Thursday 17 April 2014

राज्य निवडणूक आयोग

          ‘लोकराज्यमासिकाचा मार्च-एप्रिल 2014 चा निवडणूक विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. त्यात माझाही सोबतचा लेख प्रसिद्ध झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या कारकिर्दीत राज्य निवडणूक आयोगात झालेल्या सुधारणांबाबतचा हा आढावा... 
निवडणुकांमुळेच सर्वसामान्यांनाही विकेंद्रित सत्ता व्यवस्थेत हक्काचा वाटा मिळतो. लोकशाहीतील विकेंद्रित सत्ता व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय व्यवस्थेतून कार्यकर्ते आणि नेते घडत जातात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका होय. हा संसंदीय लोकशाहीचा पाया आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा डोलारा सांभाळण्याची सांविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचा करभार चालतो. सध्या श्रीमती नीला सत्यनारायण राज्य निवडणूक आयुक्तपदाची कार्यरत आहेत. 
चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर श्रीमती सत्यनारायण यांच्याकडे ही संविधानिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत. 6 जुलै 2009 रोजी श्रीमती सत्यनारायण यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. निवडणुकांच्या निमित्ताने दौऱ्यांवर असताना त्यांनी उमेदवार, मतदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधायला सुरवात केली. त्यातून निवडणूक प्रक्रियेतील अडचणी आणि महिला सदस्यांचे प्रश्न त्यांना प्रकर्षाने जाणवले. निवडणूक चिन्हांचा प्रकार विचार करण्यासारखा होता. केळं, गाजर, खाट, कुकरसारख्या चिन्हांमुळे अपमानीत व्हावे लागत होते. या चिन्हांचा भलताच अर्थ काढला जातो, अशी बहुतांश महिला उमेदवारांची तक्रार होती. संवेदनशील महिला आयुक्त म्हणून महिलांच्या या प्रश्नाची दखल घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी तातडीने आदेश काढून एकूण नऊ चिन्हे वगळून टाकली. त्याऐवजी संगणक, दूरचित्रवाणी संचासारख्या आधुनिकतेच्या प्रतीकांचा निवडणूक चिन्हांमध्ये समावेश केला.
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाची तरतूद करून क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. या निर्णयाने अधिकाधिक महिलांना सार्वजनिक जीवनात कर्तृत्व दाखविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. त्याचा प्रत्यक्षात कितपत उपयोग महिलांना होत आहे, हे श्रीमती सत्यनारायण यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नाव बायकांचे असले तरी कारभार मात्र पुरुषच करतात. अगदी सह्याही तेच करतात. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरची महिलांची घुसमट इथेही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासंदर्भात एका संस्थेच्या मदतीने रीतसर पाहणी केली. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले, पण बळ, प्रतिष्ठा, समानता नाही मिळाली. ही घुसमट थांबविण्यासाठी श्रीमती सत्यनारायण यांच्या संकल्पनेतून क्रांतिज्योती महिला सक्षमीकरण प्रकल्प’ साकारला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांना ग्रामपचंयातीचे कायदे, कारभार, योजना, अंदाजपत्रक याबाबत प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. हा प्रशिक्षण प्रकल्प संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरला असून तो देशपातळीवर राबविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ‘यूएन वूमेनन’ या आतंरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेनेही त्याची दखल घेतली आहे.
पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्रीमती सत्यनारायण यांनी प्रारंभापासूनच सुधारणांच्या दिशेने पावले टाकली होती; पण त्यांची खरी कसोटी डिसेंबर 2011 ते 2012 या कालावधीत मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी लागली. अगदी यशस्वीपणे त्या या कसोटीला सामोऱ्या केल्या. त्यांनी केवळ निवडणुका पार पाडण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही. त्यातही अमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या. काळाच्या बरोबर राहण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे संकेतस्थळ साकारले. या संकेतस्थळावर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणूक प्रभागांच्या इलेक्ट्रॉनिक नकाशांची सुविधा आहे. महानगरपालिकेच्या एकत्रित नकाशावरून आपल्या प्रभागाचा नकाशा शोधता येतो. त्यात प्रभागातील निवडणूक अधिकाऱ्यांचे नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांची संख्या, प्रभागातील मतदार यादी आणि त्यातील आपले मतदान केंद्रही घरबसल्या शोधता येते. विविध निवडणुकांचे निकालही या संकेतस्थळावर पाहता येतात. आयोगाचे आदेश, सूचना आणि परिपत्रेकही त्यावर उलब्ध असतात. या संकेतस्थळास राज्य मराठी विकास संस्था आणि सीडॅकच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) अधिकाधिक वापरासाठीचा एज 2012’ (एन्टरप्रायजेस ड्रायव्हिंग ग्रोथ अँड एक्सलन्स थ्रू आयटी) हा पुरस्कारही मिळाला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला.            
मतदारांची गैरसोय टाळणे आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यावरही श्रीमती सत्यनारायण यांनी भर दिला आहे. त्यासाठी अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता यांना मतदानाच्या रांगेत तिष्ठत उभे राहू लागू नये म्हणून त्यांना प्राधान्य देण्यास सुरवात झाली आहे. मतदारांच्या लांब रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्र शक्यतोवर तळमजल्यावरच असते. अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था केली जाते. मतदान केंद्रावर स्वच्छता गृह, पाणी आणि सावलीची व्यवस्था केली जाते. वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ केली आहे. बोटावर निशाणी करण्यासाठी शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जाऊ लागला आहे. मतदारांच्या ओळखीसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. निवडणूक प्रचारात प्राण्यांच्या क्रूरपणे वापरावर निर्बंध घातला आहे. मतदान यंत्रांमध्ये अद्ययावत पद्धतीने सुधारणा केल्या आहेत. मतदान यंत्रांवर सांकेतिक भाषेऐवजी स्पष्टपणे माहिती दर्शविण्याची व्यवस्था केली आहे. यंत्राच्या संवेदनशील भागावर नॉन क्लोनेबल टॅग लावला आहे. यंत्रात फेरफार करता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास ते बंद होते. त्यामुळे ते अधिक सुरक्षित झाले आहे.
निवडणुकांतील पेचप्रसंगांबाबत अनुभव कथन करताना श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या, राज्य निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे. निवडणुकांच्या काळात आयुक्तांचे अधिकार सार्वभौम असतात. राजकीय पक्ष, नेते, उमेदवार आणि मतदारांची त्यांच्या बारिकसारीक निर्णयांवर बारकार्ईने नजर असते. त्या दबावातून मार्ग काढत पेचप्रसंगांसंदर्भात अचूक निर्णय घ्यावे लागतात. आचारसंहितेचा भंग, हा अत्यंत नाजूक प्रसंग असतो. आचारसंहितेचा भंग सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडूनही होऊ शकतो. त्यावर समतोल निर्णय घ्यावा लागतो. डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचंड संख्येने निवडणुका पार पडल्या. महिला आयुक्त म्हणून केवळ भावनिक विचार करून चालत नाही. आपल्या निर्णयांचे समर्थन भविष्यातही करता आले पाहिजे, म्हणून मी प्रत्येक निर्णय तावून सलाखून घेते. निर्णय प्रक्रियेत निवडणूक आयोगातील सहकाऱ्यांकडून भरपूर नैतिक बळही मिळते. पण निर्णय मात्र शेवटी आयुक्तांनाच घ्यावा लागतो. प्रसंगी कठोरही व्हावे लागते. तरच पारदर्शक निवडणुका होऊ शकतात आणि सांविधानिक पदाचा मान राखला जाऊ शकतो.
निवडणुकांच्या काळात काही वर्तमानपत्रांमधून माझ्याविषयी नकारात्मक लिहिले गेले; पण ते फारच थोडे होते. सकारात्मकतेचे पारडे जड होते. माध्यमांतील हीच सकारात्मकता मला बळ देत होती. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांत व संयमी पद्धतीने हाताळल्या गेल्याची बाब प्रसारमाध्यमांनी सातत्याने अधोरेखित केली. जनमानसांत माझी प्रतिमाही उंचावत होती. महिलांमध्ये माझ्याविषयीचा कौतुकाचा आणि आदराचा भाव पाहायला मिळत होता. काही तरुण-तरुणींनी तुम्ही आमच्या ‘आयकॉनअसल्याचे सांगून वेगळाच आनंद दिला. आनंदाबरोबर जबाबदारीचीही जाणीव होत होती. बऱ्यावाईट अनुभवांतून सर्व घटनांकडे, व्यक्तींकडे समानतेने पाहायला आणि सर्वांचे शांतपणे ऐकून घ्यायलाही मी शिकले. वाईटातून चांगले आणि नकारात्मकतेतून सकारात्मकता शोधायला शिकले. निवडणुकांचीही संधी मला केवढे मोठे दान देऊन गेली, या विचाराने मी प्रत्येक वेळा भारावते. याबाबत स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि निवडणुकांच्या अनुभावाची शिदोरी कायम सोबत राहावी म्हणून मी ‘टाकिचे घाव’ हे पुस्तक मतदारांच्या बोटावरची शाही सुकण्यापूर्वीच कागदावर उतरवून काढले, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.  
आचारसंहितेचा भंग आणि काही राजकीय नेत्यांच्या विधानांमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगालाही श्रीमती सत्यानारायण यांना सामोरे जावे लागले. त्यावर त्यांनी मात केली. त्यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या सुधारणा  मात्र कायमस्वरुपी स्मरणात राहण्यासारख्या आहेत. 

Saturday 12 April 2014

गुरुवर्य संजय कुलकर्णी

दाभोळ येथे स्टडी टूरसाठी निघालेली रानडे इंन्स्टिट्यूटमधील (पुणे विद्यापीठ) 1997-98 ची एमसीजेची बँच. डावीकडून स्व. संजय कुलकर्णी, बिमल शर्मा (आसाम), ऋषिकेश देशपांडे (वाई), डॉ. अभ्युदय रेळेकर (कराड), योगिराज करे (सोलापूर),  सचिन शर्मा (बडोदा), मृणाल सप्रे (मध्य प्रदेश), जगदीश मोरे, अनिता (केरळ), आयशा खान (बडोदा), भक्ती चपळगावकर (औरंगाबाद).  
ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी यांचे पुण्यात नुकतेच निधन झाले. पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये 1997-98मध्ये एमसीजेला असताना श्री. कुलकर्णीही आमच्यासोबत होते. त्यांनी दै. ‘केसरीत मला कामाची संधी दिली. तिथूनच माझ्या पहिल्या नोकरीची सुरवात झाली. त्यासह अनेक आठवणींचे आज स्मरण होत आहे...
 पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये एमसीजेला प्रवेश घेतल्यानंतर श्री. संजय कुलकर्णी यांच्याशी परिचय झाला. तेसंजय दिनकरया नावानेच जास्त परिचित होते. त्याच नावाने लिखाणही करायचे. त्यांनीही एमसीजेला प्रवेश घेतला होता. ते आमच्या सर्वांपेक्षा वयाने, अनुभवाने आणि सर्वाथाने ज्येष्ठ होते. ‘महाराष्ट्र हेरॉल्डचे संपादक विजय लेले आणि त्रिनिदादच्या नागरिक श्रीमती इंद्रायणी हे ज्येष्ठ पत्रकारही एमसीजेला आमच्या सोबत होते. संजय दिनकर यांच्याशी मात्र खऱ्या अर्थाने आम्हा विद्यार्थ्यांचे सूर जुळले होते. आपण सगळ्यांपेक्षा वयाने अनुभवाने ज्येष्ठ आहोत, असा कधीही त्यांचा आविर्भाव नसायचा.
दै. ‘केसरीमध्ये ते प्रदीर्घ काळापासून पत्रकारिता करीत होते. ‘सांज केसरीसुरू झाल्यानंतर त्यांच्यावर या दैनिकांच्या संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली होती. सांज केसरी दुपारी प्रसिद्ध होत असल्यामुळे ते सकाळी सातच्या आत केसरी वाड्यात येत असत. अंक फायनल करून पहिल्या लेक्चरपासून रानडेत उपस्थित रहायचे. अनेक वर्षे पत्रकारितेत असल्यामुळे तुम्हाला लेक्चरमध्ये नवीन काही जाणवत नसेल ना?, असं आम्ही त्यांना विचारत असू. त्यावर ते म्हणायचे, मी इथं विद्यार्थी आहे, पत्रकार नव्हे. विद्यार्थी नेहमीच शिकत असतो. मलाही विद्यार्थ्यांचं कर्तव्य पार पाडणं आवश्यकच आहे.
माझे ते पुण्यातले दुसरे वर्ष होते. थेट गावातून पुण्यात आलो होतो. पहिले वर्ष भांबावलेल्या स्थितीच गेले. तरीही बरेच काही शिकता आले; पण कमविण्यास सुरवात झाली नव्हती. ‘रिपोर्टिंगपासूनमार्केटिंगपर्यंत कुठल्याशा तरी अर्धवेळ कामाच्या शोधात होतो. वडिलांवर शिक्षणाचा आणखी भार टाकणे अशक्य होते. त्यांनी आधीच खूप काही सोसले होते. माझी कमाईची शोधाशो लक्षात आल्यावर संजय सरांनी विचारले, सांज केसरीत अर्धवेळ उपसंपादक म्हणून काम करणार का?
संजय सराच्या या ऑफरने उपकृत झालो. मी कामाला शोधत होतो. कामच माझ्यापर्यंत आले. तीन-चारशे रुपये ठोक मानधन आणि कॉलम सेंटीमीटरनुसार होईल तेवढी अन्य रक्कम मिळेल, असे संजय सरांनी सांगितले. प्रचंड आनंद झाला. नोकरी मिळाल्याचे गावी पत्राने (गावात कुणाकडेही दूरध्वनी नव्हता) कळविले. मुलगा कुठे तरी चिकटल्याचा आई- वडिलांना आनंद झाला. 
पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मी राहत असे. सजंय आवटे, विक्रांत पाटील, राजाराम कानतोडे, योगिराज करे आदी मित्रही वसतिगृहातच असायचे. संजय आवटे आणि विक्रांत पाटील यांनी सांज केसरीत आधी काम केले होते. मी पहिल्यांदाच नोकरी करणार होती. त्यामुळे त्या दोघांकडून कामाविषयी माहिती करून घेतली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील जुना मित्र संतोष कुलकर्णी सांज केसरीत भेटला. वसतिगृहातून सकाळी लवकर निघून पीएमटी बसने डेक्कन आणि तिथून चालत सातपर्यंत केसरीवाड्यात पोहोचायचे. हिंदी, इंग्रजीतल्या छोट्याछोट्या चटपटीत बातम्याची भाषांतर करणे, हेच मुख्य काम. कधी-कधी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणायलाही संजय सर सांगाचे. गॅसदर वाढ झाली की गृहिणींच्या प्रतिक्रिया, कांदे महागले की ग्राहकांच्या प्रतिक्रिया, बसभाडे वाढले की प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि सोबत वाचकाचे छायाचित्र नक्की असायचे. यातूनही बातमी लेखनाचे धडे मिळत होते.
स्व. संजय कुलकर्णी यांनी एमसीजेच्या सर्व विद्यार्थ्यांना केसरी वाडा पाहण्यासाठी बोलविले असताना दै. केसरीचे संपादक श्री. अरविंद गोखले यांच्याशी सर्वांचा परियच करून दिला. त्या दिवशी मदर तेरेसा यांच्या निधनाच्या बातमीचे बँनर होते. 
पहिल्याच पंधरा दिवसांत डिझेलची दरवाढ झाल्यावर रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया आणायला संजय सरांनी सांगितले होते. त्या लिहून दिल्या. काम आटोपून लेक्चरसाठी रानडेत गेलो. संजय सरही होते. दुपारी सांज केसरी आला. पहिल्याच पानावर त्या प्रतिक्रियांना माझी बायलाईन होती. ती आमच्या सर्व वर्ग मित्रांना संजय सरांनी कौतूकाने दाखविली. खरं तर ते अंत्यत किरकोळ काम होतं. बायलाईनच्या पात्रतेचे तर मुळीच नव्हते. मला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हेतू होता.       
बातमी लिहायला शिकवण्यापासून शीर्षक देण्यापर्यंत आणि तिच्यावर संस्कार करण्याचे संस्कार त्यांनी आमच्यावर केले. सांज दैनिकाला साजेशी शीर्षके देण्यात संजय सरांचा हातखंडा होता. शीर्षकावरून वाचकाला बातमी वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. शिवाय बातमी चुरचुरीत आणि आटोपशीर पाहिजे, असे ते आम्हाला सतत सांगत असत. चटपटीत चुरचुरीत करण्याच्या नादात सांज केसरी संध्याकाळच्या आनंदसारखा होऊ नये, यावर त्यांचा कटाक्ष असायचा.
संजय सरांच्या प्रोत्साहनातून मात्र शिकायलाही मिळाले. दोन पैसेही मिळू लागले. शिक्षणाचा खर्चही भागू लागला. एमसीजे सुरू होतेच. केसरीवाड्यातून रानडेतल्या पहिल्या लेक्चरला वेळेवर पोहोचण्यात बऱ्याच वेळा पाच-दहा मिनिटे उशीर व्हायचा. ते लेक्चर चळवळीतील एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार घ्याचे. नेहमीच उशीर करतो म्हणून वेळेवर आला तरच लेक्चरला बसायचे, अशी त्यांनी मला तंबीच दिली. ते ऐकून, तू माझ्यासोबतच स्कुटरने रानडेत येत जा, असे सांगितले. माझी चांगलीच सोय झाली.
सांज केसरीतला पहिला पगार हजार-अकराशे रुपये मिळाला. त्यातून सहाशे रुपयांची जुनी सायकल घेतल्याचे संजय सरांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, शक्य असल्यास तू आणखी एक काम करु शकतोस. सकाळी लवकर जाऊन पोलिस आयुक्तालयातून प्रसिद्धिपत्रके आणत जा. तुझे कॉलम सेंटिमीटर वाढतील. क्षणाचाही विलंब करता मी हो म्हणालो आणि महिन्याभरात पगारात वाढ दिसली.
संजय सरांचा स्वभाव अतिशय मदतशील होता. आमच्यासारख्या नवख्या आणि शिक्या पत्रकारांना ते नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. सिनेमा, नाटक हे त्यांच्या आवडीचे विषय होते. चित्रपटविषयक लेखन आणि क्षमीक्षणाबाबत त्यांची ख्याती होती. अचार्य अत्रे यांच्यावरीलझंझावत’, ‘असे चित्रपट अशा आठवणी’, ‘बंटी दी ग्रेटआणिनगरवधूही पुस्तकेही त्यांनी लिहिली होती. पुण्यात होणाऱ्या नाटकांच्या शुभारंभाच्या प्रयोगांनाही ते सोबत घेऊन जात असतं. त्यांच्यासोबतगांधी-आंबेडकरया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्वला पहिल्यांदा बघता आला. त्यानंतर काही नाटके त्यांच्यासोबत बघितली.
ऋषिकेश कानिटकरसोबत 
    बांगलादेशात जानेवारी 9998 मध्ये झालेल्या इंडिपेंडन्ट करंडक स्पर्धेत  भारत- पाकिस्तानमध्ये अंतिम लढत झाली होती. पाकच्या 314 धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताला शेवटच्या दोन चेंडूंत तीन धावांची गरज होती. ऋषिकेश कानिटकरने सकलेन मुश्ताकला चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता. 314 धावांचे आव्हान पार करण्याचा बहुदा विश्वविक्रम भारताने केला होता. त्यामुळे कानिटकर अचानक हिरो झाला होता. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो पुण्यात परतला. संजय सरांनी त्याची मुलाखत घेण्यास सांगितले. एखाद्या क्रिकेटपटूला भेटण्याची ती मला पहिलीच संधी मिळणार होती. मला प्रचंड आनंद झाला होता. कानिटकरची पुणा क्लब येथे मुलाखत घेतली. सांज केसरीत ती प्रसिद्ध झाली. माझा आनंद आणखीच दुणावला.  
 एमसीजे संपत आल्यावर मला आणि राजारामला पुणे सकाळमध्ये प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून संधी मिळाली. माझ्यानंतर काही दिवसांनी राजारामही सांज केसरीत उपसंपादक म्हणून काम करत होता. आमची सकाळची बातमी कळल्यावर संजय सरांना बरे वाटले. त्यांनी आमचे मनापासून अभिनंदन केले. पोरांचे चांगले होतेय, ही त्यांची भावना होती.  
संजय सरांच्या निधनाने एक सच्चा माणूस गेला, पत्रकार गेला, शिक्षक गेला, गुरू गेला. संजय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली