Sunday, 3 July 2022

रंधा

रंधा: गुळगुळीततेवरचे निसटलेले जगणे

स्टोव्हच्या तोंडात द्वारकाने एक- दोनदा पिन लावली. आगकाडी पेटवली. स्टोव्हच्या तोंडात अचानक मोठी ज्योत पेटली. द्वारकाच्या चेहऱ्याजवळून ज्योत चाटून गेली. तशी ती घाबरली. मागे सरकणार तोच अचानक टोव्हचा भडका झाला. बघता बघता स्टोव्हचा स्फोट झाला अन् द्वारकाच्या साडीला आगीने धरले. द्वारका एकदम घाबरली. आपण आधी स्टोव्ह विझवावा? पण कसा विझवावा? की आधी आपली साडी विझवावी? अजून दुसरं काय करावं? अशा अनेक प्रश्नांचा गुंता तिच्या डोक्यात वाढत गेला. तिला काही समजत नव्हते. क्षणाक्षणाला आग वाढत गेली. हवेचा वेग जास्त होता. त्यामुळे आग घरात चहुबाजूला पसरली. झोळीत झोपलेल्या बाळाला आता आगीनं कवेत घेतलं. त्याला आगीच्या झळा लागत होत्या. बाळ आक्रोशाने रडत होते. आता ते जागेवर जास्ती हालचाल करत होते. झोळीच्या गोधडीला आगीने धरले. क्षणात झोळीचा दोर तुटला. बाळ आगीत पडले. द्वारका अजून घाबरली. बाळाला वाचवण्यासाठी ती पुढे सरसावली. बाळ आणि द्वारका दोघेही पेटत होते. आग आता प्रचंड वाढली होती. ती जिवाच्या आकांताने आरोळ्या मारत होती, वाचवा होऽऽ वाचवाऽऽ… कोणी माझ्या बाळाला तरी वाचवाऽऽ. कोणी तरी वाचवा होऽऽ

श्री. भाऊसाहेब मिस्तरी यांच्या ‘रंधा’ कादंबरीचा हा ब्लर्ब अंगावर शहारे आणतो. कादंबरीविषयीची उत्सुकता वाढवितो. कादंबरीच्या सुरुवातीला वेगवान नाट्यमयता आहे. कारुण्याची किनार आहे. वाचताना प्रचंड अस्वस्थता दाटते. कादंबरीचा नायक- अण्णाच्या संसारात पुरुषी मानसिकतेचा गंड विघ्न घेऊन येतो. संसारातील विघ्नांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र होत जातो. त्यातून कादंबरी पुढे जाते खरी; पण वाचक म्हणून मध्यास पकड काहीशी सैल झाल्यासारखे वाटू लागते. काही पृष्ठानंतर ती पुन्हा मजबूत होते. संपूर्ण कादंबरी खानदेशच्या पार्श्वभूमीवर विशेषत: धुळे जिल्हा आणि आर्वी गावाभोवती फिरत राहाते. शीर्षकावरून ती बलुतेदारीवर भाष्य करणारी वाटत असले तरी ती त्यास केवळ स्पर्श करते. ग्रामीण व्यवस्था, कृषक जीवन, आर्थिक ओढाताण आदींवर ती अधिक भाष्य करते. विवाह पद्धती, आखाजीसारखे सण- उत्सव, ग्रामीण संस्कृती आदींचे दर्शनही लेखक करून देतो.

भविष्य सांगणारा पिंजऱ्यातला पोपट घेऊन गावोगावी आणि गल्लोगल्ली फिरत असतो. मोठ्या आशेने लोक आपले भविष्य बघतात; पण भविष्य उज्ज्वल होत नाही. मुलींच्या आशा- अपेक्षांना दुय्यम स्थान देणारा समाज आपल्या अपेक्षांचे ओझे मात्र त्यांच्यावर लादतो. कुसुमला चांगले स्थळ मिळणार असतानाही बापाच्या आग्रहास्तव अण्णाची बायको म्हणून आयुष्याला सामोरे जावे लागते. गावात येणाऱ्या विक्रेत्यांना किंवा कल्हईवाल्यालाही जीव लावणाऱ्या महिलांचे भावविश्व संवेदनशीलता दाखवते. आपल्या पोराबाळांना बरे करण्यासाठी दिलेल्या औषधाचा मोबदला देण्यासाठी काहीच नसताना आपली शेळी फकिराला सहज देणाऱ्या माणसांचे उदारपण वाचकाच्या मनात कणव जागृत करते. रित्या आयुष्यासमोर हात न टेकणारी ग्रामीण माणसे काळासोबत लढत राहतात. संकटांशी सामाना हेच त्यांचे प्राक्तन असते, याची ठळक जाणीव ही कादंबरी करून देते.    

खानदेशातील गावगाड्याचा, गरिबीचा पट या कांदबरीतून उलगडतो. खानदेशातील गावागावांतील आणि कुटुंबाकुटुंबातील प्रतिबिंब शब्दागणिक उमटते. अण्णाचे संपूर्ण आयुष्य कष्टमय आहे. भाकरीच्या चंद्रासाठी लढणाऱ्या अण्णाचा जगण्याचा संघर्ष संपत नाही. रुढी- परंपरा अंद्धश्रद्धा त्याच्या जगण्याचे अविभाष्य अंग असते. बैलगाडी घडविणे आणि शेतीची अवजारे तयार कहणे हे त्याचे नैसर्गिक कसब आहे. लाकडे तासताना त्याच्या स्वत:च्या आयुष्याच्या खपल्या निघत राहतात. बैलगाडीची चाके अधिकाधिक वेगवान करण्यासाठी धडपडणाऱ्या अण्णाच्या जगण्याला मात्र गती लाभत नाही. त्याची खंत करण्याची त्याला उसंत नाही. सुतारकाम आणि मोलमजुरीवर संसाराचा गाडा तो हाकत राहतो. अण्णाच्या आयुष्याचा हा प्रवास रंध्यामुळे गुळगळीत होतो खरा; पण जगणे मात्र निसटून जाते. (कादंबरीचे लेखक- भाऊसाहेब मिस्तरी, मो. 9960294001.)

-जगदीश मोरे