Sunday 13 October 2013

चैत्रपालवी

   दै. ‘सकाळ’ने 2002-03 मध्ये राज्यातील पाच प्रयोगशील व्यक्तींची निवड केली होती. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात त्यांचा गौरव झाला. तिथं त्यांचं पाच दिवस सादरीकरणही होतं. बारीपाड्याचे(जि.धुळे) श्री. चैत्राम पवार त्यातील एक! दै. ‘सकाळ’चा जिल्हा प्रतिनिधी म्हणून मीही पुण्याला त्यांच्या सोबत होता. अलीकडेच पुन्हा एकदा त्यांच्याविषयी एका दिवाळी अंकाच्या निमित्ताने लिहिण्याचा योग आला…  
सुमारे हजारभर लोकसंख्या असलेलं आणि साधारणत: शंभर कुटुंबांचं शंभर टक्के आदिवासी गाव; नव्हे लहानसा पाडाच तो. साक्रीपासून 50 ते 55 किलोमीटरवर अतिशय दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यांतली ही वस्ती. दुचाकी वाहनांनाही तिथवर जाणं खडतर… पाड्यावर बस तर सोडाच; पण लहान वाहनही जात नव्हतं. गावात पूर्वी शिक्षणाचा गंधही नव्हता. शासनही गावापर्यंत पोहचलं नव्हतं… गावासाठी रस्ता नव्हता. अलीकडंच तो झाला.
धुळे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस या पाड्याच्या परिसरातच होतो; तरीही मार्च उजाडला की पाणीटंचाई पाचवीला पूजलेलीच. जमीन चांगली; पण उत्पन्न नाही. मोठमोठे डोंगर; पण वनराई नाही. शिक्षणाची आस; पण सोय नाही. कष्टाची धमक; पण उत्पन्न नाही. जिद्द आहे; पण मार्गदर्शन नाही. अन् पैशाचं पाठबळ तर नाहीच नाही… असा हा पाडा, त्याचं नाव बारीपाडा!
बारीपाडा महसुली गावही नाही. मांजरी या महसुली गावात त्याचा समावेश आहे. या पाड्याचा कायापालट केला आहे तो श्री. चैत्राम पवार यांनी. अतिशय नि:स्वार्थी, निर्मळ असं हे व्यक्तिमत्त्व. पाड्यातल्या आदिवासी बांधवांच्या चैतन्याचा झरा म्हणजे चैत्राम. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. या उमद्या झऱ्यातील कल्पकता पाझरायला सुरवात झाली ती विद्यार्थी दशेपासूनच. त्यांच्या कल्पक प्रवाहातून बारीपाड्यातील शेती बहरली. लाकडाच्या चिपाडासारखे झालेले आदिवासी शेतकरी पुन्हा उभे राहू लागले. चारसूत्री भात पद्धतीचा अवलंब झाला. ‘बासमती’ आणि ‘इंद्रायणी’सारख्या दर्जेदार जातीचा भात पिकू लागला आहे. शेतकऱ्यांत भात उत्पादनाची स्पर्धा लागली. एका शेतकऱ्यानं एका गुंठ्यात ‘जया’ जातीच्या भाताचं 98 किलो उत्पादन घेतलं. बिगर आदिवासी भागासाठी यात नवल नसेल; पण आदिवासींसाठी ते अप्रूप होतं. म्हणून तर राहुरी कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी बारीपाड्यात येऊन भात उत्पादकांचा सत्कार केला.
भातातल्या यशानंतर आणखी कुठलं पीक घेता येईल? या विचारातून बटाटा, टोमॅटो, सोयाबीन, कांदा, लसूण यासारख्या पिकांकडंही इथला शेतकरी वळला. जे पीक घ्यायचं त्यातील तज्ज्ञाला गावात बोलवावं आणि शेतकरी मेळावा घ्यावा, हे चैत्राम यांनी ठरवलं. कृतीतही आणलं. शेतकऱ्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळूं लागलं. पारंपरिक ऊस पिकाच्या पद्धतीतही बदल झाला. पाटा पद्धत आली. उसाचं उत्पादन वाढलं. नवनवीन प्रयोगांमुळे गहू, हरभऱ्याचंही उत्पादन वाढलं.
पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन सुरू झालं. आदिवासी बांधवांना चार पैसे अधिकचे मिळू लागले. बारीपाड्यापासून लगतच्या 11 गावांनी प्रेरणा घेतली. तिथंही मधुमक्षिका पालन सुरू झालं. 700 लीटरवर मधाचे उत्पादन आलं. ते दीडशे रुपये प्रतिकिलोनं विकलं. हा पाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळा बनला.
पुण्याच्या नवजीवन फाउंडेशनच्या मदतीमुळं चैत्राम आणि बारीपाडावासियांचा उत्साह आणखी दुणावला. चैत्राम यांचं कौतूक होऊ लागलं; पण चैत्राम एवढ्यावर थांबणारे नव्हते. जंगलाचंही त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन केलं. बोडक्या झालेल्या डोंगरानं पुन्हा हिरव्यागार शाल पांघरली. जंगलाच्या वर्धन आणि संवर्धनासाठी गावकऱ्यांनी स्वत:वर आचारसंहिता लादली. लाकूड तोडणाऱ्याला शिक्षा होऊ लागली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी झाली. त्यामुळेच आज पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात जंगलं उभं राहिलं आहे. त्यात 300 प्रकारच्या वनस्पती आहेत. जळणासाठी गावकऱ्यांना वर्षातून विशिष्ट दिवसांत सुकलेली लाकडं गोळा करण्याची परवानगी मिळते. घरातल्या चुलीचा प्रश्न सुटतो. महूच्या फुलांचा लिलाव होतो. गावकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी एक साधन मिळालं. जंगलात पशू-पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. अंगणी मोर नाचू लागले.
शेतीत प्रगती सुरू असताना स्वयंरोजगाराचेही धडे गिरवण्यास सुरुवात केली. भाषणातले धडे कृतीत आणले. पाड्यात गुळाचं गुऱ्हाळ घरघरू लागलं. 20-25 जणांच्या हातांना काम मिळालं. ओढ्या-नाल्यात, तलावांत माशांचं बी टाकलं. मासेमारीसाठी आदिवासी सरसावले. घरोघरी कुक्कुटपालनाच्या व्यवसायानं जोर धरला. आदिवासी बांधवांनी विशेषत: भगिनींनी बचत गट उभा केला. एकमेकांच्या अडीअडचणीसाठी हा गट बँकेसारखा कामी येऊ लागला.
राज्य शासनानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची घोषणा केली. पाड्यातील लोकांना चैत्रामनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. पाडा पुढं आला. झोपडी वजा घराघरांत आदिवासींनी स्वच्छता गृहं बांधली. गावानं सामाजिक क्रांतीच्या दिशेनंही पावलं टाकली. सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन होऊ लागलं. गरिबांचेही विवाह थाटात, पण अत्याल्प खर्चात पार पडू लागले.
पाड्यातील लोकांना चैत्राम यांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. आपलीच चूक मुलांना भोवते, याची जाणीव आदिवासी बांधवांना झाली. मुला शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड होऊ लागला. तोच नियम अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांनाही लागू झाला. हायस्कूलसाठी मुलं-मुली आश्रमशाळेत जाऊ लागली. गावांतला बदल अबालवृद्धांनाही जाणवू लागला. लोक सुखावू लागले.
दिवाळीच्या सुट्टीसाठी आश्रमशाळांतून गावी परतलेल्या विद्यार्थ्यांची गावालगतच्या जंगलात सहल काढण्याची कल्पना चैत्राम यांना सूचली. दिवाळीची सुट्टी आणि सहल हे दरवर्षाचं समीकरण झालं. ही सहल मात्र थोडी वेगळीच… सहलीला जाताना प्रत्येकानं सोबतीला थोडा तांदूळ आणि एक रुपया घ्यायचा. जमलेल्या पैशांतून तेल-मीठ आणायचं. त्याची जंगलातच खिचडी करायची. ती शिजेपर्यंत प्रत्येकानं आपल्या वयाला आणि हातांना पेलवेल एवढ्या दगड उचलत लहान-लहान ओढ्यांवर छोटे-छोटे बांध घालायचे. दिवाळीच्या सुट्टीतल्या या नित्य उपक्रमामुळे आज असे अनेक बांध बारीपाड्याच्या जंगलात दिसतात. कुठलाही खर्च नाही आणि शासनाकडंही त्यासाठी आर्जव नाही. जल, वन आणि मातीचं संरक्षण, संवर्धन झालं.
 पूर्वी मांजरी गावाकडून पाणी घेणारा बारीपाडा आज मांजरीसह अन्य दोन-चार गावांनाही पाणी पाजतोय. उन्हाळ्यातही गावातील विहिरींवर ऊस, कांदा, बटाटा आदी नगदी पिकं घेतली जातात. तीही अतिशय आधुनिक पद्धतीनं. डोंगर आणि जंगलाच्या कुशीत वसलेल्या या पाड्याचं रुपडचं चैत्राम पवारांनी पालटून टाकलंय. निसर्गही आता पाड्यावर खूश आहे. खान्देशामध्ये चैत्र-वैशाखात उन्हानं जीवाची काहीली होते. बारीपाड्याच्या परिसरातील उन्हाळा मात्र सुसह्य असतो.
चैत्राम यांनी बारीपाड्यातील आदिवासी महिलांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं आहे. परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. या रानभाज्यांची अनोखी स्पर्धाही दरवर्षी बारीपाड्यात घेतली जाते. आदिवासी महिला जंगलातून रानभाज्या गोळा करून आणतात. त्यावर आधारित विविध प्रकारच्या पाककृती केल्या जातात. परीक्षक पाककलांचं परीक्षण करतात. विजेत्यांना बक्षिसंही दिली जातात. आता तर विविध ठिकाणाहूनही लोक या रानभाज्यांच्या पाककलांचा आस्वाद घेण्यासाठी येऊ लागले आहेत. इथल्या आदिवासी महिलांना या रानभाज्या औषधी गुणांसह माहीत आहेत, हे विशेष!
चैत्राम आणि पाडावासियांच्या जिद्दीची आता शासनानंही दखल घेतली आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बारीपाड्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. कृषी विभागाच्या मदतीनं अनेक शेततळी साकारली आहेत. इथल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाची आणि बांधवाची विकासाला साथ देणारी सकारात्मक मानसिकता घडवण्यात चैत्राम यांना यश आलं आहे. या यशाचं कौतूक मात्र फार उशिरानं झालं.
मुळात चैत्राम अबोल आहेत. अगदी साध्या आणि सरळ स्वभावाचा हा माणूस. भाषण करणं, चराचरा बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. आधीच दुर्गम भागातला पाडा. त्यात चैत्राम यांचा प्रचारकी थाट नाही. म्हणूनच कदाचित काल-परवापर्यंत विविध गुणवंत आणि यशवंतांवर निघणाऱ्या वृत्तपत्रांच्या, नियतकालिकांच्या विशेषांकात किंवा पुस्तकांत चैत्राम आणि बारीपाड्याला स्थान मिळत नव्हतं. बाराही महिने बारीपाड्यात चैत्रातल्या उन्हासारखी रखरख असायची. चैत्राम यांच्या कल्पकतेतून आणि गावकऱ्यांच्या सहकाऱ्यातून बारीपाडा आता मात्र चैत्रपालवीच्या छायेत आला आहे. ही चैत्रपालवी आता अनेकांना साद घालू लागली आहे. ‘व्हीआयपी’ लोकांच्या बारीपाड्यातील येरझाऱ्या वाढल्या आहेत. पाड्याला प्रसिद्धी मिळू लागली आहे.
चैत्राम पवार आणि बारीपाड्यातील या क्रांतीची दखल सातासमुद्रापारही घेतली गेली. इटलीच्या `इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट`नं (इफाड) चैत्राम यांचं कौतूक केलं. या संस्थानं चैत्राम यांना बँकॉकमध्ये निमंत्रित करून त्यांचा शेती क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव केला. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ देऊन चैत्रामचा सन्मान केला. कॅनडातून एक व्यक्ती त्यांच्यावर व पाड्यावर पी.एच.डी. करण्यासाठी आली. तो पाहुणा तब्बल 48 दिवस चैत्रामच्याच कुटुंबात रमला. अवघ्या गावाच्या बदल्या मानसिकतेचा आणि विकासाचा अभ्यास त्या पाहुण्यानं केला.
चैत्राम म्हणजे निखळ नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व. म्हणूनच तर शेतीनिष्ठ पुरस्काराचे दहा हजार रुपयेही त्यांनी बारीपाड्यात घरोघरी स्वच्छतागृहाची योजना राबविण्यासाठी खर्ची केले. हगणदारीमुक्त गावाचा बारीपाड्याला बहुमान मिळवून दिला. चैत्राम यांचं काम मोठं असलं तरी ते अजून संपलेलं नाही. अजून खूप काही करायचे आहे आणि जे काही केले आहे ते टिकवायचे आहे, त्यांचा ध्यास आहे! (पत्ता: श्री. चैत्राम पवार, मु. बारीपाडा, पो. शेंदवड, ता. साक्री, जि. धुळे. मो. 9823642713)

4 comments:

  1. जगदीश , तळात काम करणारे चैत्राम सारखे आदर्श पुढे न्यायला हवेत. चैत्राम सोबत काम करणे खूपच आशादायी आहे.

    ReplyDelete
  2. चैत्रामांच्या उत्तम कामामुळं बारीपाडा फुलला आणि त्यांच्या या कामाचं शैलीदार लेखणीतून उतरलेलं वर्णन वाचून खूपच 'भारी' वाटलं. त्यांच्या कामाला सलाम!!!

    ReplyDelete