अमळनेर येथील मीराबाईंकडे संतसज्जनांचे येणे- जाणे असायचे. गाडगेबाबा एकदा त्यांच्याकडे आले होते. तिथे त्यांनी कृष्णाचे गाणे ऐकले. बाल कृष्णाच्या आवाजाने ते भारावून गेले. त्यांनी कृष्णाचे घर गाठले. बाबांच्या अवचित दर्शनाने कृष्णाची आजी धन्य झाली. साताजन्माची पुण्याई सार्थकी लागली. अश्रुभरलेल्या डोळ्यांनी आजी म्हणाली, “बाबा, माझं भाग्य लय थोर म्हणून तुम्ही स्वत: माझ्या दारी आलात. तुम्ही माझ्याजवळ कायबी मागा… जे आसंल ते मी दिवून टाकीन!”
बाबा हसत
म्हणाले, “माहे, माले
तुह्यावाला नातू दे.”
बाबांच्या
मागणीने आजी गांगरली. थरथर कापत म्हणाली, “बाबा, माझं काळीज कापून मागितलं असतं तर तुमच्या पायावर वाहिलं असतं. अख्खं घरदार
म्हणाला असता तर त्यावर पाणी सोडून तुमच्या संगं गाव- गाव भीक्षा मागाय निघाले असती.
अवं, पर ह्ये कसं द्यावं? बोलून चालून सोयऱ्याचं पोर. लेक- जावाय काय म्हणंल? सोयऱ्या
धायऱ्यात तोंड दावाय जागा ऱ्हाइल का मले?”
बाबांनी
परिस्थितीचा अंदाज घेतला. आजीचा ठाम नकार होता. बाबांचा हेतू चांगला होता. ते चांगली
माणसं हेरायचे. कृष्णाही त्यांना भावला होता. कृष्णाने केवळ भजने गाऊन टाळकुटेपणा करण्याऐवजी
डफ हातात घेऊन लोकजागृती करावी. सोबत त्याचे शिक्षणही पूर्ण व्हावे, अशी बाबांची धारणा
होती; पण बाबा आल्या पावली परत गेले.
कृष्णा खदखदू
लागला. साने गुरुजींनाही एकदा आजीमुळे असेच माघारी जावे लागले होते. गुरुजींनी एका
कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमळनेरकरांसाठी सेनापती बापट या कार्यक्रमाचे प्रमुख
आकर्षण होते. कृष्णाच्या देशभक्तीपर कवनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. जेवणे
आटोपून प्रेक्षक मंडपात जमू लागले होते. बत्तीच्या प्रकाशाने मंडप उजडून निघाला होता.
गुरूजी आतुरतेने कृष्णाची वाट बघत होते. कृष्णाच्या नावाचा वारंवार पुकारा सुरु होता.
आजीने कृष्णाला घरातच कोंडले होते. त्याची घालमेल सुरू होती. दरवाज्यावर थाप पडली.
दातओठ खात आजीने कडी उघडली. प्रत्यक्षात सानेगुरुजीच दारात!
नापसंती
दर्शवित आजी म्हणाली, “कायवो गुरूजी?”
“कृष्णा काय करतोय घरी अजून? कार्यक्रम सुरू व्हायला आला.” गुरुजींनी विचारले.
“गुरूजी, माफ करा या येडीला. मला न्हाय धाडता यियाचं कृष्णाला
तुमच्या संगटी.”
“अहो माई, कृष्णाचा गाण्याचा कार्यक्रम आहे आता. सगळी तयारी झालीय.
दहा मिनिटांत परत धाडतो त्याला घरी.”
“गुरुजी, एकदा सांगितलं ना. अहो, त्याला साळा शिकायला पाठवलंय
आईबापानी माझ्याकडं. तुमच्या संगं गाण बजावणं करून साळंचा इस्कोट करण्यासाठी न्हाई.”
“जसी तुमची मर्जी माई.”
गुरूजी शांतपणे
परत गेले. कृष्णा आतल्या आत तडफडत होता. सानेगुरुजींप्रमाणे गाडगे बाबाही परत गेले
होते. आपल्यासारख्या सामान्य पोरासाठी थोरामोठ्यांचे अपमान व्हावेत, हे पाहून कृष्णाला
वाईट वाटत होते.
आई- वडिलांनी
कृष्णाला शिक्षणासाठी अमळनेरला आजीकडे पाठविले होते. अन् शेवटी नको तेच झाले. कृष्णाची
सातवीची म्हणजे त्यावेळच्या फायनलची परीक्षा जवळ आली. केंद्र होते जळगाव. जाण्याचा
खर्च तीन रूपये होता. आजीला वाटायचे की परीक्षेला बसून याचा काही उपयोग नाही. म्हणून
तीने पैसे देण्यास नकार दिला. कृष्णाने आदळआपट केली. काही उपयोग झाला नाही. शेजारपाजाऱ्यांनी
वर्गणी करून पैसे द्यायचे कबूल केले; पण कृष्णा स्वाभिमानी. त्याने पैसे घेतले नाहीत.
बहाद्दर परीक्षेला गेलाच नाही. शेवटी सातवी नापास हीच त्याची शैक्षणिक पात्रता राहिली;
पण जगणे समृद्ध करणाऱ्या चार- पाच वर्षांच्या अनुभवांची शिदोरी उराशी घेत कृष्णाने
गुपचूप आपले पसरणी गाव गाठले. कृष्णाचे अमळनेरमधील तीळ- तांदूळ संपले होते.
कृष्णा!
कोण होता कृष्णा? ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गौरवगाण
कानावर पडले की आठवात ते शाहीर साबळे. तेच ते… तो कृष्णा! स्वातंत्र्य
चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीतही योगदान देणारे; तसेच गीतकार,
संगीतकार, गायक, वादक कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे!
गेल्याच
आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमामुळे शाहीर साबळे यांच्याविषयीच्या
माझ्या वैयक्तिक आठवणी ताज्या झाल्या. दै. ‘सकाळ’मध्ये असताना माझी धुळ्याहून साधारणत:
सप्टेंबर 2006 मध्ये मुंबईत ‘सकाळ न्यूज नेटवर्क’साठी बदली झाली होती. सकाळ न्यूज नेटवर्क
संपादक आणि प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे (ठाणे येथील 84 व्या अखिल मराठी साहित्य
संमेलनाचे अध्यक्ष) यांनी मला एका विशेष पुरवणीसाठी शाहीर साबळे यांची मुलाखत घ्यायला
सांगितले. शाहिरांच्या परळमधल्या घरी गेलो. आदराने त्यांना सगळे ‘बाबा’ म्हणत. नतमस्तक
व्हावे, असे हे उतुंग व्यक्तिमत्व. मी अमळनेरचा म्हटल्यावर त्यांना आनंद झाला. गाडगेबाबा,
साने गुरुजी, अमळनेरची जत्रा याबाबत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माझ्यासाठी ती मेजवणी होती!
बाबा अमळनेरच्या
आठवणी सांगू लागले. मलाच भारावून गेल्यासारखे झाले. अमळनेरला जाण्यासाठी आई कृष्णाची
समजूत काढत होती, “लेकरा, आमच्या ह्या वढाताणीत तुझ्या लिव्हण्या- वाचण्याचा खेळखंडोबा नग, तवा तुला
मामासंगती धाडायचं यवाजलंय. तवा तू साळा सीक, अमळनेरची तुझी आजी आबाळ न्हाय होऊ दियाची.”
कृष्णा देशावरून
खानदेशात येऊन पोहचला. तो अमळनेरच्या नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये जाऊ लागला.
वाटेवर साने गरुजींचे निवासस्थान होते. ते प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. (प्रताप
हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्याला आजही स्फुरण येते.) त्यावेळी स्वातंत्र्य
चळवळीचे लोण खेडोपाडी पोहचले होते. साने गुरुजींच्या पुढाकारातून अमळनेरला मोठमोठ्या
पुढाऱ्यांच्या सभा व्हायच्या. त्यात देशभक्तीपर गाणी, पोवाडे, कविता सादर केल्या जायच्या.
त्यात कृष्णा उत्साहाने सहभागी व्हायचा.
साने गुरुजींच्या
सभेत एकदा कृष्णाने ‘रमला कुठे गं कान्हा’ हे गीत म्हटले. ते ऐकून गुरुजींनी त्याच
धर्तीवर “सारी राष्ट्रे जाती पुढती, मिळवा
जगी हो ज्ञाना” हे गाण
लिहून दिले आणि कृष्णाला गायला सांगितले. या प्रसंगाची आठवण सांगताना शाहीर साबळे म्हणत,
“अमळनेरला मला पाठविलं होतं शिक्षण
घ्यायला. ते काही माझ्या नशिबी नव्हतं; पण ज्ञान मात्र मी मिळवलं या जगाच्या शाळेतून.”
गुरुजींच्या
त्या उत्स्फूर्त गीताने कृष्णा भारावून गेला होता. त्याने विचारले, “मलासुद्धा असं गीत रचता येईल का?” गुरूजी हसून म्हणाले, “नक्की येईल, प्रयत्न कर.” साक्षात सानेगुरुजींचे कृष्णाला
आशीर्वाद लाभले. त्याची धडपड सुरू झाली.
अमळनेरला
आवळे नावाचे स्टेशनमास्तर होते. ते संगीत साधनाही जोपासत. ते राहायला कृष्णाच्या आजीच्या
शेजारीच होते. कृष्णाच्या आवाजाचे ते नेहमी कौतुक करीत आणि आजीचे बोलणे खात. प्रख्यात
गायिका हिराबाई बडोदेकर यांचा एकदा अमळनेरमध्ये मुक्काम होता. आवळे मास्तरांची हिराबाईंशी
ओळख होती. त्यांनी कृष्णाला हिराबाईंकडे गाणे गाण्यासाठी नेले. इतक्या मोठ्या गायिकेसमोर
कृष्णाने संकोचाने गाणे गायले. बाईंनी कृष्णाचे कौतूक केले. शाबासकी देत म्हणाल्या,
“मास्तर, गोड गळा लाभलाय पोराला. गाण्याच्या
हरकती समजून घेतल्यात त्यानं. खड्या आवाजाची देणगी लाभलीय. येवढ्या लहान वयात ही जाणीव?
खरंच वाटत नाही. तेव्हा मास्तर, तुम्हाला सांगते, सहा महिने आमच्याकडं ऱ्हायला तर नाव
काढील. विचारा त्याच्या घरच्यांना.”
अमळनेरमध्ये प्रत्येक जाणकाराला कृष्णाचा लळा लागायचा; पण आजी गाणे
शिकायला सहा महिने काय सहा मिनिटेही पाठवणार नाही, याची त्याला पुरती जाणीव होती. कृष्णाला
बालपणापासूनच गाण्याचा छंद होता. त्याच्या भवताली जन्मापासूनच गाणे होते; पण आई चिंतीत
असायची. “गायलास तर अमळनेरला आजीकडे पाठविन,’’
अशी धमकी ती द्यायची.
धमकी खरी
झाली; पण कृष्णाच्या आयुष्याला अमळनेरमध्ये पैलू पडले. आईचा गाण्याला विरोध होता, असे
नाही; पण गळ्याच्या पोषणाच्या नादात पोटापाण्याची आबाळ होऊ नये, याची तिला काळजी वाटायची.
ती म्हणायची, “गाण्यानं
पोट भरत नाही. हाताला काम असंल तर विरुंगुळा म्हणून ओठावर गाणं असावं.”
कृष्णा अमळनेरहून पसरणीला गेला. कृष्णाला समज येऊ लागली होती; पण
गाण्यापासून दूर जात होता. तो आता कृष्णा साबळे म्हणून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आला.
मीलमध्ये नोकरी करू लागला. स्वराज्य मीलमध्ये एकदा साने गुरुजी येणार होते. कृष्णाला
कळले. तो तिथे गेला. गुरुजींनी बहुदा ओळखले नाही. तो म्हणाला, “गुरुजी मी कृष्णा… तुमचा कृष्णा…
कृष्णा साबळे… अमळनेरचा कृष्णा!”
गुरूजींना आनंद झाला. कृष्णा गात नाही कळल्यावर गुरुजी म्हणाले,
“तू जीवंत कसा? गाणं तुझा श्वास आहे.
गाण्याची तुझ्या आत्म्याला गरज आहे. तू शाहीर आहेस. तू फक्त गात नाहीस तर जनतेला तू
चेतवतोस आणि त्यांच्या भावनांना पेटवतोस.”
गुरुजींच्या शब्दांनी कृष्णाचाच अंतरआत्मा जागृत झाला. सर्व विरोध
झुगारून कृष्णाने गाण्याचा निर्धार केला आणि महाराष्ट्रला एक उतुंग शाहीर लाभले… शाहीर
कृष्णराव साबळे! सिनेमात हा प्रसंग अधिक भावोत्कटपणे चितारला आहे. सिनेमाच्या मध्यांतरापर्यंत
शाहीर साबळे आणि अमळनेरचे संदर्भ मध्येमध्ये येत राहतात. मध्यांतरानंतर शाहिरांची यशाची
चढती कमान आणि जगण्यातील चढउतारही उलगडत जातात. त्यांच्या जीवनातील काव्य आणि कारुण्याचे
दर्शन होते. एका अद्भूत व्यक्तीच्या जगण्याची अनुभूती घेत मी
वैयक्तिकरीत्या अमळनेरकर म्हणून थिएटरमधून बाहेर पडलो होतो.
अमळनेर हे
शहर खानदेशातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि सांस्कृतिक पंढरी आहे. श्रीमंत प्रताप
शेठ यांनी इथे कापड मील उभारली. अण्णाभाऊ साठे यांनी अमळनेरच्या मील कामगारांवर पोवाडा
रचला, ‘अमळनेरचे अमर हुतात्मे लाल नऊ तारे, रक्तामाजी विझले निखारे ते धगधगणारे’ 1945
मध्ये मोहम्मद हुसेन हाशम प्रेमजी यांच्या ‘वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल
प्रोडक्ट लिमिटेड’ने म्हणजे ‘विप्रो’ने पहिला श्वास येथेच घेतला. विप्रोच्या आजच्या
महाकाय वटवृक्षाचे बिजारोपण इथेच झाले. भारतभरासाठी महत्वाची ‘इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ (तत्त्वज्ञान
मंदिर) इथे उभी राहिली. त्यामुळे देश- विदेशातले आणि साने गुरुजींसारखी
माणसे अमळनेरशी जोडली गेली.
प्रख्यात
अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मूळ गावदेखील अमळनेरमधीलच. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील,
काका उत्तमराव पाटील आणि काकू लीलाताई पाटील यांच्याशिवाय इथल्या इतिहासाची पाने ओलांडता
येत नाहीत किंबहुना तो पूर्णच होऊ शकत नाही. उत्तमराव पाटील साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी
होते. “खरा तो एकचि धर्म। जगाला
प्रेम अर्पावे” असा विशाल
दृष्टिकोन इथेच अंकुरला. साने गुरुजींनीच “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” अशी स्फूर्तीदेखील या मातीत जागविली.
साने गुरूजी
प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण
देण्यासाठी हस्तलिखित ‘छात्रालय’ आणि छापील ‘विद्यार्थी’ ही दोन नियतकालिके सुरु केली
होती. दोन्हीतील लेखण वाचून तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्याने प्रताप हायस्कूल हे राष्ट्रद्रोही
मच्छरांची पैदास करण्याचे ठिकाण बनले असल्याचा शेरा मारला होता. राजकारण, समाजकारण
व देशप्रेमाने भारवलेल्या या भूमीतूनच वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठ्या डौलाने आपल्या
खांद्यांवर फडकवित संत सखाराम महाराजांनी खान्देशात भावजागरण केले.
अमळनेर मध्ये
आता तब्बल 71 वर्षानंतर पुन्हा साहित्याचा गजर होणार आहे. मराठी वाङ्मय
मंडळ आयोजक आहे. 1952 मध्ये इथे पहिल्यांदा साहित्य संमेलन भरले होते. कृष्णाजी पांडुरंग
कुलकर्णी अध्यक्ष होते. यावेळी कोण अध्यक्ष असेल याची
उत्सुकता आहे. सोशल मीडायावर लोकांनी आपले अध्यक्ष जाहीर करून टाकले आहेत. कुणी तरी
अभय बंग यांचे नाव सूचविले आहे. साने गुरुजींचा सहवास लाभलेले बाबा आढाव याचंही नाव
कुणी तरी घेतलं आहे. जळगाव जिल्ह्यात 1984 (शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली) नंतर
प्रथमच साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे मराठी कादंबरीला, साहित्याला नवा आयाम देणारे
भालचंद्र नेमाडे यांना अध्यक्ष केले पाहिजे, असेही काहींना वाटते. अध्यक्षाचे नाव जाहीर
होईपर्यंत सोशल मीडियावर साहित्यिक गप्पा अशाच सुरू राहतील. “अध्यक्ष कोणीही होवो; पण तो साहित्यिक
असावा,” असा मिस्किल टोलाही एकाने या गप्पांत
हाणला आहे. गेल्या रविवारी (ता. 30) नेमाडे सरांच्या घरी गेलो होतो. त्यांना सहज सोशल
मीडियावरच्या गप्पांविषयी सांगितले. ते म्हणाले, “मुळात मी साहित्य संमेलनाला जात नाही. लिखाणाचं बरंच काम बाकी
आहे. लोक ‘हिंदू’च्या दुसऱ्या भागाविषयी विचारणा करत आहेत.”
अमळनेरसारख्या गावात भव्यदिव्य साहित्याचा मेळा फुलणार
आहे. अमळनेर निमशहरी किंवा गाव म्हणून लहान असले तरी त्याची ‘लिगसी’ खूप मोठी आहे.
त्याची प्रचिती ‘माझा पोवाडा’मधील शाहीर साबळेंच्या विधानातून येते. ते म्हणतात, “अमळनेरनं मला भरभरून दिलं. अमळनेरच्या
वास्तव्यात माझ्या कलागुणांचा चोहोबाजूंनी विकास झाला. थोरामोठ्यांच्या सहवासाने लोखंडाला
‘परिसा’चा स्पर्श लाभल्यामुळे माझं अवघं जीवन सुवर्णमय झालं!”
डॉ. जगदीश मोरे
संदर्भ: 1) शाहीर साबळे यांची मुलाखत, 2005, मुंबई
2) साबळे शाहीर, माझा पोवाडा,
मेजेस्टिक प्रकाशन, मुंबई
3) https://vishwakosh.marathi.gov.in
4) महाराष्ट्र शाहीर, केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमा
No comments:
Post a Comment