Sunday 25 August 2013

शोध शिवाचा जारी... अन् बोधही भारी !


‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक यशवंत नाट्यमंदिरात नुकतेच बघितले. एका संवेदनशील  विषयाला  हात घालणारे ते नाटक आहे. त्याचा हा परिचय नाही. परीक्षण तर मुळीच नाही; पण जे काही उमगले, गवसले ते  सांगण्यासाठीच हा खटाटोप.
-जगदीश मोरे.
-----------------------------------------------
गो. पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ नावाचे नाटक एक- दीड वर्षांपूर्वी रंगभूमीवर येऊन गेलं. या नाटकाद्वारे थोर समाज सुधारक जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार पुन्हा एकदा समोर आणण्याचे प्रयत्न होते. त्यापाठोपाठ आता श्री. राजकुमार तांगडे लिखित ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर जोरात सुरू आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि वस्तुनिष्ठ शिवाजी त्यात प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक पाहताना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाची आठवण झाल्याशिवाय मात्र राहत नाही. कदाचित आता हा विषय आपल्या लक्षात आला असेल.
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या शीर्षकावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नाटक आधारित असेल, याचा अंदाज येतो; पण भीमनगर मोहल्ल्याचा संबंध येतो कुठून? याची उत्सुकता असते. ‘शिवाजी’, ‘भीमनगर’ आणि ‘मोहल्ला’ हे तीन शब्द वेगवेगळ्या घटकांच्या अस्मितांशी नाते सांगतात. ‘अंडरग्राऊंड’ला अनेक अर्थछटा आहेत. स्वातंत्र्य चळवळीत अंडरग्राऊंड हा शब्द आदराने घेतला जात असे; तर ‘गनिमी कावा’ हा महाराजांच्या युद्धनीतीतला एक चाणाक्ष गुण होता. त्याचेही इथे स्मरण होते; पण अंडरग्राऊंड या शब्दाचा इथला अर्थ फार व्यापक आहे.
थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आत्मभान जागृत झालेला भीमनगरमधला बंडखोर शाहीर या नाटकात शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सामोरा आणतो. झीलकरी म्हणून वावरणारा बेरोजगार, पण शिक्षित मुस्लिम तरूण पाशा याचीही त्याला साथ लाभते. ते दोघे जण महाराजांच्या सहिष्णू, सर्वधर्म समभाव आणि समतेच्या नीतीचा परिचय करून देतात. दर्यादिल राजाचा खरा इतिहास समोर आणतात. महाराजांविषयी सोयीच्या कथा सांगणारे बिनापोवाड्याचे अनेक शाहीर होऊन गेले; पण हे नाटक थेट शाहिरीच्याच बाजात महाराजांची महती सांगत भूत आणि वर्तमान काळाची सांगड घालते. राजेशाही आता अस्वीकार्य शासन पद्धती असली तरी महाराज लोककल्याणकारी राजे होते. सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन पुढे जाणारे ते राजे होते. वर्तमानात मात्र लोककल्याणाचीच उपेक्षा होते आहे. जातिभेदांनी उच्छाद मांडला आहे. यावरही हे नाटक भाष्य करते.
शिवाजी राजांना त्यांच्या विचारांसह पृथ्वीवरून जेरबंद करून आणायचे फर्मान इंद्रदेव यमाला (प्रवीणकुमार डाळिंबकर) देतात. यमाला मात्र हे काम आवडत नाही; पण बॉसची आज्ञा! यमराज पृथ्वीवर येतो. शिवाजी राजांना (राजकुमार तांगडे) सोबत घेऊन इंद्राकडे निघतो; पण महाराज इथेही यमाच्या हातावर तुरी देतात. यमराजाच्या हाती फक्त महाराजांचा जिरेटोप उरतो. तीन-साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला तरी यमाला महाराज सापडत नाहीत. या प्रदीर्घ प्रवासात यमराजाला महाराजांच्या नावाने चाललेली दुकानदारी दिसते. महाराजांविषयीच्या खोट्या संदर्भांची पारायणं करून इतिहासाचे पुराण करणारी मंडळी भेटतात. अस्मितेच्या नावाने गोंधळलेल्या राजकारणातली बजबजपुरी दिसते.
शिवाजीच्या नावाचा जप करणाऱ्या पक्षाची आक्का (अश्विनी भालेकर), गणेश शिंदे (दादा) आणि युवा नेते दीपक (राजेंद्र तांगडे) लावणीच्या कार्यक्रमाची सुपारी देतात. ऐनवेळी लावणीची सुपारी रद्द होते. त्याऐवजी ते धर्मा शाहिराला (संभाजी तांगडे) शिवगोंधळाचे निमंत्रण देतात. त्याच्या ग्रुपमधला सोंगाडगिरी करणारा पुरोगामी विचारांचा मिलिंद कांबळे मात्र येण्यास तयार नसतो. त्याला धर्माची खोटी शाहिरी पसंत नसते. तरीही धर्मा आणि आयोजक त्याला राजी करतात. मिलिंदलाही ती संधी वाटते. आपण गेलो नाही, तर खोटा शिवाजीच लोकांसमोर येत राहील, असे त्याला वाटते.
कार्यक्रमादरम्यानच मिलिंद आणि धर्माचं बिनसते. एकमेकांचे विचार पटत नाहीत. दोघे एकमेकांना आव्हान देतात. जाहीर सवाल-जबाबाचे आयोजन होते. मिलिंदच्या पाठिशी पाशा (राजू सावंत) उभा राहतो. पाशालाही मनातली सल बोचत असते. आमदार होण्यापेक्षा समजूतदार नागरिक होणे बरे, अशी टिपणी तो करतो. अफजल खानाचा कोथळा काढणे आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटण्यापेक्षा कितीतरी मोठे कर्तृत्व महाराजांनी बजावले आहे, हेही तो अभिमानाने सांगतो. महाराज आमचेही राजे होते. महाराजांचा आरमार प्रमुख दौलतखान, तोफखाना प्रमुख इब्रहिम खान, वकील काजी हैदर, खास नोकर मदारी म्हेतर यांच्यासह असंख्य मुस्लिम मावळ्यांनीही स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला समर्पित केले होते, याची आठवण तो करून देतो; पण हे बोलण्याची आम्हाला सोय नाही, ही पाशाची खंत चटका देऊन जाते.
ऐतिहासिक भरजरी पोषाख आणि साजशृंगाराने मढवलेल्या भाषेत धर्मा शिवचरित्र सादर करतो. शब्दच्छल करून टाळ्या मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. मिलिंद थेट वस्तुनिष्ठ शिवाजी उभा करताना भेदक भाषेत साद घालतो. कल्पनारंजक इतिहास लिहिणाऱ्यांचे पितळ उघडे पाडतो. चापलुसीवर प्रहार करतो. गडतोरणांवर बोलण्यापेक्षा महाराजांच्या धोरणांवर भर देतो. शेतकरी, कामकरी, स्त्रिया, स्वधर्म आणि इतर धर्माविषयीचे महाराजांचे विचार स्पष्ट करतो. महाराजांची युद्धनीती, मरिन इंजिनिअरिंग, पर्यावरणनीती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिचय करून देतो. धर्मांध लोकांना ते पटत नाही. ते मुद्यांवरून गुद्यांवर येतात. विचारांच्या लढाईत हिंसेचा आधार घेतात. त्यावेळी प्रेक्षकांसमोर वर्तमानही उभा ठाकतो. (ज्येष्ठ विज्ञानवादी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचेही स्मरण होते.)
मिलिंदच्या अख्ख्या कुटुंबाने विवेकवादाची कास धरलेली असते. समंजस, पण बंडखोर विचारांच्या सावित्रीची (मीनाक्षी राठोड) मिलिंदला लाभलेली साथ नाटकाच्या आशयाचे गांभीर्य वाढवते. नाटकाच्या अखेरीस या दाम्पत्याची छकुली वैशाली (वसुंधरा तांगडे) एक प्रश्न विचारते, खऱ्या आणि खोट्या इतिहासाचे पुस्तक कसे ओळखायचे? हा प्रश्न प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो. इतिहास जागेपणी लिहावा आणि वाचावा लागतो. इतिहासाचा खरे-खोटेपणा लिहिणाऱ्याच्या नीतीवर अवलंबून असतो. जे पुस्तक माणसं जोडण्याचे शिक्षण देते, त्याला खऱ्या इतिहासाचे पुस्तक म्हणावे. हे या नाटकातले संस्कारक्षम उत्तर आहे; पण तो परिस्थितीवर शोधलेला तोडगा वाटतो. कारण खऱ्या-खोट्या इतिहासाचा निकाल एवढ्या सहजतेने लावणे शक्य नाही. शेवटी महाराजांच्या शोधार्थ साडेतीनशे वर्षांपासून हिंडणारा यम जिरेटोपाच्या मापाकडे लक्ष वेधत पडदा पडण्यापूर्वी प्रेक्षकांना विनवतो की, सर्व जातिधर्मातील शिवबाच्या मावळ्यांनो, फक्त एवढीच अपेक्षा आहे, की हे माप प्रत्येकाच्या मेंदूशी जुळवून घेऊ या.
रंगमळा संस्थेचे ‘शिवाजी अंडरग्राऊंड…’ हे नाटक पब्लिक ओपिनियन प्रोडक्शनने प्रस्तुत केले आहे. श्री. संभाजी भगत यांची ही भन्नाट संकल्पना आहे. भेदक लोकगीतं आणि संगीतही त्यांचेच आहे. जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन दिग्दर्शक नंदू माधव यांनी हे नाटक बसवले आहे. खेडूत आणि शेतकरी पार्श्वभूमीचे कलावंतही ताकदीनं नाटक पेलू शकतात, फक्त गरज असते ती संधीची. मग आम्हीदेखील संधीचं सोनं करू शकतो, हे या शेतकरी रंगकर्मींनी दाखवून दिले आहे. यमाची भूमिका करणाऱ्या प्रवीणकुमार डाळिंबकरचा अभिनय लक्षवेधी आहे. त्याने साकारलेला यम हसवत-खेळवत अंतर्मुख करतो. यातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावली आहे. शेतीत रमणारी ही मंडळी इथेही खूपच रंगत आणतात.
पारंपरिक नाटकांपेक्षा या नाटकाला वेगळा बाज आहे. ते मुक्त नाट्य आहे. शाहिरी जलसा आहे. त्यात विद्रोह आहे. पोवाडा आहे. सवाल-जबाब आहेत. नर्म विनोद आहेत. सटायर आहे. पथनाट्याच्या शैलीचा भास होतो; पण ते पथनाट्य नाही. नेपथ्यातही अडकलेलं नाही. त्याला पारंपरिक नाट्याचा साज नाही. पण ते विचारांचे महानाट्य आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. भूतकाळातल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देताना वर्तमानातले प्रश्न विचारायला भाग पाडते. मेंदूला झिणझिण्या आणते. डोके जड करते आणि शिवाजी महाराजांचा आदर आणखीच वाढविण्याचे काम करते.
‘शिवाजी अंडरग्राऊंड…’ची थीम पुरोगामी विचार पुढे नेणारी आहे. शिवाजी महाराजांचे खरे कर्तृत्व सांगणारी आहे. हे नाटक कुठल्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. कुणाच्याही देव-देवतांचा अपमान करणारे नाही. कुणाच्या भावना दु:खविण्याचा प्रश्न नाही. अस्मिता पेटविणारेही नाही. आहे ते सत्य सांगणारे आहे. हे सत्य मात्र पचविण्याची ताकद आणि इच्छा पाहिजे. मग हे नाटक आत्मचिंतनाबरोबरच समाज चिंतन करायलाही भाग पाडते. म्हणून ते प्रत्येकाने (लग्न पत्रिकेप्रमाणे) सहकुटुंब, सहपरिवार आणि इष्टमित्र मंडळींसह आवर्जून पाहावे, असे आहे. 

8 comments:

 1. मित्रा, खूप चिंतनशील विचार मांडले आहेस. मुळात ही कलाकृती इतकी उत्तम साकारली आहे की, तिच्याविषयी यापूर्वीही अनेक दिग्गज मंडळींनी लिहिलं आहेच. तुझं लेखन पुनर्प्रत्ययाचा आनंद देतंच, शिवाय काही वेगळ्या पैलूंवरही प्रकाश टाकतं. मुळात शिवराय होतेच तसे मल्टीडायमेन्शनल व्यक्तिमत्त्वाचे! आपण त्यांचे विविध पैलू समजावून घेणे आणि लोकांना ते समजावून घेण्यास प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद मित्रा.

   Delete
  2. सर, खुप छान विवेचन केलयं, पण मला अजूनही या नाटकाला जे ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे शिर्षक दिले ते का म्हणून दिलं हे मला कळालं नाही.plz समजवा मला.

   -नंदलाल कुचे

   Delete
 2. प्रिय जगदीश,
  चांगले लिहलेस. त्यापेक्षाही चांगला विषय मांडला, हे मला महत्वाचे वाटते. मी सोलापुरात हे नाटक बघितले. ते जास्तीत जास्त तरुण, कॉलेजच्या मुलांपुढे जावे असे मला वाटते. दोन प्रयोग आतापर्यंत सोलापुरात झाले. हे नाटक इतिहासातील मोडतोड दाखविते. त्याअर्थाने ते भूतकाळातील भल्याबुऱ्याचा समाचार घेते. वर्तमानातील समाजाकारण, सत्ताकारण यांची दखल घेत त्यातल्या खाचा-खोचा शोधत त्यावर प्रहार करते. त्याचबरोबर भविष्यासाठी मानवतेची पायवाट दाखविते. महापुरूषाचा वापर कालानुरूप आपले सत्ताकारण अबाधित ठेवण्यासाठी कसा होतो, याचे दर्शन या नाटकात होते. पण केवळ तेवढेच नाही, हे नाटक त्यापेक्षाही जास्त काहीतरी मांडते, असे प्रेक्षकांना जाणवते. त्यामुळेच त्याला गर्दी होत आहे. जे रुढार्थाने सगळेच सांगतात, त्यापेक्षाही पुढे जाणारे, सगळ्यांना पटतील, असे राजे लेखकाने मांडले आहेत.
  राजाराम ल. कानतोडे, सोलापूर

  ReplyDelete
 3. जगदीशा,
  हे असे चित्रपट, नाटके याविषयी विस्ताराने लिहिले जाणे आवश्यक आहे.
  ते समीक्षण म्हणून नाही तर प्रशिक्षण म्हणून अपरिहार्य आहे.
  मित्रवर्य राजाराम म्हणताहेत ते खरेच तर आहे.
  कृषीवलच्या या शनिवारच्या कलासक्त पुरवणीत ही कव्हर स्टोरी करतोय.
  - संजय आवटे

  ReplyDelete
 4. प्रिय जगदिश मोरेजी,

  आपला ब्लॉग वाचला. फारच छान लिहिता आपण... खुप समाधान वाटले...

  कलमनामा आपलाच आहे. आपण लिहावे अशी अपेक्षा आह्रे...

  भेटूया आपण

  धन्यवाद


  युवराज मोहिते

  ReplyDelete
 5. जगदीश तुझी शैली खूपच छान आहे. नाटकाचा आशय मस्तच मांडला आहे. प्रत्येकाने वाचावे असे तुझे लेखन - परीक्षण नाही- आणि नाटक आहे. पण पुरोगामी म्हणविनाऱ्याणा देखील पचणारा नाही . समाज फारच संवेदनशील झाला आहे.

  ReplyDelete