Tuesday, 2 October 2018

‘गांधी’ बघितलेला माणूस!

बेफाम वाऱ्यावर स्वार होऊन आक्रमण करत येणाऱ्या आषाढधारा… ऊन सावलीच्या खेळात हिरव्या गालीच्यावर कोसळणाऱ्या श्रावणसरी… पौषातल्या कडाक्याच्या थंडीत पाना-फुलांवरील गोठलेल्या दवबिंदूंतून ओघळणाऱ्या मोतीच्या माळा… चैत्र आणि वैशाखात प्रखर उन्हाने अंगाची लाही होत असताना वसंताची शीतलता देणारा अशा या वेगवेगळ्या ऋतूंतल्या वैविध्यपूर्ण उन्मादक निसर्गाचं रूप प्रत्यक्ष अनुभवण्याचं, न्याहळण्याचं ठिकाण- पाचगणी आणि महाबळेश्वरचा परिसर!
शिवरायांच्या नावानं आणि कर्तृत्वाच्या संदर्भानं रोमांचित झालेली ही भूमी आहे. इंग्रज साहेबाला तिनं भूरळ घातली होती. ट्रॉबेरी या परकीय फळालाही इथल्या मातीनं आपलंसं केलंय. त्यात आपलं सत्व ओतलंय. स्वकीय चवीची ही स्टॉबेरी पहाताच क्षणी जीभ पाणावल्याशिवाय राहत नाही. पाचगणीच्या कुशीत सामावलेल्या भिलारानं ट्रॉबेरीचं गाव म्हणून ओळख प्रस्थापित केलीय. ते आता भारतातलं पहिलं ‘पुस्तकांचं गाव’ झालंय!
पाचगणी, महाबळेश्वरला येणारे अनेक पर्यटक आता वाट वाकडी करत भिलारलाही भिडतात. ‘वाचक पर्यटक’ संज्ञा रुढ होतेय. पाचगणीवरून साधारणत: 5 किलोमीटर; तर महाबळेश्वरवरून 14 किलोमीटरवर भिलार वसलंय. पाचगणीतून भोसे खिंडीत भिलारच्या रस्त्याला वळल्यावर मोठंमोठे फलक पुस्तकांच्या गावात दाखल झाल्याची चाहूल देतात. बालसाहित्य, स्त्री साहित्य, लोकसाहित्य, कथा, कादंबरी, ललित, विज्ञान, क्रीडा, परिवर्तन, विनोदी अशा विविध साहित्याच्या दालनाची फलकं गावभर दिसू लागतात. दालनं म्हणजे राहती घरं!
इथं विविध 25 घरांमध्ये 15 हजार पुस्तकांचा खजिना आहे. ही पुस्तकं राज्य शासनानं दिली आहेत. या पुस्तकांना आणि वाचकांना निवारा देण्याचं औदार्य गावकऱ्यांनी दाखवलं आहे. कुणीही जाऊन आवडीची पुस्तकं घरात बसून वाचू शकतात. त्यासाठी कुठलाही मोबदला आकारला जात नाही. अनेक गावकरी तर उत्साहानं चहापाणी देत स्वागत करतात. निसर्ग, आकाश, पक्षी, स्वच्छ हवा आणि आवडीची पुस्तकं, सोबत गावकऱ्यांची आपुलकी आणि आतिथ्य अविस्मरणीय ठरतं!
भिलारमध्ये येतानाच भिलारे गरूजींचे स्मरण न होणे केवळ अशक्य होतं. श्री. भिकू दाजी भिलारे उपाख्य ‘भिलारे गुरुजी’ ही ओळख पुरेशी ठरते. त्यांच्या सतर्कतेमुळे 23 जुलै 1944 रोजी महात्मा गांधींचे प्राण वाचले होते. भिलारे गुरूजी अलीकडे मुंबईत असत. एकदा भिलारे गुरूजींना भेटण्याची संधी मी गमावली होती. दै. ‘सकाळ’मधील माझे ज्येष्ठ सहकारी आणि सन्मित्र सातारचे श्री. बाबूराव शिंदे यांच्यामुळे ही संधी चालून आली होती. त्यानंतर थोड्याच दिवसांत 19 जुलै 2017 रोजी गुरूजी गेल्यावर खूपच खंत वाटली. भिलारे गुरुजी हे भिलारचेच!
भिलारच्या मध्यवर्ती भागात ‘परिवर्तन साहित्या’चा फलक दृष्टीस पडतो. तिकडे आम्ही वळलो. सोबत ऊर्वी, चार्वी, वर्षा, विवेक आणि जयश्री होती. श्री. दत्तात्रय भिकू भिलारे यांचं हे घर. घरात ‘परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास’ या विषयाला वाहिलेली बरीच पुस्तकं दिसू लागली. दारापाशी येत श्री. दत्तात्रय यांचे वडील भिलारे आजोबांनी स्वागत केलं, या… या!
भिलारे आजोबा पुस्तकांच्या गावाची आणि पुस्तकांची महती सांगत होते. पुस्तकासाठी ठेवण्यासाठी ‘परिवर्तन साहित्य’ हा विषय का निवडला? उत्सुकतेपोटी मी विचारलं.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी अशा अनेक महापुरुषांनी राजकीय व सामाजिक परिवर्तनासाठी आपलं आयुष्य समर्पित केलंय. त्यांचे विचार घरात रुजविण्याची आणि पुढे नेण्याच्या सेवाकार्याची ही संधी लाभली आहे. आमच्या चिरंजिवांचेही याच विषयाला प्राधान्य होते. भिलारे आजोबा समाधानी भावानं सांगत होते.
गांधीजींचा उल्लेख येताच मी म्हणालो, भिलारे गुरुजींच्या सर्व आठवणी तुमच्या नजरेसमोर तरळत असतील!
भिलारे गुरुजी माझे चुलत भाऊ. ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यांचा जन्म 1919 चा. माझा 1935 चा. ते आम्हाला सायकलीनं फिरवत असतं.
भिलारे गुरुजींनी गांधीजींचे प्राS…
माझं वाक्य पूर्ण होण्याचा आवकाश… भिलारे आजोबा म्हणाले, होय! गुरूजींच्याच सतर्कतेमुळे गांधीजींचे प्राण वाचवले होते. गांधीजी पाचगणीत होते. एक माणूस सुरा घेऊन त्यांच्या अंगावर धाऊन आला होता. प्रसंगावधान राखत भिलारे गुरूजींनी हिंमतीने त्याच्या हातातला चाकू हिसकावून घेतला आणि त्याला बाजूला सारले. गांधीजींनी त्या व्यक्तीला भेटायला बोलावले. तो आला नाही. नथूराम गोडसेच होता तो. बघा हा गुरूजींवरचा गौरवग्रंथ. त्यात संदर्भ आहेते हे सर्व.
आजोबा, तुम्ही तेव्हा कुठे होता तेंव्हा?
मी काही त्या प्रसंगाचा साक्षिदार नाही. मी खूप लहान होता; पण गांधीजी एकदा पाचगणीत असतानाचा अनुभव मला चांगलाच आठवतो. ते बाथा हायस्कूलमध्ये दररोज प्रार्थना घेत असत. प्रार्थनेत माझी आईदेखील सहभागी होत असे. ती मलाही सोबत नेत असे. त्यामुळे गांधी दर्शन आणि सहवासाचं भाग्य मला लाभलं.
कोणती प्रार्थना म्हणत असत?
गांधीजी स्वत: विविध प्रार्थना म्हणत. ‘वैश्णव जन तो तेने कहिये जे पीड परायी जाणे रे’  ही त्यांची विशेष आवडीची प्रार्थना होती. आम्हीही त्यात दंग होत असू.
तुमचं शिक्षण आणि नंतर…?
मी जुन्या काळतली सातवी शिकलोय. मी प्राथमिक शिक्षक होतो. शिक्षक म्हणून माझी सेवा महाबळेश्वर आणि जावळी तालुक्याच्या परिसरातच झाली. भिलारे गुरूजी स्वातंत्र्य सैनिक होते. आमच्या गावाचं आणि स्वातंत्र्य चळवळीचं मोठं नातं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक आमच्या परिसरात भूमिगत असायचे. त्यांच्या जेवणाखावणाची व्यवस्था आमच्या गावांतून होत असे. क्रांतिसिंह नाना पाटलांसारख्या थोर लोकांचे आमच्या गावात नित्याचं येणं-जाणं असायचं.
थोडक्यात भारावलेल्या काळाचे तुम्ही साक्षीदार आहात.
हो. खरं आहे! स्वातंत्र्य चळवळीत आमच्या गावाचे योगदान होतेच. मी लहान होतो तेव्हा. सत्यशोधक समाजाचंही आमच्या गावात काम होतं. स्वातंत्र्यानंतरही आमच्या गावात आणि परिसरात विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत कार्यरत असेले बरेच जण होते. मी स्वत: त्यात सक्रीय होतो.
भूदान चळवळीत कार्यकर्ते म्हणून काय भूमिका असायची?
आम्ही ‘सभ भूमी है गोपाल की’ म्हणत जनजागृती करायचो. त्यावेळी टाटा शेट यांनी त्यांची जमीन आमच्या इथल्या भोसे गावाला दिली.
गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच ‘गांधी’ बघितलेल्या अनुभवलेल्या माणसासोबतच्या या गप्पा खूपच रोमांचित होत्या. भिलारे आजींचे आदरातिथ्य प्रेरक होते. गप्पांतून भिलार गावाचा झालेला परिचय अधिक उत्सुकतावर्धक झाला.
वाईमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात कार्यरत असलेले आणि सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक मित्रवर्य रवींद्र घोडराज यांनी स्वत: भिलारे गुरूजींची शेवटच्या दिवसांत मुलाखत घेतली होती. ध्वनिमुद्रित स्वरुपातील ही मुलाखत आजही त्यांनी जपून ठेवली आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला बापूजींनी सोडून द्यायला सांगितले होते, असे भिलारे गुरूजींनी या मुलाखतीत नमूद केले आहे. पुस्तकांचे गाव अशी नवीन ओळख निर्माण झालेल्या भिलारचे पुस्तकांशी खूप जुने नाते आहे. त्याचा संदर्भ भिलारे गुरूजींच्या याच मुलाखतीत आहे. भिलारे गुरुजी राष्ट्रसेवा दलात होते. सत्यशोधक चळवळीशीही त्यांचा जवळचा संबंध होता. गावातील लोकांना ते महात्मा फुले यांचे लिखाण वाचवून दाखवत असत. इथल्या वाचन संस्कृतीची बिजे तेव्हाच रोवली गेली असावीत. वाचन संस्कृती वाढविणारा तो ‘चला वाचू या’सारखाच उपक्रम म्हणावा.
सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेबर 1873 रोजी झाली होती. भिलारे गुरूजी यांचे चुलते श्री. गोविंदराव बापूजी भिलारे हे महात्मा फुले यांच्यासोबत सत्यशोधक समाजाचे काम करत असत. त्यांनी सत्यशोधक समाजाची शाखा भिलारमध्ये स्थापन केली होती. त्याचा उल्लेख सत्यशोधक समाजाच्या पहिल्या अहवालात आहे. (महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, पृ. क्र. 2006) ही सत्यशोधक समाजाची बहुदा पहिली ग्रामीण शाखा होती. महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलारचा हा परिसर दऱ्याखोऱ्यांनी नटलेला, निसर्गानं संपन्न आहे. तसाच तो ऐतिहासिक आ णिसामाजिक वारसा सांगणारादेखील आहे.