Wednesday, 22 March 2023

वसंत ऋतू

 

गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा

         वसंताच्या पुष्पोत्सवात न्हालेल्या चैत्रानं आपल्या आयुष्याच्या ओंजळीत आज आणखी एका नवीन वर्षाचं आणि सृजनशीलतेचं दान टाकलं. दानाच्याबाबतीत तो कधीच कसूर करत नाही; पण गेल्या वर्षाच्या आधीची दोन वर्षे आपल्याला आपली ओंजळ भरून घेता आली नव्हती. एका अदृष्य भयाणूणं माणसाच्या जगण्याच्या मूलभूत प्रेरणेलाच आव्हान दिलं होतं. ओंजळीचं काय अनेकांचं जगणंच त्यानं रितं केलं होतं. अनेक कुटुंबांचे आधारवड डोळ्यांदेखत कोसळले होते. काही कुटुंब निष्पर्ण झाले होते. कोरोनाची पहिली लाट तीन वर्षांपूर्वी वसंत ऋतूच्या सोबतच आली होती. दोन वर्षांपूर्वीची दुसरी लाटदेखील वसंताच्या हातात हात घेऊनच आली होती. ती फारच जीवघेणी होती. कोरोनासुद्धा चैत्रासारखा वसंतसखा भासू लागला होता.

चैत्रपालवी वसंताचा सांगावा घेऊन येते. दोन वर्षे वसंत कोरोनाचा सांगावा घेऊन येत होता. म्हणून गेल्या वर्षी माघातली पानगळ वसंताची चाहूल देत असताना मनात धडकी भरत होती. उघडीबोडकी झाडं भीषणतेचा इशारा करत होती. वसंतानं आपला नवा सखा सोबत आणू नये, हीच प्रार्थना हाती. ती स्वीकार झाली. वसंत एकटाच आला होता. कोरोनाची काजळी फिटू पाहत होती. यंदा तर ती पूर्णपणे निवळली आहे. आता कोरोनाला तीन वर्षे लोटली आहेत. कोरोनापूर्व काळ प्रस्थापित झाला आहे. त्यानं माणसं हिरावल्याच्या वेदना ताज्याच आहेत.

वसंत तोंडावर आला असताना यंदा मात्र पौषातलं धुकं माघच काय फाल्गुनाच्या शेवटापर्यंतही संपायचं नाव घेत नव्हतं. त्याला धुकं तरी कसं म्हणावं? ती प्रदूषणाची काजळी होती. त्यात ऐन फाल्गुनात कुठल्याशा तरी तापानं यंदा पुन्हा कोविळकाळाचं स्मरण करून द्यायला सुरुवात केली होती. मास्क वापरण्याचे सल्ले दिले जाऊ लागले होते. लोकांनी दुर्लक्ष केलं. तो भाग अलाहिदा. धुकं मात्र कायम होतं. बहरणाऱ्या वसंताला ते नजर लावेल की काय ही भीती होती. वसंताच्या आगमनाच्या एक दिवस आधी प्रभातवेळी मुंबई परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धुकं वाहून गेलं. झाडंझुडपं धुऊन निघाली. सिमेंटचं जंगल म्हणजे शहरं ‘स्वच्छ व सुंदर’ झाली. वसंताची आणि गुढीपाडव्याची पहाट निरामय आसमंत घेऊन आली. प्रदूषणाचं मळभ दूर झालं आणि प्रदूषणात दिल्लीच्या पुढं जाऊ पाहणारी मुंबई माघारी आली. फोटो टिपण्याचा मोह आवरता आला नाही. इतकं स्वच्छ वातावरणाचं दान वसंतानं पहिल्याचं दिवशी दिलं.

निसर्ग तोच आहे. पण आता आमचे जीवन शहरी झाले आहे. जीवनाचे उद्दिष्टेही बदलू पाहते आहे. तरीपण एवढे खरे की कुठे गवातचे पात हलू दे, अद्याप ते आमच्या डोळ्यांना रिझवते. सांजसकाळचे पूर्वपश्चिमेचे रंग सुखदायक वाटतात. वाऱ्याची झुळूक अपूर्व स्पर्शसुख देते. पावसाच्या सरी अजूनही कानांत काळाचे अनादी गूढ कवन ओततात, हे दुर्गा भागवातांचे शब्द कालच्या जगण्याची आठवण करून देतात. अवकाळी पावसानं शहरी वसंत अधिक अल्हाददायक केला असला तरी शेतकऱ्याच्या जीवनात त्यानं पुन्हा पानगळ आणली आहे. पाऊस वेळेवर कोसळतो तेव्हा शेतकऱ्याला ताट मानेनं जगण्यासाठी तोच उभा करतो. अवकाळी कोसळण्यानं त्याचं जगणं उघडंबोडकं झालं. वसंताचं सौंदर्य खुलवणाऱ्या या शहरी पावसाचं किती कौतुक करावं? हा सवाल आहे. खरोखर आपल्या जीवनाची उदिष्टे बदलल्याची, ही साक्ष आहे. आपण प्रदूषण करतो आणि निसर्गाला धुवायला सांगतो. अवकाळी पाऊस कोसळतो तेव्हा बळीराजाचं जगणं वाहून जातं आणि अवकाळी पावसानंही अत्तराचे भाव कोसळतात का? अशा पोस्टी समाजमाध्यमांवर डकवतो.

पौष महिन्यातील म्हणजे हिवळ्यातील धुकं माघात ओसरू लागतं, हा निसर्ग नियम आहे. नद्यासुद्धा आता बारमाही वाहत नाहीत; पण प्रदूषणरुपी धुकं बारमाही राहतं. पाऊस आल्यावर ते थोडेफार कमी होतं. ऋतुचक्रातला हा बदल आहे. आपण त्याला जबाबदार आहोत. दुर्गा भागवतांनीच वर्णन केलेला एक प्रसंग इथं आणखी एक उदाहरण म्हणून सांगता येईल. अश्विनात एखादी पावसाची झड आली की दुसऱ्या दिवशी दुपारी उन्हात भाताच्या शेताजवळून जा. भाताचा सुवास वातावरणात कोंदलेला आढळेल. या दिवसांत मुंबई ते कल्याण एकदा तरी मी जाते. आणि ठाणे ते मुंब्रा भात- शेते रेल्वे लाईनजवळ पसरलेली असतात, त्यांचा दरवळणारा गंध गाडीत बसूनच हुंगण्याची मजा अनुभवते. वळवाचा पाऊस आला की मातीचा सुवास जसा उत्तेजक वाटतो तसाच हा शेतातल्या भाताच्या गंध. ‘ऋतुचक्र’ या पुस्तकातील या ओळी आहेत. आश्विनात आता मुंबई किंवा ठाण्याहून कल्याणला जाता- येताना हे आठवून पाहा. भलतीच अनुभूती येईल. कारण दुर्गा भागवतांनी केलेलं वर्णन 1956 मधील आहे. माणसानं आता निसर्ग पार बदलूनच टाकला आहे. रेल्वेलाईन लगत केवळ झोपड्या आणि एखादं दुसरं टॉवर नजरेस पडतं. आपण पालकात पनीर टाकून तृप्तीचे ढेकर देतो. तो पालक ट्रॅकलगतच्या रिकाम्या जागेवर गटारीच्या पाण्यावर पिकतो. मुळा आणि भेंडी तर फेमसच आहे. बाकी आश्विनात भाताच्या गंधाऐवजी सांडपाण्याचा दरवळ नक्कीच जाणवतो.

असो! आपला विषय वसंत ऋतूचा आहे; पण यास वसंत तरी कसा अपवाद राहणार! तरीही वसंत सृजनशीलतेची प्रेरणा देतो. निसर्गानंच नित्यनियमाप्रमाणे कालपरवा नागडीउघडी केलीली झाडंझुडपं आज पुन्हा हिरवाईनं नटली आहेत. म्हणून वसंत जगण्याला बळ देतो. कोसळल्यावर पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो. सध्याचं बहरलेलं पुष्पवैभव चैत्रातल्या उन्हातही शीतलता देतं. बेबंधपणे निसर्ग खुलला आहे. रंगांची उधळण आहे. झाडाची शीतल सावली पसरली आहे. त्याचवेळी झाडाला वरून न्याहळण्याचीसुद्धा सोय शहरात असते. टॉवरच्या खिडकीतून नजर फिरवली तर झाडांचं विहंगम सौंदर्य नजरेत भरू लागतं. त्यासाठी वेगळ्या ‘दृष्टी’ची गरच नाही. फक्त डोळे उघडे करून बघता यायला हवं. ते महानगरांतही कमीअधिक दिसतं.  

यंदाचं हे मराठी नवीन वर्ष कोरोनाप्रमाणे सर्वच निर्बंधांपासून मुक्ती देणारं आणि नवी उमेद जागविणारं ठरावं. आपल्या सगळ्यांच्या नवोन्मेषी कल्पनांना वसंतातल्या पुष्पभारासारखा बहार येवो. आपल्या यशाची गुढी गगणाला भिडो. कीर्तीचा गोडवा श्रीखंडासारखा प्रत्येकाच्या मुखी नांदो, याच सदिच्छा!

गुढीपाडव्याच्या पुन:श्च आनंददायी शुभेच्छा!!

                                                                                                                              -डॉ. जगदीश मोरे.


No comments:

Post a Comment