Thursday 26 September 2019

अंडरवेअर आणि लिप्स्टिक


अंडरवेअर आणि लिप्स्टिक
आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदींची स्थिती दर्शविणारे वेगवेगळे निर्देशांक (इंडेक्स) असतात. जसा अलीकडेच हंगर इंडेक्सचर्चेत आला. सामाजिक शास्रांशी संबंधित तज्ज्ञ ते विकसित करत असतात. एका अर्थतज्ज्ञाने विकसित केलेला असाच एक अंडरवेअर इंडेक्सनुकताच चर्चेत येऊन गेला. त्यावरील श्री. हेमराज बागूल याची अतिशय खुशखुशीत शैलीतली ॲलनभाऊंची अंडरपँट आपल्या दोरीवर नको!ही पोस्ट वाचली. हे चड्डी पुराण वाचताना खाकी अर्धी चड्डी पूर्णपणे आठवली; ती जिल्हा परिषदेतल्या शाळेतली! अर्थात, शाळा आणि शाळाबाह्य अशा वेगळ्या चड्ड्या नसायच्याच मुळात आमच्या. तसंच आतली आणि बाहेरची असाही पसारा नसायचा. जसं स्लीपर हीच चप्पल आणि चप्पल हीच स्लिपर!
पालकांच्या काटकसरीच्या आणि दूरदृष्टीच्या आर्थिक धोरणामुळे वाढत्या वयाची चड्डी शिवली जायची. रेडिमेड कधीच घेतली जात नसे. कबंरेवरून सातत्यानं निसटणं, हा तिचा धर्म. बापाच्या महसुली खर्चातल्या तरतुदीतली ही चड्डी खरोखर निसटावंतअसायची. तेव्हा अंगावरच्या धाग्यादोऱ्यांच्या आदर- अनादराचा प्रश्न मनाला शिवायचा नाही. म्हणून करदोडाही चड्डीला आधार द्यायचा. करदोड्याला खराट्याच्या काडीचा पीळ दिल्यास निसाटावंत चड्डी सुंभासारखी सरळ व्हायची; पण चुनीदार नक्षी कंबरेभोवती फेर धरायची.
करदोटा आणि चड्डीचं फार जिव्हाळ्याचं नातं असायचं. चड्डीवर पकड राखणारा करदोडा चोरी लपवायलाही मदतीस यायचा. खान्देशात पाऊस नेहमीच रुसलेला असायचा किंवा असतो; परंतु थंडी मात्र मनसोक्त बरसते. ती गुलाबी किंवा बोचरी राहत नाही. थेट कातडचं उसवते. अशा थंडीत सकाळी- सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आंघोळीच्या दिव्यातून बाहेर पडणे अवघड व्हायचं; पण शाळेत मात्र आंघोळ करून येणं कम्पलसरी असायचं. याच्यावरही आमचे काही मित्र उपाय शोधून काढायचे. आंघोळ न करता चड्डी आणि कपडे तेच. फक्त करदोडा ओला करायचा. याबाबतची मजेशीर आठवण भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) असलेले राजेश पाटील यांनी ताई- मी कलेक्टर व्हयनू या आत्मकथनात लिहिली आहे. गुरूजी रोज माझा करगोटा तपासत असतं. तो ओला असला म्हणजे मी आंघोळ केली आहे, याची त्यांना श्वासती मिळे. मला त्या दरम्यान एक नवी युक्ती सूचली. मी फक्त करगोटा ओला करून, आंघोळ न करता जाऊ लागलो. गरुजी मला चांगली सवय लागल्यामुळे खूष झाले. पुणे विद्यापीठातील वसतिगृहातील आमच्या राजेश या मित्राची ही आठवण वाचताना चड्डी आणि करदोडारूपी धागा आठवल्याशिवाय राहत नाही.
प्रश्न गंडादोऱ्याचा नसायचा. दोरा नेहमीच मदतीला धावायचा. जाड दोऱ्याचे भलेमोठे सुईची टाके फॅशनेबल भासायचे. किंचित जणांच्या नशिबी आखीव- रेखीव मशीनच्या शिलाईची ठिगळं असायची. मागची दोन्ही ठिगळं आत्ताच्या फाटक्या जीन्सप्रमाणे शोभिवंत असायची; पण ती कायमस्वरूपी तुटीच्या अर्थव्यवस्थेची द्योतक आणि स्थायी मंदीची प्रतीकं असायची. नाही तरी आपण प्रतीकांशिवाय जगूच शकत नाही! ॲलन भाऊनंही तसंच एक अर्थस्थिती दर्शक प्रतीक जगासमोर आणलं होतं. ते आत्ता आपल्यालाही माहीत झालं. मंदीचा दावा होत असताना ही ज्ञानाची संधीच नाही का?
अंडरवेअर इंडेक्सच्या बातम्या आल्यानंतर लिप्स्टिक इंडेक्सचीही बातमी वाचण्यात आली. अंडरवेअर इंडेक्स खालावल्यास मंदी; तर लिप्स्टिक इंडेक्स घसरल्यास संधी. आता कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं? आपण अर्थतज्ज्ञ नाही आहोत. मी तर नाहीच नाही. खरं खोटं कुबेरच जाणोत. मी उपरवाल्या कुबेरची बात करतोय. धनदेवता कुबेर अर्थशास्रात पारंगत असेलच. तो आपल्यासारखा खजिल निश्चितच नसेल. म्हणून तो आठवला.
अॅलन ग्रीनस्पॅन या जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञानं अंडरवेअर्सच्या विक्रीवरून देशाची आर्थिक स्थिती ताडणाऱ्या अंडरवेअर इंडेक्सचा सत्तरीच्या दशकात जगाला परिचय करून दिला होता. श्री. ॲलेन US Federal Reserve चे अध्यक्ष होते. बाजारात अंडरवेअर्सचा खप मंदावतो तेव्हा अर्थव्यवस्था मंदीकडे झुकते, असं ॲलनभाऊचा सिद्धांत सांगतो. त्याच वेळी बाजारात लिप्स्टिकवर उड्या पडल्यास मंदीची चाहूल लागते, असं लियोनार्डभाऊचा प्रयोग सांगतो. आता हा दुसरा भाऊ कोण? या महोदयांचं नाव लियोनार्ड लॉडर असं आहे. ते एस्टी लॉडरया कॉस्मेटिक कंपनीचे माजी अध्यक्ष. सन 2000 च्या मंदीत एस्टी लॉडर कंपनीच्या उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली होती. त्याची कारणे शोधण्याच्या प्रयत्नांत आणि प्रयोगात त्यांना लिप्स्टिकच्या मागणीतली वाढ मंदीची चाहूल ठरू शकते, याचा साक्षात्कार झाला.
लिप्स्टिक इंडेक्सच्या बाबतीत अजब तर्कट आहे हे. सध्या आपल्या देशात मोठ्या आणि खर्चिक वस्तूंची खरेदी टाळली जात आहे; परंतु लॅक्मे आणि लॉरिआलसारख्या ब्रँडच्या लिप्स्टिकच्या विक्रीत वेगानं वाढ होत आहे. कॉस्मेटिक उद्योगासाठी ही आनंदाची वार्ता असली तरी तो अर्थव्यस्थेसाठी ती मंदीचा संकेत आहे, असा दावा लिप्स्टिक इंडेक्सच्या हवाल्यानं केला जात आहे. या दाव्यावर चर्चेचं गुऱ्हाळ रंगू शकतं. वादविवाद होऊ शकतात, यात वाद नाही.
गांभीर्यानं विचार करावा, असा आणखी एक इंडेक्स वाचण्यात आला. तो म्हणजे डेमोक्रसी इंडेक्स’. ब्रिटनमधील इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) ही कंपनी डेमोक्रसी इंडेक्स तयार करते. त्यासाठी 60 प्रश्नांचा समावेश असलेल्या प्रश्नावलीद्वारे सर्व्हे केला जातो, हे वाचलं होतं. अंडरवेअर आणि लिप्स्टिक इंडेक्सचं लफडं पहिल्यांदाच वाचलं. जगातील 167 देशांचा डेमोक्रसी इंडेक्स जाहीर करण्यात आला आहे. त्यात नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे. आपण 41 व्या स्थानावर आहोत. शेजाऱ्याच्या घरात डोकावून पाहण्याचा आपला स्थायी भाव आहे. इतर देशांचा विषय निघाल्यास पाकिस्तानच्या आकड्यांकडे लक्ष जाणार नाही, असं कसं होणार. आपला क्रमांक 41 आहे; पण पाकिस्तानचा 112 क्रमांक बघून गुदगुल्या झाल्याना राव!
अंडरवेअर आणि लिप्स्टिक इंडेक्सबाबत वाचतानाही शेजारी-पाजारी देशांचं चित्र बघण्याची अनावर इच्छा होते; पण इंडेक्स बायसही असू शकतात. मग तरी का बघावेत? चर्चेचं गुऱ्हाळ सुरू करता येतं ना. सामाजिक संशोधनात बायस हा घटक निष्कर्षांवर विपरित परिणाम करू शकतो. म्हणून इंडेक्समध्ये गरीब, श्रीमंत देश, जात, धर्म, लिंग, भाषा आदी बायस लपलेले असू शकतात. म्हणून प्रश्न इंडेक्सच्या विश्वासार्हतेचा असतो. संबंधित तज्ज्ञच यावर अधिक भाष्य करू शकतील. अंडरवेअर आणि लिप्स्टिक इंडेक्सचं अर्थशास्राशी असलेलं केवळ वरवरचं नातं मला वाचून माहीत झालं. मी अर्थशास्री नसल्याचा डिफेन्सिव्ह मोडआधीच जाहीर केला आहे. विषय क्रिकेटचा असतात तर नक्कीच रवी शास्रीच्या पुढं गेलो असतो.
लो वेस्ट जीन्सवापरत नसल्यामुळे फॅशनेबल अंडरवेअर्शचा शौकीन नाही; तसंच लिप्स्टिकचं अर्थशास्त्रच काय साधा भावही माहीत असण्याचं कारण नाही. शपथ सांगतो अजून कधी घरी आणि बाहेरही कोणासाठी (संधी महत्वाची) लिप्स्टिक खरेदी केलेली नाही; पण आता तिचा- (तिच्या नव्हे) लिस्प्टिकचा अभ्यास केला. फक्त लिस्प्टिकच्या रंगांबाबत तो नाही केला. आपण रंगांना आधीच जातीजातीत आणि धर्माधर्मांत विभागलं आहे. विविध जाती- धर्मांनी त्याची पेटंट मिळविली आहेत. तशा बऱ्याच बिचाऱ्या जाती अजूनही रंगांविनाच आहेत. कुठल्या तरी छटेत स्वतःला सामावून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. नाही म्हटलं तरी रंगांचे आपल्यावर उपकारही खूप आहेत. डावा की उजवा ओळखण्यासाठी तेच मदत करतात.
थोडक्यात अंडरवेअर्स आणि लिप्स्टिक या दोन्ही इंडेक्सच्या संशोधनाबाबत मेटा ॲनॅलिसिसकेलं. रंग, रूप, स्थान, किंमत आदी सर्व पैलू तपासले. सारांश काय तर मी अभ्यासकांच्या अभ्यासाचा अभ्यास केला. आता मी या निष्कर्षाप्रत पोहचलो आहे, की सद्यःस्थितीत दिसतं ते रंगवा आणि आतलं ते भागवा.