Monday, 17 March 2025

‘ओके… सॉरी… थँक्यू!’ #OK,Sorry,Thankyou!

        ‘ओके’, ‘सॉरी’ आणि ‘थँक्यू’ हे तीन शब्दांत जादू आहे. ते माणसे जोडण्याचा कानमंत्र देतात. मानवी मूल्यांशी नाते सांगतात. त्यांना नम्रतेचा गंध आहे. सौजन्याचा साज आहे. ते अंतर्मनातील वेदनेवर हळूच फुंकर घालतात. काळजातल्या वेदनेची दाहकता कमी करतात. अचूक वेळी अंत:करणापासून प्रकट होणाऱ्या या शब्दांतून सद्‌भाव प्रदर्शित होतो. सहमती, क्षमा आणि कृतज्ञतेचे भाव त्यात सामावलेले आहेत…
        औष्णिक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन क्षेत्रात प्रख्यात असलेले प्रफुल्ल वानखेडे यांची लिखाणातही मुशाफिरी सुरू असते. ‘केल्व्हिन’ व ‘लिक्विगॅस’सह पाच कंपन्यांचे ते संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत. शिवाय ‘लेट्‌स रीड इंडिया’ वाचक चळवळ त्यांनी आरंभली आहे. त्यांनी राज्यभरात वाचन संस्कृती रुजविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठीदेखील ते प्रयत्नशील असतात. जगण्याचा एकमेव आधार पैसा नसला तरी विविध आधारांपैकी तो एक महत्वाचा आधार आहे. तो स्वत:च निर्माण केला पाहिजे. अट फक्त एकच आहे, प्रामाणिक मार्गाने पुढे त्यांचे जतन, संवर्धन करता आले पाहिजे. त्याचा परीघ विस्तारता यायला हवा. त्यासाठीची कौशल्य आत्मसात करता आली पाहिजेत. तरुणांमध्ये हीच स्वप्ने पेरणाचे काम श्री वानखेडे गेली अनेक वर्षे व्याख्यानांतून, स्तंभ लेखनातून आणि पुस्तकांद्वारे करीत आहेत. त्यातूनच साकार झालेल्या त्यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या; परंतु मी तुम्हाला आज पैशापाण्याची गौष्ट सांगत नाहीय. ही गोष्ट आहे त्यांच्या ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या नव्या कोऱ्या पुस्तकाची.
        ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत व्यंगचित्रकार आलोक. राजकीय आणि सामाजिक विषयावरील तिरकत आणि उपाहासात्मक शैलीमुळे आलोक यांच्या व्यंगचित्रांचा भावार्थ मनोरंजनातून प्रबोधनाडे जाणारा असतो. त्यांच्या कुंचल्याच्या फटकऱ्यांतून आविष्कृत होणारे आशयगर्भित भाष्य मोठे मार्मिक असते. आलोक सध्या ‘सकाळ’ माध्यम समूहात राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची यापूर्वीही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
        श्री. वानखडे आणि श्री. आलोक या जोडगोळीचे ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ हे मराठीतील वेगळ्या धाडणीचे पुस्तक आहे. तसा तो छान प्रयोग आहे. शब्दांशिवायदेखील वाचकांशी संवाद साधण्याची क्षमता आलोक यांच्या चित्रांत असते; परंतु इथे वानखेडे यांच्या शब्दांच्या माध्यमातून आलोक यांची चित्रे वाचकाशी वार्तालाप करतात. आलोक यांच्या रेषा बोलू लागतात. त्याचवेळी आलोक यांच्या कुंचल्याने वानखडे यांच्या शब्दांना आशयगर्भित सौंदर्य प्राप्त होते. हीच वानखेडे व आलोक यांची शब्दचित्रे व्यक्तिगततेबरोबरच सामूहिक आत्मपरीक्षणाचा संदेश देऊ जातात. 
        ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ तीन शब्दांत जादू आहे. ते माणसे जोडण्याचा कानमंत्र देतात. मानवी मूल्यांशी नाते सांगतात. अंतर्मनातील वेदनेवर हळूच फुंकर घालतात. वेदनेची दाहकता कमी करतात. या शब्दांना नम्रतेचा गंध आहे. सौजन्याचा साज आहे. अचूक वेळी अंत:करणापासून प्रकट झालेल्या शब्दांतून सद्‌भाव प्रदर्शित होतो. हे तीन शब्द भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. सहमती, क्षमा आणि कृतज्ञतेचे भाव त्यात आहेत. ‘ओके’ या सहज साध्या, सोप्या शब्दांतून व्यापक सहमती घडून येऊ शकते. सहमतीतून सहकार्य आणि सकारात्मकतेकडे वाटचाल होते. ‘सॉरी’ शब्दातही मोठी ताकद आहे. क्षमा मागण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी माणूस दर्यादिल असावा लागतो. क्षमाशीलता दुर्बलतेचे लक्षण नसते. तो संस्काराचा भाग असतो. ‘थँक्यू’ शब्दातल्या कृतज्ञतून सामंजस्याचे भाव वृदिंगत होतात. 
        ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही आणि त्यातल्या पृष्ठांनाही अनुक्रमांक नाही; पण पानोपानी एक स्वतंत्र संदेश आहे. विचार आहे आणि त्याचा धागा आधीच्या पृष्ठावरील विचारांशी जोडलेला आहे. तरीही प्रत्येक पृष्ठाला स्वतंत्र आशय आहे. कुठेलेही पृष्ठ यादृच्छिकपणे उघडून वाचायला सुरुवात केली तरी हे पुस्तक तिथून सूरू झाल्याचा भास होतो आणि पुढच्या पृष्ठावरील मजकूर नाही वाचाला तर हे पुस्तक तिथेच संपले असावे, असेही वाटू लागते. प्रत्येक पृष्ठाची हीच तर गंमत आणि ताकद आहे. सगळे पृष्ठ मिळून एक भक्कम विचार मनात रुंजी घालू लागतो आणि हे पुस्तक एक चांगला संदेश देऊन जाते. 
        मार्शल मॅक्लुहानचे ‘माध्यम हाच संदेश’ हे प्रसिद्ध विधान संप्रेषणाच्या (communication) अभ्यासात खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे पुस्तक हाच एक संदेश असतो. त्याच धर्तीवर ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या शीर्षकातच एक प्रभावी संदेश आहे. आतल्या प्रत्येक पृष्ठावर, पृष्ठावरील प्रत्येक चित्रांत किंवा संवादात एक संदेश दडला आहे. प्रत्येक संदेशात एक स्वतंत्र विचार आहे. मॅक्लुहानच्या मते माध्यम म्हणजे केवळ माहिती पोहोचविण्याचे साधन नाही, तर ते स्वतःच एक शक्ती आहे. त्या शक्तीची जाणीव या पुस्तकातून होते. 
        ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’ या शब्दांचा वापर आपण अगणिक वेळा करत असतो. त्याचे आपण मोजमापही करू शकत नाही; पण हे शब्द किती अंतर्मनातून येतात, वेळ किती अजूक आहे (टायमिंग) आणि तुमची देहबोली काय असते? त्यावर त्यांचा प्रभाव आणि निर्मळता अवलंबून असते. प्रत्येकला हे शब्द वापरण्याचे किंवा न वापरण्याचेही स्वातंत्र्य असते. त्यातून व्यक्तिमत्व प्रतीत होते. ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ हे पुस्तक विचारांच्या स्वातंत्र्यालाच अर्पण केले आहे. त्यांची अर्पण पत्रिकाही कलात्मक आहे. प्रत्येकाला स्वत:ची ‘इकोसिस्टिम’ योग्य वाटते, तेच त्यांच्या विचाराचे स्वातंत्र्य असते आणि हाच संदेश हे पुस्तक देत असते. 
        अर्पण पत्रिकेतल्या गर्भित आशयानेच पुस्तकाची सुरुवात होते. अर्पणपत्रिकेच्या पृष्ठावर चार बाजूंना चार रेखाटणे दिसतात. त्यात कोळ्याचे जाळे, मधमाशांचे पोळ, माकड आणि मोबाईलमध्ये मग्न माणसाचे चित्र आहे. कोळ्याचे जाळे आणि मधमाशांच्या पोळ्यात सौंदर्य आहे. जाळे किंवा पोळ कुठेही दिसले की आपले लक्ष वेधून घेतात. कोळ्याचे जाळे मात्र दुसऱ्या जीवाच्या शिकारीसाठी विणलेले असते. त्याला ‘जाळ्या’ऐवजी ‘सापळा’ म्हटले की अचूक भाव व्यक्त होतो. कोळ्याचे हे जाळे ‘डिस्ट्रक्टिव्ह’ असते. मध्यमाशांचे पोळ ‘कन्स्ट्रक्टिव्ह’ असेत. त्याद्वारे मधमाशा मनस्वी आनंद घेत एकतेचा संदेश आणि भान देतात. एकसारखे षटकोन, त्यातल्या एखाद्या षटकोनाची बाजू खराब झाली तरी इतर त्याला सावरतात.
        माकड हे माणसाच्या उत्क्रांतीचा पाया आहे आणि प्रतीक आहे. मोबाईलमध्ये मग्न असलेल्या चित्रातील माणसाला तुम्ही तरुणही म्हणू शकता. अर्थात, ते तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. माकडापासून सुरू झालेला प्रवास माणसापर्यंत आला आहे; पण माकडापासून मानवापर्यंतची ‘इवोल्यूशन’ आता मोबाईल फोनमध्ये अडकून पडली आहे. हातात मोबाईल घेऊन बसणारा माणूस आता माकडासारखा वाटायला लागलाय का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. मोबाईलमधून होणारा माहितीचा मारा किंवा भराभर रील्स पाहताना मेंदूपर्यंत काय व किती पोहचत असेल आणि त्यातल्या किती माहितीचे पचन होत असेल? हा खरोखर गंभीर विषय आहे, तेच तर ही चित्रे सूचवू पाहत नाहीत ना?
        माणसाचा मेंदू ‘युनिक’ आहे. मेंदूने विचार करायचा असतो. मोबाईल किंवा इंटरनेट हे ‘एक्सटेंडेड मेमरी’ म्हणून वापरायच्या असतात हे बहुतांश जण विसरत चालले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) कितीही विकास झाला तरी तिच्या जन्मदात्या मानवाला लाभलेली ‘क्रिएटिव्हीटी’ ही शाश्वत आहे. तेच तर माणसाला मिळालेले ते सर्वात मोठे वरदान आहे. एआय आपला ‘मास्टर’ न होता ‘असिस्टंट’ झाला पाहिजे, यासारख्या गोष्टींचे भान कदाचित हे पुस्तके देऊ पाहते.
        कलात्मक अर्पण पत्रिकेच्या अशायाची फोड करताना लेखकद्वयी नमूद करतात, “माणसानं स्वतः विचार करावा. तोच बेसिक फरक माणूस आणि इतर प्राण्यांत आहे! तोच आपला सर्वांच्या प्रगतीचा मूळ आधार आहे. तो आपण जपायला, वाढवायला हवा! आपल्या रोजच्या जगण्यात आर्थिक स्वातंत्र्य, मानसिक शांतता, कौटुंबिक सुख, सामाजिक बांधिलकी हवीच... पण हे सर्व कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपला विवेक जागृत हवा. तो विवेक जागृत असणाऱ्या व विचार स्वातंत्र्य मान्य करणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक अर्पण!”
        अर्पणपत्रिकेपासून सुरू होणारा विचारांचा हा प्रवास मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाच्या चित्राच्या पार्श्वभूमीवरील दोन व्यक्तींतल्या संवादापासून एखाद्या गोष्टीसारखा सुरू होतो. तिथेच मराठी आस्मितेचा संदेश आणि विचार मनात डोकावतो. 105 हुतात्म्यांचे स्मरण होते. मुंबईत दुकानाच्या मराठी पाट्यांचा प्रश्न अधून मधून ऐरणीवर येत असतो; पण दुकानदार कोण? हा प्रश्न मात्र मेंदूत फारसा शिरत नाही, अशा विविध प्रश्नांवर या पुस्तकात मार्मिक भाष्य आहे. पुस्तकातील वेगवेगळी पात्र विविध विषयांवर सहज, सुलभ संवादाद्वारे भाष्य करतात. त्यातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, करियरविषयक, वाचन संस्कृती, व्यसन, टाईम मॅनेजमेंट, गरिबी, पैसा, गुंतवणूक अशा विविध विषयांना मोजक्या शब्दांत स्पर्श करण्यात आला आहे. मोजक्या शब्दांत मोठा आशय दडला आहे. आशयात विचार आहे. संदेश आहे.
        शून्य मिनिटात येतो म्हणारी व्यक्ती तासाभरानेही येत नाही, त्यावेळी ‘टाईम मॅनेजमेंट’चे बारा वाजलेले असतात. आपल्या लायकीपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा जास्त काहीच मिळत नाही तरीही सोशल मीडियावरच्या ‘घरबसल्या करोडपती’ सारख्या व्हिडोओंना आपण भुलतो; परंतु लायकी किंवा क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. मोबाईलमुळे आपण वाचनापासून दूर जात आहोत. एखादी व्यक्ती पुस्तक वाचत असल्यास तिचा मोबाईल बंद पडला असावा, एवढाच अंदाज व्यक्त करण्यापर्यंत आपली क्षमता राहिली आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये पूर्वी बहुतांश जण वृत्तपत्र किंवा पुस्तक वाचताना दिसायचे. कुणी भंजनात दंग व्हायचेत. काही लोक पत्तेही कुटायचेत. आता मात्र बहुतांश जण मोबाईलमध्ये मग्न असतात. रिल बघता बघता स्वत:शीच हासतात. अर्थात, ते हसतायेत की रडतायेत ते पाहायला इतर चाकरमान्यांना वेळ नसतो. कारण तेही मोबाईमध्ये ‘बिझी’ असतात. आपला दीड जीबी डेटा भला आणि आपण भले! या दीडजीबी डेट्याने लोकल ट्रेनमधले भांडण, तंटे कमी केले आहेत. बहुतांश बिचारे गरीब मुंबईकर रील्स किंवा पायरेटेड सिनेमे अथवा वेब सिरीज बघत आपले डेस्टिनेशन गाठतात!
        ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’मधील “प्रत्यक्ष कृतीपेक्षा कधी कधी कन्फ्युजनमुळेही दमायला होतं.” हे विधान बरेच काही संगून जाते. प्रत्यक्ष कामापेक्षा किंवा कृतीपेक्षा काही लोक नियोजनावरच जास्त भर देतात आणि ऐन कृतीच्या वेळी मात्र त्यांचा शक्तीपात झालेला असतो. “श्रीमंत दिसण्याच्या नादात अनेक जण गरीबच राहतात,” अशा विधानांच्या माध्यमातून आर्थिक सजगतेवर आणि गुंतवणुकीवरही या पुस्तकात भाष्य केले आहे; परंतु पैसा ही एकमेव गुंतवणूक नाही. ‘यशस्वी’, ‘आनंदी’ आणि ‘समाधीनी’ जीवनासाठी इतरही बाबींतही गुंतवणूक करावी लागते. आपल्या कमाईला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी ‘इमोशनल कोशंट’ आणि ‘फायनान्शिल कोशंट’ यांचा मेळ घालता यायला हवा, याची जाणीव पुस्तक वाचताना होते.  
        “दुसऱ्याला केलेली मदत लगेच विसरता आली की आपण माणूस म्हणून घडत जातो,” सुभाषितांसारखा हा संवाद पटकन आपले लक्ष वेधतो. नाही तर छटाकभर मदतीचाही आपण गावभर डंका पिटतो. “मला कोणाची गरज नाही,” असं म्हणारे लोकही भवती असतात. रागाच्या भरात आपणही असे उद्‌गार काढतो; पण ही दांभिकता असते. त्यातून फक्त अहंकार कुरवाळला जातो आणि आपल्या जगण्याचा पालापोचोळा होतो. तो वादळासोबत उडून जातो. प्रवाहासोबत वाहून जातो. हे टाळण्यासाठी आपल्या मेंदूला विचार कराण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते.
“इलेक्ट्रिक गाड्यांमुळे आता प्रदूषण होणार नाही,” असे नुकताच इंजिनियर झालेला एक तरुण आजोबांना सांगतो. त्याचवेळी आजोबांच्या मनात त्यांच्या इमेजचा कोळसा होता. इथे इंजिनियरच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत होते. मुळातच लेखक वानखेडे ऊर्जा क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांनी ‘इलेक्ट्रिक कार वास्तव काय?’ या शीर्षकाचा लेख 7 नोव्हेंबर 2021 रोजी एका वृत्तपत्रात लिहिला होता. त्यात या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. आपण बऱ्याचदा भ्रमात जगतो आणि त्याला सकारात्मकतेचा मुलामा देऊन वास्तवाकडे दुर्लक्ष करतो, हे या दाव्यातून लक्षात येते.
        प्रसारमाध्यमांच्या समकालीन स्थितीवरही या पुस्तकात बोट ठेवले आहे. एक जण सांगतो, “सांभाळून हां… आजोबा ते पत्रकार आहेत.” त्यावर आजोबा विचारतात, “हो? कुठल्या पक्षाचे?” हा उपरोधिक टोला जिव्हारी लागण्यासारखा असतो; परंतु तो नाकारता कसा येईल? असे विविध संवाद वाचत ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’ हे पुस्तक कधी संपते, ते कळतही नाही. त्यात कधी उपरोधिक, तर कधी तिरकस, तर कधी विनोदी स्वरुपाचे भाष्य आहे; पण त्यामागे एक गंभीर विचारसुद्धा असतो, तो आपल्या अंतरमनापर्यंत चपखलपणे पोहचविण्यात लेखकद्वयी यशस्वी झालेले दिसतात. 
        आपण आयुष्यभर कुठे कुठे सुख शोधत असतो. ते आपल्याच भवताली असते. ते छोट्या छोट्या छोट्या गोंष्टींत सामावेलेले असते. आपल्याला वाऱ्याच्या झुळूकमधील संगीत ऐकता यायला हवे, वृक्ष वेलींच्या पानांच्या सळसळीतली कळ लक्षात यायला हवी, समुद्राची गाज कानांत साठवता यायला हवी, आवडत्या व्यक्तीचा हातात हात घेऊन एकमेकांच्या स्पर्शाची अनुभूती घेता यायला हवी, आदी लहान सहान गोष्टींत आनंद, सुख, समाधान सामावलेले असतं! त्याच्यासाठीच तर ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ वाचायला हवे!
                                                                                                                                            -डॉ. जगदीश मोरे

Sunday, 20 October 2024

व्हॉट्सॲप ग्रुप #Whatsapp_Group

मित्रा,

नको सोडूस मित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप

कुणाशिवाय अडत नाही कुणाचं

असोत नाती मित्रत्वाची वा रक्ताची

नसेलही फायदा मित्रांच्या ग्रुपचा

नुकसान तर नक्कीच नाही ना?

 

संपर्कातून एकमेकांच्या

होईलही मदत एखाद्या मित्राला

निमित्त व्हॉट्सॲप ग्रुपचं

औचित्य ते एक मैत्रीचं

 

वाहून गेलंय बरंच पाणी

कॉलेजनंतर नळातून

नाही ना आठवत आता

मित्रांच्या मुला-मुलींची बारसे

जातोच ना आताशी त्यांच्या लग्नाला!

 

अर्धी लाकडं जातील मसणात

होईलच ना राख अहंकाराची

कशाला फुंकर गुलामगिरीची?

 

वाढली असेल बैठक एव्हाना

प्रत्येकाच्या विचारसणीची

नाही नाकारता येत

झाले असतील बदल विचारांत

झाल्याच असतील दुरुस्त्याही

 

बैठकच नसेल काहींना

नसू शकते ठाम भूमिका

त्यात गैर आहे काय?

उगाच म्हणावं कशाला

बिनबुडाचा कुणाला?

 

नकोच मित्रांच्या ग्रुपवर

विचारसरणीच्या पोस्टी

तसंही ‘फॉरवर्ड’ होण्यात

कसलं आलंय कर्तृत्व?

केली इकडची पोस्ट तिकडे

झालो फॉरवर्ड

 

द्यायलाचं पाहिजे का उत्तर

प्रत्येक विखारी पोस्टला?

नाही पचत ते एखाद्याला

मौनातही असतेच की एक उत्तर

लागू दे कस ग्रुपच्या बुद्धीचा

करू दे त्यांना भाषांतरं

तुझ्या मौनांची

 

नाही का टाळता येत हे सगळं?

नाही का निभावता येत मैत्री?

नाही का जगतायेत माणूस म्हणून?

 

घेऊनी गोड सुंगधी ओझं अंगावर

ओथंबलेला असतो वारा

तिष्ठत असतो उभा दाराशी

नाही का घेता येणार त्याला उराशी?

 

रंगरूप, लिंग, भाषा, जात, धर्म

आपला प्रांत, आपलं पद, आपलं कर्म

येतंय का मैत्रीच्या आड?

उत्तर असेल ‘होय’

तर, सोड ग्रुप आत्ताच तू

 

पण,

मित्रा, अजून विचार करं

थांब जरा,

नाही का ठरणार

आपला व्हॉट्ॲप ग्रुप

आनंदाचं कारण

कॉलेजच्या मैत्रीचं स्मरण

 

तोडूयात ना हे बांध

मैत्रीआडच्या विचारसरणींचे

आहेत ना ग्रुप त्यास्तव अन्य

प्रसंगी खोडूया मुद्दे एकमेंकांचे

सारूया झूल बाजूला अंहकाराची

 

जिवंतपणाची आहेत लक्षणं

मतभेद आणि वादविवाद

राहायलाच हवं का जीवंत प्रत्येकानं

असतं मरायचं एखाद्याला जिवंतपणी

 

विसरलो का आपण?

आपल्या बहिणाईच्या ओळी

'जगन मरन एका सासाचं रे अंतर'

 

राख किंवा माती

हेच प्राक्तन सगळ्यांचं

आहे का तिसरं काही?

असेल काही तिसरं

तर देहदान वगैरे सोडून

कर इथं ज्ञानदान आपलं

 

जाळलं तर राख, पुरलं तर माती

दिसता भेद राखेत आणि मातीत

दृष्टी नाही दृष्टिकोन तपासू

शेवटी मित्रच बरा

मित्रच खरा

                     -डॉ. जगदीश मोरे

Thursday, 3 October 2024

गावगाड्यातल्या गाभाऱ्यातील ‘गाभ’ #गाभ #Gaabh #Marathi_Movie

शेतकऱ्यासाठी शेतीचा तुकडा केवळ ढेकळं असलेली जागा नसते. तो त्याच्या काळजाचा तुकडा असतो. तेच त्याच्या जगण्याचं निमित्त असतं आणि मरणाचंही सबळ कारण असतं. म्हणून आपल्या पोरांना शिकविण्यासाठी शेतकरी धडपडत असतो. पोरगं शिकंल. कुठं तरी नोकरीला चिकटंल, हीच आशा त्याच्या जगण्या-मरण्यातलं अंतर वाढवते. ‘गाभ’मधल्या दादूच्या (कैलास वाघमारे) कुटुंबाचंही हेच तर प्राक्तन असतं.

दादूची आई लहानपणीचं हे जग सोडून गेलेली असते. बाप झाडाला टांगून घेतो. आजी दादूचा सांभाळ करते; पण आजी आणि दादू एकमेकांशी सरळ बोलतच नाहीत. दोघांतल्या ताणतणावाचं भावविश्व उलगडत ‘गाभ’चं कथानक पुढं सरकतं. शेतकरी, शेतमजूर किंवा पशुपालकांचं गावगाड्यातलं जगणं लेखक-दिग्दर्शक Anup Jatratkar अनुप जत्राटकर आपल्या ‘अँगल’नं पडद्यावर उभं करतो. शेती- मातीशी नाळ असलेल्या प्रत्येकाला तो ‘अँगल’ आपला वाटतो. ते सिनेमाशी एकरूप होतात. शहरातल्या प्रेक्षकांनाही गावातलं जगणं, जगण्यातली गरिबी आणि गरिबीतल्या हतबलतेविषयी कणव वाटू लागते.

        वयाची तिशी उलटली तरीही दादूचं लग्न जमत नाही. मुलगी मिळत नाही. ‘टोणगा’ गावभर फिरतो, म्हणत आजी टोमणे हाणते; पण आजीच्या टोमण्यात चिंतेची छटा असते. नातवाचे दोनाचे चार हात होत नाहीत, म्हणून ती अस्वस्थ असते. दादूही चिडचिड करतो. दोघांमध्ये सारखे खटके उडत राहतात; पण दोघांचंही एकमेकांवर निर्विवाद प्रेम. एकमेकांशिवाय दोघांना तिसरं असतंच कोण? हीच तिसरी व्यक्ती येण्याचा प्रवास म्हणजे ‘गाभ’चं कथासूत्र!

लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर उपवर मुलांनी तीन-एक वर्षांपूर्वी मोर्चा काढला होता, ही आठवण सिनेमा बघताना येत राहते. गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि सामाजिक समतोल राखला जावा, अशी मागणी या मोर्चाद्वारे झाली होती. खरे तर शेती कसणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे या विषयावरचं दत्ता पाटील यांचं ‘तो राजहंस एक’ हे नाटक संवेदनशील माणसाचं ह्रदय पिळवटून टाकतं. आपला मुलगा शेती करणारा असला तरी आपल्या मुलीला मात्र शेतकरी नवरा नको, ही शेतकरी बाबाची आगतिकता या नाटकातून प्रतीत होते. मातीशी नातं तोडायचं असतं, असं नाही; पण शेतीत पिकणाऱ्या दारिद्र्यावर जगण्यासाठी पुढच्या आणखी किती पिढ्यांना मातीत ढकलावं, हा बापाच्या मनातला सवाल असतो. दादू आणि दादूचा भवताल तरी त्याला अपवाद कसा राहणार?

दादूला शिकून नोकरी करायची असते. शेतीवावरातून त्याला बाहेर पडायचं असतं. म्हणूनच कॉलेजची फी भरण्यासाठी दादूचा बाप खटाटोप करून कुठून तरी उधार- उसनवारीनं पैसे मिळवतो, पण एसटीच्या प्रवासात ती तुटपुंजी रक्कम चोरीला जाते आणि दादूचं शिक्षण तिथंच संपतं. बाप आत्महत्येचा मार्ग पत्करतो. पोरक्या दादूचा सांभाळ आजी करते. बापानं शोधलेल्या पळवाटीचा राग दादूच्या नसानसात भिनलेला असतो.

आजीच्या आग्रहास्तव दादू म्हैस विकत आणतो. म्हशीला गर्भधारणा होण्याची प्रक्रिया म्हणजे गाभ घालणे. म्हैस माजावर आल्यावर ती गाभण राहावी म्हणून तिला रेडा लावावा लागतो. दूधदुभतं हवं म्हणून म्हैस पाळली जाते. म्हैस दूधही देते आणि पुढची पिढीही जन्माला घालते. रेडा जन्मला तर त्याचा उपयोग शून्य असतो. बाईच्या पोटी मुलगी जन्मली तर ती नकुशी ठरते. प्रसंगी तिच्या नरडीला नखं लावली जातात. म्हैशीच्या पोटी मात्र रेडकू जन्मलं तर ते कसायाला दिलं जातं. या रितीरिवाजात प्रतिष्ठा आणि उपयोगिता शोधणाऱ्या सभ्य समाजासाठी ते नैतिक असतं, यावरच ‘गाभ’ भाष्य करतो.

शेती, माती, पुरुषप्रधान संस्कृती, गावगाड्यातले व्यवसाय, कर्जबाजारीपण अशा अनेक विषयांना ‘गाभ’ स्पर्श करतो. भाष्य करतो; पण या सिनेमाबाबत सोशल मीडियावर केवळ ‘म्हशीला रेडा लावणे’ यावरच चर्वणं होताना दिसत आहेत. त्यामुळे सिनेमा न बघताच भाष्य करणं आणि आपलं ‘परसेप्शन’ ठरवून टाकणं, हे ‘गाभ’च्या व्यावसायिक यशासाठी धोकादायक ठरू शकतं. दिग्दर्शक किंवा कलावंतांनी कुठंही हा सिनेमा अश्लीलतेकडं झुकू दिलेला नाही. अनुपने अतिशय संवेदनशीलपणे सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. खरं तर इथं विषय जनावरांचा आहे. बॉलिवूडच्या सिनेमातली माणसं तर बरीच पुढं गेली आहेत. ‘स्क्रिप्ट’ची गरज म्हणून त्याचं समर्थनही होतं. म्हणून प्रेक्षक हिंदी सिनेमा भरभरून पाहत असतील. मराठी प्रेक्षकांमध्ये तेवढी प्रगल्भता आली नसावी, असं म्हणण्यापेक्षा मराठी प्रेक्षकांची अभिरुची अद्याप तेवढी बिघडलेली नाही, असं म्हणणं अधिक उचित ठरेल.

म्हशीला रेडा लावण्याचा कार्यक्रम हा ग्रामीण भागात तसा नवलाईचा नाही. रेडा पाळणाऱ्यासाठी तो व्यवसाय असतो. म्हैस कुणाच्या तरी जगण्याचं साधन असते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून म्हशीला गाभ घालता येतो. त्यातून दुधाळ जनावरांचं 'फलन' केले जाते. ‘गाभ’ची नायिका फुलवा (सायली बांदकर) म्हशींना कृत्रिम रेतनाच्या सुया टोचायला विरोध करते. बंडखोर फुलवा बापाचा वारसा चालवते. ती म्हशीला रेडा लावण्याचा व्यवसाय पुढे नेते. बाप अभिमानाने म्हणतो, सा शाब्बास पोरी! आपल्या साता जन्मात अन् सत्तर पिढ्यांत हे काम कुण्या बाईनं केलं नव्हतं. पन तू वहिवाट तोडलीस पट्ठे!

पुरुषप्रधान समाजात विशिष्ट व्यवसाय- धंद्यात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असते. पोटापाण्याचा तो व्यवसाय असतो; पण बाईनं केल्यास तो कमी दर्जाचा ठरतो. त्यातही गाभ घालण्याचा व्यवसाय कमीपणाचा असतो. आपल्या म्हशीला गाभ घातलेला चालतो; पण गाभ घालणारे लोक चालत नाहीत. समाजाची वाईट नजर चुकविण्यासाठी फुलवाची आई रेडा कसायाला देण्याचा परस्पर व्यवहार ठरवते. ते ऐकून फुलवाच्या बापाचा संताप अनावर होतो. तेव्हा तो फुलवाला सांगतो, राजाचा (रेडा) अन् तुझा जन्म एकाच दिवशी झाला. तेव्हा माझी आय म्हनली व्हती- एकाला कसायाला विक आन् दुसरीच्या नरडीला नख लाव. पण, मी ठरवलं, राजाला मोठा करणार अन् ह्योच धंदा करनार आन् दुसरीला अशी वाढविनार की सम्द्या लोकांनी तोंडात बोटं घालावीत. कुठलाबी धंदा वंगाळ नसतो पोरी, वंगाळ असते ती मानसाची नजर!

फुलवा आणि तिच्या बापातल्या या संवादातून संपूर्ण थिएटरभर कारुण्याचे तरंग उमटतात. सिनेमातला असाच आणखी एक प्रसंग काळाजवर जखमा करणारा आहे. आक्काचा नवरा गावपुढारी. त्यांच्याकडे चंद्रा नावाची म्हैस असते. आक्का सांगते, चंद्रीला रेडा झाला, तो कसायाला विकून भुसा भरायला दिला. भुसा भरलेल्या चामड्याच्या वासानं ती दूध देईल बी. पन कितीबी झालं तरी आईचंच काळीज तिचं. तिला काय कळंत नसलं, आपलं लेकरू हालत नाय, हंबरत नाय. निस्त्या चामड्याच्या वासानं ती दुसऱ्याच्या लेकरांसाठी दूध देती. एवढंच करायचं होतं, तर त्येलाबी मारुन टाकायचं की- माज्या दोन तान्ह्युल्या पोटातच मारल्या तशा. सम्दं गाव मला वांझोटी म्हनतंय. माझ्या ह्या आटलेल्या दुधाचा वाली कोन?

म्हशीचा नर कसायाला दिला जातो. माणसाच्या मादीसाठी बापचं कसाई होतो. तिकडे मादी चालते इकडे चालत नाही. मुलीचा जन्म, तिचं जगणं, तिचं शिक्षण, तिचं लग्न, सारं काही परस्पर; पण गावखेड्यातली फुलवा त्याला छेद देऊ पाहते. मुलगा- मुलगी भेद कमी होत असतानाच कोवळ्या कळ्या खुडणारे अजूनही आपल्या भोवताली वावरताना दिसतात. एवढंच काय? पापी लोकांच्या पोटीच मुली जन्मतात, असं म्हणणारे काही शिक्षित म्हणविणारे बघितल्यावर त्यांचा आणि शिक्षणाचा किंवा संस्कारांचा काय संबंध? असा प्रश्न पडतो. त्यामुळे फुलवा अधिक आश्वासक वाटू लागते.

शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी शेतकऱ्याच्याही मुली मिळत नाहीत. शेतीत पुरेसं पिकत नाही. नोकरी नाही, रोजगार नाही आणि लग्नही जुळत नाही. तरणीबांड पोरं व्यसनाच्या आहारी जातात. दारू, सिगारेट नित्याचं होतं. ‘शेतकरी’ या शब्दाची अस्मिता राजकीय पटलावर कितीही टोकदार झाली तरी अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याच्या जगण्यात काहीच फरक पडत नाही.

पशुपालकाच्या दारी बांधलेलं जनावर हे केवळ त्याचं पशूधन नसतं. ते त्याच्या पोटच्या गोळ्यागत असतं. हे विविध कलाकृतीतूनही आतापर्यंत मांडलं गेलं आहे. मंगेश हडवळे यांचा 2008 मध्ये आलेला ‘टिंग्या’ हा सिनेमा एका ग्रामीण मुलाची बैलाशी असलेल्या मैत्रीची कहाणी होती. ‘गाभ’मध्येही आजी म्हशीवर जीवापाड प्रेम करते. ‘टिंग्या’च्याच मागेपुढे उमेश कुलकर्णी यांचा ‘वळू’ हा सिनेमा झळकला होता. त्याचं बरंच कौतुक झालं होतं. तो करमणूकप्रधान होता. त्यातलं स्टारकास्ट मोठं होतं; ‘गाभ’ मात्र पूर्णत: सामाजिक पट उलगडून दाखवतो. ग्रामीण वास्तवाकडं लक्ष वेधतो.

म्हशीच्या निमित्तानं दादूच्या भग्नह्रदयी प्रेमवेल फुलू पाहते; परंतु फुलवा इज्जत नसलेला रेडा लावण्याचा धंदा करते म्हणून दादूचा काका दादू आणि फुलवाच्या प्रेमाचा विचका करतो. या दोघांच्या भग्नह्रदयी प्रेमपुष्प फुलते का? कोमजलेली ह्रदयवेल पुन्हा बहरते का? त्यांच्या मुखमंडलांवर हास्य उमटते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘थिएटरा’ला जाऊनच ‘गाभ’ बघायला हवा!

गाभ’ ही कथा आहे एका मानसिकतेची आणि एका तरुणाची. ती आहे संपूर्ण गावगाड्याची. ती आहे जनावरांची आणि माणसातल्या पशूची. लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी ही कथा आपल्यासमोर आणली आहे. अनुपचा हा पहिलाच मोठा सिनेमा. दहा- बारा वर्षांपूर्वी अनुपच्या ‘द प्रॉमिस’ या पहिल्या लघुपटाच्या प्रिमियरला कोल्हापुरात मला उपस्थित राहता आलं होतं. त्याची आठवण पुन्हा ताजी झाली. मध्यंतरापर्यंत ‘गाभ’ पाहताना अनुप लेखक म्हणून आणि मध्यंतरानंतर तो खऱ्या अर्थाने दिग्दर्शक म्हणून मनाच्या ‘बॅकएण्ड’ला दिसू लागतो. मध्यंतरापूर्वी अनुपनं लिहिलेली कथा वाचत असल्याचा भास होतो. माझा मित्र Alok Jatratkar चा लहान भाऊ म्हणून कित्येक वर्षे मी अनुपला पाहतो आहे. कदाचित त्याचा हा परिणाम असावा. सिनेमाचा नायक कैलास वाघमारे या सिनेमाचा संपूर्ण पडदा व्यापतो. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक पाहिलं असेल, तर कैलास नक्की आठवेल. कैलासनं आजवर विविध चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी’मध्येही त्याची भूमिका आहे. ‘गाभ’मधील दादूची करूण कहाणी प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहचविण्यात कैलास यशस्वी ठरतो.

बंडखोर फुलवाची भूमिका सायली बांदकरने फारच छान सजवली आहे. वेगवेगळ्या एकांकिकांतून, नाटकांतून आणि मालिकांमधून ती यापूर्वी दिसली आहे. ग्रामीण जीवनाशी रोजचा संबंध नसतानाही सायलीने फारच उत्तम पद्धतीने ग्रामीण जगणं या भूमिकेसाठी आत्मसात केलं आहे. ‘गाभ’चे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे. सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी आणि आनंद शिंदे यांनी गाणी गायली आहेत. त्यामुळे ‘तुझ्यापायी झालं मन येड रं खुळं’ आणि ‘तुझा मी रेडा, तू माझी म्हस’ ही दोन्ही गाणी कथेला आणखी साज चढवितात. निर्माते मंगेश गोटुरे यांनी धाडसाने या सिनेमाची निर्मिती केली, हेही महत्त्वाचं आहे.

-डॉ. जगदीश मोरे

Friday, 5 May 2023

महाराष्ट्र शाहीर: अमळनेरचा वसा आणि वारसा (Amalner)

अमळनेर येथील मीराबाईंकडे संतसज्जनांचे येणे- जाणे असायचे. गाडगेबाबा एकदा त्यांच्याकडे आले होते. तिथे त्यांनी कृष्णाचे गाणे ऐकले. बाल कृष्णाच्या आवाजाने ते भारावून गेले. त्यांनी कृष्णाचे घर गाठले. बाबांच्या अवचित दर्शनाने कृष्णाची आजी धन्य झाली. साताजन्माची पुण्याई सार्थकी लागली. अश्रुभरलेल्या डोळ्यांनी आजी म्हणाली, बाबा, माझं भाग्य लय थोर म्हणून तुम्ही स्वत: माझ्या दारी आलात. तुम्ही माझ्याजवळ कायबी मागा… जे आसंल ते मी दिवून टाकीन!

बाबा हसत म्हणाले, माहे, माले तुह्यावाला नातू दे.

बाबांच्या मागणीने आजी गांगरली. थरथर कापत म्हणाली, बाबा, माझं काळीज कापून मागितलं असतं तर तुमच्या पायावर वाहिलं असतं. अख्खं घरदार म्हणाला असता तर त्यावर पाणी सोडून तुमच्या संगं गाव- गाव भीक्षा मागाय निघाले असती. अवं, पर ह्ये कसं द्यावं? बोलून चालून सोयऱ्याचं पोर. लेक- जावाय काय म्हणंल? सोयऱ्या धायऱ्यात तोंड दावाय जागा ऱ्हाइल का मले?

बाबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. आजीचा ठाम नकार होता. बाबांचा हेतू चांगला होता. ते चांगली माणसं हेरायचे. कृष्णाही त्यांना भावला होता. कृष्णाने केवळ भजने गाऊन टाळकुटेपणा करण्याऐवजी डफ हातात घेऊन लोकजागृती करावी. सोबत त्याचे शिक्षणही पूर्ण व्हावे, अशी बाबांची धारणा होती; पण बाबा आल्या पावली परत गेले.

कृष्णा खदखदू लागला. साने गुरुजींनाही एकदा आजीमुळे असेच माघारी जावे लागले होते. गुरुजींनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमळनेरकरांसाठी सेनापती बापट या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. कृष्णाच्या देशभक्तीपर कवनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. जेवणे आटोपून प्रेक्षक मंडपात जमू लागले होते. बत्तीच्या प्रकाशाने मंडप उजडून निघाला होता. गुरूजी आतुरतेने कृष्णाची वाट बघत होते. कृष्णाच्या नावाचा वारंवार पुकारा सुरु होता. आजीने कृष्णाला घरातच कोंडले होते. त्याची घालमेल सुरू होती. दरवाज्यावर थाप पडली. दातओठ खात आजीने कडी उघडली. प्रत्यक्षात सानेगुरुजीच दारात!

नापसंती दर्शवित आजी म्हणाली, कायवो गुरूजी?

कृष्णा काय करतोय घरी अजून? कार्यक्रम सुरू व्हायला आला. गुरुजींनी विचारले.

गुरूजी, माफ करा या येडीला. मला न्हाय धाडता यियाचं कृष्णाला तुमच्या संगटी.

अहो माई, कृष्णाचा गाण्याचा कार्यक्रम आहे आता. सगळी तयारी झालीय. दहा मिनिटांत परत धाडतो त्याला घरी.

गुरुजी, एकदा सांगितलं ना. अहो, त्याला साळा शिकायला पाठवलंय आईबापानी माझ्याकडं. तुमच्या संगं गाण बजावणं करून साळंचा इस्कोट करण्यासाठी न्हाई.

जसी तुमची मर्जी माई.

गुरूजी शांतपणे परत गेले. कृष्णा आतल्या आत तडफडत होता. सानेगुरुजींप्रमाणे गाडगे बाबाही परत गेले होते. आपल्यासारख्या सामान्य पोरासाठी थोरामोठ्यांचे अपमान व्हावेत, हे पाहून कृष्णाला वाईट वाटत होते.

आई- वडिलांनी कृष्णाला शिक्षणासाठी अमळनेरला आजीकडे पाठविले होते. अन्‌ शेवटी नको तेच झाले. कृष्णाची सातवीची म्हणजे त्यावेळच्या फायनलची परीक्षा जवळ आली. केंद्र होते जळगाव. जाण्याचा खर्च तीन रूपये होता. आजीला वाटायचे की परीक्षेला बसून याचा काही उपयोग नाही. म्हणून तीने पैसे देण्यास नकार दिला. कृष्णाने आदळआपट केली. काही उपयोग झाला नाही. शेजारपाजाऱ्यांनी वर्गणी करून पैसे द्यायचे कबूल केले; पण कृष्णा स्वाभिमानी. त्याने पैसे घेतले नाहीत. बहाद्दर परीक्षेला गेलाच नाही. शेवटी सातवी नापास हीच त्याची शैक्षणिक पात्रता राहिली; पण जगणे समृद्ध करणाऱ्या चार- पाच वर्षांच्या अनुभवांची शिदोरी उराशी घेत कृष्णाने गुपचूप आपले पसरणी गाव गाठले. कृष्णाचे अमळनेरमधील तीळ- तांदूळ संपले होते.

कृष्णा! कोण होता कृष्णा? ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गौरवगाण कानावर पडले की आठवात ते शाहीर साबळे. तेच ते… तो कृष्णा! स्वातंत्र्य चळवळीबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही योगदान देणारे; तसेच गीतकार, संगीतकार, गायक, वादक कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे!

गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमामुळे शाहीर साबळे यांच्याविषयीच्या माझ्या वैयक्तिक आठवणी ताज्या झाल्या. दै. ‘सकाळ’मध्ये असताना माझी धुळ्याहून साधारणत: सप्टेंबर 2006 मध्ये मुंबईत ‘सकाळ न्यूज नेटवर्क’साठी बदली झाली होती. सकाळ न्यूज नेटवर्क संपादक आणि प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे (ठाणे येथील 84 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष) यांनी मला एका विशेष पुरवणीसाठी शाहीर साबळे यांची मुलाखत घ्यायला सांगितले. शाहिरांच्या परळमधल्या घरी गेलो. आदराने त्यांना सगळे ‘बाबा’ म्हणत. नतमस्तक व्हावे, असे हे उतुंग व्यक्तिमत्व. मी अमळनेरचा म्हटल्यावर त्यांना आनंद झाला. गाडगेबाबा, साने गुरुजी, अमळनेरची जत्रा याबाबत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्यासाठी ती मेजवणी होती!

बाबा अमळनेरच्या आठवणी सांगू लागले. मलाच भारावून गेल्यासारखे झाले. अमळनेरला जाण्यासाठी आई कृष्णाची समजूत काढत होती, लेकरा, आमच्या ह्या वढाताणीत तुझ्या लिव्हण्या- वाचण्याचा खेळखंडोबा नग, तवा तुला मामासंगती धाडायचं यवाजलंय. तवा तू साळा सीक, अमळनेरची तुझी आजी आबाळ न्हाय होऊ दियाची.

कृष्णा देशावरून खानदेशात येऊन पोहचला. तो अमळनेरच्या नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये जाऊ लागला. वाटेवर साने गरुजींचे निवासस्थान होते. ते प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. (प्रताप हायस्कूलचा माजी विद्यार्थी म्हणून माझ्यासारख्याला आजही स्फुरण येते.) त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे लोण खेडोपाडी पोहचले होते. साने गुरुजींच्या पुढाकारातून अमळनेरला मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या सभा व्हायच्या. त्यात देशभक्तीपर गाणी, पोवाडे, कविता सादर केल्या जायच्या. त्यात कृष्णा उत्साहाने सहभागी व्हायचा.

साने गुरुजींच्या सभेत एकदा कृष्णाने ‘रमला कुठे गं कान्हा’ हे गीत म्हटले. ते ऐकून गुरुजींनी त्याच धर्तीवर सारी राष्ट्रे जाती पुढती, मिळवा जगी हो ज्ञाना हे गाण लिहून दिले आणि कृष्णाला गायला सांगितले. या प्रसंगाची आठवण सांगताना शाहीर साबळे म्हणत, अमळनेरला मला पाठविलं होतं शिक्षण घ्यायला. ते काही माझ्या नशिबी नव्हतं; पण ज्ञान मात्र मी मिळवलं या जगाच्या शाळेतून.

गुरुजींच्या त्या उत्स्फूर्त गीताने कृष्णा भारावून गेला होता. त्याने विचारले, मलासुद्धा असं गीत रचता येईल का? गुरूजी हसून म्हणाले, नक्की येईल, प्रयत्न कर. साक्षात सानेगुरुजींचे कृष्णाला आशीर्वाद लाभले. त्याची धडपड सुरू झाली.

अमळनेरला आवळे नावाचे स्टेशनमास्तर होते. ते संगीत साधनाही जोपासत. ते राहायला कृष्णाच्या आजीच्या शेजारीच होते. कृष्णाच्या आवाजाचे ते नेहमी कौतुक करीत आणि आजीचे बोलणे खात. प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांचा एकदा अमळनेरमध्ये मुक्काम होता. आवळे मास्तरांची हिराबाईंशी ओळख होती. त्यांनी कृष्णाला हिराबाईंकडे गाणे गाण्यासाठी नेले. इतक्या मोठ्या गायिकेसमोर कृष्णाने संकोचाने गाणे गायले. बाईंनी कृष्णाचे कौतूक केले. शाबासकी देत म्हणाल्या, मास्तर, गोड गळा लाभलाय पोराला. गाण्याच्या हरकती समजून घेतल्यात त्यानं. खड्या आवाजाची देणगी लाभलीय. येवढ्या लहान वयात ही जाणीव? खरंच वाटत नाही. तेव्हा मास्तर, तुम्हाला सांगते, सहा महिने आमच्याकडं ऱ्हायला तर नाव काढील. विचारा त्याच्या घरच्यांना.

         अमळनेरमध्ये प्रत्येक जाणकाराला कृष्णाचा लळा लागायचा; पण आजी गाणे शिकायला सहा महिने काय सहा मिनिटेही पाठवणार नाही, याची त्याला पुरती जाणीव होती. कृष्णाला बालपणापासूनच गाण्याचा छंद होता. त्याच्या भवताली जन्मापासूनच गाणे होते; पण आई चिंतीत असायची. गायलास तर अमळनेरला आजीकडे पाठविन,’’ अशी धमकी ती द्यायची.

धमकी खरी झाली; पण कृष्णाच्या आयुष्याला अमळनेरमध्ये पैलू पडले. आईचा गाण्याला विरोध होता, असे नाही; पण गळ्याच्या पोषणाच्या नादात पोटापाण्याची आबाळ होऊ नये, याची तिला काळजी वाटायची. ती म्हणायची, गाण्यानं पोट भरत नाही. हाताला काम असंल तर विरुंगुळा म्हणून ओठावर गाणं असावं.  

         कृष्णा अमळनेरहून पसरणीला गेला. कृष्णाला समज येऊ लागली होती; पण गाण्यापासून दूर जात होता. तो आता कृष्णा साबळे म्हणून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आला. मीलमध्ये नोकरी करू लागला. स्वराज्य मीलमध्ये एकदा साने गुरुजी येणार होते. कृष्णाला कळले. तो तिथे गेला. गुरुजींनी बहुदा ओळखले नाही. तो म्हणाला, गुरुजी मी कृष्णा… तुमचा कृष्णा… कृष्णा साबळे… अमळनेरचा कृष्णा!

         गुरूजींना आनंद झाला. कृष्णा गात नाही कळल्यावर गुरुजी म्हणाले, तू जीवंत कसा? गाणं तुझा श्वास आहे. गाण्याची तुझ्या आत्म्याला गरज आहे. तू शाहीर आहेस. तू फक्त गात नाहीस तर जनतेला तू चेतवतोस आणि त्यांच्या भावनांना पेटवतोस.

         गुरुजींच्या शब्दांनी कृष्णाचाच अंतरआत्मा जागृत झाला. सर्व विरोध झुगारून कृष्णाने गाण्याचा निर्धार केला आणि महाराष्ट्रला एक उतुंग शाहीर लाभले… शाहीर कृष्णराव साबळे! सिनेमात हा प्रसंग अधिक भावोत्कटपणे चितारला आहे. सिनेमाच्या मध्यांतरापर्यंत शाहीर साबळे आणि अमळनेरचे संदर्भ मध्येमध्ये येत राहतात. मध्यांतरानंतर शाहिरांची यशाची चढती कमान आणि जगण्यातील चढउतारही उलगडत जातात. त्यांच्या जीवनातील काव्य आणि कारुण्याचे दर्शन होते.   एका अद्‌भूत व्यक्तीच्या जगण्याची अनुभूती घेत मी वैयक्तिकरीत्या अमळनेरकर म्हणून थिएटरमधून बाहेर पडलो होतो.  

अमळनेर हे शहर खानदेशातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि सांस्कृतिक पंढरी आहे. श्रीमंत प्रताप शेठ यांनी इथे कापड मील उभारली. अण्णाभाऊ साठे यांनी अमळनेरच्या मील कामगारांवर पोवाडा रचला, ‘अमळनेरचे अमर हुतात्मे लाल नऊ तारे, रक्तामाजी विझले निखारे ते धगधगणारे’ 1945 मध्ये मोहम्मद हुसेन हाशम प्रेमजी यांच्या ‘वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट लिमिटेड’ने म्हणजे ‘विप्रो’ने पहिला श्वास येथेच घेतला. विप्रोच्या आजच्या महाकाय वटवृक्षाचे बिजारोपण इथेच झाले. भारतभरासाठी महत्वाची ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ (तत्त्वज्ञान मंदिर) इथे उभी राहिली. त्यामुळे देश- विदेशातले आणि साने गुरुजींसारखी माणसे अमळनेरशी जोडली गेली.

प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मूळ गावदेखील अमळनेरमधीलच. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील, काका उत्तमराव पाटील आणि काकू लीलाताई पाटील यांच्याशिवाय इथल्या इतिहासाची पाने ओलांडता येत नाहीत किंबहुना तो पूर्णच होऊ शकत नाही. उत्तमराव पाटील साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी होते. खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे असा विशाल दृष्टिकोन इथेच अंकुरला. साने गुरुजींनीच बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो अशी स्फूर्तीदेखील या मातीत जागविली.

साने गुरूजी प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण देण्यासाठी हस्तलिखित ‘छात्रालय’ आणि छापील ‘विद्यार्थी’ ही दोन नियतकालिके सुरु केली होती. दोन्हीतील लेखण वाचून तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्याने प्रताप हायस्कूल हे राष्ट्रद्रोही मच्छरांची पैदास करण्याचे ठिकाण बनले असल्याचा शेरा मारला होता. राजकारण, समाजकारण व देशप्रेमाने भारवलेल्या या भूमीतूनच वारकरी संप्रदायाचा ध्वज मोठ्या डौलाने आपल्या खांद्यांवर फडकवित संत सखाराम महाराजांनी खान्देशात भावजागरण केले.

अमळनेर मध्ये आता तब्बल 71 वर्षानंतर पुन्हा साहित्याचा गजर होणार आहे. मराठी वाङ्मय मंडळ आयोजक आहे. 1952 मध्ये इथे पहिल्यांदा साहित्य संमेलन भरले होते. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी अध्यक्ष होते. यावेळी कोण अध्यक्ष असेल याची उत्सुकता आहे. सोशल मीडायावर लोकांनी आपले अध्यक्ष जाहीर करून टाकले आहेत. कुणी तरी अभय बंग यांचे नाव सूचविले आहे. साने गुरुजींचा सहवास लाभलेले बाबा आढाव याचंही नाव कुणी तरी घेतलं आहे. जळगाव जिल्ह्यात 1984 (शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली) नंतर प्रथमच साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे मराठी कादंबरीला, साहित्याला नवा आयाम देणारे भालचंद्र नेमाडे यांना अध्यक्ष केले पाहिजे, असेही काहींना वाटते. अध्यक्षाचे नाव जाहीर होईपर्यंत सोशल मीडियावर साहित्यिक गप्पा अशाच सुरू राहतील. अध्यक्ष कोणीही होवो; पण तो साहित्यिक असावा, असा मिस्किल टोलाही एकाने या गप्पांत हाणला आहे. गेल्या रविवारी (ता. 30) नेमाडे सरांच्या घरी गेलो होतो. त्यांना सहज सोशल मीडियावरच्या गप्पांविषयी सांगितले. ते म्हणाले, मुळात मी साहित्य संमेलनाला जात नाही. लिखाणाचं बरंच काम बाकी आहे. लोक ‘हिंदू’च्या दुसऱ्या भागाविषयी विचारणा करत आहेत.

 अमळनेरसारख्या गावात भव्यदिव्य साहित्याचा मेळा फुलणार आहे. अमळनेर निमशहरी किंवा गाव म्हणून लहान असले तरी त्याची ‘लिगसी’ खूप मोठी आहे. त्याची प्रचिती ‘माझा पोवाडा’मधील शाहीर साबळेंच्या विधानातून येते. ते म्हणतात, अमळनेरनं मला भरभरून दिलं. अमळनेरच्या वास्तव्यात माझ्या कलागुणांचा चोहोबाजूंनी विकास झाला. थोरामोठ्यांच्या सहवासाने लोखंडाला ‘परिसा’चा स्पर्श लाभल्यामुळे माझं अवघं जीवन सुवर्णमय झालं!

डॉ. जगदीश मोरे

संदर्भ: 1) शाहीर साबळे यांची मुलाखत, 2005, मुंबई

         2) साबळे शाहीर, माझा पोवाडा, मेजेस्टिक प्रकाशन, मुंबई

         3) https://vishwakosh.marathi.gov.in

         4) महाराष्ट्र शाहीर, केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमा