Saturday, 12 April 2014

गुरुवर्य संजय कुलकर्णी

दाभोळ येथे स्टडी टूरसाठी निघालेली रानडे इंन्स्टिट्यूटमधील (पुणे विद्यापीठ) 1997-98 ची एमसीजेची बँच. डावीकडून स्व. संजय कुलकर्णी, बिमल शर्मा (आसाम), ऋषिकेश देशपांडे (वाई), डॉ. अभ्युदय रेळेकर (कराड), योगिराज करे (सोलापूर),  सचिन शर्मा (बडोदा), मृणाल सप्रे (मध्य प्रदेश), जगदीश मोरे, अनिता (केरळ), आयशा खान (बडोदा), भक्ती चपळगावकर (औरंगाबाद).  
ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी यांचे पुण्यात नुकतेच निधन झाले. पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये 1997-98मध्ये एमसीजेला असताना श्री. कुलकर्णीही आमच्यासोबत होते. त्यांनी दै. ‘केसरीत मला कामाची संधी दिली. तिथूनच माझ्या पहिल्या नोकरीची सुरवात झाली. त्यासह अनेक आठवणींचे आज स्मरण होत आहे...
 पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये एमसीजेला प्रवेश घेतल्यानंतर श्री. संजय कुलकर्णी यांच्याशी परिचय झाला. तेसंजय दिनकरया नावानेच जास्त परिचित होते. त्याच नावाने लिखाणही करायचे. त्यांनीही एमसीजेला प्रवेश घेतला होता. ते आमच्या सर्वांपेक्षा वयाने, अनुभवाने आणि सर्वाथाने ज्येष्ठ होते. ‘महाराष्ट्र हेरॉल्डचे संपादक विजय लेले आणि त्रिनिदादच्या नागरिक श्रीमती इंद्रायणी हे ज्येष्ठ पत्रकारही एमसीजेला आमच्या सोबत होते. संजय दिनकर यांच्याशी मात्र खऱ्या अर्थाने आम्हा विद्यार्थ्यांचे सूर जुळले होते. आपण सगळ्यांपेक्षा वयाने अनुभवाने ज्येष्ठ आहोत, असा कधीही त्यांचा आविर्भाव नसायचा.
दै. ‘केसरीमध्ये ते प्रदीर्घ काळापासून पत्रकारिता करीत होते. ‘सांज केसरीसुरू झाल्यानंतर त्यांच्यावर या दैनिकांच्या संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली होती. सांज केसरी दुपारी प्रसिद्ध होत असल्यामुळे ते सकाळी सातच्या आत केसरी वाड्यात येत असत. अंक फायनल करून पहिल्या लेक्चरपासून रानडेत उपस्थित रहायचे. अनेक वर्षे पत्रकारितेत असल्यामुळे तुम्हाला लेक्चरमध्ये नवीन काही जाणवत नसेल ना?, असं आम्ही त्यांना विचारत असू. त्यावर ते म्हणायचे, मी इथं विद्यार्थी आहे, पत्रकार नव्हे. विद्यार्थी नेहमीच शिकत असतो. मलाही विद्यार्थ्यांचं कर्तव्य पार पाडणं आवश्यकच आहे.
माझे ते पुण्यातले दुसरे वर्ष होते. थेट गावातून पुण्यात आलो होतो. पहिले वर्ष भांबावलेल्या स्थितीच गेले. तरीही बरेच काही शिकता आले; पण कमविण्यास सुरवात झाली नव्हती. ‘रिपोर्टिंगपासूनमार्केटिंगपर्यंत कुठल्याशा तरी अर्धवेळ कामाच्या शोधात होतो. वडिलांवर शिक्षणाचा आणखी भार टाकणे अशक्य होते. त्यांनी आधीच खूप काही सोसले होते. माझी कमाईची शोधाशो लक्षात आल्यावर संजय सरांनी विचारले, सांज केसरीत अर्धवेळ उपसंपादक म्हणून काम करणार का?
संजय सराच्या या ऑफरने उपकृत झालो. मी कामाला शोधत होतो. कामच माझ्यापर्यंत आले. तीन-चारशे रुपये ठोक मानधन आणि कॉलम सेंटीमीटरनुसार होईल तेवढी अन्य रक्कम मिळेल, असे संजय सरांनी सांगितले. प्रचंड आनंद झाला. नोकरी मिळाल्याचे गावी पत्राने (गावात कुणाकडेही दूरध्वनी नव्हता) कळविले. मुलगा कुठे तरी चिकटल्याचा आई- वडिलांना आनंद झाला. 
पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मी राहत असे. सजंय आवटे, विक्रांत पाटील, राजाराम कानतोडे, योगिराज करे आदी मित्रही वसतिगृहातच असायचे. संजय आवटे आणि विक्रांत पाटील यांनी सांज केसरीत आधी काम केले होते. मी पहिल्यांदाच नोकरी करणार होती. त्यामुळे त्या दोघांकडून कामाविषयी माहिती करून घेतली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील जुना मित्र संतोष कुलकर्णी सांज केसरीत भेटला. वसतिगृहातून सकाळी लवकर निघून पीएमटी बसने डेक्कन आणि तिथून चालत सातपर्यंत केसरीवाड्यात पोहोचायचे. हिंदी, इंग्रजीतल्या छोट्याछोट्या चटपटीत बातम्याची भाषांतर करणे, हेच मुख्य काम. कधी-कधी सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणायलाही संजय सर सांगाचे. गॅसदर वाढ झाली की गृहिणींच्या प्रतिक्रिया, कांदे महागले की ग्राहकांच्या प्रतिक्रिया, बसभाडे वाढले की प्रवाशांच्या प्रतिक्रिया आणि सोबत वाचकाचे छायाचित्र नक्की असायचे. यातूनही बातमी लेखनाचे धडे मिळत होते.
स्व. संजय कुलकर्णी यांनी एमसीजेच्या सर्व विद्यार्थ्यांना केसरी वाडा पाहण्यासाठी बोलविले असताना दै. केसरीचे संपादक श्री. अरविंद गोखले यांच्याशी सर्वांचा परियच करून दिला. त्या दिवशी मदर तेरेसा यांच्या निधनाच्या बातमीचे बँनर होते. 
पहिल्याच पंधरा दिवसांत डिझेलची दरवाढ झाल्यावर रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया आणायला संजय सरांनी सांगितले होते. त्या लिहून दिल्या. काम आटोपून लेक्चरसाठी रानडेत गेलो. संजय सरही होते. दुपारी सांज केसरी आला. पहिल्याच पानावर त्या प्रतिक्रियांना माझी बायलाईन होती. ती आमच्या सर्व वर्ग मित्रांना संजय सरांनी कौतूकाने दाखविली. खरं तर ते अंत्यत किरकोळ काम होतं. बायलाईनच्या पात्रतेचे तर मुळीच नव्हते. मला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हेतू होता.       
बातमी लिहायला शिकवण्यापासून शीर्षक देण्यापर्यंत आणि तिच्यावर संस्कार करण्याचे संस्कार त्यांनी आमच्यावर केले. सांज दैनिकाला साजेशी शीर्षके देण्यात संजय सरांचा हातखंडा होता. शीर्षकावरून वाचकाला बातमी वाचण्याची इच्छा झाली पाहिजे. शिवाय बातमी चुरचुरीत आणि आटोपशीर पाहिजे, असे ते आम्हाला सतत सांगत असत. चटपटीत चुरचुरीत करण्याच्या नादात सांज केसरी संध्याकाळच्या आनंदसारखा होऊ नये, यावर त्यांचा कटाक्ष असायचा.
संजय सरांच्या प्रोत्साहनातून मात्र शिकायलाही मिळाले. दोन पैसेही मिळू लागले. शिक्षणाचा खर्चही भागू लागला. एमसीजे सुरू होतेच. केसरीवाड्यातून रानडेतल्या पहिल्या लेक्चरला वेळेवर पोहोचण्यात बऱ्याच वेळा पाच-दहा मिनिटे उशीर व्हायचा. ते लेक्चर चळवळीतील एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार घ्याचे. नेहमीच उशीर करतो म्हणून वेळेवर आला तरच लेक्चरला बसायचे, अशी त्यांनी मला तंबीच दिली. ते ऐकून, तू माझ्यासोबतच स्कुटरने रानडेत येत जा, असे सांगितले. माझी चांगलीच सोय झाली.
सांज केसरीतला पहिला पगार हजार-अकराशे रुपये मिळाला. त्यातून सहाशे रुपयांची जुनी सायकल घेतल्याचे संजय सरांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, शक्य असल्यास तू आणखी एक काम करु शकतोस. सकाळी लवकर जाऊन पोलिस आयुक्तालयातून प्रसिद्धिपत्रके आणत जा. तुझे कॉलम सेंटिमीटर वाढतील. क्षणाचाही विलंब करता मी हो म्हणालो आणि महिन्याभरात पगारात वाढ दिसली.
संजय सरांचा स्वभाव अतिशय मदतशील होता. आमच्यासारख्या नवख्या आणि शिक्या पत्रकारांना ते नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. सिनेमा, नाटक हे त्यांच्या आवडीचे विषय होते. चित्रपटविषयक लेखन आणि क्षमीक्षणाबाबत त्यांची ख्याती होती. अचार्य अत्रे यांच्यावरीलझंझावत’, ‘असे चित्रपट अशा आठवणी’, ‘बंटी दी ग्रेटआणिनगरवधूही पुस्तकेही त्यांनी लिहिली होती. पुण्यात होणाऱ्या नाटकांच्या शुभारंभाच्या प्रयोगांनाही ते सोबत घेऊन जात असतं. त्यांच्यासोबतगांधी-आंबेडकरया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्वला पहिल्यांदा बघता आला. त्यानंतर काही नाटके त्यांच्यासोबत बघितली.
ऋषिकेश कानिटकरसोबत 
    बांगलादेशात जानेवारी 9998 मध्ये झालेल्या इंडिपेंडन्ट करंडक स्पर्धेत  भारत- पाकिस्तानमध्ये अंतिम लढत झाली होती. पाकच्या 314 धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारताला शेवटच्या दोन चेंडूंत तीन धावांची गरज होती. ऋषिकेश कानिटकरने सकलेन मुश्ताकला चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता. 314 धावांचे आव्हान पार करण्याचा बहुदा विश्वविक्रम भारताने केला होता. त्यामुळे कानिटकर अचानक हिरो झाला होता. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो पुण्यात परतला. संजय सरांनी त्याची मुलाखत घेण्यास सांगितले. एखाद्या क्रिकेटपटूला भेटण्याची ती मला पहिलीच संधी मिळणार होती. मला प्रचंड आनंद झाला होता. कानिटकरची पुणा क्लब येथे मुलाखत घेतली. सांज केसरीत ती प्रसिद्ध झाली. माझा आनंद आणखीच दुणावला.  
 एमसीजे संपत आल्यावर मला आणि राजारामला पुणे सकाळमध्ये प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून संधी मिळाली. माझ्यानंतर काही दिवसांनी राजारामही सांज केसरीत उपसंपादक म्हणून काम करत होता. आमची सकाळची बातमी कळल्यावर संजय सरांना बरे वाटले. त्यांनी आमचे मनापासून अभिनंदन केले. पोरांचे चांगले होतेय, ही त्यांची भावना होती.  
संजय सरांच्या निधनाने एक सच्चा माणूस गेला, पत्रकार गेला, शिक्षक गेला, गुरू गेला. संजय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

4 comments:

  1. भावपूर्ण आदरांजली

    ReplyDelete
  2. जगदीश तू गुरुंना, शिक्षकाला लक्षात ठेवलेस.ही पोस्ट टाकून तू खरोखरच त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहेस.
    anirudha ashtaputre

    ReplyDelete
  3. बापू लेख छान आहे. पण फोटो दिसत नाहीत ?

    ReplyDelete
    Replies
    1. गेले काही दिवस माझ्या ब्लॉगवरचे फोटो दिसत नाहीत.

      Delete