Friday, 17 January 2014

प्रसारमाध्यमांतली शेती

‘शेती-प्रगती’ मासिकाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख. शेतीचं वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांत अधूनमधून कमी-अधिक प्रमाणात प्रतिबिंब उमटत असतं. पूर्णत: शेतीला वाहिलेली कृषी पत्रकारिताही आता रुजली आहे. त्याच अनुषंगाने ‘प्रसारमाध्यमे आणि शेती’ याविषयाचा घेतलेला धांडोळा. यात अनेक उल्लेख राहून गेले असतीलही; ते टाळण्याचा उद्देश नाही. कारण हा आढावा परिपूर्ण असल्याचा मुळीच दावा नाही…    
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरवातीची काही वर्षे राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक, 60 टक्क्यांपेक्षा जास्त होता. आता स्थिती उलटी आहे. सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक 50 टक्क्यांच्या वर गेला आहे. कृषी क्षेत्र तिसऱ्या स्थानावर आहे. कृषीचा वाटा 20 टक्क्यांच्या खाली आला आहे. राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा कमी झाला असला तरी शेतीवरील अवलंबितांच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही. आजही सर्वाधिक सुमारे 55 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांच्या जगण्याचे साधन शेतीच आहे. शेतीवर अवलंबून असलेले सर्वाधिक लोक राष्ट्रीय उत्पन्नात मात्र सर्वात कमी योगदान देतात. म्हणजे बहुसंख्य जनतेचा आर्थिक स्तर अद्याप समाधानकारक नाही. कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय विकासातला हा असमतोल दूर होणं शक्य नाही. हा असमतोल दूर करण्याच्या उपाययोजनेत प्रसारमाध्यमांचीही सहभाग वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना पोहोचविण्यात कृषी पत्रकारिता महत्वाची भूमिका बजावत आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न झाले आहेत.
शेतीचा पूर्वेतिहास
मानवी जीवनाच्या आणि संस्कृतीच्या विकासात कृषीचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. किंबहुना शेतीच्या अनुषंगानेच मानवी जीवन बहरत आणि फुलत गेले. इंग्रजीतील Culture या शब्दाला आपण संस्कृती हा शब्द वापरतो. Colere या लॅटिन शब्दापासून Culture हा शब्द आला आहे. सूक्ष्मजीवशास्त्रात Culture म्हणजे जीवाणूंच्या पेशी वाढविणे, हा अर्थ अभिप्रेत आहे. ‘Agriculture’ हा शब्दसुद्धा Ager आणि Cultura या शब्दांपासून तयार झाला आहे. Ager म्हणजे जमीन आणि Cultura म्हणजे मशागत. कृषीहा संस्कृत शब्द असून तो कृषया धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ जमिनीची मशागत करणे, असा आहे. मनुष्यबळ, प्राणी, अवजारे आणि यंत्रांच्या सहाय्याने जमीन कसून पिके काढेणे, याला कृषिकर्म किंवा शेती म्हणतात. त्यात पशुपालन, कुक्कुठपालनासारखे व्यवसायसुद्धा अंतर्भूत आहेत.
माणूस सुरवातीला शिकारीवर जगत होता. हिमयुगांवर हिमयुगे येत गेली. साऱ्या भूभागावर बर्फ पसरले. वनस्पती आणि प्राणीसृष्टीचा संहार झाला. दीर्घकाळ बर्फ साचून राहिला. पाऊसही झाला नाही. मानवाची उपासमार झाली. बर्फ वितळल्यानंतर मात्र वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्यातून मानवाला शेतीची प्रेरणा मिळाली. आदिमानवाच्या जीवनातील ही एक क्रांतीच होती. या क्रांतीमुळे मानवाची झपाट्याने उत्क्रांती होत गेली.
प्राचीन काळी शेतीतील नवनवीन कल्पनाचा अवलंब होऊ लागला. शेतकरी एकमेकांचे अनुकरण करू लागले. आपसातील देवाण-घेवाण वाढू लागली. सण-उत्सव हा एकत्र येण्याचे प्रमुख निमित्त असायचे. त्यातील गप्पा टप्पांतून शेतीच्या नवनवीन कल्पना एकमेकांना कळत असत. बलुतेदारी व्यवस्था ही सुद्धा एक संवादाचे प्रतिरूप (Communication Model) होते. विषे: सुतार, लोहार आणि नाभिकाच्या दारी जमणारा गप्पांचा फड म्हणजे बातम्यांची ठिकाणे असत. कुणाच्या शेतात काय लावले आहे, कुणाच्या शेतात काय पिकले आहे, याची बातमी तिथेच समजत असे. खरे तर ही आद्यपत्रकारिताच होती. प्रत्येक जण बातमीदाराच्या आणि विश्लेषकाच्या भूमिकेत असायचा. म्हणजेसिटिझन जर्नालिस्टसंकल्पनेचे मूळ यात असावे. संवादासाठी माध्यम नव्हेत; पण जनसंवाद व्हावयचा. ते संवादाचे बहुस्तरीय प्रतिरूप होते.  
कृषी पत्रकारितेची पार्श्वभूमी
लिपीच्या शोधानंतर लेखनाला सुरवात झाली. वेगवेगळे स्तलिखित ग्रंथ लिहिले गेले. त्यात शेतीचेही प्रतिबिंब दिसू लागले. ऋग्वेद आणि अथर्व वेदातही शेतीविषयक उल्लेख आहे. पाट किंवा कालवे काढून शेतीला पाणीपुरवठा करण्यासंबंधीचे वचने त्यात आहेत. पाणिनीच्याअष्टाध्यायीतही कालवे, विहिरी आणि मोटेने पाणी काढण्याचे उल्लेख आहेत. रामायण, महाभारतातही शेतीचे संदर्भ आहेत. शेतीवर प्राचीन काळापासून लिखाण केले जात असल्याचे दिसून येते; परंतु शेती हा लिखाणाचा मुख्य विषय नसायचा. शेती हा लिखाणाचा मुख्य व्यवसाय झाल्यावर कृषी पत्रकारितेचा उदय आणि विकास झाला.
भारतात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आधुनिक कृषी पत्रकारितेला प्रारंभ झाला, असे मानले जाते. सर सय्यद अहमद खान यांनी भाषांतर केलेल्या हवामान’, ‘युरोपियन शेतीआणिशेतीची साधनेया तीन पुस्तकांच्या प्रकाशनानंतर कृषी पत्रकारितेला प्रोत्साहन मिळाले. सन 1866 मध्येअलिगड इन्स्टिट्यूट गॅझेटनावाने साप्ताहिक सुरू झाले. या साप्ताहिकामुळे शेतीविषयक लिखाणाला चालना मिळाली. सन 1914 आणि 1918 मध्ये आग्रा येथून अनुक्रमेकृषिसुधारआणिकृषीही दोन शेतीविषयक नियतकालिके सुरू झाली. शेतीविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशींवरून 1929 मध्येइम्पेरिकल कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चची (आयसीएआर) स्थापना झाली. 1931 मध्ये आयसीएआरच्या माध्यमातूशेती आणि पशुधननावाने पहिले शेतीविषयक शासकीय नियतकालिक सुरू झाले. त्यानंतरजर्नल ऑफ निमल सायन्ससुरू झाले. बिहार सरकारने 1938 मध्ये सुरू केलेलेगावनावाचे नियतकालिक खूप वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत होते. स्वातंत्र्यानंतरइम्पेरिकलऐवजीइंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च’ (आयसीआरआय) असे नामकरण झाले. आयसीआरआयने हिंदीमध्येखेतीहे नियतकालिक सुरू केले. त्याला शेतीविषक गंभीर चिंतनात्मक नियतकालिकाचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यात विविध पिके, फलोत्पादन आणि पशुधनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असे. नियोजन मंडळानेहीयोजनानावाचे मासिक सुरू केले. ते देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसिद्ध होते. आता वेगवेगळ्या भाषांत आणि राज्यांत कृषीविषयक नियतकालिके सुरू झाली आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे बंगालीतीलवसुंधरा’, ‘कृषिजगतआदींचा समावेश होता. आयसीआरआयतर्फे आता वेगवेगळी नियतकालिके प्रसिद्ध केली जातात.
महाराष्ट्रातही शेतीविषयक नियतकालिके किंवा पत्रिका प्रसिद्ध केल्या जातात. त्यात प्रामुख्याने कृषी विद्यापीठांच्या पत्रिकांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1965पासूनशेतकरीमासिक प्रकाशित केले जाते. शेतीविषयक नियतकालिकांमध्ये ते सर्वाधिक खपाचे समजले जाते. राज्य शासनाचे मुपत्र असलेल्यालोकराज्यमासिकातूनही वेळोवेळी शेतीविषयक माहिती, त्यासंदर्भातील निर्णय आणि योजना प्रसिद्ध केल्या जातात. राज्यात मोठ्या प्रमाणात खासगी प्रकाशनेही आहेत. नाशिकचे श्री. . शं. पोतनीश यांनीकृषिसाधनहे शेतीविषयक साप्ताहिक सुरू केले होते. कृषी विज्ञान प्रकाशानचेबळिराजामासिकानेही राज्यात बराच लौकिक मिळविला आहे. याशिवाय ट्रॉम्बे शेती पत्रिका, कृषिविकास, ऊसमळा, किसान शक्ती, शेतकरी शिक्षण मळा, श्रीसुगीआपली शेती, हंगाम, पशुसेवा, द्राक्षवृत्त, डाळिंबवृत्त आदी अनेक नियकालिके आपल्याकडे प्रसिद्ध होतात. दशकभरापूर्वी सुरू झालेल्याशेतीप्रगतीमासिकाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संपादक रावसाहेब पूजारी यांनी या मासिकाला चांगला नावलौकिक मिळवून दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकमध्ये शेतीप्रगतीचा खप दिवसेंदिवस वाढत आहे.
साहित्यातली शेती
            साहित्यातही शेतीचे प्रतिबिंब उमटले; पण ते पुरेशे नव्हते. महात्मा फुले यांनी मात्र ‘शेतकऱ्यांच्या आसूड’मधध्ये शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तववादी चित्र मांडले. सर्व संकटांपैकी शेतीमालाला मिळणारा बाजारभाव ही सर्वांत मोठी समस्या असते. 1850 मध्ये लोकहितवादींनी यावर भाष्य केले होते. ही समस्या आजही कायम आहे. यंदाही कापूस आणि सोयाबिन उत्पादकांना अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. शेती उत्पादनासाठी केलेली गुंतवणूक बाजारभावाच्या रूपाने शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर बोलताना ज्याच्या हाती चंदी, त्याचाच घोडा, असे वर्णन केले होते.
          अलीकडे श्री. शेषराव मोहिते यांची ‘धूळपेरणी’, श्री. सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ श्री. भास्कर चंदनशीव यांची ‘अंगारमाती’ या साहित्यकृती शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. कवितेत मात्र शेती आणि शेतकऱ्याचे बरचे दर्शन झाले आहे. बहिणाबाई चौधरींच्या बहुसंख्य कविता शेतीशीनिगडीच आहेत. ना. धो. महानोर यांचा ‘रानातल्या कविता’ हा काव्यसंग्रह पूर्णत: कृषक जीवनाचं दर्शन घडवितो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष यांनी दै. ॲग्रोवनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होत की, बाजारात कांदा महाग झाल्यानंतर डोळ्यांतून अश्रू येतात. प्रसारमाध्यमेदेखील अतिरंजित वृत्तांकन करतात; परंतु त्याचवेळी सिगारेट आणि मद्याच्या किमती वाढल्यानंतर मात्र कोणी आक्रोश करत नाही, हा विरोधाभास आहे. गोरगरिबांना स्वस्तात धान्य मिळायला पाहिजे, याबाबत कोणाचे दुमत नाही. शेतकऱ्याला वेठीशी धरून अशी स्वप्नपूर्ती करू नये.
चंदेरी दुनियतील शेती
 मेरे देश की धरती सोना उग ले, उग ले हिरे मोती... ‘उपकार’ चित्रपटातल्या या गीतातली ही ओळ देशातील कृषी संस्कृतीचं वर्णन करून जाते.  कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात चित्रपटांत शेतीचं प्रतिबिंब उमटणं अगदी स्वाभाविक होतं. मात्र, हिंदी चित्रपट असेल तर ‘सरसोंदा खेत’ अन् गोफण खेळतानाची, अथवा नांगरणीचं चित्रण करणारी गाणी... असले शेतीविषयक उथळ चित्रण दिसतं. कलामहर्षी बाबूराव पेंटरांनी `सावकारी पाश` या मुकपटात शेतकऱ्यांचं शोषणाचं चित्रण दाखवलं, असं वास्तव चित्रण पुढे अभावानंच आलं. ‘साधी माणसं’, ‘मीठ-भाकर’ असे काही अपवाद वगळता पुढे 1960 नंतर आलेल्या बहुसंख्य मराठी चित्रपटांतून शेतकरी रंगवला तो तालेवार पाटील असलेला सधन जमीनदार असाच. हा जमीनदार म्हणजे मालामाल. जणू शेतकऱ्यासमोर प्रश्नच नाहीत!
`सामना` या चित्रपटात सहकार चळवळ कशी वाढली, सहकार सम्राट कसे तयार झाले याचे चित्रण आहे. ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न ‘सुर्वंता’ या चित्रपटातून मांडले गेले. दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘शापित’, ‘अरे संसार संसार’ अशा चित्रपटांतून शेतीचं अंशत: चित्रण केलंय. ‘अरे संसार संसार’मधून प्रा. विठ्ठल वाघ यांची अन् अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेली गाजलेली कविता काळ्या मातीत मातीत तिफन चालते शेतीकामांचं हृद्य वर्णन करते. श्रीकांत बोजेवार यांनी ‘तहान’ या चित्रपटाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची होत असलेली उपेक्षा मांडण्याचा प्रयत्न केला होता.
अलीकडच्या काळात गजेंद्र अहिरे, सतीश मन्वरसारखे दिग्दर्शक, गिरीश कुलकर्णीसारखे लेखक, मकरंद अनासपुरेसारखे ग्रामीण भागातून आलेले अभिनेते शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या चित्रपट माध्यमातून सर्वांगाने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. गजेंद्र अहिरे दिग्दशिर्त ‘पांढर’ या चित्रपटात शेतकऱ्यांचे प्रश्नांना भिडण्याचा उल्लेखनीय प्रयत्न झालाय एसईझेडचाच प्रश्न ‘मेड इन चायना’ या चित्रपटात मांडण्यात आलाय. अभिनेते नंदू माधव यांनी मधल्या काळात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित ‘श्वेतअंगार’ नावाची ‘शॉर्टफिल्म’ तयार केली होती. नंदू माधव यांची ‘आकडा’ ही ‘शॉर्टफिल्म’ही गाजली होती. ग्रामीण भागात भेडसावणारा भारनियमनाचा प्रश्न यात मांडण्यात आला होता. ‘गाभ्रीचा पाऊस’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर प्रभावी प्रकाश टाकण्यात आलाय. सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि नागेश भोसले यांनी एकत्र येऊन ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ ही समाजिक आशय असलेली कलाकृती निर्माण केली. ती बरीच गाजली. ‘वळू’, ‘टिंग्या’, ‘पीकपाणी’ अशा चित्रपटांतून ग्रामीण भागातले प्रश्न, विषयाचं प्रत्ययकारी चित्रण होऊ लागलंय.
हिंदीमध्ये बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ अथवा मेहबूब खान यांच्या गाजलेल्या ‘मदर इंडिया’सारख्या चित्रपटांचा काही अपवाद सोडला तर शेतीच्या प्रश्नांचं चित्रण करण्याबाबत व्यावसायिक हिंदी चित्रपटांना फारसा रस नाही. नुकताच थ्रीडीत आलेला आणि पूर्वी फार गाजलेल्या ‘शोले’सारख्या चित्रपटाचा खलनायक गब्बरसिंग जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून अन्नधान्य लुटून नेतो. बंदुकीच्या जोरावर अन्नधान्याचे प्रश्न सोडवतो. सुहेल तातरीच्या ‘समर 2007’ या चित्रपटात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न मांडला गेलाय.
इलेक्ट्रॉनिक माध्यमे
इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही कृषी पत्रकारितेला स्थान मिळाले आहे. 23 जुलै 1927 मध्ये मुंबईत देशातील पहिल्या नभोवाणी केंद्राची स्थापना झाली. पुढे त्याचे आकाशवाणी असे नामकरण झाले. कालांतराने राज्यात ठिकठिकाणी आकाशवाणी केंद्रे सुरू झाली. आकाशवाणीवरीलशेतीसल्लाआणिआमचं घर, आमचं शिवारसारख्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक भाषेत आणि बोलीत शेतीविषयक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले.
आकाशवाणीनंतर 1959 मध्ये भारतात युनेस्कोच्या सहकार्याने दिल्ली येथे प्रायोगिक स्तरावर दूरचित्रवाणी केंद्र सुरू झाले. 19 ऑक्टोबर 1972 पासून मुंबई केंद्र सुरू झाले. दिल्ली दूरदर्शन केंद्राने 1961 मध्येएज्युकेशनल टीव्ही’ (-टीव्ही) हा कार्यक्रम सुरू केला. त्यातून वैज्ञानिक माहितीच्या प्रसारावर भर देण्यात आला. त्याचा शेतकऱ्यांनाही उपयोग होऊ लागला. युनेस्को आणि भारत सरकारच्या सहकार्याने 1967 मध्ये देशाच्या विकासात उपग्रहाच्या उपयोगासंदर्भात एक पाहणी करण्यात आली. त्यात दूरचित्रवाणीचे योगदान महत्वाचे ठरू शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला. टोमिक एनर्जी आणि नासाच्या माध्यमातून 1975 मध्येसॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट’ (साईट) नावाने कार्यक्रम सुरू करण्यात आला. यातील कार्यक्रम ओरिसा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील जवळपास 2 हजार 400 खेड्यांमध्ये दिसत असत. त्यात शिक्षण, शेती, आरोग्य आणि कुटुंब नियोजनासारख्या विषयांवर अधिक भर दिला जात असे.
साईट प्रकल्पासाठी कृषी मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करून दिली होती. रडवाहू शेतीसंदर्भात मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखविणे, कुक्कुट पालन आणि पशुधनाची माहिती देणे, पीक व्यवस्थापन समजवून सांगणे, बियाणे, खते, पणन, कर्जाची उपलब्धता आदींवर साईटमध्ये भर द्यावा, अशी काही मागर्दर्शक तत्वे कृषी मंत्रालयाने ठरवून दिली होती. शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित कराव्यात. हवामानाचा अंदाज आणि बाजार भावांचीही माहिती द्यावी, असेही कृषी मंत्रालयातर्फे सूचविण्यात आले होते. त्यामुळेच साईटचा प्रयोग यशस्वी झाला. ही एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कृषी पत्रकारितेची सुरवात होती.
मुंबई दूरदर्शन केंद्रावरीलआमची माती, आमची माणसंहा कार्यक्रमही घराघरात पोहोचला होता. शेतकरी कुटुंबात तो आवर्जून पाहिला जाणारा कार्यक्रम होता. आपल्या राज्यात त्यातूनही कृषी पत्रकारिता आणि कृषि विस्तार शिक्षणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. इनाडू समूहाचे ईटव्हीने सुरू केलेलाबळिराजाहा खासगी वाहिनीवरील पहिला शेतीविषक कार्यक्रमही चांगलाच लोकप्रिय ठरला. स्टार माझा म्हणजे आताच्या एबीपी माझावरीलसातबाराच्या बातम्याया कार्यक्रमातूनही शेतीविषयक माहिती आणि तंत्रज्ञानाचा चांगला प्रसार होत आहे. झी 24 तासनेहीपीकपाणीनावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. या खासगी वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे जाळे सर्वदूर पोहोचल्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणी एकाच व्यासपीठावरून मांडणे शक्य झाले आहे.
इंटरनेट आणि मोबाईलमुळे आणखीच क्रांती झाली आहे. हवामानाचा अंदाज ऐकण्यासाठी आता रडिओ किंवा टीव्हीच्या बातम्यांपर्यंत अथवा सकाळी वर्तमानपत्र येऊपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही. इंटरनेटवर कधीही ही माहिती घेता येते. शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे हवामानापासून बी-बियाण्यांची माहिती देणारी सुविधारॉयटर्सने सुरू केली आहे. राज्याच्या कृषी विभागानेही एका खासगी कंपनीच्या मदतीने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूट्यूबवर शेतीसंदर्भातले असंख्य व्हिडिओ बघता येतात. फेसबु, ट्वीटर सारख्या सोशल नेटवर्कमुळे शेतकऱ्याला स्वत:चे प्रयोग किंवा कल्पना लोकांपर्यंत पोहोचता येऊ लागल्या आहेत. इतरांचीही माहिती त्यातून मिळू लागली आहे.
दैनिकांतील कृषी पत्रकारिता
कृषी पत्रकारितेला वाहिलेले नियतकालि किंवा कार्यक्रमापुरतीच कृषी पत्रकारिता सिमित नाही. मुळात भारतात स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेतून पत्रकारितेचा उदय झाला. प्रारंभीच्या काळी भारतीय पत्रकारिता म्हणजे मिशन होते. वृत्तपत्रे बातमीपत्रांपेक्षा मतपत्रे अधिक होती. अर्थात स्वातंत्र्य चळवळीची ती गरजही होती. स्वातंत्र्यानंतर मात्र यात बदल झाला. वृत्तपत्रांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. वृत्तपत्रांनी व्यावसायिकता स्वीकारल्यामुळे सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे त्यांना आवश्यक होते. त्याला शेतकरीही अपवाद नव्हता. त्यामुळे अनेक वृत्तत्रांनी शेतीविषय मजकुराचे पान किंवा साप्ताहिक पुरवण्या प्रसिद्ध करण्यास सुरवात केली.
 सकाळचे संस्थापक ना. भि. परुळेकर यांनी दै. सकाळच्या माध्यमातून वर्तमानपत्राला सर्वसमावेशक आणि सर्व घटकांचे बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच सर्वप्रथम आपल्या दैनिकात बाजारभाव आणि अंड्यांचे भाव देण्यास सुरवात केली. सुरवातीला त्यांच्या अशा प्रयोगांची टिंगल झाली. नंतर कौतुक झालं आणि मग त्यांचंच अनुकरणही झाले. अलिबागमधून सुमारे पाऊ दशकांपासूनकृषीवलहे दैनिक प्रसिद्ध होत आहे. यात केवळ शेतीविषयकच मजकूर होता, असे नाही, तर हे ते भूमिपुत्रांचे, शेतकऱ्यांचे दैनिक म्हणून ओळखले जावे, शी मालक-प्रकाशकांची त्यामागची भूमिका होती. अलीकडे लोकसत्तासारख्या शहरी आणि मोठ्या दैनिकानेही शेतीविषय पान सुरू केले. आता तर बहुतांश मोठ्या दैनिकांच्या जिल्हा आवृत्त्याही प्रकाशित होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात सर्वच दैनिकात शेतीला स्थान मिळाले आहे. परंतु शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येच्या किंवा वाचकांच्या प्रमाणात हे स्थान पुरेसे नाही.
            शेतकरी संघटनेने श्री. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली 1980 च्या दशकात शेतीप्रश्नांची अभ्यासू आणि प्रभावीपणे मांडणी केली. त्यांच्या आंदोलनांना वृत्तपत्रांमधून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे कृषी पत्रकारितेला आणखी चालना मिळाली. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली. शेतकरी सर्वप्रथम एवढ्या मोठ्याप्रमाणात संघटित होण्याची आणि वृत्तपत्रांत शेतीला स्थान मिळण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
शेतीला वाहिलेले दैनिक
मराठी कृषी पत्रकारितेत दै. ‘ग्रोवनचा प्रयोग क्रांतिकारक ठरला आहे. संपूर्णपणे शेतीला वाहिलेले हे भारतातले पहिले दैनिक असल्याचा दावा सकाळ समूहातर्फे केला जातो. ग्रोवन महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे. शेतीविषयक बातम्या आणि त्यातील वैविध्यता, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या यशोगाथा अशा भरगच्च शेतीविषयक मजकुरामुळे ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दैनिक ठरले आहे.
सकाळ समूहाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर व्यापक पाहणी केली होती. सकाळचे समूह संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पाहणीचा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात आला होता. अलीकडेच प्रकाश पोहरे यांच्या देशोन्नती समूहानेकृषकोन्नतीहे साप्ताहिक सुरू केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्याने त्यात स्थान मिळाले आहे. शेतकरी आत्महत्यांसारख्या विषयावर यात विप प्रमाणात लेखन झाले आहे. देशोन्नतीनेही शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयाला प्राधान्य दिलेले दिसते
उणिवांचा उहापोह
कृषी पत्रकारितेसंदर्भात 1976 मध्ये एक राष्ट्रीय कार्यशाळा झाली हाती. त्यात शेतीविषयक नियतकालिकांची गुणवत्ता, त्यांची मांडणी, कृषी संवाद आदीसंदर्भात विचारविनिमय झाला होता. त्यात काही ठळक निष्कर्ष मांडण्यात आले होते. वाचकांच्या विशेषत: शेतकऱ्यांच्या वाचनाच्या सवयीचा किंवा गरजेचा विचार न करता कुठल्याही आकारात नियतकालिके प्रसिद्ध केली जातात. बऱ्याच नियतकालिकांच्या मुखपृष्ठांची आणि आतील पानांची छपाई योग्य नसते. अक्षरांचा आकार (फाँट साईज) खूपच लहान असतो. त्यामुळे वाचनीयता कमी होते. काही नियतकालिकांमध्ये छायाचित्र आणि हस्तचित्रे चांगली असतात; परंतु बहुतांश नियतकालिकांमध्ये अत्यंत छोटी आणि दर्जाहिन छायाचित्रे असतात. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मजकुराला प्राधान्य दिले जात नाही. नवसाक्षर वर्गाला समजल अशा भाषेत मजकूर नसतो.
विकास पत्रकारिता व कृषी पत्रकारिता
विकास पत्रकारिता ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे. विकसनशील देशांमध्ये विकास पत्रकारितेला महत्त्वाचे स्थान आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाची फळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा विकास पत्रकारितेचा मुख्य उद्देश असतो. कृषी पत्रकारितासुद्धा विकास पत्रकारितेशी निगडीत अशीच संकल्पना आहे. मूळ प्रश्न असा आहे की, विकास म्हणजे काय? विकास म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. प्रांतिक आणि वर्गीय असमतोल त्यातून दूर होणे अपेक्षित असते. समाजातील अंधविश्वासांचा नायनाट करून वैज्ञानिक विचार रुजवून समाजाच्या आधुनिकीकरणाला विकास पत्रकारितेचे प्राधान्य असते. तेच तत्व कृषी पत्रकारितेलाही लागू असते. कृषी जीवनाशी निगडित प्रश्न, घटना आणि प्रसंगांचे वार्तासंकलन किंवा विश्लेषण म्हणजे कृषी पत्रकारिता होय. त्यातून शेतकऱ्याचे, त्याच्या कुटुंबाचे आणि कृषक समाजाचे जीवनमान उंचावणे, हा त्यामागील मुख्य उद्देश असतो
कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. वाचकांना माहिती देणे, शिक्षण देणे आणि मनोरंजन करणे, पत्रकारितेची तीन प्रमुख उद्देश आहेत. कृषी पत्रकारितेचीसुद्धा शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरविणे, त्यांना शिक्षित आणि प्रोत्साहित करणे, ही तीन प्रमुख कार्य आहेत. हे काम करताना त्यात रंजकता असेल तर ही पत्रकारिता शेतकऱ्यांना अधिक भावू शकते. परिवर्तनात्मक दृष्टीने हे झाले पाहिजे. अलीकडे शेतीविषयक नियतकालिकांमध्ये कथा, कविता आणि चुटक्यांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो.
कृषी विस्तार आणि कृषी पत्रकारिता
         कृषी विस्तार म्हणजे पारंपरिक शिक्षणाची बंदीस्त चौकट मोडून नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपयुक्त माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे. शेतजमीन, पाणी, पशुधन आदी नैसर्गिक साधन संपत्तीचा नीटनेटका वापर करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा कृषी विस्तार कार्याचा मुख्य उद्देश आहे. सर्वप्रथम अमेरिकेत एकोणीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कृषी विस्तार कार्याला सुरवात  झाली होती. ‘को-ऑपरेटिव्ह एक्स्टेंशन र्व्हीअसे त्याला नाव दिले गेले होते. ब्रिटीश विद्यापीठांनी खऱ्या अर्थाने विस्तारहा शब्द परिचित केला. आपल्याकडेही महात्मा गांधीच्या मार्गदर्शनाखाली 1920 मध्ये महाराष्ट्रात विस्तारविषयक सेवाग्राम प्रकल्पराबविण्यात आला होता. पश्चिम बंगालमध्ये 1921मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाख विस्तार कार्य हाती घेण्यात आले होते. भारतात सत्तरच्या दशकात सुरू झालेल्या प्रशिक्षण भेट योजनेमुळे विस्तार कार्याला गती आली होती. अलीकडेच आत्मा (राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प) ही योजनाही विस्तारासाठी फारच उपयुक्त ठरली. या विस्तार कार्याला प्रसारमाध्यमांनीही हातभार लावला आहे.
     कृषी पत्रकारिता करणारा पत्रकारही एक प्रकारे विस्तार कार्यकर्ताच असतो. शिक्षण हे प्रसारमाध्यमांचे मूलभूत कार्यच आहे. त्यामुळे विस्तार कार्य किंवा शिक्षण आणि कृषी पत्रकारिता एकमेकांना पूरक आहेत. म्हणूनच शासनानेही विस्तार कार्यातील प्रसारमाध्यमांच्या सहभागावर विशेष भर दिला आहे.शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत, बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमे महत्वाची भूमिका बजावू शकता. म्हणूनच आता सर्वच ठिकाणी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांमध्येकृषी  आणि ग्रामीण पत्रकारितेच्या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तर स्वतंत्र कृषी पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हैदराबादच्या कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेतही पत्रकारितेचा स्वतंत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
    (संदर्भ: विश्वकोष, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विविध पुस्तके, श्री. रा. के. लेले यांचे 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' ना. भि. परुळेकर यांचे 'निरोप घेता..'  दै. ‘ॲग्रोवन’मधील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत, ॲड. प्रज्ञा हेंद्रे-जोशी यांचा लेख आणि अर्थातच गुगलचीही साथ.)

Sunday, 13 October 2013

चैत्रपालवी (चैत्राम पवार)

    दै. ‘सकाळ’ने 2002-03 मध्ये राज्यातील पाच प्रयोगशील व्यक्तींची निवड केली होती. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात त्यांचा गौरव झाला. तिथं त्यांचं पाच दिवस सादरीकरणही होतं. बारीपाड्याचे(जि.धुळे) श्री. चैत्राम पवार त्यातील एक! दै. ‘सकाळ’चा जिल्हा प्रतिनिधी म्हणून मीही पुण्याला त्यांच्या सोबत होता. अलीकडेच पुन्हा एकदा त्यांच्याविषयी एका दिवाळी अंकाच्या निमित्ताने लिहिण्याचा योग आला…  
 सुमारे हजारभर लोकसंख्या असलेलं आणि साधारणत: शंभर कुटुंबांचं शंभर टक्के आदिवासी गाव; नव्हे लहानसा पाडाच तो. साक्रीपासून 50 ते 55 किलोमीटरवर अतिशय दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यांतली ही वस्ती. दुचाकी वाहनांनाही तिथवर जाणं खडतर… पाड्यावर बस तर सोडाच; पण लहान वाहनही जात नव्हतं. गावात पूर्वी शिक्षणाचा गंधही नव्हता. शासनही गावापर्यंत पोहचलं नव्हतं… गावासाठी रस्ता नव्हता. अलीकडंच तो झाला.
 धुळे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस या पाड्याच्या परिसरातच होतो; तरीही मार्च उजाडला की पाणीटंचाई पाचवीला पूजलेलीच. जमीन चांगली; पण उत्पन्न नाही. मोठमोठे डोंगर; पण वनराई नाही. शिक्षणाची आस; पण सोय नाही. कष्टाची धमक; पण उत्पन्न नाही. जिद्द आहे; पण मार्गदर्शन नाही. अन् पैशाचं पाठबळ तर नाहीच नाही… असा हा पाडा, त्याचं नाव बारीपाडा!
  बारीपाडा महसुली गावही नाही. मांजरी या महसुली गावात त्याचा समावेश आहे. या पाड्याचा कायापालट केला आहे तो श्री. चैत्राम पवार यांनी. अतिशय नि:स्वार्थी, निर्मळ असं हे व्यक्तिमत्त्व. पाड्यातल्या आदिवासी बांधवांच्या चैतन्याचा झरा म्हणजे चैत्राम. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. या उमद्या झऱ्यातील कल्पकता पाझरायला सुरवात झाली ती विद्यार्थी दशेपासूनच. त्यांच्या कल्पक प्रवाहातून बारीपाड्यातील शेती बहरली. लाकडाच्या चिपाडासारखे झालेले आदिवासी शेतकरी पुन्हा उभे राहू लागले. चारसूत्री भात पद्धतीचा अवलंब झाला. ‘बासमती’ आणि ‘इंद्रायणी’सारख्या दर्जेदार जातीचा भात पिकू लागला आहे. शेतकऱ्यांत भात उत्पादनाची स्पर्धा लागली. एका शेतकऱ्यानं एका गुंठ्यात ‘जया’ जातीच्या भाताचं 98 किलो उत्पादन घेतलं. बिगर आदिवासी भागासाठी यात नवल नसेल; पण आदिवासींसाठी ते अप्रूप होतं. म्हणून तर राहुरी कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी बारीपाड्यात येऊन भात उत्पादकांचा सत्कार केला.
भातातल्या यशानंतर आणखी कुठलं पीक घेता येईल? या विचारातून बटाटा, टोमॅटो, सोयाबीन, कांदा, लसूण यासारख्या पिकांकडंही इथला शेतकरी वळला. जे पीक घ्यायचं त्यातील तज्ज्ञाला गावात बोलवावं आणि शेतकरी मेळावा घ्यावा, हे चैत्राम यांनी ठरवलं. कृतीतही आणलं. शेतकऱ्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळूं लागलं. पारंपरिक ऊस पिकाच्या पद्धतीतही बदल झाला. पाटा पद्धत आली. उसाचं उत्पादन वाढलं. नवनवीन प्रयोगांमुळे गहू, हरभऱ्याचंही उत्पादन वाढलं.
  पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन सुरू झालं. आदिवासी बांधवांना चार पैसे अधिकचे मिळू लागले. बारीपाड्यापासून लगतच्या 11 गावांनी प्रेरणा घेतली. तिथंही मधुमक्षिका पालन सुरू झालं. 700 लीटरवर मधाचे उत्पादन आलं. ते दीडशे रुपये प्रतिकिलोनं विकलं. हा पाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळा बनला.
 पुण्याच्या नवजीवन फाउंडेशनच्या मदतीमुळं चैत्राम आणि बारीपाडावासियांचा उत्साह आणखी दुणावला. चैत्राम यांचं कौतूक होऊ लागलं; पण चैत्राम एवढ्यावर थांबणारे नव्हते. जंगलाचंही त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन केलं. बोडक्या झालेल्या डोंगरानं पुन्हा हिरव्यागार शाल पांघरली. जंगलाच्या वर्धन आणि संवर्धनासाठी गावकऱ्यांनी स्वत:वर आचारसंहिता लादली. लाकूड तोडणाऱ्याला शिक्षा होऊ लागली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी झाली. त्यामुळेच आज पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात जंगलं उभं राहिलं आहे. त्यात 300 प्रकारच्या वनस्पती आहेत. जळणासाठी गावकऱ्यांना वर्षातून विशिष्ट दिवसांत सुकलेली लाकडं गोळा करण्याची परवानगी मिळते. घरातल्या चुलीचा प्रश्न सुटतो. महूच्या फुलांचा लिलाव होतो. गावकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी एक साधन मिळालं. जंगलात पशू-पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. अंगणी मोर नाचू लागले.
 शेतीत प्रगती सुरू असताना स्वयंरोजगाराचेही धडे गिरवण्यास सुरुवात केली. भाषणातले धडे कृतीत आणले. पाड्यात गुळाचं गुऱ्हाळ घरघरू लागलं. 20-25 जणांच्या हातांना काम मिळालं. ओढ्या-नाल्यात, तलावांत माशांचं बी टाकलं. मासेमारीसाठी आदिवासी सरसावले. घरोघरी कुक्कुटपालनाच्या व्यवसायानं जोर धरला. आदिवासी बांधवांनी विशेषत: भगिनींनी बचत गट उभा केला. एकमेकांच्या अडीअडचणीसाठी हा गट बँकेसारखा कामी येऊ लागला.
राज्य शासनानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची घोषणा केली. पाड्यातील लोकांना चैत्रामनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. पाडा पुढं आला. झोपडी वजा घराघरांत आदिवासींनी स्वच्छता गृहं बांधली. गावानं सामाजिक क्रांतीच्या दिशेनंही पावलं टाकली. सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन होऊ लागलं. गरिबांचेही विवाह थाटात, पण अत्याल्प खर्चात पार पडू लागले.
 पाड्यातील लोकांना चैत्राम यांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. आपलीच चूक मुलांना भोवते, याची जाणीव आदिवासी बांधवांना झाली. मुला शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड होऊ लागला. तोच नियम अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांनाही लागू झाला. हायस्कूलसाठी मुलं-मुली आश्रमशाळेत जाऊ लागली. गावांतला बदल अबालवृद्धांनाही जाणवू लागला. लोक सुखावू लागले.
 दिवाळीच्या सुट्टीसाठी आश्रमशाळांतून गावी परतलेल्या विद्यार्थ्यांची गावालगतच्या जंगलात सहल काढण्याची कल्पना चैत्राम यांना सूचली. दिवाळीची सुट्टी आणि सहल हे दरवर्षाचं समीकरण झालं. ही सहल मात्र थोडी वेगळीच… सहलीला जाताना प्रत्येकानं सोबतीला थोडा तांदूळ आणि एक रुपया घ्यायचा. जमलेल्या पैशांतून तेल-मीठ आणायचं. त्याची जंगलातच खिचडी करायची. ती शिजेपर्यंत प्रत्येकानं आपल्या वयाला आणि हातांना पेलवेल एवढ्या दगड उचलत लहान-लहान ओढ्यांवर छोटे-छोटे बांध घालायचे. दिवाळीच्या सुट्टीतल्या या नित्य उपक्रमामुळे आज असे अनेक बांध बारीपाड्याच्या जंगलात दिसतात. कुठलाही खर्च नाही आणि शासनाकडंही त्यासाठी आर्जव नाही. जल, वन आणि मातीचं संरक्षण, संवर्धन झालं.
 पूर्वी मांजरी गावाकडून पाणी घेणारा बारीपाडा आज मांजरीसह अन्य दोन-चार गावांनाही पाणी पाजतोय. उन्हाळ्यातही गावातील विहिरींवर ऊस, कांदा, बटाटा आदी नगदी पिकं घेतली जातात. तीही अतिशय आधुनिक पद्धतीनं. डोंगर आणि जंगलाच्या कुशीत वसलेल्या या पाड्याचं रुपडचं चैत्राम पवारांनी पालटून टाकलंय. निसर्गही आता पाड्यावर खूश आहे. खान्देशामध्ये चैत्र-वैशाखात उन्हानं जीवाची काहीली होते. बारीपाड्याच्या परिसरातील उन्हाळा मात्र सुसह्य असतो.
चैत्राम यांनी बारीपाड्यातील आदिवासी महिलांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं आहे. परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. या रानभाज्यांची अनोखी स्पर्धाही दरवर्षी बारीपाड्यात घेतली जाते. आदिवासी महिला जंगलातून रानभाज्या गोळा करून आणतात. त्यावर आधारित विविध प्रकारच्या पाककृती केल्या जातात. परीक्षक पाककलांचं परीक्षण करतात. विजेत्यांना बक्षिसंही दिली जातात. आता तर विविध ठिकाणाहूनही लोक या रानभाज्यांच्या पाककलांचा आस्वाद घेण्यासाठी येऊ लागले आहेत. इथल्या आदिवासी महिलांना या रानभाज्या औषधी गुणांसह माहीत आहेत, हे विशेष!
 चैत्राम आणि पाडावासियांच्या जिद्दीची आता शासनानंही दखल घेतली आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बारीपाड्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. कृषी विभागाच्या मदतीनं अनेक शेततळी साकारली आहेत. इथल्या प्रत्येक आदिवासी कुटुंबाची आणि बांधवाची विकासाला साथ देणारी सकारात्मक मानसिकता घडवण्यात चैत्राम यांना यश आलं आहे. या यशाचं कौतूक मात्र फार उशिरानं झालं.
मुळात चैत्राम अबोल आहेत. अगदी साध्या आणि सरळ स्वभावाचा हा माणूस. भाषण करणं, चराचरा बोलणं, हा त्यांचा स्वभाव नाही. आधीच दुर्गम भागातला पाडा. त्यात चैत्राम यांचा प्रचारकी थाट नाही. म्हणूनच कदाचित काल-परवापर्यंत विविध गुणवंत आणि यशवंतांवर निघणाऱ्या वृत्तपत्रांच्या, नियतकालिकांच्या विशेषांकात किंवा पुस्तकांत चैत्राम आणि बारीपाड्याला स्थान मिळत नव्हतं. बाराही महिने बारीपाड्यात चैत्रातल्या उन्हासारखी रखरख असायची. चैत्राम यांच्या कल्पकतेतून आणि गावकऱ्यांच्या सहकाऱ्यातून बारीपाडा आता मात्र चैत्रपालवीच्या छायेत आला आहे. ही चैत्रपालवी आता अनेकांना साद घालू लागली आहे. ‘व्हीआयपी’ लोकांच्या बारीपाड्यातील येरझाऱ्या वाढल्या आहेत. पाड्याला प्रसिद्धी मिळू लागली आहे.
 चैत्राम पवार आणि बारीपाड्यातील या क्रांतीची दखल सातासमुद्रापारही घेतली गेली. इटलीच्या `इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट`नं (इफाड) चैत्राम यांचं कौतूक केलं. या संस्थानं चैत्राम यांना बँकॉकमध्ये निमंत्रित करून त्यांचा शेती क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव केला. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ देऊन चैत्रामचा सन्मान केला. कॅनडातून एक व्यक्ती त्यांच्यावर व पाड्यावर पी.एच.डी. करण्यासाठी आली. तो पाहुणा तब्बल 48 दिवस चैत्रामच्याच कुटुंबात रमला. अवघ्या गावाच्या बदल्या मानसिकतेचा आणि विकासाचा अभ्यास त्या पाहुण्यानं केला.
 चैत्राम म्हणजे निखळ नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व. म्हणूनच तर शेतीनिष्ठ पुरस्काराचे दहा हजार रुपयेही त्यांनी बारीपाड्यात घरोघरी स्वच्छतागृहाची योजना राबविण्यासाठी खर्ची केले. हगणदारीमुक्त गावाचा बारीपाड्याला बहुमान मिळवून दिला. चैत्राम यांचं काम मोठं असलं तरी ते अजून संपलेलं नाही. अजून खूप काही करायचे आहे आणि जे काही केले आहे ते टिकवायचे आहे, त्यांचा ध्यास आहे! 
                (पत्ता: श्री. चैत्राम पवार, मु. बारीपाडा, पो. शेंदवड, ता. साक्री, जि. धुळे.)

Sunday, 25 August 2013

शोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी !


‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक यशवंत नाट्यमंदिरात नुकतेच बघितले. एका संवेदनशील  विषयाला  हात घालणारे ते नाटक आहे. त्याचा हा परिचय नाही. परीक्षण तर मुळीच नाही; पण जे काही उमगले, गवसले ते  सांगण्यासाठीच हा खटाटोप.
-जगदीश मोरे.
-----------------------------------------------
गो. पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ नावाचे नाटक एक- दीड वर्षांपूर्वी रंगभूमीवर येऊन गेलं. या नाटकाद्वारे थोर समाज सुधारक जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार पुन्हा एकदा समोर आणण्याचे प्रयत्न होते. त्यापाठोपाठ आता श्री. राजकुमार तांगडे लिखित ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर जोरात सुरू आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि वस्तुनिष्ठ शिवाजी त्यात प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक पाहताना ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाची आठवण झाल्याशिवाय मात्र राहत नाही. कदाचित आता हा विषय आपल्या लक्षात आला असेल.
         ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या शीर्षकावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नाटक आधारित असेल, याचा अंदाज येतो; पण भीमनगर मोहल्ल्याचा संबंध येतो कुठून? याची उत्सुकता असते. ‘शिवाजी’, ‘भीमनगर’ आणि ‘मोहल्ला’ हे तीन शब्द वेगवेगळ्या घटकांच्या अस्मितांशी नाते सांगतात. ‘अंडरग्राऊंड’ला अनेक अर्थछटा आहेत. स्वातंत्र्य चळवळीत अंडरग्राऊंड हा शब्द आदराने घेतला जात असे; तर ‘गनिमी कावा’ हा महाराजांच्या युद्धनीतीतला एक चाणाक्ष गुण होता. त्याचेही इथे स्मरण होते; पण अंडरग्राऊंड या शब्दाचा इथला अर्थ फार व्यापक आहे.
थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आत्मभान जागृत झालेला भीमनगरमधला बंडखोर शाहीर या नाटकात शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सामोरा आणतो. झीलकरी म्हणून वावरणारा बेरोजगार, पण शिक्षित मुस्लिम तरूण पाशा याचीही त्याला साथ लाभते. ते दोघे जण महाराजांच्या सहिष्णू, सर्वधर्म समभाव आणि समतेच्या नीतीचा परिचय करून देतात. दर्यादिल राजाचा खरा इतिहास समोर आणतात. महाराजांविषयी सोयीच्या कथा सांगणारे बिनापोवाड्याचे अनेक शाहीर होऊन गेले; पण हे नाटक थेट शाहिरीच्याच बाजात महाराजांची महती सांगत भूत आणि वर्तमान काळाची सांगड घालते. राजेशाही आता अस्वीकार्य शासन पद्धती असली तरी महाराज लोककल्याणकारी राजे होते. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन पुढे जाणारे ते राजे होते. वर्तमानात मात्र लोककल्याणाचीच उपेक्षा होते आहे. जातिभेदांनी उच्छाद मांडला आहे. यावरही हे नाटक भाष्य करते.
शिवाजी राजांना त्यांच्या विचारांसह पृथ्वीवरून जेरबंद करून आणायचे फर्मान इंद्रदेव यमाला (प्रवीणकुमार डाळिंबकर) देतात. यमाला मात्र हे काम आवडत नाही; पण बॉसची आज्ञा! यमराज पृथ्वीवर येतो. शिवाजी राजांना (राजकुमार तांगडे) सोबत घेऊन इंद्राकडे निघतो; पण महाराज इथेही यमाच्या हातावर तुरी देतात. यमराजाच्या हाती फक्त महाराजांचा जिरेटोप उरतो. तीन-साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला तरी यमाला महाराज सापडत नाहीत. या प्रदीर्घ प्रवासात यमराजाला महाराजांच्या नावाने चाललेली दुकानदारी दिसते. महाराजांविषयीच्या खोट्या संदर्भांची पारायणं करून इतिहासाचे पुराण करणारी मंडळी भेटतात. अस्मितेच्या नावाने गोंधळलेल्या राजकारणातली बजबजपुरी दिसते.
शिवाजीच्या नावाचा जप करणाऱ्या पक्षाची आक्का (अश्विनी भालेकर), गणेश शिंदे (दादा) आणि युवा नेते दीपक (राजेंद्र तांगडे) लावणीच्या कार्यक्रमाची सुपारी देतात. ऐनवेळी लावणीची सुपारी रद्द होते. त्याऐवजी ते धर्मा शाहिराला (संभाजी तांगडे) शिवगोंधळाचे निमंत्रण देतात. त्याच्या ग्रुपमधला सोंगाडगिरी करणारा पुरोगामी विचारांचा मिलिंद कांबळे मात्र येण्यास तयार नसतो. त्याला धर्माची खोटी शाहिरी पसंत नसते. तरीही धर्मा आणि आयोजक त्याला राजी करतात. मिलिंदलाही ती संधी वाटते. आपण गेलो नाही, तर खोटा शिवाजीच लोकांसमोर येत राहील, असे त्याला वाटते.
कार्यक्रमादरम्यानच मिलिंद आणि धर्माचं बिनसते. एकमेकांचे विचार पटत नाहीत. दोघे एकमेकांना आव्हान देतात. जाहीर सवाल-जबाबाचे आयोजन होते. मिलिंदच्या पाठिशी पाशा (राजू सावंत) उभा राहतो. पाशालाही मनातली सल बोचत असते. आमदार होण्यापेक्षा समजूतदार नागरिक होणे बरे, अशी टिपणी तो करतो. अफजल खानाचा कोथळा काढणे आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटण्यापेक्षा कितीतरी मोठे कर्तृत्व महाराजांनी बजावले आहे, हेही तो अभिमानाने सांगतो. महाराज आमचेही राजे होते. महाराजांचा आरमार प्रमुख दौलतखान, तोफखाना प्रमुख इब्रहिम खान, वकील काजी हैदर, खास नोकर मदारी म्हेतर यांच्यासह असंख्य मुस्लिम मावळ्यांनीही स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला समर्पित केले होते, याची आठवण तो करून देतो; पण हे बोलण्याची आम्हाला सोय नाही, ही पाशाची खंत चटका देऊन जाते.
ऐतिहासिक भरजरी पोषाख आणि साजशृंगाराने मढवलेल्या भाषेत धर्मा शिवचरित्र सादर करतो. शब्दच्छल करून टाळ्या मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मिलिंद थेट वस्तुनिष्ठ शिवाजी उभा करताना भेदक भाषेत साद घालतो. कल्पनारंजक इतिहास लिहिणाऱ्यांचे पितळ उघडे पाडतो. चापलुसीवर प्रहार करतो. गडतोरणांवर बोलण्यापेक्षा महाराजांच्या धोरणांवर भर देतो. शेतकरी, कामकरी, स्त्रिया, स्वधर्म आणि इतर धर्माविषयीचे महाराजांचे विचार स्पष्ट करतो. महाराजांची युद्धनीती, मरिन इंजिनिअरिंग, पर्यावरणनीती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिचय करून देतो. धर्मांध लोकांना ते पटत नाही. ते मुद्यांवरून गुद्यांवर येतात. विचारांच्या लढाईत हिंसेचा आधार घेतात. त्यावेळी प्रेक्षकांसमोर वर्तमानही उभा ठाकतो. 
मिलिंदच्या अख्ख्या कुटुंबाने विवेकवादाची कास धरलेली असते. समंजस, पण बंडखोर विचारांच्या सावित्रीची (मीनाक्षी राठोड) मिलिंदला लाभलेली साथ नाटकाच्या आशयाचे गांभीर्य वाढवते. नाटकाच्या अखेरीस या दाम्पत्याची छकुली वैशाली (वसुंधरा तांगडे) एक प्रश्न विचारते, खऱ्या आणि खोट्या इतिहासाचे पुस्तक कसे ओळखायचे? हा प्रश्न प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो. इतिहास जागेपणी लिहावा आणि वाचावा लागतो. इतिहासाचा खरे-खोटेपणा लिहिणाऱ्याच्या नीतीवर अवलंबून असतो. जे पुस्तक माणसं जोडण्याचे शिक्षण देते, त्याला खऱ्या इतिहासाचे पुस्तक म्हणावे. हे या नाटकातले संस्कारक्षम उत्तर आहे; पण तो परिस्थितीवर शोधलेला तोडगा वाटतो. कारण खऱ्या-खोट्या इतिहासाचा निकाल एवढ्या सहजतेने लावणे शक्य नाही. शेवटी महाराजांच्या शोधार्थ साडेतीनशे वर्षांपासून हिंडणारा यम जिरेटोपाच्या मापाकडे लक्ष वेधत पडदा पडण्यापूर्वी प्रेक्षकांना विनवतो की, सर्व जातिधर्मातील शिवबाच्या मावळ्यांनो, फक्त एवढीच अपेक्षा आहे, की हे माप प्रत्येकाच्या मेंदूशी जुळवून घेऊ या.
रंगमळा संस्थेचे ‘शिवाजी अंडरग्राऊंड…’ हे नाटक पब्लिक ओपिनियन प्रोडक्शनने प्रस्तुत केले आहे. श्री. संभाजी भगत यांची ही भन्नाट संकल्पना आहे. भेदक लोकगीतं आणि संगीतही त्यांचेच आहे. जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन दिग्दर्शक नंदू माधव यांनी हे नाटक बसवले आहे. खेडूत आणि शेतकरी पार्श्वभूमीचे कलावंतही ताकदीनं नाटक पेलू शकतात, फक्त गरज असते ती संधीची. मग आम्हीदेखील संधीचं सोनं करू शकतो, हे या शेतकरी रंगकर्मींनी दाखवून दिले आहे. यमाची भूमिका करणाऱ्या प्रवीणकुमार डाळिंबकरचा अभिनय लक्षवेधी आहे. त्याने साकारलेला यम हसवत-खेळवत अंतर्मुख करतो. यातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावली आहे. शेतीत रमणारी ही मंडळी इथेही खूपच रंगत आणतात.
पारंपरिक नाटकांपेक्षा या नाटकाला वेगळा बाज आहे. ते मुक्त नाट्य आहे. शाहिरी जलसा आहे. त्यात विद्रोह आहे. पोवाडा आहे. सवाल-जबाब आहेत. नर्म विनोद आहेत. सटायर आहे. पथनाट्याच्या शैलीचा भास होतो; पण ते पथनाट्य नाही. नेपथ्यातही अडकलेलं नाही. त्याला पारंपरिक नाट्याचा साज नाही. पण ते विचारांचे महानाट्य आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. भूतकाळातल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देताना वर्तमानातले प्रश्न विचारायला भाग पाडते. मेंदूला झिणझिण्या आणते. डोके जड करते आणि शिवाजी महाराजांचा आदर आणखीच वाढविण्याचे काम करते.
‘शिवाजी अंडरग्राऊंड…’ची थीम पुरोगामी विचार पुढे नेणारी आहे. शिवाजी महाराजांचे खरे कर्तृत्व सांगणारी आहे. हे नाटक कुठल्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. कुणाच्याही देव-देवतांचा अपमान करणारे नाही. कुणाच्या भावना दु:खविण्याचा प्रश्न नाही. अस्मिता पेटविणारेही नाही. आहे ते सत्य सांगणारे आहे. हे सत्य मात्र पचविण्याची ताकद आणि इच्छा पाहिजे. मग हे नाटक आत्मचिंतनाबरोबरच समाज चिंतन करायलाही भाग पाडते. म्हणून ते प्रत्येकाने (लग्न पत्रिकेप्रमाणे) सहकुटुंब, सहपरिवार आणि इष्टमित्र मंडळींसह आवर्जून पाहावे, असे आहे.