Saturday 20 June 2015

साताऱ्यातले जलयुक्त शिवार




'शेतकरी' मासिकाच्या मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झालेला सातारा जिल्ह्यातील ओढाजोड कल्पाबाबतचा माझा लेख. 
       गुळुंब (ता. वाई) येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून ओढाजोड प्रकल्प राबविला जात आहे. जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरमुक्तीच्या दिशेने टाकलेल्या या कल्पक पावलांचा घेतलेला हा वेध...
       अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा असल्या तरी 'पाणी' ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याविषयी आतापर्यंत खूप चिंतन झाले आहे. चिंतनशील विचार कृतीत आणण्यासाठी राज्य शासनातर्फे 'जलयुक्त शिवार अभियान' राबविले जात आहे. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील प्रत्येकी पाच गावांत पहिल्या टप्प्यातील कामे सुरु झाली आहेत. काही तालुक्यांत पाचपेक्षा जास्तही कामे सुरु झाली आहेत. त्यातील गुळुंब (ता. वाई) येथील ओढाजोड हा अत्यंत महत्वाकांक्षी आणि कल्पक प्रकल्प ठरणार आहे.
           सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या गुळुंबवर नियतीने काहीसा अन्यायच केला आहे. गुळुंब येथून मांढरदेव आणि भालेघरचा डोंगर सहज दृष्टिक्षेपात पडतो. तो अगदी सातआठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पुढे महाबळेश्वरचा परिसर सुरु होतो. तेथे राज्यातला सर्वाधिक पाऊस कोसळतो. मांढरदेव आणि भालेघर डोंगर परिसरातही चांगला पाऊस होतो. गुळुंबमध्ये मात्र केवळ सरासरी 400 मिलीमीटर पाऊस होतो. अगदीच थोड्या अंतरावर निसर्गातील ही विषमता जाणवते. या विषमतेचा मात्र इथल्या गावकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम होतो. त्यावर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा पत्रातील ''खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळापर्यंत पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी'' या उक्तीप्रमाणे गुळुंब येथे पाझर तलाव बांधण्यात आला आहे. काही वर्षांपर्यंत 2 हजार 949 लोकसंख्येच्या गावाची तहान हाच पाझर तलाव भागवत होता. आता मात्र डिसेंबर-जानेवारीतच हा तलाव तळ गाठतो आणि टँकरला निमंत्रण देतो. 2010 पासून टँकरला पर्याय राहिलेला नाही. दरवर्षीच टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येते. जलयुक्त शिवार अभियानातून गुंळुंबच्या पाण्याचा ताळेबंदही (वॉटर ऑडिट) तयार करण्यात आला आहे. त्यात 340 कोटी 94 लाख लीटरची तूट आढळून आली आहे.
          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी गुळुंबला भेट देऊन टंचाईवर कायमस्वरुपी कशी मात करता येईल याबाबत ग्रामस्थांशी विचारविनिमय केला. त्यात ग्रामस्थांनी चांदक आणि गुळुंब ओढाजोड प्रकल्प सुचविला. जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी स्वत: यात लक्ष घातले. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडले आणि ओढाजोड प्रकल्पाचा प्रारंभ झाला. चांदकच्या ओढ्यावर पूर्वी लहानसा बंधारा होताच. नैसर्गिक उतारानुसार  त्याच्या पाटातून काही प्रमाणात शेते भिजली जात होती. आता ते बंधाराही आणि पाटही नामशेष झाला आहे. त्या बंधाऱ्याच्या पाण्याच्या आठवणी मात्र आजही अनेक ग्रामस्थ सांगतात. पालकमंत्री  विजय शिवतारे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.
           गुळुंबच्या पश्चिमेस चांदक गाव आहे. चांदकच्या वरच्या बाजूला मांढरदेव आणि भालेघरचा डोंगर आहे. तिथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्याच परिसरात चांदकचा ओढा उमग पावतो. त्याला गुळुंबच्या ओढ्यापेक्षा जास्त पाणी असते. गुळुंबचा ओढा गुळुंबच्या परिसरातच उगम पावतो. त्याला फारसे पाणी नसते. चांदकच्या ओढ्यातून मात्र पावसाळ्यात खूप पाणी वाहून जाते. त्याच्यातील वाहून जाणारे पाणी गुळुंबच्या पाझर तलावात टाकल्यावर गुळुंबच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. वाहून जाणारे पाणी अडविले पाहिजे, हा बहुमोल संदेश छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले आणि अनेक साधूसंतांनी दिला आहे. त्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे,
            'नदी सागरी मिळावा, तिची अपार भक्ती व्यर्थचि जावी
            ऐसी ईश्वरी इच्छाचित नसावी, उपयोगी यावी सर्वांच्या''
ग्रामगीतेतल्या या ओळी आता गुळुंबमध्ये प्रत्यक्षात येत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरीही सुखावले आहेत. ओढाजोड प्रकल्पामुळे चांदक आणि गुळुंबला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. शिवाय या शिवारातील शेतकऱ्यांच्या 15 विहिरीनाही लाभ होणार आहे. बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरीही मोठ्या उमेदीने पुढे आले आहेत. अनेकजण लोकवर्गणी देत आहे. अनेक जणांनी श्रमदानाची तयारी दर्शवली आहे.
ओढाजोड प्रकल्पाला सुमारे 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ज्ञानदीप सहकारी पतसंस्था, किसनवीर सहकारी साखर कारखाना, वाई रोटरी क्लब; तसेच अन्य एका उद्योगानेही आर्थिक आणि यंत्र सामुग्रीच्या स्वरुपात मदत देऊ केली आहे. आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. बळ, युक्ती आणि द्रव्याचा इथे संगम झाला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पुढील ओळींचे इथे स्मरण झाल्याशिवाय राहत नाहीत.
''बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उद्क चालवावे युक्ती
 नाही चळण तया अंगी, धावे लवणामागे वेगी''
        जलयुक्त शिवार अभियानातून हा प्रकल्प राबविला जात आहे. चांदक गावच्या बंधाऱ्यावर सिमेंट क्रॉक्रिटचा वळण बंधारा बांधला जाणार आहे. या बंधाऱ्यापासून गुळुंबच्या बंधाऱ्यापर्यंत साधारणत: 1.50    किलोमीटर लांबी बंदिस्त सिमेंट पाईप टाकले जाणार आहेत. 600 मिली मीटर व्यासाची पाईप असतील. काही ठिकाणी ही पाईपलाईन उभारुन ती पुढे नेली जाईल. काही शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आनंदाने संमती दिली आहे. नैसर्गिक उतार शेवटपर्यंत राखला जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारे पंपिंग करता उच्च दाबाने हे पाणी गुरुत्व पद्धतीने गुळुंबपर्यंत नेले जाईल. वाहून जाणाऱ्या पाण्यातून साधारणत: दोन वेळा गुळुंबचा पाझर तलाव भरुन घेतल्यास ते पाणी उन्हाळ्यामध्ये वापरता येईल. परिणामी गुळुंबची टँकरपासून मुक्ती होऊ शकेल आणि परिसरातील विहिरींचा पाझरही वाढू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

विकेंद्रीत पाणीसाठ्यांवर भर
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रीत स्वरुपात पाणी साठे तयार केले जातील. पाण्याच्या उपलब्धतेबाबत जिल्हाभरात समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी माण-खटाव सारख्या दुष्काळी भागालाही न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर ओढा जोड सारखे प्रकल्प निश्चितच उपयुक्त ठरतील.
                                                                                          -श्री. विजय शिवतारे, पालकमंत्री, सातारा
गुळुंबची एकी कौतुकास्पद
ओढा जोडणीसाठी गुळुंबच्या ग्रामस्थांनी टाकलेले पाऊल म्हणजे त्यांच्या सकारात्मक भावनेचे प्रकटीकरण आहे. त्यांनी दाखवलेली एकी कौतुकास्पद आहे. गुळुंबला एकूण 340 कोटी 94 लाख लीटर पाण्याची तूट भासते. ती भरुन काढण्यासाठी ओढा जोढणीसारखा प्रकल्प निश्चितच वरदान ठरु शकतो. त्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीसह ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहे.
-श्री.अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, सातारा


टँकरमुक्तीच्या दिशेने
वाई तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागातो, हेच मुळात आश्चर्यजणक आहे. ओढा जोड प्रकल्प म्हणजे टँकरमुक्तीच्या दिशेने केलेली वाटचाल आहे; परंतु पाणी येऊन प्रश्न सुटणार नाही. पाण्याचा शिस्तीने आणि काटकसरीने वापर करावा लागेल. त्यासाठी जिल्हा परिषद गावकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करेल.
-जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

ग्रामस्थांच्या एकीचे फळ
ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकीमुळेच गुळुंबच्या पाण्याचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही या प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो. आमच्या गावकऱ्यांचा उत्साह वाढविणारा हा प्रकल्प आहे. सगळ्यांमध्येच सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या सर्वांना मी मन:पूर्वक धन्यवाद देते.
-सौ. अल्पना यादव, सरपंच, गुळुंब
गुळुंबच्या पाण्याचा ताळेबंद
  • गावाची एकूण लोकसंख्या- 2 हजार 949
  • सरासरी पर्जन्यमान- 400 मिलीमीटर
  • पिण्यासाठी प्रतिवर्षी लागणारे पाणी- 5 कोटी 38 लाख लीटर
  • जनावरांसाठी लागणारे पाणी- 78 लाख लीटर
  • पिकांसाठी लागणारे पाणी- 418 कोटी 50 लाख लीटर
  • गावाची एकूण पाण्याची गरज- 424 कोटी 66 लाख लीटर
  • पावसाद्वारे उपलब्ध होणारे एकूण पाणी- 435 कोटी 60 लाख लीटर
  • त्यापैकी जमिनीत मुरलेले प्रकल्पांतील उपलब्ध पाणी- 83 कोटी 72 लाख लीटर
  • वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे भासणारी तूट- 350 कोटी 88 लाख लीटर