Monday, 8 March 2021

प्रणालीची महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती

प्रणालीची सायकल भ्रमंती

          मित्र श्री. चैत्राम पवार यांच्या खूप दिवसांच्या निमंत्रणानंतर गेले दोन दिवस (दि. 6 आणि 7 मार्च) बारीपाड्यात (ता. साक्री, जि. धुळे) सहकुटुंब होतो. योगायोगाने तिथे सायकलवरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भ्रमंती करणाऱ्या प्रणाली विठ्ठल चिकटे या तरुणीची भेट झाली. प्रणालीने गेल्याच वर्षी व्यावसायिक समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी (बी. एस. डब्ल्यू) प्राप्त केली. प्रणालीने विज्ञान शाखेतून बारावी केली; परंतु त्यात तिला रस नव्होता. समाजकार्याबाबतही तिला फारशी माहिती नव्हती. तरीही तिने बीएसडब्ल्यूला प्रवेश घेतला आणि आपण आवडीच्या विषयाकडे वळल्याची तिला जाणीव होऊ लागली. आपल्या स्वत:च्या जाणिवा विस्तारण्यासाठीच ती आता सायकलवर स्वार होऊन महाराष्ट्र भ्रमंतीसाठी घराबाहेर पडली आहे.

            प्रणालीदेखील गावखेड्यातील चारचौघींसारखीच सर्वसामान्य मुलगी आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) येथील कास्तकार कुटुंबातील तीन बहिणींमधील शेंडेफळ. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने बारावीनंतरच घराचा उंबरठा ओलांडला होता. कापसाच्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रणालीसह तिन्ही बहिणी आईवडीलांना शेतीच्या कामात हातभार लावतात. बीएसडब्ल्यूसाठी तिने चंद्रपूर येथील एसआरएम समाजकार्य महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पदवीचे शेवटचे वर्ष संपत आले आणि संपूर्ण विश्व कोविड-19 च्या गडद छायेखाली झाकोळले गेले. लॉकडाऊनने प्रत्येकाला घरात बंदीवान केले.

            प्रणालीची जिद्द आणि उत्साह लॉकडाऊनवर स्वार झाला. तिच्या विचारांची चाके वेगाने धावू लागली. कन्याकुमारीला सायकलने प्रवास करण्याचे स्वप्न ती बऱ्याच दिवसांपासून बाळगून होती. या स्वप्नाला तिने थोडे वेगळे वळण दिले आणि लॉकडाऊनमध्येच तयारीला लागली. स्वत:ला मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पर्याय शोधू लागली. घरोघरी सायकलीने जाऊन वृत्तपत्र टाकण्याचा मार्ग तिने निवडला. त्यातून थोडेफार पैसेही मिळू लागले. चंद्रपुरातले घर भाडेही सुटू लागले. लॉकडॉऊनच्या काळात तिथे ती 75 ते 80 घरात दररोज पहाटे वृत्तपत्र टाकत असताना करोनाच्या ताणतणावावर नकळत ती मात करू लागली. सायकलचाही आपोआप सराव होऊ लागला.

            संपूर्ण विश्व सप्टेंबरच्या अखेरीस अंशत: अनलॉक होऊ लागले होते. तीच वेळ साधत पाठीवर कमीतकमी गरजांची आणि मनावर कमीतकमी अपेक्षांचे ओझे घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रणाली ऑक्टोबरमध्ये सायकलवर स्वार झाली. स्वत:च्या गावातून (पुनवट) आईवडीलांच्या आशीर्वादाने ती आता लांब पल्ल्याच्या आणि दीर्घ कालावधीच्या प्रवासासाठी उंबरठा ओलांडत होती. आपली तरुण मुलगी एकटीच सायकलीन महाराष्ट्रभर अनोळख्या परिसरात हिंडणार आहे, या कल्पनेने कुठल्याही आईवडीलांच्या काळजात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही. प्रणालीचे आईवडीलही हाडामासाचेच. तरीही त्यांना फारसे कनव्हिन्स करावे लागले नाही. तेवढा विश्वास प्रणालीने त्यांना आपल्या वर्तनातून दिला होता, हीच तिची जमेची बाजू होती.

            ऑक्टोबरमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून सुरू झालेला तिचा हा प्रवास पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांनंतर आता खांदेशापर्यंत झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगावसारख्या अत्यंत दुर्गम भागातही ती जाऊन आली. जागतिक महिला दिनाच्या दोन दिवस आधी ती बारीपाडा येथे श्री. चैत्राम पवार यांच्या कुटुंबात रमली आहे. एक छोटासा आदिवासी पाडादेखील पर्यावरण संवर्धनाचे एक उत्तम प्रतीक होऊ शकते, हेच ती जाणून घेत आहे. योगायोगाने तिथेच तिच्याशी आमची भेट झाली. मी सहकुटुंब तिथे गेल्यावर माझ्या मुलींसोबत तिची चांगलीच गट्टी जमली. दोन दिवस ती आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वाटू लागली होती.

            प्रणालीसोबत दोन दिवस बऱ्याच गप्पा रंगल्या. सर्वसाधारणपणे एखादी तरूण मुलगी असे अफाट धाडस करत असल्यास आपल्या मनात सहज काही प्रश्न घर करतात. प्रणालीसोबतच्या पहिल्या संवादातच आमच्या तोंडून आश्चर्यमिश्रित प्रश्न पटापटा बाहेर पडू लागले... मुळात ही कल्पना सूचली कशी? अनोळख्या रस्त्यांनी हिंडताना आणि अनोळख्या लोकांकडे राहताना भीती वाटत नाही का?

कन्याकुमारीपर्यंत सायकलीने जाण्याचा निर्धार मी पूर्वीच केला होता. आता प्रवासाची दिशा आणि उद्देश बदलून डोक्यात विविध विचार घेऊन मी बाहेर पडले आहे. सुरूवातीला मनात काहीशी धाकधूक होती. ती आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. आतापर्यंत मी सुमारे 5 हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास केला आहे. माझ्यादृष्टीने हा संपूर्ण प्रवास अनोळखीच आहे. त्यात चांगले वाईट अनुभव येत आहेत. वाईट अनुभव अर्थांतच नगण्य आहे. जे वाईट अनुभव आहेत ते माझे आहे. चांगले अनुभव मी शेयर करणार आहे. अडचणींचा पाढा वाचायचा नाही. इतर मुलींना नाउमेद करायचे नाही. बाहेरचा प्रत्येक पुरूष वाईटच असतो, असे नाही; परंतु मी वाचलेले किंवा ऐकल्यानुसार परिचित पुरूषच महिला मुलींचे शोषण करतात. त्यामुळे अनोळखी लोकांची भीती वाटत नाही, प्रणाली आत्मविश्वासाने उत्तर देत होती.

प्रणाली राज्यतील विविध जिल्ह्यांमधील सायकलस्वारांच्या (सायकलिस्ट) संपर्कात आहे. त्याबाबत ती म्हणते, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना सायकलिस्ट लोकांची मदत होते. इतरही लोक भेटतात. त्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे असतात. विविध सामाजिक कार्यकर्ते असतात. अधिकारीही भेटात. या भेटीतून, संवादातून पुढील प्रवास आपोआप सुलभ होतो. काही लोक प्रवासाच्या दृष्टीने सर्वोतोपरी सहकार्यदेखील करतात. कुणाकडून काहीही मागण्याची गरज भासत नाही. मुळातच गरजा कमी असल्याने त्या आपोआप भागतात. कधी धर्मशाळेत राहिले. कधी मंदिरातही थांबले. कधीकधी शासकीय विश्रामगृहांमध्ये न मागता, न सांगता सोयही झाली. माझ्यादृष्टीने हे महत्वाचे नाही. संवादाला माझे प्राधान्य आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाबाबत ती म्हणाली, भविष्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी आतापासूनच कमीतकमी गरजांच्या आधारे जीवन जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. उपभोगवादी जीवनशैलीला फाटा देण्याऱ्या लोकांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पर्यावरणाच्याबाबतीत उल्लेखनीय कामे प्रत्यक्ष बघायला हवीत. मानस जोडता यायला हवीत. ती वाचता यायला हवीत. राज्याचा भूगोल व्यवस्थित अभ्यासता यावा. अनुभवता यावा. यासाठी सायकलीशिवाय दुसरा चांगला प्रवास असू शकत नाही. सायकल हाच एक मुळात पर्यावरण संवर्धनाचा सक्षक्त संदेश आहे.

महिला म्हणून स्वत:ला आधी सक्षम करणे आवश्यक आहे. कॉस्मेटिक सौंदर्य माझ्यादृष्टीने महत्वाचे नाही. आपण आपल्या अंतरमनात डोकावून पाहणे महत्वाचे आहे. अंतरमनाच्या सौंदर्यातून यशाची शिखरे सहज सर करता येऊ शकतील. त्याला कुठलाही साज चढविण्याची आवश्यकता नाही. महिला म्हणून स्वत:ला कुठल्याही मर्यादा घालून घेण्याची आवश्यकता नाही; पण मूल्यांची कास सोडता कामा नये, असे मला वाटेत, अशा विविध विषयांवर ती बिनधास्तपणे व्यक्त होत होती.   

प्रणालीचे धाडस म्हणजे मुलगी पोटी जन्माला येणे पाप समजणाऱ्या विकृतांसाठी चपराक आहे. ती आता धुळे जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. तिथून पालघर आणि कोकणाचा प्रवास करणार आहे. नंतर पश्चिम महाराष्ट्रात भ्रमंती करायची आहे. पावसाळ्याच्या दरम्यान मराठवाडा गाठायचा आहे. पावसळ्यात मराठवाड्यात फिरताना उन्हाचा तडाखा बसणार नाही आणि कोकणासारखा पाऊसही झेलावा लागणार नाही. प्रवासादरम्याने राजकीय क्षेत्रातील लोकांना भेटण्याचे आपण नियोजन केले नसल्याचे प्रणालीने सांगितले; परंतु महाराष्ट्राच्या पर्यावरण खात्याच्या मंत्रिमहोदयांशी संवाद साधायला आवडेल, ही तिची इच्छा आहे.

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

                                                                                                                          -जगदीश मोरे

No comments:

Post a Comment