Saturday 29 March 2014

फँड्री: समतेची बिकट वाट

नागराज मंजुळेंचाफँड्रीहा सिनेमा वर्तमान सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर भाष्य करतो. तसाच तो जातीव्यवस्था आणि व्यवस्थेनं ठरवलेल्या माणसाच्या प्रतवारीवरही बोलतो. जातीव्यवस्थेचे हे संस्कार बदलायचे आहेत. समतेची वाट प्रशस्त करायची आहे, हेच हा सिनेमा सांगतो. ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख…
कचरूच्या कुटुंबाची भाकरीची लढाई कधी संपतच नाही. जीवाच्या आकांतानं कुटुंब डुकरामागं घावतंय. डुक्कर टप्प्यात येतं तेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं. पाय जागीच थबकतात. डुक्कर मुक्तच राहतं. डुक्कर पकडलं तरच भाकरीचा चंद्र दिसेल. जन्मासोबतच दारिद्र्याचं गिफ्टमिळालं आहे. दारिद्र्यानं छळलं आहे. व्यवस्थेनं नाकारलं आहे. माणूसपण हिरावलं आहे. कचरूनं हे सर्व भोगलं आहे. तो त्याला जगण्याचा भाग वाटतो. गावात राहाचंय तर भोगायचं, ही त्याची धारणा पक्की आहे. गाव कुणाच्या बापाचं नाही. तुमचं आहे; तसंच आमचंही आहे, सांगण्याचं कचरूत धैर्य नाही. भोगालाच तो कर्म समजतो. झोपडीत स्वाभिमानाची ज्योत पेटलेली नाही. अस्मिता मनाला शिवलेली नाही. परिस्थितीची साथ नाही. बंडखोरीची बातच नाही!
मुलगा- जब्याला जीन्सची पॅन्ट घ्यायचीय. शिकायचं आहे. शालीसोबत आयुष्य थाटायचंय. तो प्रकाशाची वाट शोधतोय. वाटेवरचा अंधार अधिक गडद होतोय. समाजानं कुटुंबाला, बहिणीला नवऱ्यानं टाकून दिलं आहे. आयपीएलची चिअर गर्ल’ म्हणून टवाळखोर तिची टिंगल करताहेत. भाकरीसाठी डुक्करामागं धावणाऱ्या जब्याच्या बहिणीची पी. टी. उषा म्हणून थट्टा केली जातेय. डुक्कर वाहून नेताना तिलाच डुक्करीण म्हणून हिणवण्यापर्यंत टारगटांची मजल गेली आहे. आता मात्र जब्याला असह्य झालं आहे. मुळात कचरूनं ते स्वीकारलंच आहे. मात्र जब्याच्या आणि प्रेक्षकांच्याही ते सहनशीलतेच्या पलीकडंचं आहे. सिनेमा बघताना वाटतं, सांगावं जब्याला, उचल धोंडा... तत्पूर्वीच जब्यानं टवाळखोऱ्याच्या टाळक्यावर घातलाच धोंडा! इथं फँड्री संपतो.आणि ज्याचा त्याचा सिनेमा सुरू होतो.
नागराज मंजुळेंचा फँड्रीहा सिनेमा वर्तमान सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर भाष्य करतो. तसाच तो जातीव्यवस्था आणि व्यवस्थेनं ठरवलेल्या माणसाच्या प्रतवारीवरही बोलतो. शाहू, फुले, आंबेडकरांनी आरंभलेलं समतेचं कार्य अध्यापही आपण पूर्णत्वास नेलेलं नाही, हे सांगतो. जब्या आणि जब्याची बहीण शाहू, फुले, आंबेडकरांच्या तसबीरीसमोरून डुक्कर वाहून नेतानाची वाट विषमतेचं दर्शन घडवते. चंक्या नावाचं पात्र देवदेवांच्या तसबीरीला आणि लिंबू- मिरच्या आणि काळ्या बाहुली शेजारील अण्णाभाऊ साठेंच्या तसबीरीला उदबत्ती दाखवतं. महामानवाच्या प्रतिमा आमच्यापर्यंत पोहचल्या आहेत. त्याचे विचार अद्याप पोहोचायचे आहेत. या तसबीरींशेजारी उद्या कदाचित डॉ. नरेंद्र दोभोळकरही असू शकतील. दाभोळकर’ हे नाव आपल्यापर्यंत पोहोचलं आहे; पण अंधश्रद्धेचा फास अजून सुटायचा आहे. त्यांचे मारेकरी सापडायचे आहेत. नाही तरी गणपती उत्सव मंडळाच्या किंवा राजकीय पक्षाच्या फलकावर सत्यनारायणाची पूजा अथवा गणपतीच्या प्रतिमेशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असतेच. कीर्तीवंतांच्या तसबीरी भिंतीची शोभा वाढवितात. शाळेतल्या अभ्यासतला एक धडा व्यापतात. शाहित्य खानाची बोटं तोडणारा, अफजल खानाचा कोथडा बाहेर काढणाऱ्या शिवाजी महाराजांची धड्यातली रेखाटनं बालमनावर कायमची ठसतात.
फँड्रीमधील अकोळनेर गावातील कुटुंबांचा जातींचा स्तर कमी अधिक असला तरी आर्थिक स्तर मात्र बहुतांश कुटुंबाचा समानच असावा. जातीव्यवस्थेतील खालच्या जाती जरा जास्तच पिचलेल्या असतात. अकोळनेरमध्ये सर्वांचंच जगणं शेतीशी निगडीत आहे. मुळात शेतकरीच शोषित आहे. कुठली जात त्याचं शोषण करत नाही. खतं, बि-बियाणं विक्रेते, व्यापारी आणि दलालच त्याचे खरे शोषक असतात, याचं कुणाला भान सतं. तसं भान अकोळनेरमध्येही दिसत नाही. गावाच्या पाटलाचं जगणंदेखील बेभरोशाच्या शेतीवरच अवलंबून असल्याचं जाणवतं. कुलकर्णी कुटुंबाची आर्थिक स्थितीही जेमतेम दिसते. आपली जात इतरांपेक्षा वरची मानण्यातच सगळ्यांना धन्यता वाटते. निवडणुकांमध्येदेखील आरक्षित जागेवरच्या उमेदवाराबाबत मतदानाच्या वेळी पणतीआणि मेणबत्ती भेद शोधला जातो. या सिनेमात कचरुची हेटाळणी करण्यात गावातला न्हावीदेखील पुढं आहे. तो स्वत:ला कचरुच्या वरच्या जातीतला समजतो. कचरुला जातीवरून हिणवतो. खरं तर कुणालाही जातीवरून हाक मारणं अपमानास्पद वाटतं. चिमणीला मारू नकोस. चिमणी बामणीन असते, असं जब्याला एक आजी सांगते. पशु-पक्षांशी मावाची तुलनाच कशी होऊ शकते? हे कुणासाठीही भूषणावह नाही; पण व्यवस्थेचे हे संस्कार आहेत. ते बदलायचे आहेत. समतेची वाट प्रशस्त करायची आहे, हेच हा सिनेमा सांगतो.
जब्यानं शेवटी टवाळखोरांच्या टाळक्यावर धोंडा घातल्यानं कर्तृत्व सिद्ध होत नाही. ती स्वरक्षणाची आणि स्वाभिमानासाठीची अपरिहार्यता आहे; पण जब्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं त्यानंतर काय झालं असेल? हे सांगण्याची गरज नाही. अकोळनेरातही खैरलांजी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जब्याचे दोन आणि कुटुंबातल्या इतर चौघांचे आठ असे दहा हात किती दगडं उचलू शकतात किंवा प्रतिकार करु शकतात? मोठ्या समुदायाशी लढा देणं एक वेळ सिनेमात शक्य आहे; वास्तवात नाही. गावात राहायचं तर भोगायचं’ एवढंच त्यांचं प्राक्तन आहे?. हिंसेला हिंसा हा पर्याय नाही. शिक्षणाचा उपाय आहे. गांधीजी खेड्याकडं चला सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शहराकडं जाण्याचा सल्ला दिला होता. भरलेल्या पोटवाल्यांनी गावाकडं जावं आणि दारिद्र्यानं, विषमतेनं पिचलेल्यांनी शहराची वाट धरावी, हेच या दोघा महामानवांना अपेक्षित असेल.
अकोळनेर हे सर्वसाधारण गावगाड्याचं प्रतीक आहे. प्रत्येक गावगाड्यात आढळणारी गावकुसातली आणि गावकुसाबाहेरची अशी व्यवस्था इथंही आहे. राज्यघटनेनं बंधनकारक करूनही सामाजिक दरी मात्र कायम आहे. त्यातूनच कचरुच्या कुटुंबाचं माणूसपण नाकारलं जातं. त्यांना फँड्री (डुक्कर) घावत नाही. जाती व्यवस्थेनं माथी मारलेलं काम जब्याला लपवता येत नाही. लोकांकडून मिळणारी हिणकस वागणूक जब्याचं काळीज चिरत जाते. गावात कमी अधिक प्रमाणात दारिद्र्य सगळीकडं आहे; पण केवळ खालच्या जातीमुळं जब्याच्या कुटुंबाला समाजात मान, स्थान नाही. म्हणून आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे, हेही हा सिनेमा सूचित करतो. उद्या कदाचित आरक्षणानं जब्या सावरेलही; पण त्याचं सामाजिक, जातीय ‘स्टेटस’ उंचावणार आहे का? त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास अशा दोन्ही घटकांचा विचार करावा लागेल. आर्थिक आणि सामाजिक समतोल साधावा लागेल. गोऱ्यांचा जुलूम नको, तसंच काळ्यांचं वर्चस्वही नको, हे डॉ. नेल्सन मंडेलांचं तत्व आचरणात आणावं लागेल. तीच समतेची पहाट ठरेल, हेच हा सिनेमा सांगतो.