Tuesday, 17 March 2015

गौरव विश्वविजेत्यांचा

भारतीय क्रिकेट संघानं  2011 चा विश्वचषक जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी राजभवनातखेळाडूंचा तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. या समारंभाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली होती. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेनिमित्त तेव्हा लिहिलेल्या लेखाचे स्मरण झाले. तोच हा लेख...
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीलंकेला धूळ चारत भारतीय संघानं विश्वविजेतेपदाला गवसणी घातली... मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून उठलेली विजयाची लहर क्षणार्धात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीच सर्वत्र विजयाच्या गुढ्या उभारल्या गेल्या!
विश्वविजयाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मुंबईतील राजभवनात `टीम इंडिया`चा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हॉटेल ताजमहलपासून विजयी वीरांना राजभवनकडे घेऊन निघालेल्या दोन अलिशान बस ताजचा परिसर, काळाघोडा, मरिन ड्राईव्हमार्गे मलबार हिलवरून राजभवनात दाखल झाल्या. रस्त्याच्या दुतर्फा अबालवृद्धांची गर्दी होती. ही मिरवणूक नव्हती. तरीही क्रिकेट प्रेमींनी खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बस आणि त्यातील क्रिकेटवीरांना पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बस राजभवनावर दाखल झाल्या आणि पोलिसांच्या बँड पथकानं शूरवीरांना सलामी दिली. `जय हो...`ची धून उपस्थितांच्या रोमारोमात संचारली होती. एकामागून एक क्रिकेटपटू राजभवनच्या हिरवळीवर दाखल झाले. उपस्थितांच्या नजरा विजयाचे हिरो युवराज, झहीर, धोणी, सचिनला शोधत होत्या; पण धोणी काही दिसेना! अचानक धोणी समोर आला; क्षणभर त्याला अनेकांनी ओळखलं नाही. धोणीनं लांबसडक केसं कापून आपलं डोकं खेळपट्टीसारखं चकाचक केलं होतं! सर्व खेळाडू आले. राष्ट्रपतींसह मान्यवरांसोबत ग्रुप फोटो सेशन सुरू झालं. धडाधड फ्लॅश पडले. खेळाडूंच्या टी-शर्टवरील हिरव्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे... खाली हिरवंगार टवटवीत गवत... समोर निळाशार अथांग समुद्र... मावळतीला आलेल्या सूर्याची पिवळी किरणं... लखलखते शुभ्र फ्लॅश म्हणजे एकाच वेळी असंख्य रंगांची उधळण होती. आपल्या विविधतेतल्या एकात्मतेचं ते प्रतीक होतं. याच एकतेच्या वज्रमुठीनं भारतीय क्रिकेटला उत्कर्षाचा मार्ग दाखविला होता.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं भल्याभल्यांना चीत केलं होतं. वज्रमुठीच्या तडाख्यानं उपांत्यपूर्व लढतीत
ऑस्ट्रेलियाला केवळ हरवलंच नाही तर त्यांच्या सम्राटपदाला आवाहनही दिलं. रिकी पाँटिंगलाही, `बस, आता फक्त भारतच`, असं म्हणायला भाग पाडलं. मुक्ताफळं उधळणाऱ्या आणि `माइंड गेम` खेळणाऱ्या शाहीद आफ्रिदीच्या संघाचा आपल्या वज्रमुठीनंच उपांत्य लढतीत `गेम` केला होता. अतिंम लढतीतल्या वणव्यात लंकेचं दहन झालं.
ग्रूप फोटो सेशन आटोपलं. औपचारिक समारंभ सुरू झाला. अंतिम सामन्यात नायकपदाला साजेशी खेळी करणाऱ्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोणीच्या नावाचा पुकार होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रपतींनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव केला. संपूर्ण स्पर्धेत रुसलेली धोणीची बॅट अंतिम सामान्यात चांगलीच बरसली आणि तो `हिरो` ठरला. दुसरं नाव होतं सचिन रमेश तेंडुलकर! अनेकांच्या ओठांचा चेंडू झाला आणि `व्हाव! सच्चिनSSS`, असे उद्‌गार बाहेर पडले. राष्ट्रपतींनी सचिनला पुष्पगुच्छ देताच टाळ्यांचा गजर झाला. 21 वर्षाच्या अविरत क्रिकेट कारकीर्दीची, 30 हजारांहून अधिक धावांची, 99 शतकांची, असंख्य विक्रमांची आणि त्या विश्वचषकात तिलकरत्ने दिलशाननंतरच्या (500) सर्वाधिक 482 धावांच्या खेळीच्या स्मृती जागविणारा तो क्षण होता. सचिनपाठोपाठ विरेंद्र सेहवागचा गौरव झाला आणि उपांत्य सामन्यात उमर गूलला गूल करणारी फलंदाजी आणि सलामीच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध 175 धावांची खेळी सहज नजरेसमोर येऊन गेली.
नावाप्रमाणे गंभीर खेळी करणाऱ्या गंभीरच्या चेहऱ्यावर गौरव स्वीकारताना भलताच उत्साह होता. आता सन्मान होता तो भारताच्या विश्वविजयाच्या खऱ्या शिल्पकाराचा- युवराज सिंगचा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला. विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकविणाऱ्या युवराजच्या हातात बॅट असो वा बॉल कमाल झालीच समजा, असा हा हुकमी एक्का. त्यानंतर विराट खेळी करणारा विराट कोहली, स्फोटक फलंदाज युसूफ पठाणचा सत्कार झाला. आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान देणारं नाव पुकारलं गेलं ते झहीर खानचं. पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार गजर झाला. अस्सल मराठी मातीतला श्रीरामपूरचा हा रांगडा गडी. पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या बरोबरीनं झहीरनं या स्पर्धेत सर्वाधिक 21 बळी घेतले.
गुजरातमधून इखार नावाच्या कोणत्या तरी खेड्यातून आलेला आणि पाकिस्तानविरुद्ध टिच्चून मारा करणारा मुनाफ पटेल सत्काराच्या वेळीही भारीच खूश दिसत होता. आक्रमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या `दुसराफेम` हरभजन सिंगच्या चेहऱ्यावर संयम होता. मधल्या फळीत शेवटच्या क्रमांकावर येऊनही आश्वासक फलंदाजीनं मॅचेस आणि मनं जिंकणाऱ्या सुरेश रैनाच्या गौरवाचा क्षण म्हणजे `रैना है ना` असाच होता. केरळचा स्टायलीश आणि प्रचंड आक्रम गोलंदाज श्रीशांत मात्र यावेळी कमालीचा शांत होता. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मल्याळी भाषेत श्रीशांतशी संवाद साधला. पीयुष चावला, अशिष नेहरा, आर. आश्विन सगळ्यांचा गौरव झाला. आणखी एका खास व्यक्तीचा गौरव झाला ते म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन.
संघाचं अभिनंदन करताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ``विश्वविजेतेपद पटकवून आपल्या क्रिकेट संघानं तमाम भारतीयांना उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण प्राप्त करून दिला आहे. या यशात महाराष्ट्राचे दोन सुपूत्र सिचन तेंडुलकर आणि झहीर खान यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाच्यावतीनं प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्यात येईल, तसंच संघाच्या सर्पोट स्टाफमधील महाराष्ट्रातील सहकाऱ्यांना बीसीसीआय प्रमाणं बक्षिसं दिली जातील.``
गौरव समारंभानंतर उपस्थितांमधलं आणि खेळाडूंमधलं अंतर गळून पडलं. लहान-मोठ्या सर्वांनाच खेळाडूंसोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरला गेला नाही. प्रत्येकला सचिनसोबत, धोणीसोबत छायाचित्र हवंच होतं. युवराज, झहीर, गंभीर, सेहवाग, युसूफ, कोहली, रैना, मुनाफ, हरभजन सोबतच्या छायाचित्राचीही संधी कुणालाच सोडायची नव्हती. उर्वरित खेळाडूंसोबतही वेळ, जागा आणि छायाचित्रकार उपलब्ध होईल, तसे क्षण टिपले जात होते. काही जण एकमेकांच्या मोबाईलमधील कॅमेऱ्याद्वारे हे ऐतिहासिक क्षण टिपत होते. अनेक जण विश्वचषक हातात घेऊन तो मनसोक्तपणे न्याहळत होते.
समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन म्हणाला की, ``ज्या मातीत वाढलो. लहानाचा मोठा झालो, त्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या मातीतच विश्वचषक जिंकण्यासारखा दुसरा आनंद नाही. मुंबईकरांसमोर माझ्या सहकाऱ्यांनी मला उचलून घेतलं, तेव्हा डोळ्यातून चटकन पाणी आलं``
सचिनची प्रतिक्रिया ऐकून उपस्थितही भावूक झाले. समारंभ संपत आला; पण उपस्थितांची उत्सुकता शमत नव्हती. खेळाडूंची अखेरपर्यंत कॅमेरा आणि उपस्थितांच्या विळख्यातून सुटका होणं शक्य नव्हतं. विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच या समारंभाच्या स्मृतीही मनात साठवत उपस्थितांनी राजभवनाचा निरोप घेतला.