Saturday, 31 May 2014

वाढदिवसाचं कौतूक?

सर्वप्रथम मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व मित्रांना धन्यवाद. खरं तर हा लेख दोन वर्षांपूर्वीच लिहिला होता. तो गेल्या वर्षी फेसबूकवरही पोस्ट केला होता. आता नव्याने ब्लॉग सुरू केल्याने तो इथंही कायमस्वरुपी असावा म्हणून इथं प्रकाशित करीत आहे. त्यावर आपल्या प्रतिक्रिया किंवा अनुभव नक्की नोंदवाव्यावत, ही विनंती.
आज 1 जून… विशेष दिवस! माझा वाढदिवस आहे म्हणून नाही; अनेकांचा वाढदिवस आहे म्हणूनही नाही. तर ग्रामीण भागातील असंख्य मुला-मुलींना स्वत:हून शाळेत घालणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींच्या कार्यामुळे आणि स्वप्न पेहरणाऱ्या आणि पाहणाऱ्या आई-बाबांच्या कर्तृत्वामुळे आजचा दिवस विशेष आहे. खऱ्या शुभेच्छा त्यांना दिल्या पाहिजेत.
        पूर्वी आया हॉस्पिटलमध्ये प्रसुती होत नसत. (मागास भागात आजही तसंच चित्र आहे. कधीकधी तेचं बरं वाटतं. डॉक्टरांतला कसाई बंघून किंवा ऐकून) शिवाय माता-पिता निरक्षर. मग मुलांची जन्म तारीख आणि वेळ लिहून ठेवणार कोण? लिहिलीच तर कुणी तरी ती भिंतीवर अथवा छताला तोलून धरणाऱ्या लाकडावर लिहित असत. असं भाग्य मात्र फारच थोड्या बालकांच्या नशिबी. गरजेच्या वेळी जन्म तारीख निश्चित व्हायची ती म्हणजे शाळेत नाव दाखल करताना. तेही बिचाऱ्या मास्तराचंच काम. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर मास्तर घरोघरी जाऊन आपल्या मुलाला शाळेत घाला, अशी विनंती करीत फिरत असत. पाच वर्षांच्या वयाचं गणित जुळविण्यासाठी 1 जून प्रमाणबद्ध मानायचं आणि मागच्या पाच वर्षांपूर्वीचं साल गृहित धराचं, झाली जन्म तारीख नक्की!
जन्म तारखेसाठी कुठल्याही दाखला किंवा पुरावा लागत नव्हता. मुलं शाळेत जाणं, हेच ध्येय होतं… ॲडमिशन नावाचं नाटक नव्हतं… फॉर्मसाठी रांग नव्हती… फी नव्हती… दप्तराचं आणि अपेक्षांचंही ओझं नव्हतं… पाटी-पेन्शील हेच दप्तर होतं… शेणानं सारवलेली शाळा होती… शाळेत बेल नव्हती; घंटा होती… अभ्यासाचं भान येईपर्यंत त्या घंट्याचीच प्रतीक्षा असायची… जणू काही शाळेत घंटा निनादण्याचीच वाट पाहण्यासाठी जात असू!
आई बाबांनी अभ्यास करायला सांगितलं तर पाटीवर चित्र काढत अभ्यासाचा भास निर्माण करत असू. पण आमच्यातलं कुणी एम.एफ. हुसेन झाल्याचंही ऐकिवात नाही. असं असूनही पुस्तकी शाळेपेक्षा प्रॅक्टिकल जगणं शिकायला मिळत होतं. शाळेतलं, गल्लीतलं भांडण घरी नल्यावर आईच कानाखली आवाज काढत होती. स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्याचा तो धडा होता. माध्यमिक शाळेपर्यंत पायात चप्पल नव्हती. मातीशी नातं अधिक घट्ट होतं. मातीतल्या जीवजंतुंच्या संगतीनं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत होती. आपलं मुलं शाळेत काय करतं, हे आई-वडिलांना माहीत नव्हतं. पण शेतात बियाणं पेरता-पेरता ते आपल्या मुला-बाळांच्या डोळ्यांत स्वप्न पेरत होते. आज जे काही किरकोळ जमलं ते कदाचित त्या स्वप्नांचं पीक असावं!
स्वप्न पेरताना आई-बाबांनी आमचा कधी वाढदिवस साजरा केला नाही. त्याचं मुळीच दु:ख नाही. तरीही आम्ही वाढत होतो… घडत होतो… बिघडत होतो. 1 जून कधी यायचा आणि जायचा याचं भानही नसायचं. अलीकडे बायको आणि मुलीमुळे वाढदिवसाचं भान आलं आहे. फेसबुकमुळे ते मित्रांपर्यंत पोचलं. अर्थात, या नव्या विश्वामुळे नवा आनंदही गवसला. अर्थात, मूळ प्रेरणा, प्रोत्साहन आणि आनंदाचा पाया रचला तो आई-वडिलांनीच!
ही केवळ माझी कहाणी नाही. ग्रामीण भागातल्या निरक्षर, शब्दांची ओळखही नसलेल्या पण आपल्या मुला-मुलींना शब्दांशी खेळायला शिकविणाऱ्या आई-बाबांच्या मुलांची ही प्रातिनिधीक कहाणी आहे. आणि हो, हे आई-बाबा म्हणजे केवळ दमलेलेच नव्हे तर काबाळ कष्टानं पिचलेले, नांगरलेल्या जमिनीप्रमाणे देह खिळखिळा झालेले आणि पावसाप्रमाणे नशीबानंही हूल दिलेले आहेत. आम्ही मात्र त्यांच्या वेदनांच्या नावानं संवेदनशीलतेची झूल पांगरूण वाढदिवस साजरा करीत आहोत की काय? अशी भीती वाटते.

4 comments:

 1. प्रिय श्री. जगदीश मोरे,

  परत एकदा आपल्या या लेखाबद्दल अभिनंदन कारण आपल्या या लेखामुळे शहरी वातावरणात मोठ्या झालेल्या अनेकांना वाढदिवसाची दुसरी बाजू लक्षात येते. तसेच जिथे शहरात मातीचे दर्शन दररोज फक्त तुळशीच्या कुंडीत घेणाऱ्या व्यक्तींना मातीची नाळ जोडणारे नाते काय याची जाणीव होऊ शकते.

  तसेच आपणांसारख्या व्यक्तीसाठी वाढदिवस केवळ शारिरीक वर्षांची वाढ नसून बौद्धिक कर्तृत्वाची व जगण्यातील जाणिवा अधिक समृद्ध करत नेणाऱ्या वर्षांची वाढ होय. वाढदिवसाच्या प्रसन्न शुभेच्छा…. असेच प्रगल्भ लेखन आपल्या हातून होत राहो ही इच्छा….

  Thanks and Regards,

  BIPIN MAYEKAR

  | NLP GOLD Master Trainer | First Indian Trainer and third in the Globe |
  | Founder CEO of PRASANNA HRD - Your Profit is Our Business |
  | VISIT NOW www.prasannahrd.com | +919819001215 |
  | http://picasaweb.google.co.in/mayekar.bipin/MayekarBipinATrainerWithResults/ |

  ReplyDelete
 2. प्रिय श्री. बिपिनजी,
  मनापासून धन्यवाद.
  आपल्यासारखे मान्यवर, नामवंत आणि बुद्धिवादी मित्र लाभल्यामुळे आपल्या सदिच्छा नेहमीच माझ्या पाठिशी आहेत. त्याबळावर पुढील वाटचाल आणखी बळकट होवो, हीच अपेक्षा.
  -जगदीश.

  ReplyDelete
 3. धन्यवाद साहेब,

  ReplyDelete