Monday 4 May 2020

कथा: लॉकडाऊन

लॉकडाऊन
अजयची मुंबई- कोल्हापूर- मुंबई धावपळ सुरू होती. बाबा कोल्हापूरच्या रुग्णालयात होते. पाय घसरण्याचे निमित्त झाले होते. तेही घरातच. पायाचे ऑपरेशन केले. तरीही चित्र फारसे बरे नव्हते. औषधोपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. रुग्णालयाचे बील सहा लाखांवर गेले होते. बाबांची प्रकृती मात्र गंभीर झाली होती. मुंबईत जे. जे. रुग्णालयात हलवले. रुग्णाचे नाव- प्रभाकर तापळे, वय- 80, राहणार- कोल्हापूर... शिरस्त्याप्रमाणे रुग्णालयात भरती करण्याची औपचारिकता पूर्ण झाली.
अजय आणि वेणू नवरा- बायको दोघे नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक. दोघांची धावपळ सारखीच. दोन मुलगे- आर्यन 5 वर्षांचा आणि सिद्धांत 12 वर्षांचा. आर्यन दिवसभर पाळणा घरात असायचा. सिद्धांतला घरात एकटे राहण्याची सवय झाली होती. बाबांना मुंबईत आणल्यामुळे मदतीसाठी अजयच्या दोन्ही बहिणी आल्या होत्या. अजय आणि दोन्ही बहिणी आलटूनपालटून जेजेला रात्रभर थांबत असत.
बाबांना जेजेमध्ये आता महिना झाला होता. डॉक्टर पुरेपूर काळजी घेत होते. बाबांच्या प्रकृतीत मात्र चढउतार सुरूच होता. डिस्चार्ज मिळण्याची कुठलीही चिन्हे दिसत नव्हती. बहिणींना बाबा सोडवत नव्हते; पण दोघींना आपापल्या मुलाबाळांची आणि घरांचीही ओढ लागली होती. अजयचे एकाच वेळी ऑफिस, रुग्णालय आणि घर अशी कसरत सुरू होती. कधी खरे सांगून; तर कधी खोटे बोलून अजय ऑफिसमधून गायब व्हायचा आणि जेजेत जायचा. घर, मुले आणि ऑफिस सांभाळत वेणूचीही धावपळ सुरू आहे.
बाबांना आता जेजेत दीड महिना झाला होता. मोठी बहीण आपल्या गावी पुण्याला; तर लहान बहीण रत्नागिरीला परतली होती. मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या होत्या. काही दिवसांतच अवघा देशच करोनाने आपल्या कवेत घ्यायला सुरूवात केली होती. त्याचा फैलाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाला होता. मुंबईत करोनाचा कहर माजला होता. मुंबई कधी नव्हे ती थबकली होती. बहुतांश भागांत स्मशान शांतात; पण घरात बसलेल्यांच्या आरोग्यासाठी अनेकजण रस्त्यावर येऊन सेवा देत होते. बाहेर पडल्यावर करोना नकळत आपल्यात शिरतो, असा ॲनिमेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत होता.
डॉक्टर, नर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी करोनाशी लढत होते. जनजागृती सुरू होती. सेलेब्रेटी आपापल्या महालांमधून संदेश देत होते-  बाहेर पडू नका... घरातच थांबा... सुरक्षित रहा! बाहेर पडू नका अंगणातही येण्याची सोय नाही. मुंबईकरांच्या घराला अंगण नाही आणि अंगण असलेल्यांना घर नाही. फुटपाथ हेच अंगण आणि तेच घर! तेच फुटपाथ रिकामे केले जात होते. सोशल मीडियावर गरिबांना मदत करण्यासंदर्भातल्या आवाहनाच्या पोष्टी टाकणाऱ्यांच्या सोसायट्यांच्या गेटच्या आत कुणालाच शिरकाव नव्हता. मायानगरी कधीच भयनगरी झाली होती. जेजेत जाताना अजय हेच अनुभवत होता.
बहिणी आपापल्या गावी गेल्यामुळे रुग्णालयात बाबांजवळ एक दिवस तो; एक दिवस आई, असा रात्रक्रम सुरू होता. अजय आईला रात्री गाडीने जेजेत सोडून आला होता. सकाळी उठल्या उठल्या त्याने टीव्ही लावला. आई टॅक्सीने घरी आली.टॅक्सी चालकाला करोनाची बाधा टीव्हीवर बातमी सुरू होती.
टीव्हीवर, सोशल मीडियावर संदेश येत होते- साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक आणि दहा वर्षांच्या आतील बाळांना जपा. घराबाहेर पडू देऊ नका. रुग्णालयांतील डॉक्टर आणि नर्सनाच करोनाचा संसर्ग होत असल्याच्या बातम्यांनी जीव कासावीस होऊ लागला होता. आईचे वय सत्तरी पार आणि घरात बाळ. बाबांच्या वेदना दिवसागणिक वाढल्या होता. डॉक्टर, नर्सची ये-जा वाढली होती.
बाबांचे उच्चार अस्पष्ट झाले होते. मला गावी घेऊन चला. इथं मरण नको, असंच ते म्हणत असावेत, हे आईने ताडले होते. बाबांचे मुंबईशी जुने नाते. सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांच्या नोकरीची सुरुवात मंत्रालयातूनच झाली होती. काही वर्षे त्यांनी इथेच काढली होती. मुलगाही आता मुंबईत आहे. दुसऱ्या पिढीमुळे मुंबईशी नाते घट्ट झाले होते. कोल्हापूरच्या मातीशी असलेली नाळ मात्र बाबांनी तोडलेली नव्हती.
तापळे कुटुंबियांची दगदग काही करता कमी होईना. पुण्याहून, रत्नागिरीहून बहिणी, भाऊजी, भाच्यांचे फोन येत असत. बाबांच्या प्रकृतीची सारखी चौकशी करत. बाबांची प्रकृती मात्र चिंताजनक झाली होती. अजयचा मोबाईल खणखणला... त्याने स्क्रीनवर नजर टाकली... पुण्याच्या भाच्याचे नाव दिसले... किरण! मोबाईल उचलला... कानाला लावला... किरण रडायला लागला. अजय धीर देत म्हणाला, अरे, बाबांची प्रकृती ठीक आहे. रडू नकोस.
मामा, बाबा गेले!
अरे बाळा, असं बोलू नकोस. बाबांना काहीही झालेलं नाही. मी बाबांजवळच आहे, बाबांच्या चेहऱ्याकडे कटाक्ष टाकत अजयने खुलासा केला.  
मामा, तसं नाही. माझे बाबा
किरणला अजयने मध्येच थांबविले. नाही तरी किरणच्या तोंडून शब्द फूटत नव्हते आणि अजयच्या कानांना ऐकवत नव्हते. विचित्र घटना घडल्याचा अजयला अंदाज आला होता. किरण प्रचंड घाबरला होता. अजय कापऱ्या स्वरात म्हणला, बाळा, तुला काय सांगायचं आहे? रडू नकोस... व्यवस्थित सांग मला
मामा, माझ्या बाबांना हार्टॲटक आला आणि ते गेले हे ऐकल्या ऐकल्या अजयला स्वत:लाही सावरणे अवघड झाले होते.
जावई अकाली गेल्याची वार्ता आईला सांगायची कशी? या प्रश्नाने अजयच्या मनात काहूर माजले होते. अजय कसाबसा घरी आला. त्याच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते. जड अंत:करणाने आईला सांगितले. आई कोसळलीच. देवा! इतका निष्ठूर कसा रे तू? माझ्या लेकीऐवजी माझं कुंकू पुसलं असतंस तरी चाललं असतं रे भगवंता! 
आईला इकडे बाबांनाही सोडता येत नव्हते. तिकडेही जाता येत नव्हते. अजय आणि वेणू आईला धीर देत असताना लहान बहिणीचा फोन आला. तिनेही आईला सावरण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा गहिवर दाटून आला होता. अजयने मुलांना शेजाऱ्यांकडे सोडले. आईला जेजेत बाबांजवळ पाठविले. तो आणि वेणू गाडीने पुण्याला निघाले. अजय गाडी चालवत होता. ठिकठिकाणी करोनाची दहशत आणि लॉकडाऊनचा परिणाम जाणवत होता. रस्ते सुनसान होते. पोलिसांशिवाय कुणीही नव्हते. प्रत्येक ठिकाणी ऑफिसचे ओळखपत्र आणि वास्तव कारण सांगितल्यावर नाकाबंदीतून सुटका करून घेताना अजयच्या नाकी नऊ येत होते. तिकडे त्यांची वाट बघत होते. शेवटी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली. अजय आणि वेणूला अंत्यदर्शन घेता यावे म्हणून स्मशानभूमीच्या अलीकडेच कात्रज बायपासवर अंत्ययात्रा पाच मिनिटांसाठी थांबविली. ते तिथे पोचले. अंत्यदर्शन घेतले. शहरातले करोनाचे कंटेन्मेंट झोन भेदणे अवघड होते. त्यामुळे घरी जाऊन बहिणीचं सांत्वन न करताच अजय आणि रेणूने बायपासवरूनच गाडी मुंबईकडे वळवली.
पुण्यातही करोनाची परिस्थिती गंभीर होती; पण मुंबईची परिस्थिती आता अधिक चिंताजनक झाली होती. सर्वत्र भीतीचे सावट होते. टारगट पोरं मात्र हिंडताना दिसत होते. काही जण गच्चीवर एकत्र येत होते. गप्पा झोडत होते. करोना शहरात पोचला होता; पण त्याचे गांभीर्य काही लोकांपर्यंत पोचलेले दिसत नव्हते. वेगवेगळ्या पद्धतीने टारगट लोकांना समजविण्याचा प्रयत्न सुरू होता; पण काही लोकांच्या डोक्यात प्रकाशच पडत नव्हता. टाळ्या, थाळ्या वाजवून झाल्या होत्या. दिवे लाऊन झाले होते. करोना योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात होती. कामाशिवाय फिरणाऱ्यांना समाज माध्यमांतून उपाहासात्मक श्रद्धांजलीही अर्पण करण्यात येत होती; पण उनाड लोकांना तीही थट्टाच वाटत होती. उपहासात्मक श्रद्धांजली प्रत्यक्षात आणण्याची त्यांना घाई झाली असावी.
संचार बंदी असली तरी संसार बंदी नव्हती आणि दु:खाचा डोंगर असला तरी अजयला जीवनावश्यक गोष्टींसाठीदेखील बाहेर पडणे आवश्यक होते. मोठ्या रांगा असलेल्या बऱ्याच ठिकाणी पोलिसांच्या धाकाने सोशल डिस्टन्सिंग पाळले जाऊ लागले होते. कमी गर्दीच्या ठिकाणी मात्र गांभीर्य दिसत नव्हते. दोघे- तिघेच गिऱ्हाईक असलेल्या एका डेअरीवर अजय गेला. त्याने सोशल डिस्टन्सिंग पाळत मिळेल ते दूध घेतले. कारण नेहमीचा दूधवाला गावी निघून गेला होता. दूध विक्रेत्याला 100 रुपये दिले. 40 रुपये परत घ्यायचे होते. दोन मिनिटे थांबा. तुमचे उरलेले पैसे देतो, विक्रेता म्हणाला. अजय जरा दूर जाऊन थांबला. दोन- तीन गिऱ्हाईकांनंतर पैसे परत करण्यासाठी दूधवाल्याने त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो जवळ येऊ पाहतो तोच एक जण पटकन पुढे आला. त्याने दूध घेतले. अजय दूरच थांबला. पुन्हा जवळ जाऊ लागताच आणखी एक जण घुसला. हा पुन्हा जागेवर थांबला. पुन:पुन्हा तेच चित्र. आता अजय वैतागला, अहो मॅडम, मी इथं उगाचच थांबलेलो नाही. जरा अंतर ठेवा. थोडा वेळ थांबा.
मला काय करोनाबिरोना झालेला नाही. दूध घ्यायला आलेल्या शिकल्यासवरलेल्या गृहिणी संतापल्या.
मी कुठं म्हणालो तुम्हाला करोना झालाय असं. नियम पाळावेत, एवढीच अपेक्षा आहे.
एवढं का घाबरता तुम्ही? घाबरत असाल तर कशाला घराच्या बाहेर पडता? त्या गृहिणी तुच्छतेने बोलल्या. अजयला मात्र त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावेसे वाटले नाही. आधीच कुटुंबावरच्या संकटांनी त्याचा शक्तिपात झाला होता. त्यांना त्याने आधी दूध घेऊ दिले.
अजयने चहा घेतला आणि तो लवकर जेजेत गेला. तो राहत असलेल्या वसाहतीतल्या चौकातल्या ग्रुपवर मेसेज आला- आपल्या चौकातल्या- इमारतीतल्या तळ मजल्यावरील दट्टेवार यांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांना पोलिस आणि डॉक्टर घेऊन गेलेत. त्यांना पंधरा दिवसांपासून क्वारंटाईन केलं होतं. हे वाचून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर बायको, पोरं, आई, बाबा आणि रुग्णालयातली ये-जा, हे सगळे चित्र झर्रकन येऊन गेले.
डॉक्टरांशी बोलून अजय लवकरच घरी आला. संपूर्ण चौक सील करण्याची तयारी सुरू होती. तोपर्यंत अफवांचे प्रचंड पिक आले होते. दट्टेवार कुटुंबातील सर्वांचे नमुने पॉझिटिव्ह आले… दट्टेवार वसाहतीभर फिरत होते... किरणा दुकानावर जाऊन आले... दूधवाल्याकडे रोज जात होते. कुठलीही खात्री न करता वसाहतीतले लोक आपसात असे मेसेज व्हॉट्सॲपवर बिनधास्तपणे फॉरवर्ड करत होते. दट्टेवार कुटुंबातील दोघे- तिघे पॉझिटिव्ह निघालेत म्हणून चौक सील करण्यात आला, हे खरे असले तरी त्यांच्याबाबतचे अन्य बहुतांश मेसेज म्हणजे वावड्या आणि फेक न्यूजच होत्या. आधीच एकामागून एक संकटे येत असताना करोना आपल्या दारापर्यंत येऊन पोचल्याने तापळे कुटुंबियांची पाचावर धारण बसली होती. त्यांचा परिसर आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाला होता. येण्या- जाण्यावर बंधने आली होती.
बाबांचीही प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये हलविले होते. वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक झाले होते. जेजेत जाणे- येणे सोपे राहिलेले नव्होते. करोनाची दहशतही वाढली होती. म्हणून आता जेजेत बाबांसाठी केअर टेकरची व्यवस्था केली होती.   
अजय रात्री उशिरा बारा- साडेबाराच्या सुमारास रुग्णालयातून घरी आला. आई घरीच होती. तिने अजयच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता हेरली होती. अजयने हातावर सॅनिटायझर घेतले. अंगावरचे कपडे डेटॉलमध्ये टाकले. आंघोळ केली. खाण्याची इच्छा नव्हती. दोनचार घास तोंडात कोंबले. पलंगावर आडवा झाला. झोप येत नव्हती. कधी तरी डोळे लागले.
पहाटे साडेचारच्या सुमारास रुग्णालयातून केअर टेकरचा फोन आला, साहेब, पटकन निघा.  
अजयला अंदाज आला होता. आईला उठवले. तो म्हणाला, आम्ही, हॉस्पिटलला जाऊन येतो. मुलं झोपली आहेत. त्यांना झोपू दे.
एवढ्या पहाटे का?
फोन आला होता. बाबांना त्रास होतोय.
मला खरं सांग. काय झालं? आई कासावीस झाली.
मी पोहचल्यावर लगेच फोन करतो.
आईच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. नवऱ्याच्या वेदना आणि करोनाच्या दहशतीमुळे मुलाची दगदग तिला पाहवत नव्हती. स्वत:च्या कपाळावर तिने हळूच हात फिरवित आपलं कुंकू शाबित असल्याची खात्री करून घेतली. तरीही तिला आपण काही तरी गमवत असल्याच्या दु:खाची चाहूल लागली होती.
लॉकडाऊनमुळे मुंबईत सर्वत्र पक्ष्यांचा मुक्त संचार गेल्या काही दिवसांपासून जाणवत होतो. पेडर रोड आणि मलबार हिलच्या परिसरात मोर दिसू लागले होते. कदाचित राजभवनाचा पिंजरा त्यांनी ओलांडला असावा. जेजे रुग्णालयाच्या परिसरातील झाडांवरच्या पक्ष्यांचाही किलबिलाट जोरात जाणवू लागला होता. तो आज जरा जास्तच होता. पहाटेचे पाच वाजले होते. अजय आणि वेणू रुग्णालयात पोचले. बाबांचे डोळे मिटलेले होते. डॉक्टर म्हणाले, बाबांचे प्राण आता देहाच्या पिंजऱ्यात नाहीत...  
अजयला क्षणभर काहीच सुचले नाही. वेणूने बाबांच्या मस्तकावरून हात फिरवला. तिला किंचितशी हालचाल जाणवली. ती उद्‌गारली, डॉक्टर बाबांना काहीही झालेलं नाही. लवकर काही तरी करा. श्वासोच्छ्‌वास सुरू आहे.
मॅडम, अद्याप व्हेंटिलेटर काढलेले नाही. ते काढल्यावर... डॉक्टरांनी समजावले.
अजय हुंदके देत होता. आता काय करावे? त्याला प्रश्न पडला होता. सगळे रुग्णालयीन सोपस्कार पार पाडले. अंत्यसंस्कार कुठे करावेत? नवा प्रश्न उभा ठाकला होता. तो वेणूला म्हणाला, आपण बाबांना घेऊन कोल्हापूरला जाऊ. शववाहिनीने 400 किलो मीटरचा रस्ता सहा- सात तासात पार करू. नाही तरी रस्ते ओसच आहेत.
पार्थिव नेण्यास हरकत नाही. दु:खद प्रसंगी लॉकडाऊनचीही अडचण येणार नाही; पण गावातल्या लोकांच्या साशंक नजरांना तोंड कसं देणारं? किती लोकांकडे खुलासे करणार की, माझ्या बाबांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झाला नसला तरी किती नातेवाईक विश्वास ठेवणार? सध्याच्या काळात सगळेच मृत्यू करोनामुळे झालेले नसतात, हे किती जण समजून घेतील? वेणू प्रश्नांची सरबत्ती करत अजयला समजावत होती.
आपल्याकडं मृत्यूचं कारण नमूद केलेलं जेजेचं सर्टिफिकेट आहे. ते आपण दाखवू, अजय स्वत:च्या मनाच्या समाधानासाठी काही तरी पुटपुटला.
आपल्याकडं सर्टिफिकिट आहे दाखविण्यासाठी; पण तरीही नातेवाईक शासंक असतील. लोकांनी आधीच गावा-शहरांत शिरणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. ती त्यांच्या दृष्टीने दक्षता असेल. दक्षता घेण्यात मला चूक वाटत नाही; पण पुण्या- मुंबईहून येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत करोना आणत असल्याचा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. त्यात आपण मुंबईहून डेडबॉडी घेऊन जातोय. शिवाय जाताना शासकीय यंत्रणेकडून क्वारंटाईनचा शिक्का हातावर मारला जाऊ शकतो. तोही दक्षतेचा उपाय आहे. त्यात वावगं काहीही नाही. आपल्यासाठी झटणाऱ्या यंत्रणेला आपणही सहकार्य करायला तर हवेच; पण हे सारं लोक कसं समजून घेणार? आधीच आपण अनेक मोठ्या संकटातून जात आहोत. त्यात पुन्हा प्रवासात आणि गावात नवीन संकटं नकोत.
तुझं म्हणणं पटतंय मला; पण बाबांची शेवटची इच्छा कोल्हापूरला जाण्याची होती. ती मी पूर्ण करू शकत नाही. बाबांच्या मृत्यूएवढंच मला हे भयंकर वाटतंय, अजयला आता आपली मती लॉकडाऊन झाल्याचा भास झाला होता.  
अखेरीस त्याने स्वत:ला सावरले. मुंबईतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. थेट स्मशानभूमीत जाण्याऐवजी चौकाच्या अलीकडेच कंटेन्मेंट झोनच्या सीमेवर शववाहिनी थांबवायची. तिथल्या पोळीभाजी केंद्राजवळ आईला शेवटच्या दर्शनासाठी आणायचे आणि थेट अंत्यसंस्कारासाठी न्यायचे ठरले. जेजेतून निघण्यापूर्वी शेजाऱ्यांना फोनवर कल्पना दिली.
तापळे साहेबांच्या वडिलांचे आज पहाटे निधनचौकाच्या व्हॉटस्ॲपवर ग्रुपवर संदेश पोस्ट झाला होता. अजयचा मित्र सुदेश शेजारच्याच चौकात राहत होता. वेणूने सुदेशची बायको- उषाला अजयचे बाबा गेल्याचा व्हॉट्‌सॲप केला. अजयसोबत केअर टेकर आणि शववाहिनीचा चालक दोघेच आहेत. नऊ वाजता पोळीभाजी केंद्राजवळ पाच मिनिटे थांबवणार आणि अत्यंसंस्कारासाठी नेणार असल्याचेही तिने मेसेजद्वारे कळविले होते.
चेंबूरमध्ये एकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घरात बायको आणि मुलगी होती. कोणीही मदतीला आले नाही. आई आणि मुलगीलाच खांदा द्यावा लागला. अशाच घटना खारघर आणि बोरिवलीत घडल्याच्या बातम्या वेणूने बहुदा वाचल्या, ऐकल्या असाव्यात. कुणी येईल का? हा प्रश्न तिला पडला असावा. म्हणून तिने काही जणांना व्हॉटसॲपद्वारे कळविले असेल.
लॉकडाऊनमुळे अनेकांची सकाळ दहा- अकरानंतर होऊ लागली होती. त्या दिवशी नेमकी उषाला सकाळी लवकर नऊ- पावणेनऊच्या सुमारास जाग आली. मोबाईल बघितला. तिने सुदेशला उठविले. तो घाईघाईत पोळीभाजी केंद्राकडे धावत गेला. शववाहिनी आली होती. अजयच्या मदतीला तिथे खरंच दोघेच होते. आई आणि सिद्धांत शववाहिनीजवळ आले होते. आर्यन शेजाऱ्यांकडे खेळत होता.
बाबांचे अंत्यदर्शन घेताना आईने हंबरडा फोडला होता. अजूनं खूप प्रयत्न केलेत... तरीही तुम्ही आम्हाला सोडून चाललात... आमच्यावर रागावलात का? आम्ही तुम्हाला कोल्हापूरला नेऊ शकलो नाही... आईने हंबरडा फोडला होता.
बाबांना शेवटचे औक्षण केले. शववाहिनी स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. चालकाच्या शेजारी केअर टेकर बसला होता. पार्थिव स्मशानभूमीत सोडून शववाहिनी परस्पर जाणार होती. म्हणून अजयने बाईक घेतली. सुदेश मागे बसला. मेट्रो ट्रेनच्या कामामुळे बराच मोठा वळसा घालून स्मशानभूमीत पोचले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वच आत्मे तिथे शेजारीशेजारी नांदत होते. तोपर्यंत अजयच्या चौकातले पाच- सहा जण तिथे पोहचले होते. एरवी चौकात कुणाचे निधन झाल्यास अंत्यसंस्काराला बहुतांश जण येतात. अजयचा ठाण्यात राहणारा चुलत भाऊही थेट स्मशानभूमीत आला होता. तो एकमेव नातेवाईक उपस्थित होता. शववाहिनीमुळे तशीही खांदेकऱ्यांची आवश्यकता नव्हती. अजयने अग्नी दिला. सात- आठ जणांच्या उपस्थितीत सहा बाय तीनच्या चौथऱ्यावर प्रभाकर तापळेंचा भूतलावरचा 80 वर्षांचा लॉकडाऊन संपला.
(या कथेतील पात्रांशी कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तींचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
-जगदीश त्र्यं. मोरे

1 comment:

  1. Apratim,such incidents are occurring due to current situation. (covid 19)

    ReplyDelete