मित्रहो,
सातारा येथे `जिल्हा माहिती अधिकारी` म्हणून रुजू होऊन मला आता दीड-दोन महिने झाले
आहेत. मधल्या काळात ब्लॉग आणि फेसबूकवर कुठलीही पोस्ट टाकली नाही. सातारा
जिल्ह्यात पोस्टिंग झाल्याने पुन्हा एक चांगली संधी मिळाली आहे. ब्लॉग अपडेटची
सुरवातही एका प्रसन्न प्रसंगावरील लिखाणापासून करीत आहे. 25 नोव्हेंबर रोजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण
यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन दर्शन घेतले
होते. त्यावर मी लिहिलेला वृतांत `लोकराज्य`च्या डिसेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध
झाला आहे. तो आपल्यासाठी ब्लॉगवर टाकत आहे…
संथ वाहणारी
कृष्णामाई आणि महाराष्ट्राचं भाग्य घडविणाऱ्या कोयनेच्या संगमावर सकाळपासूनच मान्यवरांची
रीघ लागली होती. पुरोगामी महाराष्ट्राची पायभरणी करणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाणांच्या
समाधिस्थळी प्रत्येक जण आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण करताना नतमस्तक होत
होता. पुण्यतिथिनिमित्त चव्हाण साहेबांचं स्मरण सरु होतं. इथली विस्तीर्ण हिरवळ, झाडाझुडपांची पानं-फुलं साहेबांच्या
हिमालयाएवढ्या कर्तृत्वाची साक्ष देत होती. कृष्णा- कोयनेच्या संगमावर सकाळच्या कोवळ्या
उन्हांनी गर्दी केली होती. ऊन आणि नितळ पाण्याच्या मिश्रणाच्या रुपेरी- सोनेरी रंगानं
प्रीतिसंगमचा परिसर न्हाऊन निघाला होता. भजनांच्या मधूर स्वरांनी वातावरण प्रसन्न झालं
होतं. कीर्तीवंत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधिस्थळाच्या दर्शनाच्या ओढीनं महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पावलं प्रीतिसंगमाच्या दिशेनं वळली होती.
श्री.
फडणवीस यांचं विमान कराडात उतरलं आणि ते थेट प्रीतिसंगमावर पोहोचले. श्री. फडणवीस समाधिस्थळी
नतमस्तक झाले अन् वैभवशाली भूतकाळाची आणि उमद्या वर्तमानाची प्रीत जुळली; हीच प्रीत महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची
आणि यशाची प्रेरणा ठरावी, अशी सहज सुंदर, नैसर्गिक भावना तिथं उपस्थित प्रत्येकांच्या मनात तरळून गेली. समाधीस्थळावरची
फुलांची रांगोळी चव्हाण साहेबांच्या मोहक आणि प्रसन्न व्यक्तिमहत्वाचं जणू प्रतीकच
होती. श्री. फडणवीस आणि सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केलेलं पुष्पचक्र
म्हणजे राज्याच्या विकासाची चाकं आणखी गतिमान करण्याचा संकल्प होता.
''महाराष्ट्राच्या निर्मितीत आणि जडणघडणीत स्वर्गीय चव्हाण साहेबांचा सिंहाचा
वाटा आहे. राजकीय व्यवस्थेत कसं काम करावं आणि राज्याचं प्रशासन कसं चालवावं,
हे त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानं आपला महाराष्ट्र
आपल्याला पुढ न्यायचा आहे'', अशा उत्स्फूर्त शब्दांत श्री. फडणवीस
यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकीय आणि पक्षीय भेदापलीकडच्या महाराष्ट्राचं
हे दर्शन होतं.
स्व. चव्हाण
साहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा कराड कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या आवाराच्या दिशेनं निघाला. वाटेत ठिकठिकाणी होणारं स्व. चव्हाण साहेबांचे
स्मरण आणि श्री. फडणवीस यांचं स्वागत अत्यंत प्रेरणादायी होतं. बाजार समितीच्या आवारातील
'स्व. यशवंतराव चव्हाण
कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शना'चं
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि ऐतिहासिक, सामाजिक,
राजकीय अन् कृषी संस्कृतीच्या वारशाचं एक वर्तूळ पूर्ण झालं. व्यासपीठावरील
महात्मा जोतिबा फुले, स्व. यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक
यांच्या तसबिरी महाराष्ट्राचा देदीप्यमान वारसा
सांगत होत्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यासपीठावरच्या उपस्थितीनं
आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र आले. कार्यक्रमस्थळी
सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी,
विविध मान्यवर आणि शेतकऱ्यांची मांदियाळी जमली होती. बळीराजाला पाठबळ
देण्यासाठी सुरु झालेला हा जागर होता. तिथलं आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि प्रयोगशील
शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्याच्या कृषी विकासाची साक्ष देत होत्या.
शेतकऱ्यांना
नवनवीन तंत्रज्ञान, कीटकनाशकं आणि बी-बियाणं योग्य दरात उपलब्ध करुन देण्याचं; तसचं सिंचन वाढीचं आपल्यासमोर मोठं आव्हान असल्याचं नमूद करत माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी साखळी सिमेंट बंधाऱ्यांचा कार्यक्रम अधिक जोमानं पुढं नेण्याची
आवश्यकता असल्याचं सांगितलं.
स्व. चव्हाण
साहेबांनी शेतकऱ्यांना ताठ मानेनं उभं केल्याचं सांगून श्री. पाटील यांनी इतिहास जागा
केला. इतिहासाचं स्मरण करून पुन्हा एकदा शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी शेतीमालाला पुरेसा
भाव, शेतमालावर प्रक्रिया
आणि त्यासाठीचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची शासनाची भूमिका राहील, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी
असलेल्या या उपक्रमात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि चिंतांबाबत ऊहापोह केल्याशिवाय श्री.
फडणवीस यांचं प्रभावी आणि ओघवतं भाषण पूर्ण होणं शक्यच नव्हतं. शेतीसमोर विविध आव्हानं
असली तरी सर्वांत मोठं आव्हान वातावरण बदलाचं आहे. भविष्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा
अवलंब करुन आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागेल. त्यासाठी सरकार पूर्ण ताकदीनिशी
आपल्या पाठीशी उभं राहील, असा शेतकऱ्यांना विश्वास देताना राज्यभरात मंडलस्तरावर 2 हजार 65 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची
घोषणाही श्री.फडणवीस यांनी केली.
राज्यात सुमारे 19 हजार गावांमध्ये
दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त गावांच्या पंचनाम्यात केंद्र
सरकारने सूट दिल्यामुळे शेतकऱ्यांना केंद्राकडून लवकरात लवकर मदत मिळणं शक्य होणार
आहे. त्याचबरोबर स्थायी आदेशानुसारदेखील मदतीचं वाटप सुरु करीत असल्याची घोषणा करुन
श्री. फडणवीस यांनी शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देण्याचं काम यावेळी केलं.
No comments:
Post a Comment