![]() |
चित्रे: चार्वी जगदीश मोरे |
अक्षय्य तृतीयमुळे खानदेशातील गावं आज माणसांनी फुलून गेली
आहेत. आखाजी नावाच्या या लोकोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत आहे. सर्वत्र लगबग आहे.
किलबिलाट सुरू आहे. मुलांना आखाजीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. कॅलेंडरवर आजची
तारीख लाल रंगात नाही; पण स्थानिक सुट्टी आहे. शेतावर कुणीही नाही. मालक
घरीच आहेत. सालदारालाही सुट्टी आहे. चैत्र संपताना माहेराहून मूळ येण्यासाठी
आसुसलेही सून आखजीमुळे आता माहेरवाशीण झाली आहे. वैशाखाचा प्रारंभ तिच्यासाठी
आल्हाददायक ठरलाय. दिवाई (दिवाळी)- आखाजी तिच्यासाठी जीव की प्राण. ओसरीतल्या
तुळईला झोका बांधलाय. लहानगे झोके घेतायत. प्रत्येक अंगणात निंबाच्या, चिंचेच्या
झाडालाही झोके बांधले आहेत.
आखजीचा आखजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी
हे झोके बहिणाबाईंच्या अस्सल खान्देशी भाषेतील कवितेचे
स्मरण करून देताहेत. झोक्यावरनं माहेरवाशीण आकाशाच्या दिशेनं झेपावतेय. झोक्यावर
बसून गाण्यांतून सासरच्या सुख-दुःखानं भरलेलं मन रितं करण्यास ती उत्सुक आहे.
झोक्याच्या तालावर सूर उमलू लागले आहेत...
हाथानी कैरी तथानी कैरी,
कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना
झुयझुय पानी वाह वं
घराघरांतून धुराचे लोट बाहेर पडतायत. आई- आज्जीच्या
मनगटातील कलाकुसर अतिशय लोभनीय दिसतेय. हाताचे कोपरे आणि मनगटाच्या साह्याने
क्रिकेटच्या मैदनासारखी गोलाकार पुरणपोळी आकार घेतेय. खापरावर खरपूस भाजल्या
जाणाऱ्या पुरणपोळ्यांचा खमंग गल्लीभर दरवळतोय. पुरुष मंडळींच्या मनात सुवासानेच
मांडे फुटतायत. बाप रसासाठी गावठी, शेंद्य्रा आंब्याच्या साली, कोयी
पाण्यातून हातरुमाला सारख्या पिळून काढतोय. रसात पाणीच अधिक होतंय. आमरसात भरपूर
साखर टाकलीय. आंबटपणा कमी झालाय. पाण्यात धुतल्याने बेचव झालेल्या कोयीदेखील
नातवंडं चवीनं चाखतायत. कुरडया-पापडांचा घाना निघालाय.
झोक्यावर हिंदोळे घेणाऱ्या पोरीबाळी भूक तहान विसरल्या
आहेत. पाय जमिनीला टेकवत नाहीयेत. त्या वाऱ्यावर स्वार झाल्या आहेत. बहिणाबाईच्या
ओळी गुणगुणी लागल्या आहेत...
माझा झोका माझा झोका
जिवाची भूक सर जी
भूक सर भूक सरे
वाऱ्यानं पोट भरे जी
बापानं घागर भरण्याची तयारी केली आहे. मूठभर गव्हाच्या
आळ्यावर मातीची घागर मांडलीय. स्वयंपाक झालाय.
“निंब्याले बलावतंस का नाही.
तेले अख्खा दिनभी पुरावं नही पुत्ता कुटाले. नाही ते डवरी रायना हूई गावभर” स्वयंपाक खोलीतून आदेश सुटतो.
“ओ बाख्खर! निंब्या! चालणारे भो.
घागर भरनी से. तुनी माय आराया मार रायनी.” बापानं पत्ते कुटणाऱ्या मुलाला हाळी दिली.
“हाऊ डाव सरना की लगेच येस मी.
तू पुढे व्हय.” निंब्या
काही लगेच उठला नाही.
“ये लवकर” म्हणत बाप
उलटपावली घरी परतला.
घागर भरली. पूजन झालं.
“भाऊ पयले आगारी टाकी दे” आजी बोलली.
नैवद्याच्या ताटावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेली नातवंडे
मागं सरकली. निखाऱ्यांवर पुरण पोळीचा तुकडा, आमरस, रस्सीभात, कुरडया, पापडाचे
तुकडे टाकले. तूप टाकताच घरभर धूर झाला. जळणाऱ्या तुपाच्या दरवळानं पित्रं तृप्त
झाल्याचे भाव उमटले.
माले आते एकटीले
उघडं पाड ना राम
मी आते
परकी होईगू ना राम
मन्ही हू माले
हिडीसफिडीस करी ना राम
माले आते ती
कच्ची खाई जाई ना राम
हां हां हां हां
हे करून स्वर गल्लीच्या कोपऱ्यावरच्या घरातून येऊ लागले.
तिथं ओसरीवर भाऊबंदकी आणि आप्त जमलेयत. डेरगं भरलं जातंय. पाच-सहा महिन्यापूर्वी
घरातला बाप परलोकात निघून घेलाय. त्याच्या मरणानंतरची ही पहिलीच आखाजी. सासू
पाठोपाठ सुनेचं रडणं कानावर येऊ लागलं. तिच्याही रडण्यात उत्स्फूर्तता जाणवतेय. तिच्या
करुण काव्यात उपमा आहेत. प्रतिमा आहेत. रूपके भरली आहेत. डोळे मात्र शुष्क. भावहीन.
तीही आता सासूसारखी करून काव्य कलेत निपुण झालीय. तिनं शोक सागरात विहार करण्याची
कला अवगत करून घेतलीय. आता ती सासूचा वारसा चालवण्यासाठी सज्ज होतेय.

सूर्य डोक्यावर आला आहे. उन्हं तापली आहेत. शहरातून आलेली
दोन-चार नोकरदार मंडळीही विरंगुळा म्हणून पत्ते खेळतायत. ते बेतानंच डाव मांडत
आहेत. हात अखडता आहे. करमणूक म्हणून त्यांचा डाव रंगला आहे. पत्त्यांच्या
निमित्तानं गावातली आबालवृद्ध ठिकठिकाणी जमली आहेत. नोकरी, रोजगाराच्या
निमित्तानं बाहेर असलेले सगळे जण गावी आले आहेत. वर्षे- सहा महिन्यांपूर्वी
झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील कटुता बऱ्याच अंशी ओसरली आहे. एखाद दुसरी चुकार
व्यक्ती राजकारणांचे डाव टाकीत आहेत; पण तिला कुणी भीक घालत नाही.
जेवणं आटोपली आहेत. आयाबाया एकमेकींच्या ओट्यावर जमल्या
आहेत. सासू-सुनांच्या कहाण्या रंगल्या आहेत. सासरहून आलेल्या मुली कौतुकात न्हाऊन
गेल्या आहेत. गावातले ज्येष्ठ तात्या, नाना, दादा, आबा, आप्पांचा
गप्पांचा फड रंगात आला आहे. कुणाच्या घरची आखाजीची घागर जास्त पाझरली, कुणाच्या
घरची कमी पाझरली, कुणाची पाझरलीच नाही. प्रत्येक जण आपापल्या घागरीचा
अनुभव सांगताहेत. घागर जास्त पाझरल्याने यंदा भरपूर पाऊस पडेल. घागर कमी
पाझरल्याने कमी; तर मध्यम पाझरल्याने पाऊसही मध्यमच असेल, असा
सर्वसाधारण समज आहे. जो तो आपल्या परीनं पावसाचा अंदाज बांधतोय. हवामान
शास्त्रज्ञालाही लाजवतील एवढ्या रुबाबात आणि तोऱ्यात सत्तरीतले आजोबा आपला पावसाचा
अंदाज सांगतायत.
पावसाळा जवळ आलाय. बहुतांश जमीन नांगरून तयार आहे. उन्हाने
भाजून निघतेय. सालदार निश्चित केलायं. त्याचा वर्षभराचा मोबदला ठरविला जातोय.
बी-बियाण्यांची चिंता सतावू लागलीय.. ‘दिवाई खावरी आखाजी हावरी!’ या म्हणीची
प्रचिती येतेय. ‘कुणबी आखाजीले येडा होस आनी दिवाईले शहाना होस,’ निसर्गामुळे
या जाणिवेची उणीव कधीच भरून निघताना दिसत नाही. आखाजीला शेतकरी हजार इरादे बाळगतो; पण त्यावर
निसर्ग पाणी फिरवतो. ते दिवाळीच्या वेळीच कळतं. पिकपाण्याची सगळ्यांचे बेत अंतिम
होताहेत.
अल्लड वयातल्या मुली गौराईच्या आगमनानं उल्हासित झाल्या
आहेत. गावातल्या एका घराच्या भल्या मोठ्या ओसरीवर सर्व जणींनी आपापल्या गौराया
आणल्या आहेत. नाचगाणी सुरू आहेत. झिम्मा- फुगड्या खेळतायत. थट्टा, मस्करी, मनोरंजन सुरू
आहे. गौराईच्या गाण्यांनी लोकसाहित्याचा जागर होतोय...
तठे मन्ही गौराई
काय काय इसरनी
तठे मन्ही गौराई
तोडा ईसरनी
तोडासले लई गया चोर
अंगनमा नाचे मोर
गौराईच्या नाचगाण्याचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
पत्ते खेळताना पहाट कशी झाली ते कळलंच नाही. आखाजीचा दुसरा दिवस जरा उशिरानंच
उगवला. आखाजीच्या कालच्या गोडधोडनंतर आज घराघरांत कर साजरा करण्याची तयारी सुरू
झालीय. उस्मान काकाकडून शेर-पावशेर मटण आणलंय. काबाडकष्टानं थकलेल्या शरीराला आणि
मनाला पुन्हा नव्या कष्टासाठी उभारी देण्याकरिता बापानं गुत्त्यावर जाऊन पावशेरभर
टाकलीय. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाट्याला मटणाची एकएक बोटी आलीय. एका
बोटीने आलेला तृप्तीचा ढेकर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवतोय.
मुलींची गौराई विसर्जनाची लगबग सुरू झालीय. हसत, खेळत, गाणी म्हणत
मुलींनी नदीच्या डोहावर जाऊन लाडक्या गौराईला निरोप दिला. नदी पल्याडच्या गावातही
हाच कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही काठांवरील मुलींमध्ये ‘धुमश्चक्री’ सुरू झालीय.
एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली जातेय. परस्परांवर दगडगोट्यांचा मारा होतोय.
दोन गटातले हे युद्ध बराच काळानंतर शमलं. सर्व जणी आपापल्या घरी परतल्यायत.
बघ्यांची गर्दी पांगलीय. आखाजी आता सरलीय!
ता. क. : खान्देशातील हा अक्षय्य तृतीयेचा हा लोकोत्सव आता पार बदलला
आहे. गौराई दिसेनाशी झाली आहे. नाजुकसाजुक ते मुळं झोके दिसत नाहीत. बोली भाषेतील
गाणी कानावर पडत नाहीत. बोलीवरून थेट आता इंग्रजीपर्यंत झेप घेतली आहे.
विरंगुळ्यासाठी पत्त्याचे डाव रंगत नाहीत. जुगाऱ्यांना वर्ष पुरत नाही.
प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन आहे. चैत्र आणि वैशाखात रोज सायंकाळी
रंगणाऱ्या ‘आयपीएल’च्या सामन्यांमुळे उन्हाळ्यात
करमणुकीची सोय झाली आहे. ग्रामपंचायत आणि सोसायाटीच्या निवडणुकांतील कटुता
दिवसेंदिवस वाढत आहे. एकमेकांच्या जिवावर उठले आहेत. नोकरी किंवा रोजगारानिमित्त
बाहेर गेलेली मंडळी ‘बिझी’ असल्यामुळे आखाजीसाठी गावी येत
नाही. त्यांच्या मुलाबाळांना उन्हाचे चटकेही सहन होत नाहीत. गावी गेले तर त्यांना
अहंकार स्वस्थ बसू देत नाही. सोशल मीडियावरील अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छांमुळे
मात्र या लोकोत्सवाला उधाण आलं आहे.
-जगदीश मोरे
Khup chhan saheb...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआखाजीची श्रीमंती आणि आजची तिची आगतिकता छान मांडली आहे. समर्पक चित्रांमुळे ती अधिकच भिडली. अभिनंदन !
Deleteजगदीश मोरे धन्यवाद आखाजी ती आखाजी अक्षय तृतीया ती शहरातील अगदी छान उजाळा दिला धन्यवाद
Deleteशेवटचा ता.क.डोळ्यात पाणी आणतो.
ReplyDeleteकाय लिहिलंस जगदीश तू👍👍
--अष्टपुत्रे
धन्यवाद साहेब
Deleteजगदीश मित्रा जबरदस्त लेखणी चालविली आहेस मस्तच
Deleteलई भारी ना सर ! आख्खा सण डोयापुढे यी उभा राह्यना फ्ल्यशब्यक ना गत. पोरनी चिञा मजाना रेखाटेल शेतस. बाकी ता. क. हाईच वस्तूस्थिती शे हे दुर्दैव.
ReplyDeleteआभारी से तुमना
ReplyDeleteवा व्वा. मस्त. आवडल. नवे शब्द कळाले
ReplyDeleteधन्यवाद
Deleteचार्वीने काढलेले चित्र,वा भारीच.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice description of Akshay Trutiya.
ReplyDeleteछानच
ReplyDeleteJaggu mast re dada ,bhutkal aathvala.......,shabdanvarache tuze prabhtva afat aahe.... Speechless.
ReplyDelete👍Charvis drawings too good
ReplyDeleteगाव आठवलं, आखाजी आठवली.. आपण केलेलं वर्णन वाचताना झालेली ही जाणीव हळवं करून गेली..धन्यवाद..
ReplyDeleteखुपच सुरेख! आता हे वाचण्यापूरतच राहील असलं तरी चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं! जगदीश, सुंदर लिहिलं आहे, आणि हो, चार्वीची चित्र छानच!
ReplyDelete- वर्षा शेडगे
अगदी नजरेसमोर सगळा माहोल उभा राहीला सर. खूप मस्त लिहीलत सर..
ReplyDeleteThanks
Deleteजबरदस्त सर
ReplyDeleteलहानपणी आपण अनुभवलेली आखाजी वास्तवात साकारली.भन्नाट.....!!👌👌👍
Thanks
Deleteजगदीश गावाकडच्या आठवणी छान मांडल्या अश्याच कधीतरीगावाची आठवण म्हणून सर्वजण एकदा एकत्र या आम्ही सर्वmannageकरू
ReplyDeleteThanks
ReplyDeleteHarrah's Lake Tahoe Casino & Hotel - JT Hub
ReplyDeleteThe Tahoe Hotel 김포 출장샵 & Casino is located 의정부 출장마사지 in Stateline, South 상주 출장마사지 Lake 순천 출장샵 Tahoe and provides an exciting nightlife experience in Stateline, 제주 출장안마 NV.
जबरदस्त!
ReplyDelete... राम तायडे (देशमूख), बंगळुरू