Wednesday 3 July 2013

आनंदमय जीवन प्रवासासाठी


श्री. बिपिन मयेकर यांचे ‘मी मुंबईकरहे पुस्तक नुकतेच वाचले. जीवनातले ताणतणाव, चिंता, भीती, संघर्ष आदी वेगवेगळ्या घटकांवर प्रकाश टाकत सकारात्मक मते आणि विचार विकसित करण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे.
पल्लवी फौंडेशनने अलीकडेच प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या नावात मुंबई असले तरी त्यातील संदर्भ सर्वठायी लागू पडणारे आहेत. सकारात्मक व प्रेरणादायी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मुळात श्री. मयेकर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (एनएलपी) प्रशिक्षक आहेत. एनएलपी म्हणजे सर्वोत्तमपणाचा अभ्यास. यातील न्यूरोचा संबंध मज्जातंतू आणि पंचेद्रियांसंदर्भात आहे. (बघणे, ऐकणे, अनुभवणे, चव घेणे व वास घेणे) लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र. यात शब्दांचा यथायोग्य वापर, शब्दांचा मेंदूवर होणारा परिणाम, मेंदूकडून शब्दांचा होणारा वापर व देहबोली यातून भाषाशास्त्राशी असलेले संबंध प्रतिबिंबित होतात. प्रोग्रामिंगचा उल्लेख विचार, भावना आणि कृतिसंदर्भात आहे.
एनएलपीच्या माध्यमातून मानसिक जडणघडणीची कुंडली मांडता येते. योग्य मानसिक जडणघडण झाल्यास कार्यक्षमतेत वाढ होऊ शकते. एनएलपी प्रशिक्षणाच्या मदतीने विचारसणीत, भावभावनांत, कृतीमध्ये पर्यायाने जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणणे शक्य असते. त्यातून जुन्या मानसिक आघातातून माणसाला मुक्त करणे, अंतर्मनातील गुंता सोडविणे, सुखद मन:स्थिती प्राप्त करणे, वाईट सवयी घालविणे, तसेच आत्मविश्वास व उत्साह निर्माण करण्याचे कामदेखील अल्पावधीत शक्य होते, असा दावा केला जातो.
श्री. मयेकर यांची अमेरिकेच्या नॅशनल फेडरेशन ऑफ न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगया जागतिक संघटनेतर्फे जगातील 10 ‘मास्टर ट्रेनर ऑफ एनएलपीम्हणून जून 2012 मध्ये निवड करण्यात आली होती. यावरून श्री. मयेकर यांची एनएलपीमधील मास्टरी लक्षात येते. पण श्री. मयेकर यांची ही मास्टरी आणि एनएलपीचे दावे बाजूला ठेऊन पुस्तक वाचले तरी ते प्रेरणादायी वाटते. त्यांचे लिखाण मानसशास्त्राच्या अंगाने जाते. वाचकाच्या उणिवांवर बोट ठेवते. त्याला न्यूनगंडाच्या फेऱ्यातून सोडविण्याचा प्रयत्न करते. गर्वहरण करून आत्मप्रेरणेला फुंकर घालण्याचेही काम करते.
पुस्तक वाचताना मी केवळ मुंबईतल्या गर्दीतला एक भाग आहे की या गर्दीत माझीसुद्धा काही ओळख आहे? हा प्रश्न वाचकाला नक्कीच पडतो. गर्दी फक्त मुंबईतच नाही. सर्वच शहरे हळूहळू गर्दीने व्यापली जात आहेत. सर्वांसाठीच हा प्रश्न जिव्हाळ्याचा झाला आहे. त्याचे उत्तर सगळ्यांनाच या पुस्तकात सापडेल, असे नाही. पण बऱ्याच जणांना ते त्या दिशेने विचार आणि कृती करण्यासाठी उद्दिक्त करु शकते. आला दिवसगेला दिवस म्हणत जगणारेही असतात आणि धावपळीत जीवनरसाचा आनंद घेणारे आनंदयात्रीही असतात. आनंदमय जीवनसाठी सफलतेच्या दिशेने प्रवास करताना सोबतीला ज्ञान, कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, प्रभावी विचारसरणी, कणखरपणा, द्रष्टेपणा, उत्साह, चिकाटी, स्नेहसंबंध, धाडस, संयम; तसेच वेळ आणि ताणतणावाच्या नियोजनाबरोबर थोडा धूर्तपणाही हवा असतो. तोच धागा पकडत विविध उदाहरणे आणि रुपकांतून जीवन प्रवासाचा मार्ग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
वाहून गेलेले पाणी मागे वळून परत फिरत नाही. आयुष्यातून वजा झालेला दिवससुद्धा परत येत नाही. दिवसच काय, वर्षेही वजा होत जातात! याचे भानच राहत नाही. उत्तरआयुष्यात कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. भीतीपोटीच आयुष्य खर्ची झालेले असते. भीती हाच यश आणि आनंदायी जीवनातला सर्वात मोठा अडसर असतो. भीती अनेक प्रकारच्या असतात. टीका होण्याची भीती, नाकारले जाण्याची भीती, अपयशाची भीती, हवे ते न मिळण्याची भीती आणि आहे ते गमविण्याची भीती. एकूणच काय? भीतीभीतीआणि भीतीच! भीती वर्तमानकाळात असते. चिंता भविष्यातून निर्माण होते. असे झाले तर किंवा तसे झाले तर अशा प्रकारचे मानसिक खेळ चिंतेतून निर्माण होतात. भविष्यातील या अनामिक जीवघेण्या चिंतेला सामोरे जाऊ न शकणारे व्यसनांच्या आहारी जातात, कधी कधी बेफिकीर होऊन जगतात. काहीजण थेट जीवन संपविण्याचा मार्ग अवलंबतात. ते टाळण्यासाठी बालपणापासूनच संस्कारांची आणि वास्तव जीवनाची नाळ जोडली गेली पाहिजे. मुलांना केवळ गुणांच्या शर्यतीत धावायला भाग पाडून उपयोग नाही. वास्तववादी जीवनाचे भान यायला हवे. अपयशाचे दु:ख पचवता आले पाहिजे. यशाचा उन्माद टाळता यायला हवा. चांगल्या- वाईट जीवनाशी त्यांची ओळख वेळीच व्हायला हवी. कठीण आणि कटू प्रसंगांनाही सामोरे जाता आले पाहिजे. कठीण काळ टिकत नाही; पण दृढ मनाची माणसे टिकतात, हे लहानपणापासूनच बिंबले गेले पाहिजे आणि मोठेपणी त्याचे स्मरण झाले पाहिजे. निराश होऊन जीवन फुकट घालविण्यापेक्षा आशावादी राहत झुंजणे चांगले. दु:खी अंत:करणाने मरत मरत जणगण्यापेक्षा ठामपणे जगणे कधीही चांगले! याची जाणीव यातून होते.
जगातील सर्वोत्तम स्वत:ला हवे असणे ही बाब सर्वसाधारण बनते तेव्हा यायुष्यातील समस्या व ताणतणांवाना खरी सुरवात होते. कपातली कॉफी किंवा चहा म्हणजे आयुष्य. ते अधिक चविष्ट करायला हवे. कप हे साधन आहे. साध्य नाही. सर्वोत्तम कप प्राप्तीसाठी संघर्ष करताना आपण ताणतणाव ओढून घेतो. अहंकारातूनही ताणतणाव येतात. अहंकाराला जरासुद्धा ठेच पोहचली तरी तीळपापड होतो. अहंकार अतिआत्मविश्वास आणि न्यूनगंडातूनही येवू शकतो. न्यूनगंड असुरक्षिततेमुळे किंवा असुरक्षिततेच्या भीतीमुळे येऊ शकतो. अहंकार मात्र नातेसंबंधामध्ये दरी वाढवितो. नम्रपणा नातेसंबंधातील गोडवा वाढवित नेतो. अलीकडे घरांचे क्षेत्रफळ वाढले आहे; पण घरांमध्ये माणसांऐवजी सुखसोयीच जास्त झाल्या आहेत. वस्तुकेंद्रित स्वभावही ताणतणावांना निमंत्रण देत असतो. मीच बरोबरमाझेच सर्नांनी ऐकावे अशा हेक्याने आपण इतरांची मने तुडवतो. माणसांना नकळत दूर सारतो; पण मान काही मिळत नाही. शेवटी निराशाच पदरी पडते. निर्मळ आणि निर्व्याज आनंदाला अशा व्यक्ती नेहमीच पारख्या होतात. आयुष्याच्या दीर्घ प्रवासात मान मागून मिळत नसतो. तो आपल्या नैसर्गिक मोठेपणातून मिळतो. याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
कुठल्याही गोष्टीचा अभिमान असावा; गर्व नको. गर्वामुळे आपण स्वत:ला श्रेष्ठ समजतो. इतरांना कमी लेखतो. न्यूनगंडही नसावा. न्यूनगंडामुळे आपण स्वत:ला कमी लेखतो. सार्थ अभिमान असणारे स्वत:चा मान राखत इतरांनाही मान देतात. मात्र आपला समजुतदारपणा इतरांनी गृहित धरू नये. अन्यथा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो. याचेही भान राखले पाहिजे. त्याचप्रमाणे पश्चात्ताप असावा; अपराधीपणा नको. उदा. नात्यांच्याबाबतीत चूक झाल्यास पश्चात्तापाची भावना हवी. अपराधीपणाची उजळणी नको. पश्चात्ताप चुकांची जाणीव करून देत सकारात्मक पावले उचलण्यास प्रवृत्त करतो. अपराधीपणा आपल्याला नकारात्मक मन:स्थितीत घेऊन जातो. नाते आले की अपेक्षा आल्याचनाते म्हणजे अपेक्षांची यादी! प्रत्येक नात्यात व्यक्तिगत भूमिका बदलते. प्रत्येक भूमिकेत आपले हक्क आणि आपल्या जबाबदाऱ्या ठाऊक असायला हव्यात. आपल्या प्रमुख नात्यांमधील हक्क आणि जबाबदाऱ्या आपल्याला माहीत आहेत का? हा प्रश्न ‘मी मुंबईकरहे पुस्तक वाचतांना पडतो.   
पल्लवी फौंडेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील सर्वच विचार किंवा उदाहणे सगळ्यांनाच आवडतील, असे नाही. जे जे चांगले, जे जे आवडेल ते ते घ्यावे, या भावनेतून हे पुस्तक वाचल्यास नक्कीच आनंद मिळू शकतो. पुस्तकातील भाषा साधी आणि सोपी आहे. त्यातील उदाहणेही आपल्या 
दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न श्री. मयेकर पल्लवी फौंडेशनला देणार आहेत. त्यातून रक्तपेढी उभारण्यास हातभार लाभेल, अशी फौंडेशनला अपेक्षा आहे.
पुस्तकाचे नाव: मी मुंबईकर
लेखक: बिपिन मयेकर (9819001215)
ईमेल: myself.bipin@yahoo.co.in  admn@prasannahrd.com
प्रकाशक: पल्लवी फौंडेशन
किंमत: रु. 200
संपर्क: श्री. प्रीतम मोहिले (9987069886)

20 comments:

 1. मित्रा, ब्लॉगविश्वात तुझं मनःपूर्वक स्वागत. एका वेगळ्या पुस्तकाची ओळख वेगळेपणानं मांडून तुझं आगमन जोरदार केलंयस, हे नक्की. भरभरून लिही, वाचायला आम्ही आहोतच! हार्दिक शुभेच्छा!!

  ReplyDelete
 2. मनःपूर्वक स्वागत आणि सातत्यासाठी शुभेच्छा !

  ReplyDelete
 3. जगदीश, सर्वात आधी ब्लॉगर झाल्याबद्दल अभिनंदन... आणि तुझ्या शिवारातून असेच वैचारिक पीक येत राहो, अशा शुभेच्छा...

  ReplyDelete
 4. स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा...

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, सर... आपल्या शुभेच्छा फार मोलाच्या आहेत.

   Delete
 5. My Heartiest Wishes...
  Alok already created sensation & eagerness; your First Article shows that we have still much more to Read...
  Congrates!
  Keep Going.
  With Wishes,
  Vikrant

  ReplyDelete
 6. ब्लॉगविश्वात तुमचे मनःपूर्वक स्वागत.…. प्रथम गोष्टीचे महत्व विशेष असते. पहिली नोकरी, पहिला पगार, पहिले प्रेम, मंदिरातील पहिली पायरी… तुमच्या ब्लॉगच्या माध्यामातर्फे होणाऱ्या लेखनाची सुरुवात तुम्ही माझ्या पुस्तकाच्या विषयी लिहून केलीत याबद्दल मनपूर्वक आभार…. माझ्या मी मुंबईकर पुस्तकाचा सारांश आपण ज्या नेमकेपणाने लिहिला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या जगात जिथे स्व:केंद्रित प्रवृत्ती उफाळून येत आहेत. स्वत:च्या व स्वकियांच्या व्यतिरिक्त अनेकांना इतर जग दिसत नाही. तिथे आपण इतरांबद्दल चांगले लिहित चांगुलपणाचा प्रसार करत आहात. वाईट गोष्टी जंगलातल्या वणव्यासारख्या वेगाने पसरत जातात. त्यामुळे सर्वत्र वाईटच वाईट आहे असा दृढ गैरसमज फैलावत चालला आहे. आपणासारख्या व्यक्ती प्रकाशदूत बनून अंधकार भेदण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या या अनमोल प्रयत्नास प्रसन्न शुभेच्छा… आपल्या वास्तववादी लिखाणाचे माझ्यासह अनेक जण चाहते आहेत. येणाऱ्या काळात तुमच्या वैचारिक मेजवानीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत….

  [कृपया माझा इमेल चुकीचा छापला गेला आहे, योग्य इमेल आहे - myself.bipin@yahoo.co.in or admn@prasannahrd.com]

  ReplyDelete
  Replies
  1. प्रिय बिपीनजी,
   या लेखातल्या विचारांसह शब्दही तुमचेच आहेत. फक्त मी ते सारांक्ष रुपात संकलित केले आहे. त्यामुळे सर्व श्रेय तुमचेच आहे. ....आणि हो, मेल दुरुस्त केला आहे. खरे तर तो आयडी पुस्तकातून घेतला आहे, असो. अलिबाग येथून प्रकाशित होणाऱ्या दै. कृषिवलमध्ये आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे.
   जगदीश.

   Delete
 7. वाव, जगदीश ...
  ग्रेट!
  आवडेल, वाचायला!
  (आणि, उत्तम ते आमच्याकडे वापरायलाही!
  आम्ही किती तयारीचे चोर आहोत, यू नो)
  आरंभ उत्तम, पण आरंभशूर ठरु नका, सर!
  सातत्य ठेवा ...
  - संजय आवटे

  ReplyDelete
 8. सर, तुमच लेखन माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी असत. मला वाचनाची आवड नाही पण जर काही वेगळ आणि सकारात्मक वाचायला मिळाल तर मी नक्कीच वाचतो. मी मुंबईकर या पुस्तकावर लिखान केल खरच खुप छान आणि सुदंर. तुमच्या मुळे कदाचित मला वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. मी मुंबईकर या पुस्तकाविषयी जे थोडक्यात मांडलय त्यामुळे असे वाटत की ते पुस्तक नक्कीच वाचव, जीवनाला प्रेरणा देणार हे लिखान असाव. अस मला वाटत. मी बाजारातून पुस्तक मिळविण्याचा प्रयत्न करेल, पण जर मला हे पुस्तक मिळाले नाही. तर तुम्हाला मला हे पुस्तक उपलब्ध करुन दयावे लागेल.............................. धन्यवाद ङ!

  पु

  पुन्हा एका शुभेच्छा ब्लॉगसाठी..................


  -नंदलाल कुचे

  ReplyDelete
 9. जगदीश,
  परिचय चांगला लिहिला आहेस. मी मुंबईकर या शीर्षकावरून दिशाभूल होण्याची शक्यता आहे पण जो तुझे नेटके परीक्षण वाचेल त्याचा गैरसमज होणार नाही. खरे तर, परिचयावरून असे वाटते की, पुस्तकाचे नाव मी शहरकर असायला पाहिजे होते कारण गर्दी सर्वत्रच वाढत आहे. हे तूच नमूद केले आहेस. भावनिक व्यवस्थापन (Emotional Management) साठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे वाटते.
  बिपिन मयेकरांचेही अभिनंदन.

  ReplyDelete
  Replies
  1. होय केदार, श्री. मयेकर यांचे हे पुस्तक दै. सकाळमधील स्तंभावर आधारीत आहे. सुरवातीलाच मीही त्यांना हेच सांगितले होत. परंतु नावावरून काही फरक पडत नाही. पुस्तक चांगले आहे.
   जगदीश

   Delete
 10. jagdish. best of luck. .

  ReplyDelete
 11. खुप सुंदर परिचय........

  ReplyDelete