Monday 12 June 2017

सर्वांसाठी कृषी शिक्षण

सर्वांसाठी कृषी शिक्षण
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सर्वांसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असण्याची आवश्यकता नाही. दहावी आणि बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. शिवाय दररोज महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मातृभाषेत सोप्या पद्धतीने कृषी शिक्षण घेण्याची ही संधी आहे....
लोकविद्यापीठाच्या भूमिकेतून सर्वांसाठी शिक्षणया ध्येयाने व्यापक शिक्षण चवळवळ उभी करण्यासाठी 1 जुलै 1989 रोजी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ध्येयपूर्तीसाठी मुक्त व लवचीक शिक्षणप्रणाली अवलंबविण्यात आली आहे. ज्ञानव्यवहरात लोकभाषेचा वापर आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रविज्ञान व संज्ञापन साधनांची सांगड घालून खुली शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर आहे. समाजाच्या आशा-आकांक्षा, भौतिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन विविध शिक्षणक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. त्याच धर्तीवर कृषी अभ्यासक्रमही विद्यापीठात सुरु करण्यात आले आहेत. त्याला चांगला प्रतिसादही लाभला आहे.
अभ्यासक्रम कोणासाठी?
दहावी- बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. इच्छा असूनही कृषी शिक्षण न घेता आलेले किंवा काही अडचणींमुळे शिक्षण अर्धवट राहिलेले किंवा अधिक तंत्रशुद्ध शेती करण्याची इच्छा असलेले या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीसाठी टप्प्याटप्प्याने प्रत्येकी एक वर्षाचे विविध पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात. त्यात उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, फळबाग उत्पादन, फुलशेती व प्रांगणविद्या पदविका अभ्यासक्रमाचा समावेश असतो. कृषी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमही करता येतो.
कृषी पदविका उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आवश्यकता नसते. थेट विविध पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. आवश्यक तेवढे पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी परीक्षा द्यावी लागते. तत्पूर्वी पदवी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विहित नमुन्यातील अहवाल विद्यापीठास सादर करावा लागतो. या अहवालाचे मूल्यमापन केले जाते. त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जाते. त्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विषयानुसार बी.एस्सी (ॲग्री) किंवा बी. एस्सी (हॉर्टी) पदवी प्रदान केली जाते.
प्रवेश प्रक्रिया
            मुक्त विद्यापीठांच्या कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उपलब्ध करून दिली जाते. प्रत्यक्ष अभ्यासक्रम मात्र अभ्यास केंद्रांवर शिकविले जातात. कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे इत्यादींच्या माध्यमातून ही केंद्रे चालवली जातात. साधारणत: मे- जून मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु होते. आता ही प्रक्रिया सुरू आहे. गुणानुक्रमे प्रवेश दिले जातात. प्रवेशानंतर संबंधित अभ्यास केंद्रावर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तिका, अभ्यासक्रमाचे तासिकानिहाय वेळापत्रक उपलब्ध करून दिले जाते. प्रवेश शुल्कातच पाठ्यपुस्तिकांचा समावेश असतो. वेगळे शुल्क द्यावे लागत नाही. शनिवारी व रविवारी सर्व विषय पूर्वनिर्धारित वेळापत्रकाप्रमाणे संबंधित अभ्यास केंद्रांवर शिकविले जातात. कृषी विद्यापीठांच्या धर्तीवर हे अभ्यासक्रम असून ते पूर्णत: मराठी भाषेत उपलब्ध आहेत. प्रत्येक पदविका अभ्यासक्रमात प्रत्येकी चार विषय घटकांचा समावेश असतो. त्याच्या सराव, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात.
अभ्यासक्रमाचे फायदे
दैनंदिन शेती करत असताना त्यातले तंत्रज्ञान व विज्ञान समजून घेण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यालाही लाभ होतो. शेतीशास्त्राची अगदी पायाभूत माहिती मिळाल्यानंतर आपले काही गैरसमज असल्यास तेही दूर होण्यास मदत होते. विविध पिकांचे प्रकार, बि-बियाणे, शत्रू व मित्र कीड, किटकनाशके, रासायनिक व सेंद्रिय खते, विपणन, मातीचे प्रकार व परीक्षण, हवामान यासारख्या बाबींची अत्यंत सोप्या भाषेत माहिती करून घेता येते. त्याचा फायदा प्रत्यक्ष शेती किंवा शेतीशीनिगडित उद्योगधद्यांसाठी होऊ शकतो. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नर्सरी, भाजीपाला, फळे व फुलोत्पादन अशा विविध क्षेत्रात प्रवेश करणे सुलभ होते. काही ठिकाणी व्यवसायासोबत नोगरीही मिळू शकते. पदोन्नतीसाठी लाभदायक ठरू शकतात.
संपर्क
अधिका माहितीसाठी मुक्त विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac किंवा  http://www.ycmou.ac.in या संकेतस्थळालाही आपण भेट देऊ शकता. कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संबंधित अभ्यासक केंद्रांवरही संपर्क साधता येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी वरील संकेतस्थळावरून माहिती पुस्तिका डाऊनलोड करून ती संपूर्ण वाचल्यानंतर पुढील प्रक्रिया करणे सुलभ ठरते.
                               प्रवेश व अभ्यासक्रम वेळापत्रक
·         प्रवेश अर्ज भरणे- 1 ते 15 जून 2017
·         गुणवत्ता यादीची प्रसिद्धी- 21 जून 2017
·         गुणवत्ता यादी प्रवेश फेरी- 22 ते 24 जून 2017
·         प्रतीक्षा यादीची प्रसिद्धी- 27 जून 2017
·         प्रतीक्षा यादी प्रवेश फेरी- 27 ते 28 जून 2017
·         अंतिम प्रात्याक्षिक परीक्षा- 20 ते 28 फेब्रुवारी 2018
·         अंतिम लेखी परीक्षा- 1 ते 10 मार्च 2018