
‘ओके’, ‘सॉरी’ आणि ‘थँक्यू’ हे तीन शब्दांत जादू आहे. ते माणसे जोडण्याचा कानमंत्र देतात. मानवी मूल्यांशी नाते सांगतात. त्यांना नम्रतेचा गंध आहे. सौजन्याचा साज आहे. ते अंतर्मनातील वेदनेवर हळूच फुंकर घालतात. काळजातल्या वेदनेची दाहकता कमी करतात. अचूक वेळी अंत:करणापासून प्रकट होणाऱ्या या शब्दांतून सद्भाव प्रदर्शित होतो. सहमती, क्षमा आणि कृतज्ञतेचे भाव त्यात सामावलेले आहेत…
औष्णिक ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन क्षेत्रात प्रख्यात असलेले प्रफुल्ल वानखेडे यांची लिखाणातही मुशाफिरी सुरू असते. ‘केल्व्हिन’ व ‘लिक्विगॅस’सह पाच कंपन्यांचे ते संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत. शिवाय ‘लेट्स रीड इंडिया’ वाचक चळवळ त्यांनी आरंभली आहे. त्यांनी राज्यभरात वाचन संस्कृती रुजविण्याकरिता पुढाकार घेतला आहे. आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठीदेखील ते प्रयत्नशील असतात. जगण्याचा एकमेव आधार पैसा नसला तरी विविध आधारांपैकी तो एक महत्वाचा आधार आहे. तो स्वत:च निर्माण केला पाहिजे. अट फक्त एकच आहे, प्रामाणिक मार्गाने पुढे त्यांचे जतन, संवर्धन करता आले पाहिजे. त्याचा परीघ विस्तारता यायला हवा. त्यासाठीची कौशल्य आत्मसात करता आली पाहिजेत. तरुणांमध्ये हीच स्वप्ने पेरणाचे काम श्री वानखेडे गेली अनेक वर्षे व्याख्यानांतून, स्तंभ लेखनातून आणि पुस्तकांद्वारे करीत आहेत. त्यातूनच साकार झालेल्या त्यांच्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाच्या हजारो प्रती खपल्या; परंतु मी तुम्हाला आज पैशापाण्याची गौष्ट सांगत नाहीय. ही गोष्ट आहे त्यांच्या ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या नव्या कोऱ्या पुस्तकाची.
‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत व्यंगचित्रकार आलोक. राजकीय आणि सामाजिक विषयावरील तिरकत आणि उपाहासात्मक शैलीमुळे आलोक यांच्या व्यंगचित्रांचा भावार्थ मनोरंजनातून प्रबोधनाडे जाणारा असतो. त्यांच्या कुंचल्याच्या फटकऱ्यांतून आविष्कृत होणारे आशयगर्भित भाष्य मोठे मार्मिक असते. आलोक सध्या ‘सकाळ’ माध्यम समूहात राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची यापूर्वीही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
श्री. वानखडे आणि श्री. आलोक या जोडगोळीचे ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ हे मराठीतील वेगळ्या धाडणीचे पुस्तक आहे. तसा तो छान प्रयोग आहे. शब्दांशिवायदेखील वाचकांशी संवाद साधण्याची क्षमता आलोक यांच्या चित्रांत असते; परंतु इथे वानखेडे यांच्या शब्दांच्या माध्यमातून आलोक यांची चित्रे वाचकाशी वार्तालाप करतात. आलोक यांच्या रेषा बोलू लागतात. त्याचवेळी आलोक यांच्या कुंचल्याने वानखडे यांच्या शब्दांना आशयगर्भित सौंदर्य प्राप्त होते. हीच वानखेडे व आलोक यांची शब्दचित्रे व्यक्तिगततेबरोबरच सामूहिक आत्मपरीक्षणाचा संदेश देऊ जातात.
‘ओके… सॉरी… थँक्यू!’ तीन शब्दांत जादू आहे. ते माणसे जोडण्याचा कानमंत्र देतात. मानवी मूल्यांशी नाते सांगतात. अंतर्मनातील वेदनेवर हळूच फुंकर घालतात. वेदनेची दाहकता कमी करतात. या शब्दांना नम्रतेचा गंध आहे. सौजन्याचा साज आहे. अचूक वेळी अंत:करणापासून प्रकट झालेल्या शब्दांतून सद्भाव प्रदर्शित होतो. हे तीन शब्द भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. सहमती, क्षमा आणि कृतज्ञतेचे भाव त्यात आहेत. ‘ओके’ या सहज साध्या, सोप्या शब्दांतून व्यापक सहमती घडून येऊ शकते. सहमतीतून सहकार्य आणि सकारात्मकतेकडे वाटचाल होते. ‘सॉरी’ शब्दातही मोठी ताकद आहे. क्षमा मागण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी माणूस दर्यादिल असावा लागतो. क्षमाशीलता दुर्बलतेचे लक्षण नसते. तो संस्काराचा भाग असतो. ‘थँक्यू’ शब्दातल्या कृतज्ञतून सामंजस्याचे भाव वृदिंगत होतात.
‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या पुस्तकाला अनुक्रमणिका नाही आणि त्यातल्या पृष्ठांनाही अनुक्रमांक नाही; पण पानोपानी एक स्वतंत्र संदेश आहे. विचार आहे आणि त्याचा धागा आधीच्या पृष्ठावरील विचारांशी जोडलेला आहे. तरीही प्रत्येक पृष्ठाला स्वतंत्र आशय आहे. कुठेलेही पृष्ठ यादृच्छिकपणे उघडून वाचायला सुरुवात केली तरी हे पुस्तक तिथून सूरू झाल्याचा भास होतो आणि पुढच्या पृष्ठावरील मजकूर नाही वाचाला तर हे पुस्तक तिथेच संपले असावे, असेही वाटू लागते. प्रत्येक पृष्ठाची हीच तर गंमत आणि ताकद आहे. सगळे पृष्ठ मिळून एक भक्कम विचार मनात रुंजी घालू लागतो आणि हे पुस्तक एक चांगला संदेश देऊन जाते.
मार्शल मॅक्लुहानचे ‘माध्यम हाच संदेश’ हे प्रसिद्ध विधान संप्रेषणाच्या (communication) अभ्यासात खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे पुस्तक हाच एक संदेश असतो. त्याच धर्तीवर ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ या शीर्षकातच एक प्रभावी संदेश आहे. आतल्या प्रत्येक पृष्ठावर, पृष्ठावरील प्रत्येक चित्रांत किंवा संवादात एक संदेश दडला आहे. प्रत्येक संदेशात एक स्वतंत्र विचार आहे. मॅक्लुहानच्या मते माध्यम म्हणजे केवळ माहिती पोहोचविण्याचे साधन नाही, तर ते स्वतःच एक शक्ती आहे. त्या शक्तीची जाणीव या पुस्तकातून होते.
‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’ या शब्दांचा वापर आपण अगणिक वेळा करत असतो. त्याचे आपण मोजमापही करू शकत नाही; पण हे शब्द किती अंतर्मनातून येतात, वेळ किती अजूक आहे (टायमिंग) आणि तुमची देहबोली काय असते? त्यावर त्यांचा प्रभाव आणि निर्मळता अवलंबून असते. प्रत्येकला हे शब्द वापरण्याचे किंवा न वापरण्याचेही स्वातंत्र्य असते. त्यातून व्यक्तिमत्व प्रतीत होते. ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ हे पुस्तक विचारांच्या स्वातंत्र्यालाच अर्पण केले आहे. त्यांची अर्पण पत्रिकाही कलात्मक आहे. प्रत्येकाला स्वत:ची ‘इकोसिस्टिम’ योग्य वाटते, तेच त्यांच्या विचाराचे स्वातंत्र्य असते आणि हाच संदेश हे पुस्तक देत असते.
अर्पण पत्रिकेतल्या गर्भित आशयानेच पुस्तकाची सुरुवात होते. अर्पणपत्रिकेच्या पृष्ठावर चार बाजूंना चार रेखाटणे दिसतात. त्यात कोळ्याचे जाळे, मधमाशांचे पोळ, माकड आणि मोबाईलमध्ये मग्न माणसाचे चित्र आहे. कोळ्याचे जाळे आणि मधमाशांच्या पोळ्यात सौंदर्य आहे. जाळे किंवा पोळ कुठेही दिसले की आपले लक्ष वेधून घेतात. कोळ्याचे जाळे मात्र दुसऱ्या जीवाच्या शिकारीसाठी विणलेले असते. त्याला ‘जाळ्या’ऐवजी ‘सापळा’ म्हटले की अचूक भाव व्यक्त होतो. कोळ्याचे हे जाळे ‘डिस्ट्रक्टिव्ह’ असते. मध्यमाशांचे पोळ ‘कन्स्ट्रक्टिव्ह’ असेत. त्याद्वारे मधमाशा मनस्वी आनंद घेत एकतेचा संदेश आणि भान देतात. एकसारखे षटकोन, त्यातल्या एखाद्या षटकोनाची बाजू खराब झाली तरी इतर त्याला सावरतात.
माकड हे माणसाच्या उत्क्रांतीचा पाया आहे आणि प्रतीक आहे. मोबाईलमध्ये मग्न असलेल्या चित्रातील माणसाला तुम्ही तरुणही म्हणू शकता. अर्थात, ते तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. माकडापासून सुरू झालेला प्रवास माणसापर्यंत आला आहे; पण माकडापासून मानवापर्यंतची ‘इवोल्यूशन’ आता मोबाईल फोनमध्ये अडकून पडली आहे. हातात मोबाईल घेऊन बसणारा माणूस आता माकडासारखा वाटायला लागलाय का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. मोबाईलमधून होणारा माहितीचा मारा किंवा भराभर रील्स पाहताना मेंदूपर्यंत काय व किती पोहचत असेल आणि त्यातल्या किती माहितीचे पचन होत असेल? हा खरोखर गंभीर विषय आहे, तेच तर ही चित्रे सूचवू पाहत नाहीत ना?
माणसाचा मेंदू ‘युनिक’ आहे. मेंदूने विचार करायचा असतो. मोबाईल किंवा इंटरनेट हे ‘एक्सटेंडेड मेमरी’ म्हणून वापरायच्या असतात हे बहुतांश जण विसरत चालले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) कितीही विकास झाला तरी तिच्या जन्मदात्या मानवाला लाभलेली ‘क्रिएटिव्हीटी’ ही शाश्वत आहे. तेच तर माणसाला मिळालेले ते सर्वात मोठे वरदान आहे. एआय आपला ‘मास्टर’ न होता ‘असिस्टंट’ झाला पाहिजे, यासारख्या गोष्टींचे भान कदाचित हे पुस्तके देऊ पाहते.
कलात्मक अर्पण पत्रिकेच्या अशायाची फोड करताना लेखकद्वयी नमूद करतात, “माणसानं स्वतः विचार करावा. तोच बेसिक फरक माणूस आणि इतर प्राण्यांत आहे! तोच आपला सर्वांच्या प्रगतीचा मूळ आधार आहे. तो आपण जपायला, वाढवायला हवा! आपल्या रोजच्या जगण्यात आर्थिक स्वातंत्र्य, मानसिक शांतता, कौटुंबिक सुख, सामाजिक बांधिलकी हवीच... पण हे सर्व कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपला विवेक जागृत हवा. तो विवेक जागृत असणाऱ्या व विचार स्वातंत्र्य मान्य करणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक अर्पण!”
अर्पणपत्रिकेपासून सुरू होणारा विचारांचा हा प्रवास मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाच्या चित्राच्या पार्श्वभूमीवरील दोन व्यक्तींतल्या संवादापासून एखाद्या गोष्टीसारखा सुरू होतो. तिथेच मराठी आस्मितेचा संदेश आणि विचार मनात डोकावतो. 105 हुतात्म्यांचे स्मरण होते. मुंबईत दुकानाच्या मराठी पाट्यांचा प्रश्न अधून मधून ऐरणीवर येत असतो; पण दुकानदार कोण? हा प्रश्न मात्र मेंदूत फारसा शिरत नाही, अशा विविध प्रश्नांवर या पुस्तकात मार्मिक भाष्य आहे. पुस्तकातील वेगवेगळी पात्र विविध विषयांवर सहज, सुलभ संवादाद्वारे भाष्य करतात. त्यातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, करियरविषयक, वाचन संस्कृती, व्यसन, टाईम मॅनेजमेंट, गरिबी, पैसा, गुंतवणूक अशा विविध विषयांना मोजक्या शब्दांत स्पर्श करण्यात आला आहे. मोजक्या शब्दांत मोठा आशय दडला आहे. आशयात विचार आहे. संदेश आहे.
शून्य मिनिटात येतो म्हणारी व्यक्ती तासाभरानेही येत नाही, त्यावेळी ‘टाईम मॅनेजमेंट’चे बारा वाजलेले असतात. आपल्या लायकीपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा जास्त काहीच मिळत नाही तरीही सोशल मीडियावरच्या ‘घरबसल्या करोडपती’ सारख्या व्हिडोओंना आपण भुलतो; परंतु लायकी किंवा क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. मोबाईलमुळे आपण वाचनापासून दूर जात आहोत. एखादी व्यक्ती पुस्तक वाचत असल्यास तिचा मोबाईल बंद पडला असावा, एवढाच अंदाज व्यक्त करण्यापर्यंत आपली क्षमता राहिली आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये पूर्वी बहुतांश जण वृत्तपत्र किंवा पुस्तक वाचताना दिसायचे. कुणी भंजनात दंग व्हायचेत. काही लोक पत्तेही कुटायचेत. आता मात्र बहुतांश जण मोबाईलमध्ये मग्न असतात. रिल बघता बघता स्वत:शीच हासतात. अर्थात, ते हसतायेत की रडतायेत ते पाहायला इतर चाकरमान्यांना वेळ नसतो. कारण तेही मोबाईमध्ये ‘बिझी’ असतात. आपला दीड जीबी डेटा भला आणि आपण भले! या दीडजीबी डेट्याने लोकल ट्रेनमधले भांडण, तंटे कमी केले आहेत. बहुतांश बिचारे गरीब मुंबईकर रील्स किंवा पायरेटेड सिनेमे अथवा वेब सिरीज बघत आपले डेस्टिनेशन गाठतात!
‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’मधील “प्रत्यक्ष कृतीपेक्षा कधी कधी कन्फ्युजनमुळेही दमायला होतं.” हे विधान बरेच काही संगून जाते. प्रत्यक्ष कामापेक्षा किंवा कृतीपेक्षा काही लोक नियोजनावरच जास्त भर देतात आणि ऐन कृतीच्या वेळी मात्र त्यांचा शक्तीपात झालेला असतो. “श्रीमंत दिसण्याच्या नादात अनेक जण गरीबच राहतात,” अशा विधानांच्या माध्यमातून आर्थिक सजगतेवर आणि गुंतवणुकीवरही या पुस्तकात भाष्य केले आहे; परंतु पैसा ही एकमेव गुंतवणूक नाही. ‘यशस्वी’, ‘आनंदी’ आणि ‘समाधीनी’ जीवनासाठी इतरही बाबींतही गुंतवणूक करावी लागते. आपल्या कमाईला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी ‘इमोशनल कोशंट’ आणि ‘फायनान्शिल कोशंट’ यांचा मेळ घालता यायला हवा, याची जाणीव पुस्तक वाचताना होते.
“दुसऱ्याला केलेली मदत लगेच विसरता आली की आपण माणूस म्हणून घडत जातो,” सुभाषितांसारखा हा संवाद पटकन आपले लक्ष वेधतो. नाही तर छटाकभर मदतीचाही आपण गावभर डंका पिटतो. “मला कोणाची गरज नाही,” असं म्हणारे लोकही भवती असतात. रागाच्या भरात आपणही असे उद्गार काढतो; पण ही दांभिकता असते. त्यातून फक्त अहंकार कुरवाळला जातो आणि आपल्या जगण्याचा पालापोचोळा होतो. तो वादळासोबत उडून जातो. प्रवाहासोबत वाहून जातो. हे टाळण्यासाठी आपल्या मेंदूला विचार कराण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते.
“इलेक्ट्रिक गाड्यांमुळे आता प्रदूषण होणार नाही,” असे नुकताच इंजिनियर झालेला एक तरुण आजोबांना सांगतो. त्याचवेळी आजोबांच्या मनात त्यांच्या इमेजचा कोळसा होता. इथे इंजिनियरच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत होते. मुळातच लेखक वानखेडे ऊर्जा क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांनी ‘इलेक्ट्रिक कार वास्तव काय?’ या शीर्षकाचा लेख 7 नोव्हेंबर 2021 रोजी एका वृत्तपत्रात लिहिला होता. त्यात या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. आपण बऱ्याचदा भ्रमात जगतो आणि त्याला सकारात्मकतेचा मुलामा देऊन वास्तवाकडे दुर्लक्ष करतो, हे या दाव्यातून लक्षात येते.
प्रसारमाध्यमांच्या समकालीन स्थितीवरही या पुस्तकात बोट ठेवले आहे. एक जण सांगतो, “सांभाळून हां… आजोबा ते पत्रकार आहेत.” त्यावर आजोबा विचारतात, “हो? कुठल्या पक्षाचे?” हा उपरोधिक टोला जिव्हारी लागण्यासारखा असतो; परंतु तो नाकारता कसा येईल? असे विविध संवाद वाचत ‘ओके’, ‘सॉरी’ आणि थँक्यू’ हे पुस्तक कधी संपते, ते कळतही नाही. त्यात कधी उपरोधिक, तर कधी तिरकस, तर कधी विनोदी स्वरुपाचे भाष्य आहे; पण त्यामागे एक गंभीर विचारसुद्धा असतो, तो आपल्या अंतरमनापर्यंत चपखलपणे पोहचविण्यात लेखकद्वयी यशस्वी झालेले दिसतात.
आपण आयुष्यभर कुठे कुठे सुख शोधत असतो. ते आपल्याच भवताली असते. ते छोट्या छोट्या छोट्या गोंष्टींत सामावेलेले असते. आपल्याला वाऱ्याच्या झुळूकमधील संगीत ऐकता यायला हवे, वृक्ष वेलींच्या पानांच्या सळसळीतली कळ लक्षात यायला हवी, समुद्राची गाज कानांत साठवता यायला हवी, आवडत्या व्यक्तीचा हातात हात घेऊन एकमेकांच्या स्पर्शाची अनुभूती घेता यायला हवी, आदी लहान सहान गोष्टींत आनंद, सुख, समाधान सामावलेले असतं! त्याच्यासाठीच तर ‘ओके… सॉरी… थँक्यू!’ वाचायला हवे!
-डॉ. जगदीश मोरे
No comments:
Post a Comment