उपेक्षित भाद्रपद
साधारणत: दोन आठवड्यापूर्वी दुपारच्या सुमारास बाहेर
डोकावलं. इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. पावसानं आवरतं घेतल्याचं जाणवलं. ऊन
पावसाच्या खेळात ऊन्हाचीच जास्त सरशी होती. कधी लख्ख प्रकाश तर कधी दाटून आलेली
अभ्रं. गावाकडंचं जिनिंग प्रेसिंग मीलचं आवार आठवलं. इथं मात्र आख्खं आभाळचं
कापसाच्या ढिगानं व्यापलं होतं. काळ्या, पांढऱ्या, राखाडी रंगाच्या मेंढ्यांचे कळपही दिसत होते. भाद्रपद
आकाशात मर्यादित रंग खेळत होता. आकाश मोकळं होऊ पाहत असल्याचं ते लक्षण होतं. कृषक
जीवनासाठी ती मंगलमय चाहूल होती. सुगी जवळ आली.
धनधान्याच्या राशी सजतील. ओसरीतला कापसाचा ढीग कलेकलेनं वाढत जाईल. भाव घसरत जाईल.
सर्वपित्रीनंतर आता हळूहळू आकाश चकाकू लागलं आहे. पित्र
तृप्त झाले असावेत. आश्विनच्या आगमनानं ढग बहुरुप्यासारखी सोंगं बदलत आहे. आकाशात
लखलखणाऱ्या सोनेरी- रुपेरी तारकांसह तांबूस तारेही दिसू लागले आहेत. अधून- मधून
सायंकाळी विजाही कडाडतात. ढग कधीही झपकन येऊन दोन- चार थेंब शिंपडून जातात. दिवसा
उष्मा आणि रात्री गारवा. ऑक्टोबर हिटचा हा सांगावा. ढगा आडूनही ऊन प्रभाव दाखवतं.
ढगांची ती तक्रारच नाही. हेच ऊन त्यांना रुपेरी बनवते. कांचनच्या झाडाला रंगीबेरंगी
फुलांचा बहर येण्याचाही हाच काळ आणि आपट्याचं झाड समजून सोन्यासाठी त्यांची पानं
ओरबाळण्याचीदेखील हीच ती वेळ. तोच तो दसरा!
मुंबई - ठाण्यात ठिकठिकाणी मैदानांवर- रस्त्यांवर विविध
मंडळांच्या, गटांच्या देव्या विराजमान झाल्या आहेत. भाविक दर्शनासाठी
गर्दी करू लागले आहेत. सायंकाळी स्टेशनवरून रिक्षेत बसलो तरी आरामात देवी
देर्शनाचं पुण्य लाभतं. रिक्षा मुंगीच्या पावलानं मार्गक्रमण करते. काही लोक उगीचच
विविध रस्ते बंद केल्यानं वाहतूकीची कोंडी झाल्याच्या तक्रारी करतात. दांडिया
उत्तरोत्तर रंगू लागतो. ‘गोंगाट- दणदणाटा’चाही लोक आनंद लूटतात. लोकलच्या
फलाटापासून डब्बा आणि कार्यालयापर्यंत दररोज एकसारखा रंग दिसतोय. निसर्ग बेशिस्तीत
मर्यादित रंग उधळत असताना शिस्तप्रिय बायकांचं रंग प्रदर्शन लोभस आहे. अलीकडे
बऱ्याच लोकलमधील ‘व्हिडिओ कोच’ची सुविधा रेल्वेनं काढून घेतली आहे; पण हा कुणावरही अन्याय नाही. फक्त एकाच रंगाच्या वेगवेगळ्या
छटा न्याहाळता येत नाहीत, एवढंच!
आश्विनचं स्वागत दमदार झालं आहे; पण भाद्रपद येऊन गेल्याचं कळलं नाही. तसंही भाद्रपद कधी
येतो- जातो ते मोठ्या शहरांत कळत नाही. श्रावणाचं मात्र केवढं कौतुक होतं. श्रावण
पाळल्याचे ढोल बडविले जातात. न पाळणाराही अभिमाने सांगतो. विषय श्रावणाचा नाहीच
आहे. भाद्रपदाचा आहे. तो मात्र उपेक्षितच राहतो.
भाद्रपद आला की गाव- खेड्यांत पटकन कळतं. कुत्रे दिसू लागतात. पदोपदी
भाद्रपद. शहरातल्या ‘डॉगीं’ना भाद्रपदाचं अप्रूप काय! ‘स्ट्रिट डॉग’ तर अनेकांना नकोच
असतात. असलेच तर बळजबरीनं माणसं त्यांची नसबंदी करतात. प्राणीवत्सल लोक ‘स्ट्रिट
डॉग’ना शेजारच्या इमारतीजवळ किंवा घराजवळ जाऊन बिस्किट घालतात. अशा लोकांना दूष्ट लोक
पाठिमागं शिव्यांची लाखोली वाहतात.
मुंबईसारख्या शहरात ‘बँडस्टॅंड’ अथवा ‘मरिन ड्राईव्ह’वर भाद्रपद असो अथवा वैशाख वणवा, हमखास गर्दी असते. गुलुगुलु गप्पा असतात. वर्षा ऋतूत तर नजाकतच वेगळी असते. सोबतीला छत्रीचे छत दोघांसाठी पुरेसे असते; पण काही जणांना नाही आडत हे. संस्कृती रक्षणाची नेहमी त्या बिचाऱ्यांनीच का चिंता वाहावी? अगदी ‘व्हॅलेंटाईन डे’लाही त्यांनी तरुणाईला हुसकावून पाहिले होते. आता मात्र त्यांनाही आला असेल कंटाळा!
असो! भाद्रपद
सरला आहे. आश्विनचे बरेच दिवस अजून उरले आहेत. दसरा गेला की दिवाळी आहेच!
-जगदीश मोरे
No comments:
Post a Comment