Tuesday, 4 April 2023

तो राजहंस एक

 

नवरी मिळेना शेतकऱ्याला

मातीशी नातं तोडायचं असतं, असं नाही; पण शेतीत पिकणाऱ्या दारिद्र्यावर जगण्यासाठी पुढच्या आणखी किती पिढ्यांना मातीत ढकलावं, हा त्याच्या सुप्त मनातला सवाल असतो. ‘सोनं पिकविणारी आपली काळी आई’ आणि ‘आपण आहोत जगाचे पोशिंदे’, या सुविचारांच्या स्मरणानं त्याचं पोट भरत नाही आणि सरणापुरती लाकडंही पिकत नाहीत. मग शेती करणाऱ्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्याचं आक्रंदन हेलावून टाकतं. तेच ‘तो राजहंस एक’मधून प्रतित होत राहतं...

थाटामाटात वरात निघाली होती. घोड्यावर स्वार नवरदेव एकामागून एक येत होते. वरात मोठी होती. वऱ्हाडी कमी, नवरदेव जास्त होते. ती सामूहिक विवाह सोहळ्याची वरात नव्हती. तो उपवर मुलांचा मोर्चा होता. लग्नाला मुली मिळत नाही म्हणून! हा लक्षवेधी मोर्चा निघाला होता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीकडेही यानिमित्तानं गांभीर्यानं लक्ष वेधलं गेलं; पण शेती कसणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे हा विषय किती ज्वलंत आहे, याची ‘तो राजहंस एक’ हे नाटक पाहिल्यावर केवळ कल्पनाच येत नाही, तर संवेदनशील माणसाचं ह्रदय पीळवटल्याशिवाय राहत नाही.

नाटककार दत्ता पाटील यांनी लिहिलेले ‘तो राजहंस एक’ हे नाटक मुंबई विद्यापीठाच्या ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टतर्फे आयोजित राष्ट्रीय वसंत नाट्य महोत्सवात पाहण्याच्या योग आला. साताऱ्याच्या ‘परिवर्तन’ या संस्थेच्या ‘मानसरंग प्रकल्पां’तर्गत दिग्दर्शक सचिन शिंदे यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. दत्ता पाटील आणि सचिन शिंदे यांच्यासोबतचे एक जबरदस्त नाव म्हणजे प्राजक्त देशमुख. प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शीत ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर अनेक विक्रम रचत आहे. ‘तो राजहंस एक’मध्ये प्राजक्त ज्ञानेशच्या भूमिकेत शिरतो आणि प्रेक्षकाच्या काळजात घर करतो.

ज्ञानेश स्वप्नांच्या आशेवर जगत राहतो. तो कवी आहे. जागतिक कवी होण्याची त्याला आस आहे; पण त्याच्या कवितांना विचारतय कोण? नैसर्गिक न्यायही त्याच्या वाट्याला नाही. काव्यागत न्यायापासून त्याचं जगणं कोसोमैल दूर आहे. परिस्थितीनं त्याला भ्रमित केलंय. अवघा भवतालच संभ्रमित झाला आहे. त्यात तो स्वत:च अस्तित्व शोधतोय. तिशी उलटली आहे. तेहतीसचा झाला आहे. चौतीस मुलींच्या घरचे कांदेपोहे खाऊन उपयोग झालेला नाही. त्याला मुली आवडतात. मुली त्याला नाकारतात. लहान भाऊ सुधीर संसारात रमलाय. बारावी नापास झाल्यावर सुधीरनं मार्केट कमिटीत हमाली वगैरेचं काम धरलं. त्यामुळे कुटुंबात आणि गावात तो महत्वाचा माणूस वाटतो. ज्ञानेश एम.ए. झाला आहे; पण शिक्षकाच्या नोकरीसाठी लाच द्यायला दहा लाख रुपये नाहीत. बाप लाचेसाठी शेतीचा तुकडा विकायला तयार नाही. न कळत्या वयात आई सोडून गेली आहे. कुटुबांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पस्तिसावं स्थळ सांगून आलं आहे. ज्ञानेशला आता कांदेपोह्याचं आकर्षण राहिलं नाही. तरी वडील आणि भावाच्या आग्रहस्तव तो मुलगी बघायला जातो. मधुरा त्याला नुसतीच आवडत नाही; तर ती त्याला भावतेही. तीही सह्रदयी आहे; पण तिचीसुद्धा काही स्वप्नं आहेत. दोघांच्या स्वप्नांच्या प्रवासातून कथासूत्र पुढं जातं. ती त्याच्या स्वप्नांची राणी होते की नाही, तेच तर बघण्यात खरी मजा नाही; वेदना आहे. तरुण शेतकऱ्याचं ते आक्रंदन आहे.

‘तो राजहंस एक’च्या माध्यमातून दत्ता पाटील आपल्या जबरदस्त लेखणीनं शब्दवेदनांचा विस्मयकारक प्रवास घडवून आणतात. अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याची दु:खं किती भव्य असतात, त्याच्या जगण्याचं सबळ कारण शेतीचा तुकडा असतो आणि मरण्याचंही कारण तोच तुकडा असतो. असाच तुकडाधारी शेतकरी- ज्ञानेश आणि त्याचा बाप आत्महत्येच्या सीमेवर उभा आहे. आईनं तर पदरातली कोवळी मुलं सोडून ही सीमा ओलांडली आहे. शेतकऱ्याच्या जगण्याची कल्पना फक्त ‘जगाचा पोशिंदा’ ही भली मोठी उपाधी माहीत असणाऱ्याला, अरेरे हे असंही असतं! असे उद्‌गार काढायला हे नाटक भाग पाडतं.

प्राजक्त देशमुखनं ज्ञानेशच्या भूमिकेत जीव ओतला आहे. त्यासाठी त्यांनं लावलेल्या आवाजानं आपलं काळीज कंपित होतं. प्रेक्षक कानांत आणि डोळ्यांत जीव एकवटून तल्लीनतेनं वेदनेची अनुभूती घेतात. अस्वस्थ होतात. अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याच्या मुलाच्या मानसशास्रीय स्थितीचा वेध घेणारं हे नाटक पाहताना आपणही प्रेक्षक म्हणून स्वत:च्या मन:स्थितीचा ठाव घेऊ लागतो. स्वत:चं अस्तित्व चाचपळून पाहतो. विषय- आशयाच्या परिप्रेक्ष्यात स्वत:चं स्थान शोधू लागतो. शेती आणि मातीशी असलेलं नातं किलकिलं करत शहराची वाट धरून योग्य ते केल्याचं समाधान मानायचं की पळ काढला म्हणून सल बाळगायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. शहरात गेल्यावर आयुष्याची घडी न बसल्यास मात्र अब मैं राशन की क़तारों में नज़र आता हूँ, अपने खेतों से बिछड़ने की सज़ा पाता हूँ या खलील धनतेजवी यांच्या रचनेप्रमाणे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी गत होते.

शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी शेतकऱ्याच्याही मुली मिळत नाहीत. शेतीत पुरेसं पीकत नाही. नोकरी नाही. रोजगार नाही आणि लग्नही जुळत नाही. तरणीबांड पोरं व्यसनाच्या आहारी जातात. दारू, सिगारेट नित्त्याचं होतं. अशा मुलांचा शेतकरी बापही आपल्या मुलीसाठी शेतकरी जावई नको म्हणतो. त्याच्या वाट्याला आलेलं कृषक जीवन तो आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी नाकारतो. शहरातला नोकरी- व्यवसायवाला जावई मिळावा म्हणून तो मुलीच्या लग्नासाठी शेतीचा तुकडा विकण्याच्या तयारीत असतो. त्याला मातीशी नातं तोडायचं असतं, असं नाही; पण शेतीत पिकणाऱ्या दारिद्र्यावर जगण्यासाठी पुढच्या आणखी किती पिढ्यांना मातीत ढकलावं, हा त्याच्या सुप्त मनातला सवाल असतो. ‘सोनं पिकविणारी आपली काळी आई’ आणि ‘आपण आहोत जगाचे पोशिंदे’, या सुविचारांच्या स्मरणानं त्याचं पोट भरत नाही आणि सरणापुरती लाकडंही पिकत नाहीत.

‘शेतकरी’ या शब्दाची आस्मिता राजकीय पटलावर कितीही टोकदार झाली तरी अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याच्या जगण्यात काहीच फरक पडत नाही. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी माल्कम डार्लिंग यांनी 1925 मध्ये शेतकऱ्याच्या दारुण परिस्थितीविषयी असे उद्‌गार काढले होते, भारतीय शेतकरी कर्जबाजारी म्हणूनच जन्माला येतो. कर्जबाजारी म्हणूनच जगतो आणि कर्जबाजारी म्हणूनच त्याचा अंतही होतो. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय पुढं येतो तेव्हा अनेक जण नकारात्मक असतात. काही अर्थतज्ज्ञांना त्यात नैतिक धोकाही दिसतो. कर्जमाफीची सवय लागेल, असं त्यांना वाटतं; पण के. एन. राज यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाचा दृष्टिकोन वेगळा असतो. ते म्हणतात, सरकार रस्त्याच्या विद्युतीकरणावर पैसे खर्च करते आणि जे कोणी या रस्त्याचा वापर करतात ते करदाता असोत अगर नसतो. सर्वांनाच या सेवेचा लाभ मिळतो, याच अर्थाने पाहिले तर कर्जमाफी ही समाज हितासाठी नसून त्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक हितासाठी आहे,से वरकरणी वाटते कारण त्याचा लाभ मुख्यत्वे करून कर्जदाराला होत असतो; परंतु दारिद्र्याने गांजलेल्या कर्जात गळ्यापर्यंत बुडालेल्या एखाद्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी कर्जमाफी देणे, शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाची सोय करणे, ग्रामीण जीवनात स्थैर्य आणणे. या गोष्टींचे सामाजिक लाभही पुष्कळ आहेत. म्हणून कर्जमाफी हे एक अनुदान आणि एक समाजहिताची गोष्ट आहे.

‘तो राजहंस एक’ या नाटकात शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय नाही; पण शेतकऱ्याच्या जगण्याकडे किती अतंर्विरोधातून पाहिले जाते, हे दिसते. शेवटी शेतऱ्याची ‘जात’च दुर्दैवी ठरते आणि त्या दुर्दैवी जातीचा ज्ञानेश प्रतिनिधी असतो. या दुर्दैवी जगण्यात वर्तमानाच्या खोलीत भूतकाळ आणून ठेवला जातो. मग तिथं वर्तमानालाच जागा राहत नाही. सतत एड्यागत सतावणारी जगण्याची त्याची भ्रांत संपत नाही. पहाट होते… शेणकुटाचा वास येऊ लागतो… गाई- बैलांच्या गळ्यातील घुंगरू निनादू लागतात… तो शेतकऱ्यासाठी अर्ल्ट असतो- सोसायटीच्या कर्जाचा हप्त्याची तारीख जवळ आली आहे! हे ज्ञानेश सांगतो तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले  असतात.

शेतऱ्याच्या वेदना जगाला कशा कळत नाहीत किंवा दिसत नाहीत म्हणजे त्या जागतिक का होत नाहीत, हा ज्ञानेशच्या कवितांचा आशय असतो. शेतकऱ्याची दु:खं तो कवितांतून प्रतित करतो; पण शेतकऱ्याच्या पोरानं मनातलं लिहिलं तरीही तो किंवा त्याचं लिखाण जागतिक होत नाही. चार भिंतीआडच्या लैंगिक संबंधांच्या व्हिडिओ क्लिप जागतिक (व्हायरल या अर्थानं) होतात; पण आपली कविता जागतिक होत नाही. नोकरी नाही. रोजगार नाही. शेतात पिकत नाही. आपण केवळ पृथ्वीवरचा पर्यायानं जगावरचा भार आहोत, याची त्याला जाणीव आहे. तरीपण आपण जागतिक का होत नाही, हे ज्ञानेशचं दु:ख आहे. ज्ञानेशचे जीवनमूल्यांविषयीचे विचार स्पष्ट आहेत; पण त्याचं भविष्य पुसट आहे.

ज्ञानेश जगण्यातला विरोधाभासही मांडतो. शेतकरी बाप पोराशी संवाद साधत नाही की त्याला संवाद साधण्याची उसंतच मिळत नाही. संवाद साधण्यात वेळ गेल्यास आहे तेही त्याला गमविण्याची भीती सतावत असावी. ज्ञानेशला मोटार सुरू कर, मोटार बंद कर, पावसाला काय रोग झालाय, यंदासारखं उन उभ्या जन्मात बघितलं नाही एवढाच बापासोबतचा संवाद आठवतो आणि तोच नेहमीचा असतो. ही पृथ्वी माझ्या बापाच्या आणि भावाच्या कष्टानं हिरवीगार झाली आहे, असं तो लिहित असताना त्याचा भाऊ, ‘नवरी नटली आणि सुपारी फुटली’ या गाण्यावर कुठल्याशा तरी मिरवणुकीत नाचत असतो. कविता लिहिणारे नावा पुढं ‘कवी’ लावतात. कोणी ‘डॉक्टर’ लावतो. कुणी ‘ॲडव्होकेट लावतो. मगी मी ‘शेतकरी ज्ञानेश्वर दिलीप गांगुर्डे’ असं लिहिलं तर का नाही चालत. ‘शेतकरी’ शब्दाला मान किंवा जगमान्यता का नाही? हा त्याचा सवाल आहे. इथं भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील एक संवाद आठवतो, खंडेराव, तू शेती करायचं ठरवलं तर नवरा होवू नकोस आणि लग्न करायचं ठरवलं तर शेतकरी होवू नकोस. संपूर्ण नाटकात शेतकऱ्याच्या जगण्याची परवड दत्ता पाटलांनी मांडली आहे. शेतकऱ्याचं जगणं शाप आहे, याची कल्पना ‘हिंदू’तल्याच आणखी एका संवादातून येऊ शकते, अरे मागच्या जन्मात काही पाप केलं अशील नं, तव्हा तं आपुन शेतकरी झालू? ते शिवलीलामृत बी बदलावं लागील भौ- शिवशंबू एकान्तात पार्वतीबरोबर क्रीडा करत असताना एक गंधर्व चुकून त्याच्या खोलीत घुसला. त्याला शाप दिला शंभूनं- जाय, तू महाराष्ट्रात शेतकरी व्हशील. हॉ हॉ हॉ

पार्श्वसंगीत आणि प्राजक्तच्या आवाजातील पार्श्वनिवेदनातूनही ‘तो राजहंस एक’ नाटक थेट ह्रदयाला भिडतं. इथं मात्र प्राजक्तचा आवाज भारदस्त असतो. नेपथ्य फारसं नसलं तरी ते आशयाला गर्भित करतं. प्रकाश योजनेमुळे काही प्रसंग विशेषत: हत्तीचा संदर्भ अधिक आशय संपन्न होतो. नाटकाची भव्यता वाढते. प्रेक्षकांतली अस्वस्थता गडद होते. नाटकात ज्ञानेशशिवाय इतरही पात्र आहेत. बाप आहे. लहान भाऊ आहे. मधुरा आहे आणि त्याला समजून घेणारा मित्र पभ्या आहे. या पात्रांच्या वाट्याला लहानलहान भूमिका आहेत. त्याततला सुपरिचित चेहरा म्हणजे मधुराच्या भूमिकेतील ‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अनिता दाते; पण संपूर्ण नाटकात आणि नाटक संपल्यानंतरही ज्ञानेश डोक्यातून जात नाही. पडता पडल्यावर ज्ञानेशच्या डोक्यातला भुंगा आपल्या डोक्यात शिरतो आणि संवेदनशील माणसाचाही मेंदू पोखरू लागतो. ज्ञानेशनं साकारलेल्या तरुणाच्या काळजाच्या उडणाऱ्या ठिकऱ्या आणि मेंदूचा झालेला भुगा रंगमंचभर इतस्तत: विखुरल्याचा भास खिन्न करतो. ती जादू लेख, दिग्दर्शक आणि प्राजक्तची आहे.

भवतालचा वर्तमान अंधारलेला आहे. भविष्यकाळात हा अंधार अधिक गडत होण्याचा धोका संभवतोय. तो दूर करून शुभ्र आणि नितळ आयुष्य जगण्याची ज्ञानेशला आस आहे. राजहंसासारखी जगण्याला शुभ्रता लाभावी, यासाठी तो सातत्यानं चिंतन करतो. ते चिंतन कवितांतूनही अभिव्यक्त करतो. मानसिकदृष्ट्या बाह्यज्ञानेश संभ्रमित दिसत असला तरी तो आतून राजहंसासारखा शुभ्र आहे. तो सजग आहे. अंधारातून तो उजेडाकडे झेप घेऊ पाहत आहे. त्याला निर्मळ आणि मोकळ्या आकाशात राजहंसारखा मुक्त विहार करायचा आहे. त्यासाठीच त्याची धडपड आहे.      

‘तो राजहंस एक’ची कथा कशी सूचली असावी? हा भल्लाभल्यांना प्रश्न पडतो मराठी, गुजराथी व हिंदी नाटक- चित्रपटातील अभिनेते मनोज जोशींनाही हाच प्रश्न पडला होता. नाटक संपल्यासंपल्या त्यांनी तो थेट दत्ता पाटील यांना विचारला. खरं तर ही कोण्या एका तरुण शेतकऱ्याची कथा नाही; पण लहान शेतकऱ्यांच्या रोजच्याच जगण्याची वेथा आहे. प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवारदेखील ‘तो राजहंस एक’ हे नाटक पाहण्यासाठी आले होते. हजारो वर्षांच्या परंपरांच विघटन होतानाचा पट यात मांडलायं. या नाटकातून काही तरी भव्य प्रतित होते. ते एकदा पाहून संपूर्णपणे कळणार नाही.

-डॉ. जगदीश मोरे

2 comments: