Wednesday, 16 September 2015

ॲबसर्ड रंगभूमी आणि तिचे उद्‌गाते

सकारात्मकतेच्या हेकेखोरपणामुळे नकारात्मकतेकडं दुर्लक्ष होऊ शकते. शब्दांचा कितीही फुलोरा फुलवला तरी वास्तवाचं अस्तित्व नष्ट करता येत नाही. फार तर ते दृष्टीआड करता येऊ शकतं. विसंगती हा जगण्याचा भाग असतो. जीवनातील विसंगतीची जाणीव ॲबसर्ड नाटकात प्रकर्षानं होते. यावरचे प्रा. माणिक कानेड याचे ‘ॲबसर्ड थिएटर’ हे पुस्तक अलीकडेच वाचले. या पुस्तकावर आधारित 'तारांगण' मासिकात प्रसिद्ध झालेला माझा हा लेख.
मानवी जीवन सुख आणि दु:ख, अंधार आणि प्रकाश, जगणं आणि मरणं अशा परस्परविरोधी अवस्थांनी त्रस्त आहे. आयुष्य विसंगतींनी खच्चून भरलं आहे. या द्वैतात मानवी जीवनातील सुख निसटून जात आहे. जगण्याचा शेवटही मरणात होतो, असं म्हनणं म्हणजे नकारात्मकता आहे, असं काहींना वाटू शकतं; पण वास्तव तेच आहे. जगण्या-मरण्यातील विसंगतीवर ॲबसर्डचे थिएटरचे प्रमुख उद्‌गाते लूई पिरॅन्देलो, अल्बर्ट कामू, सॅम्युएल बेकेट आणि युरेन यानेस्को यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी जगण्यातली नकारात्मकता दाखवतांना त्यालाही वैभव मानलं आहे; पण याचा अर्थ नकारात्मकतेचा अस्वीकार केलेला नाही.
विसंगती आणि नकारात्मकता याता पुसटशी रेषा आहे. सकारात्मकतेच्या हेकेखोरपणामुळे नकारात्मकतेकडं दुर्लक्ष होऊ शकते. शब्दांचा कितीही फुलोरा फुलवला तरी वास्तवाचं अस्तित्व नष्ट करता येत नाही. फार तर ते दृष्टीआड करता येऊ शकतं. विसंगती हा जगण्याचा भाग असतो. जीवनातील विसंगतीची जाणीव ॲबसर्ड नाटकात प्रकर्षानं होते. नवी क्षितिजं आणि मानवी मनाचा गूढ तळ शोधण्याची धडपड या नाटकांत दिसते. या धडपडीत काहीच हाती लागलं नसलं तरी हे अपयशही थोर आणि एकापरीनं वैभवशाली मानावं लागेल, असं ॲबसर्ड थिएटरवाल्यांना वाटतं. या जिवंत प्रवाहाला ‘न-नाट्य’ अर्थात अर्थहिन किंवा अर्थशून्य नाटकं म्हणून नाकं मुरडण्याचा प्रघात होता.
विश्वाच्या पोकळीत मानवी अस्तित्वाचे प्रयोजन काय आणि मानवी जीवनाचा अर्थ काय? असा मूलभूत शोधाचा प्रयत्न काही पाश्चिमात्य नाटककारांनी मागील शतकात केला. रुढ चाकोरी मोडणाऱ्या त्यांच्या कलाकृतींना नाके मुरडण्यात आली. ‘न-नाट्य’ किंवा ‘अर्थशून्य’ म्हणून त्यांची संभावना केली गेली. या आंतरिक धडपडीचे स्वरूप केवळ प्रायोगिक म्हणून झटकण्यासारखे नगण्य नव्हते, हे काळानेच सिद्ध केले. विलक्षण, विसंगत आणि विचक्षण स्वरुपाचा नाट्यानुभव देणारी ही नाटके ‘ॲबसर्ड’ रंगभूमीची गंगोत्री ठरली. जागतिक रंगभूमीला नवे अर्थपूर्ण वळण या नाटकांनी दिले. याचा मागोवा लेखक श्री. कानेड यांनी घेतला आहे.
अलबर्ट कामू या फ्रेंच नाटककाराने ‘अबसर्ड’ हा शब्द सर्वप्रथम वापरला. ‘Absurd’ या शब्दाला प्रतिशब्द म्हणून Strange (विलक्षण), Fantastic (विचित्र), Comically (चमत्कारिक), Extravagant (हास्यकारक) आदी शब्दही वापरले जातात; पण त्यातून Absurd यातील सूक्ष्म छटा एकसंधपणे व्यक्त होत नाहीत. म्हणून Absurd या लॅटीन भाषेतील शब्द हेतुपुरस्सर वापरला जातो. ॲबसर्ड नाटकांत विश्वातील मानवी अवस्थेचे अस्तित्व आणि मानवाची अवस्था विषद केलेली असते. या नाटकातून समुच्चयात्मक मानवीपण प्रत्यक्षपणे नव्हे तर प्रतीकात्मकपणे उभे केलेले दिसते. ही प्रयोगिक रंगभूमीची चळवळ असली तरी तिचा प्रेरणास्त्रोत दोन महायुध्दांनी उद्ध्‍वस्त झालेल्या मानवी जीवनात आहे. सदगुण, नीतिमूल्य, कौटुंबिक-सामाजिक संबंध, सभ्यता यांना जणूकाही अर्थच उरला नव्हता. सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली होती. या अस्वस्थतेतून ॲबसर्ड रंगभूमी साकारली.
मानवी जीवनाची परिणती मृत्यूत होते. त्यामुळे माणसाला आपलं जीवन अर्थशून्य वाटू शकतं. हा नकारात्मक विचार असला आणि हे खरं असलं तरी जगण्याचं भान विसरता कामा नये, असं अलबर्ट कामुला वाटतं. मृत्यूची टांगती तलवार मानवाच्या शिरावर कायम असते. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण रितीनं जगला पाहिजे. हे म्हणजे वास्तवातली नकारात्मकता स्वीकारून त्यामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम कामू करतो. कामूची ॲबसर्डडिटीची संकल्पना निराशावादी किंवा नकारात्मक नाही.आशा-निराशा आणि सुख-दु:खात विरोधाभास किंवा विसंगती आहे; परंतु त्यात सुसंगती साधता येते, असं कामूला वाटतं.  
युरेन आयनेस्कोनं फ्रेंच भाषेत लिखाण केलं आहे. फ्रान्सवरील जर्मनीचं आक्रमण 1944 मधील मुक्तता या घटनांच्या भावनिक प्रभावातून त्याचं साहित्य जन्मलं. भव्यदिव्य स्वप्न पाहण्याचा छंद; पण स्वप्नांचा भंग झाल्यावर वास्तव जीवन क्षुद्र, भकास आणि अर्थशून्य वाटू लागतं. जीवनाची इतिश्री शेवटी मृत्यूतच होते. या नकारात्मक, उबग आणणाऱ्या आणि बकाल जीवनाच्या पलीकडं रम्य जगाची आस त्याला वाटत होती. त्यामुळे एकाकीपणा, माणसांचा परस्परांशी तुटलेपणा आणि कंटाळवाण्या स्थितीमुळं एकूणच जीवन त्याला ॲबसर्ड वाटू लागलं होतं.
सॅम्युएल बेकेट या आरिश नाटकाराने फ्रान्सवरील नाझीचे आक्रमण आणि त्यांनी केलेले अत्याचार जवळून अनुभवले. त्यातून प्रयोजनशून्य जगण्याची वेदना त्याच्या साहित्यातून व्यक्त झाली आहे. त्यामुळे त्याचा ॲबसर्ड नाटकार म्हणून उल्लेख केला जातो. ईश्वरावरील श्रद्धा गमावली, मानवी सुखाची आस मालवली, अस्तित्वासाठी संघर्ष करतानाची वेदनाच फक्त वाट्याला आली अशा औदासिन्याने भरलेल्या युद्धोत्तर अवस्थेचे व्यंगात्मक चित्रण त्याच्या कलाकृतीत आढळते.
  नोबेल पारितोषिक विजेत्या लुई पिरॅन्देलो या इटालियन साहित्य सम्राटानं एकूण 40 नाटकं लिहिली. लुईचा विवाह एका वेडसर तरुणीशी झाला होता. त्याच्या दु:खमय अनुभवानं त्याच्या नाटकांतून वेडेपणा, आभास आणि एकाकीपणाचा शोध घेतलेला दिसतो. सत्याचा आणि व्यक्तिमत्वाचा विविध अंगांनी विचार केला पाहिजे. रंगभूमीवरील वास्तव (खरं म्हणजे आभास) आणि प्रत्यक्ष जीवनातील वास्तव यात गल्लत करता कामा नये, अशा आशयाची दृष्टी या ॲबसर्ड नाटककारानं दिली आहे.
ॲबसर्ड नाटकांचा नवप्रवाह मराठीत बिचकतच आला. तो पूर्णपणे स्वीकारला गेला नाही. स्थिरावला तर मुळीच नाही. याची काही कारणे श्री. कानेड यांनी नोंदविली आहेत. दोन महायुध्दांचा दारुण अनुभव भारतीयांना कधीच आला नाही. त्याची दाहकता मराठी नाटकांतून येणार कशी? अबसर्ड थिएटरचे मूळ याच अनुभवात आहे. आपल्या जुन्या परंपरांचा अभिमान आणि नव्या परंपरांचा अव्हेर, हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे. हे सर्व खरे असले तरी त्यामागील किंवा त्यात असलेली संवेदना आणि ते सादर करण्याचे रंगतंत्र मात्र मराठी रंगभूमीने उचलले आहे. श्री. गडकरी यांचे ‘मूकनायक’ (श्री.कृ. कोल्हटकरांचे ‘मूकनायक’ नव्हे) याला मराठीतले पहिले ॲबसर्ड नाटक म्हणता येईल. त्याचबरोबर ‘चंद्र नभीचा ढळला’, ‘वेटींग फॉर गोदो भाग-2’, ‘काळे बेट लाल बत्ती’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘गार्बो’, ‘पार्टी’, ‘प्रतिबिंब’, ‘शीतयुध्द’, ‘सदानंद’ इत्यादी मराठी नाटके ढोबळ अर्थाने ॲबसर्ड थिएटरशी जवळीक साधणारी आहेत, असे श्री. कानेड यांनी नमूद केले आहे.
मानवी जीवन सुख आणि दु:ख, अंधार आणि प्रकाश, जगणे आणि मरणे अशा परस्परविरोधी अवस्थांनी त्रस्त आहे. या द्वैतात मानवी जीवनातील सुख निसटून जात आहे. जगण्याचा शेवटही मरणात होतो, ही एक प्रकारची विसंगती आहे, हेच ॲबसर्ड संकल्पनेचे शास्त्र आहे. तेच श्री. कानेड यांनी या पुस्तकात मांडले आहे.
(ॲबसर्ड थिएटर, लेखक: प्रा. माणिक कानेड, प्रकाशक: ग्रंथाली, पृष्ठे: 132, किंमत: 160.) 

Sunday, 26 July 2015

ग्रामपंचायत निवडणुकाही हायटेक

राज्यातील सुमारे 9 हजार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पहिल्या टप्यातील 1 हजार 779 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कालच (ता. 25 जुलै) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 ऑगस्ट 2015 रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणुकांविषयी जाणून घेतलेली  माहिती... 
(दै. सकाळ अँग्रोवनमध्ये प्रसिद्धी: दि. 26 जुलै 20015)
          प्रश्न: राज्यात सध्या मोठ्याप्रमाणावर ग्रामंपचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे; परंतु नेमक्या कुठल्या जिल्ह्यात आणि किती ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे?
         श्री. सहारिया: राज्यात जवळपास 28 हजार ग्रामपंचायती आहेत. त्यातील सुमारे 15 हजार म्हणजे 50 टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका 2015 अखेर होणार आहेत. त्यातल्या काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका 22 एप्रिल 2015 रोजी पार पडल्या आहेत. सध्या सुमारे 9 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 1 हजार 779 सार्वत्रिक व 632 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी नुकतेच 25 जुलै 2015 रोजी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 22 जिल्ह्यातील 7 हजार 19 सार्वत्रिक व 1 हजार 212 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. कोल्हापूर, यवतमाळ, अहमदनगर, जळगाव, पुणे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 400 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतमोजणी 27 जुलै 201 रोजी; तर दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी 6 ऑगस्ट 2015 रोजी होईल.
        प्रश्न: नामनिर्देशनपत्रे म्हणजे उमेदवारी अर्ज संकेतस्थळावर भरण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली होती. त्याचा नेमका काय उद्देश आहे?
       श्री. सहारिया: निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना अधिकाधिक पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. डिजीटल युगामुळे कामकाजात गतिमानता आली आहे. म्हणूनच काळासोबत राहण्यासाठी; तसेच मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आदींच्या सोयीसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. संगणक आणि अधुनिक तंत्राचा वापर जसा जसा वाढत जाईल, तस तशी वेळेत, पैशांत आणि कागदांची बचत होत जाईल. पर्यायाने पर्यावरण रक्षणाचेही काम होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे नामनिर्देशनपत्रे संकेतस्थळावर भरल्यामुळे सर्व उमेदवारांची एकत्रित माहिती उपलब्ध होते. या माहितीचा उपयोग निवडणूक सुधारणा व अभ्यासकांसाठी होऊ शकतो.
   प्रश्न: संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्रे भरण्याबाबत ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छूक उमेदवारांकडून कशा प्रकारे प्रतिसाद लाभला आहे?
          श्री. सहारिया: ग्रामपंचायत निवडणुकीविषयीची माहिती देण्याआधी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे उदाहरण देऊ इच्छितो. भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येदेखील नामनिर्देशनपत्रे संकेतस्थळावर भरण्याची सुविधा होती. हा दुर्गम आणि आदिवासी भाग असूनही तिथे नामनिर्देशनपत्रे संकेतस्थळावर भरण्यास उत्तम प्रतिसाद लाभला. नामनिर्देशनपत्रांची माहिती भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महाऑनलाईनच्या मदतीने http://panchayatelection.maharashtra.gov.in हे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले आहे.  एका ग्रामपंचायतींच्या सदस्यांची कमीत कमी संख्या 7 व जास्तीत जास्त संख्या 17 असते. याचा विचार करता सध्या 9 हजार ग्रामपंचायतींच्या सुमारे 88 हजार जांगासाठी या निवडणूकांची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकांमध्येही संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्रे भरण्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. यासंदर्भात अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरणाची ही सुरवात आहे.
        प्रश्न: ग्रामपंचायतीच्या निवडणुकांविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या (एफएक्यू) उत्तराचे पुस्तके आयोगाने प्रकाशित केले आहे. त्याचा सर्वसामान्य मतदरांना काय फायदा?
    श्री. सहारिया: एफएक्यूचे पुस्तके केवळ ग्रामपंचातीच नव्हे तर सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुकांविषयी तयार केली आहेत. मतदारांसह निवडणूकीशी संबंधित सर्वांना निवडणूक प्रक्रियेची सहजतेने आणि सोप्या भाषेत माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही प्रश्न आणि उत्तरे या स्वरुपात ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते आम्ही या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. ग्रामपंचायतीसह एफएक्यूची चारही पुस्तके राज्य निवडणूक आयोगाच्या http://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पीडीएफच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ती कुणालाही सहज डाऊनलोड करता येऊ शकतात.
          प्रश्न: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येणारा खर्च आणि उपलब्ध निधी याबाबत क्षेत्रीय स्तरावर बऱ्याचदा अडचणी येतात. त्यात कितपत तथ्य आहे?
       श्री. सहारिया: ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत संवेदनशीलपणे आणि कौशल्याने हाताळाव्या लागतात. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे दक्षता घेतली जाते तेवढीच दक्षता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही घ्यावी लागते. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांप्रमाणेच सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. परिणामी खर्चदेखील सर्व निवडणुकांना सारखाच येतो. ग्रामपंचायतीच्या निवडणूक खर्चासाठी ग्रामविकास विभागाकडून प्रतिग्रामपंचायत केवळ 20 हजार रुपयांची तरतूद केली जाते. लोकसंख्या किंवा भौगोलिकदृष्ट्या ग्रामपंचायत लहान असो किंवा मोठी सर्व ग्रामपंचायतींसाठी 20 हजार रुपयांचीच तरतूद असते. मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष खर्चावर आधारित तरतुदी असाव्यात, अशी आयोगाची भावना आहे.
मी या मुद्यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांना या परिस्थितीबाबत अवगत केलं आहे. त्यांनीही लवकरच सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे सांगितले आहे. निवडणुकांचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या तहसिलदारांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच केला आहे. निवडणुकांसाठी निधी उपलब्ध करून देणे, ही शासनाची जबाबदारी असली तरी राज्य निवडणूक आयोगाने याबाबत पाठपुरावा केला आहे आणि तो यापुढेही केला जाईल, असे मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो.
       प्रश्न: निवडणूक म्हटली की आचारसंहिता आलीच. मग त्याला ग्रामपंचायत निवडणुकीचाही अपवाद नाही; परंतु आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
    श्री. सहारिया: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक किंवा पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्रभागाच्या क्षेत्रापुरतीच असते. राजकीय पक्ष, उमेदवार, राज्य शासन, शासकीय यंत्रणा यांनाही आचारसंहिता बंधनकारक असते. अनावश्यक खर्च, भेदभाव, लाचखोरी, मतदारांना प्रलोभने दाखविणे, मतदारांना धमक्या देणे, धाकदपटशाही करणे, निवडणूकीत गैरव्यवहार करणे, भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणे आदींना आळा घालण्यासाठी आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य निवडणूक आयोगाचा विशेष कटाक्ष असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आता आपण निरीक्षकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निरीक्षकांच्या माध्यमातून निवडणुका अधिक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यास आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. कायदा व सुव्यवस्था, दारुबंदी, निवडणूक साहित्य वाटप इत्यादींबाबत संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी चर्चा करून वेळोवेळी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करावा, अशा सूचना निरीक्षकांना करण्यात आल्या आहेत.
        प्रश्न: सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यादृष्टीने मतदानाच्या दिवशी काही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे का?
           श्री. सहारिया: सध्या पावसाचे दिवस असले तरी पाऊस नाही. पाऊस यायलाच हवा आणि पाऊस आला तरी आम्ही सज्ज आहोत. मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगातर्फे सातत्याने केला जातो. मतदारांची गैरसोय होऊ नये आणि त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होता कामा नये, याबाबत आम्ही दक्षात घेतो. ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, गरोदर स्त्रिया व अपंग व्यक्ती यांची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न असतो. त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्रं मुख्यत: शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीत असतील; तसेच ती पुरेसा प्रकाश असलेल्या हवेशीर जागेवर असतील. मतदारांना पावसाचा आणि उन्हाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
           प्रश्न: ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी गावागावांत सुरू झाली आहे, हे सर्व खरे असले तरी मतदानाचे प्रमाणही वाढणे आवश्यक आहे, असे नाही का वाटत आपल्याला?
         श्री. सहारिया: मतदार हा तर लोकशाही व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. मतदारांच्या सक्रिय सहभागाशिवाय लोकशाही मजबूत होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वप्रथम वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकानं मतदार यादीत आपले नाव नोंदविले पाहिजे. नाव नोंदवलेल्या प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे. महिलांच्या मतदानाचेही प्रमाण वाढले पाहिजे, यावर आम्ही कायमस्वरुपी भर देण्याचा निर्णय घेतला आहे.  मतदारच आपल्या निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. मतदारांनी कुणाच्याही कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. आपले एक मतही मौल्यवान असते. आपल्या एका मताने लोकशाही बळकट होते. म्हणून 4 ऑगस्ट 2015 रोजी आपल्या गावासाठी, ग्रामपंयाचतीसाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे मी सर्व मतदारांना आवाहन करतो.
राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग
भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोन स्वतंत्र संविधानिक संस्था आहेत. भारत निवडणूक आयोगातर्फे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातात. राज्य निवडणूक आयोगातर्फेत महानगरपालिका, नगरपरिषदा/नगरपंचायती, जिल्हा परिषदा/पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. घटनेने दोन्ही आयोगांना आपापल्या कार्यक्षेत्रात समान अधिकार दिले आहेत. 
श्री. ज. स. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्त यांचा अपल् परिचय
श्री. जे. एस. सहारिया यांनी 5 सप्टेंबर 2014 पासून ‘राज्य निवडणूक आयुक्त’ म्हणून पदभार स्वीकारला आहे. जुलै 2014 मध्ये राज्याचे ‘मुख्य सचिव’ म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही संविधानात्मक जबाबदारी आली आहे. 1978 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीत विविध महत्वाच्या पदांची धुरा सांभाळली आहे. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदवीव्युत्तर पदवी (एमएससी) संपादन केली आहे. त्यांनी अहमदाबादच्या आयआयएममधून आणि एमबीए केले आहे; तसेच त्यांनी कायद्याचीही पदवी संपादन केली आहे.

Saturday, 20 June 2015

साताऱ्यातले जलयुक्त शिवार




'शेतकरी' मासिकाच्या मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झालेला सातारा जिल्ह्यातील ओढाजोड कल्पाबाबतचा माझा लेख. 
       गुळुंब (ता. वाई) येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून ओढाजोड प्रकल्प राबविला जात आहे. जिल्हाधिकारी श्री. अश्विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरमुक्तीच्या दिशेने टाकलेल्या या कल्पक पावलांचा घेतलेला हा वेध...
       अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा असल्या तरी 'पाणी' ही मानवाची मूलभूत गरज आहे. पाण्याविषयी आतापर्यंत खूप चिंतन झाले आहे. चिंतनशील विचार कृतीत आणण्यासाठी राज्य शासनातर्फे 'जलयुक्त शिवार अभियान' राबविले जात आहे. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील प्रत्येकी पाच गावांत पहिल्या टप्प्यातील कामे सुरु झाली आहेत. काही तालुक्यांत पाचपेक्षा जास्तही कामे सुरु झाली आहेत. त्यातील गुळुंब (ता. वाई) येथील ओढाजोड हा अत्यंत महत्वाकांक्षी आणि कल्पक प्रकल्प ठरणार आहे.
           सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या गुळुंबवर नियतीने काहीसा अन्यायच केला आहे. गुळुंब येथून मांढरदेव आणि भालेघरचा डोंगर सहज दृष्टिक्षेपात पडतो. तो अगदी सातआठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पुढे महाबळेश्वरचा परिसर सुरु होतो. तेथे राज्यातला सर्वाधिक पाऊस कोसळतो. मांढरदेव आणि भालेघर डोंगर परिसरातही चांगला पाऊस होतो. गुळुंबमध्ये मात्र केवळ सरासरी 400 मिलीमीटर पाऊस होतो. अगदीच थोड्या अंतरावर निसर्गातील ही विषमता जाणवते. या विषमतेचा मात्र इथल्या गावकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम होतो. त्यावर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञा पत्रातील ''खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळापर्यंत पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी'' या उक्तीप्रमाणे गुळुंब येथे पाझर तलाव बांधण्यात आला आहे. काही वर्षांपर्यंत 2 हजार 949 लोकसंख्येच्या गावाची तहान हाच पाझर तलाव भागवत होता. आता मात्र डिसेंबर-जानेवारीतच हा तलाव तळ गाठतो आणि टँकरला निमंत्रण देतो. 2010 पासून टँकरला पर्याय राहिलेला नाही. दरवर्षीच टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येते. जलयुक्त शिवार अभियानातून गुंळुंबच्या पाण्याचा ताळेबंदही (वॉटर ऑडिट) तयार करण्यात आला आहे. त्यात 340 कोटी 94 लाख लीटरची तूट आढळून आली आहे.
          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी गुळुंबला भेट देऊन टंचाईवर कायमस्वरुपी कशी मात करता येईल याबाबत ग्रामस्थांशी विचारविनिमय केला. त्यात ग्रामस्थांनी चांदक आणि गुळुंब ओढाजोड प्रकल्प सुचविला. जिल्हाधिकारी श्री अश्विन मुद्गल यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी स्वत: यात लक्ष घातले. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडले आणि ओढाजोड प्रकल्पाचा प्रारंभ झाला. चांदकच्या ओढ्यावर पूर्वी लहानसा बंधारा होताच. नैसर्गिक उतारानुसार  त्याच्या पाटातून काही प्रमाणात शेते भिजली जात होती. आता ते बंधाराही आणि पाटही नामशेष झाला आहे. त्या बंधाऱ्याच्या पाण्याच्या आठवणी मात्र आजही अनेक ग्रामस्थ सांगतात. पालकमंत्री  विजय शिवतारे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.
           गुळुंबच्या पश्चिमेस चांदक गाव आहे. चांदकच्या वरच्या बाजूला मांढरदेव आणि भालेघरचा डोंगर आहे. तिथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्याच परिसरात चांदकचा ओढा उमग पावतो. त्याला गुळुंबच्या ओढ्यापेक्षा जास्त पाणी असते. गुळुंबचा ओढा गुळुंबच्या परिसरातच उगम पावतो. त्याला फारसे पाणी नसते. चांदकच्या ओढ्यातून मात्र पावसाळ्यात खूप पाणी वाहून जाते. त्याच्यातील वाहून जाणारे पाणी गुळुंबच्या पाझर तलावात टाकल्यावर गुळुंबच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. वाहून जाणारे पाणी अडविले पाहिजे, हा बहुमोल संदेश छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले आणि अनेक साधूसंतांनी दिला आहे. त्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे,
            'नदी सागरी मिळावा, तिची अपार भक्ती व्यर्थचि जावी
            ऐसी ईश्वरी इच्छाचित नसावी, उपयोगी यावी सर्वांच्या''
ग्रामगीतेतल्या या ओळी आता गुळुंबमध्ये प्रत्यक्षात येत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरीही सुखावले आहेत. ओढाजोड प्रकल्पामुळे चांदक आणि गुळुंबला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. शिवाय या शिवारातील शेतकऱ्यांच्या 15 विहिरीनाही लाभ होणार आहे. बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरीही मोठ्या उमेदीने पुढे आले आहेत. अनेकजण लोकवर्गणी देत आहे. अनेक जणांनी श्रमदानाची तयारी दर्शवली आहे.
ओढाजोड प्रकल्पाला सुमारे 60 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ज्ञानदीप सहकारी पतसंस्था, किसनवीर सहकारी साखर कारखाना, वाई रोटरी क्लब; तसेच अन्य एका उद्योगानेही आर्थिक आणि यंत्र सामुग्रीच्या स्वरुपात मदत देऊ केली आहे. आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. बळ, युक्ती आणि द्रव्याचा इथे संगम झाला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पुढील ओळींचे इथे स्मरण झाल्याशिवाय राहत नाहीत.
''बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उद्क चालवावे युक्ती
 नाही चळण तया अंगी, धावे लवणामागे वेगी''
        जलयुक्त शिवार अभियानातून हा प्रकल्प राबविला जात आहे. चांदक गावच्या बंधाऱ्यावर सिमेंट क्रॉक्रिटचा वळण बंधारा बांधला जाणार आहे. या बंधाऱ्यापासून गुळुंबच्या बंधाऱ्यापर्यंत साधारणत: 1.50    किलोमीटर लांबी बंदिस्त सिमेंट पाईप टाकले जाणार आहेत. 600 मिली मीटर व्यासाची पाईप असतील. काही ठिकाणी ही पाईपलाईन उभारुन ती पुढे नेली जाईल. काही शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आनंदाने संमती दिली आहे. नैसर्गिक उतार शेवटपर्यंत राखला जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारे पंपिंग न करता उच्च दाबाने हे पाणी गुरुत्व पद्धतीने गुळुंबपर्यंत नेले जाईल. वाहून जाणाऱ्या पाण्यातून साधारणत: दोन वेळा गुळुंबचा पाझर तलाव भरुन घेतल्यास ते पाणी उन्हाळ्यामध्ये वापरता येईल. परिणामी गुळुंबची टँकरपासून मुक्ती होऊ शकेल आणि परिसरातील विहिरींचा पाझरही वाढू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

विकेंद्रीत पाणीसाठ्यांवर भर
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकेंद्रीत स्वरुपात पाणी साठे तयार केले जातील. पाण्याच्या उपलब्धतेबाबत जिल्हाभरात समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी माण-खटाव सारख्या दुष्काळी भागालाही न्याय देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर ओढा जोड सारखे प्रकल्प निश्चितच उपयुक्त ठरतील.
                                                                                          -श्री. विजय शिवतारे, पालकमंत्री, सातारा
गुळुंबची एकी कौतुकास्पद
ओढा जोडणीसाठी गुळुंबच्या ग्रामस्थांनी टाकलेले पाऊल म्हणजे त्यांच्या सकारात्मक भावनेचे प्रकटीकरण आहे. त्यांनी दाखवलेली एकी कौतुकास्पद आहे. गुळुंबला एकूण 340 कोटी 94 लाख लीटर पाण्याची तूट भासते. ती भरुन काढण्यासाठी ओढा जोढणीसारखा प्रकल्प निश्चितच वरदान ठरु शकतो. त्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीसह ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहे.
-श्री.अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, सातारा


टँकरमुक्तीच्या दिशेने
वाई तालुक्यातील गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागातो, हेच मुळात आश्चर्यजणक आहे. ओढा जोड प्रकल्प म्हणजे टँकरमुक्तीच्या दिशेने केलेली वाटचाल आहे; परंतु पाणी येऊन प्रश्न सुटणार नाही. पाण्याचा शिस्तीने आणि काटकसरीने वापर करावा लागेल. त्यासाठी जिल्हा परिषद गावकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करेल.
-जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

ग्रामस्थांच्या एकीचे फळ
ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकीमुळेच गुळुंबच्या पाण्याचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही या प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो. आमच्या गावकऱ्यांचा उत्साह वाढविणारा हा प्रकल्प आहे. सगळ्यांमध्येच सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या सर्वांना मी मन:पूर्वक धन्यवाद देते.
-सौ. अल्पना यादव, सरपंच, गुळुंब
गुळुंबच्या पाण्याचा ताळेबंद
  • गावाची एकूण लोकसंख्या- 2 हजार 949
  • सरासरी पर्जन्यमान- 400 मिलीमीटर
  • पिण्यासाठी प्रतिवर्षी लागणारे पाणी- 5 कोटी 38 लाख लीटर
  • जनावरांसाठी लागणारे पाणी- 78 लाख लीटर
  • पिकांसाठी लागणारे पाणी- 418 कोटी 50 लाख लीटर
  • गावाची एकूण पाण्याची गरज- 424 कोटी 66 लाख लीटर
  • पावसाद्वारे उपलब्ध होणारे एकूण पाणी- 435 कोटी 60 लाख लीटर
  • त्यापैकी जमिनीत मुरलेले व प्रकल्पांतील उपलब्ध पाणी- 83 कोटी 72 लाख लीटर
  • वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे भासणारी तूट- 350 कोटी 88 लाख लीटर