Monday, 21 October 2019

‘निखळ’ या पुस्तकाचा परिचय


जागर संवेदनांचा
      मित्रवर्य आलोक जत्राटकरच्या निखळया पुस्तकाचा मी लिहिलेला परिचय कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाला होता. त्यातला हा संपादित भाग...
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी दै. ‘कृषीवलमध्येनिखळनावानं सदर लेखन केलं होतं. नियमित ब्लॉगही लिहितात. त्यांचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं निखळ: जागर संवेदनांचाहे पुस्तक म्हणजे कृषीवल आणि ब्लॉगमधील निवडक लेखांचा संग्रह आहे. या पुस्तकातील विषय कदाचित एका सूत्रात बांधता येणार नाहीत; पण विचारांची सुसूत्रता त्यात आहे. जाणिवांची प्रगल्भता आहे. रोजच्या जगण्यातील अनुभव आणि भोवतालच्या घटना- घडामोडी आणि त्यावरील चिंतन त्यात प्रतिबिंबित झाले आहे.
श्री. जत्राटकर यांचं हे पुस्तक म्हणजे लेखकानं संयतपणे व्यक्त केलेल्या आपल्या भावना आहेत. कुठंही आक्रोश नाही. या पुस्तकाच्या विविध प्रकरणांत भावभावनांचा काहूर दिसतो. मुळातच पुस्तकातील भिन्न विषयांचा आणि आशयांचा आवाका मोठा आहे, त्यातून मानवी स्पंदनं समोर येतात. वृत्तपत्रीय लेखनात समकालीन मूल्यं अधिक असतात, हे गृहितच आहे; परंतुनिखळ: जागर संवेदनांचामधील प्रेरणा आणि मूल्ये चिरंत असल्याचं पानोपानी जाणवतं राहतं. श्री. जत्राटकर यांचं हे लेखन तत्वज्ञान किंवा उपदेशाचे डोस पाजणारं नाही. ते स्वत:शी केलेलं हितगूज आहे. विषयांतून, आशयांतून कृतज्ञतेचे भाव प्रकट होत राहतात. जगण्याशी भिडणाऱ्या व्यक्तिमत्वातील पैलूंचं दर्शन जत्राटकर करून देतात. संघर्षाशिवाय अन्य कुठलंही प्राक्तन नसलेली प्रशांतसारखी व्यक्तिमत्वं भेटत राहतात. एका शेतकऱ्याला मंत्रालयाच्या दारात आत्महत्येपासून परावृत्त करणारे संवेदनशील पत्रकार श्री. विजय गायकवाडही भेटतात; तर कधी डॉ. सॅम पित्रोदांची पुन्हा नव्यानं ओळख होते.‘निखळ जागर संवेदनांचाहे माणसा-माणसांतील परस्पर संवाद वाढवणारं पुस्तक असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि कवी विजय चोरमारे यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे.
पुस्तकाची सुरुवात संघर्षानं खच्चून भरलेल्या प्रशांतच्या जगण्याच्या धडपडीपासून होते. नात्यांचा कोलाहल उपसत जगणारा प्रशांत नव्यानं उभारी घेतो आणि पुन्हा कोसळतो. अखेर मृत्यूला कवटाळून जगण्याच्या छळापासून स्वत:ची सुटका करून घेतो. प्रशांतचा हा संघर्ष आणि अंत वाचताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. ‘सत्यनारायणाच्या क्रांती कथेतून डॉ. सॅम पित्रोदांच्या वलयांकीत व्यक्तीच्या आयुष्यातील वेदनाही श्री. जत्राटकर यांनी टिपल्या आहेत. राजीव गांधींची हत्या, त्यानंतर डॉ. पित्रोदा यांना स्वत:ला आलेला हार्ट ॲटक, कॅन्सर, दोन बायपास शा थरारक आयुष्याची जाणीव हे पुस्तक करून देतं. मंत्रालयात आलेल्या एका शेतकऱ्याला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यात यश आलेला थरारक प्रसंग तेवढ्याच संवेदनशीलतेनं श्री. जत्राटकर यांनी मांडला आहे. हृदयी पत्रकार श्री. विजय गायवाड यांच्यासह इतर ज्येष्ठ पत्रकार, अधिकारी, पोलिस आदींनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तो शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला आणि मोठ्या उमेदीनं उभा राहिला.
शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आई- वडिलांच्या संस्कारांचेही प्रतिबिंबगुरुजी, तुम्ही होता म्हणून…!’ या प्रकरणात दिसतं. गुरुजींची शिस्त आणि आई- वडिलांचा गुरुजींवर असलेला दृढ विश्वास यातूनच मूल्य शिक्षणाचं उदाहरण आपल्यासमोर येतं. वेड्यांचे संस्कारया वाचन संस्कृतीवरच्या प्रकरणातील दोन वेड्यांची गोष्ट वाचन प्रेरणा देणारी आहे. आजोबा आणि नातवातलं मैत्रीचं नातं- आजोबा जाऊन ठरा वर्षे झाली तरी वाचताना ताजं-टवटवीत वाटतं. श्री. जत्राटकर यांनी आजोबांनाच हे पुस्तक अर्पण केलं आहे. नातवानं व्यक्त केलेली ही प्रांजळ कृतज्ञता आहे. गुणांच्या स्पर्धेत मुलांना ढकलताना पालक नकळत मार्क्सवादाच्या आहारी जातात. त्यावेळी एका बापाबरोबर वाचकालाही अस्वस्थ व्हायला होतं. नात्यातला ओलावा कमी होण्याची विविध कारणं असतात. डोक्यात खूर्ची शिरल्यावर नवरा किंवा बाप घरातचसाहेबझाल्याच्या संवेदनाहीन प्रसंगावरही श्री. जत्राटकर यांनी नेमकेपणानं बोट ठेवलं आहे.
गुणी माणसांसोबतच आपल्या भवताली दरोडेखोरदेखील वावरत असतात आणि ते आपल्याला सहज गंडवतात, हेविश्वासाचा टायर बर्स्टमध्ये निदर्शनास येतं. असे दरोडेखोर ओळखणं कठीण असतं, याची सलही यात दिसते. वेगवेगळ्या पद्धतीनं, प्रसंगातून किंवा स्तरांतून नवनव्या मार्गानं वर्ग व्यवस्था उभी राहत असते. मुंबई उपनगरीय रेल्वेतील फोर्थ सीटवरची व्यक्ती म्हणजे क्षुद्र! त्याला विंडो सीट मिळणं अवघडच; तसंचव्हाय शूड आय स्पीक टू क्लास फोर पर्सन?’ असं विचारणारे महाभाग वर्ग व्यस्थेला जन्म देत असतात, याबाबतचं सूक्ष्म निरीक्षणही जत्राटकरांनी इथं नोंदवलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर ही महाराष्ट्राची खरी शक्तीस्थळं. हे महापुरुष कुठल्या जातीधर्माचे नव्हते. ते सर्वांचे होते. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकराच्या वस्तूंचं संग्रहालय उभारण्यासाठी नागपूरजवळील चिंचोली इथं श्रीमती गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या उच्चवर्णीय महिलेनं आपली साडेअकरा एकर जमीन दान दिली. ही समतेची आणि कर्तृत्वांची कदर करणारी भूमी आहे. तोच वारसा आपल्याला पुढं न्यायचा आहे, याची जाणीवशांतिवन: विदर्भातील चैत्यभूमी या प्रकरणातून अधिक प्रकर्षानं होते.  
रुग्णाचा जीव जात असताना डॉक्टरांचं निघून जाण्यासारखे दोन प्रसंग अनुभवल्यानंतर वैद्यकीय प्रॅक्टीसची नोंदणी प्रसंगी घ्यावयाच्या डॉक्टरांच्या शपथेच्या स्वरुपातीलतिसरा मृत्यूअधिक वेदनादायी वाटतो. हावरटपणामुळे मातीचा कस कमी होत चालला आहे, तशीच नातीसुद्धा दुरावत चालली आहेत. माती आणि नात्यांचं सारखंच आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी नव्यानं खतपाणी आणि मशागतीची आवश्यकता आहे. नात्यांतला हा कोलाहल उपसताना होणारी दमछाक बरंच काही सांगणारी आहे.
पिण्याचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असताना डि-सलाईनेशनसारख्या तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असं म्हणत श्री. जत्राटकर यांनी तंत्रज्ञान या विषयाला हात घातला आहे. तंत्रज्ञानानं मानवी जगणं सुसह्य होत आहे किंवा होऊ शकते; परंतु तंत्रज्ञानानं काही आव्हानंही उभी केली आहेत. आपलं खासगीपण राहील की नाही, ही भीती सोश मीडियानं गडद केली आहे. त्यासाठी आपल्यालाच स्वत:वर बंधन घालून घेण्याचं भान अंगीकारणं, हेच यावरचं उत्तर लेखक सूचवितो. मिल्खा सिंगवरील सिनेमासंदर्भात लिहितानामिल्खाचं मल्टिफिकेशन हवंय!’ असं नमूद केलं आहे. मिल्खा सिंग एक प्रतीक आहे; त्यातून दिलेला संदर्भ अधिक मौल्यवान आहे. त्यातील सामाजिक प्रेरणांच्या स्वीकारार्हतेच्या मानसिकेतसंदर्भातला ऊहापोह अधिक महत्वाचा वाटतो.
श्री. जत्राटकर यांनी पत्रकार आणि शासकीय अधिकारी म्हणून भूमिका बजावली आहे. अधिकारी म्हणून माहितीच्या अधिकाराचा संबंध येणं अपरिहार्यच आहे. ‘शॉर्ट बट स्वीटअसा हा कायदा आहे. त्याची महती श्री. जत्राटकर यांनी विषद केली आहे; परंतु दोन्ही बाजूनं काही अपप्रवृत्ती या जनकल्याणाच्या कायद्यासाठी घातक ठरू शकतात. त्या अनुषंगानं उपस्थित केलेला इन्फो टेररिस्टचा मुद्दा आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्री. नरेंद्र दाभोळकरांचा खू कुठल्याही विवेकी माणसाला अस्वस्थ करणाराच आहे. त्यासंदर्भातलंगोली मार भेजे में…!’ या प्रकरणात उपरोधिकपणे मांडलेलं गोळीचं तत्वज्ञान मनाची घालमेल वाढवणारं आहे. अशा अनेक विषयांतून श्री. जत्राटकर यांनी भावभाना, सुख-दु:, बरे-वाईट प्रसंग अत्यंत संयतपणे उलगडले असल्यामुळे आपण कधी निखळपणे संवेदनांच्या जागराचा भाग बनून जातो, हे लक्षातही येत नाही. हेच आलोक जत्राटकर यांच्या निखळ: जागर संवेदनांचा या पुस्तकाचं आणि त्यातील लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
कृषीवलचे तत्कालीन संपादक श्री. संजय आवटे यांच्या संकल्पनेतून श्री. जत्राटकर यांचंनिखळहे सदर साकारलं. ज्येष्ठ पत्रकार आणि प्रकाशक रावसाहेब पुजारी यांच्यामुळे हे पुस्तक आकारास आलं. जयसिंगपूरच्या कवितासागर प्रकाशनानं ते वाचकांच्या हाती दिलं. त्याला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत अनुदान लाभणं, हे श्री. जत्राटकर यांच्या साहित्यविश्वातील स्वागताचं प्रतीक आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पठारे, श्री. विश्वास पाटील, श्री. संजय पवार, श्री. इंद्रजित भालेराव आदींच्याही पहिल्या पुस्तकांना नवलेखक योजनेतून अनुदान मिळाले होते, याची आठवण ज्येष्ठ विचारवंत श्री. हरी नरके यांनीनिखळ: जागर संवेदनांचाच्या प्रकाशन समारंभात करून दिली होती. त्यामुळेच श्री. जत्राटकर यांच्याविषयीच्या आशा-अपेक्षा वाढल्या आहेत.

No comments:

Post a Comment