Tuesday 20 January 2015

खडकावर रुजवली स्ट्रॉबेरी

        सातारा जिल्ह्यातील घोटेघर (ता. जावळी) येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री. रामदास महाडीक यांची अत्यंत खडतर; पण प्रेरणादायी कहाणी...
मुंबईची रोजची धावपळ आणि दगदग सहन करुनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहात येणाऱ्या अडचणी नित्याच्याच झाल्या होत्या. कष्टाला कधीतरी फळ येईल या आशेने सूर्योदयापासून रोज सुरु होणारी कष्टमय सफर दिवसाच्या अस्तानंतरही फारसी समाधानकारक ठरत नव्हती. मनात सातत्याने चलबीचल असायची. गावाकडे परतावे की मुंबईत रहावे अशी द्विधामन:स्थिती होती. अखेर मुंबईतले बिऱ्हाड गावाकडे हलविण्याचा निर्णय घेतला आणि अपार मेहनतीने खडकाळ रानावर स्ट्रॉबेरी रुजवून काढली. कष्टाला फळ आले. हाताला काम, कामाला दाम आणि मनाला समाधान लाभल्याचे सातारा जिल्ह्यातील घोटेघर (ता. जावळी) येथील श्री. रामदास महाडीक सांगत होते.
श्री. महाडीक यांची कथा अत्यंत कष्टमय आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे शिक्षण केवळ 8 वी पर्यंतच झाले होते. वडिलोपार्जित शेती अगदीच कमी होती. तीन भावांना निभाव लागणे कठीण होते.  म्हणून श्री. महाडीक यांनी उदरनिर्वाहसाठी थेट मध्यप्रदेश गाठले. तेथून मुंबईत आले. मुंबईत दिवसरात्र कष्ट उपसून काही रक्कम जमविली. भरतकामाच्या चार मशिन विकत घेतल्या. भांडूपमध्ये कारागिरांच्या मदतीने भरतकामात जम बसविण्यात सुरुवात केली. काही पैशे गाठीशी येत असतानाच एकाकडून झालेली फसवणूक रोजीरोटीला जबर धक्का आणि मनाला चटका देऊन गेली. तेथून पुन्हा एकदा श्री. महाडीक आणि त्यांच्या पत्नी सुनिता महाडीक यांच्या वाट्याला पुन्हा काबाडकष्ट आले; परंतु हाती मात्र फारसे लागत नव्हते. त्याची सल मनाला सारखी बोचत होती. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. निराशेने घेरल्याने त्यांच्या मनात गावाकडे परतण्याची भावना तीव्रतेने उफाळून आली. आधी सौ. महाडीक घोटेघरला परतल्या. त्यानंतर एक-दीड वर्षांतच श्री. महाडीक यांनीही  मुंबई सोडली.
मुंबई सोडताना श्री. महाडीक यांनी भरतकामाची यंत्र विकून सोबतीला काही रक्कम आणली होती. त्यातून गावातच उदरनिर्वाहाचा मार्ग शोधण्याच प्रयत्न सुरु झाले. मेढा-पाचगणी रस्त्यावर काहीशा आतल्या बाजूची 53 गुंठे खडकाळ जमीन विकत घेतली. तिथे झाडाझूडपांव्यतिरिक्त काही नव्हते. उंचसखल पृष्ठ भागामुळे त्यावर शेती करणेही अवघड होते; परंतु कष्ट हा श्री. महाडीक यांचा स्थायीभाव असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी ते सरसावले. सर्व प्रथम 53 गुंठ्यापैकी काही गुंठ्याचे सपाटीकरण केले. महाराष्ट्र बँकेकडून 1 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज घेतले. बोरवेल खोदली; पण वीज नव्हती. जनरेटर खरेदी केले. ठिबक सिंचन केले आणि स्ट्रॉबेरी रुजविण्याचा संकल्प केला.
माळरानावर स्ट्रॉबेरी रुजताना पाहून श्री. महाडीक कुटुंबियांची स्वप्नेही फुलू लागली. फुलांचे फळात रुपांतर व्हावे आणि आयुष्यच बदलून जावे अशी आस महाडिकांना लागली होती. त्यांनी मग आणखी जोमाने स्वत:ला शेतीत झोकून दिले. आख्ये कुटुंबच शेतीशी एकरुप झाले. स्ट्रॉबेरीला भर आला. कष्टाचे चीज झाले. हुरुप वाढल्याने श्री. महाडिकांनी 53 गुंठ्यातील आणखी उर्वरित क्षेत्राचे सपाटीकरण केले. त्यातही स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली. शिल्लक क्षेत्रावरील दगडही आता त्यांनी दूर केले आहेत. फक्त सपाटीकरण बाकी आहे. आता श्री. सौ. महाडीक यांना वर्षाकाठी दीड-दोन लाख रुपयांचे भांडवल टाकून साधरणत: चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे. आता त्यांना आर्थिक चणचणीवर मात करण्यात काहिशे यश आले आहे. दोघामुलांचे शिक्षणही सुरु आहे. दरम्यानच्या काळात सौ. महाडीक यांना अंगणवाडी सेविका म्हणून कामही मिळाले आहे. अंगणवाडी सेविकेची जबाबदारी सांभाळात सौ. महाडीक सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत श्री. महाडीक स्ट्रॉबेरीच्या देखभालीसाठी श्री.महाडिकांना मदत करतात.
श्री. महाडीक दररोज पहाटे उजाळल्यावर स्ट्रॉबेरीची तोंडणी सुरु करतात. सकाळी 11 च्या आत जवळच्या भिलार येथे ती पॅक करुन पोहचावितात. तिथे रिलायन्स कंपनी स्ट्रॉबेरी खरेदी करते. सध्या सर्वोत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीला सरासरी 150 रुपये किलोचा भाव मिळत आहे. 'विंटर' आणि 'कॅमारोजा' या जातीच्या स्ट्रॉबेरीची श्री. महाडीक यांनी लागवड केली आहे. विंटरला  लागवडीनंतर साधारणत: 60 दिवसात फळे यायला सुरुवात होते; तर कॅमारोजाची फळे लागवडीनंतर 90 दिवसानंतर सुरु होतात. फळे यायला सुरुवात झाल्यामुळे श्री. महाडीक कुटुंबियांचा दिनक्रम आता अधिकच व्यस्त झाला आहे. यापुढील यापुढचा त्यांचा मुक्काम आता शेतावरच असणार आहे.
''अस्वस्थतेतून गावाकडे आलो आणि स्ट्रॉबेरीबरोबर मनालाही मातीत रुजवून घेतले'', अशी भावना व्यक्त करताना श्री. महाडीक म्हणाले की, ''स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाजूक आणि जोखमीचे पीक असल्यामुळे त्याची लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. दिवसरात्र जपावे लागते. वातावरणातला थोडासा बदलही स्ट्रॉबेरीच्या पिकाचे मोठे नुकसान करु शकतो. त्यासाठी वारंवार बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्या लागतो. रानडूकरांपासून संरक्षण करण्यासाठी रात्री जागता पहारा द्यावा लागतो. कष्ट अफाट असले तरी त्यात समाधान आहे. आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून स्ट्रॉबेरीच्या उत्पादन वाढीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. काही ठिकाणी आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे गट आणि कंपन्या सुरु झाल्या आहेत. त्याचाही आम्हांला फायदा होईल''.
''माझ्याकडे असलेले 53 गुंठे हे फार मोठे क्षेत्र नाही.खडकाळ असले तरी ते पूर्णत: स्ट्रॉबेरीखाली आणण्याचा माझा प्रयत्न आहे. कमी क्षेत्रामुळे वेगळा प्रयोग म्हणून पाईपात (हॅडोबोनिक) स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा माझा मनोदय आहे. स्ट्रॉबेरीची शेती पूर्णत: हवामानातील बदलांवर अवलंबून असतो. कष्टही खूप आहेत; परंतु लहानसहान नोकरीपेक्षा बरी आहे. आपण स्वत:चे मालक असतो. कोणाचा आपल्यावर ताबा नसतो. सर्वात महत्वाचे म्हणजे स्ट्रॉबेरी हे आमच्यासाठी नुसतेच फळ नाही; तर ते प्रेरणादायी आणि उभारी देणारे फळ आहे'', अशी भावनाही श्री. सौ. महाडीक यांनी व्यक्त केली. 
(संपर्क: श्री. रामदास महाडीक, घोटेघर, ता. जावळी, जि. सातारा. मोबाईल- 9011119892)