Sunday, 8 November 2020

केकरा के वोट दो?

 केकरा के वोट दो?

दुपारी काही कामानिमित्त वाकोल्यात गेलो होतो. "बांद्रा येणार का?," रिक्षावाल्यांना विचारत होतो. तिघांनी नकार दिला. कोविडनंतर मुंबई पूर्वपदावर आल्याचा तो पुरावा होता.

कधीही न झोपणाऱ्या, न थांबणाऱ्या मुंबईत मार्च- एप्रिलमध्ये सायंकाळी साडेआठ- नऊनंतर भीती वाटावी, असं चित्र होतं. हातावर पोट असलेल्यांची चूल पेटेनाशी झाली होती. उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या एका विषाणूमुळे भीतीनं शिखर गाठलं होतं. भयाणू शिरजोर झाला होता. परप्रांतीय आपापल्या गावी निघाले होते.

जूननंतर मुंबई अनलॉक होऊ लागली. रस्त्यावर तुरळक वाहनं दिसू लागली होती. रिक्षावाले आशाळभूत नजरेनं प्रवाशांकडे बघायचे. दिवसाला दोनचार प्रवाशी मिळाले तरी चुलीत आणि काळजात घग जाणवावी, असं सगळं होतं. ऑगस्टपासून मात्र चित्र पालटू लागलं. ट्रॅफिक वाढू लागली. परप्रांतिय परतू लागले.

ऑक्टोबरपासून तर गर्दीला घाबरून करोनाने पळ काढला असावा, एवढी मुंबई बहरू लागली होती. दिवाळीच्या तोंडावर तर ती आता ओसंडून वाहू लागली आहे. हीच गर्दी करोनाला आपल्या पायाखाली तुडविणार, असं दिसतंय. रिक्षावाले भाडे नाकारु लागले आहेत. प्रवाशी येणाऱ्या- जाणाऱ्या रिक्षांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागले आहेत. नेहमीची मुंबई आता चाकरमान्यांच्या टप्प्यात येऊ पाहत आहे. यातच आशेची किरणं आहेत!

रिक्षा मिळत नाही म्हणून मी वाकोल्यातून कलिनाच्या दिशेने चालत पुढे आलो. एका रिक्षेला हात केला. ती थांबली. सुटकेचा नि:श्वास टाकला!

रिक्षावाला तिशीतलाच होता. त्याला विचारलं, ''कुठल्या गावचा?"

"साहब, बिहार से हूं!"

"गाव नही गये?"

"गये थे! करोना से डर लगता था! आगे बरसात भी आवत रहे, हमरा इलाका मे पानी भर जाला! बम्बे ना लौटना, ऐसा तय कर लिया था. लेकीन आना पडा! पैर ना कहे थे! पेट बम्बे की ओर खिचता था!"

"बिहार मे चुनाव चल रहा था! पता नही था?"

"मालूम बा!"

"फिर भी बिना वोट डाले आ गये?"

"का करी, साहब? पापी पेट के सवाल बा!"

"थोडे दिन और रुक जाते!"

"साहब, साच बोली!"

"अरे, बोलो बिनधास्त."

"साहब, गरीब लोग की खाली पेट केही सोच और विचारधारा बा!"

"ठीक है! फिर भी वोट डालना जरूरी था ना!"

"साहब, तहरो भी ठिके बा! वहा पर केइ का कइले बा! केकरा के वोट दो?"

रिक्षा थांबली... माझं डेस्टिनेशन आलं होतं!

-जगदीश मोरे