समृद्ध सहवास
मुंईबत गेले
काही दिवस अधून मधून धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत असताना गुरुवारी (ता. 16) आकाश
जरा जास्तच काळभोर होते. पावसाविना मुंबई शोभत नाही आणि मुंबईचा पाऊस धडकी
भरवल्याशिवाय राहत नाही. त्यातच श्रीमती नीला सत्यनारायण यांचा करोनाने घात केल्याची
वार्ता कानोकानी धडकू लागली. धस्स झाले. “बातमी खरी आहे का?” अशी विचारणा
करणारे फोन आणि मेसेच येऊ लागले. अस्वस्थता दाटली. दुर्दैवाने बातमी खरी होती.
‘व्रत प्रशासकीय सेवेचे आणि मन कवीचे’ अशी नीला सत्यनारायण यांची ओळख! शालेय जीवनातच
त्यांची कवितेशी गट्टी जमली होती. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ 37 वर्षे सेवा बजावली. प्रशासकीय सेवेबरोबरच त्यांनी गीत, संगीत आणि साहित्यातही मुशाफिरी केली होती. त्यांच्यासोबत काम करण्याची मलाही संधी लाभली होती. त्यांनी वडिलांच्या प्रोत्साहनामुळे संगीताचेही धडे गिरविले होते. जुलै 1972 मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. ठाणे जिल्ह्यातून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दला प्रारंभ केला. त्यानंतर मंत्रालयात त्यांनी
मंत्रालयात सचिव म्हणून विविध विभागांची धुरा सांभाळली होती. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर जुलै 2009 मध्ये त्यांची ‘राज्य निवडणूक आयुक्त’ म्हणून नियुक्ती करण्यात आली
होती.
मी मुंबईत 2005
मध्ये दै. ‘सकाळ’मध्ये
‘सकाळ न्यूज नेटवर्क’साठी बातमीदारी
करत असताना एक सनदी अधिकारी आणि कवयित्री, लेखिका म्हणून श्रीमती सत्यनारायण माहीत
होत्या. मी 2006 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक म्हणून
शासकीय सेवेत हजर झालो. दै. ‘ॲग्रोवन’मध्ये
केलेली पत्रकारिता आणि ग्रामीण भागाची पार्श्वभूमी म्हणून तत्कालीन महासंचालिका
श्रीमती मैनीषा म्हैसकर मॅडम यांनी माझ्यावर कृषी, पदूम आणि वने या विभागाचा
संपर्क अधिकार म्हणून जबाबदारी सोपविली. वन विभागाच्या प्रधान सचिव सत्यनारायण
मॅडम होत्या. तिथे त्यांच्याशी परिचय झाला. अपर मुख्य सचिव म्हणून पदोन्नतीनंतर
त्यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी आली. तिथे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी
मिळाली.
प्रशासकीय
जबाबदारी, विशेष गरजा असलेल्या मुलाचा सांभाळ आणि लेखन अशा तिहिरी भूमिकेत लीला
मॅडम लिलया वावरत असत. त्यांच्या वैयक्तिक प्रतिभेच्या अविष्कारांचे सभासमारंभ होत
असत. कधी तरी एखाद्या पुस्तकाचे किंवा अल्बमचे प्रकाशन असे; तर कधी कुठे तरी व्याख्यान असायचे. या कार्यक्रमांमुळे
त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जवळून परिचय झाला. त्याच वेळी त्यांच्या मानस कन्यबाबतही
माहिती समजली. एक लहानगी भीषण प्रसंगातून जात होती. आई नव्हती. बाप सोबतीला
नव्हता. सत्यनारायण मॅडम हा प्रसंग
गृहविभागाच्या सचिव म्हणून अनुभवत होत्या. त्यांच्यातली माय जागी झाली.
आयुष्याच्या कठीण काळात तिच्या पाठिशी त्या धिरोधात्तपणे उभ्या राहिल्या. तिला
मायचे सावली दिली. ही सावली केवळ आर्खिक मदतीची नव्हती. या सावलीत प्रेम होते.
माया होती. संकटांच्या शिखरांवर सर होण्याची उमेद त्यांनी त्या मुलीला दिली.
तिच्या काळजावरच्या वेदनांवर अलगद फुंकर घातली. आज तिचा संसार सुखाने फुलला आहे.
कारुण्यशील आंतरिक निर्मितीचे हे फळ आहे.
‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मकथनात्मक पुस्तक वाचताना त्यांच्यातली माय अधिक उलगडत जाते. हे पुस्तक असंख्य माता-पितांना प्रेरणा देणारे आहे. चैतन्याला
त्यांनी आयुष्यभर जीवापाड जपले. विशेष गरजा असेल्या मुलांच्या जपवणुकीची एका आईने दिलेली शिकवण आहे. विशेष
गरजा असणाऱ्या प्रत्येक आईच्या पाठीवर त्यांनी धीराचा हात तर ठेवलाच; पण अशा मुलांचे संगोपन कसे करावे याचा कानमंत्रही आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. विविध भाषांमध्ये
अनुवादही झाला. त्यांच्या सोबतच्या पुस्तकांवरच्या गप्पा ‘एक पूर्ण अपूर्ण’शिवाय अपूर्ण असायच्या.
सत्यनारायण मॅडम
यांच्याकडे जुलै 2009 मध्ये राज्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी आली. त्यानंतर तीन
वर्षे त्यांच्या संपर्कात नव्हतो. दरम्यान मला उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क
अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. फेब्रुवारी 2011 मध्ये मी पुन्हा
मी माझ्या मूळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रुजू झालो. आमचे तत्कालीन
महासंचालक श्री. विजय नाहटा यांनी जुलै 2011 मध्ये एके दिवशी मला बोलविले आणि
सांगितले, “पुढील आदेशापर्यंत तुझ्या सेवा राज्य निवडणूक आयोगाकडे वर्ग करित आहे.”
ही संधी की
आणखी काही... मी गोंधळलो होतो; पण नाही
म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. “जगदीश, ही संधी आहे. जोमाने काम कर!” अशा शब्दांत माझे
वरिष्ठ अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी मला प्रोत्साहन दिले. माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे पत्र घेऊन मी राज्य निवडणूक आयोगात रुजू होण्यासाठी गेलो. प्रथमत:
एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटलो. भेट काही फारशी चांगली झाली नाही. “मॅडमना भेटा,” त्यांनीच आदेश दिला.
मॅडमची भेट
घेणे आवश्यकच होते. काही वेळानंतर मॅडमच्या केबिनकडे गेलो. “मॅडम आत येऊ?” दरवाजा उघडत मी
विचारले. संबंधित वरिष्ठ अधिकारीही केबिनमध्ये होते.
“या... या...”
“मॅडम, मी जगदीश मोरे. नाहटा साहेबांनी पाठविले आहे.”
“माहीत आहे. मी काय तुला ओळखत नाही का? ये बस. चांगलं काम कर. पुढे भरपूर
निवडणुका आहेत.”
“एस मॅडम. धन्यवाद!” म्हणत केबिनच्या
बाहेर पडलो आणि निवडणूक आयोगात माझ्या कामाची सुरूवात झाली. मॅडमसह सगळ्या
सहकाऱ्यांशी संवाद वाढत गेला. 2012 मध्ये बृहन्ममुंबई महानगरपालिकेसह राज्यातील
विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली होती.
प्रसारमाध्यमांसह राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष आयोगाकडे असायचे. विविध
प्रसिद्धिपत्रके, पत्रकारपरिषदा, मुलाखतींच्या निमित्ताने मॅडमी सतत चर्चेत
असायच्या. 1 जानेवारी 2012 रोजी निवडणुका जाहीर होणार
होत्या. प्रसिद्धिपत्रक आधीच तयार केले होते. त्यावर 1 जानेवारी 20112 तारिख होती;
परंतु काही कारणास्तव 3 जानेवारी 2012 रोजी निवडणुका जाहीर
कराण्याचे ठरले. प्रसिद्धिपत्रकाच्या झेरॉक्सच्या शंभर प्रती तयार होत्या. प्रश्न
फक्त 1 जानेवारी 2012 तारिखेचा होता. झेरॉक्स प्रतींवर 1 जानेवारी खोडून 3
जानेवारी हस्ताक्षरात केले. तेवढेच निमित्त झाले आणि निवडणूक जाहीर करण्याच्या
विषयला राजकीय गंध देण्याचा प्रयत्न झाला; पण मॅडमनी तो विषय
संयमाने सोडविला. वेळप्रसंगी धाडसही दाखविले. आयोगाबाबत एका नेत्याने केलेल्या
विधानासंदर्भात त्यांच्या पक्षाची मान्यता का काढून घेण्यात येऊ नये? अशा आशषयाची नोटीस पाठविली. आणखी एका प्रकरणी त्यांनी एका बड्या नेत्याला
दिलगिरी व्यक्त करण्यास भागही पाडले होते.
मी माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयात 2006 मध्ये रुजू झालो होतो. त्या आधी काही वर्षांपूर्वी
मॅडम माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकही होत्या. स्वत: लेखिका आणि कवयित्री असल्यामुळे लेखन, भाषण, शासकीय प्रसिद्धी
या गोष्ट्या त्यांच्यासाठी नव्या नव्हत्या. तरीही निवडणूक आयोगात असताना
प्रसारमाध्यमांसंबंधित कुठलेही काम असल्यास त्या थेट माझ्यासारख्या लहान
अधिकाऱ्यावर सोपवून देत असत. “तूच ठरवं आणि मला सांग,” असं म्हणत. त्यावेळी त्यांचे मोठेपण आपोआप अधोरिखेत होत
असे.
एकादा मॅडमच्या
कॅबिनमध्ये काही पत्रकार मित्र गप्पा मारत होते. काही तरी विषय होता. मॅडम
म्हणाल्या, “जगदीश काय म्हणतो ते बघू.” मी फार ओशाळलो. सगळ्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. इतक्या
मोठ्या व्यक्तीने असा विश्वास व्यक्त करणे सुखद धक्कादायक असते. स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांवर आधारित मॅडमचे ‘टाकीचे घाव’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. “मॅडम, ‘टाकीचे घाव’ हे शीर्षक खटकल्यासारखे
वाटते...” मी थोड्या भयभीतपणे माझे मत मांडले.
“मला लक्षात आले. तुला काय म्हणायचे आहे आणि मला स्वत:लाही माहीत आहे की मी स्वत:ला देव म्हणून
घेत नाहीय. पूर्ण पुस्तक वाचल्यावर लक्षात येईल. देशात अजूनही निवडणूक यंत्रणेवर
लोकांचा विश्वास आहे. लोकशाहीचा तो आधार आहे. त्या यंत्रणेला कुठल्या दिव्यातून
जावे लागते. ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.” मॅडमनी अतिशय
शांतपणे पुस्तकाविषयी आपली भूमिका विषद केली. पुढे माझे काही मत व्यक्त करण्याचा
मुद्दाच नव्हता.
मॅडम गप्पा
मारताना अतिशय मृदू आणि गोड आवाजात बोलत असते; पण एखाद्याचा पान उतारा करयाचा असल्यास अगदी त्याच पद्धतीने मिश्किलपणेही
बोलत. ऐकणारा खट्टू झाल्याशिवाय राहत नसे. सुरवातीलाच त्या प्रत्येकाच्या कामाची
पद्धत आणि क्षमता जोखत असत. त्यानुसारच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याशी त्यांचा
व्यवहार असायचा. एक सहकारी वेगवगेळ्या कारणाने अडचणीत आला होता. कार्यालयात
उपस्थित राहत नसे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव होता. त्याची कौटुंबीक स्थिती
लक्षात घेऊन त्याला अधिक अडचणीत टाकण्याऐवजी त्यांनी सम्यक मार्ग काढला होता.
न्यूनगंड झटकला
पाहिजे, अशी आग्रही मांडणी ते नेहमी करत असत. त्यांना आपल्या सावळ्या रंगाचा
लहानपणी न्यूनगंड असायचा. घरात सगळेच गोरेपान. त्यांचाच रंग तेवढा सावळा. वेळोवेळी
जवळची माणसं त्यांना त्यांच्या काळ्या रंगाची जाणीव करून द्यायचे; पण घरात तसा भेद नसायचा; पण कपडे घेताना
अडचण व्हायची. “तू गडद रंगाचा फ्रॉक घेऊ नकोस,” असं आई म्हणाली की त्यांचे
मन खट्टू व्हायचे. वडील पोलिस अधिकारी होते. ते समजवायचे, “बाळा, कोणाचा रंग कोणता.
यावरून कर्तृत्व ठरत नाही. शारीर सौंदर्य, रंग, रुप कालांतराने लोप पावते. तू
गुणसुंदर हो.” वडिलांचा मंत्र त्यांनी आयुष्यभर जोपासला. म्हणून त्यांचे स्मरण आपल्याला
कायमस्वरूपी होत राहील.
“जगदीश मोरे हे अनेक दिवस नीला सत्यनारायण यांच्या समवेत
कार्यरत होते. श्रीमती सत्यनारायण यांच्या अतिशय विश्वासू आणि आवडत्या
अधिकाऱ्यांपैकी जगदीश एक…. मंत्रालय पत्रकारांच्या
ग्रुपवरील ही पोस्ट आहे,” हा मेसेच एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला मॅडम गेल्याची बातमी
आल्यानंतर काही वेळाने पाठविला. तो वाचून मॅडम गेल्याची जाणीव जास्त तीव्रतेने
झाली आणि त्यांच्या संपूर्ण सहवासाचे चित्र डोळ्यांसमोरच्या अदृष्य पडद्यांवर दिसू
लागले.
मॅडम फेसबूकवर
नेहमी सक्रीय असत. त्यांनी ‘लॉकडॉऊन’ या पुस्तकाचे सुतोवाचही केले नुकतेच केले होते. त्यांनी 24 जूनला
फेसबूकवर अशीच एक पोस्ट शेअर केली होती,
दिवसभर जगण्याचा
अर्थ शोधतो
अजून तोही गवसत नाही
मनाचा एकांत सरत नाही
मॅडम
कायमस्वरुपी अशा एकांताच्या प्रवासाला निघून जातील, असे कधीच वाटले नव्हते.
-जगदीश
मोरे
(प्रसिद्धी- दै. आपलं महानगर,
रविवार, दि. 19.07.2020)
No comments:
Post a Comment