(श्रीमीत नीला सत्यनारायण मॅडम राज्य निवडणूक आयुक्त असताना दै. ‘प्रहार’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महिला सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या संकल्पनेतून आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने `क्रांतिज्योती` प्रकल्प हाती घेतला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी दहा जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याविषयी...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये पूर्वी महिलांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित होत्या. राज्य शासनाने आता त्यात वाढ करून 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के जागा निश्चित करून निवडणुकीची प्रक्रिया पार
पाडली आहे. महिलांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात आपले कर्तृत्व स्वबळावर सिद्ध करावे आणि ग्रामविकासात मोलाचे योगदान
द्यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने `क्रांतिज्योती` प्रकल्प हाती घेतला आहे.
संविधानातील तरतुदींचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता या तरतुदींचा आत्मा लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. प्रथमच निवडून आलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या कारभारापासून इतर महिलांनीही प्रेरणा घेऊन स्वत: पुढे यायला हवे, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे स्मरण म्हणून राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला `क्रांतिज्योती` हे नाव दिले आहे.
सेलू (जि. वर्धा) तालुक्यात प्रायोगिक तत्वावर एक प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्याचे मूल्यमापन करून हा प्रकल्प साकारण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या समस्यांची जाणीव ठेऊन प्रकल्पाचे नियोजन आणि आखणी केली आहे. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड,
अमरावती आणि वर्धा या दहा जिल्ह्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी राबविला जात आहे. प्रशिक्षक आणि महिला सदस्यांच्या माहितीकरिता सर्वंकष साहित्याचे संकलन व निर्मिती करण्यात आली आहे. त्याहीपेक्षा खेळ, गाणी आणि प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यावर भर आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्थानिक भाषेत साहित्य उपलब्ध करून देण्याचासुद्धा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर तीन दिवसांच्या अनिवासी कार्यशाळेत अनौपचारिक वातावरणात हे प्रशिक्षण दिले जाते. त्यात स्थानिक यशस्वी महिलांच्या यशोगाथा देखील प्रशिक्षणार्थी महिलांसमोर मांडल्या जातात.
ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष कारभार, ज्वलंत सामाजिक समस्या आणि शासनाच्या विविध योजना यांची माहिती देऊन स्त्रियांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, यावर यात भर देण्यात येत आहे. प्रशिक्षणात पंचायत राज कार्यपद्धती, ग्रामपंचायत कायदा, त्यातील नियम आणि ग्रामपंचायतींचे अर्थव्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागात विशेषत: महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिलांना तपशिलवार माहिती दिली जाते. ग्रामपंचायतीचे अर्थव्यवस्थापन, अंदाजपत्रक तयार करणे याचेसुद्धा प्रशिक्षण दिले जाते.
क्रांतिज्योतीच्या माध्यमातून राज्यस्तरापासून ग्रामीणस्तरापर्यंत महिला सदस्यांच्या प्रशिक्षकांची एक सक्षम फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य आणि जिल्हास्तरावर प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. तसेच जिल्हास्तरावर मदत कक्ष किंवा सल्ला केंद्र स्थापन केले जाते. प्रशिक्षणानंतर दरमहा पाठपुरावा सत्रांचेसुद्धा आयोजन केले जाते. सहा महिन्यांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी महिला सदस्यांचे विविध बाबींवरून मूल्यमापन केले जाते. त्यात कारभाराची माहिती, आत्मविश्वास, कार्यक्षमता, ग्रामपंचायत प्रशासनामधील सहभाग, व्यक्तिमत्व व गुणवत्ता यामधील प्रगती आदी मुद्यांचा समावेश असतो.
पहिल्या टप्प्यातील
दहा जिल्हे
1) ठाणे, 2)
नाशिक, 3) पुणे, 4) सातारा, 5) कोल्हापूर, 6) सिंधुदुर्ग, 7) सोलापूर, 8) नांदेड,
9) अमरावती आणि 10) वर्धा.
राजकीय व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावे
``स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना
आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. या संधीचा फायदा घेऊन महिला राजकीय आणि सामजिकदृष्ट्या
सक्षम व्हाव्यात यासाठी हा प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सार्वजनिक जीवनात
आत्मविश्वासाने वावरता यावे, या दृष्टीने प्रथमत: आम्ही ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी
या प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. कारण संपूर्ण कुटुंबाचा डोलारा व्यवस्थितपणे
सांभाळू शकणारी महिला ग्रामपंचायतींचाही कारभार व्यवस्थितपणे पाहू शकते. त्यासाठी त्यांना
केवळ प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. तेच काम क्रांतिज्योतिच्या माध्यमातून केले
जात आह``, असे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.
0-0-0
No comments:
Post a Comment