`तारांगण`च्या दिवाळी अंकात माझा हा लेख प्रसिद्ध
झाला होता. निवडणुकांच्या धामधुमीत ब्लॉगवर अपलोड करायला विसरलो होतो...
सैराटनंही कोटीची उड्डाणं घेतली. त्यानं मराठी चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राचं
अवघं समाजमन व्यापून टाकलं. अनेक वस्तू, पदर्थांचं सैराट असं नामकरण झालं. बॉलिहुडलाही भूरळ घातली. सैराटनं तिकीट खिडक्या व्यापल्यानं
अन्य मराठी हींदी चित्रपटांना फटका बसला. काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या नियोजित तारखाही बदलाव्या
लागल्या आणि अवघं विश्वच सैराट झालं!
“अरे, फँड्री! आर्चीला घेऊन ये”
“आर्चीला नेलंय”
“परश्या आहे का?”
“नाही.”
“मग, गोल्डन ईगल आणि झिंगाटला घेऊन ये.”
“झिंगाट नको, गोल्डन ईगल आणि अँड्रॉईडला आणतो.”
“आण लवकर. सिराज हाय इथं”
माथेरानच्या दस्तुरी नाक्यावरच्या घोडेवाल्यांचा
हा संवाद गुदगुल्या करत होता! हिरवी गर्द झाडी,
दाटून आलेलं काळभोर आभाळ आणि गच्च धुकं होतं. पावसाचे टप्पोरे थेंब टपाटपा
झाडाझुडपांच्या पानांवर कोसळत होते. मऊ तुषारांच्या स्वरुपात पानांवरून खाली येताना
त्यांना आम्ही अलद अंगावर झेलत होतो. तुषारांच्या तृप्तीत न्हाऊन निघालो होतो.
घोड्यांची नावं आणि त्या नावांच्या
संदर्भामुळे प्रसन्नतेला विनोदाची फोडणी होती. तव्यावर तडतडणाऱ्या पाण्यांच्या
थेंबांप्रमाणे अधूनमधून झाडांच्या गर्दीतून थेट लाल मातीवरच्या विस्तीर्ण भूतव्यावर
कोसळणारे थेंब थुईथुई नाचत होते. टप टप टापा टाकीत घोडे चालत होते. थुईथुई
नाचणाऱ्या थेंबांना टापांच्या लयबद्ध स्वरांची साथ होती. काही पर्यटक ‘नेटवर्क’, ‘वायफाय’ आणि ‘गुगल’वर स्वार होऊन मार्गस्थ झाले होते.
पाठोपाठ आम्ही गोल्डन ईगल, अँड्रॉइड आणि सिराजवर स्वार होऊन माथेरानच्या दिशेनं
प्रस्थान केलं.
एक घोडेवाला चाळीशीतला होता. दुसरा
तेरा- चौदा वर्षांचा असेल. त्याचं नाव होतं ‘फँड्री’. त्याला विचारलं, “तुला फँड्री का म्हणतात.”
“माहीत नाही. चिडवतात ते मला.”
चिडवणाऱ्याला विचारलं, “का
चिडवता याला.”
“कुणी तरी याला एकदा फॅंड्री म्हटलं. तेव्हापासून
आम्हीबी त्याला फॅंड्री म्हणतो.”
“काय अर्थ आहे ‘फँड्री’चा”
“कुणाला माहीत साहेब”
“आर्ची परश्या तरी माहीत आहेत का?”
“काय साहेब, टिंगल करताय गरिबाची?”
“सैराट माहीत नाही, असा कुणी आहे का?”
मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर
आणि सुमद्र सपाटीपासून 2,625 फूट उंचावरील प्रसिद्ध थंड हवेचं पर्टन स्थळ म्हणजे
माथेरान. 1907 मध्ये इथं टॉय ट्रेन आली. सध्या ती
रुळांवरून घसरली आहे. तशी ती आता कधी कधी रुळांवर असते. टॉय ट्रेन आणि घोडे हेच
इथंल्या दळणवळणाचं मुख्य साधन. रुळांशी नातं असलेली इथंली माणसं आता आपल्या
रोजच्या जगण्याचं नातं रिळांशी जुळवू पाहत आहेत; पण सैराटचा फारच भन्नाट प्रभाव जाणवला.
काळानुरूप सिनेमाच्या यशाच्या परिमाणाची
परिभाषाही बदलली आहे.
‘किती आठवडे?’ चालला ऐवजी ‘किती कोटी कमविले?’
हे परिमाण आलं. ‘हंड्रेड करोर क्लब’ नावाच्या संकल्पनेचा जन्म झाला. एकाच वेळी हजारो स्क्रिनवरी
प्रदर्शित करून अल्पावधित कोटीच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्या सिनेमांची चर्चा कानावर येते
आणि जाते. ‘शॉर्ट मेमरी लॉस’ चा अनुभव येतो. सैराट मात्र या सगळ्यांना अपवाद ठरला आहे. सैराटनंही कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. त्यानं मराठी चित्रपटसृष्टी आणि महाराष्ट्राचं अवघं समाजमन व्यापून टाकलं. ढवळून काढलं. अनेक वस्तू, पदर्थांचं सैराट असं नामकरण झालं. बॉलिहूडलाही भूरळ घातली. सैराटच्या तिकीट खिडकीवरील
कमाईचा झटका अन्य मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांनाही बसला. काही सिनेमांच्या नियोजित प्रदर्शनाच्या तारखाही बदलाव्या
लागल्या आणि अवघं विश्वच सैराट झालं!
अनेक जण आर्ची आणि परश्यात स्वत:चा शोध घेऊ लागले. बरेच जण रोचक आणि रोमांचक प्रेमकहाणीत हरखून केले. काहींना ग्रामीण बोलीनं आकर्षित केलं. काहींना नागराज मंजुळेंनी विषमतेवर ठेवलेलं
बोटं दिसलं. काहींना समतेचा संदेश दिसला. काहींना आपल्या समाजाची होणारी बदनामी खेदजनक वाटली. काहींना अभ्यासाच्या वयात प्रेमाचे उद्याग करणाऱ्या विद्यार्थ्यांनामुळे
संस्कारांची झालेली माती दिसली. तरीही सिनेमागृहात प्रेक्षक
झिंगाट होत होते. त्याचवेळी काही जणांकडून समाज माध्यमाद्वारे
नागराजविषयी संतापही व्यक्त होत होता. काही जण तर सिनेमा पाहूच नका, असा अनाहूत सल्लाही देत
होते; पण अशा सल्ल्यांना बॉक्स ऑफिसनं झुगारलं. विरोधकांना न जुमानता सैराट सुसाट धावला.
सैराट प्रदर्शित होऊन आता जवळपास सहा
महिने उलटतील; पण तो अजूनही अवघ्या मराठी आणि हिंदी
चित्रपटसृष्टीवर राज करतोय. त्याच्या यशाची गणितं
सोडवण्याचा प्रयत्न जो तो आपापल्या परिनं करतोय. सिनेमा नागराजचा आहे, यात वादच नाही; काहींच्या मते अजय-अतुलचा यशात मोठा वाटा आहे. ‘झी’मुळे यशाचं शिखर गाठलं, असंही काहींना वाटतं. खरं तर झीचा हा काही
पहिलाच सिनेमा नव्हता, असो! सर्वांच्या पलीकडं सैराटनं वेगळ्या अर्थानं सर्वसामान्यांचंही जीवन व्यापलं आहे. मनोरंजनापांसून खाद्यपदार्थं, विविध वस्तू आणि सामाजिक मंथनापर्यंत ‘सैराट’चं अस्तित्व जाणवतं.
लेखक, दिग्दर्शक जनार्दन लवंगारे यांनी ‘आर्ची परशा झिंगा’ नावानं मराठी रंगभूमीवर नाटकही आणलं आहे. मनोरंजनात्मक किंवा सिनेसृष्टीशीनिगडित पुरस्कार प्रदान समारंभ सैराटशिवाय पूर्णच
होत नाही. मनोरंजन वाहिन्यांवर आजही विविध रियालिटी
शो आणि मालिकांमध्ये सैराटचा प्रभाव दिसतो. डान्स शोमध्ये ‘झिंग… झिंग… झिंगाट….’वर स्पर्धकांची पावलं थिरकल्याशिवाय राहत नाहीत. मालिकांमध्ये रोमांटिक सीन दाखवताना सैराटची पार्श्वधून असते, हे फक्त मराठी मनोरंजन क्षेत्राबाबत नाही, तर सैराटची ही जादू हिंदी वाहिन्यांवरही छा गई है. मग तो ‘चला हवा येऊ द्या’ असो की कपिलचा शो असो, सर्वत्र अधून मधून आजही झिंगाटवर अनेक जण थिरकताना दिसतात. सलमान, शारुख, जॉन, वरूण, अक्षय आदी सर्वच जण ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झिंगाट झाल्याचं आपण पाहिलं आहे.
नागराज मंजुळेंचे सिनेमे असो अथवा कविता, ‘माणूस’ हाच केंद्रस्थानी असतो. विषमतेवरचा प्रहार हे त्यांच्या निर्मितीचं वैशिष्ट्ये
असतं. त्याला सैराट तरी कसा अपवाद असणार. ‘ऑनर किलिंग’वर
पुन्हा चर्चा झाली. काहींना सैराटचा दुखान्त प्रबोधनात्मक
वाटला. काहींना तो डिवचल्यासारखा भासला. सैराटचं कौतुक झालं; तसा विरोधाचा अंतरप्रवाही तेवढाच तीव्र होता, हे खरे. मुलुंडच्या वझे
महाविद्यालयात सैराटचा समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या वेध घेण्यासाठी ‘अभ्यासकाच्या दृष्टीतून सैराट’ या परिसंवादाचं गेल्याच आठवड्यात आयोजन करण्यात आलं
होतं. या सिनेमाच्या सामाजिक संदर्भांचा आंतरशाखीय वेध घेण्याचा प्रयत्न विविध
मान्यवरांनी केला.
“सैराट हा एक विचार आहे.”, असं नागराज सांगतात. डोक्यात जाणारा हा विचार आता पोटातही जाऊ लागला आहे. नाशिक- त्र्यंबक रोडवर सैराट
नावानं हॉटेल सुरु झालं आहे. नाशिकात सिटी सेंटर मॉलजवळ
सैराट मिसळ मिळू लागली आहे. तिथंच प्रत्येकीला आर्ची
बनविण्यासाठी ब्युटिपार्लरही सुरू झालं आहे. अनेकांना तरतरीत करण्यासाठी ‘सैराट मोसंबी’ आणि ‘झिंगाट संत्रा’ नावानं देशी ब्रँडही आले आहेत. ‘सैराट कुरकुरे’ बाजारात आल्याने मुलांच्या खाऊ सोबत अनेकांच्या चखण्याचीही सोय झाली आहे.
‘नवरात्रोत्सवात सैराट बॉम्बचे आवाहन’ ही बातमी नुकतीच एका वृत्तपत्रात वाचली. दांडियाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईला अमली पदार्थांकडे
आकर्षित करण्यासाठी ‘सैराट बॉम्ब’ नावाने अमली पदार्थ विकण्यास सुरवात झाली होती. त्यावर पोलिसांनी वेळीच करडी नजर ठेवल्याचे बातमीत म्हटले
आहे. दिवाळीत फुटणारे फटाक्यांचे बॉम्बही
सैराट, झिंगाट, आर्ची, परश्या नावाने नसले तरच नवल!
सैराटच्या चित्रिकरणाच्या ठिकाणांना
पर्यटन स्थळांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. उजणीचा जलाश, उगावचा वाडा, आर्ची पोहते ती विहीर, नागराज आणि रिंगू राजगुरूचं घर, पुण्याच्या पर्वतीजवळच्या
झोपडपट्टीतलं घर आदी सर्वच ठिकाणी लोक भेटी देऊ लागले आहेत. मृत्युपंथाला लागलेलं शुष्क झाडं प्रेमाचं प्रतीक बनलंय. लोकांची वर्दळ वाढल्यानं उगावला ‘सैराट वडापाव’ही मिळू लागला आहे, हे खुद्द नागराज यांनी
झीवर सैराटची यशोगाथा कथन करताना सांगितलं आहे.
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरून कर्जतकडे
(जि. रायगड) वळताना रस्त्यात ‘खैराट’ नावाच्या गावाचा फलक
दिसतो. स्पेलिंग चुकल्यामुळे ‘सैराट’चं ‘खैराट’ झालं असावं, असा उत्स्फूर्त विनोदही सहज होतो. नागराज मंजुळेंनी वलयांकित केलेल्या या शब्दांचा हा
प्रभाव म्हणावा लागेल. एक म्हणजे ‘सैराट’ सर्वदूर पोहचला; पण सैराटपेक्षा अधिक सशक्त ‘फॅंड्री’
नाही पोहचला तेवढा. शब्दातलं नावीन्य आणि उच्चारातली गंमत म्हणून फक्त ‘फँड्री’
नाव तेवढं पोहचलं! नागराज यांच्या दाव्याप्रमाणे सैराट
हा विचार आहे. त्याच्या उच्चारातही गंमत आहे. गंमतीसोबतच या विचाराला अजय- अतुलच्या संगीताचंही इंधन लाभल्यानं तो अधिक वेगानं सर्वदूर पोहचला, असं म्हणता येऊ शकेल. सैराटच्या शेवटी बाळाच्या पायाचे रक्ताचे ठसे काळजाचा ठाव घेतात. ते विसरण्याचा प्रयत्न केला तरी अवघड आहे. आता तर वेगळ्या अर्थाने रोजच्या जगण्यात सैराटच्या पाऊलखुणा
जागोजागी उमटू लागल्या आहेत, हे यश म्हणजे नागराज
यांच्या नावावर नोंदविला गेलेला मराठी चित्रपट सृष्टीचा अद्भूत इतिहास आहे.
No comments:
Post a Comment