‘श्यामची आई’ हा ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले
आहेत. आपल्या ज्ञानामध्ये, सद्भावनांमध्ये वाढ होणार असेल आणि ती गणरायाला दाखवता
येणार असेल, तर दरवर्षी गणपती आणण्याला अर्थ आहे, असं सांगणाऱ्या गुरुजींच्या नजरेतला गणपती कसा होता, त्याचा घेतलेला हा वेध…
‘श्यामची आई’ हा
ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आपल्या
ज्ञानामध्ये, सद्भावनांमध्ये वाढ होणार असेल
आणि ती गणरायाला दाखवता येणार असेल, तर दरवर्षी गणपती आणण्याला अर्थ आहे, असं सांगणाऱ्या गुरुजींच्या नजरेतला गणपती कसा होता, त्याचा घेतलेला हा वेध.
अमळनेरच्या खानदेश
एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये साने गुरुजी 17 जून 1924 रोजी शिक्षक म्हणून रूजू झाले. त्याच वर्षी
शाळेतल्या गणेशोत्सवालाही प्रारंभ झाला. या शाळेचे पुढे प्रताप हायस्कूल असे
नामकरण झाले. साने गुरुजींवर या शाळेच्या छात्रालय (वसतिगृह) प्रमुखाचीही जबाबदारी
सोपवलेली होती. तिथे साने गुरुजी ‘छात्रालय’ नावाचे दैनिक दररोज पहाटे उठून
स्वहस्ताक्षरात लिहून काढायचे. ‘छात्रालया’च्या एका अंकात गुरुजींनी लिहिले होते, “छात्रालयाच्या ग्रंथालयात गणेश चतुर्थीच्या सुमारास बरीच
नवीन पुस्तके मागविली आहेत. ती येणार आहेत. मुलांनी वाचावित इच्छा असेल तर. ‘यंग
इंडिया’ही आठ दिवसांनी येऊ लागेल. मी स्वत: ‘क्रॉनिकल’ घेणार आहे. तोही छात्रालयात
ठेवित जाईन. वाचीत जा म्हणजे झाले.”
निरोगी आरोग्य व सतेज
बुद्धीबाबत गुरुजींनी एका अंकात नमूद केले आहे, “पुढील वर्षी आपण देवास या. सिद्धीविनायक विश्वेश्वरास
पुन्हा आणू; परंतु या वर्षापेक्षा पुढील
वर्षी आपल्या मनाची वाढ, हृदयातील सद्भावनांची
वाढ,
बुद्धीची वाढ व शारीरिक बलाची वाढ आपणास त्यास दाखविता आली
पाहिजे. पुढील वर्षी गणपती येईल, त्यावेळी
प्रत्येक काम, नवीन ज्ञान देवापुढे मांडावे.
म्हणजे त्यास आनंद होईल.”
मुलांच्या प्रगतीच्या
अनुषंगाने गुरुजी लिहितात, “गणपती बाप्पा दरवर्षी आपली सुधाराणा पाहण्यास येतो. त्याला मुलांची सर्वांगीण
सुधारणा दिसली, तनमन सुसंस्कृत दिसले तर तो
आनंदाने चार दिवस राहील. नाही तर त्यास आपल्याबद्दल दया, प्रेम वाटणार नाही.”
साने गुरुजींनी प्रताप
हायस्कूलमधील नोकरीचा 1930 मध्ये
राजीनामा दिला होता. नंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांच्याजवळ
आजोबांकडची गणपतीची लहान सुंदर पितळी मूर्ती होती. ती मूर्ती ते नेहमी खिशात ठेवत
असत. एका मित्राने ती मूर्ती त्यांच्याकडून मागितली. गुरुजींना क्षणभर मोह पडला; परंतु त्यांनी ती मूर्ती त्याला देऊन टाकली. कारण विरक्त
वृत्ती हीच त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती.
साने गुरुजींनी ‘साधना’
साप्ताहिकातून आपली पुतणी सुधास (सुधा साने-बोडा) उद्देशून पत्रं लिहिली होती. ती
पत्रं सुधास उद्देशून असली तरी सर्वच वाचकांमध्ये, विशेषत: मुलांमध्ये जिज्ञासा उत्पन्न करणारी होती. सप्टेंबर 1949 च्या अंकातील पत्रामध्ये त्यांनी नमूद केले होते, “गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय केला. या दहा
दिवसांत एकत्र यावे, ज्ञानाची
उपासना व्हावी, राष्ट्रीय वृत्ती वाढावी, असा त्यांचा हेतू. आज राष्ट्र स्वतंत्र आहे. आपण आपल्या
उत्सवाला सर्वांना बोलवावे. कुरुंदवाड गणेशोत्सवात मुसलमान बंधूही पूर्वी येत. ती
सुंदर प्रथा आज आहे की नाही, मला माहीत
नाही.”
साने गुरुजींना लहानपणी
सगळेजण ‘पंढरी’ म्हणून हाक मारत असत. त्यांनी एका पत्रात आपल्या बालपणीच्या
गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला होता. ते लिहितात, “गौरी-गणपतीचे दिवस येणार म्हणून तयारी सुरू होती. गावात
अनेकांकडे गणपतीच्या मूर्ती तयार होत होत्या. तो मुक्या पटवर्धन- तो किती सुंदर
गणपती बनवतो! लहानपणी आम्ही मुले गावाबाहेर किल्ल्याकडे एका पऱ्ह्याच्या काठी जात
असू. तेथे चिकण माती असे. एकदा काठाची माती काढताना मी प्रवाहात पडलो, वाहूनच जायचा! आम्ही मुलांनी त्या मातीचा गणपती केला, उत्सव केला. मारकुटे हेडमास्तरांची बदली व्हावी म्हणून. तो
आमचा नवसाचा गणपती होता.”
साने गुरुजींनी सुधाला
लिहिलेल्या एका पत्रात नमूद केले होते, “तू मागे लिहिलेस की, समितीच्या काही बायका गांधीजींबद्दल वाटेल ते बोलतात. ‘एवढा काय गांधीजींबद्दल
पुळका येतो तुम्हाला?’ असे एक बाई
म्हणाल्या. ते ऐकून तुला वाईट वाटले, तू उठून गेलीस वगैरे. चांगले केलेस. त्यांना पाप करू दे. तू दूर राहा. तुझ्या
मैत्रिणी,
तुम्ही तुमचा मानवता संघ काढा. गणपतीचा उत्सव सर्वत्र सुरू
आहे. नाना प्रकारचे, नाना आकारांचे
गणपती- नेहरूरूपधारी, गांधीरूपधारी
असे नमुने. गणपती शेत नांगरीत आहे, असेही देखावे आहेत म्हणे. त्या-त्या वेळच्या गरजांना अनुरूप असा आपला देव
बनतो.”
“गणपतीचे
मस्तक मोठे आहे. पोट मोठे आहे. सर्वांचे अपराध तो पोटात घालील आणि थोर विचार
डोक्यात खेळवील. गणपतीचे स्वरूप म्हणजे महान नेत्याचे स्वरूप. गांधीजी सर्वांचे
अपराध पोटात घालीत. डोक्यात महान विचार खेळवीत. केवळ चिरफाड करणारे ते नव्हते, तर समन्वय करणारे होते. सारे जग हिंसेकडे जात असता ‘जगाला
जर खरी शांती हवी असेल, तर या विशेष
मार्गाने जा’ असे ते सांगणारे होते. ते साधे नव्हते, तर विनायक म्हणजे विशेष रीतीने नेतृत्व करणारे होते.” अशा भावनेतून गुरुजी मुलांना
गांधीदर्शन घडवत असत.
मुंबई आणि कोकणातल्या
गणेशोत्सवाचे वर्णन सांगताना साने गुरुजी लिहितात, “गौरी-गणपतीचे दिवस कुणबी मंडळींत फार आनंदाचे. मुली माहेरी
येतात. नवी लुगडी, नवे कपडे आणि
त्यांचे ते नाच. मुंबईचे रामा लोक नाचाची तालीम घेतात. तो नाच फार आवडतो. पायांत
घुंगरू,
हातांत निरनिराळ्या रंगांचे रूमाल. एकदम बसतात, उठतात. गिरकी घेतात. रूमाल नाचवतात. वाद्ये वाजत असतात.
आनंद असतो. शेतीची कामे संपलेली असल्यामुळे हे पंधरा दिवस ते मजेत दवडतात; परंतु पाऊस नीट पडलेला असला, तर हा आनंद... नाही तर चिंताच असते.”
मुळातच आपले सण-उत्सव कृषक
संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. त्याबाबत साने गुरुजी सुधाला सांगताना लिहितात, “घरी आणलेल्या गणपतीभोवती आरास केलेली आहे लोकांनी. वरती ती
भाळी. भाळीला कवंडळे, कांगण्या; तसेच दोडके, सहस्रफळ वगैरे भाजी-फळे. कांगण्यासुद्धा दिसतात छान. जणू बारीक सुपाऱ्यांचे
पेन्द्रे! मला गणपतीच्या डोक्यावर पावसाळ्यातील फळे टांगायची कल्पना फार आवडते. जे
आपण पावसाळ्यात निर्मिले, त्याचीच सजावट
उपयुक्त. तेच सुंदर!”
गणपतीला निरोप
दिल्यानंतरच्या भावपूर्ण वातावरणाचे वर्णन करता साने गुरुजी लिहितात, “गणपतीला बुडवायला नेतो, तेव्हा जरा वाईट वाटते. जणू घरातलेच कोणी जात आहे, असे वाटते. आम्ही गणपती घेऊन वाजत-गाजत कोंढीवर गेलो. चौरंग
डोक्यावर घेऊन तरुण पाण्यात शिरले. ‘गणपती बाप्पा मोरया’ जयघोष होत होता. पाणी
गळ्याएवढे झाले. गेले...आणखी पुढे गेले... बुडवले गणपती... मूर्ती तळाशी गेल्या...”
मुंबईत 1940 मध्ये ब्राह्मण सभेच्या गणपतीच्या उत्सवात त्यांना
व्याख्यानासाठी बोलावले होते. तेथे त्यांच्या व्याख्यानात विघ्न आणण्यासाठी पुष्कळ
लोक आले होते. एकदा साने गुरुजींनी कुठे तरी लिहिले होते, “नाशिकच्या रामाच्या रथाला हरिजनाचे हात लावू देत नसाल, तर ती...”
व्याख्यानात विघ्न
आणणाऱ्यांनी हस्तपत्रके वाटली होती. त्यात लिहिले होते, “ते शब्द मागे घ्या न् मग बोला.”
हस्तपत्रक हातात घेऊनच साने
गुरुजी बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले, “मी लहानपणी गणपतीचं जे अथर्वशीर्ष शिकलो, त्यात ‘सर्वे जगदिदं त्वत्तो जायते’- ‘हे सारं जग
तुझ्यापासून जन्मलं’, असं म्हटलं
आहे. आम्ही ब्राह्मणच त्याच्यापासून जन्मलो, असं नाही. आपण सारी प्रभूची लेकरं. त्याच्याजवळ सर्वांना जाता येत नसेल, तर तो देव कसा?”
साने गुरुजी दोन तास बोलले. ती सभा शांतपणे पार पडली.
विरोधक शांत राहिले. लहानपणी साने गुरुजी गणपतीच्या देवळात जायचे, उपवास करायचे, खूप फुले आणून पूजा करायचे. कालांतराने ते तसे काही करीत नसत. एखादे वेळेस
देवाची आठवण आली की ते जेथे असत तिथे क्षणभर डोळे मिटून डोके टेकवत असत. तेवढ्याने
त्यांना समाधान वाटे.
लहानपणी श्याम शाळेतल्या
मुलांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या
गोष्टी सांगत असे. चातुर्मासात पालगड येथील श्यामच्या घराजवळील गणपतीच्या देवळात
रोज पुराण होत असे. श्यामच्या घरी मुले जमली. घरातील रिकामे डब्बे घेतले. मुले
डब्बे बडवत भजने म्हणू लागली, मुलांच्या
कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. पुराण ऐकायला आलेले म्हणू लागले, “काय शिंची कार्टी!”
“हा सगळा
त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का?” असे कोणी तरी म्हणाले.
श्यामची आईदेखील मंदिरातच
होती. हा संवाद ऐकून ती घरी आली, “श्याम!”
आईच्या आवाजातला क्रोध लक्षात येताच श्याम चपापला.
भजन थांबले. डब्ब्यांचा मृदुंग मुका झाला. श्यामने विचारले, “काय झाले आई?”
“तुला
लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला,” आईने रागातच विचारले.
“आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत,” श्याम म्हणाला.
श्यामचे म्हणणे आईने ऐकून
घेतले. मग तिने श्यामला समजावून सांगितले. श्यामला ते पटले. आई म्हणाली होती, “हळूहळू टाळ्या वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हाला
देवाच्या नावापेक्षा आरडाओरड व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच
दुसऱ्याला त्रास होतो, ती कसली रे
पूजा?
माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये.”
श्यामला हे उमगले. म्हणूनच मोठेपणी श्यामचे गणेशप्रेम
विरक्तीकडे, मूल्यांकडे झुकले.
-डॉ. जगदीश मोरे
No comments:
Post a Comment