Friday 24 July 2020

अष्टपैलू व्यक्तिमत्व

नीला सत्यनारयण: अष्टपैलू व्यक्तिमत्व

व्रत प्रशासकीय सेवेचे आणि मन कवीचे… अशी नीला सत्यनारायण यांची ओळख! शासनामध्ये 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्यावर पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची ‘राज्य निवडणूक आयुक्त’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासकीय सेवेबरोबरच त्यांनी गीत, संगीत आणि साहित्यातही मुशाफिरी केली होती.

श्रीमती नीला सत्यनारायण यांच्यातल्या विविध पैलूंना लहानपणापासूनच आकार मिळत गेला होता. शालेय जीवनापासूनच त्यांची आणि कवितांची गट्टी जमली होती. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी संगीताचे धडे गिरविले होते. वडिलांच्या बदलीमुळे मुंबई, नाशिक, पुणे, दिल्ली मग पुन्हा मुंबई असा त्यांचा प्रवास झाला. दिल्ली विद्यापीठातून बीए; तर पुणे विद्यापीठातून एमएची पदवी प्राप्त केली. जुलै 1972 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. ठाणे जिल्ह्यातून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांचा मंत्रालयात कृषी व सहकार, सामाजिक कल्याण, सांस्कृतिक व युवा कार्य, वैद्यकीय शिक्षण व औषधे, नगर विकास, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक व पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बाल विकास, माहिती व जनसंपर्क, सामान्य प्रशासन, गृह, वने, महसूल अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळत अपर मुख्य सचिव पदापर्यंत प्रवास झाला. जून 2009 मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर राज्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.

राज्य निवडणूक आयोग ही सांविधानिक संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख पदाच्या जबाबदारीचे भान आणि महत्व राखले किंबहुना त्यात त्यांनी भरच घातली आहे. त्याच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. आयोगाचे अद्ययावत संकेतस्थळ, मतदारांसाठी हेल्पलाईन, तळमजल्यावर मतदान केंद्रे, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंगांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, वृद्ध आणि गरोदर महिलांना रांगेत थांबावे लागू नये म्हणून प्राधान्य, प्राण्यांच्या क्रुरपणे वापरावर निर्बंध अशा अनेक सुधारणा त्यांनी केल्या.

निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी संविधानातील तरतुदींचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती योजना सुरू केली आहे. प्रथमच निवडून आलेल्या ग्रामपंचायत महिला सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि इतर महिलांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वत: पुढे यायला हवे, हा त्यामागचा उद्देश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून श्रीमती सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला ‘क्रांतिज्योती’ हे नाव दिले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे, या दृष्टीने प्रथमत: आयोगाने ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आणि दहा जिल्ह्यांत अंमलबजावणी सुरू केली. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळू शकणारी महिला ग्रामपंचायतींचाही कारभार व्यवस्थितपणे पाहू शकते. त्यासाठी त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. हाच विचार श्रीमती सत्यनारायण यांनी प्रत्यक्षात आणला होता

श्रीमती सत्यनारायण यांचा प्रशासकीय सेवेतील कृतीचा आणि कर्तृत्वाचा आलेख कायम उंचावतच राहिला आहे. त्याच वेळी त्यांच्यातील संवेदनशील कवयित्री, संगीतकार आणि लेखिका काय सजग राहिली आणि घडतही गेली. शांत, सयंमी आणि नि:श्चल व्यक्तिमत्वाच्या श्रीमती सत्यनारायण यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून कुठलीही बारीकसारीक घटना किंवा प्रसंग निसटणे केवळ अशक्य असते. प्रत्यक्ष कृती, गतिशील स्वभाव आणि निरीक्षण क्षमतेमुळे त्यांचे आयुष्य अधिकच समृद्ध होते गेले. त्यांची ही समृद्धता कधी कविता, कथा तर कधी कादंबरीच्या रुपाने व्यक्त होत राहिली.

आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतील अनुभवजन्य ज्ञान आणि माहिती वाचकांबरोबर शेअर करताना श्रीमती सत्यनारायण यांच्या सर्जनशीलतेतून रात्र वणव्याची’ ही कादंबरी साकारली आहे. एक पूर्ण अपूर्ण’,आयुष्य जगताना, एक दिव (जी)वनातला, ओळखीची वाट, जाळरेषा, टाकीचे घाव, डेल्टा 15, तुझ्याविना, पुनर्भेट, मैत्र, सत्यकथा आदी विविध पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

‘एक पूर्ण अपूर्ण’ हे पुस्तक असंख्य माता-पितांना प्रेरणा देणारे आहे. विशेष गरजा असलेल्या आपल्या मुलाच्या निमित्ताने त्यांनी हे आत्मकथन सादर केले आहे. अशी मुले असणाऱ्या प्रत्येक आईच्या पाठीवर त्यांनी धीराचा हात तर ठेवलाच; पण अशा मुलांचे संगोपन कसे करावे याचा कानमंत्रही या पुस्तकाद्वारे दिला आहे. ‘सत्यकथा’ या पुस्तकाद्वारे त्यांनी मराठी मुला-मुलींना उद्योग व्यवसायाकडे कसे वळावे आणि देशाच्या विकासात आपला हातभार कसा लावावा हे सांगणारी सुंदर कथा गुंफली आहे. निसर्गाविषयीच्या त्यांच्या प्रेमाचे ‘एक दिवस (जी)वनातला’ या पुस्तकातून दर्शन घडते. निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण का करावे, हे फार रंजक पध्दतीने त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. ‘ओळखीची वाट’ या काव्यसंग्रहात निसर्ग, प्रेम, समाज अशा विविध विषयांवरील कवितांचा समावेश आहे.

लेखनाखेरीज श्रीमती सत्यनारायण यांनी संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही योगदान दिले आहे. ‘तूच माझी आई’, ‘जोडीदार’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘सावित्री’ या मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. ‘सौभाग्य’ या मराठी चित्रपटाचे आणि ‘दक्षता’ या मराठी टीव्ही मालिकेचे शीर्षक गीतही त्यांचेच होते. जीवनभर का साथ, माता की जय हो, सखी मै श्यामबोलो कृष्ण या नावाने हिदी गाण्यांच्या सीडी प्रकाशित झाल्या आहेत. प्रीतीचे तराणे, झुलेत मनात गाणे, आपल्या बरसत धारा, आकाश पेलताना ‘धिम्‌ताना धिम्‌ताना हे मराठी गाण्यांचे अल्बमही त्यांच्या नावावर आहेत. त्यात रवींद्र साठे, साधना सरग, विभावरी जोशी, ऋषिकेश रानडे आदी आघाडीच्या गायकांनी गाणी गायली आहेत. केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कार-1985 आणि महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार-2006 सह त्यांना विविध संस्थांकडून वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

-जगदीश मोरे

Sunday 19 July 2020

सत्यनारायण यांचा सहवास

  समृद्ध सहवास

मुंईबत गेले काही दिवस अधून मधून धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत असताना गुरुवारी (ता. 16) आकाश जरा जास्तच काळभोर होते. पावसाविना मुंबई शोभत नाही आणि मुंबईचा पाऊस धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. त्यातच श्रीमती नीला सत्यनारायण यांचा करोनाने घात केल्याची वार्ता कानोकानी धडकू लागली. धस्स झाले. बातमी खरी आहे का? अशी विचारणा करणारे फोन आणि मेसेच येऊ लागले. अस्वस्थता दाटली. दुर्दैवाने बातमी खरी होती.

व्रत प्रशासकीय सेवेचे आणि मन कवीचेअशी नीला सत्यनारायण यांची ओळख! शालेय जीवनातच त्यांची कवितेशी गट्टी जमली होती. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ 37 वर्षे सेवा बजावली. प्रशासकीय सेवेबरोबरच त्यांनी गीत, संगीत आणि साहित्यातही मुशाफिरी केली होती. त्यांच्यासोबत काम करण्याची मलाही संधी लाभली होती. त्यांनी वडिलांच्या प्रोत्साहनामुळे संगीताचेही धडे गिरविले होते. जुलै 1972 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. ठाणे जिल्ह्यातून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दला प्रारंभ केला. त्यानंतर मंत्रालयात त्यांनी मंत्रालयात सचिव म्हणून विविध विभागांची धुरा सांभाळली होती. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर जुलै 2009 मध्ये त्यांचीराज्य निवडणूक आयुक्तम्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मी मुंबईत 2005 मध्ये दै. सकाळमध्ये सकाळ न्यूज नेटवर्कसाठी बातमीदारी करत असताना एक सनदी अधिकारी आणि कवयित्री, लेखिका म्हणून श्रीमती सत्यनारायण माहीत होत्या. मी 2006 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक म्हणून शासकीय सेवेत हजर झालो. दै. ॲग्रोवनमध्ये केलेली पत्रकारिता आणि ग्रामीण भागाची पार्श्वभूमी म्हणून तत्कालीन महासंचालिका श्रीमती मैनीषा म्हैसकर मॅडम यांनी माझ्यावर कृषी, पदूम आणि वने या विभागाचा संपर्क अधिकार म्हणून जबाबदारी सोपविली. वन विभागाच्या प्रधान सचिव सत्यनारायण मॅडम होत्या. तिथे त्यांच्याशी परिचय झाला. अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नतीनंतर त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी आली. तिथे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

प्रशासकीय जबाबदारी, विशेष गरजा असलेल्या मुलाचा सांभाळ आणि लेखन अशा तिहिरी भूमिकेत लीला मॅडम लिलया वावरत असत. त्यांच्या वैयक्तिक प्रतिभेच्या अविष्कारांचे सभासमारंभ होत असत. कधी तरी एखाद्या पुस्तकाचे किंवा अल्बमचे प्रकाशन असे; तर कधी कुठे तरी व्याख्यान असायचे. या कार्यक्रमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जवळून परिचय झाला. त्याच वेळी त्यांच्या मानस कन्यबाबतही माहिती समजली. एक लहानगी भीषण प्रसंगातून जात होती. आई नव्हती. बाप सोबतीला नव्हता.  सत्यनारायण मॅडम हा प्रसंग गृहविभागाच्या सचिव म्हणून अनुभवत होत्या. त्यांच्यातली माय जागी झाली. आयुष्याच्या कठीण काळात तिच्या पाठिशी त्या धिरोधात्तपणे उभ्या राहिल्या. तिला मायचे सावली दिली. ही सावली केवळ आर्खिक मदतीची नव्हती. या सावलीत प्रेम होते. माया होती. संकटांच्या शिखरांवर सर होण्याची उमेद त्यांनी त्या मुलीला दिली. तिच्या काळजावरच्या वेदनांवर अलगद फुंकर घातली. आज तिचा संसार सुखाने फुलला आहे. कारुण्यशील आंतरिक निर्मितीचे हे फळ आहे.

एक पूर्ण अपूर्ण हे आत्मकथनात्मक पुस्तक वाचताना त्यांच्यातली माय अधिक उलगडत जाते. हे पुस्तक असंख्य माता-पितांना प्रेरणा देणारे आहे. चैतन्याला त्यांनी आयुष्यभर जीवापाड जपले. विशेष गरजा असेल्या मुलांच्या जपवणुकीची एका आईने दिलेली शिकवण आहे. विशेष गरजा असणाऱ्या प्रत्येक आईच्या पाठीवर त्यांनी धीराचा हात तर ठेवलाच; पण अशा मुलांचे संगोपन कसे करावे याचा कानमंत्रही आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. त्यांच्या सोबतच्या पुस्तकांवरच्या गप्पा एक पूर्ण अपूर्णशिवाय अपूर्ण असायच्या.

सत्यनारायण मॅडम यांच्याकडे जुलै 2009 मध्ये राज्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी आली. त्यानंतर तीन वर्षे त्यांच्या संपर्कात नव्हतो. दरम्यान मला उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. फेब्रुवारी 2011 मध्ये मी पुन्हा मी माझ्या मूळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रुजू झालो. आमचे तत्कालीन महासंचालक श्री. विजय नाहटा यांनी जुलै 2011 मध्ये एके दिवशी मला बोलविले आणि सांगितले, पुढील आदेशापर्यंत तुझ्या सेवा राज्य निवडणूक आयोगाकडे वर्ग करित आहे.

ही संधी की आणखी काही... मी गोंधळलो होतो; पण नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. जगदीश, ही संधी आहे. जोमाने काम कर! अशा शब्दांत माझे वरिष्ठ अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी मला प्रोत्साहन दिले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र घेऊन मी राज्य निवडणूक आयोगात रुजू होण्यासाठी गेलो. प्रथमत: एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटलो. भेट काही फारशी चांगली झाली नाही. मॅडमना भेटा, त्यांनीच आदेश दिला.

मॅडमची भेट घेणे आवश्यकच होते. काही वेळानंतर मॅडमच्या केबिनकडे गेलो. मॅडम आत येऊ? दरवाजा उघडत मी विचारले. संबंधित वरिष्ठ अधिकारीही केबिनमध्ये होते.

या... या...    

मॅडम, मी जगदीश मोरे. नाहटा साहेबांनी पाठविले आहे.

माहीत आहे. मी काय तुला ओळखत नाही का? ये बस. चांगलं काम कर. पुढे भरपूर निवडणुका आहेत.

एस मॅडम. धन्यवाद! म्हणत केबिनच्या बाहेर पडलो आणि निवडणूक आयोगात माझ्या कामाची सुरूवात झाली. मॅडमसह सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद वाढत गेला. 2012 मध्ये बृहन्ममुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली होती. प्रसारमाध्यमांसह राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष आयोगाकडे असायचे. विविध प्रसिद्धिपत्रके, पत्रकारपरिषदा, मुलाखतींच्या निमित्ताने मॅडमी सतत चर्चेत असायच्या. 1 जानेवारी 2012 रोजी निवडणुका जाहीर होणार होत्या. प्रसिद्धिपत्रक आधीच तयार केले होते. त्यावर 1 जानेवारी 20112 तारिख होती; परंतु काही कारणास्तव 3 जानेवारी 2012 रोजी निवडणुका जाहीर कराण्याचे ठरले. प्रसिद्धिपत्रकाच्या झेरॉक्सच्या शंभर प्रती तयार होत्या. प्रश्न फक्त 1 जानेवारी 2012 तारिखेचा होता. झेरॉक्स प्रतींवर 1 जानेवारी खोडून 3 जानेवारी हस्ताक्षरात केले. तेवढेच निमित्त झाले आणि निवडणूक जाहीर करण्याच्या विषयला राजकीय गंध देण्याचा प्रयत्न झाला; पण मॅडमनी तो विषय संयमाने सोडविला. वेळप्रसंगी धाडसही दाखविले. आयोगाबाबत एका नेत्याने केलेल्या विधानासंदर्भात त्यांच्या पक्षाची मान्यता का काढून घेण्यात येऊ नये? अशा आशषयाची नोटीस पाठविली. आणखी एका प्रकरणी त्यांनी एका बड्या नेत्याला दिलगिरी व्यक्त करण्यास भागही पाडले होते.

मी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 2006 मध्ये रुजू झालो होतो. त्या आधी काही वर्षांपूर्वी मॅडम माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकही होत्या. स्वत: लेखिका आणि कवयित्री असल्यामुळे लेखन, भाषण, शासकीय प्रसिद्धी या गोष्ट्या त्यांच्यासाठी नव्या नव्हत्या. तरीही निवडणूक आयोगात असताना प्रसारमाध्यमांसंबंधित कुठलेही काम असल्यास त्या थेट माझ्यासारख्या लहान अधिकाऱ्यावर सोपवून देत असत. तूच ठरवं आणि मला सांग, असं म्हणत. त्यावेळी त्यांचे मोठेपण आपोआप अधोरिखेत होत असे.

एकादा मॅडमच्या कॅबिनमध्ये काही पत्रकार मित्र गप्पा मारत होते. काही तरी विषय होता. मॅडम म्हणाल्या, जगदीश काय म्हणतो ते बघू. मी फार ओशाळलो. सगळ्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. इतक्या मोठ्या व्यक्तीने असा विश्वास व्यक्त करणे सुखद धक्कादायक असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आधारित मॅडमचे टाकीचे घाव नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. मॅडम, टाकीचे घाव हे शीर्षक खटकल्यासारखे वाटते... मी थोड्या भयभीतपणे माझे मत मांडले.

मला लक्षात आले. तुला काय म्हणायचे आहे आणि मला स्वत:लाही माहीत आहे की मी स्वत:ला देव म्हणून घेत नाहीय. पूर्ण पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल. देशात अजूनही निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास आहे. लोकशाहीचा तो आधार आहे. त्या यंत्रणेला कुठल्या दिव्यातून जावे लागते. ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मॅडमनी अतिशय शांतपणे पुस्तकाविषयी आपली भूमिका विषद केली. पुढे माझे काही मत व्यक्त करण्याचा मुद्दाच नव्हता.

मॅडम गप्पा मारताना अतिशय मृदू आणि गोड आवाजात बोलत असते; पण एखाद्याचा पान उतारा करयाचा असल्यास अगदी त्याच पद्धतीने मिश्किलपणेही बोलत. ऐकणारा खट्‌टू झाल्याशिवाय राहत नसे. सुरवातीलाच त्या प्रत्येकाच्या कामाची पद्धत आणि क्षमता जोखत असत. त्यानुसारच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याशी त्यांचा व्यवहार असायचा. एक सहकारी वेगवगेळ्या कारणाने अडचणीत आला होता. कार्यालयात उपस्थित राहत नसे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव होता. त्याची कौटुंबीक स्थिती लक्षात घेऊन त्याला अधिक अडचणीत टाकण्याऐवजी त्यांनी सम्यक मार्ग काढला होता.

न्यूनगंड झटकला पाहिजे, अशी आग्रही मांडणी ते नेहमी करत असत. त्यांना आपल्या सावळ्या रंगाचा लहानपणी न्यूनगंड असायचा. घरात सगळेच गोरेपान. त्यांचाच रंग तेवढा सावळा. वेळोवेळी जवळची माणसं त्यांना त्यांच्या काळ्या रंगाची जाणीव करून द्यायचे; पण घरात तसा भेद नसायचा; पण कपडे घेताना अडचण व्हायची. तू गडद रंगाचा फ्रॉक घेऊ नकोस, असं आई म्हणाली की त्यांचे मन खट्टू व्हायचे. वडील पोलिस अधिकारी होते. ते समजवायचे, बाळा, कोणाचा रंग कोणता. यावरून कर्तृत्व ठरत नाही. शारीर सौंदर्य, रंग, रुप कालांतराने लोप पावते. तू गुणसुंदर हो. वडिलांचा मंत्र त्यांनी आयुष्यभर जोपासला. म्हणून त्यांचे स्मरण आपल्याला कायमस्वरूपी होत राहील.  

जगदीश मोरे हे अनेक दिवस नीला सत्यनारायण यांच्या समवेत कार्यरत होते. श्रीमती सत्यनारायण यांच्या अतिशय विश्वासू आणि आवडत्या अधिकाऱ्यांपैकी जगदीश एक…. मंत्रालय पत्रकारांच्या ग्रुपवरील ही पोस्ट आहे, हा मेसेच एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला मॅडम गेल्याची बातमी आल्यानंतर काही वेळाने पाठविला. तो वाचून मॅडम गेल्याची जाणीव जास्त तीव्रतेने झाली आणि त्यांच्या संपूर्ण सहवासाचे चित्र डोळ्यांसमोरच्या अदृष्य पडद्यांवर दिसू लागले.

मॅडम फेसबूकवर नेहमी सक्रीय असत. त्यांनी लॉकडॉऊन या पुस्तकाचे सुतोवाचही केले नुकतेच केले होते. त्यांनी 24 जूनला फेसबूकवर अशीच एक पोस्ट शेअर केली होती,

दिवसभर जगण्याचा

अर्थ शोधतो                          

अजून तोही गवसत नाही

मनाचा एकांत सरत नाही

मॅडम कायमस्वरुपी अशा एकांताच्या प्रवासाला निघून जातील, असे कधीच वाटले नव्हते. 

                                                                                        -जगदीश मोरे

(प्रसिद्धी- दै. आपलं महानगर, रविवार, दि. 19.07.2020)

Thursday 16 July 2020

क्रांतिज्योती

(श्रीमीत नीला सत्यनारायण मॅडम राज्य निवडणूक आयुक्त असताना दै. प्रहारमध्ये प्रसिद्ध झालेला लेख)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महिला सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या संकल्पनेतून आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने `क्रांतिज्योती` प्रकल्प हाती घेतला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी दहा जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याविषयी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त निर्भय वातावरणात पार पाडण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये पूर्वी महिलांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित होत्या. राज्य शासनाने आता त्यात वाढ करून 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के जागा निश्चित करून निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली आहे. महिलांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात आपले कर्तृत्व स्वबळावर सिद्ध करावे आणि ग्रामविकासात मोलाचे योगदान द्यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने `क्रांतिज्योती` प्रकल्प हाती घेतला आहे.

संविधानातील तरतुदींचा केवळ शाब्दिक अर्थ घेता या तरतुदींचा आत्मा लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. प्रथमच निवडून आलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या कारभारापासून इतर महिलांनीही प्रेरणा घेऊन स्वत: पुढे यायला हवे, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे स्मरण म्हणून राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला `क्रांतिज्योती` हे नाव दिले आहे.

सेलू (जि. वर्धा) तालुक्यात प्रायोगिक तत्वावर एक प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्याचे मूल्यमापन करून हा प्रकल्प साकारण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या समस्यांची जाणीव ठेऊन प्रकल्पाचे नियोजन आणि आखणी केली आहे. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, अमरावती आणि वर्धा या दहा जिल्ह्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी राबविला जात आहे. प्रशिक्षक आणि महिला सदस्यांच्या माहितीकरिता सर्वंकष साहित्याचे संकलन निर्मिती करण्यात आली आहे. त्याहीपेक्षा  खेळ, गाणी आणि प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यावर भर आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्थानिक भाषेत साहित्य उपलब्ध करून देण्याचासुद्धा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर तीन दिवसांच्या अनिवासी कार्यशाळेत अनौपचारिक वातावरणात हे प्रशिक्षण दिले जाते. त्यात स्थानिक यशस्वी महिलांच्या यशोगाथा देखील प्रशिक्षणार्थी महिलांसमोर मांडल्या जातात.

ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष कारभार, ज्वलंत सामाजिक समस्या आणि शासनाच्या विविध योजना यांची माहिती देऊन स्त्रियांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, यावर यात भर देण्यात येत आहे. प्रशिक्षणात पंचायत राज कार्यपद्धती, ग्रामपंचायत कायदा, त्यातील नियम आणि ग्रामपंचायतींचे अर्थव्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागात विशेषत: महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिलांना तपशिलवार माहिती दिली जाते. ग्रामपंचायतीचे अर्थव्यवस्थापन, अंदाजपत्रक तयार करणे याचेसुद्धा प्रशिक्षण दिले जाते.

क्रांतिज्योतीच्या माध्यमातून राज्यस्तरापासून ग्रामीणस्तरापर्यंत महिला सदस्यांच्या प्रशिक्षकांची एक सक्षम फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य आणि जिल्हास्तरावर प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. तसेच जिल्हास्तरावर मदत कक्ष किंवा सल्ला केंद्र स्थापन केले जाते. प्रशिक्षणानंतर दरमहा पाठपुरावा सत्रांचेसुद्धा आयोजन केले जाते. सहा महिन्यांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी महिला सदस्यांचे विविध बाबींवरून मूल्यमापन केले जाते. त्यात कारभाराची माहिती, आत्मविश्वास, कार्यक्षमता, ग्रामपंचायत प्रशासनामधील सहभाग, व्यक्तिमत्व गुणवत्ता यामधील प्रगती आदी मुद्यांचा समावेश असतो.

पहिल्या टप्प्यातील दहा जिल्हे

1) ठाणे, 2) नाशिक, 3) पुणे, 4) सातारा, 5) कोल्हापूर, 6) सिंधुदुर्ग, 7) सोलापूर, 8) नांदेड, 9) अमरावती आणि 10) वर्धा.

राजकीय व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावे

``स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. या संधीचा फायदा घेऊन महिला राजकीय आणि सामजिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी हा प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे, या दृष्टीने प्रथमत: आम्ही ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. कारण संपूर्ण कुटुंबाचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळू शकणारी महिला ग्रामपंचायतींचाही कारभार व्यवस्थितपणे पाहू शकते. त्यासाठी त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. तेच काम क्रांतिज्योतिच्या माध्यमातून केले जात आह``, असे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.

0-0-0


पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त

राज्य निवडणूक आयुक्त असताना श्रीमती नीला सत्यनारायण मॅडम यांच्यासंदर्भात साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख...

 निवडणुकांमुळेच सर्वसामान्यांनाही विकेंद्रित सत्ता व्यवस्थेत हक्काचा वाटा मिळतो. सत्ताधिशांपर्यंत आपला आवाज पोहचवता येतो. लोकशाहीतील विकेंद्रित सत्ता व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय व्यवस्थेतून कार्यकर्ते आणि नेते घडत जातात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका होय. हा संसंदीय लोकशाहीचा पाया आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा डोलारा सांभाळण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचा करभार चालतो. सध्या श्रीमती नीला सत्यनारायण राज्य निवडणूक आयुक्तपदाची धुरा समर्थपणे पेलत आहेत.

चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर श्रीमती सत्यनारायण यांच्याकडे ही संविधानिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त किंवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी एवढीच त्याची ओळख सीमीत नाही. त्या गीतकार आहेत. संगीतकार आहेत. लेखिका आहेत. ती एक चैतन्यदायी माय आहे. आई नावाचं गाव आहे. कारण ती सर्वसामान्य आई नाही. निर्मिकानेच अन्याय केल्यावर दु:ख सांगावं कुणाला? अशी अवस्था विकलांग मुलांच्या जन्मदातची होते; पण निर्सगाने केलेल्या चेष्टेवर मात करणारी अपवादात्मक उदाहणेही असतात. त्यातलाच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नीला सत्यनारायण! चैतन्य या आपल्या मतिमंद मुलाला घडवताना, वाढवताना आईपणाचे कौशल्य त्यांनी पणाला लावले. त्याची फलश्रृती म्हणजे असामान्य असलेल्या मूलातून आज घडलेला, अगदी सर्वसामान्य वाटावा असा चैतन्य! चैतन्यामुळे माझ्यातली आई घडली, अशी  उत्स्फूर्त भावना श्रीमती सत्यनारायण यांनी एक पूर्ण- एक अपूर्णया पुस्तकात चितारलेली आहे. चैतन्य आणि स्वत:च्या जिद्दीची ही कहाणी सर्वच आयांसाठी पेरणादायी आहे.

श्रीमती सत्यनारायण यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत. लोकशाहीत निवडणुका हाच महत्वाचा घटक नाही; परंतु इतर घटकांतील हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे; परंतु दुर्दैवाने सर्व अर्थकारण, राजकारण आणि सत्ताकारणाभोवती निवडणुका केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे पारदर्शक आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ते आव्हान श्रीमती सत्यनारायण यांनी समर्थपणे पेलले आहेत. विधिमंडळ आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार या मुद्यावरून पूर्वीच्या राज्य निवडणूक आयुक्तांबाबत झालेला वाद महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 6 जुलै 2009 रोजी श्रीमती सत्यनारायण यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. या पदासाठी त्यांनी शासनाकडे कुठल्याही प्रकारचा विनंती अर्ज केलेला नव्हता. केवळ त्याची प्रशासकीय कारकीर्द लक्षात घेऊन त्यांना हा बहुमान मिळाला आहे, असे त्या नेहमी सांगत असत.

निवडणुकांच्या निमित्ताने दौऱ्यांवर असताना त्यांनी उमेदवार, मतदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधायला सुरवात केली. त्यातून निवडणूक प्रक्रियेतील अडचणी आणि महिला सदस्यांचे प्रश्न त्यांना प्रकर्षाने जाणवले. निवडणूक चिन्हांचा प्रकार विचार करण्यासारखा होता. केळं, गाजर, खाट, कुकरसारख्या चिन्हांमुळे अपमानीत व्हावे लागत होते. या चिन्हांचा भलताच अर्थ काढला जातो, अशी बहुतांश महिला उमेदवारांची तक्रार होती. संवेदनशील महिला आयुक्त म्हणून महिलांच्या या प्रश्नाची दखल घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी तातडीने आदेश काढून एकूण नऊ चिन्हे वगळून टाकली. त्याऐवजी संगणक, दूरचित्रवाणी संचासारख्या आधुनिकतेच्या प्रतिकांचा निवडणूक चिन्हांमध्ये समावेश केला.

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाची तरतूद करून क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. या निर्णयाने अधिकाधिक महिलांना सार्वजनिक जीवनात कर्तृत्व दाखविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. त्याचा प्रत्यक्षात कितपत उपयोग महिलांना होत आहे, हे श्रीमती सत्यनारायण यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नाव बायकांचे असले तरी कारभार मात्र पुरुषच करतात. अगदी सह्याही तेच करतात. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरची महिलांची घुसमट इथेही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासंदर्भात एका संस्थेच्या मदतीने रीतसर पाहणी केली. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले, पण बळ, प्रतिष्ठा, समानता नाही मिळाली. ही घुसमट थांबविण्यासाठी श्रीमती सत्यनारायण यांच्या संकल्पनेतून क्रांतिज्योती महिला सक्षमीकरण प्रकल्प साकारला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांना ग्रामपचंयातीचे कायदे, कारभार, योजना, अंदाजपत्रक याबाबत प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. हा प्रशिक्षण प्रकल्प संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरला असून तो देशपातळीवर राबविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. यूएन वूमेन या आतंरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेनेही त्याची दखल घेतली आहे.

पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्रीमती सत्यनारायण यांनी प्रारंभापासूनच सुधारणांच्या दिशेने पावले टाकली होती. पण त्यांची खरी कसोटी डिसेंबर 2011 ते 2012 या कालावधीत मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी लागली. अगदी यशस्वीपणे त्या या कसोटीला सामोऱ्या केल्या. त्यांनी केवळ निवडणुका पार पाडण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही. त्यातही अमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या. काळाच्या बरोबर राहण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे संकेतस्थळ साकारले. या संकेतस्थळावर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणूक प्रभागांच्या इलेक्ट्रॉनिक नकाशांची सुविधा आहे. महानगरपालिकेच्या एकत्रित नकाशावरून आपल्या प्रभागाचा नकाशा शोधता येतो. त्यात प्रभागातील निवडणूक अधिकाऱ्यांचे नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांची संख्या, प्रभागातील मतदार यादी आणि त्यातील आपले मतदान केंद्रही घरबसल्या शोधता येते. विविध निवडणुकांचे निकालही या संकेतस्थळावर पाहता येतात. आयोगाचे आदेश, सूचना आणि परिपत्रेकही त्यावर उलब्ध असतात. या संकेतस्थळास राज्य मराठी विकास संस्था आणि सीडॅकच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) अधिकाधिक वापरासाठीचाएज 2012’ (एन्टरप्रायजेस ड्रायव्हिंग ग्रोथ अँड एक्सलन्स थ्रू आयटी) हा पुरस्कारही मिळाला आहे, याचे श्रेय अर्थातच श्रीमती सत्यनारायण यांचे आहे.

मतदारांची गैरसोय टाळणे आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यावरही श्रीमती सत्यनाराण यांचा भर आहे. त्यासाठी अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता यांना मतदानाच्या रांगेत तिष्ठत उभे राहू लागू नये म्हणून त्यांना प्राधान्य देण्यास सुरवात झाली आहे. मतदारांच्या लांब रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्र शक्योवर तळमजल्यावरच असते. अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था केली जाते. मतदान केंद्रावर स्वच्छता गृह, पाणी आणि सावलीची व्यवस्था केली जाते. वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ केली आहे. बोटावर निशाणी करण्यासाठी शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जाऊ लागला आहे. मतदारांच्या ओळखीसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. निवडणूक प्रचारात प्राण्यांचा क्रूरपणे वापरावर निर्बंध घातला आहे. मतदान यंत्रांमध्ये अद्ययावत पद्धतीने सुधारणा केल्या आहेत. मतदान यंत्रांवर सांकेतिक भाषेऐवजी स्पष्टपणे माहिती दर्शविण्याची व्यवस्था केली आहे. यंत्राच्या संवेदनशील भागावर नॉन क्लोनेबल टॅग लावला आहे. यंत्रात फेरफार करता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास ते बंद होते. त्यामुळे ते अधिक सुरक्षित झाले आहे.

निवडणुकांतील पेचप्रसंगांबाबत अनुभव कथन करताना श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या, राज्य निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे. निवडणुकांच्या काळात आयुक्तांचे अधिकार सार्वभौम असतात. राजकीय पक्ष, नेते, उमेदवार आणि मतदारांची त्यांच्या बारिकसारीक निर्णयांवर बारकार्ईने नजर असते. त्या दबावातून मार्ग काढत पेचप्रसंगांसंदर्भात अचूक निर्णय घ्यावे लागतात. आचारसंहितेचा भंग, हा अत्यंत नाजूक प्रसंग असतो. आचारसंहितेचा भंग सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडूनही होऊ शकतो. त्यावर समतोल निर्णय घ्यावा लागतो. डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचंड संख्येने निवडणुका पार पडल्या. त्यातील एका प्रकरणात ज्या राज्यकर्त्यांनी माझी या पदावर नियुक्ती केली त्यांच्याच विरोधात मला कार्यवाही करावी लागली. तीसुद्धा सर्व जनतेच्या साक्षीने. त्यावेळी महिला आयुक्त म्हणून केवळ भावनिक विचार करून चालत नाही. आपल्या निर्णयांचे समर्थन भविष्यातही करता आले पाहिजे, म्हणून मी प्रत्येक निर्णय तावून सलाखून घेते. निर्णय प्रक्रियेत निवडणूक आयोगातील सहकाऱ्यांकडून भरपूर नैतिक बळही मिळते. पण निर्णय मात्र शेवटी आयुक्तांनाच घ्यावा लागतो. प्रसंगी कठोरही व्हावे लागते. तरच पारदर्शक निवडणुका होऊ शकतात आणि सांविधानिक पदाचा मान राखला जाऊ शकतो.

निवडणुकांच्या काळात काही वर्तमानपत्रांमधून माझ्याविषयी नकारात्मक लिहिले गेले; पण ते फारच थोडे होते. सकारात्मकतेचे पारडे जड होते. माध्यमांतील हीच सकारात्मकता मला बळ देत होती. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांत व संयमी पद्धतीने हाताळल्या गेल्याची बाब प्रसारमाध्यमांनी सातत्याने अधोरेखित केली. जनमानसांत माझी प्रतिमाही उंचावत होती. महिलांमध्ये माझ्याविषयीचा कौतुकाचा आणि आदराचा भाव पाहायला मिळत होता. काही तरुण-तरुणींनी तुम्ही आमच्या आयकॉन असल्याचे सांगून वेगळाच आनंद दिला. आनंदाबरोबर जबाबदारीचीही जाणीव होत होती. बऱ्यावाईट अनुभवांतून सर्व घटानांकडे, व्यक्तींकडे समानतेने पाहायला आणि सर्वांचे शांतपणे ऐकून घ्यायलाही मी शिकले. वाईटातून चांगले आणि नकारात्मकतेतून सकारात्मकता शोधायला शिकले. निवडणुकांचीही संधी मला केवढे मोठे दान देऊन गेली, या विचाराने मी प्रत्येक वेळा भारावते. याबाबत स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि निवडणुकांच्या अनुभावाची शिदोरी कायम सोबत राहावी म्हणून मी टाकिचे घाव हे पुस्तक निवडणुकांची शाही सुकण्यापूर्वीच कागदावर उतरवून काढले.

श्रीमती सत्यनारायण यांनी एका राजकीय पक्षाच्या प्रभावशाली नेत्याने केलेल्या उलटसुलट विधानांवरून निर्माण झालेले वादंगही अतिशय संयमी पद्धतीने हाताळले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य अडचणीही टाळता आल्या. त्यांची या प्रकराणातील तटस्थ भूमिका लक्षात घेऊन अनेकांनी त्यांना लेडी शेषन म्हणूनही संबोधले. पुरुषांपेक्षा महिला अधिक संवेदनशील असतात, हे खरे असले तरी ही संवेदनशीलतेचा वापर सकारात्मकतेसाठी अधिक होऊ शकतो, हे श्रीमती सत्यनारायण यांनी दाखवून दिले. प्रसंगी कठोरही व्हावे लागते, पण त्याच वेळी संयमही राखावा लागतो आणि याच समतोलातून महिलाही नवनवीन जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतात, याचा वस्तुपाठ श्रीमती सत्यनारायण यांनी घालून दिला आहे.

                      जगदीश मोरे

                                                      0-0-0