Monday 24 April 2023

बेडकाच्या भाजीवरून आठवलं म्हणून... (सचिन तेंडुलकर)

 

 तोच तो सचिनला आवडणार वडापाव

सचिन खवय्यादेखील आहे. वांद्र्यातील चिकन बिरयाणी त्याला विशेष आवडते. त्याचं वडापाववरचे प्रेम तर सर्वश्रुत आहे; पण एकदा तो मित्राच्या घरून जेऊन आला. बेडकाची भाजी खाल्ल्याचे त्याने घरी सांगतले. सगळेच चक्रावले. नंतर लक्षात आले. त्याने भेंडीची भाजी खाल्‍ली होती, हा किस्सा सचिनच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्याचाच मोठा भाऊ नितीन तेंडुलकर यांनी आज लिहिला आहे. यावरून सहज आठवलेल्या काही सूरस कथा... दंतकथा....     

हॉटेलातल्या वडापावला गाडीवरच्या वडापावची चव शक्यच नाही. उगाच टापटीप आणि स्वच्छतेची कास धराल तर चवीला मुकाल. टिशू पेपरात पॅक केलेल्या वडापावपेक्षा रोजचे इश्यू मांडणाऱ्या वर्तमानपत्राच्या रद्दीत गुंडाळलेला वडापाव अधिक चविष्ट असतो. गाडीवरचा वडापाव दिसला की, तोंडाला पाणी सुटतेच. पाय आपोआप थबकतात. सुट्टे पैसे नसले तरी भागते. तेलाने कळकट मळकट झालेला क्यूआर कोड बहुतांश गाड्यांवर असतोच. आपल्या मोबाईलात गुगलपे, पेटीएम असतचं ना. विरासतीत मिळालेल्या संपत्तीसारखे! तोपर्यंत वडापावच्या अनावर ओढीनं जिभेवरचे पाणी ओठांचा बांधही ओलांडू पाहते. तेंव्हा आठवतो अवघ्या क्रिकेट जगताचा लाडका सचिन आणि त्याचा लाडका वडापाव. मग काय ‘आयला वडापाव’!

तुम्हाला म्हणून सांगतो सचिनच्या आवडीचा आणि तो खायचा (असं म्हणतात) तोच वडापाव खायचो बरं का आम्हीपण!

खोटं वाटतंय?

सचिन राहायचा कलानगरला वांद्रे पूर्वेत. ‘मातोश्री’पासून फर्लांगभर अंतरावर. आपल्या सर्वांना माहीत आहे- त्याची शाळा शारदाश्रम! तत्पूर्वी मात्र तो होता, वांद्रे पूर्वच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. क्रिकेटसाठी तो दादरच्या शाळेत गेला होता. नावारुपाला आला आणि राहायला वांद्रे पश्चिमेला गेला.

विषय आहे वडापावचा. शासकीय वसाहतीत न्यू इग्लिश स्कूलकडे जाताना वडापावचा एक लोकप्रिय अड्डा लागतो. सचिनला तिथला वडापाव आवडतो, लोक चवीने अशी चर्चा करतात. खरे खोटे माहीत नाही; पण चिनने स्वत: ट्विट केल्याशिवाय त्यांच्या या वडापावचे ‘सत्य’ उलगडणार नाही. माणूस मोठा झाला त्याच्या नावाभोवती अशा कथा- दंतकंथा अविष्कृत होतात. बाकी एकूणच वडापावच्या प्रेमाविषयी सचिनने स्वत: ‘सचिन अ बिलिएन ड्रिम’मध्येही सांगितले आहेच. शिवाय विविध मुलाखती किंवा कार्यक्रमांतही सचिन वडापावविषयी बोललाच आहे; पण मला उत्सुकता आहे ती वांद्र्यातल्या वडापावशी असलेल्या सचिनच्या कथित नात्याची.

मी वांद्रे शासकीय वसाहतीत राहायचो तेही त्या वडापावच्या अड्ड्याजवळ. सचिनचं नक्की माहीत नाही, नुसतीच चर्चित चर्वणे; पण अजित तेंडुलकर यांना (कोविडकाळापूर्वी) तिथून वडापाव पार्सल घेऊन जाताना मी स्वत: पाहिले आहे. तिथं आणि एमआएजीत ‘वॉक’च्या वेळी (विशेषत: संध्याकाळी) अजित तेंडुलकरांना पाहिल्यावर साक्षात सचिनचं दर्शन झाल्याचा भाव मनात जागृत व्हायचा. दुधाची तहान ताकावर भागायची एवढंच!

एमआयजीत कधीकधी सकाळी लवकर अर्जुनही नेट प्रॅक्टिससाठी आयचा आणि क्रिकेटच्या देवाच्या वारसदाराचे दर्शन घडायचे. वडापावऐवजी फक्त चटणीच वाट्याला आली तरीही आनंद मानून घेण्यासारखं. केवढं ते अप्रूप! यंदाच्या हंगामात तर अर्जूनचे आयपीएलमध्ये पदार्पणही झालं आहे. तो त्याची स्वत:ची ओळख प्रस्थापित  करेल  की नाही? या प्रश्नाचे उत्तर काळच देईल.  

आणि हो, एकदा चार्वी वडापाव घेऊन आली. जाम खूश होती. मी विचारले, वडापावच आणलाय ना?

ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का? सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर...

मलाच काय सगळ्यांना माहीत आहे. त्यात काय गुपित! मी उद्‌गारलो.

तसं नाही. पूर्ण ऐकणार आहात का?

मग कसं? ते सांग

अजित तेंडुलकरही माझ्यासोबत आपल्या इथंला वडापाव घेत होता! अजित तेंडुलकर जणू काही तिचा समवयस्कच. केवढं ते कौतुक!

सचिनचे पुस्तक असो की सिनेमा अथवा मुलाखत- वडापावचे रवंथ झालेच पाहिजे. तो आता मैदानात चौके- छक्के मारत नसला तरी त्याचे गारुड आजही कायम आहे. कुठलेही ट्विट करो प्रसिद्धी आहेच. अलीकडेच सचिनने बेस्टच्या 315 नंबरच्या बसचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला होता. सचिन त्याच बसने कलानगर- शिवाजी पार्क- कलानगर असा प्रवास करायचा. त्याच आठवणींना त्याने या व्हिडिओत उजाळा दिला आहे. आधीही त्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मग आपणच का मागे राहवे या बसशी नाते जोडायला? शासकीय वसाहतीत राहत असताना पहिल्यांदा आधारकार्ड काढताना पत्त्याचा लॅंडमार्क म्हणून ‘315 बेस्ट बस स्टॉपजवळ’ असे लिहिले होते. याच बसने सचिन जायचा, हेच तेव्हा  डोक्यात होते. त्याचेही भलतेच कौतुक. शासकीय वसाहतीत काही अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या आता दुसऱ्या पिढ्याही आहेत. त्यातील बहुतांश जण न्यू इंग्लिस स्कूलमध्येच शिकले आहेत. त्यातील  काही जण सांगतात, सचिन एक वर्षे आमच्या मागं होता... एक वर्षे पुढं होता; पण तेव्हा तो कुठं एवढा मोठा होता! आम्ही सोबत होतो आणि आजही एकमेकांना ओळखतो, असे सांगणारा मात्र कोणीच घावला नाही.

शासकीय वसाहतीत कॉलनीत एक सलून होते. त्यातला एक चाचा हमखास सांगत असे, सचिन केस कटवाने मेरे पास आता था. बहुत प्यारा बच्चा था. मुझे चाचा कहे कह के पुकारता था. पण कुणास ठावूक चाचाच्या बोलण्यावर काही विश्वस बसेना; पण जनश्रुती म्हणून त्यांचा आनंद घ्यायला काय हरकत आहे? असो!

सचिनचं सोडा. मूळ विषयाकडे वळा. आपला विषय आहे वडापाव!

भारतातील पहिल्या ॲपल स्टोअरचे उद्घाटन गेल्या आठवड्यात (18 एप्रिल) मुंबईत झालं. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी त्याचं उद्घाटन केले. टीम कूक यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचीही भेट घेतली. माधुरी यांनी टीम कुक यांना वडापावचा पाहुणचार केला. ते  स्वत: माधुरीने ट्विट केले. वडापाव स्वादिष्ट असल्याचे म्हणत कुक यांनी रिट्विट केले. ‘तेजाब’ मधल्या ‘मोहिनी’ने कुक यांना वाडपावची मोहिनी घातली.

मुंबईत वडापाव कुठलाही असो, मुंबईकरांच्या जिभेवरचं त्याचंही गारूड कधीच कमी होणार नाही. फार तर वडापावचा जुना ‘ब्रॅड’ लुप्त होतो. दुसरा ब्रँड काही काळासाठी नव्यानं नाव कमवितो; पण मुंबईकरांचं वडापावावरचं प्रेम काही कमी होत नाही. शिवाय कधी तेंडुलकर तर कधी माधुरीसोबत टीम कूकमुळे वडापावला प्रसिद्धी मिळतचे. कष्टकऱ्यांही ‘वडापाव’तो. कारण बजेटमध्ये तोच बसतो. खवय्यांची मात्र चंगळ असते. म्हणून तर वडापाव दिसताच क्षणी जीभ पाणावते!

                   -जगदीश मोरे

No comments:

Post a Comment