सकारात्मकतेच्या हेकेखोरपणामुळे नकारात्मकतेकडं दुर्लक्ष
होऊ शकते. शब्दांचा कितीही फुलोरा फुलवला तरी वास्तवाचं अस्तित्व नष्ट करता येत
नाही. फार तर ते दृष्टीआड करता येऊ शकतं. विसंगती हा जगण्याचा भाग असतो. जीवनातील
विसंगतीची जाणीव ॲबसर्ड नाटकात प्रकर्षानं होते. यावरचे
प्रा. माणिक कानेड याचे ‘ॲबसर्ड थिएटर’ हे पुस्तक अलीकडेच वाचले. या पुस्तकावर आधारित
'तारांगण' मासिकात प्रसिद्ध झालेला माझा हा लेख.
मानवी जीवन सुख आणि दु:ख, अंधार आणि
प्रकाश, जगणं आणि मरणं अशा परस्परविरोधी अवस्थांनी त्रस्त आहे. आयुष्य विसंगतींनी
खच्चून भरलं आहे. या द्वैतात मानवी जीवनातील सुख निसटून जात आहे. जगण्याचा शेवटही
मरणात होतो, असं म्हनणं म्हणजे नकारात्मकता आहे, असं काहींना वाटू शकतं; पण
वास्तव तेच आहे. जगण्या-मरण्यातील विसंगतीवर ॲबसर्डचे
थिएटरचे प्रमुख उद्गाते लूई पिरॅन्देलो, अल्बर्ट कामू, सॅम्युएल बेकेट आणि युरेन
यानेस्को यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी
जगण्यातली नकारात्मकता दाखवतांना त्यालाही वैभव मानलं आहे; पण याचा
अर्थ नकारात्मकतेचा अस्वीकार केलेला नाही.
विसंगती आणि नकारात्मकता याता पुसटशी रेषा आहे.
सकारात्मकतेच्या हेकेखोरपणामुळे नकारात्मकतेकडं दुर्लक्ष होऊ शकते. शब्दांचा
कितीही फुलोरा फुलवला तरी वास्तवाचं अस्तित्व नष्ट करता येत नाही. फार तर ते
दृष्टीआड करता येऊ शकतं. विसंगती हा जगण्याचा भाग असतो. जीवनातील विसंगतीची जाणीव
ॲबसर्ड नाटकात प्रकर्षानं होते. नवी क्षितिजं आणि मानवी मनाचा गूढ तळ शोधण्याची
धडपड या नाटकांत दिसते. या धडपडीत काहीच हाती लागलं नसलं तरी हे अपयशही थोर आणि
एकापरीनं वैभवशाली मानावं लागेल, असं ॲबसर्ड थिएटरवाल्यांना वाटतं. या जिवंत प्रवाहाला
‘न-नाट्य’ अर्थात अर्थहिन किंवा अर्थशून्य नाटकं म्हणून नाकं मुरडण्याचा प्रघात
होता.
विश्वाच्या पोकळीत मानवी अस्तित्वाचे प्रयोजन काय आणि मानवी जीवनाचा अर्थ काय? असा
मूलभूत शोधाचा प्रयत्न काही पाश्चिमात्य नाटककारांनी मागील शतकात केला. रुढ चाकोरी
मोडणाऱ्या त्यांच्या कलाकृतींना नाके मुरडण्यात आली. ‘न-नाट्य’ किंवा ‘अर्थशून्य’
म्हणून त्यांची संभावना केली गेली. या आंतरिक धडपडीचे स्वरूप केवळ प्रायोगिक
म्हणून झटकण्यासारखे नगण्य नव्हते, हे काळानेच सिद्ध केले. विलक्षण, विसंगत आणि
विचक्षण स्वरुपाचा नाट्यानुभव देणारी ही नाटके ‘ॲबसर्ड’ रंगभूमीची
गंगोत्री ठरली. जागतिक रंगभूमीला नवे अर्थपूर्ण वळण या नाटकांनी दिले. याचा मागोवा
लेखक श्री. कानेड यांनी घेतला आहे.
अलबर्ट कामू या फ्रेंच नाटककाराने ‘अबसर्ड’ हा शब्द
सर्वप्रथम वापरला. ‘Absurd’ या शब्दाला प्रतिशब्द म्हणून Strange (विलक्षण), Fantastic (विचित्र), Comically (चमत्कारिक), Extravagant
(हास्यकारक) आदी शब्दही वापरले जातात; पण त्यातून Absurd यातील
सूक्ष्म छटा एकसंधपणे व्यक्त होत नाहीत. म्हणून Absurd या
लॅटीन भाषेतील शब्द हेतुपुरस्सर वापरला जातो. ॲबसर्ड नाटकांत विश्वातील मानवी
अवस्थेचे अस्तित्व आणि मानवाची अवस्था विषद केलेली असते. या नाटकातून समुच्चयात्मक
मानवीपण प्रत्यक्षपणे नव्हे तर प्रतीकात्मकपणे उभे केलेले दिसते. ही प्रयोगिक
रंगभूमीची चळवळ असली तरी तिचा प्रेरणास्त्रोत दोन महायुध्दांनी उद्ध्वस्त
झालेल्या मानवी जीवनात आहे. सदगुण, नीतिमूल्य, कौटुंबिक-सामाजिक संबंध, सभ्यता
यांना जणूकाही अर्थच उरला नव्हता. सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली होती. या
अस्वस्थतेतून ॲबसर्ड रंगभूमी साकारली.
मानवी जीवनाची परिणती मृत्यूत होते. त्यामुळे माणसाला
आपलं जीवन अर्थशून्य वाटू शकतं. हा नकारात्मक विचार असला आणि हे खरं असलं तरी
जगण्याचं भान विसरता कामा नये, असं अलबर्ट कामुला वाटतं. मृत्यूची टांगती तलवार
मानवाच्या शिरावर कायम असते. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण रितीनं
जगला पाहिजे. हे म्हणजे वास्तवातली नकारात्मकता स्वीकारून त्यामध्ये सकारात्मकता
आणण्याचं काम कामू करतो. कामूची ॲबसर्डडिटीची संकल्पना निराशावादी किंवा नकारात्मक
नाही.आशा-निराशा आणि सुख-दु:खात विरोधाभास किंवा विसंगती आहे; परंतु
त्यात सुसंगती साधता येते, असं कामूला वाटतं.
युरेन आयनेस्कोनं फ्रेंच भाषेत लिखाण केलं आहे.
फ्रान्सवरील जर्मनीचं आक्रमण 1944 मधील मुक्तता या घटनांच्या भावनिक प्रभावातून
त्याचं साहित्य जन्मलं. भव्यदिव्य स्वप्न पाहण्याचा छंद; पण
स्वप्नांचा भंग झाल्यावर वास्तव जीवन क्षुद्र, भकास आणि अर्थशून्य वाटू लागतं.
जीवनाची इतिश्री शेवटी मृत्यूतच होते. या नकारात्मक, उबग आणणाऱ्या आणि बकाल
जीवनाच्या पलीकडं रम्य जगाची आस त्याला वाटत होती. त्यामुळे एकाकीपणा, माणसांचा
परस्परांशी तुटलेपणा आणि कंटाळवाण्या स्थितीमुळं एकूणच जीवन त्याला ॲबसर्ड वाटू
लागलं होतं.
सॅम्युएल बेकेट या आरिश नाटकाराने फ्रान्सवरील नाझीचे
आक्रमण आणि त्यांनी केलेले अत्याचार जवळून अनुभवले. त्यातून प्रयोजनशून्य जगण्याची
वेदना त्याच्या साहित्यातून व्यक्त झाली आहे. त्यामुळे त्याचा ॲबसर्ड नाटकार
म्हणून उल्लेख केला जातो. ईश्वरावरील श्रद्धा गमावली, मानवी सुखाची आस मालवली,
अस्तित्वासाठी संघर्ष करतानाची वेदनाच फक्त वाट्याला आली अशा औदासिन्याने भरलेल्या
युद्धोत्तर अवस्थेचे व्यंगात्मक चित्रण त्याच्या कलाकृतीत आढळते.
नोबेल
पारितोषिक विजेत्या लुई पिरॅन्देलो या इटालियन साहित्य सम्राटानं एकूण 40
नाटकं लिहिली. लुईचा विवाह एका वेडसर तरुणीशी झाला होता. त्याच्या दु:खमय अनुभवानं
त्याच्या नाटकांतून वेडेपणा, आभास आणि एकाकीपणाचा शोध घेतलेला दिसतो. सत्याचा आणि
व्यक्तिमत्वाचा विविध अंगांनी विचार केला पाहिजे. रंगभूमीवरील वास्तव (खरं म्हणजे
आभास) आणि प्रत्यक्ष जीवनातील वास्तव यात गल्लत करता कामा नये, अशा आशयाची दृष्टी
या ॲबसर्ड नाटककारानं दिली आहे.
ॲबसर्ड नाटकांचा नवप्रवाह मराठीत बिचकतच आला. तो
पूर्णपणे स्वीकारला गेला नाही. स्थिरावला तर मुळीच नाही. याची काही कारणे श्री.
कानेड यांनी नोंदविली आहेत. दोन महायुध्दांचा दारुण अनुभव भारतीयांना कधीच आला
नाही. त्याची दाहकता मराठी नाटकांतून येणार कशी? अबसर्ड
थिएटरचे मूळ याच अनुभवात आहे. आपल्या जुन्या परंपरांचा अभिमान आणि नव्या परंपरांचा
अव्हेर, हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे. हे सर्व खरे असले तरी त्यामागील किंवा त्यात
असलेली संवेदना आणि ते सादर करण्याचे रंगतंत्र मात्र मराठी रंगभूमीने उचलले आहे.
श्री. गडकरी यांचे ‘मूकनायक’ (श्री.कृ. कोल्हटकरांचे ‘मूकनायक’ नव्हे) याला
मराठीतले पहिले ॲबसर्ड नाटक म्हणता येईल. त्याचबरोबर ‘चंद्र नभीचा ढळला’, ‘वेटींग
फॉर गोदो भाग-2’, ‘काळे बेट लाल बत्ती’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘गार्बो’,
‘पार्टी’, ‘प्रतिबिंब’, ‘शीतयुध्द’, ‘सदानंद’ इत्यादी मराठी नाटके ढोबळ अर्थाने
ॲबसर्ड थिएटरशी जवळीक साधणारी आहेत, असे श्री. कानेड यांनी नमूद केले आहे.
मानवी जीवन सुख आणि दु:ख, अंधार आणि
प्रकाश, जगणे आणि मरणे अशा परस्परविरोधी अवस्थांनी त्रस्त आहे. या द्वैतात मानवी
जीवनातील सुख निसटून जात आहे. जगण्याचा शेवटही मरणात होतो, ही एक प्रकारची विसंगती
आहे, हेच ॲबसर्ड संकल्पनेचे शास्त्र आहे. तेच श्री. कानेड यांनी या पुस्तकात
मांडले आहे.
(ॲबसर्ड थिएटर, लेखक: प्रा.
माणिक कानेड, प्रकाशक: ग्रंथाली, पृष्ठे:
132, किंमत: 160.)
No comments:
Post a Comment