‘शेती-प्रगती’ मासिकाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा
लेख. शेतीचं वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांत अधूनमधून कमी-अधिक प्रमाणात प्रतिबिंब उमटत
असतं. पूर्णत: शेतीला वाहिलेली कृषी पत्रकारिताही आता रुजली आहे. त्याच अनुषंगाने ‘प्रसारमाध्यमे
आणि शेती’ याविषयाचा घेतलेला धांडोळा. यात अनेक उल्लेख राहून गेले असतीलही; ते टाळण्याचा
उद्देश नाही. कारण हा आढावा परिपूर्ण असल्याचा मुळीच दावा नाही…
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
सुरवातीची काही वर्षे राष्ट्रीय
उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा
सर्वाधिक, 60 टक्क्यांपेक्षा जास्त
होता. आता स्थिती उलटी आहे. सेवा
क्षेत्राचा वाटा सर्वाधिक 50 टक्क्यांच्या वर गेला आहे. कृषी क्षेत्र
तिसऱ्या स्थानावर आहे. कृषीचा वाटा 20 टक्क्यांच्या
खाली आला आहे. राष्ट्रीय उत्पादनात
कृषी क्षेत्राचा वाटा कमी
झाला असला तरी शेतीवरील
अवलंबितांच्या संख्येत फारसा फरक
पडलेला नाही. आजही सर्वाधिक
सुमारे 55 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांच्या
जगण्याचे साधन शेतीच आहे. शेतीवर
अवलंबून असलेले सर्वाधिक लोक
राष्ट्रीय उत्पन्नात मात्र सर्वात
कमी योगदान देतात. म्हणजे बहुसंख्य
जनतेचा आर्थिक स्तर अद्याप
समाधानकारक नाही. कृषी क्षेत्रावर
लक्ष केंद्रित केल्याशिवाय विकासातला
हा असमतोल दूर होणं शक्य
नाही. हा असमतोल
दूर करण्याच्या उपाययोजनेत प्रसारमाध्यमांचीही सहभाग वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.
शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना पोहोचविण्यात कृषी पत्रकारिता महत्वाची
भूमिका बजावत आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे
प्रयत्न झाले आहेत.
शेतीचा पूर्वेतिहास
मानवी
जीवनाच्या आणि संस्कृतीच्या विकासात कृषीचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. किंबहुना
शेतीच्या अनुषंगानेच मानवी जीवन बहरत आणि फुलत गेले. इंग्रजीतील Culture या शब्दाला
आपण ‘संस्कृती’ हा शब्द वापरतो.
Colere या लॅटिन
शब्दापासून Culture हा शब्द आला
आहे. सूक्ष्मजीवशास्त्रात Culture म्हणजे
जीवाणूंच्या पेशी वाढविणे, हा अर्थ
अभिप्रेत आहे. ‘Agriculture’ हा शब्दसुद्धा
Ager आणि
Cultura या शब्दांपासून
तयार झाला आहे. Ager म्हणजे जमीन
आणि Cultura म्हणजे मशागत. ‘कृषी’ हा संस्कृत
शब्द असून तो ‘कृष’ या धातूपासून
बनला आहे. त्याचा अर्थ
जमिनीची मशागत करणे, असा आहे. मनुष्यबळ, प्राणी, अवजारे आणि यंत्रांच्या सहाय्याने जमीन कसून पिके
काढेणे, याला कृषिकर्म किंवा शेती म्हणतात. त्यात पशुपालन, कुक्कुठपालनासारखे
व्यवसायसुद्धा अंतर्भूत आहेत.
माणूस
सुरवातीला शिकारीवर जगत होता.
हिमयुगांवर हिमयुगे येत गेली.
साऱ्या भूभागावर बर्फ पसरले.
वनस्पती आणि प्राणीसृष्टीचा संहार
झाला. दीर्घकाळ बर्फ साचून
राहिला. पाऊसही झाला नाही. मानवाची उपासमार झाली.
बर्फ वितळल्यानंतर मात्र
वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण
तयार झाले. त्यातून मानवाला
शेतीची प्रेरणा मिळाली. आदिमानवाच्या
जीवनातील ही एक क्रांतीच
होती. या क्रांतीमुळे मानवाची
झपाट्याने उत्क्रांती होत गेली.
प्राचीन
काळी शेतीतील नवनवीन कल्पनाचा अवलंब होऊ लागला. शेतकरी एकमेकांचे अनुकरण करू
लागले. आपसातील देवाण-घेवाण वाढू लागली. सण-उत्सव हा एकत्र येण्याचे प्रमुख
निमित्त असायचे. त्यातील गप्पा टप्पांतून शेतीच्या नवनवीन कल्पना एकमेकांना कळत
असत. बलुतेदारी व्यवस्था ही सुद्धा
एक संवादाचे प्रतिरूप (Communication Model) होते.
विषेशत: सुतार, लोहार आणि नाभिकाच्या दारी जमणारा गप्पांचा फड म्हणजे बातम्यांची ठिकाणे असत. कुणाच्या शेतात काय लावले आहे, कुणाच्या शेतात काय पिकले आहे, याची बातमी तिथेच समजत
असे. खरे तर ही आद्यपत्रकारिताच होती. प्रत्येक
जण बातमीदाराच्या आणि विश्लेषकाच्या भूमिकेत असायचा. म्हणजे
‘सिटिझन जर्नालिस्ट’ संकल्पनेचे मूळ यात असावे.
संवादासाठी माध्यम नव्हेत; पण जनसंवाद व्हावयचा.
ते संवादाचे बहुस्तरीय प्रतिरूप होते.
कृषी पत्रकारितेची पार्श्वभूमी
लिपीच्या
शोधानंतर लेखनाला सुरवात झाली. वेगवेगळे हस्तलिखित ग्रंथ लिहिले गेले. त्यात शेतीचेही प्रतिबिंब दिसू लागले. ऋग्वेद आणि अथर्व वेदातही
शेतीविषयक उल्लेख आहे. पाट किंवा कालवे काढून शेतीला पाणीपुरवठा करण्यासंबंधीचे
वचने त्यात आहेत. पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’तही कालवे, विहिरी आणि मोटेने पाणी काढण्याचे उल्लेख
आहेत. रामायण, महाभारतातही शेतीचे संदर्भ
आहेत. शेतीवर प्राचीन काळापासून लिखाण केले जात असल्याचे दिसून
येते; परंतु शेती हा लिखाणाचा मुख्य विषय नसायचा. शेती हा लिखाणाचा मुख्य व्यवसाय झाल्यावर कृषी पत्रकारितेचा उदय आणि विकास
झाला.
भारतात एकोणिसाव्या
शतकाच्या मध्यावर आधुनिक कृषी पत्रकारितेला प्रारंभ
झाला, असे मानले जाते. सर सय्यद अहमद खान यांनी भाषांतर केलेल्या ‘हवामान’, ‘युरोपियन शेती’ आणि
‘शेतीची साधने’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशनानंतर
कृषी पत्रकारितेला प्रोत्साहन मिळाले. सन 1866 मध्ये ‘अलिगड इन्स्टिट्यूट गॅझेट’ नावाने साप्ताहिक सुरू झाले. या साप्ताहिकामुळे शेतीविषयक
लिखाणाला चालना मिळाली. सन 1914 आणि 1918 मध्ये आग्रा येथून अनुक्रमे ‘कृषिसुधार’ आणि ‘कृषी’ ही दोन शेतीविषयक नियतकालिके सुरू झाली. शेतीविषयक रॉयल
कमिशनच्या शिफारशींवरून 1929 मध्ये ‘इम्पेरिकल
कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च’ची (आयसीएआर)
स्थापना झाली. 1931 मध्ये आयसीएआरच्या माध्यमातून ‘शेती आणि पशुधन’ नावाने पहिले शेतीविषयक
शासकीय नियतकालिक सुरू झाले. त्यानंतर ‘जर्नल ऑफ ॲनिमल सायन्स’ सुरू झाले. बिहार सरकारने
1938 मध्ये सुरू केलेले ‘गाव’ नावाचे नियतकालिक खूप वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत होते. स्वातंत्र्यानंतर ‘इम्पेरिकल’ ऐवजी
‘इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च’ (आयसीआरआय)
असे नामकरण झाले. आयसीआरआयने हिंदीमध्ये
‘खेती’ हे नियतकालिक सुरू केले. त्याला शेतीविषयक गंभीर चिंतनात्मक नियतकालिकाचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यात विविध पिके, फलोत्पादन आणि पशुधनाविषयी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केले जात असे. नियोजन मंडळानेही ‘योजना’ नावाचे मासिक सुरू केले. ते देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध होते. आता
वेगवेगळ्या भाषांत आणि राज्यांत कृषीविषयक नियतकालिके सुरू झाली आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे बंगालीतील ‘वसुंधरा’,
‘कृषिजगत’ आदींचा समावेश होता. आयसीआरआयतर्फे आता वेगवेगळी नियतकालिके प्रसिद्ध केली जातात.
महाराष्ट्रातही
शेतीविषयक नियतकालिके किंवा पत्रिका प्रसिद्ध केल्या जातात. त्यात प्रामुख्याने कृषी विद्यापीठांच्या पत्रिकांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1965पासून ‘शेतकरी’ मासिक प्रकाशित
केले जाते. शेतीविषयक नियतकालिकांमध्ये ते सर्वाधिक खपाचे समजले
जाते. राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकातूनही
वेळोवेळी शेतीविषयक माहिती, त्यासंदर्भातील निर्णय आणि योजना
प्रसिद्ध केल्या जातात. राज्यात मोठ्या प्रमाणात खासगी प्रकाशनेही
आहेत. नाशिकचे श्री. द. शं. पोतनीश यांनी ‘कृषिसाधन’
हे शेतीविषयक साप्ताहिक सुरू केले होते. कृषी विज्ञान
प्रकाशानचे ‘बळिराजा’ मासिकानेही राज्यात
बराच लौकिक मिळविला आहे. याशिवाय ट्रॉम्बे शेती पत्रिका,
कृषिविकास, ऊसमळा, किसान
शक्ती, शेतकरी शिक्षण मळा, श्रीसुगी, आपली शेती, हंगाम, पशुसेवा, द्राक्षवृत्त,
डाळिंबवृत्त आदी अनेक नियकालिके आपल्याकडे प्रसिद्ध होतात. दशकभरापूर्वी सुरू झालेल्या ‘शेतीप्रगती’ मासिकाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संपादक रावसाहेब
पूजारी यांनी या मासिकाला चांगला नावलौकिक मिळवून
दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
गोवा आणि उत्तर कर्नाटकमध्ये शेतीप्रगतीचा खप दिवसेंदिवस वाढतो आहे.
साहित्यातली शेती
साहित्यातही शेतीचे प्रतिबिंब उमटले; पण ते पुरेशे नव्हते.
महात्मा फुले यांनी मात्र ‘शेतकऱ्यांच्या आसूड’मधध्ये शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तववादी
चित्र मांडले. सर्व संकटांपैकी शेतीमालाला
मिळणारा बाजारभाव ही सर्वांत मोठी समस्या असते. 1850 मध्ये लोकहितवादींनी यावर भाष्य
केले होते. ही समस्या आजही कायम आहे. यंदाही कापूस आणि सोयाबिन उत्पादकांना अत्यंत
वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. शेती उत्पादनासाठी केलेली गुंतवणूक बाजारभावाच्या
रूपाने शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे शेतकऱ्यांच्या उत्पादन
खर्चावर बोलताना “ज्याच्या
हाती चंदी, त्याचाच घोडा”,
असे वर्णन केले होते.
अलीकडे श्री. शेषराव मोहिते
यांची ‘धूळपेरणी’, श्री. सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ श्री. भास्कर चंदनशीव यांची
‘अंगारमाती’ या साहित्यकृती शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब
आहे. कवितेत मात्र शेती आणि शेतकऱ्याचे बरचे दर्शन झाले आहे. बहिणाबाई चौधरींच्या बहुसंख्य
कविता शेतीशीनिगडीच आहेत. ना. धो. महानोर यांचा ‘रानातल्या कविता’ हा काव्यसंग्रह पूर्णत:
कृषक जीवनाचं दर्शन घडवितो. अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष यांनी दै. ॲग्रोवनला दिलेल्या
मुलाखतीत म्हटले होत की, “बाजारात कांदा महाग
झाल्यानंतर डोळ्यांतून अश्रू येतात. प्रसारमाध्यमेदेखील अतिरंजित वृत्तांकन करतात;
परंतु त्याचवेळी सिगारेट आणि मद्याच्या किमती वाढल्यानंतर मात्र कोणी आक्रोश करत
नाही, हा विरोधाभास आहे. गोरगरिबांना स्वस्तात धान्य मिळायला पाहिजे, याबाबत
कोणाचे दुमत नाही. शेतकऱ्याला वेठीशी धरून अशी स्वप्नपूर्ती करू नये.”
चंदेरी दुनियतील शेती
“मेरे देश की धरती सोना उग ले, उग
ले हिरे मोती...” ‘उपकार’
चित्रपटातल्या या गीतातली ही ओळ देशातील कृषी संस्कृतीचं वर्णन करून जाते. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात चित्रपटांत शेतीचं
प्रतिबिंब उमटणं अगदी स्वाभाविक होतं. मात्र, हिंदी चित्रपट असेल तर ‘सरसोंदा खेत’
अन् गोफण खेळतानाची, अथवा नांगरणीचं चित्रण करणारी गाणी... असले शेतीविषयक उथळ चित्रण
दिसतं. कलामहर्षी बाबूराव पेंटरांनी `सावकारी पाश` या मुकपटात शेतकऱ्यांचं शोषणाचं
चित्रण दाखवलं, असं वास्तव चित्रण पुढे अभावानंच आलं. ‘साधी माणसं’, ‘मीठ-भाकर’ असे
काही अपवाद वगळता पुढे 1960 नंतर आलेल्या बहुसंख्य मराठी चित्रपटांतून शेतकरी रंगवला
तो तालेवार पाटील असलेला सधन जमीनदार असाच. हा जमीनदार म्हणजे मालामाल. जणू शेतकऱ्यासमोर
प्रश्नच नाहीत!
`सामना` या चित्रपटात सहकार चळवळ कशी वाढली, सहकार सम्राट कसे
तयार झाले याचे चित्रण आहे. ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न ‘सुर्वंता’ या चित्रपटातून मांडले
गेले. दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘शापित’, ‘अरे संसार संसार’ अशा चित्रपटांतून शेतीचं
अंशत: चित्रण केलंय. ‘अरे संसार संसार’मधून प्रा. विठ्ठल वाघ यांची अन् अनिल-अरुण यांनी
संगीतबद्ध केलेली गाजलेली कविता “काळ्या मातीत मातीत तिफन चालते” शेतीकामांचं हृद्य वर्णन करते. श्रीकांत बोजेवार यांनी ‘तहान’
या चित्रपटाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची होत असलेली उपेक्षा मांडण्याचा प्रयत्न
केला होता.
अलीकडच्या काळात गजेंद्र अहिरे, सतीश मन्वरसारखे दिग्दर्शक,
गिरीश कुलकर्णीसारखे लेखक, मकरंद अनासपुरेसारखे ग्रामीण भागातून आलेले अभिनेते शेती
आणि शेतकऱ्यांच्या समस्या चित्रपट माध्यमातून सर्वांगाने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
गजेंद्र अहिरे दिग्दशिर्त ‘पांढर’ या चित्रपटात शेतकऱ्यांचे प्रश्नांना भिडण्याचा उल्लेखनीय
प्रयत्न झालाय एसईझेडचाच प्रश्न ‘मेड इन चायना’ या चित्रपटात मांडण्यात आलाय. अभिनेते
नंदू माधव यांनी मधल्या काळात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित ‘श्वेतअंगार’
नावाची ‘शॉर्टफिल्म’ तयार केली होती. नंदू माधव यांची ‘आकडा’ ही ‘शॉर्टफिल्म’ही गाजली
होती. ग्रामीण भागात भेडसावणारा भारनियमनाचा प्रश्न यात मांडण्यात आला होता. ‘गाभ्रीचा
पाऊस’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर प्रभावी प्रकाश टाकण्यात आलाय. सयाजी
शिंदे, मकरंद अनासपुरे आणि नागेश भोसले यांनी एकत्र येऊन ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ ही
समाजिक आशय असलेली कलाकृती निर्माण केली. ती बरीच गाजली. ‘वळू’, ‘टिंग्या’, ‘पीकपाणी’
अशा चित्रपटांतून ग्रामीण भागातले प्रश्न, विषयाचं प्रत्ययकारी चित्रण होऊ लागलंय.
हिंदीमध्ये बिमल रॉय यांच्या
‘दो बिघा जमीन’ अथवा मेहबूब खान यांच्या गाजलेल्या ‘मदर इंडिया’सारख्या चित्रपटांचा
काही अपवाद सोडला तर शेतीच्या प्रश्नांचं चित्रण करण्याबाबत व्यावसायिक हिंदी चित्रपटांना
फारसा रस नाही. नुकताच थ्रीडीत आलेला आणि पूर्वी फार गाजलेल्या ‘शोले’सारख्या चित्रपटाचा
खलनायक गब्बरसिंग जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून अन्नधान्य लुटून नेतो. बंदुकीच्या जोरावर
अन्नधान्याचे प्रश्न सोडवतो. सुहेल तातरीच्या ‘समर 2007’ या चित्रपटात शेतकरी आत्महत्यांचा
प्रश्न मांडला गेलाय.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे
इलेक्ट्रॉनिक
माध्यमांमध्येही कृषी पत्रकारितेला स्थान मिळाले आहे. 23 जुलै 1927 मध्ये मुंबईत देशातील पहिल्या नभोवाणी केंद्राची
स्थापना झाली. पुढे त्याचे आकाशवाणी असे नामकरण झाले.
कालांतराने राज्यात ठिकठिकाणी आकाशवाणी केंद्रे सुरू झाली. आकाशवाणीवरील
‘शेतीसल्ला’ आणि ‘आमचं घर,
आमचं शिवार’सारख्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद
मिळाला. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक भाषेत आणि बोलीत शेतीविषयक
कार्यक्रम प्रसारित होऊ लागले.
आकाशवाणीनंतर 1959 मध्ये भारतात युनेस्कोच्या सहकार्याने दिल्ली येथे प्रायोगिक स्तरावर दूरचित्रवाणी
केंद्र सुरू झाले. 19 ऑक्टोबर
1972 पासून मुंबई केंद्र सुरू झाले. दिल्ली दूरदर्शन
केंद्राने 1961 मध्ये ‘एज्युकेशनल टीव्ही’
(ई-टीव्ही) हा कार्यक्रम सुरू केला. त्यातून वैज्ञानिक माहितीच्या
प्रसारावर भर देण्यात आला. त्याचा शेतकऱ्यांनाही उपयोग होऊ लागला.
युनेस्को आणि भारत सरकारच्या सहकार्याने 1967 मध्ये
देशाच्या विकासात उपग्रहाच्या उपयोगासंदर्भात एक पाहणी करण्यात आली. त्यात दूरचित्रवाणीचे योगदान महत्वाचे ठरू शकेल, असा
निष्कर्ष काढण्यात आला. ॲटोमिक एनर्जी आणि नासाच्या माध्यमातून 1975 मध्ये ‘सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट’
(साईट) नावाने कार्यक्रम सुरू करण्यात आला.
यातील कार्यक्रम
ओरिसा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील जवळपास
2 हजार 400 खेड्यांमध्ये दिसत असत. त्यात शिक्षण, शेती,
आरोग्य आणि कुटुंब नियोजनासारख्या विषयांवर अधिक भर दिला जात असे.
साईट प्रकल्पासाठी
कृषी मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करून दिली होती. कोरडवाहू शेतीसंदर्भात मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके
दाखविणे, कुक्कुट पालन आणि पशुधनाची माहिती देणे,
पीक व्यवस्थापन समजवून सांगणे, बियाणे,
खते, पणन, कर्जाची उपलब्धता
आदींवर साईटमध्ये भर द्यावा, अशी काही मागर्दर्शक तत्वे कृषी
मंत्रालयाने ठरवून दिली होती. शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित
कराव्यात. हवामानाचा अंदाज आणि बाजार भावांचीही माहिती द्यावी,
असेही कृषी मंत्रालयातर्फे सूचविण्यात आले होते. त्यामुळेच साईटचा प्रयोग यशस्वी झाला.
ही एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कृषी पत्रकारितेची सुरवात होती.
मुंबई दूरदर्शन
केंद्रावरील ‘आमची माती, आमची माणसं’ हा कार्यक्रमही घराघरात
पोहोचला होता. शेतकरी कुटुंबात तो आवर्जून पाहिला जाणारा कार्यक्रम
होता. आपल्या राज्यात त्यातूनही कृषी पत्रकारिता आणि कृषि विस्तार
शिक्षणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. इनाडू समूहाचे ईटव्हीने
सुरू केलेला ‘बळिराजा’ हा खासगी वाहिनीवरील
पहिला शेतीविषक कार्यक्रमही चांगलाच लोकप्रिय ठरला. स्टार माझा
म्हणजे आताच्या एबीपी माझावरील ‘सातबाराच्या बातम्या’
या कार्यक्रमातूनही शेतीविषयक माहिती आणि तंत्रज्ञानाचा चांगला प्रसार
होत आहे. झी 24 तासनेही ‘पीकपाणी’ नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. या खासगी वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे जाळे सर्वदूर पोहोचल्यामुळे राज्यातील
कानाकोपऱ्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी एकाच व्यासपीठावरून मांडणे
शक्य झाले आहे.
इंटरनेट आणि
मोबाईलमुळे आणखीच क्रांती झाली
आहे.
हवामानाचा अंदाज ऐकण्यासाठी आता
रडिओ किंवा टीव्हीच्या बातम्यांपर्यंत अथवा सकाळी वर्तमानपत्र येऊपर्यंत
थांबण्याची आवश्यकता नाही. इंटरनेटवर कधीही
ही माहिती घेता येते. शेतकऱ्यांना
एसएमएसद्वारे हवामानापासून बी-बियाण्यांची
माहिती देणारी सुविधा ‘रॉयटर्स’ने सुरू
केली आहे. राज्याच्या कृषी
विभागानेही एका खासगी कंपनीच्या
मदतीने ही सुविधा उपलब्ध
करून दिली आहे. यूट्यूबवर
शेतीसंदर्भातले असंख्य व्हिडिओ बघता
येतात. फेसबुक, ट्वीटर सारख्या
सोशल नेटवर्कमुळे शेतकऱ्याला
स्वत:चे प्रयोग किंवा कल्पना
लोकांपर्यंत पोहोचता येऊ लागल्या
आहेत. इतरांचीही माहिती त्यातून मिळू
लागली आहे.
दैनिकांतील कृषी पत्रकारिता
कृषी पत्रकारितेला
वाहिलेले नियतकालिक किंवा कार्यक्रमापुरतीच कृषी पत्रकारिता सिमित नाही. मुळात भारतात स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेतून
पत्रकारितेचा उदय झाला. प्रारंभीच्या काळी भारतीय पत्रकारिता
म्हणजे मिशन होते. वृत्तपत्रे बातमीपत्रांपेक्षा मतपत्रे अधिक
होती. अर्थात स्वातंत्र्य चळवळीची ती गरजही होती. स्वातंत्र्यानंतर मात्र यात बदल झाला. वृत्तपत्रांना
व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. वृत्तपत्रांनी व्यावसायिकता
स्वीकारल्यामुळे सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे त्यांना आवश्यक होते. त्याला शेतकरीही अपवाद नव्हता. त्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी शेतीविषयक मजकुराचे पान किंवा साप्ताहिक पुरवण्या प्रसिद्ध करण्यास सुरवात केली.
सकाळचे संस्थापक ना. भि. परुळेकर यांनी दै. सकाळच्या
माध्यमातून वर्तमानपत्राला सर्वसमावेशक आणि सर्व घटकांचे बनविण्याचा प्रयत्न केला.
त्यांनीच सर्वप्रथम आपल्या दैनिकात बाजारभाव आणि अंड्यांचे भाव देण्यास
सुरवात केली. सुरवातीला त्यांच्या अशा प्रयोगांची टिंगल झाली. नंतर कौतुक झालं आणि मग त्यांचंच अनुकरणही झाले. अलिबागमधून सुमारे पाऊण दशकांपासून ‘कृषीवल’
हे दैनिक प्रसिद्ध होत आहे. यात केवळ शेतीविषयकच
मजकूर होता, असे नाही, तर हे ते भूमिपुत्रांचे, शेतकऱ्यांचे दैनिक म्हणून ओळखले जावे, अशी मालक-प्रकाशकांची त्यामागची भूमिका होती. अलीकडे लोकसत्तासारख्या शहरी आणि मोठ्या दैनिकानेही शेतीविषयक पान सुरू केले. आता तर बहुतांश
मोठ्या दैनिकांच्या जिल्हा आवृत्त्याही प्रकाशित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात सर्वच दैनिकात शेतीला स्थान मिळाले आहे.
परंतु शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येच्या किंवा वाचकांच्या प्रमाणात
हे स्थान पुरेसे नाही.
शेतकरी संघटनेने श्री. शरद
जोशी यांच्या नेतृत्वाखाली 1980 च्या दशकात शेतीप्रश्नांची अभ्यासू आणि प्रभावीपणे
मांडणी केली. त्यांच्या आंदोलनांना वृत्तपत्रांमधून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे कृषी
पत्रकारितेला आणखी चालना मिळाली. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली. शेतकरी
सर्वप्रथम एवढ्या मोठ्याप्रमाणात संघटित होण्याची आणि वृत्तपत्रांत शेतीला स्थान मिळण्याची
ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
शेतीला वाहिलेले दैनिक
मराठी कृषी
पत्रकारितेत दै. ‘ॲग्रोवन’चा प्रयोग क्रांतिकारक ठरला आहे. संपूर्णपणे शेतीला वाहिलेले
हे भारतातले पहिले दैनिक असल्याचा दावा सकाळ समूहातर्फे केला जातो. ॲग्रोवन महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे. शेतीविषयक बातम्या आणि त्यातील वैविध्यता, तज्ज्ञांचे
मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या यशोगाथा अशा भरगच्च शेतीविषयक मजकुरामुळे
ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दैनिक ठरले आहे.
सकाळ समूहाने
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर व्यापक पाहणी केली होती. सकाळचे समूह संपादक आणि
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पाहणीचा अहवाल
राज्य शासनास सादर करण्यात आला होता. अलीकडेच प्रकाश पोहरे
यांच्या देशोन्नती समूहाने ‘कृषकोन्नती’ हे साप्ताहिक सुरू केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या
समस्यांना प्राधान्याने त्यात स्थान मिळाले आहे. शेतकरी आत्महत्यांसारख्या
विषयावर यात विपुल प्रमाणात लेखन झाले आहे. देशोन्नतीनेही शेती आणि शेतकऱ्यांच्या
विषयाला प्राधान्य दिलेले दिसते.
उणिवांचा उहापोह
कृषी पत्रकारितेसंदर्भात 1976 मध्ये एक राष्ट्रीय कार्यशाळा झाली
हाती. त्यात शेतीविषयक नियतकालिकांची गुणवत्ता, त्यांची मांडणी, कृषी
संवाद आदीसंदर्भात विचारविनिमय झाला होता. त्यात काही ठळक निष्कर्ष मांडण्यात आले होते.
वाचकांच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या वाचनाच्या सवयीचा
किंवा गरजेचा विचार न करता कुठल्याही आकारात नियतकालिके प्रसिद्ध केली जातात. बऱ्याच नियतकालिकांच्या मुखपृष्ठांची आणि आतील पानांची छपाई योग्य नसते. अक्षरांचा आकार (फाँट
साईज) खूपच लहान असतो. त्यामुळे वाचनीयता
कमी होते. काही नियतकालिकांमध्ये छायाचित्र आणि हस्तचित्रे चांगली
असतात; परंतु बहुतांश नियतकालिकांमध्ये अत्यंत छोटी आणि दर्जाहिन छायाचित्रे असतात. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मजकुराला प्राधान्य दिले जात नाही. नवसाक्षर वर्गाला समजेल अशा भाषेत मजकूर नसतो.
विकास पत्रकारिता व कृषी पत्रकारिता
विकास पत्रकारिता ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे. विकसनशील देशांमध्ये विकास पत्रकारितेला महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि
विकासाची फळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा विकास पत्रकारितेचा मुख्य उद्देश असतो. कृषी पत्रकारितासुद्धा विकास पत्रकारितेशी निगडीत अशीच संकल्पना आहे.
मूळ प्रश्न असा आहे की, विकास म्हणजे काय?
विकास म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. प्रांतिक आणि
वर्गीय असमतोल त्यातून दूर होणे अपेक्षित असते. समाजातील अंधविश्वासांचा
नायनाट करून वैज्ञानिक विचार रुजवून समाजाच्या आधुनिकीकरणाला विकास पत्रकारितेचे प्राधान्य
असते. तेच तत्व कृषी पत्रकारितेलाही लागू असते. कृषी जीवनाशी निगडित प्रश्न, घटना आणि प्रसंगांचे वार्तासंकलन किंवा विश्लेषण म्हणजे कृषी पत्रकारिता होय.
त्यातून शेतकऱ्याचे, त्याच्या कुटुंबाचे आणि कृषक
समाजाचे जीवनमान उंचावणे, हा त्यामागील मुख्य उद्देश असतो.
कृषी पत्रकारितेच्या
माध्यमातून शेतकऱ्यांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. वाचकांना माहिती देणे, शिक्षण देणे आणि मनोरंजन करणे,
पत्रकारितेची तीन प्रमुख उद्देश आहेत. कृषी पत्रकारितेचीसुद्धा
शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरविणे, त्यांना शिक्षित आणि प्रोत्साहित
करणे, ही तीन प्रमुख कार्य आहेत. हे काम
करताना त्यात रंजकता असेल तर ही पत्रकारिता शेतकऱ्यांना अधिक भावू शकते. परिवर्तनात्मक दृष्टीने हे झाले पाहिजे. अलीकडे शेतीविषयक नियतकालिकांमध्ये
कथा, कविता आणि चुटक्यांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांचे प्रबोधन
करण्याचा प्रयत्न केला जातो.
कृषी विस्तार आणि कृषी पत्रकारिता
कृषी विस्तार म्हणजे
पारंपरिक
शिक्षणाची बंदीस्त
चौकट
मोडून
नाविन्यपूर्ण कल्पना
आणि
उपयुक्त
माहिती
थेट
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे.
शेतजमीन,
पाणी,
पशुधन
आदी
नैसर्गिक
साधन
संपत्तीचा नीटनेटका
वापर
करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
करून
त्यांचे
जीवनमान
उंचावणे
हा
कृषी
विस्तार
कार्याचा
मुख्य
उद्देश
आहे.
सर्वप्रथम अमेरिकेत
एकोणीसाव्या शतकाच्या
पहिल्या
दशकात
कृषी
विस्तार
कार्याला
सुरवात झाली होती.
‘को-ऑपरेटिव्ह एक्स्टेंशन सर्व्हीस’ असे त्याला नाव दिले गेले होते. ब्रिटीश विद्यापीठांनी
खऱ्या
अर्थाने
‘विस्तार’
हा
शब्द
परिचित
केला.
आपल्याकडेही महात्मा
गांधीच्या मार्गदर्शनाखाली
1920 मध्ये
महाराष्ट्रात विस्तारविषयक ‘सेवाग्राम प्रकल्प’
राबविण्यात आला
होता.
पश्चिम
बंगालमध्ये
1921मध्ये
रवींद्रनाथ टागोर
यांच्या
मार्गदर्शनाखाली विस्तार कार्य हाती घेण्यात आले होते. भारतात सत्तरच्या दशकात
सुरू
झालेल्या
प्रशिक्षण व
भेट
योजनेमुळे विस्तार
कार्याला
गती
आली
होती.
अलीकडेच
आत्मा
(राष्ट्रीय कृषी
तंत्रज्ञान प्रकल्प)
ही
योजनाही
विस्तारासाठी फारच
उपयुक्त
ठरली.
या
विस्तार
कार्याला
प्रसारमाध्यमांनीही हातभार
लावला
आहे.
कृषी पत्रकारिता करणारा
पत्रकारही एक
प्रकारे
विस्तार
कार्यकर्ताच असतो.
शिक्षण
हे
प्रसारमाध्यमांचे मूलभूत
कार्यच
आहे.
त्यामुळे
विस्तार
कार्य
किंवा
शिक्षण
आणि
कृषी
पत्रकारिता एकमेकांना पूरक
आहेत.
म्हणूनच
शासनानेही विस्तार
कार्यातील प्रसारमाध्यमांच्या सहभागावर
विशेष
भर
दिला
आहे.शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आणि
माहिती
शेतकऱ्यांपर्यंत,
बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमे महत्वाची
भूमिका
बजावू
शकतात.
म्हणूनच
आता
सर्वच
ठिकाणी
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांमध्ये
‘कृषी
आणि ग्रामीण पत्रकारिते’च्या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त
विद्यापीठाने तर
स्वतंत्र
कृषी
पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू
केला
आहे.
हैदराबादच्या कृषी
विस्तार
व्यवस्थापन संस्थेतही पत्रकारितेचा स्वतंत्र
अभ्यासक्रम उपलब्ध
आहे.
(संदर्भ: विश्वकोष, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विविध
पुस्तके, श्री. रा. के. लेले यांचे 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' ना. भि. परुळेकर यांचे 'निरोप घेता..' दै. ‘ॲग्रोवन’मधील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत, ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी
यांचा लेख आणि अर्थातच गुगलचीही साथ.)