Thursday 21 November 2019

रेड टेप

सन्मित्र अभिजितची रेड टेप ही कांदबरी साधारणत: एक वर्षांपूर्वी प्रकाशित झाली. नाशिक येथे प्रकाशन समारंभ झाला होता. मलाही त्याला उपस्थित राहता आलं होतं. तिथं कांदबरी विकत घेतली; परंतु वाचली नव्हती. आता वाचली. धैर्यवान अधिकाऱ्याची ही उत्कंठावर्धक कहाणी आहे. त्यातून समकालीन व्यवस्थेवर ती भाष्य करते.
वांद्र्याच्या मध्यवस्तीत उभारावयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यवधी रुपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट एक बिल्डर घालतो. तिथून कथानकाला सुरूवात होते; परंतु मुख्य कथानक वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्वसनच्या फाईलचे आहे, हे काही पृष्ठे वाचल्यावर लक्षात येतं. हा व्यवहार म्हणजे बिल्डरसाठी दानावर दक्षिणा आणि शासनाचा यात फायदा नाही, असं या कांदबरीचा नायक अर्थात मुंबई उपनगर (वांद्रे) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेश राऊत यांचं ठाम मत असतं. त्यातच या कथानकाची संपूर्ण बिजं आहेत. त्यासाठी महेश शेवटपर्यंत विविध घटकांशी संघर्ष करतो; पण आपल्या ध्येयापासून किंचित्साही विचलीत होत नाही. त्याच्या या संघर्षाची कहाणी छोट्या- मोठ्या प्रसंगातून फुलत जाते. वाचताना त्यात उत्सुकता आणि थ्रील सतत जाणवत राहतं.
राजकारणी, अधिकारी, बिल्डर, पत्रकार, समाजसेवक आदी विविध घटकांतील आपसातलं नातं, संगनमत, अंत्यस्थ हेतू उलगडत जातात. हे किती नैसर्गिक आहे, हे काही पात्रांच्या माध्यमातून दुर्दैवानं जाणवतं. ते लेखकाने प्रभावीपणे प्रतिबिंबित केले आहे. मुखवट्याच्या आतील चेहरे विविध प्रसंगांतून उलगडत जातात. तरीही सत्याची आणि व्यापक जनहिताची बाजू घेणारे प्रामाणिक लोकही सर्वच घटकांत असतात, असा आशेचा किरणही दिसतो. चेहरे आणि मुखवटे आपल्या आजूबाजूला वावरत असतात. आपण त्यांचाच एक भाग असतो. कादंबरी वाचताना त्यात आपणही स्वत:ला शोधू पाहतो आणि मग वाचणात आणखी गुंग होऊन जातो.
एका प्रसंगात राज्याचे मुख्य सचिव महेशला समजावताना म्हणतात, चढते सूरज को सलाम करना हमारे लोग बहुत अच्छे तरह से जानते है, लेकिन जब वह ढलने लगता है तो यही लोग दोनो हाथों से तालिया पिटकर उसे अलविदा कर देते है! प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नात्यावर केलेलं हे मार्मिक भाष्य बरंच काही सांगून जातं. आणखी एका प्रसंगात लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर भाष्य केलं आहे. त्यात पत्रकार जया देशमुख महेश यांना म्हणतो, बहुतेक जण कुणाच्या ना कुणाच्या ऑब्लिगेशनमध्ये असतात. निम्म्याधिक मंडळींनी दहा टक्के कोट्यातून घरं घेतलीयेत, अनेकांनी मंत्र्या- संत्र्यांच्या नावावर दुकानदारी सुरू असते, तर बाकीच्यांचं वेगवेगळं फिक्सिंग सुरू असतं. पीआरच्या क्षेत्रातील तोंडदेखलेपणावरही एका संवादाद्वारे मार्मिक टिपणी केली आहे. बाहेरचा खासगी मीडिया काय आपल्या घरचा आहे? ही पीआरची पोस्ट आहे. असं डायरेक्ट नाही कसं सांगता येईल? म्हणून आज हो, हो म्हणायचं. उद्या परत फोन आला की सांगायचं, मोठ्या पेपरला द्यायचं तर जाहिराती द्याव्या लागतील, त्याला पैसे पडतात भरपूर... अन्‌ टीव्हीवाले अशा मुलाखती दाखवत नाहीत. ही टिपणी बरंच काही सांगून जाते.  
भक्कम पोलादी चौकट भेदू पाहणारा महेश, मुरब्बी घोरपडे, कदम, धडाडीचा पत्रकार जया, अंत्ययात्रेला शेवटची मिरवणूक म्हणणारी डोंबिवलीची कतरिना, स्वत:ला तरबेज समजणारा संपर्क अधिकारी, लॉलिपॉप नावाने परिचित अधिकारी, उपमुख्यमंत्र्यांचा पुतण्या पवन, टॉपलेस नर्तिका, अग्रलेखाच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्पला झापणे, विशिष्ट पत्रकारांनाचं बातमी सांगणारा अधिकारी सोर्स नसलेलं पब्लिसिटी डिपार्टमेंट आदी विविध मतेमंतांतरं, प्रसंग, व्यक्तिरेखा इत्यादींद्वारे कादंबरी अधिक वाचणीय झाली आहे. नायकाच्या- महेशच्या तोंडी इंग्रजी संवाद घातले आहेत. त्याचं औचित्य कळत नसलं तरी कदाचित वेगळी शैली किंवा सहजता दाखविण्यासाठी तसे असावे. नायकाशी नामसाधर्म्य असलेले असेच एक धडाडीचे अधिकारी मराठी असूनही इंग्रजीतच जास्त बोलायचे. त्यांच्या प्रभावाचा मोह कदाचित लेखक अभिजितला आवरला गेला नसावा.
जिल्हाधिकारी महेश याला परदेश दौऱ्यावर पाठवून एका सापळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नांचा प्रसंग अतिशय उत्कंठावर्धक आहे. यातलं वैशिष्ट्ये म्हणजे हे चित्रण अतिशय सूचक पद्धतीनं सादर केलं आहे. कुठेही अश्लिलतेकडे झुकलेलं वाटत नाही. कादंबरीच्या शेवटाकडे जातांना मात्र हलकासा गतिरोधक आल्यासारखं वाटतं. कारण एकदा मंत्रिमंडळाने वांद्रा कॉलनीचा खासगीकरणातून करावयाच्या विकासास सर्वानुमते मंजुरी दिल्यावर जिल्हाधिकाऱ्याच्या हाती काही उरत नाही. तरीही तो मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मागवून त्याचा अभ्यास सुरू करतो, हे प्रशासकीय व्यवस्थेत शक्य नसतं. अर्थात, हा काही कांदबरीचा शेवट नाही. तो प्रत्यक्षच वाचला पाहिजे. बाकी कादंबरी उत्तमच झाली आहे. वाचक त्यात गुंग होतोच. प्रवाही मांडणी आणि संवादांमुळे वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी होतो!
रेड टेपमधील बहुतांश प्रसंग, ठिकाणं आणि व्यक्तिरेखा परिचयाच्या वाटल्या. मंत्रालय, बांद्रा शासकीय वसाहत, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आदी सर्वच ठिकाणं रोजची आणि भवतालचीच. बऱ्याच व्यक्तिरेखा तर नेहमीच आपल्या आजूबाजूच्या किंवा त्यांच्या आजूबाजूलाच आपण आहोत अशी शब्दागणिक जाणीव होत राहते. यातली काही पात्रं तर हा... ही... तर तो... आणि तीच... असं बोट दाखवून सांगावं, असं वाटत राहतं. पुन:पुन्हा मला माझे रिपोर्टिंगचे दिवस आठवत राहिले. शासकीय सेवेतले अनुभवदेखील एकापाठोपाठ एक आठवू लागले. अभिजितचंही शासकीय सेवेतलं अनुभवविश्व कादंबरीत प्रतिबिंबित होताना दिसलं. त्यावेळी वाचक म्हणून विविध पात्रांच्या आजूबाजूला स्वत:ला शोधण्यास मोह झाल्याशिवाय राहत नाही.
-जगदीश त्र्यं. मोरे

No comments:

Post a Comment