Thursday, 16 July 2020

क्रांतिज्योती

(श्रीमीत नीला सत्यनारायण मॅडम राज्य निवडणूक आयुक्त असताना दै. ‘प्रहार’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महिला सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या संकल्पनेतून आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने `क्रांतिज्योती` प्रकल्प हाती घेतला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी दहा जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविला जात आहे. त्याविषयी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये पूर्वी महिलांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित होत्या. राज्य शासनाने आता त्यात वाढ करून 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के जागा निश्चित करून निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली आहे. महिलांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात आपले कर्तृत्व स्वबळावर सिद्ध करावे आणि ग्रामविकासात मोलाचे योगदान द्यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने `क्रांतिज्योती` प्रकल्प हाती घेतला आहे.

संविधानातील तरतुदींचा केवळ शाब्दिक अर्थ न घेता या तरतुदींचा आत्मा लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. प्रथमच निवडून आलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या कारभारापासून इतर महिलांनीही प्रेरणा घेऊन स्वत: पुढे यायला हवे, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे स्मरण म्हणून राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला `क्रांतिज्योती` हे नाव दिले आहे.

सेलू (जि. वर्धा) तालुक्यात प्रायोगिक तत्वावर एक प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्याचे मूल्यमापन करून हा प्रकल्प साकारण्यात आला. सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या समस्यांची जाणीव ठेऊन प्रकल्पाचे नियोजन आणि आखणी केली आहे. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, अमरावती आणि वर्धा या दहा जिल्ह्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी राबविला जात आहे. प्रशिक्षक आणि महिला सदस्यांच्या माहितीकरिता सर्वंकष साहित्याचे संकलन व निर्मिती करण्यात आली आहे. त्याहीपेक्षा  खेळ, गाणी आणि प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यावर भर आहे. दुर्गम भागातील महिलांसाठी स्थानिक भाषेत साहित्य उपलब्ध करून देण्याचासुद्धा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर तीन दिवसांच्या अनिवासी कार्यशाळेत अनौपचारिक वातावरणात हे प्रशिक्षण दिले जाते. त्यात स्थानिक यशस्वी महिलांच्या यशोगाथा देखील प्रशिक्षणार्थी महिलांसमोर मांडल्या जातात.

ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष कारभार, ज्वलंत सामाजिक समस्या आणि शासनाच्या विविध योजना यांची माहिती देऊन स्त्रियांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, यावर यात भर देण्यात येत आहे. प्रशिक्षणात पंचायत राज कार्यपद्धती, ग्रामपंचायत कायदा, त्यातील नियम आणि ग्रामपंचायतींचे अर्थव्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागात विशेषत: महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची महिलांना तपशिलवार माहिती दिली जाते. ग्रामपंचायतीचे अर्थव्यवस्थापन, अंदाजपत्रक तयार करणे याचेसुद्धा प्रशिक्षण दिले जाते.

क्रांतिज्योतीच्या माध्यमातून राज्यस्तरापासून ग्रामीणस्तरापर्यंत महिला सदस्यांच्या प्रशिक्षकांची एक सक्षम फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य आणि जिल्हास्तरावर प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. तसेच जिल्हास्तरावर मदत कक्ष किंवा सल्ला केंद्र स्थापन केले जाते. प्रशिक्षणानंतर दरमहा पाठपुरावा सत्रांचेसुद्धा आयोजन केले जाते. सहा महिन्यांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी महिला सदस्यांचे विविध बाबींवरून मूल्यमापन केले जाते. त्यात कारभाराची माहिती, आत्मविश्वास, कार्यक्षमता, ग्रामपंचायत प्रशासनामधील सहभाग, व्यक्तिमत्व व गुणवत्ता यामधील प्रगती आदी मुद्यांचा समावेश असतो.

पहिल्या टप्प्यातील दहा जिल्हे

1) ठाणे, 2) नाशिक, 3) पुणे, 4) सातारा, 5) कोल्हापूर, 6) सिंधुदुर्ग, 7) सोलापूर, 8) नांदेड, 9) अमरावती आणि 10) वर्धा.

राजकीय व सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावे

``स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना आता 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. या संधीचा फायदा घेऊन महिला राजकीय आणि सामजिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी हा प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे, या दृष्टीने प्रथमत: आम्ही ग्रामपंचायतींच्या महिला सदस्यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आहे. कारण संपूर्ण कुटुंबाचा डोलारा व्यवस्थितपणे सांभाळू शकणारी महिला ग्रामपंचायतींचाही कारभार व्यवस्थितपणे पाहू शकते. त्यासाठी त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. तेच काम क्रांतिज्योतिच्या माध्यमातून केले जात आह``, असे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.

0-0-0


पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त

राज्य निवडणूक आयुक्त असताना श्रीमती नीला सत्यनारायण मॅडम यांच्यासंदर्भात ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख...

 निवडणुकांमुळेच सर्वसामान्यांनाही विकेंद्रित सत्ता व्यवस्थेत हक्काचा वाटा मिळतो. सत्ताधिशांपर्यंत आपला आवाज पोहचवता येतो. लोकशाहीतील विकेंद्रित सत्ता व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय व्यवस्थेतून कार्यकर्ते आणि नेते घडत जातात. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका होय. हा संसंदीय लोकशाहीचा पाया आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा डोलारा सांभाळण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचा करभार चालतो. सध्या श्रीमती नीला सत्यनारायण राज्य निवडणूक आयुक्तपदाची धुरा समर्थपणे पेलत आहेत.

चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर श्रीमती सत्यनारायण यांच्याकडे ही संविधानिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त किंवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी एवढीच त्याची ओळख सीमीत नाही. त्या गीतकार आहेत. संगीतकार आहेत. लेखिका आहेत. ती एक चैतन्यदायी माय आहे. आई नावाचं गाव आहे. कारण ती सर्वसामान्य आई नाही. निर्मिकानेच अन्याय केल्यावर दु:ख सांगावं कुणाला? अशी अवस्था विकलांग मुलांच्या जन्मदातीची होते; पण निर्सगाने केलेल्या चेष्टेवर मात करणारी अपवादात्मक उदाहणेही असतात. त्यातलाच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नीला सत्यनारायण! चैतन्य या आपल्या मतिमंद मुलाला घडवताना, वाढवताना आईपणाचे कौशल्य त्यांनी पणाला लावले. त्याची फलश्रृती म्हणजे असामान्य असलेल्या मूलातून आज घडलेला, अगदी सर्वसामान्य वाटावा असा चैतन्य! चैतन्यामुळे माझ्यातली आई घडली, अशी  उत्स्फूर्त भावना श्रीमती सत्यनारायण यांनी ‘एक पूर्ण- एक अपूर्ण’ या पुस्तकात चितारलेली आहे. चैतन्य आणि स्वत:च्या जिद्दीची ही कहाणी सर्वच आयांसाठी पेरणादायी आहे.

श्रीमती सत्यनारायण यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत. लोकशाहीत निवडणुका हाच महत्वाचा घटक नाही; परंतु इतर घटकांतील हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे; परंतु दुर्दैवाने सर्व अर्थकारण, राजकारण आणि सत्ताकारणाभोवती निवडणुका केंद्रित झाल्या आहेत. त्यामुळे पारदर्शक आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ते आव्हान श्रीमती सत्यनारायण यांनी समर्थपणे पेलले आहेत. विधिमंडळ आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार या मुद्यावरून पूर्वीच्या राज्य निवडणूक आयुक्तांबाबत झालेला वाद महाराष्ट्राला चांगलाच परिचित आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 6 जुलै 2009 रोजी श्रीमती सत्यनारायण यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. या पदासाठी त्यांनी शासनाकडे कुठल्याही प्रकारचा विनंती अर्ज केलेला नव्हता. केवळ त्याची प्रशासकीय कारकीर्द लक्षात घेऊन त्यांना हा बहुमान मिळाला आहे, असे त्या नेहमी सांगत असत.

निवडणुकांच्या निमित्ताने दौऱ्यांवर असताना त्यांनी उमेदवार, मतदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधायला सुरवात केली. त्यातून निवडणूक प्रक्रियेतील अडचणी आणि महिला सदस्यांचे प्रश्न त्यांना प्रकर्षाने जाणवले. निवडणूक चिन्हांचा प्रकार विचार करण्यासारखा होता. केळं, गाजर, खाट, कुकरसारख्या चिन्हांमुळे अपमानीत व्हावे लागत होते. या चिन्हांचा भलताच अर्थ काढला जातो, अशी बहुतांश महिला उमेदवारांची तक्रार होती. संवेदनशील महिला आयुक्त म्हणून महिलांच्या या प्रश्नाची दखल घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी तातडीने आदेश काढून एकूण नऊ चिन्हे वगळून टाकली. त्याऐवजी संगणक, दूरचित्रवाणी संचासारख्या आधुनिकतेच्या प्रतिकांचा निवडणूक चिन्हांमध्ये समावेश केला.

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाची तरतूद करून क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. या निर्णयाने अधिकाधिक महिलांना सार्वजनिक जीवनात कर्तृत्व दाखविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. त्याचा प्रत्यक्षात कितपत उपयोग महिलांना होत आहे, हे श्रीमती सत्यनारायण यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नाव बायकांचे असले तरी कारभार मात्र पुरुषच करतात. अगदी सह्याही तेच करतात. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरची महिलांची घुसमट इथेही असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासंदर्भात एका संस्थेच्या मदतीने रीतसर पाहणी केली. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले, पण बळ, प्रतिष्ठा, समानता नाही मिळाली. ही घुसमट थांबविण्यासाठी श्रीमती सत्यनारायण यांच्या संकल्पनेतून ‘क्रांतिज्योती महिला सक्षमीकरण प्रकल्प’ साकारला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांना ग्रामपचंयातीचे कायदे, कारभार, योजना, अंदाजपत्रक याबाबत प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. हा प्रशिक्षण प्रकल्प संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरला असून तो देशपातळीवर राबविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ‘यूएन वूमेन’ या आतंरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेनेही त्याची दखल घेतली आहे.

पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्रीमती सत्यनारायण यांनी प्रारंभापासूनच सुधारणांच्या दिशेने पावले टाकली होती. पण त्यांची खरी कसोटी डिसेंबर 2011 ते 2012 या कालावधीत मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी लागली. अगदी यशस्वीपणे त्या या कसोटीला सामोऱ्या केल्या. त्यांनी केवळ निवडणुका पार पाडण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही. त्यातही अमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या. काळाच्या बरोबर राहण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे संकेतस्थळ साकारले. या संकेतस्थळावर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणूक प्रभागांच्या इलेक्ट्रॉनिक नकाशांची सुविधा आहे. महानगरपालिकेच्या एकत्रित नकाशावरून आपल्या प्रभागाचा नकाशा शोधता येतो. त्यात प्रभागातील निवडणूक अधिकाऱ्यांचे नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांची संख्या, प्रभागातील मतदार यादी आणि त्यातील आपले मतदान केंद्रही घरबसल्या शोधता येते. विविध निवडणुकांचे निकालही या संकेतस्थळावर पाहता येतात. आयोगाचे आदेश, सूचना आणि परिपत्रेकही त्यावर उलब्ध असतात. या संकेतस्थळास राज्य मराठी विकास संस्था आणि सीडॅकच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) अधिकाधिक वापरासाठीचा ‘एज 2012’ (एन्टरप्रायजेस ड्रायव्हिंग ग्रोथ अँड एक्सलन्स थ्रू आयटी) हा पुरस्कारही मिळाला आहे, याचे श्रेय अर्थातच श्रीमती सत्यनारायण यांचे आहे.

मतदारांची गैरसोय टाळणे आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यावरही श्रीमती सत्यनाराण यांचा भर आहे. त्यासाठी अपंग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता यांना मतदानाच्या रांगेत तिष्ठत उभे राहू लागू नये म्हणून त्यांना प्राधान्य देण्यास सुरवात झाली आहे. मतदारांच्या लांब रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्र शक्योवर तळमजल्यावरच असते. अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था केली जाते. मतदान केंद्रावर स्वच्छता गृह, पाणी आणि सावलीची व्यवस्था केली जाते. वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ केली आहे. बोटावर निशाणी करण्यासाठी शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जाऊ लागला आहे. मतदारांच्या ओळखीसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. निवडणूक प्रचारात प्राण्यांचा क्रूरपणे वापरावर निर्बंध घातला आहे. मतदान यंत्रांमध्ये अद्ययावत पद्धतीने सुधारणा केल्या आहेत. मतदान यंत्रांवर सांकेतिक भाषेऐवजी स्पष्टपणे माहिती दर्शविण्याची व्यवस्था केली आहे. यंत्राच्या संवेदनशील भागावर नॉन क्लोनेबल टॅग लावला आहे. यंत्रात फेरफार करता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास ते बंद होते. त्यामुळे ते अधिक सुरक्षित झाले आहे.

निवडणुकांतील पेचप्रसंगांबाबत अनुभव कथन करताना श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या, “राज्य निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद आहे. निवडणुकांच्या काळात आयुक्तांचे अधिकार सार्वभौम असतात. राजकीय पक्ष, नेते, उमेदवार आणि मतदारांची त्यांच्या बारिकसारीक निर्णयांवर बारकार्ईने नजर असते. त्या दबावातून मार्ग काढत पेचप्रसंगांसंदर्भात अचूक निर्णय घ्यावे लागतात. आचारसंहितेचा भंग, हा अत्यंत नाजूक प्रसंग असतो. आचारसंहितेचा भंग सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडूनही होऊ शकतो. त्यावर समतोल निर्णय घ्यावा लागतो. डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचंड संख्येने निवडणुका पार पडल्या. त्यातील एका प्रकरणात ज्या राज्यकर्त्यांनी माझी या पदावर नियुक्ती केली त्यांच्याच विरोधात मला कार्यवाही करावी लागली. तीसुद्धा सर्व जनतेच्या साक्षीने. त्यावेळी महिला आयुक्त म्हणून केवळ भावनिक विचार करून चालत नाही. आपल्या निर्णयांचे समर्थन भविष्यातही करता आले पाहिजे, म्हणून मी प्रत्येक निर्णय तावून सलाखून घेते. निर्णय प्रक्रियेत निवडणूक आयोगातील सहकाऱ्यांकडून भरपूर नैतिक बळही मिळते. पण निर्णय मात्र शेवटी आयुक्तांनाच घ्यावा लागतो. प्रसंगी कठोरही व्हावे लागते. तरच पारदर्शक निवडणुका होऊ शकतात आणि सांविधानिक पदाचा मान राखला जाऊ शकतो.”

“निवडणुकांच्या काळात काही वर्तमानपत्रांमधून माझ्याविषयी नकारात्मक लिहिले गेले; पण ते फारच थोडे होते. सकारात्मकतेचे पारडे जड होते. माध्यमांतील हीच सकारात्मकता मला बळ देत होती. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांत व संयमी पद्धतीने हाताळल्या गेल्याची बाब प्रसारमाध्यमांनी सातत्याने अधोरेखित केली. जनमानसांत माझी प्रतिमाही उंचावत होती. महिलांमध्ये माझ्याविषयीचा कौतुकाचा आणि आदराचा भाव पाहायला मिळत होता. काही तरुण-तरुणींनी तुम्ही आमच्या ‘आयकॉन’ असल्याचे सांगून वेगळाच आनंद दिला. आनंदाबरोबर जबाबदारीचीही जाणीव होत होती. बऱ्यावाईट अनुभवांतून सर्व घटानांकडे, व्यक्तींकडे समानतेने पाहायला आणि सर्वांचे शांतपणे ऐकून घ्यायलाही मी शिकले. वाईटातून चांगले आणि नकारात्मकतेतून सकारात्मकता शोधायला शिकले. निवडणुकांचीही संधी मला केवढे मोठे दान देऊन गेली, या विचाराने मी प्रत्येक वेळा भारावते. याबाबत स्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि निवडणुकांच्या अनुभावाची शिदोरी कायम सोबत राहावी म्हणून मी ‘टाकिचे घाव’ हे पुस्तक निवडणुकांची शाही सुकण्यापूर्वीच कागदावर उतरवून काढले.”

श्रीमती सत्यनारायण यांनी एका राजकीय पक्षाच्या प्रभावशाली नेत्याने केलेल्या उलटसुलट विधानांवरून निर्माण झालेले वादंगही अतिशय संयमी पद्धतीने हाताळले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य अडचणीही टाळता आल्या. त्यांची या प्रकराणातील तटस्थ भूमिका लक्षात घेऊन अनेकांनी त्यांना ‘लेडी शेषन’ म्हणूनही संबोधले. पुरुषांपेक्षा महिला अधिक संवेदनशील असतात, हे खरे असले तरी ही संवेदनशीलतेचा वापर सकारात्मकतेसाठी अधिक होऊ शकतो, हे श्रीमती सत्यनारायण यांनी दाखवून दिले. प्रसंगी कठोरही व्हावे लागते, पण त्याच वेळी संयमही राखावा लागतो आणि याच समतोलातून महिलाही नवनवीन जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतात, याचा वस्तुपाठ श्रीमती सत्यनारायण यांनी घालून दिला आहे.

                      जगदीश मोरे

                                                      0-0-0


Friday, 22 May 2020

सिंगल मिंगल

कनेक्टेड तरुणाई

कैवल्य फिलॉसॉफिचा विद्यार्थी आहे. तो हुशार आहे. तो संवेदनशील आणि कविमनाचा तरुण आहे. शिक्षकांचा लाडका आहे. सामाजिक जाणिवांचे त्याला भान आहे. त्याचे विचार ठाम आहेत. कैवल्याला स्त्रियांविषयी आदर आहे. प्रेमाबाबत मात्र गोंधळेला आहे. मित्राची बहीण- मृणालमध्ये तो गुंतला होता. ती त्याच्याहून वयाने मोठी होती. मृणाल दुसऱ्यासोबत कमिटेड असल्याचे कळल्यावर त्याने स्वत:च गुंता सोडवला. रेवतीकडे झुकताना मात्र तो स्वत:ला रोखू शकला नाही. रेवती शिक्षणासाठी मुंबईत वसतिगृहात राहते. तिचा आई- वडील आणि मुलगी हा त्रिकोण उद्‌ध्वस्त झाला आहे. तिची कौटुंबिक पाश्वर्भूमी बरे बोलण्यासारखी नाही. रेवती संवेदनाच्या पलीकडे गेली आहे. तिला अभ्यासाचा सोस नाही. करियरचा ध्यास नाही. पैसा हीच तिची महत्वकांशा आहे. कैवल्याच्या भवतीने समकालीन तरुणाईचे विश्व उलगडत जाते. समाजमाध्यमांच्या कोंदणात ती फुलत जाते. कथानक वेगवान असले तरी त्यातली रोचकता कुठेही कमी होत नाही. अधिक रसरशीत होत जाते.

श्रीरंजन आवटे यांच्या ‘सिंगल मिंगल’ कादंबरीचे हे कथासार आहे. कांदबरीची सुरुवात “….आणि तिच्यापासून दूर झालो मी. माझा आवेश संपला.” या वाक्याने होते. समकालीन तरुणाईच्या विश्वाची झलक सुरुवातीलाच मिळते. या पिढीच्या पालकांना कदाचित हे रुचणार नाही. पचणार नाही; पण नाकारता येणार नाही. आजची तरुणाई बिनधास्त आहे. तिला आपल्या हक्कांची पुरेपूर जाणीव आहे. थेट ‘राईट टू फरगेट’चाही ती विचार करते. विस्मरणाच्या संस्मरणीय सोहळ्यासाठी ही तरुणाई आतुर आहे. तिला ब्रेकअप पार्टीही आनंदाने साजरी करायची आहे. प्रेमभावनांच्या लपंडावाला ती थेट भिडते. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’च्या युगात व्हर्जिनिटी, पातिव्रत्य, एकनिष्ठता, विवाहसंस्था यातल्या बंदिस्थतेवर ही तरुणाई बोट ठेवते. कालबाह्य झालेल्या गोष्टींना ‘बाय’ करण्याची धमक दाखविते. नव्या वास्तवतेला आपल्या कवेत घेण्यासाठी धडपडते. ही धडपड चूक की बरोबर यात ही तरुणाई फारशी डोकावत नाही; पण या तरुणाईचे पालक असलेल्या वाचकांचे डोके मात्र गरगरल्याशिवाय राहत नाही.

‘व्हर्जिनिटी इज नॉट डिग्निटी. इट इज जस्ट लॅक ऑफ ॲपोर्च्युनिटी...’ असे फेसबूक स्टेटस ठेवायलाही ही पिढी कचरत नाही. शारीरिक, लैंगिक संकल्पनांना नैतिक आणि अनैतिकतेत विभाजित करण्याची या तरुणाईला गरज वाटत नाही. म्हणून ती बेजबाबदार आहे, असेही म्हणता येत नाही, हे कथासूत्राचे गमक आहे. ही तरुणाई गंभीरपणे विचारही करते. अभिजात साहित्य, समाजशास्र, मानसशास्र, तत्वज्ञान, राजकारण, दहशतवाद, नक्षलवाद अशा विविध विषयांवरही ही तरुणाई भाष्य करते. त्यामुळे वाचकाला स्वत:च्या नजरेपेक्षा तरुणांच्या दृष्टिकोनातून समकालीन युवा विश्वाकडे बघण्यास ही कांदबरी भाग पाडते.

‘सिंगल मिंगल’मध्ये हिंग्लिश, मिंग्लिशचा चपखल वापर आहे. सोशल मीडियाची भाषा यातल्या तरुणाईच्या अंगवळणी पडली आहे. अभासी जगात ती मुक्त संचार करते. इमोजीच्या भाषेत ती सहज संवाद साधते. पूर्वग्रहांचे इनबिल्ट सॉफ्टवेअर आपल्यात असते, आपल्या आत असलेले एक धारणांचे सॉफ्टवेअर पीडीएफसारखे न बदलता येणारे असते, कधी तरी कोणाचे तरी म्हणणे आपल्यातल्या नैतिक स्वाफ्टवेअरला अनकंपॅटिबल असते, असे या तरुणाईला वाटते. बाय डिफॉल्ट इन्सस्टॉल होणारी आठवण अनइन्स्टॉल कशी करावी, हा प्रश्नदेखील ही तरुणाई सोडविण्याचे धाडस बाळगते. ही तरुणाई स्मार्ट भासते. असते. तिला माठ असण्याचा न्यूनगंड सतावत नाही. तिला वेगवेगळ्या विचारांचे लाटांचे भय नाही. त्यावर ती स्वार होऊ पाहते. म्हणून तरुण वाचक ‘सिंगल- मिंगल’शी लगेच कनेक्ट होऊ शकतो.  

या तरुणाईच्या आधीच्या पिढीपासून या बदलांची सुरुवात झाली होती. तिच्याही आधीच्या पिढीची धाव मात्र ‘मांसाहरी गप्पा’पर्यंत होती. त्यातले अपवादात्मक तरुण या गप्पांचा टप्पा ओलांडत असत. समकालीन तरुणाई मात्र कामवासनांना बेधडक व्यक्त करते. प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेते. तिच्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे. वस्तुस्थितीच्या जाणिवेबरोबरच भावनांचा हळवेपणादेखील ती जोपासते. आवेश संपला म्हणून तो तिच्यापासून दूर होतो, अशा आशयाच्या निवेदनातून कांदबरीची सुरुवात होते; परंतु वाचक म्हणून कादंबरीचा शेवट करताना आवेशाच्या नादात ही तरुणाई काही तरी तुडवत चालली असल्याची भावना मनात घर करते. अर्थात, हे वाचक सापेक्ष असू शकेल.    

प्रश्न धोरणांचा नाही. तो संस्कारातून निर्माण झालेल्या धारणांचा आहे. या तरूणाईची दिशा योग्य आहे की अयोग्य आहे? यापेक्षा पालकांनी या तरुणाईला कोणत्या संस्कारांतून कोणती दिशा दिली? हा प्रश्न महत्वाचा आहे. पालकांनी अपेक्षित दिशा देण्याचा प्रयत्न केला असेलही; पण ते दिशादर्शनच चुकीचे तर नव्हते ना? किंवा संवाद साधण्यात पालक कमी पडत आहेत का? त्यांना नव्या पिढीच्या संवादाची भाषाच अवगत नाही का? असेही प्रश्न वाचक म्हणून पडू लागतात आणि स्वत:च्याच मनातला कोलाहल उपसण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून ‘सिंगल मिंगल’ समकालीन तरुणाईचे वास्तव दाखविणारा आरसा ठरते.

         ‘सिंगल मिंगल’ वाचताना ‘कोसला’ आठवली. ‘कोसला’तली कथा सुमारे 1960 मधली आहे. ती पुण्यात घडते. ‘सिंगल मिंगल’मधली कथा साधरणत: 2015 मधील. 50 दोन्हीतले अंतर 50 वर्षांपेक्षा जास्तीचे आहे. संदर्भ आता बदलले असले तरी जगण्याचे तत्वज्ञान ‘कोसला’ आजही व्यापून टाकते. ‘कोसला’त सांगवीसारख्या खेड्याचे दर्शन होते. तिथली माणसे भेटतात. पुण्यातले महाविद्यालयीन जीवन उभे राहते. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक घटकांतून आलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि त्यांची गरिबी- श्रीमंती, महाविद्यालयाचे गॅदरिंग अशा घटना- प्रसंगातून ‘कोसला’चे कथानक पुढे सरकते. त्यातून तत्कालीन तरुणाईचे दर्शन होते; पण कोसलात शिवीगाळ नाही. लैंगिक-कामुक वर्णने नाहीत. श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा पाळलेल्या दिसतात. तो त्या पिढीचा प्रभाव असेल. ‘सिंगल मिंगल’मध्ये मात्र बदलती समकालीन तरुणाई भेटते. ‘सिंगल मिंगल’मध्ये कामुक वर्णने भरपूर आहेत. या दोन्ही कादंबऱ्या दोन भिन्न काळांचे डाक्युमेंटेशन आहे. मुद्दा तुलना करण्याचा नाही. काळ परिस्थिती बदलल्यावर काही लिखाण आवडेनाशे होते. कालौघात मागे पडते. कारण त्यात नायकाचा काळ आणि आवकाश प्रतीत झालेला असतो; पण ‘कोसला’ आजही भावते. असेच मित्रवर्य श्रीच्या ‘सिंगल मिंगल’च्या बाबतीतही घडो, हीच सदिच्छा!  

                                                        -जगदीश मोरे


Monday, 4 May 2020

कथा: लॉकडाऊन

लॉकडाऊन
अजयची मुंबई- कोल्हापूर- मुंबई धावपळ सुरू होती. बाबा कोल्हापूरच्या रुग्णालयात होते. पाय घसरण्याचे निमित्त झाले होते. तेही घरातच. पायाचे ऑपरेशन केले. तरीही चित्र फारसे बरे नव्हते. औषधोपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. रुग्णालयाचे बील सहा लाखांवर गेले होते. बाबांची प्रकृती मात्र गंभीर झाली होती. मुंबईत जे. जे. रुग्णालयात हलवले. “रुग्णाचे नाव- प्रभाकर तापळे, वय- 80, राहणार- कोल्हापूर...” शिरस्त्याप्रमाणे रुग्णालयात भरती करण्याची औपचारिकता पूर्ण झाली.
अजय आणि वेणू नवरा- बायको दोघे नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक. दोघांची धावपळ सारखीच. दोन मुलगे- आर्यन 5 वर्षांचा आणि सिद्धांत 12 वर्षांचा. आर्यन दिवसभर पाळणा घरात असायचा. सिद्धांतला घरात एकटे राहण्याची सवय झाली होती. बाबांना मुंबईत आणल्यामुळे मदतीसाठी अजयच्या दोन्ही बहिणी आल्या होत्या. अजय आणि दोन्ही बहिणी आलटूनपालटून जेजेला रात्रभर थांबत असत.
बाबांना जेजेमध्ये आता महिना झाला होता. डॉक्टर पुरेपूर काळजी घेत होते. बाबांच्या प्रकृतीत मात्र चढउतार सुरूच होता. डिस्चार्ज मिळण्याची कुठलीही चिन्हे दिसत नव्हती. बहिणींना बाबा सोडवत नव्हते; पण दोघींना आपापल्या मुलाबाळांची आणि घरांचीही ओढ लागली होती. अजयचे एकाच वेळी ऑफिस, रुग्णालय आणि घर अशी कसरत सुरू होती. कधी खरे सांगून; तर कधी खोटे बोलून अजय ऑफिसमधून गायब व्हायचा आणि जेजेत जायचा. घर, मुले आणि ऑफिस सांभाळत वेणूचीही धावपळ सुरू आहे.
बाबांना आता जेजेत दीड महिना झाला होता. मोठी बहीण आपल्या गावी पुण्याला; तर लहान बहीण रत्नागिरीला परतली होती. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या होत्या. काही दिवसांतच अवघा देशच करोनाने आपल्या कवेत घ्यायला सुरूवात केली होती. त्याचा फैलाव रोखण्यासाठी देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला होता. मुंबईत करोनाचा कहर माजला होता. मुंबई कधी नव्हे ती थबकली होती. बहुतांश भागांत स्मशान शांतात; पण घरात बसलेल्यांच्या आरोग्यासाठी अनेकजण रस्त्यावर येऊन सेवा देत होते. बाहेर पडल्यावर करोना नकळत आपल्यात शिरतो, असा ॲनिमेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत होता.
डॉक्टर, नर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी करोनाशी लढत होते. जनजागृती सुरू होती. सेलेब्रेटी आपापल्या महालांमधून संदेश देत होते-  “बाहेर पडू नका... घरातच थांबा... सुरक्षित रहा! बाहेर पडू नका…” अंगणातही येण्याची सोय नाही. मुंबईकरांच्या घराला अंगण नाही आणि अंगण असलेल्यांना घर नाही. फुटपाथ हेच अंगण आणि तेच घर! तेच फुटपाथ रिकामे केले जात होते. सोशल मीडियावर गरिबांना मदत करण्यासंदर्भातल्या आवाहनाच्या पोष्टी टाकणाऱ्यांच्या सोसायट्यांच्या गेटच्या आत कुणालाच शिरकाव नव्हता. मायानगरी कधीच भयनगरी झाली होती. जेजेत जाताना अजय हेच अनुभवत होता.
बहिणी आपापल्या गावी गेल्यामुळे रुग्णालयात बाबांजवळ एक दिवस तो; एक दिवस आई, असा रात्रक्रम सुरू होता. अजय आईला रात्री गाडीने जेजेत सोडून आला होता. सकाळी उठल्या उठल्या त्याने टीव्ही लावला. आई टॅक्सीने घरी आली. ‘टॅक्सी चालकाला करोनाची बाधा’ टीव्हीवर बातमी सुरू होती.
टीव्हीवर, सोशल मीडियावर संदेश येत होते- “साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांच्या आतील बाळांना जपा. घराबाहेर पडू देऊ नका.” रुग्णालयांतील डॉक्टर आणि नर्सनाच करोनाचा संसर्ग होत असल्याच्या बातम्यांनी जीव कासावीस होऊ लागला होता. आईचे वय सत्तरी पार आणि घरात बाळ. बाबांच्या वेदना दिवसागणिक वाढल्या होता. डॉक्टर, नर्सची ये-जा वाढली होती.
बाबांचे उच्चार अस्पष्ट झाले होते. “मला गावी घेऊन चला. इथं मरण नको,” असंच ते म्हणत असावेत, हे आईने ताडले होते. बाबांचे मुंबईशी जुने नाते. सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांच्या नोकरीची सुरुवात मंत्रालयातूनच झाली होती. काही वर्षे त्यांनी इथेच काढली होती. मुलगाही आता मुंबईत आहे. दुसऱ्या पिढीमुळे मुंबईशी नाते घट्ट झाले होते. कोल्हापूरच्या मातीशी असलेली नाळ मात्र बाबांनी तोडलेली नव्हती.
तापळे कुटुंबियांची दगदग काही करता कमी होईना. पुण्याहून, रत्नागिरीहून बहिणी, भाऊजी, भाच्यांचे फोन येत असत. बाबांच्या प्रकृतीची सारखी चौकशी करत. बाबांची प्रकृती मात्र चिंताजनक झाली होती. अजयचा मोबाईल खणखणला... त्याने स्क्रीनवर नजर टाकली... पुण्याच्या भाच्याचे नाव दिसले... किरण! मोबाईल उचलला... कानाला लावला... किरण रडायला लागला. अजय धीर देत म्हणाला, “अरे, बाबांची प्रकृती ठीक आहे. रडू नकोस.”
“मामा, बाबा गेले!”
“अरे बाळा, असं बोलू नकोस. बाबांना काहीही झालेलं नाही. मी बाबांजवळच आहे,” बाबांच्या चेहऱ्याकडे कटाक्ष टाकत अजयने खुलासा केला.  
“मामा, तसं नाही. माझे बाबा…”
किरणला अजयने मध्येच थांबविले. नाही तरी किरणच्या तोंडून शब्द फूटत नव्हते आणि अजयच्या कानांना ऐकवत नव्हते. विचित्र घटना घडल्याचा अजयला अंदाज आला होता. किरण प्रचंड घाबरला होता. अजय कापऱ्या स्वरात म्हणला, “बाळा, तुला काय सांगायचं आहे? रडू नकोस... व्यवस्थित सांग मला”
“मामा, माझ्या बाबांना हार्टॲटक आला आणि ते गेले…” हे ऐकल्या ऐकल्या अजयला स्वत:लाही सावरणे अवघड झाले होते.
जावई अकाली गेल्याची वार्ता आईला सांगायची कशी? या प्रश्नाने अजयच्या मनात काहूर माजले होते. अजय कसाबसा घरी आला. त्याच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते. जड अंत:करणाने आईला सांगितले. आई कोसळलीच. “देवा! इतका निष्ठूर कसा रे तू? माझ्या लेकीऐवजी माझं कुंकू पुसलं असतंस तरी चाललं असतं रे भगवंता!” 
आईला इकडे बाबांनाही सोडता येत नव्हते. तिकडेही जाता येत नव्हते. अजय आणि वेणू आईला धीर देत असताना लहान बहिणीचा फोन आला. तिनेही आईला सावरण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा गहिवर दाटून आला होता. अजयने मुलांना शेजाऱ्यांकडे सोडले. आईला जेजेत बाबांजवळ पाठविले. तो आणि वेणू गाडीने पुण्याला निघाले. अजय गाडी चालवत होता. ठिकठिकाणी करोनाची दहशत आणि लॉकडाऊनचा परिणाम जाणवत होता. रस्ते सुनसान होते. पोलिसांशिवाय कुणीही नव्हते. प्रत्येक ठिकाणी ऑफिसचे ओळखपत्र आणि वास्तव कारण सांगितल्यावर नाकाबंदीतून सुटका करून घेताना अजयच्या नाकी नऊ येत होते. तिकडे त्यांची वाट बघत होते. शेवटी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली. अजय आणि वेणूला अंत्यदर्शन घेता यावे म्हणून स्मशानभूमीच्या अलीकडेच कात्रज बायपासवर अंत्ययात्रा पाच मिनिटांसाठी थांबविली. ते तिथे पोचले. अंत्यदर्शन घेतले. शहरातले करोनाचे ‘कंटेन्मेंट झोन’ भेदणे अवघड होते. त्यामुळे घरी जाऊन बहिणीचं सांत्वन न करताच अजय आणि रेणूने बायपासवरूनच गाडी मुंबईकडे वळवली.
पुण्यातही करोनाची परिस्थिती गंभीर होती; पण मुंबईची परिस्थिती आता अधिक चिंताजनक झाली होती. सर्वत्र भीतीचे सावट होते. टारगट पोरं मात्र हिंडताना दिसत होते. काही जण गच्चीवर एकत्र येत होते. गप्पा झोडत होते. करोना शहरात पोचला होता; पण त्याचे गांभीर्य काही लोकांपर्यंत पोचलेले दिसत नव्हते. वेगवेगळ्या पद्धतीने टारगट लोकांना समजविण्याचा प्रयत्न सुरू होता; पण काही लोकांच्या डोक्यात प्रकाशच पडत नव्हता. टाळ्या, थाळ्या वाजवून झाल्या होत्या. दिवे लाऊन झाले होते. करोना योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात होती. कामाशिवाय फिरणाऱ्यांना समाज माध्यमांतून उपाहासात्मक श्रद्धांजलीही अर्पण करण्यात येत होती; पण उनाड लोकांना तीही थट्टाच वाटत होती. उपहासात्मक श्रद्धांजली प्रत्यक्षात आणण्याची त्यांना घाई झाली असावी.
संचार बंदी असली तरी संसार बंदी नव्हती आणि दु:खाचा डोंगर असला तरी अजयला जीवनावश्यक गोष्टींसाठीदेखील बाहेर पडणे आवश्यक होते. मोठ्या रांगा असलेल्या बऱ्याच ठिकाणी पोलिसांच्या धाकाने सोशल डिस्टन्सिंग पाळले जाऊ लागले होते. कमी गर्दीच्या ठिकाणी मात्र गांभीर्य दिसत नव्हते. दोघे- तिघेच गिऱ्हाईक असलेल्या एका डेअरीवर अजय गेला. त्याने सोशल डिस्टन्सिंग पाळत मिळेल ते दूध घेतले. कारण नेहमीचा दूधवाला गावी निघून गेला होता. दूध विक्रेत्याला 100 रुपये दिले. 40 रुपये परत घ्यायचे होते. “दोन मिनिटे थांबा. तुमचे उरलेले पैसे देतो,” विक्रेता म्हणाला. अजय जरा दूर जाऊन थांबला. दोन- तीन गिऱ्हाईकांनंतर पैसे परत करण्यासाठी दूधवाल्याने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो जवळ येऊ पाहतो तोच एक जण पटकन पुढे आला. त्याने दूध घेतले. अजय दूरच थांबला. पुन्हा जवळ जाऊ लागताच आणखी एक जण घुसला. हा पुन्हा जागेवर थांबला. पुन:पुन्हा तेच चित्र. आता अजय वैतागला, “अहो मॅडम, मी इथं उगाचच थांबलेलो नाही. जरा अंतर ठेवा. थोडा वेळ थांबा.”
“मला काय करोनाबिरोना झालेला नाही.” दूध घ्यायला आलेल्या शिकल्यासवरलेल्या गृहिणी संतापल्या.
“मी कुठं म्हणालो तुम्हाला करोना झालाय असं. नियम पाळावेत, एवढीच अपेक्षा आहे.”
“एवढं का घाबरता तुम्ही? घाबरत असाल तर कशाला घराच्या बाहेर पडता?” त्या गृहिणी तुच्छतेने बोलल्या. अजयला मात्र त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावेसे वाटले नाही. आधीच कुटुंबावरच्या संकटांनी त्याचा शक्तिपात झाला होता. त्यांना त्याने आधी दूध घेऊ दिले.
अजयने चहा घेतला आणि तो लवकर जेजेत गेला. तो राहत असलेल्या वसाहतीतल्या चौकातल्या ग्रुपवर मेसेज आला- “आपल्या चौकातल्या- इमारतीतल्या तळ मजल्यावरील दट्टेवार यांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांना पोलिस आणि डॉक्टर घेऊन गेलेत. त्यांना पंधरा दिवसांपासून क्वारंटाईन केलं होतं.” हे वाचून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर बायको, पोरं, आई, बाबा आणि रुग्णालयातली ये-जा, हे सगळे चित्र झर्रकन येऊन गेले.
डॉक्टरांशी बोलून अजय लवकरच घरी आला. संपूर्ण चौक सील करण्याची तयारी सुरू होती. तोपर्यंत अफवांचे प्रचंड पिक आले होते. “दट्टेवार कुटुंबातील सर्वांचे नमुने पॉझिटिव्ह आले… दट्टेवार वसाहतीभर फिरत होते... किरणा दुकानावर जाऊन आले... दूधवाल्याकडे रोज जात होते.” कुठलीही खात्री न करता वसाहतीतले लोक आपसात असे मेसेज व्हॉट्सॲपवर बिनधास्तपणे फॉरवर्ड करत होते. दट्टेवार कुटुंबातील दोघे- तिघे पॉझिटिव्ह निघालेत म्हणून चौक सील करण्यात आला, हे खरे असले तरी त्यांच्याबाबतचे अन्य बहुतांश मेसेज म्हणजे वावड्या आणि फेक न्यूजच होत्या. आधीच एकामागून एक संकटे येत असताना करोना आपल्या दारापर्यंत येऊन पोचल्याने तापळे कुटुंबियांची पाचावर धारण बसली होती. त्यांचा परिसर आता ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर झाला होता. येण्या- जाण्यावर बंधने आली होती.
बाबांचीही प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये हलविले होते. वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक झाले होते. जेजेत जाणे- येणे सोपे राहिलेले नव्होते. करोनाची दहशतही वाढली होती. म्हणून आता जेजेत बाबांसाठी ‘केअर टेकर’ची व्यवस्था केली होती.   
अजय रात्री उशिरा बारा- साडेबाराच्या सुमारास रुग्णालयातून घरी आला. आई घरीच होती. तिने अजयच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता हेरली होती. अजयने हातावर सॅनिटायझर घेतले. अंगावरचे कपडे डेटॉलमध्ये टाकले. आंघोळ केली. खाण्याची इच्छा नव्हती. दोनचार घास तोंडात कोंबले. पलंगावर आडवा झाला. झोप येत नव्हती. कधी तरी डोळे लागले.
पहाटे साडेचारच्या सुमारास रुग्णालयातून केअर टेकरचा फोन आला, “साहेब, पटकन निघा.”  
अजयला अंदाज आला होता. आईला उठवले. तो म्हणाला, “आम्ही, हॉस्पिटलला जाऊन येतो. मुलं झोपली आहेत. त्यांना झोपू दे.”
“एवढ्या पहाटे का?”
“फोन आला होता. बाबांना त्रास होतोय.”
“मला खरं सांग. काय झालं?” आई कासावीस झाली.
“मी पोहचल्यावर लगेच फोन करतो.”
आईच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. नवऱ्याच्या वेदना आणि करोनाच्या दहशतीमुळे मुलाची दगदग तिला पाहवत नव्हती. स्वत:च्या कपाळावर तिने हळूच हात फिरवित आपलं कुंकू शाबित असल्याची खात्री करून घेतली. तरीही तिला आपण काही तरी गमवत असल्याच्या दु:खाची चाहूल लागली होती.
लॉकडाऊनमुळे मुंबईत सर्वत्र पक्ष्यांचा मुक्त संचार गेल्या काही दिवसांपासून जाणवत होतो. पेडर रोड आणि मलबार हिलच्या परिसरात मोर दिसू लागले होते. कदाचित राजभवनाचा पिंजरा त्यांनी ओलांडला असावा. जेजे रुग्णालयाच्या परिसरातील झाडांवरच्या पक्ष्यांचाही किलबिलाट जोरात जाणवू लागला होता. तो आज जरा जास्तच होता. पहाटेचे पाच वाजले होते. अजय आणि वेणू रुग्णालयात पोचले. बाबांचे डोळे मिटलेले होते. डॉक्टर म्हणाले, “बाबांचे प्राण आता देहाच्या पिंजऱ्यात नाहीत...”  
अजयला क्षणभर काहीच सुचले नाही. वेणूने बाबांच्या मस्तकावरून हात फिरवला. तिला किंचितशी हालचाल जाणवली. ती उद्‌गारली, “डॉक्टर बाबांना काहीही झालेलं नाही. लवकर काही तरी करा. श्वासोच्छ्‌वास सुरू आहे.”
“मॅडम, अद्याप व्हेंटिलेटर काढलेले नाही. ते काढल्यावर...” डॉक्टरांनी समजावले.
अजय हुंदके देत होता. आता काय करावे? त्याला प्रश्न पडला होता. सगळे रुग्णालयीन सोपस्कार पार पाडले. अंत्यसंस्कार कुठे करावेत? नवा प्रश्न उभा ठाकला होता. तो वेणूला म्हणाला, “आपण बाबांना घेऊन कोल्हापूरला जाऊ. शववाहिनीने 400 किलो मीटरचा रस्ता सहा- सात तासात पार करू. नाही तरी रस्ते ओसच आहेत.”
“पार्थिव नेण्यास हरकत नाही. दु:खद प्रसंगी लॉकडाऊनचीही अडचण येणार नाही; पण गावातल्या लोकांच्या साशंक नजरांना तोंड कसं देणारं? किती लोकांकडे खुलासे करणार की, माझ्या बाबांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झाला नसला तरी किती नातेवाईक विश्वास ठेवणार? सध्याच्या काळात सगळेच मृत्यू करोनामुळे झालेले नसतात, हे किती जण समजून घेतील?” वेणू प्रश्नांची सरबत्ती करत अजयला समजावत होती.
“आपल्याकडं मृत्यूचं कारण नमूद केलेलं जेजेचं सर्टिफिकेट आहे. ते आपण दाखवू,” अजय स्वत:च्या मनाच्या समाधानासाठी काही तरी पुटपुटला.
“आपल्याकडं सर्टिफिकिट आहे दाखविण्यासाठी; पण तरीही नातेवाईक शासंक असतील. लोकांनी आधीच गावा-शहरांत शिरणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. ती त्यांच्या दृष्टीने दक्षता असेल. दक्षता घेण्यात मला चूक वाटत नाही; पण पुण्या- मुंबईहून येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत करोना आणत असल्याचा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. त्यात आपण मुंबईहून ‘डेडबॉडी’ घेऊन जातोय. शिवाय जाताना शासकीय यंत्रणेकडून क्वारंटाईनचा शिक्का हातावर मारला जाऊ शकतो. तोही दक्षतेचा उपाय आहे. त्यात वावगं काहीही नाही. आपल्यासाठी झटणाऱ्या यंत्रणेला आपणही सहकार्य करायला तर हवेच; पण हे सारं लोक कसं समजून घेणार? आधीच आपण अनेक मोठ्या संकटातून जात आहोत. त्यात पुन्हा प्रवासात आणि गावात नवीन संकटं नकोत.”
“तुझं म्हणणं पटतंय मला; पण बाबांची शेवटची इच्छा कोल्हापूरला जाण्याची होती. ती मी पूर्ण करू शकत नाही. बाबांच्या मृत्यूएवढंच मला हे भयंकर वाटतंय,” अजयला आता आपली मती लॉकडाऊन झाल्याचा भास झाला होता.  
अखेरीस त्याने स्वत:ला सावरले. मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. थेट स्मशानभूमीत जाण्याऐवजी चौकाच्या अलीकडेच कंटेन्मेंट झोनच्या सीमेवर शववाहिनी थांबवायची. तिथल्या पोळीभाजी केंद्राजवळ आईला शेवटच्या दर्शनासाठी आणायचे आणि थेट अंत्यसंस्कारासाठी न्यायचे ठरले. जेजेतून निघण्यापूर्वी शेजाऱ्यांना फोनवर कल्पना दिली.
‘तापळे साहेबांच्या वडिलांचे आज पहाटे निधन’ चौकाच्या व्हॉटस्ॲपवर ग्रुपवर संदेश पोस्ट झाला होता. अजयचा मित्र सुदेश शेजारच्याच चौकात राहत होता. वेणूने सुदेशची बायको- उषाला ‘अजयचे बाबा गेल्या’चा व्हॉट्‌सॲप केला. अजयसोबत केअर टेकर आणि शववाहिनीचा चालक दोघेच आहेत. नऊ वाजता पोळीभाजी केंद्राजवळ पाच मिनिटे थांबवणार आणि अत्यंसंस्कारासाठी नेणार असल्याचेही तिने मेसेजद्वारे कळविले होते.
चेंबूरमध्ये एकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घरात बायको आणि मुलगी होती. कोणीही मदतीला आले नाही. आई आणि मुलगीलाच खांदा द्यावा लागला. अशाच घटना खारघर आणि बोरिवलीत घडल्याच्या बातम्या वेणूने बहुदा वाचल्या, ऐकल्या असाव्यात. कुणी येईल का? हा प्रश्न तिला पडला असावा. म्हणून तिने काही जणांना व्हॉटसॲपद्वारे कळविले असेल.
लॉकडाऊनमुळे अनेकांची सकाळ दहा- अकरानंतर होऊ लागली होती. त्या दिवशी नेमकी उषाला सकाळी लवकर नऊ- पावणेनऊच्या सुमारास जाग आली. मोबाईल बघितला. तिने सुदेशला उठविले. तो घाईघाईत पोळीभाजी केंद्राकडे धावत गेला. शववाहिनी आली होती. अजयच्या मदतीला तिथे खरंच दोघेच होते. आई आणि सिद्धांत शववाहिनीजवळ आले होते. आर्यन शेजाऱ्यांकडे खेळत होता.
बाबांचे अंत्यदर्शन घेताना आईने हंबरडा फोडला होता. “अजूनं खूप प्रयत्न केलेत... तरीही तुम्ही आम्हाला सोडून चाललात... आमच्यावर रागावलात का? आम्ही तुम्हाला कोल्हापूरला नेऊ शकलो नाही...” आईने हंबरडा फोडला होता.
बाबांना शेवटचे औक्षण केले. शववाहिनी स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. चालकाच्या शेजारी केअर टेकर बसला होता. पार्थिव स्मशानभूमीत सोडून शववाहिनी परस्पर जाणार होती. म्हणून अजयने बाईक घेतली. सुदेश मागे बसला. मेट्रो ट्रेनच्या कामामुळे बराच मोठा वळसा घालून स्मशानभूमीत पोचले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वच आत्मे तिथे शेजारीशेजारी नांदत होते. तोपर्यंत अजयच्या चौकातले पाच- सहा जण तिथे पोहचले होते. एरवी चौकात कुणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्काराला बहुतांश जण येतात. अजयचा ठाण्यात राहणारा चुलत भाऊही थेट स्मशानभूमीत आला होता. तो एकमेव नातेवाईक उपस्थित होता. शववाहिनीमुळे तशीही खांदेकऱ्यांची आवश्यकता नव्हती. अजयने अग्नी दिला. सात- आठ जणांच्या उपस्थितीत सहा बाय तीनच्या चौथऱ्यावर प्रभाकर तापळेंचा भूतलावरचा 80 वर्षांचा लॉकडाऊन संपला.
(या कथेतील पात्रांशी कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तींचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
-जगदीश त्र्यं. मोरे