Friday, 14 October 2022

उदाहरणार्थ ‘पांडुरंगा’चं दर्शन वगैरे! (#नेमाडे/ #Nemade)

उदाहरणार्थ ‘पांडुरंगा’चं दर्शन वगैरे!

अमूक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलेच पाहिजे, असे आजचे भाबडे साहित्यशास्र सांगते. हे शास्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे कळते. कळले तरी आपण कुठे त्यात बसतो. बरं, आपण काही दररोज लिहित नाही आणि लेखक तर मुळीच नाही. ‘लेखकराव’ तर माहीतच नाही. शिवाय फेसबुक वगैरेंवर पोस्टी दररोज डकवत नाही. म्हणून तर उद्याच्या ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त हा लेख लिहिला...

उदाहरणार्थ ‘वाचन प्रेरणा दिना’च्या शुभेच्छा देताना ‘पांडुरंगा’च्या भेटीतून मिळालेल्या प्रेरणेबाबत वगैरे मला काही तरी शेअर करायचे आहे... 

तुमच्या लक्षात आलेच असेल. पांडुरंग सांगवीकर आठवलाही असेल!

तुम्हाला वगैरे सांगण्यारखं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे सराची बऱ्याच दिवसानंतर नुकतीच भेट झाली. कोरोनापश्चात ही पहिलीच भेट. कोरोनापूर्वी नेमाडे सरांना बऱ्याचदा भेटण्याचा योग आला आहे. त्यांच्याशी गप्पा म्हणजे आपण समृद्ध होत जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून दडपण येते; पण माणूस अतिशय प्रेमळ आणि गप्पावेल्हाळ. विविध विषयांवरील त्यांची परखड मते वाचनाची प्रेरणा देत असतात. प्रत्येक भेटीनंतर आपल्या शिदोरीत नवीन प्रेरणा आणि ऊर्जेचा संचय होतो. त्याच भेटीत त्यांचे सारथ्य करण्याचा योग लाभणे आणखीच आनंददायी-  लाभले भाग्य करतो सारथ्य!

            मी वांद्रा येथे राहत असताना विविध कारणांमुळे ने सरांकडे जाणे होत असे. पंधरा दिवसांपूर्वी सरांकडे जाताना माझ्याकडील त्यांची सर्व पुस्तके मी घेऊन गेलो. मला त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या होत्या. कोणतेही पुस्तक वाचताना पुस्तकावरच अनेक ठिकाणी अधोरेखित किंवा त्याबाबत दोन- चार शब्दांत काही तरी लिहून ठेवण्याची माझी सवय आहे. त्यांच्या पुस्तकांवरही अशाच खाणाखुणा व वाचताना जो विचार आला असेल ते लिहून ठेवलेले होते. त्यावर सरांची नजर गेली. ते मिश्किलपणे म्हणाले, यात माझ्या साहित्याची एक चांगली समीक्षा दडली असावी. मिश्किलता लक्षात घेऊनही सरांची ही टिप्पणी माझ्या अंगावर मूठभर मास चढविणारी होती.

सर, माझ्याकडे ‘मेलडी’ व ‘देखणी’ हे काव्यसंग्रह आणि ‘सोळा भाषणे’ ही पुस्तके नाहीत, ते स्वाक्षऱ्या करत असताना मी म्हणालो.

थांब! गेल्या आठवड्यातच ‘सोळा भाषणे’ची तिसरी आवृत्ती आली. तुला एक प्रत देतो, असे म्हणत लगेचच आतून त्यांनी नवीकोरी प्रत स्वाक्षरी करून मला दिली.

काव्यसंग्रहाच्या प्रती आता नाहीत. लवकरच एकत्रित काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. त्यात सर्व कविता असतील. आल्या- आल्या त्याची प्रत तुला नक्की देईन, असे सांगत त्यांनी त्यांच्या ठेवणीतील मेलडी’ व ‘देखणी’च्या प्रती आवर्जून दाखविल्या.

नेमाडे सरांनी त्यांच्या सर्व पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीच्या प्रती क्रमवार जपल्या आहेत. त्यांची खोली ‘टॉप टू बॉटम’ आणि चौफेर भरगच्च पुस्तकांनी भरली आहे. औरंगाबादमध्ये असताना त्यांनी स्वत: ‘वाचा’ नावाची प्रकाशन संस्था काढली होती. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, मनोहर ओक, वसंत दत्तात्रय गुर्जर, तुलसी परब, सतीश काळसेकर आदींचे साहित्यही त्यांनी प्रकाशित केले होते. ते सर्व बघता- चाळता आले. त्यांच्या खजिन्यातली ‘कोसला’च्या पहिल्या आवृत्तीची पहिली प्रतही चाळली. सप्टेंबर 1963 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोसलाची किंमत होती दहा रुपये. 

नेमाडे सरांच्या घरी साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेत असताना ‘ललित’च्या जून 2015 च्या अंकात वाचलेला लेख आठवला- साठोत्तर कालखंडात लघुअनियतकालिकांची चळवळ फोफावली होती. नेमाडे सरही त्यात सक्रीय होते. एकदा ते प्रकाशक रा. ज. देशमुख यांना भेटले होते. त्यांना म्हणाले, खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसांत सहज लिहिता येईल.

असं मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. एकतरी असं पुस्तक तुम्ही लिहून दाखवा, असे आव्हान देशमुखांनी दिले. नेमाडे सरांनी ते सहजपणे स्वीकारले आणि अभूतपूर्व युगप्रवर्तक ‘कोसला’ जन्मली.

कोसला’नंतर ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबऱ्या आल्या. ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ ही अलीकडची बहुप्रतीक्षित कादंबरी. पाच- सहा वर्षांपूर्वी मी कोसला पुन्हा वाचली. कोसलाच्या नायकाचे- पांडुरंग सांगवीकरचे विश्व अधिक भावते. पांडुरंग खानदेशातून पुण्यात शिकायला जातो. मी पुण्यात ‘रानडे इन्स्टिट्यूट’ येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर सांगवीकर अधिक आपला वाटू लागला होता.

बिढार, हूल, जरीला आणि झूलचा नायक चांगदेव पाटीलही आपल्या गावशिवारातला असल्यासारखा भावतो. या चारही कादंबऱ्या ‘चांगदेव चतुष्ट्य’ म्हणून ओळखल्या जातात. नेमाडे सर स्वाक्षऱ्या करत असताना हे सगळे आठवू लागले.

चांगदेव चतुष्ट्यकातील झूलमध्ये नामदेव भोळे भेटतो. नामदेव भोळेचा स्वगतासारखा परिच्छेद झूलच्या पहिल्याच पृष्ठावर आहे, परवा आईच्या अस्थी नर्मदेत सोडताना आपण हिंदू धर्माच्या लाखो पिढ्यांच्या परंपरेतले एक सनातन धर्माभिमान आहोत, असं त्याला वाटलं. आपला सगळा बुद्धिवाद, नास्तिक तत्त्वज्ञान, पाश्चात शास्त्राचं अध्ययन अध्यापन- सगळं ढोंग तर नाही ना असं त्याला वाटून गेलं.

भोळेचं हे चिंतन आपल्याच जगण्यातली विसंगती दाखवते, असे भासत राहते. भोळेबद्दल नेमाडे सरांना विचारताच ते म्हणाले, भोळेलाच हिंदूचा नायक करायचे होते; पण त्याचे व्यक्तिमत्व हिंदूचा पट मांडताना सूट झाले नसते. शिवाय चांगदेव चतुष्ट्यकासारखं ‘खंडेराव चतुष्ट्य’ डोक्यात होतं.

मी हिंदू पहिल्यांदा वाचायला घेतली. तीस- चाळीस पृष्ठानंतर बाजूला ठेवली. कठीण वाटली. काही कालावधीनंतर पुन्हा घेतली आणि कष्टपूर्वक वाचली. त्यातला एक संवाद मनाला भिडतो, खंडेराव, तू शेती करायचं ठरवलं तर नवरा होऊ नकोस आणि लग्न करायचं ठरवलं तर शेतकरी होऊ नकोस.

खंडेराव विविध प्रश्नांच्या भोवऱ्यात फिरत असताना ‘आपली नेमकी ओळख काय?’ हा प्रश्न त्याला व्यापक संस्कृतीशोधाकडे नेतो. नेमाडे सरांचे समग्र वाङ्मय वाचल्यावर खंडेरावच्या संस्कृतीशोधाचा अंदाज येतो.

हिंदूच्या दुसऱ्या भागाचा मसुदा सहा- सात वर्षांपूर्वीच झाला होता; परंतु देशातील सामाजिक, राजकीय संदर्भ बदलल्याने त्यात पुन्हा बदल करणे आवश्यक झाले, हे नेमाडे सरांनीच एकदा सांगतिले होते.

कुठलाही वेगळा संदर्भ किंवा मुद्दा आठवला की तो ते मोजक्या शब्दांत चिठोऱ्यावर लिहून ठेवतात. उदा. त्यांनी एक चिठोरे दाखविले. त्यावर ‘पांडुरंग काळा? पांडुरपुरचा? दगडाहून वीट मऊ’ लिहिले होते.

असे का? मी उत्सुकता म्हणून विचारले.

पाडुंरंग विटेवरच का उभा राहिला असावा? त्यावरून पुढे काही तरी सूचेल. ते आतापासून डोक्यात राहील,

दगड आणि विटेची तुलना नेहमची होते; पण नेमाडे सर त्यांच्या शैलीत नक्कीच त्याबाबत कुठल्यातरी साहित्यकृतीत भाष्य करतील आणि ते आपल्याला वाचायला मिळेल.

नेमाडे सरांच्या देशीवादाबाबत काहीजणांचे आक्षेपही असतात. आपण मुदलात देशी असल्याशिवाय वैश्विक होऊ शकत नाही, ही भूमिका त्यांच्या देशीवादाच्या मांडणीतून प्रकट होते. देशी परंपरेचे भान राखणारे कुठल्याही लेखकाचे लेखन श्रेष्ठ ठरेल, असे त्यांना वाटते. वैश्विकतेच्या नावाखाली निव्वळ इंग्लड, अमेरिकेचे नियम पाळणे ही सर्व बौद्धिक क्षेत्रातही वसाहतवाद चालू ठेवण्याची लक्षणं आहेत, असे त्यांनी ऑक्टोबर 1998 मध्ये दिल्लीत केलेल्या एका भाषणात म्हटले होते.

आपली देशी मूल्ये ही जगातल्या आधुनिकतेत दिसणारी पोकळी भरून काढायला पूर्ण सक्षम आहेत, असेही त्यांनी याच भाषणात नमूद केले होते. हा सगळा तपशील ‘सोळा भाषणे’ या पुस्तकातील ‘देशीवाद आणि आधुनिकता’ या प्रकरणात आहे.

नेमाडे सरांसारख्या व्यक्तीची भेट झाल्यावर फोटो काढणे हे ‘शास्र’ असते. फोटोसह काही शब्द लिहून फेसबुवर टाकणे ‘महाशास्र’ असते. मग आपणही ही परंपरा पुढे नेली पाहिजे. त्यासाठी लिहावे की नाही, असे स्वत:लाच विचारून घेतले.

हो! उत्तर येताच हा प्रपंच थाटला.

नेमाडे सरांनी ‘टीकास्वयंवर’मध्ये ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?’ हे सांगितले आहे. त्यातला आणखी तपशील म्हणजे, अमूक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलेच पाहिजे, असे आजचे भाबडे साहित्यशास्र सांगते.

हे शाहित्याचे शास्र आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कुठे कळते. कळले तरी आपण कुठे त्यात बसतो. बरं, आपण काही दररोज लिहित नाही आणि लेखक तर मुळीच नाही. लेखकराव तर दूरचा पल्ला आहे. शिवाय फेसबूक वगैरेवर दररोज पोस्टी डकवत नाही. म्हणून मी हा लेख लिहिला. उद्या वाचन प्रेरणा दिनाच्या पोस्टींचा पूर येईल. त्यात आपली पोस्ट वाहून जाईल. त्यामुळे आजच या दिनाच्या पूर्वसंध्येला पोस्ट डकवली. आणि हो! तुम्ही ती संपूर्ण वाचली. तुमचे आभार वगैरे.

उदाहरणार्थ तुर्तास एवढेच!

                                                                                                                              -जगदीश मोरे


5 comments:

  1. खूप छान लेख 👌

    ReplyDelete
  2. लिहीत राहा जगदीश - shekhar P

    ReplyDelete
  3. धन्यवाद काका

    ReplyDelete
  4. छानच

    ReplyDelete
  5. खूप छान

    ReplyDelete