एटीजचं ‘देशी’ जगणं
आर्थिक,
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक
आदींची स्थिती दर्शविणारे वेगवेगळे निर्देशांक (इंडेक्स) असतात. संबंधित तज्ज्ञ ते
विकसित करतात. एका अर्थतज्ज्ञाने विकसित केलेला ‘अंडरवेअर इंडेक्स’ काही
वर्षांपूर्वी चर्चेत येऊन गेला. त्यावरच्या एका लेखातील अंडरवेअरचा महिमा-
चड्डीपुराण वाचताना आमची अर्धी खाकी चड्डी पूर्णपणे आठवली; ती
एटीजमधल्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतली! अर्थात, शाळा आणि
शाळाबाह्य अशा वेगळ्या चड्ड्या नसायच्याच मुळात आमच्या. आतली आणि बाहेरची असाही
पसारा नसायचा.
‘चड्डी’ हा शब्द कधीही अश्लील, असभ्य किंवा लज्जास्पद वाटला
नाही. अलीकडे आपण सारे सुशिक्षित झाल्यामुळे कदाचित तो शब्द आता वंगाळ वाटत असावा.
गावखेड्यांत पूर्वी शाळेची आणि घरची वेगळी वेशभूषा (ड्रेस) नसायची. पांढरा सदरा
लखलखीत दिसावा म्हणून आई त्याला नेहमी नीळ लावायची, एवढंच
काय ते वेगळं. चड्डीच्या पार्श्वभागावरील नक्षीदार ठिगळं मात्र लक्षवेधी असायची;
परंतु लक्ष कुणाचंही नसायचं. बहुतेकांच्या नशिबी नक्षी असायचीच. हा
आमचा एटीजचा ट्रेंड नव्हता; ते एटीजमधलं वास्तवातलं जगणं
होतं!
‘अंडरवेअर इंडेक्स’च्या बातम्या आल्यानंतर
‘लिप्स्टिक इंडेक्स’चीही बातमी वाचण्यात आली होती. अंडरवेअर इंडेक्स खालावल्यास
मंदी; तर लिप्स्टिक
इंडेक्स घसरल्यास संधी. लिप्स्टिकचं अर्थशास्त्रच काय साधा भावही माहीत असण्याचं
कारण नाही, देवा शपथ खरं सांगतोय. अद्याप कोणासाठीच
लिप्स्टिक घेतलेली नाही. लिप्स्टिकच्या रंगछटाही माहीत नाहीत. रंगांना आपण आधीच
जाती-धर्माधर्मांत वाटून टाकलं आहे; तसंच विविध
जाती-धर्मांनी वेगवेगळ्या रंगांचा सातबारा आपल्या नावावर करून घेतला आहे. त्यातूनच
माणसांचे रंग कळू लागले. काही जाती असतील अजूनही रंगाच्या सातबाराविना. नाही
म्हटलं तरी एटीजमध्ये रंगांवरून फार तर डावा-उजवा सहज ओळखता येत होता. कधीकधी
बहुरंगी झेंडेही नजरेस पडायचे; परंतु रंग मात्र फार गडद
झालेले नव्हते, झाले असतीलही; पण
आमच्या बालमनाला ते शिवले नसावेत. तसं बिंबवायला सोशल मीडियासुद्धा नव्हता!
अलीकडे जगण्याचे रंग अधिक ‘उठावदार’ झाले आहेत.
अंगी आणि मनी पक्के रासायनिक रंग भिनले आहेत. खिशातही मनीची कमतरता नाही. त्याचेही
इंडेक्स काढता येतील. अर्थात, ते तर दूरच; परंतु कुणाचा इंडेक्स खरा आणि
कुणाचा खोटा? हे ताडण्याचं कसबसुद्धा आपल्या अंगी नाही. आपण
अर्थविषयक जाणकार नाही आहोत. खरं खोटं ‘कुबेर’च जाणोत. मी उपरवाल्या कुबेरची बात
करतोय… धनदेवता कुबेर… अर्थशास्त्रातला पारंगत! तो आपल्यासारखा प्रसंगानुरूप
‘इंस्टंट’ अर्थतज्ज्ञ नसेल. तसंही अंडरवेअर आणि लिप्स्टिक इंडेक्सचं
अर्थशास्त्राशी असलेल्या नात्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता नाही. आपण काही
अर्थशास्त्री नाही. खरं तर तो आपला पिंडच नाही. विषय क्रिकेटचा असता तर आपण नक्कीच
रवी शास्त्रीच्या पुढं गेलो नसतो. पिंड नसल्याचा ‘डिफेन्सिव्ह मोड’ सेट केलेला
बरा. तो एकदाचा सेट केला की कोणाला सत्य- असत्याचं स्पष्टीकरण देण्याची गरजच उरत
नाही, हे एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधीचं एनआयचं
(नैसर्गिक बुद्धिमत्ता) संशोधन आहे. डिफेन्सिव्ह मोडमुळे दोन-चार इकडच्या-तिकडच्या
गोष्टी ठोकून देण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून घेता येतं. असो! हे काही आपले
आजचे विषय नाहीत. आपल्या आजच्या ‘चिंतना’चा विषय एटीजचा ट्रेंड हासुद्धा नाही…
एटीजचं देशी जगणं हा आहे!
एटीजमध्ये पालकांच्या काटकसरीच्या आणि
दूरदृष्टीच्या आर्थिक धोरणामुळे वाढत्या वयाची चड्डी शिवली जायची. रेडिमेड कधीच
नसायची. रेमंडची बातच नव्हती. चड्डी एकदा शिवली की झालं. कंबरेवरून सातत्यानं
निसटणं, हा तिचा
धर्म. बापाच्या महसुली खर्चातल्या तरतुदीतल्या ही चड्डी खरोखर ‘निसटावंत’ असायची.
करदोडाही चड्डीला आधार द्यायचा. करदोड्याला खराट्याच्या काडीचा पीळ दिल्यावर मग
‘निसटावंत’ चड्डी ‘निष्ठे’नं आमच्या कंबरेला घट्ट चिकटून राहायची. चुनीदार नक्षी
मात्र कंबरेभवती फेर धरायची.
खानदेशात पाऊस नेहमीच रुसलेला असायचा किंवा
असतो; परंतु थंडी
मात्र मनसोक्त बरसते. ती तशी काही गुलाबी किंवा बोचरी नसते. ती थेट चामडी उसवते.
करदोडा थंडीतही मदतीला धावायचा. थंडीत सकाळी-सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आंघोळीच्या
दिव्यातून बाहेर पडणं अवघड व्हायचं; पण शाळेत मात्र आंघोळ
करून येणं कम्पलसरी असायचं. त्यावरही उपाय असायचा. आंघोळ न करता चड्डी आणि कपडे
मात्र तेच, फक्त करदोडा ओला करायचा. याबद्दलची मजेशीर आठवण
भारतीय प्रशासकीय सेवेतील राजेश पाटील यांनी ‘ताई- मी कलेक्टर व्हयनू’ या
आत्मकथनात लिहिली आहे. “गुरुजी रोज माझा करदोडा तपासत असत. तो
ओला असला म्हणजे मी आंघोळ केली आहे,
याची त्यांना खात्री मिळे. मला त्या दरम्यान एक नवी युक्ती सुचली.
मी फक्त करदोडा ओला करून, आंघोळ न करता जाऊ लागलो. गुरुजी
मला चांगली सवय लागल्यामुळे खूश झाले.”
करदोडा म्हणजे एक रंगीत धागा. तुमच्या
करदोड्याचा रंग लगेचच तपासून खात्री करून घ्या, तरच कुठल्या तरी समूहात जागा मिळेल; पण एटीजमध्ये प्रश्न रंगाचा, धाग्यादोऱ्यांचा किंवा
गंडादोऱ्यांचा नसायचा. हे धागेदोरे नेहमी मदतीला धावायचे एवढं मात्र नक्की. लाल
रंगाचा करदोडा कंबरेवरची चड्डी सावरायचा आणि पांढऱ्या रंगाच्या मोठमोठ्या धाग्यानं
चड्डीला लावलेली रंगीबेरंगी ठिगळं पार्श्वभाग नक्षीदार करायची. झीजलेल्या घमेलीच्या
बुडाला ओबडधोबड ठोकलेला पत्रा आठवून बघा. एखाद-दुसऱ्या मुलांच्या नशिबी मशीनच्या
आखीव-रेखीव शिलाईची ठिगळं असायची. सुईच्या टाक्यांच्या ठिगळांमुळे आमचे दोन्ही
‘तबल-डग्गे’ फाटक्या जीन्ससारखे शोभिवंत असायचे. पत्रा ठोकलेल्या दोन उलट्या
घमल्या आम्ही गावभर मिरवत असू; पण ती कायमस्वरूपी तुटीच्या
अर्थव्यवस्थेची द्योतक आणि स्थायी मंदीची प्रतीकं असायची. तसंही आपण प्रतीकांशिवाय
जगूच शकत नाही!
कवी नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ या
काव्यसंग्रहातील ‘तो शेतमजुराचा पोरगा आहे’ ही कविता अगदी एटीजमधल्या
गावशिवारातल्या पोरांचं प्रतिनिधित्व करते,
असंच वाटत राहतं,
ज्याच्या सदऱ्यावर ओघळ असतील घामाचे
चड्डीला ठिगळं मागे वीतभर
कुबट वासही येत असेल कपड्यांचा
खरं तर त्याला शाळेतूनच जावं लागतं
मालकाच्या खळ्यात गणवेशासकट
पार्श्वभागावरच्या ठिगळासाठीच्या जाड
धाग्यांच्या सुईचे टाके मनाला टोचायचे;
पण ते मनावर घेण्याचं भान नसायचं. कारण दु:ख वाटून घेतल्यावर कमी
होतं. ते वाटण्याची गरजच नव्हती. जवळपास सर्वांचेच ‘तबल-डग्गे’ रंगीबेरंगी असायचे.
ग्रामीण भागात एटीजच्या सुमारास गरिबीच्या बाबतीत बहुतांशपणे समता होती. अर्थात,
अपवादही होते. अपवादवाल्याच्या नशिबी ठिगळांची फॅशन नव्हती. म्हणून
ते बिचारे आता फाटक्या जीन्स अथवा सुईच्या जाड टाक्यांचे फॅशनेबल कपडे विकत घेतात.
एटीजच्या फॅशनची हौस त्यातून ते आता भागवून घेतात. ती फॅशन आम्ही एटीजमध्ये
‘भोगली’ आहे. एटीजमधील आमची फाटलेली, ठिगळंवाली चड्डी म्हणजे
गरिबी आणि आताची फाटलेली ‘रिप्ड जीन्स’ किंवा ‘डिस्ट्रेस्ड जीन्स’ म्हणजे
श्रीमंती!
एटीजमध्ये आमचे कपडे चुकून जरी फाटले तरी
आई-वडील रागविण्याची भीती वाटायची. आता फाटलेल्या जीन्स घेण्यासाठी बाप पैसे देतो.
बाजारात ‘डिस्ट्रेस्ड जीन्स’च्या नावाखाली अर्धी फाटलेली पँट विकत घेण्यासाठी लोक
पाच हजार रुपये मोजतात. पूर्वी अशी पँट घालून घरातून बाहेर पडलो असतो, तर आईनं उंबरठ्यावरच झाडूनं
आपली पूजा मांडली असायची.
आमच्या एटीजचा प्रारंभ शालेय प्रवेशापासून झाला
आणि एटीजचा शेवट कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्रवेशानं झाला. त्यामुळे खेड्यातून
गावकम शहरात गेल्यामुळे एटीजचं जगणं आणि नाईन्टीजचा माहोल बघता आला. तोपर्यंत
अर्थात, थर्टी,
सिक्सटी, नाईन्टी असं काहीच माहीत नव्हतं,
आईच्यान खरं सांगतो. गावतल्या वडीलधारी मंडळींचं जगणं अस्सल देशी
होतं. अगदी पहिल्या धारेचं. रोज तिन्ही सांजेला पावशेरभर पुरेशी असायची. गाव
आखऱ्याच्या बांधावर नवसागर आणि काळा गूळ हमखास असायचा. आठवड्यातून एकदा भट्टी
लागायची. कधीकधी पोलिसही भट्टीवाल्यांच्या सत्काराला यायचे. पेकाट्याला दोन-चार
दांडक्यांचे बक्षीस द्यायचे. नाईन्टीजमध्ये उदारीकरणाचं धोरण आलं. विदेशीचं अप्रूप
राहिलं नाही. शॉपीला मिळालेल्या परवान्यामुळे (लायसन्समुळे) भट्ट्यांची धगधग कमी
झाली. स्टेनलेस स्टीलच्या स्पर्धेत तांब्या-पितळाच्या भांड्यांचा पराभव झाला.
कल्हईची गरज उरली नाही. नवसागरला महत्त्वच राहिलं नाही. काळ्या गुळाला सेंद्रिय
गूळ म्हणून प्रतिष्ठा लाभली.
एटीजच्या प्रारंभी शहरातल्या किंवा फॅशनेबल
व्यक्तींचे कपडे इतके सैल असायचे की त्यांच्या पँटच्या एका पायात दोन जणांचे पाय
सहज मावले असते. तो पायजमा-पायघोळ फारच भारी असायचा. त्याचा घोळ आता पुन्हा घातला
जातोय. एटीजमध्ये बेल बॉटम्सचा जमाना तसा शेवटचा श्वास घेत होता. बेल बॉटम
पँटबरोबरच खांद्याला पॅडिंग असलेले मोठे जॅकेट्स आणि हत्तीच्या कानासारखे कॉलर
असायचे. जणू काही कपड्याचं दुकानच तो अंगावर मिरवायचा. आताच्या जीन्स इतक्या स्कीन
फिट असतात की पँट उतरवण्यासाठी दोन जणांची मदत घ्यावी लागते की काय, अशी शंका येते. एटीजमध्ये शर्ट
थोडा सैल असला की आपण स्मार्ट असल्याचं तरुणाईला वाटायचं. आता शर्ट सैल असेल तर
‘ओव्हरसाइज्ड’ आणि घट्ट असेल तर ‘स्लिम फिट’ अशी नावं देऊन भागवलं आणि मिरवलं
जाण्याची समकालीन फॅशन झाली आहे.
एटीजमध्ये कपड्यांचे रंग म्हणजे भडक पिवळा, लाल, गुलाबी,
हिरवा, शर्टवर मोठमोठे फुलं किंवा ठपके अगदी
‘डिस्को डान्सर’ अवतारच असायचा. फॅशनेबल माणूस चालता-बोलता ट्रॅफिक सिग्नल
वाटायचा. तेच भडक, डगळ कपडे आजच्या भाषेत ‘रेट्रो फॅशन’
किंवा ‘Retro Vibe’ म्हणून पुन्हा येऊ पाहत आहेत. आज दर पाच
मिनिटांनी ओओटीडीचा (Outfit Of The Day) फोटो इन्स्टावर जातो;
पण गंमत म्हणजे, एटीजच्या दशकातील तेच ‘भडक’
कपडे आजच्या भाषेत ‘रेट्रो फॅशन’ म्हणून पुन्हा बाजारात विकले जात आहेत!
एटीजच्या दशकात कापड मोजताना दुकानदार विचारायचा, “पँट शिवायचीय की तंबू ठोकायचाय?” बेल-बॉटमसाठी अधिकचा कापड
लागायचा. तेव्हा फाताड्या पायांच्या पँट्सचा ट्रेंड असायचा, आता
पँट फाताड्या कंबरेची आणि घट्ट बॉटमची असते. स्कीन टाईट किंवा स्कीन फिट जीन्स
किंवा पँट घालणं म्हणजे मोठं कसब. ते जेनझीलाच विचारायला हवं. स्कीन टाईट पँट
किंवा जीन्सच्या खिशात हात तर दूरच मोबाईल जात नाही. म्हणून हातात दोन-दोन मोबाईल
घेऊन त्यांचाही ब्रँड दाखविता येतो आणि मिरवताही येतो.
अलीकडे मात्र एटीजमधल्या फाताड्या पँटची आठवण
व्हावी असा ‘स्ट्रेट लेग’ किंवा ‘स्ट्रेट फिट जीन्स’चा ट्रेंड आला आहे. या जीन्सची
कंबरेपासून किंवा मांड्यांपासून खाली पायापर्यंत समान रुंदी असते. ही जीन्स हिप्स
किंवा मांड्यांपासून खाली घोट्यापर्यंत कुठेही बारीक किंवा अति-रुंद न होता एकाच
सरळ रेषेत खाली येते. ही जीन्स पायाला घट्ट चिकटून राहत नाही आणि खूप ढगळही नसते.
ती अतिशय आरामदायक आणि क्लासिक मानली जाती. जर कंबरेपासून खाली खूप सैल आणि जास्त
रुंद घेर असेल, अशा
जीन्सला ‘वाईड लेग जीन्स’ म्हणतात, हाही आता ट्रेंड आहे.
‘वाईड लेग जीन्स’च्या माध्यमातून पुन्हा फातडी
पँट बाजारात आली आहे. थोडक्यात काय तर या जीन्स एटीजच्या पँटशी नातं सांगत आहेत.
शेवटी ‘जुनं तेच सोनं’ म्हणण्यापेक्षा जुन्या बाटलीत नवी दारू. तसाही एटीजच्या
गावखेड्यातल्या पुरुष मंडळींनी ‘देशी’वाद अधिक जपला होता. तिकडेही आता
‘देशी-विदेशी’ची उपलब्धता झाली आहे. त्यांनी तरी का मागं राहावं? देशी शब्द वाचल्यावाचल्या
झिंगण्याचं कारण नाही. मी वस्तू आणि सेवांबद्दल बोलत आहे, ज्यावर
गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स- जीएसटी असतो. एटीजच्या ‘देशी’वर जीएसटी नसायचा. तसा तो
आताही नसतो; पण विदेशीमुळे देशी जगण्याला आता प्रतिष्ठाच
उरली नाही राव! तेच कोसलाकार भालचंद्र नेमाडे सांगू पाहत आहेत की काय? असा बालसुलभ प्रश्न आपल्या निष्पाप बुद्धीला पडतो.
एटीजच्या ट्रेंडमध्ये लेडीज-जेंट्स सर्वांच्या
कंबरेवर हायवेस्ट जीन्स दिसतायत. अलीकडचा ट्रेंड ‘लो वेस्ट जीन्स’चा आहे. लो वेस्ट
जीन्समुळे जीन्सचा तर ब्रँड मिरवता येतोच;
पण अंडरवेअरचाही ब्रँड दाखविता येतो. एटीजमध्ये कपडे अंग
झाकण्यासाठी असायचे; आता कपडे स्टाइल आणि ब्रँड दाखवण्यासाठी
घातले जातात. एटीजमध्ये फाटलेले कपडे ठिगळं लावून शिवले जायचे. आता शिवलेले कपडे
फाडून वापरले जातात. आता कंबरेवरच्या पँटपेक्षा तिच्यावरच्या फाटलेल्या जागा जास्त
ठळक दिसतात. तेव्हा बेलबॉटमची रुंदी पाहून टेलर आश्चर्यचकित व्हायचा; आता स्लिम-फिटची घट्टाई पाहून तो घाबरतो. तेव्हा शर्ट जितका मोठा तितका
स्मार्ट; आता शर्ट शरीराला चिकटला नाही तर फॅशनच नाही!
एटीजमध्ये कपड्यांवर कोळशाची इस्त्री
फिरविण्याची धडपड असायची. तीही नसेल तर तांब्यात धगधगता कोळसा घालून इस्त्री केली
जायची; आता ‘क्रश्ड
लूक’साठी जास्त पैसे मोजले जातात. कायमस्वरूपी सुरकुत्या पडलेल्या कपड्यांची आता
फॅशन आली आहे. आधीच सुरकुत्या किंवा सुरगाळ्या पडलेल्या साड्या, कुर्ते, शर्ट किंवा दुपट्टे आता बाजारात मिळतात. हा
कपड्यांचा एक नैसर्गिक आणि युनिक टेक्सचर असतो. त्यामुळे आता इस्त्रीचे पैसे
वाचतात, हाही फॅशनचाच भाग आहे.
एटीजमध्ये झेडपीच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या
शाळेतल्या मुलांच्या पायात चप्पलच नसायची. ती गरजेची वस्तू वाटायची नाही. शेतात
जायण्यासाठी गावातलं उत्पादन असलेली टायरची चप्पल पुरेशी असायची. आता दोन पैसे
अधिक मिळवत्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या कपड्यांच्या रंगसंगतीनुसार ढिगभर
पायताणं असतात. त्यांच्या ‘पादुकां’च्या दर्शनानंच समृद्धीची अनुभूती लाभते. पुढे
आठवी-नववीत गेल्यावर आमच्या पायात पॅरागॉनची स्लीपर दिसू लागली. कॉलेजपर्यंत ती
साथीदार होती. मग एटीज संपलं; नाईन्टीजची नशा चढल्यावर कळलं, स्लीपर म्हणजे चप्पल
नव्हे!
एटीजमध्ये फॅशनपेक्षा कपडे किंवा कोणतीही वस्तू
अधिकाधिक कशी टिकतील याची काळजी घेतली जायची. आता ट्रेंड किती दिवस टिकेल याची
चिंता असते. एटीजचे कपडे आणि आजची फॅशन यात खूप फरक आहे. काळ बदलला आहे. कपडे
बदलले आणि कपडे घालण्याची कारणंसुद्धा बदलली आहेत. तेव्हा अंग झाकण्यासाठी कपडे
वापरले जायचे. त्यावेळी कपडे आपल्याला शोभतायेत की नाही, यावरून कपड्यांची निवड व्हायची
आणि आरशाचा फारसा हस्तक्षेप नसायचा. आता आपण कपड्यांना शोभतोय की नाही, हे मोबाईलचा कॅमेरा ठरवतो. सेल्फी पोस्ट करायची असते ना. उदारीकरणाच्या
जमान्यातला हा सेल्फिसनेस आहे!
टीजमध्ये फॅशन साधी होती; पण विदाऊट फिल्टरचे फोटो
भन्नाट असायचे. फोटो काढताना रील संपण्याची भीती असायची. आता फोटोत मूड पकडण्याची
धडपड असते. तेव्हा एखादा चुकार पाखरासारखा फोटोग्राफर कधीतरी गावात यायचा.
त्याच्याकडं लग्नाळू मुलींचे फोटो काढण्यासाठी धडपड असायची. काही फोटोग्राफर विनाअनुदानित
शाळेतले शिक्षक असायचे म्हणे. शाळा सुटली की पाठीवर कॅमेऱ्याचं ओझं घ्यायचं.
गावोगाव फिरायचं. लग्नकार्याची ऑर्डर मिळाली की, शाळेला
दांडी मारत यात्रेला निघायचं. लग्नकार्याला आता प्रोफेशनल फोटोग्राफरच लागतो.
अन्यथा प्रत्येक जण केवळ फोटोग्राफर नाही तर जर्नालिस्ट… फोटोजर्नालिस्ट झाला आहे.
सेल्फ्यांचा तर पूरच आला आहे. चेहरा दाखविण्याची भूक मोबाईलचा कॅमेराही भागवू
लागला आहे. म्हणूनच तर आपला जिवाभावाचा 'झुक्याभाऊ' मोठा झाला!
एटीजमध्ये
ग्रामीण भागात फोटो कधीतरी काढला जायचा. व्हिडिओ शूटिंगचा संबंधच नसायचा. एकूणच
संवादाच्या साधनांचा अभाव होता. थेट मौखिक किंवा वाचिक संवाद (व्हर्बल
कम्युनिकेशन) साधला जायचा. आता अमौखिक किंवा अवाचिक संवादावर (नॉनव्हर्बल
कम्युनिकेशन) भर दिला जातो. त्यातून एका आभासी विश्वानं जन्म घेतला आहे. त्याची
आपण आपत्ये आहोत. म्हणून आपण मोबाईल घेताना नॉनव्हर्बल कम्युनिकेशनसाठी
फिल्टरवाल्या मोबाईल कॅमेराला अधिक पसंती देतो. संवादतज्ज्ञ मॅक्ल्युहानच्या
सिद्धांतानुसार मोबाईलद्वारे मिळणाऱ्या माहितीपेक्षा मोबाईल हाच एक संदेश झाला
आहे. त्याने १९६० मध्ये मांडलेली ग्लोबल व्हिलेजची संकल्पना आता प्रत्यक्षात येत
असताना लोकल लयास जाऊ लागले आहे. प्रत्येक ‘देशी’ वस्तुला ‘विदेशी’ पर्याय आला
आहे. जगाच्या पाठीवरील अंतरे संपुष्टात आली आहेत आणि माणसं मनोमनी दूर गेली.
संपूर्ण जग एका छोट्या गावासारखे जवळ आले आहे. जगाच्या एका कोपऱ्यात उदयास येणारी
फॅशन क्षणात दुसऱ्या कोपऱ्यात पोहचू लागली आहे. तसाच एटीजचा ट्रेंड क्षणात व्हायरल
झाला आणि स्क्रोल करता करता लगेचच दिसेनासा झाला. -डॉ. जगदीश मोरे
#८०sLifestyle
#MarathiArticle #DesiJeevan #FashionEvolution #RuralIndia #ShabdanganDiwaliAnk
#८०sVs९०s #Nostalgia #MarathiSahitya
#DrJagdishMore #शब्दांगण #दिवाळी
No comments:
Post a Comment