Wednesday, 5 April 2017

फरक पडतो!

मित्रांनो, तुम्ही नागरिकशास्त्राच्या धड्यात महानगरपालिकेचे कार्य आणि जबाबदाऱ्या शिकला आहात. कोण सांगू शकेल बरं ते, जाधव सरांनी विचारलं.
विनित बोट वर करत म्हणाला, सर महानगरपालिका आपल्या शहराची स्वच्छता राखते. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरविते...
बरोबर, आपल्याकडे शहरी आणि ग्रामीण अशा दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती या शहरी; तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थांवर गाव आणि शहरातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबरोबरच रस्ते, परिवहन, पाणी पुरवठा, जन्म- मृत्यूच्या नोंदी, रस्त्यांवरील दिवाबत्ती इ. पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असते, सरांनी अधिक तपशीलवारपणे स्पष्ट केलं.
वर्गभर नजर फिरवत जाधव सरांनी पुन्हा बोलायला सुरवात केली, विद्यार्थ्यांनो, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेला म्युनिसिपालिटी असं म्हणतात. मध्यम व गरीब वर्गातल्या लोकांच्या जिविताचा आणि म्युनिसिपालिटीचा अगदी निकटचा संबंध आहे. म्युनिसिपालिटीचा कारभार मध्यम व गरीब वर्गाच्या प्रतिनिधींच्या तंत्रानेच चालला पाहिजे.असं भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या 1 मार्च 1929 च्या अग्रलेखात नमूद केलं आहे. सर्वसामान्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था किती महत्वाच्या आहेत, हे आजही नव्यानं सांगण्याची गरज नाही.
सर, पण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असं का म्हणतात? ऊर्वीनं विचारलं.  
सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा पुरविण्याचं काम या लोकनियुक्त संस्था करतात. म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाम्हणतात.
सर, गांधीजींचे स्वराज्याविषयीचे विचार आम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहेत. सलीम म्हणला.
सलीमकडं कटाक्ष टाकत जाधव सर म्हणाले बाळा, बरोबर! गांधीजींनी स्वराज्यासाठी अहिंसक मार्गानं मोठा लढा दिला. इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र करणं म्हणजे स्वराज्य मिळवणं, याचा अर्थ आपलं स्वत:चं राज्य म्हणजे स्वराज्य. गांधीजींनी पंचायत व्यवस्थेवरही मोठा भर दिला होता. ते म्हणतं की, प्रत्येक गाव एक गणतंत्र असेल व तिथं पंचायत असेल. तिला सर्वाधिकार असतील. भारताच्या खऱ्या लोकशाहीत प्रत्येक गावाला एक घटक मानलं जाईल. पंचायतीचा कारभार त्याच गावातील लोक पाहतील.ग्रामपंचायत असो किंवा महानगरपालिका तिचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत चालविणं म्हणजे ती स्वतंत्र असणं, असा त्याचा अर्थ घेता येईल.
विनितला पुन्हा प्रश्न पडला, सर, लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणजे काय?
मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधी किंवा त्यालाच लोकप्रतिनिधी असंही म्हणतात. 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असतो. त्यासाठी मतदार यादीत नाव असावं लागतं. मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क प्राप्त होतो. सरांनी स्पष्ट केलं.
सर, मतदान नाही केलं तर काय फरक पडतो. दोघा- तिघांनी एका सुरात विचालं.
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे। आपुल्या मतावरीच साचे।
एकेक मत लाखमोलाचे। ओळखावे याचे महिमान।।
मत हे दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर।
तरी आपुलीची उलटता वार आपणावर शेवटी।।
सरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओव्या म्हणत सुरवात केली, बाळांनो, परीक्षेत रिकाम्या जागा भरा यातलं एखादं उत्तर अपूर्ण राहिलं किंवा एखादं गणित चुकलं तर तुमच्या एकूण गुणांमध्ये फरक पडतो. अशा एकेका गुणाचे प्रश्न सोडवायचे राहिल्यास तुमच्या एकूण गुणांची टक्केवारी कमी होते. दहावी किंवा बारावीत एक गुण कमी मिळाला म्हणून आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास काय होते ? सरांनी विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारला.
सर, संपूर्ण आयुष्यावर फरक पडतो. विद्यार्थींनी एकसाथ उत्तर दिले.
फरक पडतो ना! तसाच फरक एका मतानंही पडतो. एका मतानं आपल्या गावाचं, शहराचं पर्यायानं देशाचं भविष्य बदलू शकतं. थोडक्यात आपल्या गावाचं किंवा शहराचं भवितव्य आपल्या हातात असतं.
अबोल असलेल्या प्रवीणनं हळूच विचारलं, सर, ते कसं?
बाळांनो, तुम्ही अजून मतदार नसला तरी तुमचे आई-वडील, आजी- आजोबा कदाचित मोठे भाऊ- बहीण मतदार असतील. या प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. शिवाय ते फार विचारपूर्वक करायला हवं. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये. गिफ्ट किंवा पैशांच्या स्वरुपात आपल्या मताची किंमत करू नये. आपलं मत योग्य त्या उमेदवाराला दिलं पाहिजे. चांगले उमेदवार विजयी झाल्यास शहराचं किंवा गावाचं भविष्य बदलू शकतं. गंभीर चेहरा करत जाधव सर समजवून सांगत होते.
सर, मतदानाच्या दिवशी बाबांना आणि आईला एकाच दिवशी सुट्टी मिळते. त्यामुळे आम्ही पिकनिकला जातो. स्वातीनं उत्साहात सांगितलं.
बाळा, यात तुझी चूक नाही. तुला अजून मोठं व्हायचं आहे; पण तुझ्या आई- बाबांना सांग की, आपण हक्कांसोबतच कर्तव्यदेखील निभावले पाहिजे. मतदानामध्ये हक्क आणि कर्तव्य दोन्ही सामावले आहेत. भारतीय संविधानानं आपल्याला हा हक्क दिला आहे. सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आधी मतदान करा मगच पिकनिकला जाऊ, असा आई- बाबांकडं आग्रह धरा. तर मग सांगाल ना बाळांनो, आपल्या आई- बाबांना मतदान करायला; कारण एका गुणाप्रमाणेच एका मतानंही फरक पडतो!

No comments:

Post a Comment