Friday, 24 November 2017

पत्रकारितेचं विद्यापीठ

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रख्यात साहित्यिक अरुण साधू पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे सन 1995 पासून 2001 पर्यंत विभागप्रमुख होते. हा विभाग रानडे इन्स्टिट्यूट नावाने परिचित आहे. त्याला पत्रकारितेची शाळा म्हणून प्रचंड उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य साधू सरांनी केले. ते लौकिक अर्थाने शिक्षक नव्हते; पण तरीही पत्रकारांचे लोकप्रिय शिक्षक ठरले...
सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यात सायंकाळी ठिकठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना जायचं. दुसऱ्या दिवशी बातमी लिहून आणायची आणि मला दाखवायची, साधू सरांनी पहिल्याच दिवशी बजावलं.
मी उत्साहाने सांयकाळी बालगंधर्वला गेलो. सरांकडे दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी लिहून दिली. इतर विद्यार्थ्यांनी दिल्या. सरांनी सर्व बातम्या तपासल्या. प्रत्येकाच्या बातमीवर वेगवेगळे शेरे होते. माझ्या बातमीवर शेरा होता, थातूरमातूर.
फार अस्वस्थ झालो. दुपारनंतर शिंदे अण्णा वर्गात आले, जगदीश मोरे कोण आहे?... सरांनी बोलावलंय.
मी सरांच्या केबिनचा अर्ध्या फळ्यांचा दरवाजा भीतभीत उघडला, सर, बोलावलंत?
या... बसा. सर शक्यतोवर सुरवातीला एकेरी बोलत नसत.
कुठून आलात? गाव कोणतं? आई- वडील काय करतात? पुण्यात कुठं राहता...? सगळी चौकशी केली. मी तपशील सांगितला.
ठीक आहे; पण आजचशुद्धलेखन प्रदीपघ्या. वारंवार वाचा. व्यवस्थित समजून घ्या. चांगल्या साहित्यिकांची सोप्या भाषेतील पुस्तकं वाचा. जमल्यास कविताही वाचा. बातमी लिहिण्याचा सातत्यानं सराव करा. बातमी लेखन हा पत्रकारितेचा पाया आहे. पहिली पायरी आहे. ही पायरी मजबूत झाल पाहिजे. सर सांगत होते.
मी तोपर्यंत ठराविक विचारांचीच मोजकी पुस्तके वाचली होती. विचारांचा प्रसार आणि मारा ऐवढाच या पुस्तकांचा हेतू होता. भाषेची समृद्धी वाढविण्यासाठी वाचनाकडे डोळसपणाने बघण्याचा मला दृष्टिकोन नव्हता. सरांशी झालेल्या पहिल्याच वैयक्तिक भेटीत या उणिवेची जाणीव झाली. भविष्यात नाशिकसकाळमध्ये काम करताना संपादक कांबळे साहेबांमुळे बातम्या लिहिण्याचा उत्तम सराव झाला. त्यांनी बातमीचे विविधांगी धडेही दिले. दोघांमुळे न्युज सेन्सविकसित होऊ शकला.
विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने वाचले पाहिजे, याचे धडेही साधू सर देत असत. तिथेच वाचन लेखनाच्या कक्षा विस्तारायला सुरुवात झाली. मला तेच आज शासकीय नोकरीत आणि जनसंपर्काच्या व्यवहारात उपकारक ठरत आहे. पत्रकारिता शिकताना वार्तांकनाच्या विषयात प्रसिद्धिपत्रके हा घटक होताच. बातमीदार व उपसंपादक म्हणून प्रसिद्धिपत्रकांच्या बातम्या तयार करण्याचा अनुभव होता. जनसंपर्क अधिकारी या नात्याने शासकीय प्रसिद्धिपत्रके तयार करण्याची जबाबदारी आली. न्युज सेन्सविचारात घेऊन प्रसिद्धिपत्रके तयार केल्यास कर्तव्याचा कार्यभार साध्य करणे सुलभ होते, हा आत्मविश्वास म्हणजे साधू सरांच्या संस्कारांची फलश्रुती आहे.   
श्री. अरुण साधू यांची ओळख ज्येष्ठ पत्रकार आणि प्रख्यात साहित्यिक म्हणून होती. शिक्षक हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू होता. ते लौकिक अर्थाने शिक्षक नव्हतेच; पण तरीही पत्रकारांचे लोकप्रिय शिक्षक ठरले. अनेक जण विविध माध्यमांतून सरांचे साहित्य आणि पत्रकारितेविषयी स्मृती जागवत आहेत. काही जण आपले शिक्षक अर्थात पत्रकारितेच्या प्रारंभीचे गुरू म्हणूनही सरांविषयीच्या आठवणींना उजाळा देत आहेत. कारण साधू सर पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे सन 1995 ते 2001 पर्यंत विभागप्रमुख होते. हा विभाग रानडे इन्स्टिट्यूट नावाने परिचित आहे. या रानडे इन्स्टिट्यूटला पत्रकारितेची शाळा म्हणून प्रचंड उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य साधू सरांनी केले.
साधू सर विभागप्रमुख झाल्यानंतर लगेचच रानडेत संगणक कक्ष सुरू झाला. त्याच दरम्यान मी 1996 मध्ये बीसीजेला प्रवेश घेतला होता. सर एकदा म्हणाले होते, संगणकाचा वाढता वापर लक्षात घेऊन तुम्ही टायपिंगचा सराव केला पाहिजे.
मराठी वृत्तपत्रांत तोपर्यंत बहुतांश बातमीदार बातमीची हस्तलिखित प्रतच देत असत. उपसंपादकही हस्तलिखितांवरच संस्कार करत. टायपिंगबाबत दुसऱ्या एका प्राध्यापकांनी कोटी केली होती, तुम्हाला पत्रकार व्हायचं की कॉम्प्युटर ऑपरेटर!
इंग्रजी माध्यमातील काही विद्यार्थ्यांचा टायपिंगचा सराव होता. मराठी माध्यमातील जवळपास कुणालाच टायपिंगचा गंध नव्हता. पुढे दै. सकाळमध्ये मला पत्रकारितेची संधी मिळाली. तिथं काही कालावधीनंतर स्वत:ची बातमी स्वत: टाईप करणे आणि बातम्यांचे संपादनही संगणकावरच करण्याचे फर्मान आले. नोकरीचा प्रश्न होता. काही दिवसांत टायपिंग शिकलो. साधू सरांची आठवण झाली. खरे तर साधू सरांनी खूप आधी याची जाणीव करून दिली होती. विद्यार्थी दशेत असताना वीस वर्षांपूर्वी संगणक, इंटरनेट, टायपिंग इत्यादींचा अंदाजही नव्हता. गावाकडून थेट पुण्यात गेल्यावर ‘रानडे’त संगणक, इंटरनेट सहज उपलब्ध झाले. आमच्या ग्रंथालयात दोन टाईपरायटर यंत्रेही होती; पण टायपिंगबाबत गांभीर्य नव्हते. आज जवळपास प्रत्येक पत्रकाराला स्वत:चे बातमी लेखन किंवा संपादन संगणकावरच करावे लागते. साधू सरांनी ते आधीच हेरले होते. त्याची जाणीवही आम्हाला करून दिली होती.
पत्रकारितेत वीस वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा बोलबाला नव्हता. तुरळक अस्तित्व होते. मुद्रित माध्यमांचे वर्चस्व होते. पत्रकारितेचे शिक्षणही मुद्रित माध्यमांवरच केंद्रित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वृत्तपत्र निर्मितीचा सर्वंकष अनुभव मिळावा यासाठी रानडे’त प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अधुनमधुन वृत्तविद्यानावाने चार पानांचे प्रायोगित वृत्तपत्र प्रसिद्ध केले जात असे. साधू सर रानडेत आल्यानंतर वृत्तविद्या अधूनमधून ऐवजी आठवडाभर सलग प्रसिद्ध करण्याचा प्रयोग सुरु झाला. त्या आठवड्यात लेक्चर्स नसत. प्रत्येक विद्यार्थ्यांला दररोज नवीन जबाबदारी दिली जात असे. उदा. वृत्तांकन, संपादन, अग्रलेख, स्फुट लेखन, छपाई, वितरण इ. दैनिकांच्या कार्यालयाप्रमाणे सकाळी संपादकीय विभागाची बैठक, चार पानांची संभाव्य डमी, बातम्यांचे विषय, अग्रलेखाचा विषय, लेख इ. ठरविले जात असे. पूर्वी वृत्तविद्याची मांडणी बाहेर केली जात होती. संगणक कक्ष सुरू झाल्यावर विभागातच विद्यार्थी स्वत: मांडणी करू लागले. एकूण अंकाच्या निर्मितीवर साधू सरांचे लक्ष असायचे. त्यांच्यासह प्रा. प्रसन्नकुमार अकलूजकर सर, प्रा. किरण ठाकूर सर आणि उज्ज्वला बर्वे व पटवर्धन मॅडम हेदेखील मार्गदर्शन करायचे.
पुण्याबाहेरील आम्ही बहुतांश विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत असू. मी, संजय आवटे, दत्तात्रय गवंडी आणि अभ्युदय रेळेकर आम्ही एके दिवशी भल्या पहाटे वृत्तविद्याचा अंक घेऊन विद्यापीठ कॅम्पसमधील सरांच्या घरी गेलो. साक्षात तिथे प्रख्यात लेखक यू. आर. अनंतमूर्ती होते. सरांनी कौतुकाने आमचा अंक त्यांना दिला. आमची सर्वांची ओळख करून दिली आणि किचनमध्ये गेले. चहा करू लागले. सर, तुम्ही बसा आम्ही करतो चहा. सरांना आम्ही विनंती केली.
सरांनी आम्हाला चहा नाही करू दिला. स्वत: केला. आम्हा सर्वांना दिला. विद्यार्थी दशेतला हा अनुभव तृप्त करणारा होता. सरांकडे खूप मोठ्या माणसांचा वावर असायचा. सर विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी नेहमीच संवाद घडवून आणत असत.   
साधू सर अनुभवलेल्या माझ्यासारख्यांना साधू सर हे शब्दच मुळात जादूई वाटतात. साधू सर क्रमित अभ्यासक्रमापलीडकचे (टेक्स्ट् बूक) धडे देत. त्याचा क्लास म्हणजे पत्रकारितेची खरी शाळा भरत असे. त्यात पत्रकारितेची प्रत्यक्ष अनुभूती मिळे. क्लासमधील सरांचे मुक्तचिंतन आम्हाला समृद्ध करणारे असे. ते अत्यंत संयमी, मुक्तचिंतक आणि तत्वचिंतक शिक्षक होते. ते स्वत:च पत्रकारितेचे विद्यापीठ होते. साहित्य आणि पत्रकारिता जगलेले साधू सर बातमी लेखन शिकवायचे. अलीकडे ठिकठिकाणी पत्रकारिता महाविद्यालये, विभाग आणि संस्था सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी तर कधीच बातमी न लिहिलेले लोक बातमी लेखन शिकवतात. त्यामुळे प्रत्यक्ष साधू सरांनी बातमी लेखन शिकवणे, ही केवढी अभिमानाची गोष्ट!
प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना साधू सर संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख झाले होते. त्याच दरम्यान पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रांचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर यांची नियुक्ती झाली होती. संबंधित क्षेत्रातील माणसे शिक्षक म्हणून लाभल्यास शिक्षणाचा दर्जा उंचावतो. साधू सर तर त्याचे प्रत्यक्ष अद्‌भूत उदाहरण होते.   
श्री. पराग करंदीकर (संपादक, महाराष्ट्र टाईम्स, पुणे), श्री. विक्रांत पाटील (संपादक, जनशक्ती), श्री. दयानंद माने (संपादक, सकाळ, औरंगाबाद), श्री. अनिल घोडवे अशी काही मंडळी आम्हाला सिनियर होती. ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळेदेखील त्याचवेळी एमसीजे करत होते. साधू सरांच्या सुरुवातीच्या शिकविण्याबाबत आमचे काही सिनियर सांगायचे, सर नवीन आले तेंव्हा सरांचे लेक्चर्स कंटाळवाणे वाटायचे. नंतर मात्र सरांना टॅक्ट कळली आणि आम्हालाही त्यांची लेक्चर्स इंटरेस्टिंग वाटू लागली.
साधू सरांच्या शिकविण्यात शब्दांचा उपचार नसायचा. शिकवणे वास्तववादी, व्यवहारिक आणि दिशादर्शक होते. सर बी.सी.जे.ला आम्हाला चालू घडामोडीआणि एम. सी. जे. ला ॲडव्हान्स जर्नालिझम शिकवत. सरांमुळे आमच्या वर्गात विविध क्षेत्रांतील नामवंत व्याख्यानासाठी किंवा संवाद साधण्यासाठी येत असत. श्री. शरद पवार, श्री. कुमार केतकर, श्री. दया पवार,  श्री. एम. जे. अकबर, श्री. विनोद दुआ, श्री. रामदास आठवले, प्रा. सुहास परांजपे, प्रा. राम बापट, श्री. विनय हार्डिकर अशी अनेक नावे सांगता येतील. त्यांना पहिल्यांदा ऐकण्याची संधी रानडेत मिळाली होती. केतकर साहेब, बापट सर बऱ्याचदा शिकवायला यायचे.   
साधू सरांविषयी आम्हा विद्यार्थ्यामध्ये प्रचंड कुतूहल असायचे. ‘रानडे’त खूप गप्पा व्हायच्या. सरांची पत्रकारिता, पुस्तके आणि सिनेमे हे गप्पांचे विषय असायचे. एकदा तर सरांच्या साहित्यावर सरांच्या उपस्थितीतच गप्पाही झाल्या होत्या. विद्यापीठतल्या वसतिगृहातही आमच्या गप्पा होत असत. त्यात इतर विभागांचे विद्यार्थीही सहभागी व्हायचे. मित्र राजाराम कानतोडे गप्पांत आघाडीवर असायचा. गप्पांच्या ओघाने सरांच्या साहित्याचे वाचनही व्हायचे. त्यातून सरांविषयीचे कुतुहल आणखी वाढत गेले. या कादंबरीतील हे पात्र कोणावर असेल? ते कोणावर असेल? याची उत्सुकता वाटायची.
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरच्या सिनेमाचे 1997-98 मध्ये चित्रिकरण सुरू होते. काही भागांचे चित्रिकरण विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत झाले. साधू सरांनी हा सिनेमा लिहिलेला असल्याचे ऐकून चित्रिकरण बघताना अंगावर मुठभर चढल्यासारखे वाटायचे.    
सरांचे लिखाण नियमितपणे सुरू असायचे. सर सांगायचे आणि लेखनिकाने ते लिहून काढायचे, असा सरांचा शिरस्ता असायचा. शुद्धलेखन चांगले असलेल्या विद्यार्थ्याला सर लेखनिकाचे काम देत असत. आमच्या बॅचचा अभय जोशी रात्री दै. लोकसत्तामध्ये मुद्रित शोधन करायचा. त्यामुळे त्याचे शुद्धलेखन चांगले होते. त्याने बरेच दिवस सरांकडे लेखनिक म्हणून काम केले होते. इतरही अनेक विद्यार्थींना सरांकडे लेखनिक म्हणून काम करण्याचे भाग्य लाभले होते. सर कुठल्याही विद्यार्थ्याला कधीच गृहित धरत नसत. ते विद्यार्थ्यांना लेखनिक म्हणून मोबदलाही देत असत.
‘रानडे’तील शेवटच्या दिवसांत सरांसंदर्भात काही लोकांनी अनाठायी वाद निर्माण केला होता, हे अत्यंत दुर्दैवी होते. बहुजन समाजातील आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांविषयी सरांना अधिक आस्था असायची. माझ्या मते सरांच्या संपर्कात आलेल्या कुणाचाही सरांविषयीचे असले वाद ऐकून नक्कीच वाईट वाटले असले.
अलीकडेच मित्रवर्य सुनील चव्हाण आणि मी वांद्र्यातील सरांच्या घरी गेलो होतो. मीही याच परिसरात राहत असल्यामुळे यापूर्वीही सरांच्या घरी जाणे झाले होते. तत्पूर्वी पुणे, नाशिक, भुसावळ आणि मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांत सरांची भेट झाली होती. आता मात्र सर फार थकले होते. खोला थांबत व्हता. बोलताना त्रास होत असे. सरांना नमस्कार केला. मी सोबत माझ्या मुलीला (चार्वी) आवर्जुन नेले होते. आजारपणांमुळे सरांनी सुरुवातीला ओळखले नाही. मी रानडेतले काही आठवणी सांगू लागलो, माझ्या बातमी लेखनातील चुका... सर तुम्ही दिलेला थातूरमातूर शेरा... हडपसरहून ये-जा...
माझे बोलणे संपण्यापूर्वीच श्रीमती साधू मॅडम म्हणाल्या, सर सांगायचे, की, एक मुलगा हडपसरहून सायकलीने येतो... तूच का?
ऐकून मला भरून आल्यासारखे झाले.
विद्यार्थी हा विषय सरांसाठी सर्वव्यापी होता. गावाकडून आलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांबाबत सरांना अधिक आस्था होती. मी हो म्हटल्यावर सरांच्या पटकन लक्षात आले, तू संजय आवटे, कमलेश वालावलकरच्या बॅचचा ना?
हो सर, मी म्हणालो.
आमची बॅच 1996-97 (बीसीजे) आणि 1997- 98 (एमसीजे) ची. सरांनी संजय आवटे, कमलेश वालावलकर, अभय जोशी, ऐश्वर्या माविनकुर्वे, अनिता, नीशा नांबियार, अभ्युदय रेळेकर, अविनाश थोरात, श्रीकांत धिवरे, दत्तात्रय गवंडी, सुनील पाटील, सैकत दत्ता, सुधाकर आदी, ही आमची बीसीजेची बॅच. ह्रषिकेश देशपांडे, भक्ती चपळगावकर, ज्येष्ठ पत्रकार संजय दिनकर, आयेशा खान, मृणाल सप्रे आदी एमसीजेच्या बॅचचे. सरांनी यातल्या अनेकांची चौकशी केली.
सरांचे जाणे आम्हा विद्यार्थ्यांसाठीही धक्कादायक होते. सरांच्या जाण्याने केवळ साहित्यिक किंवा पत्रकारारच नव्हे तर पत्रकारांचा शिक्षकही हरपला. सरांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी सरांचे बरेच विद्यार्थी उपस्थित होते. यातल्या बहुतांश जणांनी आता पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली आहे. सरांचे अंत्यदर्शन घेताना पार्थिवाजवळ गणेश पुराणिक मी आणि अजून दोघे पत्रकार बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकारी कीर्ती मोहरीरही होत्या. आवंढा गिळत श्रीमती साधू म्हणाल्या, तूमचे सर गेले.

 

6 comments:

  1. खुप छान लेखन मोरे साहेब........ जय श्री विश्वकर्मा

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिखाण सर.. साधु सरांना ऐकण्याचे वा भेटण्याचे भाग्य आम्हाला नाही मिळाले पण तुमच्या या लेखाने त्याची थोडीफार सर आली. सध्या रानडेमध्ये शिकतोय. आणि हा लेख वाचुन खरच खुप अभिमान दाटुन आलाय..

    ReplyDelete
  3. खूप छान.

    ReplyDelete
  4. अप्रतीम आठवणी. आदर.

    ReplyDelete