Tuesday 4 February 2014

निवडणूक आचारसंहिता

ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा नगरपरिषदा आणि महानगरपालिका ते थेट लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणुकांसाठी आचारसंहिता असते. राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग या दोन स्वंतत्र घटनात्मक संस्था आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या; तर भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक घेतली जाते. ही निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्ही आयोगांच्या आचारसंहिताही स्वतंत्र आहेत. आचारसंहितांचा उद्देश आणि आत्मा मात्र एकच असतो. त्या पाशर्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे संक्षिप्त स्वरुपातील हे संकलन. हे संकलन साधारणत: दीड-दोन वर्षांपूर्वीचे आहे. त्यात काही बदल असू शकतात. त्यामुळे हे अंतिम आहे, असे नाही.   
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संबंधित संस्थेच्या कार्यक्षेत्रापुरतीच मर्यादित असते; परंतु या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारा निर्णय किंवा कृती इतरत्र घडली तरी आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. आचारसंहिता लागू असताना काय करावे आणि काय करू नये, यासंदर्भात आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहेत. ते थोडक्यात असे:
काय करावे
·      सुरू असलेले कार्यक्रम, योजना पुढे सुरु ठेवता येतील.
·      शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण किंवा मान्यता घ्यावी.
·      पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना सुरू करता येतील व त्या पुढे सुरु ठेवता येतील.
·      मरणासन्न किंवा गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे सुरू ठेवता येईल.
·      मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना व उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. सर्व पक्षांना किंवा उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.
·      विश्रामगृहे, डाकबंगले व इतर शासकीय निवासस्थाने वगैरे बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णत: अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना व निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्वावर अनुज्ञेय असल्याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावेत.
·      इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामे या बाबींशीच संबंधित असावी.
·      शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे.
·      इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा व मिरवणुकींमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करण्यात येऊ नयेत.
·      प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलिसांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात.
·      प्रस्तावित सभेच्या जागी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. 
·      प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक (Loudspeaker) किंवा इतर कोणत्याही अशा सवलतीचा वापर करण्यासाठी परवानगी आवश्क आहे.
·      सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींबरोबर व्यवहार करण्यासाठी पोलिसांचे सहाय्य घ्यावे.
·      कोणत्याही मोर्चाच्या प्रारंभीची वेळ व जागा तसेच मोर्चाचा मार्ग, मोर्चाची अखेरची वेळ व स्थान आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलिसांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घ्यावी.
·      मोर्चामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये.
·      हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मोर्चात सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत.
·      बिल्ले व ओळखपत्रे, निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ठळकपणे लावली पाहिजेत.
·      मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर द्याव्यात. त्यावर उमेदवाराचे किंवा पक्षाचे चिन्ह नसावे.
·      वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य) देखील यातून सूट नाही.
·      कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.
काय करू नये
·      शासकीय वाहने किंवा कर्मचारीवर्ग अथवा शासकीय यंत्रणेचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. 
·      सत्तेवरील पक्ष अथवा शासनाने साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात करू नये.
·      कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करू नये. कोनशिला बसविणे किंवा नवीन रस्त्यांच्या बांधकामाचे वचन देऊ नेये.
·      शासन किंवा सार्वजनिक उपक्रमांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ (Ad hoc) नियुक्त्या करू नयेत. 
·      निवडणूक प्रचाराच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडू नये.
·      मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखवू नये.
·      मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करू नये.
·      विभिन्न जाती, जमाती किंवा धार्मिक, भाषिक गटात मतभेद निर्माण होतील किंवा परस्परात वेमैनस्य वाढेल अथवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करू नये.
·      कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसलेल्या व खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी नाही.
·      निवडणूक प्रचार, भाषणे, फलक किंवा संगीत आदींसाठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करू नये.
·      लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नांवाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या प्रकारांना प्रतिबंध आहे.
·      व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नयेत.
·      संबंधितांच्या परवानगीशिवाय कुठलीही जमीन, इमारत किंवा आवार अथवा भिंतीचा वापर ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीस चिकटविणे किंवा घोषणा लिहिण्यासाठी करता येणार नाही. 
·      इतर राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये.
·      एका पक्षाची सभा सुरू असलेल्या जागेवर दुसऱ्या पक्षाने मोर्चा काढू नये.
·      दुसऱ्या पक्षांची किंवा उमेदवारांची प्रचारपत्रके काढू नयेत.
·      मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्‌ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचारपत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्यांचे प्रदर्शन करू नये.
·      ध्वनिवर्धकांचा सकाळी सहा वाजण्यापूर्वी किंवा रात्री दहा वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेतल्याशिवाय वापर करू नये.
·      संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी परवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मोर्चात ध्वनिवर्धकाचा वापर करू नये. 
·      निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या मद्याचे वाटप करण्यात येऊ नये.
·      प्राण्यांचा निवडणूक प्रचारात क्रूरपणे वार करू नये.  

No comments:

Post a Comment