Friday, 14 October 2022

उदाहरणार्थ ‘पांडुरंगा’चं दर्शन वगैरे!

उदाहरणार्थ ‘पांडुरंगा’चं दर्शन वगैरे!

अमूक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलेच पाहिजे, असे आजचे भाबडे साहित्यशास्र सांगते. हे शास्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे कळते. कळले तरी आपण कुठे त्यात बसतो. बरं, आपण काही दररोज लिहित नाही आणि लेखक तर मुळीच नाही. ‘लेखकराव’ तर माहीतच नाही. शिवाय फेसबुक वगैरेंवर पोस्टी दररोज डकवत नाही. म्हणून तर उद्याच्या ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त हा लेख लिहिला...

उदाहरणार्थ ‘वाचन प्रेरणा दिना’च्या शुभेच्छा देताना ‘पांडुरंगा’च्या भेटीतून मिळालेल्या प्रेरणेबाबत वगैरे मला काही तरी शेअर करायचे आहे... 

तुमच्या लक्षात आलेच असेल. पांडुरंग सांगवीकर आठवलाही असेल!

तुम्हाला वगैरे सांगण्यारखं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे सराची बऱ्याच दिवसानंतर नुकतीच भेट झाली. कोरोनापश्चात ही पहिलीच भेट. तीही पुण्यातील मित्र सुनील चव्हाणमुळे. नेमाडे सरांशी जुळलेले ऋणानुबंधही सुनीलमुळेच! कोरोनापूर्वी नेमाडे सरांना बऱ्याचदा भेटण्याचा योग आला आहे. त्यांच्याशी गप्पा म्हणजे आपण समृद्ध होत जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून दडपण येते; पण माणूस अतिशय प्रेमळ आणि गप्पावेल्हाळ. विविध विषयांवरील त्यांची परखड मते वाचनाची प्रेरणा देत असतात. प्रत्येक भेटीनंतर आपल्या शिदोरीत नवीन प्रेरणा आणि ऊर्जेचा संचय होतो. त्याच भेटीत त्यांचे सारथ्य करण्याचा योग लाभणे आणखीच आनंददायी-  लाभले भाग्य करतो सारथ्य!

            मी वांद्रा येथे राहत असताना विविध कारणांमुळे ने सरांकडे जाणे होत असे. पंधरा दिवसांपूर्वी सरांकडे जाताना माझ्याकडील त्यांची सर्व पुस्तके मी घेऊन गेलो. मला त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या होत्या. कोणतेही पुस्तक वाचताना पुस्तकावरच अनेक ठिकाणी अधोरेखित किंवा त्याबाबत दोन- चार शब्दांत काही तरी लिहून ठेवण्याची माझी सवय आहे. त्यांच्या पुस्तकांवरही अशाच खाणाखुणा व वाचताना जो विचार आला असेल ते लिहून ठेवलेले होते. त्यावर सरांची नजर गेली. ते मिश्किलपणे म्हणाले, यात माझ्या साहित्याची एक चांगली समीक्षा दडली असावी. मिश्किलता लक्षात घेऊनही सरांची ही टिप्पणी माझ्या अंगावर मूठभर मास चढविणारी होती.

सर, माझ्याकडे ‘मेलडी’ व ‘देखणी’ हे काव्यसंग्रह आणि ‘सोळा भाषणे’ ही पुस्तके नाहीत, ते स्वाक्षऱ्या करत असताना मी म्हणालो.

थांब! गेल्या आठवड्यातच ‘सोळा भाषणे’ची तिसरी आवृत्ती आली. तुला एक प्रत देतो, असे म्हणत लगेचच आतून त्यांनी नवीकोरी प्रत स्वाक्षरी करून मला दिली.

काव्यसंग्रहाच्या प्रती आता नाहीत. लवकरच एकत्रित काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. त्यात सर्व कविता असतील. आल्या- आल्या त्याची प्रत तुला नक्की देईन, असे सांगत त्यांनी त्यांच्या ठेवणीतील मेलडी’ व ‘देखणी’च्या प्रती आवर्जून दाखविल्या.

नेमाडे सरांनी त्यांच्या सर्व पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीच्या प्रती क्रमवार जपल्या आहेत. त्यांची खोली ‘टॉप टू बॉटम’ आणि चौफेर भरगच्च पुस्तकांनी भरली आहे. औरंगाबादमध्ये असताना त्यांनी स्वत: ‘वाचा’ नावाची प्रकाशन संस्था काढली होती. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, मनोहर ओक, वसंत दत्तात्रय गुर्जर, तुलसी परब, सतीश काळसेकर आदींचे साहित्यही त्यांनी प्रकाशित केले होते. ते सर्व बघता- चाळता आले. त्यांच्या खजिन्यातली ‘कोसला’च्या पहिल्या आवृत्तीची पहिली प्रतही चाळली. सप्टेंबर 1963 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोसलाची किंमत होती दहा रुपये. 

नेमाडे सरांच्या घरी साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेत असताना ‘ललित’च्या जून 2015 च्या अंकात वाचलेला लेख आठवला- साठोत्तर कालखंडात लघुअनियतकालिकांची चळवळ फोफावली होती. नेमाडे सरही त्यात सक्रीय होते. एकदा ते प्रकाशक रा. ज. देशमुख यांना भेटले होते. त्यांना म्हणाले, खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसांत सहज लिहिता येईल.

असं मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. एकतरी असं पुस्तक तुम्ही लिहून दाखवा, असे आव्हान देशमुखांनी दिले. नेमाडे सरांनी ते सहजपणे स्वीकारले आणि अभूतपूर्व युगप्रवर्तक ‘कोसला’ जन्मली.

कोसला’नंतर ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबऱ्या आल्या. ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ ही अलीकडची बहुप्रतीक्षित कादंबरी. पाच- सहा वर्षांपूर्वी मी कोसला पुन्हा वाचली. कोसलाच्या नायकाचे- पांडुरंग सांगवीकरचे विश्व अधिक भावते. पांडुरंग खानदेशातून पुण्यात शिकायला जातो. मी पुण्यात ‘रानडे इन्स्टिट्यूट’ येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर सांगवीकर अधिक आपला वाटू लागला होता.

बिढार, हूल, जरीला आणि झूलचा नायक चांगदेव पाटीलही आपल्या गावशिवारातला असल्यासारखा भावतो. या चारही कादंबऱ्या ‘चांगदेव चतुष्ट्य’ म्हणून ओळखल्या जातात. नेमाडे सर स्वाक्षऱ्या करत असताना हे सगळे आठवू लागले.

चांगदेव चतुष्ट्यकातील झूलमध्ये नामदेव भोळे भेटतो. नामदेव भोळेचा स्वगतासारखा परिच्छेद झूलच्या पहिल्याच पृष्ठावर आहे, परवा आईच्या अस्थी नर्मदेत सोडताना आपण हिंदू धर्माच्या लाखो पिढ्यांच्या परंपरेतले एक सनातन धर्माभिमान आहोत, असं त्याला वाटलं. आपला सगळा बुद्धिवाद, नास्तिक तत्त्वज्ञान, पाश्चात शास्त्राचं अध्ययन अध्यापन- सगळं ढोंग तर नाही ना असं त्याला वाटून गेलं.

भोळेचं हे चिंतन आपल्याच जगण्यातली विसंगती दाखवते, असे भासत राहते. भोळेबद्दल नेमाडे सरांना विचारताच ते म्हणाले, भोळेलाच हिंदूचा नायक करायचे होते; पण त्याचे व्यक्तिमत्व हिंदूचा पट मांडताना सूट झाले नसते. शिवाय चांगदेव चतुष्ट्यकासारखं ‘खंडेराव चतुष्ट्य’ डोक्यात होतं.

मी हिंदू पहिल्यांदा वाचायला घेतली. तीस- चाळीस पृष्ठानंतर बाजूला ठेवली. कठीण वाटली. काही कालावधीनंतर पुन्हा घेतली आणि कष्टपूर्वक वाचली. त्यातला एक संवाद मनाला भिडतो, खंडेराव, तू शेती करायचं ठरवलं तर नवरा होऊ नकोस आणि लग्न करायचं ठरवलं तर शेतकरी होऊ नकोस.

खंडेराव विविध प्रश्नांच्या भोवऱ्यात फिरत असताना ‘आपली नेमकी ओळख काय?’ हा प्रश्न त्याला व्यापक संस्कृतीशोधाकडे नेतो. नेमाडे सरांचे समग्र वाङ्मय वाचल्यावर खंडेरावच्या संस्कृतीशोधाचा अंदाज येतो.

हिंदूच्या दुसऱ्या भागाचा मसुदा सहा- सात वर्षांपूर्वीच झाला होता; परंतु देशातील सामाजिक, राजकीय संदर्भ बदलल्याने त्यात पुन्हा बदल करणे आवश्यक झाले, हे नेमाडे सरांनीच एकदा सांगतिले होते.

कुठलाही वेगळा संदर्भ किंवा मुद्दा आठवला की तो ते मोजक्या शब्दांत चिठोऱ्यावर लिहून ठेवतात. उदा. त्यांनी एक चिठोरे दाखविले. त्यावर ‘पांडुरंग काळा? पांडुरपुरचा? दगडाहून वीट मऊ’ लिहिले होते.

असे का? मी उत्सुकता म्हणून विचारले.

पाडुंरंग विटेवरच का उभा राहिला असावा? त्यावरून पुढे काही तरी सूचेल. ते आतापासून डोक्यात राहील,

दगड आणि विटेची तुलना नेहमची होते; पण नेमाडे सर त्यांच्या शैलीत नक्कीच त्याबाबत कुठल्यातरी साहित्यकृतीत भाष्य करतील आणि ते आपल्याला वाचायला मिळेल.

नेमाडे सरांच्या देशीवादाबाबत काहीजणांचे आक्षेपही असतात. आपण मुदलात देशी असल्याशिवाय वैश्विक होऊ शकत नाही, ही भूमिका त्यांच्या देशीवादाच्या मांडणीतून प्रकट होते. देशी परंपरेचे भान राखणारे कुठल्याही लेखकाचे लेखन श्रेष्ठ ठरेल, असे त्यांना वाटते. वैश्विकतेच्या नावाखाली निव्वळ इंग्लड, अमेरिकेचे नियम पाळणे ही सर्व बौद्धिक क्षेत्रातही वसाहतवाद चालू ठेवण्याची लक्षणं आहेत, असे त्यांनी ऑक्टोबर 1998 मध्ये दिल्लीत केलेल्या एका भाषणात म्हटले होते.

आपली देशी मूल्ये ही जगातल्या आधुनिकतेत दिसणारी पोकळी भरून काढायला पूर्ण सक्षम आहेत, असेही त्यांनी याच भाषणात नमूद केले होते. हा सगळा तपशील ‘सोळा भाषणे’ या पुस्तकातील ‘देशीवाद आणि आधुनिकता’ या प्रकरणात आहे.

नेमाडे सरांसारख्या व्यक्तीची भेट झाल्यावर फोटो काढणे हे ‘शास्र’ असते. फोटोसह काही शब्द लिहून फेसबुवर टाकणे ‘महाशास्र’ असते. मग आपणही ही परंपरा पुढे नेली पाहिजे. त्यासाठी लिहावे की नाही, असे स्वत:लाच विचारून घेतले.

हो! उत्तर येताच हा प्रपंच थाटला.

नेमाडे सरांनी ‘टीकास्वयंवर’मध्ये ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?’ हे सांगितले आहे. त्यातला आणखी तपशील म्हणजे, अमूक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलेच पाहिजे, असे आजचे भाबडे साहित्यशास्र सांगते.

हे शाहित्याचे शास्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे कळते. कळले तरी आपण कुठे त्यात बसतो. बरं, आपण काही दररोज लिहित नाही आणि लेखक तर मुळीच नाही. लेखकराव तर दूरचा पल्ला आहे. शिवाय फेसबूक वगैरेवर दररोज पोस्टी डकवत नाही. म्हणून मी हा लेख लिहिला. उद्या वाचन प्रेरणा दिनाच्या पोस्टींचा पूर येईल. त्यात आपली पोस्ट वाहून जाईल. त्यामुळे आजच या दिनाच्या पूर्वसंध्येला पोस्ट डकवली. आणि हो! तुम्ही ती संपूर्ण वाचली. तुमचे आभार वगैरे.

उदाहरणार्थ तुर्तास एवढेच!

                                                                                                                              -जगदीश मोरे


उपेक्षित भाद्रपद

 उपेक्षित भाद्रपद

साधारणत: दोन आठवड्यापूर्वी दुपारच्या सुमारास बाहेर डोकावलं. इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. पावसानं आवरतं घेतल्याचं जाणवलं. ऊन पावसाच्या खेळात ऊन्हाचीच जास्त सरशी होती. कधी लख्ख प्रकाश तर कधी दाटून आलेली अभ्रं. गावाकडंचं जिनिंग प्रेसिंग मीलचं आवार आठवलं. इथं मात्र आख्खं आभाळचं कापसाच्या ढिगानं व्यापलं होतं. काळ्या, पांढऱ्या, राखाडी रंगाच्या मेंढ्यांचे कळपही दिसत होते. भाद्रपद आकाशात मर्यादित रंग खेळत होता. आकाश मोकळं होऊ पाहत असल्याचं ते लक्षण होतं. कृषक जीवनासाठी ती मंगलमय चाहूल होती. सुगी जवळ आली. धनधान्याच्या राशी सजतील. ओसरीतला कापसाचा ढीग कलेकलेनं वाढत जाईल. भाव घसरत जाईल.

सर्वपित्रीनंतर आता हळूहळू आकाश चकाकू लागलं आहे. पित्र तृप्त झाले असावेत. आश्विनच्या आगमनानं ढग बहुरुप्यासारखी सोंगं बदलत आहे. आकाशात लखलखणाऱ्या सोनेरी- रुपेरी तारकांसह तांबूस तारेही दिसू लागले आहेत. अधून- मधून सायंकाळी विजाही कडाडतात. ढग कधीही झपकन येऊन दोन- चार थेंब शिंपडून जातात. दिवसा उष्मा आणि रात्री गारवा. ऑक्टोबर हिटचा हा सांगावा. ढगा आडूनही ऊन प्रभाव दाखवतं. ढगांची ती तक्रारच नाही. हेच ऊन त्यांना रुपेरी बनवते. कांचनच्या झाडाला रंगीबेरंगी फुलांचा बहर येण्याचाही हाच काळ आणि आपट्याचं झाड समजून सोन्यासाठी त्यांची पानं ओरबाळण्याचीदेखील हीच ती वेळ. तोच तो दसरा!

मुंबई - ठाण्यात ठिकठिकाणी मैदानांवर- रस्त्यांवर विविध मंडळांच्या, गटांच्या देव्या विराजमान झाल्या आहेत. भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. सायंकाळी स्टेशनवरून रिक्षेत बसलो तरी आरामात देवी देर्शनाचं पुण्य लाभतं. रिक्षा मुंगीच्या पावलानं मार्गक्रमण करते. काही लोक उगीचच विविध रस्ते बंद केल्यानं वाहतूकीची कोंडी झाल्याच्या तक्रारी करतात. दांडिया उत्तरोत्तर रंगू लागतो. ‘गोंगाट- दणदणाटा’चाही लोक आनंद लूटतात. लोकलच्या फलाटापासून डब्बा आणि कार्यालयापर्यंत दररोज एकसारखा रंग दिसतोय. निसर्ग बेशिस्तीत मर्यादित रंग उधळत असताना शिस्तप्रिय बायकांचं रंग प्रदर्शन लोभस आहे. अलीकडे बऱ्याच लोकलमधील ‘व्हिडिओ कोच’ची सुविधा रेल्वेनं काढून घेतली आहे; पण हा कुणावरही अन्याय नाही. फक्त एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा न्याहाळता येत नाहीत, एवढंच!

आश्विनचं स्वागत दमदार झालं आहे; पण भाद्रपद येऊन गेल्याचं कळलं नाही. तसंही भाद्रपद कधी येतो- जातो ते मोठ्या शहरांत कळत नाही. श्रावणाचं मात्र केवढं कौतुक होतं. श्रावण पाळल्याचे ढोल बडविले जातात. न पाळणाराही अभिमाने सांगतो. विषय श्रावणाचा नाहीच आहे. भाद्रपदाचा आहे. तो मात्र उपेक्षितच राहतो.

भाद्रपद आला की गाव- खेड्यांत पटकन कळतं. कुत्रे दिसू लागतात. पदोपदी भाद्रपद. शहरातल्या ‘डॉगीं’ना भाद्रपदाचं अप्रूप काय! ‘स्ट्रिट डॉग’ तर अनेकांना नकोच असतात. असलेच तर बळजबरीनं माणसं त्यांची नसबंदी करतात. प्राणीवत्सल लोक ‘स्ट्रिट डॉग’ना शेजारच्या इमारतीजवळ किंवा घराजवळ जाऊन बिस्किट घालतात. अशा लोकांना दूष्ट लोक पाठिमागं शिव्यांची लाखोली वाहतात.

मुंबईसारख्या शहरात  ‘बँडस्टॅंड’ अथवा ‘मरिन ड्राईव्ह’वर भाद्रपद असो अथवा वैशाख वणवा, हमखास गर्दी असते. गुलुगुलु गप्पा असतात. वर्षा ऋतूत तर नजाकतच वेगळी असते. सोबतीला छत्रीचे छत दोघांसाठी पुरेसे असते; पण काही जणांना नाही आडत हे. संस्कृती रक्षणाची नेहमी त्या बिचाऱ्यांनीच का चिंता वाहावी? अगदी ‘व्हॅलेंटाईन डे’लाही त्यांनी तरुणाईला हुसकावून पाहिले होते. आता मात्र त्यांनाही आला असेल कंटाळा!

असो! भाद्रपद सरला आहे. आश्विनचे बरेच दिवस अजून उरले आहेत. दसरा गेला की दिवाळी आहेच!

                                                                                                                                             -जगदीश मोरे

 

Sunday, 3 July 2022

रंधा

रंधा: गुळगुळीततेवरचे निसटलेले जगणे

स्टोव्हच्या तोंडात द्वारकाने एक- दोनदा पिन लावली. आगकाडी पेटवली. स्टोव्हच्या तोंडात अचानक मोठी ज्योत पेटली. द्वारकाच्या चेहऱ्याजवळून ज्योत चाटून गेली. तशी ती घाबरली. मागे सरकणार तोच अचानक टोव्हचा भडका झाला. बघता बघता स्टोव्हचा स्फोट झाला अन् द्वारकाच्या साडीला आगीने धरले. द्वारका एकदम घाबरली. आपण आधी स्टोव्ह विझवावा? पण कसा विझवावा? की आधी आपली साडी विझवावी? अजून दुसरं काय करावं? अशा अनेक प्रश्नांचा गुंता तिच्या डोक्यात वाढत गेला. तिला काही समजत नव्हते. क्षणाक्षणाला आग वाढत गेली. हवेचा वेग जास्त होता. त्यामुळे आग घरात चहुबाजूला पसरली. झोळीत झोपलेल्या बाळाला आता आगीनं कवेत घेतलं. त्याला आगीच्या झळा लागत होत्या. बाळ आक्रोशाने रडत होते. आता ते जागेवर जास्ती हालचाल करत होते. झोळीच्या गोधडीला आगीने धरले. क्षणात झोळीचा दोर तुटला. बाळ आगीत पडले. द्वारका अजून घाबरली. बाळाला वाचवण्यासाठी ती पुढे सरसावली. बाळ आणि द्वारका दोघेही पेटत होते. आग आता प्रचंड वाढली होती. ती जिवाच्या आकांताने आरोळ्या मारत होती, वाचवा होऽऽ वाचवाऽऽ… कोणी माझ्या बाळाला तरी वाचवाऽऽ. कोणी तरी वाचवा होऽऽ

श्री. भाऊसाहेब मिस्तरी यांच्या ‘रंधा’ कादंबरीचा हा ब्लर्ब अंगावर शहारे आणतो. कादंबरीविषयीची उत्सुकता वाढवितो. कादंबरीच्या सुरुवातीला वेगवान नाट्यमयता आहे. कारुण्याची किनार आहे. वाचताना प्रचंड अस्वस्थता दाटते. कादंबरीचा नायक- अण्णाच्या संसारात पुरुषी मानसिकतेचा गंड विघ्न घेऊन येतो. संसारातील विघ्नांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र होत जातो. त्यातून कादंबरी पुढे जाते खरी; पण वाचक म्हणून मध्यास पकड काहीशी सैल झाल्यासारखे वाटू लागते. काही पृष्ठानंतर ती पुन्हा मजबूत होते. संपूर्ण कादंबरी खानदेशच्या पार्श्वभूमीवर विशेषत: धुळे जिल्हा आणि आर्वी गावाभोवती फिरत राहाते. शीर्षकावरून ती बलुतेदारीवर भाष्य करणारी वाटत असले तरी ती त्यास केवळ स्पर्श करते. ग्रामीण व्यवस्था, कृषक जीवन, आर्थिक ओढाताण आदींवर ती अधिक भाष्य करते. विवाह पद्धती, आखाजीसारखे सण- उत्सव, ग्रामीण संस्कृती आदींचे दर्शनही लेखक करून देतो.

भविष्य सांगणारा पिंजऱ्यातला पोपट घेऊन गावोगावी आणि गल्लोगल्ली फिरत असतो. मोठ्या आशेने लोक आपले भविष्य बघतात; पण भविष्य उज्ज्वल होत नाही. मुलींच्या आशा- अपेक्षांना दुय्यम स्थान देणारा समाज आपल्या अपेक्षांचे ओझे मात्र त्यांच्यावर लादतो. कुसुमला चांगले स्थळ मिळणार असतानाही बापाच्या आग्रहास्तव अण्णाची बायको म्हणून आयुष्याला सामोरे जावे लागते. गावात येणाऱ्या विक्रेत्यांना किंवा कल्हईवाल्यालाही जीव लावणाऱ्या महिलांचे भावविश्व संवेदनशीलता दाखवते. आपल्या पोराबाळांना बरे करण्यासाठी दिलेल्या औषधाचा मोबदला देण्यासाठी काहीच नसताना आपली शेळी फकिराला सहज देणाऱ्या माणसांचे उदारपण वाचकाच्या मनात कणव जागृत करते. रित्या आयुष्यासमोर हात न टेकणारी ग्रामीण माणसे काळासोबत लढत राहतात. संकटांशी सामाना हेच त्यांचे प्राक्तन असते, याची ठळक जाणीव ही कादंबरी करून देते.    

खानदेशातील गावगाड्याचा, गरिबीचा पट या कांदबरीतून उलगडतो. खानदेशातील गावागावांतील आणि कुटुंबाकुटुंबातील प्रतिबिंब शब्दागणिक उमटते. अण्णाचे संपूर्ण आयुष्य कष्टमय आहे. भाकरीच्या चंद्रासाठी लढणाऱ्या अण्णाचा जगण्याचा संघर्ष संपत नाही. रुढी- परंपरा अंद्धश्रद्धा त्याच्या जगण्याचे अविभाष्य अंग असते. बैलगाडी घडविणे आणि शेतीची अवजारे तयार कहणे हे त्याचे नैसर्गिक कसब आहे. लाकडे तासताना त्याच्या स्वत:च्या आयुष्याच्या खपल्या निघत राहतात. बैलगाडीची चाके अधिकाधिक वेगवान करण्यासाठी धडपडणाऱ्या अण्णाच्या जगण्याला मात्र गती लाभत नाही. त्याची खंत करण्याची त्याला उसंत नाही. सुतारकाम आणि मोलमजुरीवर संसाराचा गाडा तो हाकत राहतो. अण्णाच्या आयुष्याचा हा प्रवास रंध्यामुळे गुळगळीत होतो खरा; पण जगणे मात्र निसटून जाते. (कादंबरीचे लेखक- भाऊसाहेब मिस्तरी, मो. 9960294001.)

-जगदीश मोरे


Wednesday, 20 April 2022

पांढऱ्या सोन्याची काळी गोष्ट

श्री. सुरज नागवंशी यांचं चित्र

श्री. मॉग्लॅन श्रावस्ती यांचं चित्र 

पांढऱ्या सोन्याची काळी गोष्ट

कापसाच्या एका बोंडात पाच लाख धागे असतात, असं म्हणतात. कापसाची रूई, रुईचं सूत, सुताचं कापड. कापसाची सरकी, सरकीचं तेल आणि पशुखाद्य, असे बरेच धागे एकमेकांत विणले गेले आहेत. या धाग्यांशी प्रत्येकाचं प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष नातं आहे. कापसाचा कोणताही धागा पकडा, तिथून आपल्या नात्याची सुरुवात होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जगण्याचं आणि मरणाचंही कारण कापूसच आहे. कापूस अंग झाकतो. जखमेवर अलगद बसतो. अंथरुणावर निद्रिस्त करतो. सरणावरच्या ओंडक्यांना भडकविणाऱ्या पऱ्हाटीच्या काड्या निर्जीव देहाची राख करण्यास हातभार लावतात.

माझीच कपाशी

मीच उपाशी

माझंच बोंड

माझीच बोंब

माझाच धागा

माझाच फास

माझचं सरण

माझंच मरण

हे सूचण्याचं निमित्त आणि ठिकाण होतं, जहांगीर आर्ट गॅलरीतलं चित्रप्रदर्शन! तिथल्या ‘Revolution and Counter Revolution’ या प्रदर्शनातील कापूस उत्पादक शेतकऱ्याशी संबंधित दोन चित्रं अस्वस्थ करणारी होती. कापसाच्या धाग्याशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारी होती. प्रदर्शनात इतरही अनेक लक्षवेधी चित्रं आणि कलाकृती होत्या. श्री. सुरज नागवंशी यांचं चित्र बारकाईनं वाचल्यास- बघितल्यास पांढरं सोन्याचं भीषण वास्तव अंगावर आलं. श्री. मॉग्लॅन श्रावस्ती याच्या चित्रातल्या शेतऱ्याच्या फासानं मन सुन्न झालं; पण ते आशेचा किरणही दाखवणारं होतं.

कापूस म्हणायला नगदी पीक आहे. त्याचं दुखणंही नगदीच आहे. ते जीवघेणं आहे. राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादन विदर्भात होतं. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भातच झाल्या. मराठवाडा आणि खानदेशातील कापूस उत्पादकही वैतागले आहेत. कापसाच्या इतिहासाचं उत्खनन केल्यावर त्याची मूळं बरीच खोलवर असल्याचं संशोधकांनी हेरलं आहे. ज्ञात असलेलं सर्वात जुनं कातलेलं सूत मोहें-जो-दरो येथील उत्खनात सापडलं आहे. यावरून इ. स. पूर्व 3,000 वर्षांपासून भारतात कापूस लागवड होत असावी, असा निष्कर्ष आहे. कापसावरचं मीना मेनन आणि उझरम्मा यांचं ‘अ फ्रेड हिस्ट्री- द जर्नी ऑफ कॉटन इन इंडिया’ हे अलीकडंचं पुस्तकं कापसाच्या इतिहासाचा उलगडा करतं.

जगाचा विचार केल्यास भारतात कापसाचं सर्वाधिक क्षेत्र आहे. तुलनेनं उत्पादनात मात्र मागं आहे. कापसाच्या क्षेत्राबाबत महाराष्ट्र देश पातळीवर अव्वल आहे; पण उत्पादनात हवा आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा कापूस लागवडीत सर्वात पुढं आहे. तिथंच अधिकाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातला सर्वाधिक कापूस विदर्भात पिकतो. सूतगिरण्यांचा बोलबाला मात्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. पांढरं सोनं पिकतं विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात. महाराष्ट्राचं मँचेस्टर- इचलकरंजी मात्र कोल्हापूरात आणि भरभराट मुंबई बंदराची. मुंबई विद्यापीठातील राजाबाई टॉवरचासुद्धा एक धागा कापसाशी संबंधित आहे.

अमेरिकेतील गृहयुद्धामुळे ब्रिटनला कापसाची कमतरता भासू लागली. तेव्हा मुंबईमार्गे इंग्लंडमध्ये कापूस निर्यात होऊ लागला. कापसाच्या गाठी ठेवण्याचं ठिकाण ‘कॉटन ग्रीन’ नावानं ओळखलं जाऊ लागलं. (हार्बर लाईननं जाताना कॉटन ग्रीन स्टेशन लागतं; पण तिथं आता कापसाचा मागमूसही नाही जाणवत.) सूत गिरण्यांमुळे ‘गिरणगाव’ नावारुपास आलं. (गिरण्यांच्या थडग्यांवर आता गगनचुंबी इमारती दिसतात.) कापसाच्या व्यापारात मुंबईनं उचल खाल्ली. भरभराटही झाली; पण कापूस भारतातला आणि कापड इंग्लंडचा. कापूस स्वस्त; कापड महाग. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणाले होते, ‘कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावा’

प्रदर्शनातील कापसाच्या चित्रानं बरीच वर्षे मागं नेलं. दहा रुपये रोजंदारीवर कापूस वेचणीचे दिवस आठवले. पाठीवर किटनाशक फवाणी यंत्र ठेवत एका हातानं हापसे आणि दुसऱ्या हातानं फवारणी करतानाचा उग्र विषारी वासाच्या आठवणी अजूनही झोंबतात. अनेकांचं आजही तेच प्राक्तन आहे. पत्रकारितेतून सरकारी नोकरीत आल्यावर आत्महत्याग्रस्त पूर्व विदर्भात फिरता आलं. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या तत्कालीन महासंचालक मनीषा पाटणकर- म्हैसकर मॅडम यांच्या संकल्पनेतून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यातून यशोगाथा शोधायच्या होत्या. लिहायच्या होत्या. खरं तर यशोगाथेपेक्षा प्रतिकूल स्थितीशी संघर्ष करत धिरानं उभ्या राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाच्या प्रेरणादायी कहाण्याचं संकलन करायचं होतं. विदर्भात फिरताना वेगळ्या अंगानं कापसाच्या शेतीकडं आणि शेतकरी कुटुंबांकडं पाहता आलं.

कपाशीच्या पिकावर चौहबाजुनं हल्ले होत राहतात. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढऱ्या माशा, पिठ्या ढेकूण शेतकऱ्यांच्या काळजाची लचके तोडतात. वेचणीला येऊ पाहणारी बोंडं अळी हिरावून नेते. आतड्यांना चिमटे बसतात. पिकावरचा लाल्या रोगाचा पादुर्भाव थेट शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो. मर रोग फासाचा धागा शोधण्यासाठी उद्दिपित करतो. बेईमान पाऊस हवा तेव्हा रुसतो आणि नको असताना कोसळतो.

निसर्ग साथ देतो तेव्हा कापूस उत्पादकांचा बाजारात पराभव होतो. निर्सग साथ सोडतो तेव्हा बाजार खुणावतो; पण शेतच नागवं झालेलं असतं. यंदा कापसाचा प्रतिक्विंटल भाव दहा- बारा हजार रुपयांवर गेला; पण ऊरी फक्त खंतच आहे. बाजारा वधारण्याआधीच पावसानं सर्वच धुवून काढलं. झाडाला बोंड ठेवलं नाही. किंबहुना त्यामुळेच बाजार वधारला आणि शेतकरी बेजार झाला. पावसानं झाडालाही सडवलं. शेतकऱ्याला रडवलं. कधी ओला; तर कधी कोरडा दुष्काळ, हेच शेतकऱ्याच्या ललाटी लिहिलं आहे.

श्री. सुरज नागवंशी यांचं चित्र कापसाच्या शेतीची भीषणता मांडतं. कॅन्व्हासभर असलेला भडक लाल रंग भीतीदायक वाटतो. शेतकरी आत्महत्यांचं कटू सत्य सांगतो. शेतकऱ्याच्या रक्तानं माखलेल्या संपूर्ण शेतीत कुठं तरी कापसाची शुभ्र बोंडं दिसतात. आभाळात लुकलुकणारं एखादं चादणं संपूर्ण अंधार भेदत नाही. दिसायला फक्त सुंदर असतं. कॅन्व्हासवरची बोंडंही सुदंर; पण शेतातलं एखादं- दुसरं सुंदर बोंड जगण्यास बळ देण्यासाठी पुरेसं नसतं. ते कष्टाचं पुरेसं फळ नसतं, हे विदारक चित्र काळजी पिळवटणारं असतं.

‘क्रांती- प्रतिक्रांती’ या प्रदर्शनातलंच श्री. मॉग्लॅन श्रावस्ती यांचं चित्र कटू वास्तव दर्शवताना आशेचा मार्गही दाखवतं. कुटुंबाचा आधारवड हरपल्यानं झालेली हानी भरून निघणार नाही; परंतु आता पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढावं लागेल, हेच ते चित्र सांगतं. त्यात फास घेतलेला शेतकरी बाप, मेलेला बैल या पार्श्वभूमीवर एक आई मुलीला पुस्तकातलं काही तरी वाचवून दाखवत आहे. शिक्षण हीच भविष्याची आशा आणि दिशा आहे. तोच एक उन्नतीचा मार्ग आहे, तेच ही थरारक चित्रकथा सांगत असते.  

-जगदीश मोरे


Monday, 8 March 2021

प्रणालीची महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती

प्रणालीची सायकल भ्रमंती

          मित्र श्री. चैत्राम पवार यांच्या खूप दिवसांच्या निमंत्रणानंतर गेले दोन दिवस (दि. 6 आणि 7 मार्च) बारीपाड्यात (ता. साक्री, जि. धुळे) सहकुटुंब होतो. योगायोगाने तिथे सायकलवरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भ्रमंती करणाऱ्या प्रणाली विठ्ठल चिकटे या तरुणीची भेट झाली. प्रणालीने गेल्याच वर्षी व्यावसायिक समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी (बी. एस. डब्ल्यू) प्राप्त केली. प्रणालीने विज्ञान शाखेतून बारावी केली; परंतु त्यात तिला रस नव्होता. समाजकार्याबाबतही तिला फारशी माहिती नव्हती. तरीही तिने बीएसडब्ल्यूला प्रवेश घेतला आणि आपण आवडीच्या विषयाकडे वळल्याची तिला जाणीव होऊ लागली. आपल्या स्वत:च्या जाणिवा विस्तारण्यासाठीच ती आता सायकलवर स्वार होऊन महाराष्ट्र भ्रमंतीसाठी घराबाहेर पडली आहे.

            प्रणालीदेखील गावखेड्यातील चारचौघींसारखीच सर्वसामान्य मुलगी आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) येथील कास्तकार कुटुंबातील तीन बहिणींमधील शेंडेफळ. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने बारावीनंतरच घराचा उंबरठा ओलांडला होता. कापसाच्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रणालीसह तिन्ही बहिणी आईवडीलांना शेतीच्या कामात हातभार लावतात. बीएसडब्ल्यूसाठी तिने चंद्रपूर येथील एसआरएम समाजकार्य महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पदवीचे शेवटचे वर्ष संपत आले आणि संपूर्ण विश्व कोविड-19 च्या गडद छायेखाली झाकोळले गेले. लॉकडाऊनने प्रत्येकाला घरात बंदीवान केले.

            प्रणालीची जिद्द आणि उत्साह लॉकडाऊनवर स्वार झाला. तिच्या विचारांची चाके वेगाने धावू लागली. कन्याकुमारीला सायकलने प्रवास करण्याचे स्वप्न ती बऱ्याच दिवसांपासून बाळगून होती. या स्वप्नाला तिने थोडे वेगळे वळण दिले आणि लॉकडाऊनमध्येच तयारीला लागली. स्वत:ला मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पर्याय शोधू लागली. घरोघरी सायकलीने जाऊन वृत्तपत्र टाकण्याचा मार्ग तिने निवडला. त्यातून थोडेफार पैसेही मिळू लागले. चंद्रपुरातले घर भाडेही सुटू लागले. लॉकडॉऊनच्या काळात तिथे ती 75 ते 80 घरात दररोज पहाटे वृत्तपत्र टाकत असताना करोनाच्या ताणतणावावर नकळत ती मात करू लागली. सायकलचाही आपोआप सराव होऊ लागला.

            संपूर्ण विश्व सप्टेंबरच्या अखेरीस अंशत: अनलॉक होऊ लागले होते. तीच वेळ साधत पाठीवर कमीतकमी गरजांची आणि मनावर कमीतकमी अपेक्षांचे ओझे घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रणाली ऑक्टोबरमध्ये सायकलवर स्वार झाली. स्वत:च्या गावातून (पुनवट) आईवडीलांच्या आशीर्वादाने ती आता लांब पल्ल्याच्या आणि दीर्घ कालावधीच्या प्रवासासाठी उंबरठा ओलांडत होती. आपली तरुण मुलगी एकटीच सायकलीन महाराष्ट्रभर अनोळख्या परिसरात हिंडणार आहे, या कल्पनेने कुठल्याही आईवडीलांच्या काळजात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही. प्रणालीचे आईवडीलही हाडामासाचेच. तरीही त्यांना फारसे कनव्हिन्स करावे लागले नाही. तेवढा विश्वास प्रणालीने त्यांना आपल्या वर्तनातून दिला होता, हीच तिची जमेची बाजू होती.

            ऑक्टोबरमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून सुरू झालेला तिचा हा प्रवास पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांनंतर आता खांदेशापर्यंत झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगावसारख्या अत्यंत दुर्गम भागातही ती जाऊन आली. जागतिक महिला दिनाच्या दोन दिवस आधी ती बारीपाडा येथे श्री. चैत्राम पवार यांच्या कुटुंबात रमली आहे. एक छोटासा आदिवासी पाडादेखील पर्यावरण संवर्धनाचे एक उत्तम प्रतीक होऊ शकते, हेच ती जाणून घेत आहे. योगायोगाने तिथेच तिच्याशी आमची भेट झाली. मी सहकुटुंब तिथे गेल्यावर माझ्या मुलींसोबत तिची चांगलीच गट्टी जमली. दोन दिवस ती आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वाटू लागली होती.

            प्रणालीसोबत दोन दिवस बऱ्याच गप्पा रंगल्या. सर्वसाधारणपणे एखादी तरूण मुलगी असे अफाट धाडस करत असल्यास आपल्या मनात सहज काही प्रश्न घर करतात. प्रणालीसोबतच्या पहिल्या संवादातच आमच्या तोंडून आश्चर्यमिश्रित प्रश्न पटापटा बाहेर पडू लागले... मुळात ही कल्पना सूचली कशी? अनोळख्या रस्त्यांनी हिंडताना आणि अनोळख्या लोकांकडे राहताना भीती वाटत नाही का?

कन्याकुमारीपर्यंत सायकलीने जाण्याचा निर्धार मी पूर्वीच केला होता. आता प्रवासाची दिशा आणि उद्देश बदलून डोक्यात विविध विचार घेऊन मी बाहेर पडले आहे. सुरूवातीला मनात काहीशी धाकधूक होती. ती आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. आतापर्यंत मी सुमारे 5 हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास केला आहे. माझ्यादृष्टीने हा संपूर्ण प्रवास अनोळखीच आहे. त्यात चांगले वाईट अनुभव येत आहेत. वाईट अनुभव अर्थांतच नगण्य आहे. जे वाईट अनुभव आहेत ते माझे आहे. चांगले अनुभव मी शेयर करणार आहे. अडचणींचा पाढा वाचायचा नाही. इतर मुलींना नाउमेद करायचे नाही. बाहेरचा प्रत्येक पुरूष वाईटच असतो, असे नाही; परंतु मी वाचलेले किंवा ऐकल्यानुसार परिचित पुरूषच महिला मुलींचे शोषण करतात. त्यामुळे अनोळखी लोकांची भीती वाटत नाही, प्रणाली आत्मविश्वासाने उत्तर देत होती.

प्रणाली राज्यतील विविध जिल्ह्यांमधील सायकलस्वारांच्या (सायकलिस्ट) संपर्कात आहे. त्याबाबत ती म्हणते, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना सायकलिस्ट लोकांची मदत होते. इतरही लोक भेटतात. त्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे असतात. विविध सामाजिक कार्यकर्ते असतात. अधिकारीही भेटात. या भेटीतून, संवादातून पुढील प्रवास आपोआप सुलभ होतो. काही लोक प्रवासाच्या दृष्टीने सर्वोतोपरी सहकार्यदेखील करतात. कुणाकडून काहीही मागण्याची गरज भासत नाही. मुळातच गरजा कमी असल्याने त्या आपोआप भागतात. कधी धर्मशाळेत राहिले. कधी मंदिरातही थांबले. कधीकधी शासकीय विश्रामगृहांमध्ये न मागता, न सांगता सोयही झाली. माझ्यादृष्टीने हे महत्वाचे नाही. संवादाला माझे प्राधान्य आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाबाबत ती म्हणाली, भविष्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी आतापासूनच कमीतकमी गरजांच्या आधारे जीवन जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. उपभोगवादी जीवनशैलीला फाटा देण्याऱ्या लोकांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पर्यावरणाच्याबाबतीत उल्लेखनीय कामे प्रत्यक्ष बघायला हवीत. मानस जोडता यायला हवीत. ती वाचता यायला हवीत. राज्याचा भूगोल व्यवस्थित अभ्यासता यावा. अनुभवता यावा. यासाठी सायकलीशिवाय दुसरा चांगला प्रवास असू शकत नाही. सायकल हाच एक मुळात पर्यावरण संवर्धनाचा सक्षक्त संदेश आहे.

महिला म्हणून स्वत:ला आधी सक्षम करणे आवश्यक आहे. कॉस्मेटिक सौंदर्य माझ्यादृष्टीने महत्वाचे नाही. आपण आपल्या अंतरमनात डोकावून पाहणे महत्वाचे आहे. अंतरमनाच्या सौंदर्यातून यशाची शिखरे सहज सर करता येऊ शकतील. त्याला कुठलाही साज चढविण्याची आवश्यकता नाही. महिला म्हणून स्वत:ला कुठल्याही मर्यादा घालून घेण्याची आवश्यकता नाही; पण मूल्यांची कास सोडता कामा नये, असे मला वाटेत, अशा विविध विषयांवर ती बिनधास्तपणे व्यक्त होत होती.   

प्रणालीचे धाडस म्हणजे मुलगी पोटी जन्माला येणे पाप समजणाऱ्या विकृतांसाठी चपराक आहे. ती आता धुळे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. तिथून पालघर आणि कोकणाचा प्रवास करणार आहे. नंतर पश्चिम महाराष्ट्रात भ्रमंती करायची आहे. पावसाळ्याच्या दरम्यान मराठवाडा गाठायचा आहे. पावसळ्यात मराठवाड्यात फिरताना उन्हाचा तडाखा बसणार नाही आणि कोकणासारखा पाऊसही झेलावा लागणार नाही. प्रवासादरम्याने राजकीय क्षेत्रातील लोकांना भेटण्याचे आपण नियोजन केले नसल्याचे प्रणालीने सांगितले; परंतु महाराष्ट्राच्या पर्यावरण खात्याच्या मंत्रिमहोदयांशी संवाद साधायला आवडेल, ही तिची इच्छा आहे.

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

                                                                                                                          -जगदीश मोरे