Friday, 22 May 2020

सिंगल मिंगल

कनेक्टेड तरुणाई

कैवल्य फिलॉसॉफिचा विद्यार्थी आहे. तो हुशार आहे. तो संवेदनशील आणि कविमनाचा तरुण आहे. शिक्षकांचा लाडका आहे. सामाजिक जाणिवांचे त्याला भान आहे. त्याचे विचार ठाम आहेत. कैवल्याला स्त्रियांविषयी आदर आहे. प्रेमाबाबत मात्र गोंधळेला आहे. मित्राची बहीण- मृणालमध्ये तो गुंतला होता. ती त्याच्याहून वयाने मोठी होती. मृणाल दुसऱ्यासोबत कमिटेड असल्याचे कळल्यावर त्याने स्वत:च गुंता सोडवला. रेवतीकडे झुकताना मात्र तो स्वत:ला रोखू शकला नाही. रेवती शिक्षणासाठी मुंबईत वसतिगृहात राहते. तिचा आई- वडील आणि मुलगी हा त्रिकोण उद्‌ध्वस्त झाला आहे. तिची कौटुंबिक पाश्वर्भूमी बरे बोलण्यासारखी नाही. रेवती संवेदनाच्या पलीकडे गेली आहे. तिला अभ्यासाचा सोस नाही. करियरचा ध्यास नाही. पैसा हीच तिची महत्वकांशा आहे. कैवल्याच्या भवतीने समकालीन तरुणाईचे विश्व उलगडत जाते. समाजमाध्यमांच्या कोंदणात ती फुलत जाते. कथानक वेगवान असले तरी त्यातली रोचकता कुठेही कमी होत नाही. अधिक रसरशीत होत जाते.

श्रीरंजन आवटे यांच्या सिंगल मिंगल कादंबरीचे हे कथासार आहे. कांदबरीची सुरुवात ….आणि तिच्यापासून दूर झालो मी. माझा आवेश संपला. या वाक्याने होते. समकालीन तरुणाईच्या विश्वाची झलक सुरुवातीलाच मिळते. या पिढीच्या पालकांना कदाचित हे रुचणार नाही. पचणार नाही; पण नाकारता येणार नाही. आजची तरुणाई बिनधास्त आहे. तिला आपल्या हक्कांची पुरेपूर जाणीव आहे. थेट राईट टू फरगेटचाही ती विचार करते. विस्मरणाच्या संस्मरणीय सोहळ्यासाठी ही तरुणाई आतुर आहे. तिला ब्रेकअप पार्टीही आनंदाने साजरी करायची आहे. प्रेमभावनांच्या लपंडावाला ती थेट भिडते. लिव्ह-इन रिलेशनशिपच्या युगात व्हर्जिनिटी, पातिव्रत्य, एकनिष्ठता, विवाहसंस्था यातल्या बंदिस्थतेवर ही तरुणाई बोट ठेवते. कालबाह्य झालेल्या गोष्टींना बाय करण्याची धमक दाखविते. नव्या वास्तवतेला आपल्या कवेत घेण्यासाठी धडपडते. ही धडपड चूक की बरोबर यात ही तरुणाई फारशी डोकावत नाही; पण या तरुणाईचे पालक असलेल्या वाचकांचे डोके मात्र गरगरल्याशिवाय राहत नाही.

व्हर्जिनिटी इज नॉट डिग्निटी. इट इज जस्ट लॅक ऑफ ॲपोर्च्युनिटी... असे फेसबूक स्टेटस ठेवायलाही ही पिढी कचरत नाही. शारीरिक, लैंगिक संकल्पनांना नैतिक आणि अनैतिकतेत विभाजित करण्याची या तरुणाईला गरज वाटत नाही. म्हणून ती बेजबाबदार आहे, असेही म्हणता येत नाही, हे कथासूत्राचे गमक आहे. ही तरुणाई गंभीरपणे विचारही करते. अभिजात साहित्य, समाजशास्र, मानसशास्र, तत्वज्ञान, राजकारण, दहशतवाद, नक्षलवाद अशा विविध विषयांवरही ही तरुणाई भाष्य करते. त्यामुळे वाचकाला स्वत:च्या नजरेपेक्षा तरुणांच्या दृष्टिकोनातून समकालीन युवा विश्वाकडे बघण्यास ही कांदबरी भाग पाडते.

सिंगल मिंगलमध्ये हिंग्लिश, मिंग्लिशचा चपखल वापर आहे. सोशल मीडियाची भाषा यातल्या तरुणाईच्या अंगवळणी पडली आहे. अभासी जगात ती मुक्त संचार करते. इमोजीच्या भाषेत ती सहज संवाद साधते. पूर्वग्रहांचे इनबिल्ट सॉफ्टवेअर आपल्यात असते, आपल्या आत असलेले एक धारणांचे सॉफ्टवेअर पीडीएफसारखे न बदलता येणारे असते, कधी तरी कोणाचे तरी म्हणणे आपल्यातल्या नैतिक स्वाफ्टवेअरला अनकंपॅटिबल असते, असे या तरुणाईला वाटते. बाय डिफॉल्ट इन्सस्टॉल होणारी आठवण अनइन्स्टॉल कशी करावी, हा प्रश्नदेखील ही तरुणाई सोडविण्याचे धाडस बाळगते. ही तरुणाई स्मार्ट भासते. असते. तिला माठ असण्याचा न्यूनगंड सतावत नाही. तिला वेगवेगळ्या विचारांचे लाटांचे भय नाही. त्यावर ती स्वार होऊ पाहते. म्हणून तरुण वाचक सिंगल- मिंगलशी लगेच कनेक्ट होऊ शकतो.  

या तरुणाईच्या आधीच्या पिढीपासून या बदलांची सुरुवात झाली होती. तिच्याही आधीच्या पिढीची धाव मात्र मांसाहरी गप्पापर्यंत होती. त्यातले अपवादात्मक तरुण या गप्पांचा टप्पा ओलांडत असत. समकालीन तरुणाई मात्र कामवासनांना बेधडक व्यक्त करते. प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेते. तिच्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे. वस्तुस्थितीच्या जाणिवेबरोबरच भावनांचा हळवेपणादेखील ती जोपासते. आवेश संपला म्हणून तो तिच्यापासून दूर होतो, अशा आशयाच्या निवेदनातून कांदबरीची सुरुवात होते; परंतु वाचक म्हणून कादंबरीचा शेवट करताना आवेशाच्या नादात ही तरुणाई काही तरी तुडवत चालली असल्याची भावना मनात घर करते. अर्थात, हे वाचक सापेक्ष असू शकेल.    

प्रश्न धोरणांचा नाही. तो संस्कारातून निर्माण झालेल्या धारणांचा आहे. या तरूणाईची दिशा योग्य आहे की अयोग्य आहे? यापेक्षा पालकांनी या तरुणाईला कोणत्या संस्कारांतून कोणती दिशा दिली? हा प्रश्न महत्वाचा आहे. पालकांनी अपेक्षित दिशा देण्याचा प्रयत्न केला असेलही; पण ते दिशादर्शनच चुकीचे तर नव्हते ना? किंवा संवाद साधण्यात पालक कमी पडत आहेत का? त्यांना नव्या पिढीच्या संवादाची भाषाच अवगत नाही का? असेही प्रश्न वाचक म्हणून पडू लागतात आणि स्वत:च्याच मनातला कोलाहल उपसण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून सिंगल मिंगल समकालीन तरुणाईचे वास्तव दाखविणारा आरसा ठरते.

         सिंगल मिंगल वाचतानाकोसला आठवली.कोसलातली कथा सुमारे 1960 मधली आहे. ती पुण्यात घडते. सिंगल मिंगलमधली कथा साधरणत: 2015 मधील. 50 दोन्हीतले अंतर 50 वर्षांपेक्षा जास्तीचे आहे. संदर्भ आता बदलले असले तरी जगण्याचे तत्वज्ञानकोसला आजही व्यापून टाकते. कोसलात सांगवीसारख्या खेड्याचे दर्शन होते. तिथली माणसे भेटतात. पुण्यातले महाविद्यालयीन जीवन उभे राहते. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक घटकांतून आलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि त्यांची गरिबी- श्रीमंती, महाविद्यालयाचे गॅदरिंग अशा घटना- प्रसंगातून कोसलाचे कथानक पुढे सरकते. त्यातून तत्कालीन तरुणाईचे दर्शन होते; पण कोसलात शिवीगाळ नाही. लैंगिक-कामुक वर्णने नाहीत. श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा पाळलेल्या दिसतात. तो त्या पिढीचा प्रभाव असेल. सिंगल मिंगलमध्ये मात्र बदलती समकालीन तरुणाई भेटते. सिंगल मिंगलमध्ये कामुक वर्णने भरपूर आहेत. या दोन्ही कादंबऱ्या दोन भिन्न काळांचे डाक्युमेंटेशन आहे. मुद्दा तुलना करण्याचा नाही. काळ परिस्थिती बदलल्यावर काही लिखाण आवडेनाशे होते. कालौघात मागे पडते. कारण त्यात नायकाचा काळ आणि आवकाश प्रतीत झालेला असतो; पण कोसला आजही भावते. असेच मित्रवर्य श्रीच्या सिंगल मिंगलच्या बाबतीतही घडो, हीच सदिच्छा!  

                                                        -जगदीश मोरे


No comments:

Post a Comment