Sunday 19 August 2018

कोकणी फणस आणि खानदेशी केळं


(‘बिगूल’ पोर्टलवरील माझा https://goo.gl/qWXhpn लेख)
कोकणी फणस आणि खानदेशी केळं
तात्याचं विमानप्रवासचं स्वप्न हेच ‘पुष्पक विमाना’चं मुख्य कथानक. या स्वप्नाचा प्रवास मात्र जळगाव, जळगावातलं कळगाव, तिथली माणसं, तात्याचं मुंबईतलं आगमन, मुंबईचं जीवन, खानदेशी आणि कोकणी अस्मितीची जुगलबंदी आदी उपकथानकांमार्गे होतो. आजोबा आणि नातवाच्या नात्यातून मुख्यत: ही कथासुत्रे पुढे सरकतात. खानदेशी भाषा हा एक वेगळा पैलूही आहे. त्याविषयी...
मुंबईतील झोपड्यांच्या गर्दीत हरवलेल्या चाळीत छोट्याशा घरात विलासचं (सुबोध भावे) बरं चालंय. खानदेश सोडून विलासनं कोकणी स्मितासोबत (गौरी महाजन) लग्नाचा बार उडवलाय. उदरनिर्वाहासाठी घराजवळच एका कोपच्यात (गाळा म्हणनं अवघडं) मोटारसायकलींच्या पंक्चर काढण्याचा खोका थाटलाय. डंगऱ्यानं कोकणी फणसापुढं खानदेशची अस्मिता पंक्चर करून टाकल्याची सल तात्याला (मोहन जोशी) मुंबईत नातू विलासकडे आल्या-आल्या बोचू लागते. तात्याचंही तसं जळगावातल्या कडगावात बरं चाललं होतं. तात्या इरसाल आहे. बेरक्या आहे. खरं तर तात्या फारच चालू आहे. अहिराणीत म्हणायचं झाल्यास तात्या म्हणजे एकदम बाट्टोड माणूस से! अस्सल खान्देशी इरसालपणा त्याच्या शब्दाशब्दांत आणि वाक्यावाक्यांत सामावला आहे. टोमणा हाणण्यात तात्या पटाईत आहे. तात्याचा हाच स्वभाव नातसुनेला सुरुवातीला पचवणं अवघड जातं. मग विलासची कोंडी होऊ लागते. 
            कडगावात आख्खं गाव तात्याची काळजी घ्यायचं. वाड्यात तात्या एकटाच राहायचा. तात्याचं कुणीच उरलं नव्हतं. विलास हाच एकमेव आधार. विलासची गावाशी नाळ तुटलेली. ती तात्या जोडू पाहत होता. विलास मुंबईशी तादात्म्य पावलेला. लोकलमधल्या भजनानं कीर्तनकार तात्याच्या मात्र कानठळ्या बसतात. शहरभर काळे नाले… तुंबलेली गटारं… माशाचा उपद्रव… कसली मायानगरी? नुसतीच कचरापट्टी! तात्याला मुंबईतली डोंगरावरची झोपडपट्टी भलं मोठं मुंग्यांचं वारुळ वाटतं. शौचालयात संडासा ऐवजी उलटी होण्याची त्याला भीती सतावते. तात्याच्या नजरेत मुंबई- नुसती गंधीपटक!
            तात्या साकीनाक्याच्या एका घराच्या गच्चीवर जातो. तिथं त्याला डोक्यावरून सर्रकन उडत गेलंलं भलं मोठं काही तरी दिसतं. तेच ते तुकाबाबाचं पुष्पक इमान! विलास थाप मारतो. संत तुकारामाला सदेह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या पुष्पक विमानाचं कीर्तन करणारा विष्णूदास वाणी ही तात्याची खरी ख्याती. कीर्तन करताना तात्या देहभान विसरत या मिथकाशी एकरूप होतो. विमानाचा शोध राईट बंधूंनी लावल्याचं शाळेच्या बुकात लिव्हलंय हे लहानगा विलास सांगतो ते तात्याच्या (…आणि तात्याचं पुष्पक विमान प्रेक्षक म्हणून आपल्या) पचनी पडत नाही. पुष्पक विमान पाहून तात्या स्वप्नात रंगतो. तुकाबाबा (राहूल देशपांडे) तात्याशी संवाद साधू लागतो. तुकाबाबानं आपल्याला पुष्पक विमानात कीर्तनाचं आमंत्रण धाडल्याचे भास तात्याला होऊ लागतात. तिथून सुरू होतो, तात्याच्या विमान प्रवासाच्या स्वप्नाचा प्रवास. हेच ‘पुष्पक विमाना’चं कथाबीज आहे.
तात्याला जळगाव- खानदेशचा भलताच अभिमान. कोकणचं फणस पोकळ आणि जळगावचं केळं जगात भारी म्हणताना म्हाताऱ्याच्या अंगात तरतरी भरते. स्मिताचं कोणकणी असणं तेवढंच तात्याला निमित्त. विलासला ‘फणस’ संबोधन चिकटवतो आणि हिणवतो. मग ‘केळीचा घड’ म्हणत स्मिताही तात्याचा उपहास करते. अशा प्रकारची रुपके, प्रतीके आणि प्रतिमा सिनेमात भरपूर आहेत. कथा पुढे सरकत असताना भाषिक अस्मिता सैल होत जाते. आपसातल्या माणसांचं दर्शन गडद होतं जातं. सासू- सासरे नको असणाऱ्यांची संख्या जास्त असताना आजेसासरा जगावा म्हणून तगमग सुरू असलेल्या कोकणी स्मितातल्या केळाच्या गरासारख्या हळव्या सुनेची तात्याला अनुभूती येते. विलासच्या बालपणाची आठवण म्हणून कागदी विमान आणि भोवरा जीवापाड जपणाऱ्या खान्देशी तात्याचं वरून फणसासारखं काटेरी व्यक्तिमत्व आणि आतलं मऊ, संवेदनशील मन स्मिताला दिसतं. आजेसासरा आणि नातसुनेचे सूर जुळतात. तात्याचा मुंबईबद्दलच्या दृष्टिकोनातही परिवर्तन होताना जाणवते.
म्हातारपणी आत्मा स्वाभिमानी होत जातो आणि देह परावलंबी होत जातो. असं म्हणणारा तात्या अधिकच भावतो. अर्थात हे श्रेय आहे मोहन जोशी यांच्या कसदार अभिनयाचं! तात्याच्या ‘बकेट लिस्ट’मधलं विमान प्रवासाचं एकमेव स्वप्न सत्यात आणण्यासाठी धडपडणारा विलास साकरणाऱ्या सुबोध भावे आणि स्मिता साकारणाऱ्या गौरी महाजनचाही अभिनय प्रभावीत करतो; पण चकाचक वेशभूषतेला तेवढा गॅरेजवाला विलास मात्र रसभंग करतो. राहूल देशपांडे तर अगदीच पाहुणा कलाकार… आजोबा नातवाचा पहिला दोस्त; तर नातू आजोबाजा शेवटचा दोस्त! आणि मी तुझी सुरवात आणि तू माझा शेवट! असं म्हणणारा आणि पुष्पक विमानात कीर्तनाची आस लागलेला आजोबा- तात्या हेच या सिनेमाचं मध्यवर्ती पात्र आहे! 
            तात्याच्या विमानप्रवासचं स्वप्न हेच या सिनेमाचे मुख्य कथानक. तिथंपर्यंत पोहचण्यासाठी मात्र जळगाव, जळगावातलं कळगाव, तिथली माणसं, तात्याचं मुंईतलं आगमन, मुंबईचं जीवन, खानदेशी आणि कोकणी अस्मितीची जुगलबंदी असे अनेक उपकथानक सिनेमात दिसतात. आजोबा आणि नातवाच्या नात्यातून ही कथासुत्रे पुढे सरकतात. त्यातला भाषा हा वेगळा पैलू दाखविण्याचाही प्रयत्न आहे. अर्थातच, तात्या अहिराणी भाषक आहे. तात्या अधूनमधून अहिराणी शब्द उद्‌धृत करतो; पण त्याला अहिराणीची लकब मात्र काही पकडता आलेली नाही. 
‘पुष्पक विमाना’त खानदेशी भाषिक आणि भौगोलिक अस्मिता ठळकपणे सूचित केली आहे. म्हणूनच या सिनेमातल्या अहिरणासंदर्भात चर्चा करणे संयुक्तिक ठरते. या सिनेमात ‘माले’, ‘तुले’, ‘आते’, ‘मरीजायजो’, ‘पाटोळ्या’, ‘मरीमाय खायजो’, ‘गंधीपट्क’ यासारखे काही शब्द पेरलेली अहिराणीशी नातं सागणारे उद्‌गार कानावर पडतात. ते तात्याच्या तोंडून; पण वानगीदाखलच. तात्याचं पात्र मात्र पूर्णत: खानदेशी असल्याचं मोहन जोशी आणि दिग्दर्शक चिंचाळकर प्रेक्षकांच्या मनावर ठसवतात. विलासच्या भाषेत प्रमाणभूत मराठीपेक्षा थोडा वेगळा लहजा जाणवतो. तो पूर्ण ग्रामीण मराठी भाषक वाटत नाही आणि खानदेशी म्हणूनही मनावर ठसत नाही. मुंबईय्या म्हणूनही भावत नाही. मुंबईतल्या झोपडपट्ट्या आणि गरिबांच्या वस्त्यांतील (विलासही अशाच वस्तीतला) लोकांच्या भाषेबद्धल श्री. अरूण साधू यांनी ‘झिपऱ्या’ कांदबरीच्या मनोगतात लिहिलं आहे की, सतरा ठिकाणांहून आलेल्या अठरापगड प्रकारची माणसे एकत्र राहून जेव्हा एकमेकांशी संवाद साधू पाहतात, त्यातून भाषेचे जे एक विचित्र रसायन तयार होते ते मुंबईत ऐकायला मिळते. विलासच्या वस्तीतही अठरापगड प्रकारची माणसे आहेत. अर्थात, या सिनेमाचा ‘जॉर्गन’ वेगळा आहे.
            अहिराणी भाषा खानदेश या भूप्रदेशात बोलली जाते. भूप्रदेशावरून तिला ‘खानदेशी’देखील नाव आहे. खानदेशात प्रामुख्याने जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेकडील मालेगाव, देवळा, कळवण, बागलाण, दिंडोरी, मध्ये प्रदेशातील बऱ्हाणपूरचा परिसर, गुजरातमधील सीमेलगतच्या डांगसारख्या काही भागातही अहिराणी बोलली जाते. चौथ्या शतकात खानदेशावर अहिरांचे राज्य होते. अहिरांची वाणी- बोली म्हणजे अहिरवाणी किंवा अहिराणी. खानदेशातील अहिराणी कृषकांची बोली झाली आहे. अहिर हे पंजाब, सिंध, राजस्थान, गुजरात, माळवा, नाशिक या मार्गाने येत खानदेशात स्थिरावले. त्यामुळे भटकंती दरम्यान अहिरांच्या बोलीवर गुजराती, राजस्थानी, मराठी या भाषांचा प्रभाव आहे, असा दावा अहिराणीचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी केला आहे.
            अहिराणी आता मराठीची बोली म्हणूनच ओळखली जाते; परंतु ती स्वतंत्र भाषा आहे, असा अभ्यासकांचा दावा आहे. कारण उच्चार, व्याकरण आणि शब्दसंग्रह या तीनही भाषिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत प्रमाणभूत मराठीपेक्षा खानदेशी वेगळी आहे. ब्रिटिश कालखंडात 1920 मध्ये जॉर्ज ग्रिअरसनने भारतीय भाषांविषयी सर्वेक्षण केले होते. त्याने ‘लिंग्विस्टिक सर्व्हे’च्या सातव्या खंडात मराठी आणि मराठीच्या बोलींचे विवेचन केले आहे. ग्रिअरसननेदेखील खानदेशीचा समावेश मात्र गुजरातीच्या भिल्ल बोलीत केला होता. त्यामुळी खानदेशीची माहिती नवव्या खंडाच्या तिसऱ्या भागात केला आहे. ग्रिअरसनने केलेले खान्देशीचे वर्गीकरण निरर्थक आहे, असे मत ना. गो. कालेलकर यांनी नोंदविले आहे.
खानदेशीला मराठीची पोटभाषा म्हटले तरीही केवळ मराठी येणाऱ्या माणसाला पूर्वाभ्यास केल्याशिवाय खानदेशी नीट आणि पूर्णपणे कळणार नाही. वऱ्हाडी किंवा डांगी या बोली बोलणाऱ्यांना तिचे अधिक सहजतेने आकलन होईल. इतके असूनही आपण महाराष्ट्रीय आहोत. मराठी समाजाचाच भाग आहोत, ही भावना खानदेशीच्या वापर करणाऱ्या लोकांच्या मनात आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या व्यापक सांस्कृतिक जीवनात ते मोकळेपणाने सहभागी होऊ शकतात. मराठीचा अभ्यास करताना ते मराठीत आहेत, याबद्दल इतर मराठी भाषकांच्या मनात जरासुद्धा शंका येत नाही. म्हणूनच ग्रिअरसनने गुजरातीची पोटभाषा म्हणून केलेले तिचे वर्गीकरण निरर्थक ठरते. अशी भूमिका श्री. कालेलकर यांनी मांडली आहे.
मराठीपेक्षा उच्चार, व्याकरण आणि शब्दसंग्रहाच्या दृष्टीने खानदेशी वेगळी असल्यामुळे कदाचित ‘पुष्पक विमाना’त तिची झलक आणि प्रतिकात्मक वापर केलेला दिसतो. या उलट मालवणी किंवा वऱ्हाडी बोली सर्व मराठी भाषकांना समजते. खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कवितांचेही सर्व मराठी जणांना आकलन होते. कविता खान्देशीतच; पण मराठीच्या थोड्या जवळणाऱ्या खानदेशी बोलीत आहेत. बहिणाबाईंच्या कवितांची भाषा ‘लेवा बोली’ म्हणूनही ओळखली जाते. शिवाय दोन भाषांच्या सीमेवरील प्रदेशात दोन्ही भाषांना छेदणारी पोटभाषादेखील बोलली जाते. तसाच प्रकार या लेवा बोलीसंदर्भात असावा. कारण अहिराणी आणि वऱ्हाडी भाषांचे प्रदेश खानदेश आणि वऱ्हाडी प्रांताच्या सीमेने छेदले आहेत. बहिणाबाईंनी वापरलेली बोलीसुद्धा पूर्ण सिनेमात वापरल्यास ती अधिक मधूर वाटू शकते आणि तिचे सर्वांना आकलनही होऊ शकते.  
            भाषा सतत वापराने बेचव, बोथट होत असते. साहित्याच्या भाषेतही एकसारख्या वापराने भाषिक रुपांना गुळगुळीतपणा येत राहतो. असं ‘साहित्याची भाषा’ या पुस्तकात भालचंद्र नेमाडे यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचा आणि सिनेमाचा संबंध नाही; परंतु याच भावनेतून मराठी सिनेमेही मराठीच्या बोलींचा आधार घेत असावेत आणि ते स्वागतार्हचं आहे. अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, मराठवाडी, आग्री आदींसह अनेक मराठीच्या समृद्ध बोली आहेत. त्या मराठीच्या दाराशी उभ्या आहेत. असे प्रतिपादन 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. उत्तम कांबळे यांनी केले होते. एक आदिवासी मुलगी पख्यांला ‘भिरभिऱ्या’ म्हणत होती. तिला ‘पंखा’ शब्द माहीत नव्हता; पण ‘भिरभिऱ्या’तली अर्थछटा पंख्यापेक्षा भन्नाट असल्याची आठवणही त्यांनी याच भाषणात सांगितली होती. म्हणूनच बोलींना मराठीच्या माजघरात प्रवेश देण्याची गरच आहे. तो मार्ग सिनेमा किंवा नाटकांच्या माध्यमातून प्रशस्त होऊ शकतो.    
            तात्या ठेचा बनवण्यास सांगतो. ते स्मिताला काही तरी अद्‌भूत असल्यासारखं वाटतं. ठेचा जणू काही फक्त खानदेशीच पदार्थ असल्यासारखे तिचे भाव असतात. ठेचा संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असावाच. ‘ठेचा’ शब्दाऐवजी ‘खुडा’ शब्द वापरता आला असता; तसंच ‘पाटोळ्यांची आमटी’ऐवजी ‘पाटोळ्यासनं बट्ट’ असे शब्द प्रयोग केले असते तर भाषिक वेगळेपण दिसलं असतं. हे शब्द वापरल्याने खान्देशी वगळता अन्य मराठी भाषक प्रेक्षकांना आकलन झालं नसतं, असंही नाही. अहिराणीतल्या शब्दसंग्रहांचा आणि उच्चारांचा पुरेपुर आधार घेतला असता तर आणखी भाषिक सौंदर्य खुललं असतं; परंतु प्रमाणभूत भाषा तेवढ्या सुद्ध आणि बोली अशुद्ध असंही समजणारे असतात. वस्तुत: पूर्वपार चालत आलेली जी भाषा आईच्या तोंडून अथवा आजुबाजूच्या व्यक्तींच्या बोलण्याचे अनुकरण करून आपण जन्मापासून शिकतो ती अशुद्ध कशी असेल? अशुद्ध भाषा म्हणजे एका ठराविक समूहाच्या बोलण्याचे नियम न पाळणारी भाषा. असं ना. गो. कालेलकर यांनी नमूद केले आहे.
शुद्ध किंवा अशुद्ध अशी भाषा मानणे अशास्त्रीय आणि अडाणीपणाचे लक्षण असते. भाषा वापरण्याचे प्रकार सामाजातल्या निरनिराळ्या गरजांनुसार, प्रथांनुसार आणि संदर्भानुसार बदलत असतात. हे श्री. नेमाडे यांचे विधान महत्वाचे आहे. शिवाय त्यांच्या बहुतांश कादंबऱ्यांतील पात्रेही खान्देशी आहेत. ‘हिंदू’मध्ये तर असंख्य शब्द किंवा संवाद खानदेशीत आहेत. ते वाचताना वेगळे भाषिक आणि भौगोलिक संदर्भ समोर येतात. काही मराठी सिनेमे किंवा टीव्ही मालिकांमधील मालवणी किंवा वऱ्हाडीचा केलेला पुरेपूर वापर आशय, विषय आणि संदर्भांचे वेगळेपण सूचित करतो. पुष्पक विमानात फक्त सूचकतेतून खानदेशीचा वापर जाणवतो. तरी तेही नसे थोडके!
(मोबाईल- 9967836687  ई-मेल- jagdishmore@gmail.com)