Thursday, 9 April 2020

करोनाच्या निमित्ताने


...आणि गांधीजींना क्वारंटाईन केले.
चार्वी सध्या ‘The Story of My Experiments with Truth’ वाचते आहे. तिच्यासाठी हे पुस्तक अलीकडेच घेतलं होतं. ते वाचताना ‘Quarantine’ शब्द तिच्या नजरेसमोर आल्याआल्या तिनं मला दोन वाक्य वाचून दाखविली, No passengers are allowed to land at any of the South African ports before being subjected to a medical examination. If the ship has any passenger suffering from a contagious disease she has to undergo period of quarantine.
माझी उत्सुकता वाढली. पटकन माझे सत्याचे प्रयोग शोधून काढलं. बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं होतं ते. चार्वीला प्रकरण क्रमांक विचारला. तिनं, Part III, Chapter 2 The Storm सांगितलं. मी  खंड 3 रा, प्रकरण 2, तुफान उघडलं. नंतर पुन्हा एकदा पुस्तकभर भराभर नजर फिरवली. तुफान या प्रकरणात क्वारंटाईन शब्द प्रथमत: दिसला. नंतर त्याला सर्व ठिकाणी मराठीत विटाळ हा पर्यायी शब्द वापरला आहे. ऑक्सफर्ड लरनर्स डिक्शनरीमध्ये ‘Quarantine’ चा अर्थ ‘A period of time when an animal or a person that has or may have a disease is kept away from others in order to prevent the disease from spreading’ असा दिला आहे. विलगीकरण असा पर्यायी शब्द सध्या मराठीत चांगलाच रुढ झाला आहे. माझे सत्याचे प्रयोग पहिल्यांदा वाचताना क्वारंटाईन शब्द डोक्यात गेलाच नव्हता. नंतर संगणकातील अँटीव्हायरसच्या निमित्तानं ‘Quarantine’ शब्द परिचित झाला होता. आता तो फारच जीवलग झाला आहे; नव्हे जीवघेणा झाला आहे. क्वारंटाईनमधून सुटका होण्यासाठी गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील डरबरन म्हणजे नाताळ बंदरात संघर्ष करावा लागला होता.   
पोरबंदरच्या मेमण पेढीकडून गांधीजींना दक्षिण आफ्रिकेत बोलावणं आलं होतं. मेमण पेढीचा तिथं मोठा व्यापार होता. या पेढीचा तिथल्या न्यायालयात चाळीस हजार पौंडचा दावा चालू होता. त्यासाठी गांधीजींना हे बोलवणं होतं. दादा अबदुल्ला आणि मरहूम शेठ अबदुल करीम झवेरी यांच्या भागीदारीतली ही पेढी होती. एप्रिल 1893 मध्ये गांधीजी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्याच वेळी डरबन ते प्रिटोरियादरम्यानच्या प्रवासात गांधीजींना रेल्वेतून ढकलून देण्यात आलं होतं. त्यानंतर गांधीजींनी तिथं मोठं काम उभारलं होतं. तीन वर्षांनी गांधीजी भारतात परतले ते पुन्हा सहकुटुंब दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी.
दादा अबदुल्ला यांनी कूरलंड नावाची आगबोट विकत घेतली होती. तिच्यानं कस्तुरबा गांधी, दोन मुलगे आणि मेहुण्याच्या मुलासह गांधीजी डरबनकडे मार्गस्त झाले. सोबत आणखी एक दुसरी नादेरी आगबोटसुद्धा डरबनला जाण्यासाठी सुटली होती. या बोटीचे एजंटही दादा अबदुल्लाच होते. हा प्रवास अठरा दिवसांचा होता. पोचायला तीन- चार दिवस शिल्लक होते. त्याच वेळी समुद्रात जोरदार तुफान आलं. उतारुंची पाचावर धारण बसली. दृष्य गंभीर होतं. संकटापुढे सर्वजण एक झाले. भेद विसरून गेले. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सर्वजण देवाचा धावा करू लागले. बोटीचा कप्तान सांगत होता, संकट गंभीर आहे; पण बोट मजबूत आहे. बुडणार नाही.
उतारूंचं चित्त मात्र थाऱ्यावर येईना. चोवीस तास लोटले. वादळ शमलं. सूर्यदर्शन झालं. कप्तान म्हणाला, तुफान आटोपलं. लोकांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली. मृत्यूचं भय गेलं. खाणंपिणं, गाणीबिणी सुरू झाली. नमाज, भजनं वगैरे बंद नाही पडली; पण त्यात गांभीर्य राहिलं नाही. अखेर 19 डिसेंबर 1896 रोजी कूरलंडनं डरबन म्हणजे नाताळ बंदरात नांगर टाकला. नादेरीही त्याच दिवशी पोचली.
दक्षिण आफ्रिकेच्या बंदरांमध्ये उतारुंची कसून तपासणी सुरू होती. प्रवासात कुणाला सांसर्गिक रोग झाला असल्यास त्याला विटाळात (क्वारंटाईन) बसवित असतं. गांधीजी डरबनच्या प्रवासाला निघाले तेव्हा मुंबईत प्लेगची साथ सूरू होती. त्यामुळे आपल्याला विटाळात टाकलं जाईल, याची त्यांना काहीशी भीती होतीच. बंदरात नांगर टाकल्यावर आगबोटीवर पिवळा बावटा उभारावा लागायचा. तपासणी आटोपल्यावर डॉक्टरांकडून मोकळीक मिळाल्यानंतर पिवळा बावटा उतरविला जात असे. त्यानंतर उतारुंना बोटीतून बाहेर पडता येत असे. शिरस्त्याप्रमाणे कुरलंडवरही पिवळा बावटा फडकविण्यात आला. तपासणीनंतर पाच दिवसांचा विटाळ सांगण्यात आला. म्हणजे गांधीजींसह सर्व जणांना क्वारंटाईन केलं गेलं. प्लेगचे जंतू तेवीस दिवसांपर्यंत परिणाम करू शकतात, असं समजलं जात असे. म्हणून मुंबई सोडल्यापासून दोन्ही आगबोटींना तेवीस दिवसांपर्यंत विटाळात ठेवण्याचं फर्मान निघालं. 
गांधीजी किंवा इतर प्रवाशांना केवळ आरोग्याच्या कारणास्तव विटाळात ठेवण्याचा हुकूम नव्हता. सगळ्यांना भारतात माघारी घालविण्याची चळवळ डरबनमधील गोऱ्या लोकांनी सुरू केली होती. दादा अबदुल्ला यांच्याकडून गांधीजींना त्याबाबत माहिती मिळत असे. गोरे लोक ठिकठिकाणी त्याबाबत जंगी सभा घेत. दादा अबदुल्ला यांना धमक्या देत असत. दोन्ही आगबोटी परत पाठविल्यास दादा अबदुल्ला यांना नुकसान भरपाई देण्याची तयारीही गोऱ्या लोकांनी दाखविली होती. शिवाय त्यांना विविध आमीषंही दाखवत. दादा अबदुल्ला यांनी धमक्यांना भीक घातली नाही. ते आमीषांनाही बळी पडले नाहीत. पेढीवर अबदुल करीम हाजी आदम हेदेखील असत. त्यांनी वाटेल ती किंमत मोजून उतारुंना उतरून घेण्याची प्रतिज्ञा केली होती.
संघर्ष मोठा होता. एका बाजूला मुठभर गरीब हिंदी लोक होते. विरोधात द्रव्यबळ, बाहुबळ, विद्याबळ, संख्याबळ असं सगळं बळ एकवटलं होतं. एजंट आणि उतारुंना धाकदपटशाईनं माघारी पाठविण्याचे प्रयत्न सुरूच होते. आता थेट उतारुंनाही धमक्या येऊ लागल्या होत्या- तुम्ही माघारी गेल्यास परतीचं भाडं मिळण्याची शक्यता आहे. न गेल्यास तुम्हाला दर्यात बुडवलं जाईल. या धमक्यांनी उतारू घाबरले होते. गांधीजी त्यांना धीर देत होते. नादेरी आगबोटीवरच्या उतारुंनाही निरोप पाठवून त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. उतारुंसाठी आगबोटीवर करमणुकीचे कार्यक्रम सुरू केले होते. गांधीजीदेखील थट्टामस्करीतही सहभागी व्हायचे; पण त्यांचं मन डरबनमध्ये चालू असलेल्या लढ्यात गुंतलं होतं गोऱ्यांचा मुख्य रोख गांधीजींवर होता. हिंदुस्थानात नाताळ प्रांतातील गोऱ्या लोकांची निंदा नालस्ती केली; तसंच नाताळ प्रांत हिंदी लोकांनी भरून टाकण्याचा इरादा आहे. तिथं वसविण्यासाठी कूरलंड आणि नादरी आगबोटीतून हिंदी लोकांना भरून आणले, असा गांधीजींवर आरोप होता.
आपल्यामुळे दादा अबदुल्ला यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. उतारुंचे जीव धोक्यात आहेत, याची गांधीजींना खंत वाटत असे. तथापि, गांधीजींनी दोन्ही आगबोटीतील कुणालाही नाताळात येण्यासाठी गळ घातलेली नव्हती. कूरलंडवरील दोन- तीन नातलगांशिवाय गांधीजी दोन्ही आगबोटीतील शेकडो उतारुंपैकी कुणालाही ओळखत नव्हते. त्यांनी कुणाची निंदानालस्तही केलेली नव्हती.
गोऱ्यांचं वर्तन माणूसकीला धरून नव्हतं. त्यांच्या संस्कृतीबद्दल गांधीजींना किळस वाटू लागली होती. आगबोटीचा कप्तान आणि उतारुंची गांधीजींनी छोटेखानी सभा घेतली. त्यात त्यांनी पाश्चात्य संस्कृतीचा हिंसक म्हणून; तर पूर्वेकडील संस्कृतीचा अहिंसक म्हणून उल्लेख केला. भाषणानंतर कप्तानाने गांधीजींना प्रश्न विचारला, गोरे लोक तुम्हाला धमकी देत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी खरंच दुखापत केल्यास तुमच्या अहिंसेच्या सिद्धांताची तुम्ही कशी काय अंमलबजावणी कराल?
मला उमेद आहे की, त्यांना क्षमा करण्याची बुद्धी ईश्वर मला देईल. आजही माझा त्यांच्यावर रोष नाही. त्यांच्या अज्ञानाबद्दल, त्यांच्या संकुचित दृष्टीबद्दल मला खेद वाटतो. ते जे म्हणत आहेत व करीत आहेत ते रास्त आहे असे त्यांना खरोखरीच वाटत आहे, अशी माझी समजूत आहे. अर्थात मला रोष वाटण्याचे कारणच नाही, गांधीजींनी उत्तर दिलं.
संघर्षात एकामागून एक दिवस लांबत होता. विटाळ संपण्याची चिन्हं दिसत नव्हती. त्याबाबत गांधीजी संबंधित खात्याच्या अंमलदाराला विचाराचे. तो म्हणायचा, ही गोष्ट माझ्या अधिकाराबाहेरची आहे. सरकार मला हुकूम करेल तेव्हा मी तुम्हाला उतरू देणार.
शेवटी गांधीजी आणि इतर उतारूंना निर्वाणीची धमकी देण्यात आली; परंतु सर्वांनी डरबन बंदरात उतरण्याच्या स्वतःच्या हक्काला चिकटून राहण्याचा निर्धार केला होता. खूप मोठ्या द्वंद्वानंतर 13 जानेवारी 1897 रोजी आगबोटीला मोकळीक मिळाली. उतारूंना उतरू देण्याचा हुकूम आला आणि विटाळ संपला. गांधीजी क्वारंटाईनमधून बाहेर आले.
-जगदीश मोरे

3 comments:

  1. छान माहिती.. उजाळा मिळाला. पुन्हा वाचावेसे वाटायला लागले आहे हे पुस्तक. धन्यवाद.. मित्रा..

    ReplyDelete
  2. छान लिहीलंत . संदर्भ चांगला शोधलात

    ReplyDelete