Friday, 28 February 2020

शीमा

पोरगी पवित्र आहे का?
हिंगणघाटच्या निर्भयाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नि:शब्द वेदनांचा श्वास थबकला आणि कोडग्या समाजाच्या थडग्यावर आणखी एक निंदनीय नोंद झाली. सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्टींचा ऊत आला. पुन्हा अशा पोस्टींचा पूर येणार नाही, याची शाश्वती नाही. प्रेम आणि वासनेत होणारी गल्लत वासनांधतेकडे जाते आणि आपल्या आजूबाजुला नराधम निपजू लागतात, हे कळतही नाही. नाही तरी आपण केवळ संवेदनशीलतेची झूल पांगरलेली असते. वास्तवापासून कोसोमैल दूर असतो. लग्नाच्या आणि संसाराच्या बाजारात नात्यांच्या गुंत्यात खुळचट कल्पनांमुळे चार भिंतीआडचे अत्याचार कुणाला दिसत नाहीत. म्हणूनच असंख्य माताभगिनी आपल्या आत्मसन्मानांवर होणारे बलात्कार निमूटपणे सहन करीत राहतात. त्यांच्या वेदनांना ‘शीमा’च उरत नाही.
हो! ‘शीमा’च! ते नाटकाच नाव आहे; पण ‘शीमा’ हे नाटक नाही. ते वास्तव आहे. पुरूषी रानटी अपेक्षांच्या खपल्या काढणारी ती कलाकृती आहे. ती अनुभवताना माणसांत वसलेल्या हैवानाची जाणीव दृष्यागणिक होत राहते. त्यामुळे ‘शीमा’ हे नाटक राहत नाही. आपले उघडे डोळे न टिपू न शकणारे प्रसंग किंवा माझा काय संबंध म्हणत दुर्लक्षित होणारी घटना हुभेहूब आपल्यासमोर रंगमंचीय अविष्कारातून सादर होते. त्यावेळी मात्र निब्बर डोळ्यांनाही पाझर फुटतो. असे एक संवेदनशील नाटक दिग्दर्शक वैभव सातपुते यांनी पारमिता फाऊंडेशनच्या माध्यमातून रंगमंचावर आणले आहे. ते स्वत: श्री. सातपुते आणि श्री. राहुल साळवे यांनी लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतील ठाणे केंद्रावरील हे विजेते नाटक आहे.
शालेय वयातली मुलेमुली बिनधास्त हिंदडत असतात. खेळत असतात. त्यांच्यातली निरागसता मोहक आणि लाडीक असते; पण मुलगी मोठी होऊ लागली की, आई- वडिलांना काळजी वाटू लागते. मुलीची बाई होऊ लागली की, त्यांची काळजी वेगळ्याच वळणावर येऊन ठेपते. नंतरचा मार्ग सरळ असला तर ठिक; अन्यथा प्रत्येक वळणावर आई- वडिलांना विशेषत: मुलीला क्षणोक्षणी अग्निदिव्याला सामोरे जावे लागते. त्यातही खुळचट कल्पनांमध्ये गुरफटलेल्या समूहांतील मुलींचे जगणे आणखीच वेदनादायी होते. ‘शीमा’च्या माध्यमातून मांडलेल्या या वेदनांचा जागर काळीज चिरतो.
शाळा सुटल्यानंतर नियमितपणे जवळच्या डोहाजवळ खेळणाऱ्या नाम्या (मयूर साळवी) आणि शीमाच्या (रंजना म्हाब्दी) निरागस मैत्रीत वाढते वय आड येते. दारुतच स्नान करणाऱ्या शीमाच्या बाप- पांडबाला (सुशिल शिर्के) त्या दोघांविषयी कुणी तरी काही तरी सांगितलेले असते. शीमा घरी आल्यावर मुलगीही आईच्याच वळणावर गेल्याचे म्हणत पांडबा शीमा आणि तिची आई- सुमनला (शीतल जाधव) मारझोड करतो. कोणी तरी त्याचे कान भरलेले असतात. एका व्यक्तिबाबत सुमनवर संशय घेतो. उलट पांडबातच आता मर्दानगी राहिली नसल्याचे सांगत ती व्यक्ती सुमनला लुगडं फेडायला सांगते. हे ऐकल्यावर आपल्या मर्दानगीला कुणी तरी आव्हान देत असल्याच्या त्राग्यातून त्याचा पुरुषी अंहकार जागा होतो आणि तो मर्दानगी सिद्ध करण्यासाठी सज्ज होतो.
शीमालाही हे सगळे असह्य होते. ती नाम्याजवळ व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. आई काळजीपोटी तिला समजवत असते. “मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं. पुरुषाच्या जातीवर जास्त विश्वास ठेवायचा नसतो. बाईच्या जन्माला जगण्याची रीतभात असते पोरी.’’ आईचे हे शब्द तिला अस्वस्थ करतात. “मलपला आजा तुपला बाप. तुमला नवरा मपला बाप. त्यांच्यावरही विश्वास ठेवायचा नसतो का?” असा प्रश्न शीमा करते. “मनुष्य घाणेरडा प्राणी आहे. मोठी झाली की कळंल तुला आपोआप. पोरीच्या जातीनं सवाल करायचे नसतात. पोरगी कळती झाली की दुसऱ्याची बाई, बाईची आई आणि आईची आजी कधी होते ते तिलाही कळत नाही.” या शब्दांत सुमन समजविण्याचा प्रयत्न करते. हे प्रारंभीचे संवाद प्रेक्षकांचा अंतर्मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करतात.
शीमाच्या परकरला रक्ताचा डाग लागतो. तिच्या लग्नाची घाई सुरू होते. “रक्ताचा डाग लागत नाही, तोवर तुझं आयुष्य तुझं. तू आता स्वताची नाही राहिली पोरी.” हे आईचे बोल शीमाला अस्वस्थ करू लागतात. तिचे लग्न ठरते. आपल्या जन्मसिद्ध हक्काच्या आवेशात मुलाकडची मंडळी “पोरगी पवित्र आहे का?” असा प्रश्न विचारते. त्याचे उत्तर अमानवीय कौमार्य चाचणीतून द्यायचे असते. त्यानंतर तिच्या आयुष्यात रावसाहेब (नितीन जाधव) येतो. पहिल्याच रात्री खोटा माल सांगत सहा-सात बायकांना टाकून देणारा पंच- नाना (प्रमोद पगारे) वेगवेगळे डाव मांडत राहतो. नाटकाचे कथासूत्र पुढे जात असते. प्रेक्षक म्हणून आपल्या अस्वस्थतेचाही कडेलोट होऊ पाहतो. कोणाचे डोळे पाणावतात. कोणाच्या डोळ्यांना धारा लागतात. आपण स्वत:मध्ये डोकावू लागतो. बुरसटलेल्या विचारांच्या खपल्या उसवण्याची संधी मिळते. या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष नाटकच बघणे आवश्यक आहे. इथेच संपूर्ण कथानक जाणून घेतल्यास ही अनुभूती खोलवर रुजू शकणार नाही. ती नाटकाच्या भाष्यातच घ्यायला हवी.
समाजाच्या रीतीभातांचे ओझे किती पेलावे? बाप-लेकीची ताटातूट करणारा समाज आपला असतो का? बाईचं माणुसपण नाकारणाऱ्या समाजाला आपला म्हणावे का? पदराआड चेहरा लपवत दुधाचा ग्लास घेऊन येणारी बायको आणि मग अंधार! सिनेमात दाखविल्या जाणाऱ्या या दृष्यांची संगती जुळवत तयार होणारी संकल्पना म्हणजे लग्न का? असे अनेक प्रश्न नाटक पाहताना आपल्यालाही सतावू लागतात.
‘शीमा’तल्या संवादांना अलंकारीक भाषेने सजविलेले नाही. साध्या, सरळ, सोप्या शब्दांतले संवाद अत्यंत भेदक आहेत. “चादर लाल झाली असती तर सोन्यानाण्यानं मडवली असती. पोरगी उष्टी निघाली. दोन्ही रांडा शील फुटलेल्या. आमच्या नशिबात उद्‌घाटनाचं सुख नाही.” आणि “बाई मन लावायची गोष्ट आहे वय. माल खोटा काढावा लागतो.” हे पुरुषी मानसिकतेचे संवाद कौर्याचे टोक गाठतात.
सगळ्या कलावतांनी जबरदस्त मेहनत घेतली आहे. शीमा आणि नाम्याच्या भूमिकेतले रंजना म्हाब्दी आणि मयुर साळवी प्रेक्षकाच्या मनावर राज्य करतात. शीमाबद्दल तर काय बोलावं, काय लिहावं! इतकी भन्नाट शीमा रंजनाने साकारली आहे. शालेय विद्यार्थिनी रंगविताना रंजनाचा रंगमंचावरचा सहज वावर अल्लड आणि गोंडस असतो. दुसऱ्या अंकांत शीमाच्या भूमिकेत रंजना शिरते आणि त्यात गुंतते तेव्हा प्रेक्षकांनाही त्रास असह्य होतो. संपूर्ण नाट्यगृह स्तब्ध होते. सुन्न होते. फक्त डोळ्यांना धारा असतात. शीमा साकारताना रंजनाला काय वेदना होत असतील, या विचारानेच कापरं भरू लागते. प्रयोग संपल्यानंतरही रंजनाला शीमाच्या भूमिकेतून बाहेर येता येत नसावे, इतकी ती त्यात गुंतलेली असते.
शीमानंतर मनात नाम्याचे पात्र ठसते. ते मयुर साळवीच्या अभिनयामुळे! नाम्या संपूर्ण प्रयोगभर निरागस भासतो. निरागसतेतून तो जगण्याचे सहज, सुंदर तत्वज्ञान सांगत राहतो. “मोठ्यांविषयी बोलून आपलं थोबाड घाण करायचं नसतं. मोठं होत नाही तोवर मोठ्यांचे कायदे माहित नसतात. हे माहीत असतं तर झक मारून मोठा झालो नसतो” आणि “ठरविलं तर ढग बी फोडता येतो.” नाम्या हे संवाद उच्चारतो तेव्हा सगळ्या टाळ्या लेखकांसोबत मयूर साळवीच्या अभिनयाला मिळतात.
शीतल जाधवने साकारलेल्या आईची (सुमन) भूमिका मनात ठसते. अलीकडे चुलीवरच्या भाकरीचं भारीच ‘कवतिक’ असते; पण गॅसची तुलना केल्यास चूल हीच बाईसाठी पुरेशी शिक्षा होती. अर्थात, तेच प्राक्त समजून त्याच्यातच आनंद माणणाऱ्या आया-बहिणी अनेकांनी पाहिल्या असतील. त्यांची आठवण चुलीवरची सुमन बघताना होते. हा काही नाटकाचा विषय नाही, असो. संसारासाठी झटणारी, नवाऱ्याचे नको ते आरोप सहन करणारी, सामाजिक रुढीपरंपरेपेक्षा समाजाच्या दबावापोटी पोटाचा गोळा दूर सारणारी निर्दयी आई शीतलने उभी केली आहे. त्याच वेळी मुलीसाठी अंतर्मनात होणारी कासाविस शब्दांविना आपल्या ह्रदयापर्यंत पोहचविण्यात शीतल यशस्वी ठरते. तेव्हा प्रेक्षकांच्या मनाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही.
नितिन जाधवनेही रावसाहेबची खलभूमिका जबरदस्त रंगविली आहे. त्याच्या संवादातून आणि देहबोलीतून पुरुषी अंहकाराचे प्रतिबिंब पदोपदी उमटत राहते. त्याचवेळी हळव्या मनाचा रावसाहेबही प्रेक्षकांना भुरळ घालतो. अतिशय सकसपणे त्याने ही भूमिका साकारली आहे. सुशिल शिर्केने पांडबा साकारताना बेजाबदार बेवड्या बाप आणि समाजाचे ओझे न झुकारू शकणारा; तरीही मुलीसाठी तुकड्या तुकड्याने तुटणारा बाप दमाने उभा केला आहे.
प्रमोद पगारेने नाना नावाचा कपट प्रवृत्तीचा पंच रंगविला आहे. इतर पंचाच्या भूमिकेतले अनिश बाबर आणि विजय इंगळे यांच्या वाट्याला लहानशा भूमिका आल्या असल्या तरीही त्या नजरेआड होऊ शकत नाहीत. अनिश बाबरच्या तोंडी “पोरी नो माथो खराब होई गयो” अशा एक- दोन वाक्यांपुरते संवाद आहेत. तरीही देहबोली आणि वेशभूषेतून तो संपूर्ण रंगमंचावर छाप पाडतो. सुकेशनी काबंळे हिने स्वत:चे बाईपण आणि माणुसपण हरवलेल्या रावसाहेबच्या आईची छोटीशी भूमिका तडफदारपणे निभावली आहे. पोटी मुली जन्माला येणे, हे पापाचे फळ समजणाऱ्यांसारख्या विकृत मानसिकतेचे हे पात्र प्रतिनिधित्व करते.
सगळ्या टीमला अपेक्षित कथासूत्राच्या लयीत आणण्याचे आणि राखण्याचे काम श्री. सातपुते यांनी केले आहे. नाटकाचा विषय लैंगिक भावनांशी संबंधित आणि अतिशय संवेदनशील आहे. तरीही ते किंचित्सेही अश्लिलतेकडे झुकत नाही. उलट अश्लिलतेची घृणा वाटू लागते. विविध प्रसंगातल्या सूचकतेतून संपूर्ण भावविश्व उभे राहते. शीमाच्या लग्नाच्या तयारीच्या प्रसंगी शीमाच्या भोवती वर्तुळाकार फिरणारे तिचे आई- वडील प्रेक्षकाचे डोके चक्रावून टाकतात. त्या चक्रातून नाटक संपेपर्यंत सुटकाच नसते, ही त्यांच्या दिग्दर्शनातली किमया आहे.
श्री. नितीन मोकल यांच्या शब्दांनी सजलेल्या ‘आता फोडली सुपारी’ आणि ‘साज खुलताचं सये’ या गीतांमुळे नाटकाच्या आशयाची धग अधिक खोलर रूजते. श्री. सुशील कांबेळ यांचे संगीत आणि प्रवीण डोणे, कविता राम आणि लतेष पूजारी यांच्या स्वर नाट्यगृहाच्या बाहेर आल्यावरही कानाला कंप करत राहतात.
मध्यांतरानंतर टेकडीवरची दृष्ये शीमाच्या जगण्याच्या भीषणतेच्या झळा प्रेक्षकांपर्यंत पोहचवितात. पानगळ झालेल्या झाडांच्या काड्या आणि शेजारून गेलेल्या विजेच्या तारा शीमाच्या हाडांच्या काडांशी नातं सांगतात. पहिल्या अंकातले शीमाचे घर, ओसरीतली चुल, पाण्याचा माठ आदी प्रतिकात्मकतेत प्रेक्षकांच्या नजरा वास्तव शोधू लागतात. त्याचे श्रेय केवळ श्री. वैभव सातपुते यांच्या कल्पक नेपथ्याला आहे. श्री. निलेश प्रभाकर यांच्या नेपथ्य आणि प्रसंगाना साजेशा प्रकाश योजनेमुळे नाटकाचा आशय अधिक दमदार होतो. वैभव आणि निलेश यांचे हे कसब विषयाला आशयघनात प्राप्त करून देते.
शीमाच्या आयुष्याचं वाळवंट करणाऱ्या पंचाच्या भूमिकेतल्या अनिश बाबरच्या रंगमंचावरील छापमध्ये त्याच्या देहबोलीबरोबरच त्याची वेशभूषा आणि रंगभूषेचे मोठे श्रेय आहे. त्याचबरोबर उद्‌ध्वस्त झालेली शीमा साकारताना रंजना म्हाब्दी करपलेल्या आणि रापलेल्या चेहऱ्यानिशी समोर येत राहते. तेव्हा तिच्या अभिनयाला सलगपणे दाद मिळत राहते. अर्थात, ती दाद रंगभूषाकार जगदीश शेळके यांनाही असते.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गाणी, नेपथ्ये सगळं भन्नाट आहे. हे नाटक चळवळीशी नातं सागते. म्हणून विषय आणि आशयाच्या ‘ऑथेंटिसिटी’ महत्वाची ठरते. संशोधन हा विषयाचा गाभा असतो. तो पुरेपूर जपण्याचे प्रयत्न लेखक द्वयींनी केला आहे. आशय, विषय अनेकांच्या जगण्याचा भाग आहे. तो साध्या सरळ, सोप्या भाषेत थेट ह्रदयाला भीडतो. काळीज हेलावून टाकतो. शेवटी डोळ्यात पाणीही शिल्लक राहत नाही. पुरुषातलं जनावर अलगदपणे थिएटरमध्येच बाहेर फेकण्याची ताकद या नाटकात आहे. माणसाला माणूस करणारी ही कलाकृती ह्रदयाचा ठाव घेत राहते. प्रबोधनातून पुरुषी मानसिकतेत परिवर्तन घडवून आणण्याची ताकद यात आहे. माणुसपणाचा 'लाईफ टाईम रिचार्ज पॅक' वाटावा इतकी ती सशक्त आहे.
-जगदीश त्र्यं. मोरे
मो. 9967836687

Thursday, 5 December 2019

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’

‘डग बीगन’ झाला ‘वर्षा’
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही ‘वर्षा’नव्हते. त्याचा संदर्भ माजी मुख्यमंत्री (कै.) श्री. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे. ते पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी आजच्याच दिवशी 5 डिसेंबर 1963 रोजी विराजमान झाले होते. त्यानिमित्ताने हे एक स्मरण...
शेतकऱ्याला पाणी मिळालं की, तो चमत्कार करून दाखवितो हा सिद्धांत मांडणारे व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत झटणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी सत्तेची कवचकुंडले शांतपणे खाली ठेवली आणि त्यांचा एकोणवीस वर्षांचा ‘वर्षा’ बंगल्यावरील प्रदीर्घ रहिवास संपुष्टात आला. त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी त्यांना सहज म्हणाले, “साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल...”
बोलणाऱ्याच्या मनातील निर्मळ भावना लक्षात घेऊन श्री. नाईक म्हणाले, “आता ते होणे नाही... आता कोणी आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही- आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ हेअरली लाँग पिरिय्‌ड. आय वॉज ऑन द ग्राऊंड. आता पुरे!”
श्री. नाईक यांच्या ‘दूत पर्जंन्याचा’ या चरित्रातील हा संवाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचं स्थानमहात्म्य अधोरेखित करतो. प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी हे चरित्र लिहिलं आहे. ते मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम पाहत असत. श्री. कर्णिक यांनी ‘दूत पर्जन्यां’द्वारे श्री. नाईक यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. त्यातच ‘वर्षा’ बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं. श्री. नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हतं.
श्री. नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील गहुलीचा. 1952 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुसद मतदारसंघातून मध्य प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले आणि महसूल खात्याचे उपमंत्री झाले. राज्य पूनर्रचनेनंतर 1956 मध्ये विदर्भाचा समावेश मुंबई प्रांतात झाला. या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री. यशवंतराव चव्हाण विराजमान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात श्री. नाईक यांनाही स्थान मिळालं. मध्य प्रांतात महसूल आणि सहकार मंत्री राहिलेले श्री. नाईक मुंबई प्रांतात कृषिमंत्री झाले. त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याचं खातं मिळालं.
श्री. नाईक यांच्या वाट्याला मंत्री म्हणून ‘डग बीगन’ नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला. सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. ते मुळातच हौशी स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही टापटीपीनं राहण्याची आवड होती. तसा हा बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा नाही. वत्सलाबाईंना क्षणभर वाटलं, “सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाट्याला तर आला नाही ना? शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला केवढा भव्य! त्याच्या मागील सौधावर उभं राहिलं की मरीन लाईन्सचा ‘नेकलेस ऑफ बाँम्बे क्वीन’ कसा रात्री झगमगतांना दिसतो. चौपाटीवर समुद्राच्या लाटा कशा उसळतांना दिसतात. त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाडं आहेत. त्याची बाग किती सुरेख आहे! त्या मानानं डग बीगन अगदीच साधा आहे.”
श्री. नाईक म्हणाले, “छान आहे हे घर. याला एक घरंदाजपणा आहे.” ते खरंच होतं. वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या अभ्यगताला परकेपणा वाटेल, अशी औपचारिकता नव्हती. त्याला घराचा मोकळेपणा होता. मुलगा अविनाशच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बीगनवर राहायला आले. श्री. नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची ‘शेतकऱ्यांचे गाणे’ ही अत्यंत आवडीची कविता होती. त्यामुळे आल्या दिवशीच श्री. नाईक यांनी ‘डग बीगन’चं नामांतर ‘वर्षा’ असं केलं. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते माळ्याला म्हणायचे, “मी झाडं लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असं समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत.”
मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर श्री. नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून श्री. नाईक वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते. ते म्हणाले, “शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकीक मिळणार असं दिसतं.”
“होय, बाबासाहेब! छप्पन्न साली आम्ही आपल्या मोठ्या बाबाच्या- अविनाशच्या सहाव्या वाढदिवशी वर्षावर राहयला आलो. तेव्हापासूनचे सारे दिवस- फक्त गेलं वर्ष वगळता- सुखाचे गेले.” श्री. नाईक यांनी स्पष्ट केलं.
दोघा भावांच्या संभाषणात वत्सलाबाईदेखील सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, “आता तर आम्ही इथं रूढलोच आहोत. आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको! आपण इथं खूष आहोत...” वसंत, वत्सला आणि वर्षा- ‘व’ अक्षरानं सुरू झालेली ही नावं आहेत. खरंच वर्षा बंगला आपल्याला भाग्याचा ठरेल? याच बंगल्यात आपलं गेलं वर्ष फक्त वाईट गेलं ते 1962 चं साल. त्याच वर्षी आपली एकुलती एक लाडकी बेबी आपल्याला सोडून गेली, हे विचारही वत्सलाबाईंच्या मनात डोकावून गेले.
“वत्सलाबाईंच्या मनात वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायचं होतं; पण श्री. नाईक यांचा सौम्य विरोध होता. ते म्हणतं, आपण काय आज मंत्री आहोत. उद्या कदाचित नसूही. आपल्या खातर सरकारवर खर्चाचा बोजा नको.”
पंडित जवाहरलाल नेहरू 1964 मध्ये मुंबईत राजभवनात मुक्कामाला होते. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. श्री. नाईक यांनी पंडितजी आणि विजयालक्ष्मी यांना आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं. ते त्यांनी स्वीकारलं होतं. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर डीनरची व्यवस्था करण्यात आली होती.
पुणे येथे 3 ऑक्टोबर 1965 रोजी श्री. नाईक यांनी शनिवारवाड्यासमोरील सभेत एक ऐतिहासिक घोषणा केली होती. ते म्हणाले होते, “दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला या शनिवारवाड्यासमोर फाशी द्या.” ही घोषणा बरीच गाजली. ती सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. 1957 च्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कृषीबरोबरच दुग्धविकास खात्याचाही पदभार होता. आरेचा सर्वांगीण विकास कार्यक्रम त्यांनीच सर्वप्रथम हाती घेतला होता. मुंख्यमंत्री म्हणून पंचायत राजची प्रभावी अंमलबजावणी, कापूस एकाधिकार योजना, रोजगार हमी योजना, कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा, कृषी विद्यापीठांची स्थापना, जिल्हा नियोजन मंडळांची निर्मिती आदीं असंख्य ऐतिहासिक नोंदी श्री. नाईक यांची प्रभावशाली कारकीर्द दर्शवितात. वर्षा बंगलासुद्धा याचा साक्षिदार आहे.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री. नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलविलं; परंतु ‘वसंता’च्या हृदयातला ‘वर्षाऋतू’ कायम होता. शेतात राबणाऱ्या कास्तकारांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलविला आणि पुसद गाठलं; पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ‘वर्षा’चं स्थानमहात्म्य कायम आहे. किंबहुना ते अधिक ठळक झालं आहे.
(संदर्भ: श्री. कर्णिक मधु मंगेश, दूत पर्जन्याचा, वसंतराव नाईक, कृषिसंशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मुंबई, 1994, लोकराज्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, डिसेंबर 2012)
-जगदीश त्र्यं. मोरे