“अरे, फँड्री! आर्चीला घेऊन ये”
“आर्चीला नेलंय”
“परश्या आहे का?”
“नाही.”
“मग, गोल्डन ईगल आणि झिंगाटला घेऊन ये.”
“झिंगाट नको, गोल्डन ईगल आणि अँड्रॉईडला आणतो.”
“आण लवकर. सिराज हाय इथं”
माथेरानच्या दस्तुरी नाक्यावरच्या घोडेवाल्यांचा
हा संवाद गुदगुल्या करत होता! हिरवी गर्द झाडी,
दाटून आलेलं काळभोर आभाळ आणि गच्च धुकं होतं. पावसाचे टप्पोरे थेंब टपाटपा
झाडाझुडपांच्या पानांवर कोसळत होते. मऊ तुषारांच्या स्वरुपात पानांवरून खाली येताना
त्यांना आम्ही अलद अंगावर झेलत होतो. तुषारांच्या तृप्तीत न्हाऊन निघालो होतो.
घोड्यांची नावं आणि त्या नावांच्या
संदर्भामुळे प्रसन्नतेला विनोदाची फोडणी होती. तव्यावर तडतडणाऱ्या पाण्यांच्या
थेंबांप्रमाणे अधूनमधून झाडांच्या गर्दीतून थेट लाल मातीवरच्या विस्तीर्ण भूतव्यावर
कोसळणारे थेंब थुईथुई नाचत होते. टप टप टापा टाकीत घोडे चालत होते. थुईथुई
नाचणाऱ्या थेंबांना टापांच्या लयबद्ध स्वरांची साथ होती. काही पर्यटक ‘नेटवर्क’, ‘वायफाय’ आणि ‘गुगल’वर स्वार होऊन मार्गस्थ झाले होते.
पाठोपाठ आम्ही गोल्डन ईगल, अँड्रॉइड आणि सिराजवर स्वार होऊन माथेरानच्या दिशेनं
प्रस्थान केलं.
एक घोडेवाला चाळीशीतला होता. दुसरा
तेरा- चौदा वर्षांचा असेल. त्याचं नाव होतं ‘फँड्री’. त्याला विचारलं, “तुला फँड्री का म्हणतात.”
“माहीत नाही. चिडवतात ते मला.”
चिडवणाऱ्याला विचारलं, “का
चिडवता याला.”
“कुणी तरी याला एकदा फॅंड्री म्हटलं. तेव्हापासून
आम्हीबी त्याला फॅंड्री म्हणतो.”
“काय अर्थ आहे ‘फँड्री’चा”
“कुणाला माहीत साहेब”
“आर्ची परश्या तरी माहीत आहेत का?”
“काय साहेब, टिंगल करताय गरिबाची?”
“सैराट माहीत नाही, असा कुणी आहे का?”
मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर
आणि सुमद्र सपाटीपासून 2,625 फूट उंचावरील प्रसिद्ध थंड हवेचं पर्टन स्थळ म्हणजे
माथेरान. 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्युज पोयन्टस मलेटने हे ठिकाण
शोधलं. तत्कालीन गव्हर्नर एलफिन्सटन यांनी माथेरानच्या घडणीचा पाया रचला. 1907 मध्ये अमदजी पिरभॉय यांनी माथेरानच्या माथ्यावर टॉय
ट्रेन नेली. सध्या ती रुळांवरून घसरली आहे. तशी ती आता कधी कधी रुळांवर असते. रुळांशी
नातं असलेली इथंली माणसं आता आपल्या रोजच्या जगण्याचं नातं रिळांशी जुळवू पाहत
आहेत.
‘झिंगाट संत्रा’ आणि ‘सैराट मोसंबी’ नावानं देशी ब्रँडही आल्याचं ऐकिवात आहे. अर्थातच, नागराज
मंजुळेंनी वलयांकित केलेल्या या शब्दांचा हा वेगळ्या प्रकारचा प्रभाव म्हणावा
लागेल. यातलं ‘बिटवीन द लाईन्स’ म्हणजे ‘सैराट’ सर्वदूर पोहचला सैराटपेक्षा अधिक सशक्त ‘फॅंड्री’ नाही पोहचला. शब्दातलं नावीन्य आणि उच्चारातली गंमत म्हणून फक्त ‘फँड्री’ नाव तेवढं पोहचलं!
इंटरनेटवरील संदर्भानुसार माथेरान
हे आशिया खंडातलं एकमेव ‘ऑटोमोबाईल फ्री’ थंड हवेचं ठिकाण आहे. इथं दस्तुरी नाक्यापर्यंतचं
वाहन जातं. तिथून पुढंचं तीन-चार किलोमीटरचं अंतर पायी, घोडा किंवा मानवी रिक्षाने
जावं लागतं. म्हणून इथं टॉय ट्रेनला खूप महत्व आहे. वाहतुकीची सुविधा आणि
पर्यटनाची मजा असा दुहेरी उद्देश सफल होतो; पण टॉय ट्रेनविषयीचं वृत्त हिरमोळ करणारं आहे. ही ट्रेन बंद होणार असल्याची
लक्षणं दिसू लागली आहेत, अशी भीती तिथल्या लोकांमध्ये बळावली आहे. या ट्रेनच्या
रुळांशी इथंल्या जनतेचं घट्ट नातं आहे. ट्रेनमुळे पर्यटक वाढतात. ती उदरनिर्वाहास
हातभार लावते. तिच्या रुळांशी माथेरानकरांच्या भावना जुळल्या आहेत.
घोड्यांप्रमाणेच भावनिक आणि
व्यावसायिक ओळख असलेली टॉय ट्रेन माथेरानच्या पर्टन संस्कृतीचा एक अविभाज्य भौतिक
अविष्कार आहे. परिवर्तन हे सजगतेचं आणि सजीवतेचं लक्षण मानलं जातं. म्हणून आधुनिकतेचा
साज चढवतं टॉय ट्रेनचं अस्तित्व कायम राहणं आवश्यक आहे. इथंल्या घोड्यांची समकालीन
नावं म्हणजे भाषिक परिवर्तनाचं सूचक आहे. या टॉय ट्रेनच्या आयुष्यातही असंच
परिवर्तन घडेल आणि माथेरानची ही राणी पुन्हा पर्यटकांच्या सेवेत हजर होईल, अशी आशा
आहे. -जगदीश
त्र्यंबक मोरे