Thursday 3 October 2024

गावगाड्यातल्या गाभाऱ्यातील ‘गाभ’ #गाभ #Gaabh #Marathi_Movie

शेतकऱ्यासाठी शेतीचा तुकडा केवळ ढेकळं असलेली जागा नसते. तो त्याच्या काळजाचा तुकडा असतो. तेच त्याच्या जगण्याचं निमित्त असतं आणि मरणाचंही सबळ कारण असतं. म्हणून आपल्या पोरांना शिकविण्यासाठी शेतकरी धडपडत असतो. पोरगं शिकंल. कुठं तरी नोकरीला चिकटंल, हीच आशा त्याच्या जगण्या-मरण्यातलं अंतर वाढवते. ‘गाभ’मधल्या दादूच्या (कैलास वाघमारे) कुटुंबाचंही हेच तर प्राक्तन असतं.

दादूची आई लहानपणीचं हे जग सोडून गेलेली असते. बाप झाडाला टांगून घेतो. आजी दादूचा सांभाळ करते; पण आजी आणि दादू एकमेकांशी सरळ बोलतच नाहीत. दोघांतल्या ताणतणावाचं भावविश्व उलगडत ‘गाभ’चं कथानक पुढं सरकतं. शेतकरी, शेतमजूर किंवा पशुपालकांचं गावगाड्यातलं जगणं लेखक-दिग्दर्शक Anup Jatratkar अनुप जत्राटकर आपल्या ‘अँगल’नं पडद्यावर उभं करतो. शेती- मातीशी नाळ असलेल्या प्रत्येकाला तो ‘अँगल’ आपला वाटतो. ते सिनेमाशी एकरूप होतात. शहरातल्या प्रेक्षकांनाही गावातलं जगणं, जगण्यातली गरिबी आणि गरिबीतल्या हतबलतेविषयी कणव वाटू लागते.

        वयाची तिशी उलटली तरीही दादूचं लग्न जमत नाही. मुलगी मिळत नाही. ‘टोणगा’ गावभर फिरतो, म्हणत आजी टोमणे हाणते; पण आजीच्या टोमण्यात चिंतेची छटा असते. नातवाचे दोनाचे चार हात होत नाहीत, म्हणून ती अस्वस्थ असते. दादूही चिडचिड करतो. दोघांमध्ये सारखे खटके उडत राहतात; पण दोघांचंही एकमेकांवर निर्विवाद प्रेम. एकमेकांशिवाय दोघांना तिसरं असतंच कोण? हीच तिसरी व्यक्ती येण्याचा प्रवास म्हणजे ‘गाभ’चं कथासूत्र!

लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर उपवर मुलांनी तीन-एक वर्षांपूर्वी मोर्चा काढला होता, ही आठवण सिनेमा बघताना येत राहते. गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि सामाजिक समतोल राखला जावा, अशी मागणी या मोर्चाद्वारे झाली होती. खरे तर शेती कसणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे या विषयावरचं दत्ता पाटील यांचं ‘तो राजहंस एक’ हे नाटक संवेदनशील माणसाचं ह्रदय पिळवटून टाकतं. आपला मुलगा शेती करणारा असला तरी आपल्या मुलीला मात्र शेतकरी नवरा नको, ही शेतकरी बाबाची आगतिकता या नाटकातून प्रतीत होते. मातीशी नातं तोडायचं असतं, असं नाही; पण शेतीत पिकणाऱ्या दारिद्र्यावर जगण्यासाठी पुढच्या आणखी किती पिढ्यांना मातीत ढकलावं, हा बापाच्या मनातला सवाल असतो. दादू आणि दादूचा भवताल तरी त्याला अपवाद कसा राहणार?

दादूला शिकून नोकरी करायची असते. शेतीवावरातून त्याला बाहेर पडायचं असतं. म्हणूनच कॉलेजची फी भरण्यासाठी दादूचा बाप खटाटोप करून कुठून तरी उधार- उसनवारीनं पैसे मिळवतो, पण एसटीच्या प्रवासात ती तुटपुंजी रक्कम चोरीला जाते आणि दादूचं शिक्षण तिथंच संपतं. बाप आत्महत्येचा मार्ग पत्करतो. पोरक्या दादूचा सांभाळ आजी करते. बापानं शोधलेल्या पळवाटीचा राग दादूच्या नसानसात भिनलेला असतो.

आजीच्या आग्रहास्तव दादू म्हैस विकत आणतो. म्हशीला गर्भधारणा होण्याची प्रक्रिया म्हणजे गाभ घालणे. म्हैस माजावर आल्यावर ती गाभण राहावी म्हणून तिला रेडा लावावा लागतो. दूधदुभतं हवं म्हणून म्हैस पाळली जाते. म्हैस दूधही देते आणि पुढची पिढीही जन्माला घालते. रेडा जन्मला तर त्याचा उपयोग शून्य असतो. बाईच्या पोटी मुलगी जन्मली तर ती नकुशी ठरते. प्रसंगी तिच्या नरडीला नखं लावली जातात. म्हैशीच्या पोटी मात्र रेडकू जन्मलं तर ते कसायाला दिलं जातं. या रितीरिवाजात प्रतिष्ठा आणि उपयोगिता शोधणाऱ्या सभ्य समाजासाठी ते नैतिक असतं, यावरच ‘गाभ’ भाष्य करतो.

शेती, माती, पुरुषप्रधान संस्कृती, गावगाड्यातले व्यवसाय, कर्जबाजारीपण अशा अनेक विषयांना ‘गाभ’ स्पर्श करतो. भाष्य करतो; पण या सिनेमाबाबत सोशल मीडियावर केवळ ‘म्हशीला रेडा लावणे’ यावरच चर्वणं होताना दिसत आहेत. त्यामुळे सिनेमा न बघताच भाष्य करणं आणि आपलं ‘परसेप्शन’ ठरवून टाकणं, हे ‘गाभ’च्या व्यावसायिक यशासाठी धोकादायक ठरू शकतं. दिग्दर्शक किंवा कलावंतांनी कुठंही हा सिनेमा अश्लीलतेकडं झुकू दिलेला नाही. अनुपने अतिशय संवेदनशीलपणे सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. खरं तर इथं विषय जनावरांचा आहे. बॉलिवूडच्या सिनेमातली माणसं तर बरीच पुढं गेली आहेत. ‘स्क्रिप्ट’ची गरज म्हणून त्याचं समर्थनही होतं. म्हणून प्रेक्षक हिंदी सिनेमा भरभरून पाहत असतील. मराठी प्रेक्षकांमध्ये तेवढी प्रगल्भता आली नसावी, असं म्हणण्यापेक्षा मराठी प्रेक्षकांची अभिरुची अद्याप तेवढी बिघडलेली नाही, असं म्हणणं अधिक उचित ठरेल.

म्हशीला रेडा लावण्याचा कार्यक्रम हा ग्रामीण भागात तसा नवलाईचा नाही. रेडा पाळणाऱ्यासाठी तो व्यवसाय असतो. म्हैस कुणाच्या तरी जगण्याचं साधन असते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून म्हशीला गाभ घालता येतो. त्यातून दुधाळ जनावरांचं 'फलन' केले जाते. ‘गाभ’ची नायिका फुलवा (सायली बांदकर) म्हशींना कृत्रिम रेतनाच्या सुया टोचायला विरोध करते. बंडखोर फुलवा बापाचा वारसा चालवते. ती म्हशीला रेडा लावण्याचा व्यवसाय पुढे नेते. बाप अभिमानाने म्हणतो, सा शाब्बास पोरी! आपल्या साता जन्मात अन् सत्तर पिढ्यांत हे काम कुण्या बाईनं केलं नव्हतं. पन तू वहिवाट तोडलीस पट्ठे!

पुरुषप्रधान समाजात विशिष्ट व्यवसाय- धंद्यात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असते. पोटापाण्याचा तो व्यवसाय असतो; पण बाईनं केल्यास तो कमी दर्जाचा ठरतो. त्यातही गाभ घालण्याचा व्यवसाय कमीपणाचा असतो. आपल्या म्हशीला गाभ घातलेला चालतो; पण गाभ घालणारे लोक चालत नाहीत. समाजाची वाईट नजर चुकविण्यासाठी फुलवाची आई रेडा कसायाला देण्याचा परस्पर व्यवहार ठरवते. ते ऐकून फुलवाच्या बापाचा संताप अनावर होतो. तेव्हा तो फुलवाला सांगतो, राजाचा (रेडा) अन् तुझा जन्म एकाच दिवशी झाला. तेव्हा माझी आय म्हनली व्हती- एकाला कसायाला विक आन् दुसरीच्या नरडीला नख लाव. पण, मी ठरवलं, राजाला मोठा करणार अन् ह्योच धंदा करनार आन् दुसरीला अशी वाढविनार की सम्द्या लोकांनी तोंडात बोटं घालावीत. कुठलाबी धंदा वंगाळ नसतो पोरी, वंगाळ असते ती मानसाची नजर!

फुलवा आणि तिच्या बापातल्या या संवादातून संपूर्ण थिएटरभर कारुण्याचे तरंग उमटतात. सिनेमातला असाच आणखी एक प्रसंग काळाजवर जखमा करणारा आहे. आक्काचा नवरा गावपुढारी. त्यांच्याकडे चंद्रा नावाची म्हैस असते. आक्का सांगते, चंद्रीला रेडा झाला, तो कसायाला विकून भुसा भरायला दिला. भुसा भरलेल्या चामड्याच्या वासानं ती दूध देईल बी. पन कितीबी झालं तरी आईचंच काळीज तिचं. तिला काय कळंत नसलं, आपलं लेकरू हालत नाय, हंबरत नाय. निस्त्या चामड्याच्या वासानं ती दुसऱ्याच्या लेकरांसाठी दूध देती. एवढंच करायचं होतं, तर त्येलाबी मारुन टाकायचं की- माज्या दोन तान्ह्युल्या पोटातच मारल्या तशा. सम्दं गाव मला वांझोटी म्हनतंय. माझ्या ह्या आटलेल्या दुधाचा वाली कोन?

म्हशीचा नर कसायाला दिला जातो. माणसाच्या मादीसाठी बापचं कसाई होतो. तिकडे मादी चालते इकडे चालत नाही. मुलीचा जन्म, तिचं जगणं, तिचं शिक्षण, तिचं लग्न, सारं काही परस्पर; पण गावखेड्यातली फुलवा त्याला छेद देऊ पाहते. मुलगा- मुलगी भेद कमी होत असतानाच कोवळ्या कळ्या खुडणारे अजूनही आपल्या भोवताली वावरताना दिसतात. एवढंच काय? पापी लोकांच्या पोटीच मुली जन्मतात, असं म्हणणारे काही शिक्षित म्हणविणारे बघितल्यावर त्यांचा आणि शिक्षणाचा किंवा संस्कारांचा काय संबंध? असा प्रश्न पडतो. त्यामुळे फुलवा अधिक आश्वासक वाटू लागते.

शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी शेतकऱ्याच्याही मुली मिळत नाहीत. शेतीत पुरेसं पिकत नाही. नोकरी नाही, रोजगार नाही आणि लग्नही जुळत नाही. तरणीबांड पोरं व्यसनाच्या आहारी जातात. दारू, सिगारेट नित्याचं होतं. ‘शेतकरी’ या शब्दाची अस्मिता राजकीय पटलावर कितीही टोकदार झाली तरी अल्पभूधारक किंवा लहान शेतकऱ्याच्या जगण्यात काहीच फरक पडत नाही.

पशुपालकाच्या दारी बांधलेलं जनावर हे केवळ त्याचं पशूधन नसतं. ते त्याच्या पोटच्या गोळ्यागत असतं. हे विविध कलाकृतीतूनही आतापर्यंत मांडलं गेलं आहे. मंगेश हडवळे यांचा 2008 मध्ये आलेला ‘टिंग्या’ हा सिनेमा एका ग्रामीण मुलाची बैलाशी असलेल्या मैत्रीची कहाणी होती. ‘गाभ’मध्येही आजी म्हशीवर जीवापाड प्रेम करते. ‘टिंग्या’च्याच मागेपुढे उमेश कुलकर्णी यांचा ‘वळू’ हा सिनेमा झळकला होता. त्याचं बरंच कौतुक झालं होतं. तो करमणूकप्रधान होता. त्यातलं स्टारकास्ट मोठं होतं; ‘गाभ’ मात्र पूर्णत: सामाजिक पट उलगडून दाखवतो. ग्रामीण वास्तवाकडं लक्ष वेधतो.

म्हशीच्या निमित्तानं दादूच्या भग्नह्रदयी प्रेमवेल फुलू पाहते; परंतु फुलवा इज्जत नसलेला रेडा लावण्याचा धंदा करते म्हणून दादूचा काका दादू आणि फुलवाच्या प्रेमाचा विचका करतो. या दोघांच्या भग्नह्रदयी प्रेमपुष्प फुलते का? कोमजलेली ह्रदयवेल पुन्हा बहरते का? त्यांच्या मुखमंडलांवर हास्य उमटते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘थिएटरा’ला जाऊनच ‘गाभ’ बघायला हवा!

गाभ’ ही कथा आहे एका मानसिकतेची आणि एका तरुणाची. ती आहे संपूर्ण गावगाड्याची. ती आहे जनावरांची आणि माणसातल्या पशूची. लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी ही कथा आपल्यासमोर आणली आहे. अनुपचा हा पहिलाच मोठा सिनेमा. दहा- बारा वर्षांपूर्वी अनुपच्या ‘द प्रॉमिस’ या पहिल्या लघुपटाच्या प्रिमियरला कोल्हापुरात मला उपस्थित राहता आलं होतं. त्याची आठवण पुन्हा ताजी झाली. मध्यंतरापर्यंत ‘गाभ’ पाहताना अनुप लेखक म्हणून आणि मध्यंतरानंतर तो खऱ्या अर्थाने दिग्दर्शक म्हणून मनाच्या ‘बॅकएण्ड’ला दिसू लागतो. मध्यंतरापूर्वी अनुपनं लिहिलेली कथा वाचत असल्याचा भास होतो. माझा मित्र Alok Jatratkar चा लहान भाऊ म्हणून कित्येक वर्षे मी अनुपला पाहतो आहे. कदाचित त्याचा हा परिणाम असावा. सिनेमाचा नायक कैलास वाघमारे या सिनेमाचा संपूर्ण पडदा व्यापतो. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक पाहिलं असेल, तर कैलास नक्की आठवेल. कैलासनं आजवर विविध चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी’मध्येही त्याची भूमिका आहे. ‘गाभ’मधील दादूची करूण कहाणी प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहचविण्यात कैलास यशस्वी ठरतो.

बंडखोर फुलवाची भूमिका सायली बांदकरने फारच छान सजवली आहे. वेगवेगळ्या एकांकिकांतून, नाटकांतून आणि मालिकांमधून ती यापूर्वी दिसली आहे. ग्रामीण जीवनाशी रोजचा संबंध नसतानाही सायलीने फारच उत्तम पद्धतीने ग्रामीण जगणं या भूमिकेसाठी आत्मसात केलं आहे. ‘गाभ’चे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे. सावनी रवींद्र, प्रसेनजीत कोसंबी आणि आनंद शिंदे यांनी गाणी गायली आहेत. त्यामुळे ‘तुझ्यापायी झालं मन येड रं खुळं’ आणि ‘तुझा मी रेडा, तू माझी म्हस’ ही दोन्ही गाणी कथेला आणखी साज चढवितात. निर्माते मंगेश गोटुरे यांनी धाडसाने या सिनेमाची निर्मिती केली, हेही महत्त्वाचं आहे.

-डॉ. जगदीश मोरे

No comments:

Post a Comment